'सा' ......

Submitted by बेफ़िकीर on 30 November, 2011 - 02:02

"ये इकडे! ये! तू असा जवळ आणि मला बिलगून झोपलास की तुझी पत्नी असूनही माझ्यातील मातृत्व जागे होते रवी! तुला कुशीत घेऊन थोपटत थोपटत झोपवावे आणि रात्रभर जागे राहून तुझ्या निरागस चेहर्‍याकडे बघत राहावे असे स्वप्न असते माझे! पण अनेकदा दिवसभराच्या धावपळीने कोणत्यातरी बेसावध क्षणी माझाही डोळा लागतो आणि एकदम सकाळीच जाग येते तेव्हा तू मला माझे मातृत्व विसरायला लावून पत्नीत्व आठवून द्यायचा प्रयत्न करत असतोस. एकाच रात्रीत दोन दोन भूमिका निभावणे मला काही अवघड नाही तसे! पण एकाच व्यक्तीप्रती असे करण्यासाठी मात्र मधे एक रात्र घालवावी लागते हेही खरेच! मगाशीच जेवताना आपले ठरल्याप्रमाणे आज फक्त आणि फक्त मी बोलणार आहे. तू फक्त ऐकायचंस!

काही नाही रे! खरं सांगू? आज जरा कन्फेशनचा मुड आहे. खरंच! आपल्या लग्नाला बारा वर्षे झाली. अद्वैतही आता आठ वर्षाचा आहे. या बारा वर्षात आपण जवळ आणि लांब दोन्ही गेलो एकमेकांपासून!

हो! त्याला प्रामुख्याने कारणीभूत माझे गायनच आहे रवी! आय अ‍ॅग्री! तुझं... अंहं... असं लांब जाऊ नकोस ना! माझ्याकडे बघ! बघ! प्लीज आज माझं पूर्ण बोलणं ऐकून घे! ऐक ना! मला मान्य आहे की माझं गायनच त्याला कारणीभूत आहे. पण खरं सांगू का? अरे गायन हे काही मी ठरवून करत नाही रे! सकाळी उठले की सूर माझ्या ओठांभोवती गोळा होतात. ओठांवरून जीभ फिरवून चहा टाकताना हळूच त्यातले दोन तीन सूर गळ्यात आतमध्ये जातात. मला नसते माहीत ते! साखर झोपेतल्या तुझ्या चुळबुळीला असलेली मधुर लय पकडून माझ्या गळ्यातून ते सूर पुन्हा उमटू लागतात. माझ्या जागेपणीचे पहिलेवहिले चिन्ह तुझी चुळबूळच असते. त्यामुळे माझा दिवस सुरू होतो तोच मुळी प्रेमाच्या उत्तुंग लाटेवर स्वार होऊन! त्या लाटेच्या सर्वोच्च बिंदूला असताना डोळे जातील तिकडे आपल्याहून खुजा असा वास्तव जगाचा समुद्र दिसत असतो आणि आपल्याच उंचीचा आपल्यालाच हेवा वाटू शकतो. माझी आजवरची प्रत्येक सकाळ त्याच लाटेवर उजाडण्यास कारणीभूत ठरणार्‍या तुला त्या लाटेवर मी असताना माझ्या गायनप्रतिभेतून त्या कृत्याचा प्रतिसाद आपोआप उमटणे मात्र आवडत नाही.

असे का रे?

मी म्हणजे साक्षात गायन आहे रवी! हे मला जाणूनबुजून करावेच लागत नाही. माझ्या मनःपटलावर दिसणार्‍या भावना सुरांच्या आरश्यात प्रतिबिंब पाडून आपोआप जगाला दिसू लागतात. माझा गळा बाहेरून जितका नाजूक त्यापेक्षा आतून अधिक आहे. त्याला मी काय करू? माणूस श्वास घेतो तसे सूर माझ्यातून बाहेर येतात रे!

तुला नाही का टीव्हीवरील स्पोर्ट्स चॅनेल्स पाहायची आवड? ऑफीसमधून आलास की चहा घ्यायच्या आधी आणि शूजही काढायच्या आधी तू लावतोसच ना निओ क्रिकेट किंवा टेन स्पोर्ट्स? जसे सगळेच खिलाडूवृत्तीत घ्यायची सवय तुला त्या वाहिन्यांमुळे झाली आहे ना? तसेच सगळेच गायनातून प्रतीध्वनीत करण्याची मला! इतकाच काय तो फरक! कोणत्याही उर्मीच्या आविष्काराच्या पायथ्याशी माणूसपणच असतं रे! वरवर दिसायला आविष्कार एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असतात रवी, पण नर्तकीच्या सुडौल आणि दिलखेचक हालचाली या मुस्लिम सूफीच्या मध्यरात्री गायलेल्या आर्त भक्तीगीतापेक्षा मुळात वेगळ्या नसतातच. त्याच्या मुळाशी एकच प्रेरणा असते. माणूसपण आणि व्यक्त होण्याची प्रेरणा! इतकेच काय तर अगदी वर्षानुवर्षे एकच मशीन ऑपरेट करणारा वर्करही त्या ऑपरेशनमध्ये एक लय निर्माण करतो. त्याच्या हालचाली जगातील कोणत्याही उत्कृष्ट नर्तकीच्या हालचालींइतक्याच श्रेष्ठ असतात रे!

ही साधना आहे रवी! एक उपासना आहे. मिळालेल्या देहाचा सर्वोच्च दर्जाला उपयोग करण्याची उपासना! यात कोणी पुढे असतो तर कोणी मागे! मन हा देहाचाच एक भाग! काही वेगळे नाही.

एक साधा 'सा' लावण्यात कित्येक पुनर्जन्म घ्यावे लागतात.

होय! साधा 'सा'! एक साधा सूर!

आजवर कोणाकोणाला जमलाय तो?

पेटी या वाद्यालाही जमला नाही. कारण पेटी बनवणाराच मुळात 'सा' लावू शकत असेल असे नाही रवी!

खूप विनोदी विधान वाटेल तुला हे! पण ते अत्यंत गंभीर विधान आहे रवी!

एका कागदावर पेनाने एक अगदी लहानशी आणि अतिशय फिक्कट रेषा काढून बघ! तिच्या उजवीकडे तितक्याच लांबीची पण जरा अधिक स्पष्ट अशी रेषा काढ! त्यानंतर आणखीन उजवीकडे आणखीन एक तशीच पण अधिक स्पष्ट रेषा काढ! अशा एकंदर पाच रेषा काढ! एकापेक्षा एक स्पष्ट अशा! मग सहाव्वी रेषा मात्र अत्यंत स्पष्ट काढ! लांबी तीच ठेवायची सगळ्या रेषांची! त्या अतिशय स्पष्ट अशा सहाव्या रेषेच्या पुढे मात्र उतरत्या क्रमाने अस्पष्ट होत जाणार्‍या अशा पाच रेषा काढ! पहिल्या पाच रेषांच्या अगदी उलट! म्हणजे फिक्कट ते सुस्पष्ट ते पुन्हा फिक्कट असा हा प्रवास! रेषांचा प्रवास! या रेषा म्हणजे काय आहेत माहीत आहे??

रवी, हे सगळेच 'सा' आहेत. यातील प्रत्येक रेष एक 'सा' आहे रवी!

सर्वात मधील आणि सर्वात सुस्पष्ट अशी जी रेष आहे ती.. ...तो खरा.. परफेक्ट 'सा'! तो खरा 'सा' असतो.

बाकीचे जे 'सा' असतात ते एक तर आधीच्या सप्तकातील 'नी' कडे तरी धावणारे असतात किंवा त्याच सप्तकातील 'रे' कडे तरी!

'सा' जो लावायचा असतो तो हा, मधला, सुस्पष्ट!

तुला माहीत आहे असा 'सा' कोण कोण लावू शकतं भारतात?

क्रमांक एक, लता मंगेशकर!

क्रमांक दोन, सौ. रसिका पाध्ये, म्हणजे तुझी बायको, मी!

क्रमांक तीन, कोणीही नाही.

आजवरच्या इतिहासात, जो मला आणि काही तज्ञांना माहीत आहे, त्यानुसार भारतात तरी असा 'सा' लावणारे दोनच गायक, खरे तर गायिका झाल्या आहेत. लतादीदी आणि मी!

हासशील तू!

हास! पण तुला हे आज खरे वाटले नाही तरी तज्ञांना विचार रवी! मीच तसा 'सा' लावू शकते. रियाझाशिवाय तसा 'सा' लताबाई लावू शकतात. आणि रियाझाशिवायच मीही! रियाझ करून या 'सा' पर्यंत पोचणारे अगणित गायक झाले आणि होत राहतील रवी! पण गळ्यातच सर्वात सुस्पष्ट रेघेचा 'सा' लावणार्‍या आम्ही दोघीच!

खिदळून झाले असेल तर पुढचे ऐक! हा जमाना परफेक्शनचा नाही. हा जमाना गुणवत्तेचा नाही. अन्यथा मीही त्याच दर्जाची समजले जाण्यात काहीच अडचण नव्हती. पण हा जमाना आहे दिखाऊगिरीचा रवी!

या जमान्यामधे तुमच्या गुणवत्तेला कोणीही विचारत नाही. तुमच्या 'सा' प्रमाणे स्वतःचा तबला लावून घेतील, पण 'सा' चे कौतुक करणार नाहीत. कौतुक तेव्हाच होईल जेव्हा आपण लाळघोटेपणा करून स्वतःचे स्थान निर्माण करू.

स्वतःचे स्थान निर्माण करताना मात्र हजारो लोकांना आपल्यापेक्षा अधिक सन्मान द्यावा लागतो रवी, अक्षरशः बहाल करावा लागतो. 'तुम्ही म्हणजे ग्रेटच, आह काय तान लावलीत, वावा हा सूर लावावात तर तुम्हीच' असे कोणाही सोम्यागोम्याला म्हणावे लागते. तो सोम्यागोम्या केवळ आपल्याला त्या त्या कार्यक्रमात घेणार असतो आणि पैशासहीतच प्रसिद्धही करायला तयार झालेला असतो म्हणून!

मी तत्वाप्रमाणे जाणारी होते हेच मी आता विसरून गेलेले आहे. माझ्यासारखा 'सा' कुठे लावलात तुम्ही हा प्रश्न मी आता 'सा' ऐवजी 'नी' किंवा 'रे' लावणार्‍यालासुद्धा विचारत नाही. या सर्व भ्रामक, खुळ्या कलाविश्वात एक धनंजय सोडला तर कोणीही मला कधीच म्हणत नाही रवी, की रसिका तुझ्यासारखा 'सा' लावणे या जन्मात तरी अशक्यच आहे. स्वतः धनंजयही रियाझाशिवाय त्या 'सा' ला पोचत नाही मात्र त्याच्यात आणि जगात फरक इतकाच की तो हे मान्य करतो, जग मान्य करत नाही. रसिका पाध्ये रियाझाशिवाय 'सा' लावू शकते हेही कोणी मान्य करत नाही. त्यामुळे धनंजयच्या प्रामाणिकपणाचा आदर वाटून मी असे ठरवले आहे की कार्यक्रम करेन तर फक्त त्याच्याचबरोबर किंवा किमान त्या सगळ्या ताफ्यात तो तरी असलाच पाहिजे. अन्यथा मी कार्यक्रम करणारच नाही. पैशाची आपल्याला काय ददात आहे रे? दोन बेडरूम्सचा फ्लॅट, भरपूर खेळते पैसे आणि तुझ्या गावी असलेल्या शेतीवर एकट्या तुझा हक्क! मी केवळ त्या कलेसाठी हे सगळे करत होते. आणि कलेचे जिथे चीज होते त्या ठिकाणी जाण्यात कलाकाराला कसा दोष देता येईल. एक मात्र आहे रवी, तू कधीच माझ्या गायनाला, गावोगावी जाऊन कार्यक्रम करण्याला ... कधीच विरोध केला नाहीस. तो मागच्या आठवड्यात एकदाच केलास तितकाच! मी इंदौरला गेले असताना आणि परत आल्यावर तू खूप संतापलास तेवढेच!

पण सांगू? इंदौरला मला तीन हजार रुपये मिळाले, जाण्यायेण्याचा खर्च वेगळा! अर्थात पैशासाठी नव्हते गेले. पण इंदौरचे रसिक म्हणजे काय रसिक असतात रवी! तुला सांगून नाही जाणवणार रे! अक्षरशः खिळून राहिले होते पहाटे चारपर्यंत!

तुला लोणचे खूप आवडते त्यावरून आठवले. जेवणात म्हणे लोणचे असते तसेच संसारातील वाद असतात. लोणचे या पदार्थाबद्दल मला अतिशय उत्सुकता आहे. किती वर्षे टिकते ते! म्हणजे संसारातील वाद टिकतात असे नाही हां म्हणायचे मला! नाहीतर चिडवशील उगाचच मला! लोणच्यात कित्ती मसाले असतात. किती चवी असतात. आणि इतके करूनही लोणचे दिसायला मात्र वेगळेच असते. त्याची एक संमिश्र चव वेगळीच असते. आजवर बाहेरून आपण लोणचे आणायचो. तुला आवडते म्हणून गेल्या वर्षापासून मी घरीच लोणचे करायला लागले. तुला मी केलेले लोणचेही आवडते. काही नाही रे, जरा विषयांतर!

हं! तर 'सा'!

आपला हनीमून आठवतो. सलग सहा दिवस आपण धसमुसळेपणा करून प्रत्यक्ष प्रेमापासून वंचितच राहिलो होतो वेड्यासारखे! ज्या बिंदूला संपूर्ण शरीर एका स्वर्गीय फ्रिक्वेन्सीला जाऊन थरथरते, आपले आपल्यावरील नियंत्रण सुटते आणि नंतर कित्येक तास एकमेकांच्या मिहीत अबोलपणे पड्न राहावेसे वाटते तो बिंदू आपल्याला आपल्या हनीमूनच्या शेवटच्या दिवशी मिळाल होता.

बावळटपणाच सगळा!

तुला पटकन कळावं म्हणून उदाहरण दिले रे!

शेवटच्या दिवशी आपल्या दोघांचा 'सा' लागला. एकत्रीतरीत्या!

रियाझाशिवाय नव्हे, तर रियाझानेच!

पण रवी, धनंजयचा गातानाचा 'सा' रियाझाने लागत असला तरी... 'त्यातला' 'सा' मात्र रियाझाशिवाय लागतो रे!

मला खरा 'सा' माहीतच नव्हता. तुला तर अजूनही माहीत नसेल.

मला तो धनंजयमुळे कळला.

तुला राग येणे साहजिक आहे. पण माझी मनस्थिती कशी झाली माहीत आहे का रवी?

मला जणू माझ्या गायनात आजवर खरा 'सा' आलाच नव्हता असे धनंजयच्या त्या 'सा' मुळे वाटू लागले.

कोणतातरी एक 'सा' पकडायचा होता मला! पण नंतर समजू लागले.

खरे तर मला ..... खरे तर मला दोन्ही 'सा' हवे होते...

दुसरा 'सा' केवळ धनंजय देऊ शकत होता.... थिल्लर भावना वाटेल तुला.. पण मानवी देहाचा सर्वोच्च सुखाचा बिंदू जर प्राप्तच होत नसेल तर काहीच अडचण नसते रे... पण एकदा प्राप्त झाल्यावर मात्र तो सतत प्राप्त व्हावासा वाटू लागतो... हारले मी...

रवी... ऐक ना... रागवू नकोस... मी खरच हारले अरे...

नाही आठवलं काहीही मला... तू... अद्वैत... माझा गायनातील 'सा'... काही... काहीच नाही आठवलं...

... आणि आता??? आता मला काही आठवायचंच नाही आहे... मला आता दोन्ही 'सा' हवे आणि हवे'च' आहेत रवी...

म्हणून तर... ज्यात काहीही घातलं तरी चवीत आणि दिसण्यात काही फरकच पडू शकत नाही अशा लोणच्यात....

.... आज मी वीष घातलं रवी...

तू आत्ता निर्जीव असलास तरी माझं सगळं ऐकत असशील अशी आशा आहे...

======================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

शेवट्च्या ओळीपर्यंत उत्कंठा टिकून राहिली आणि अनपेक्षित शेवट झाला.

'गाणे' हा जिव्हाळ्याचा विषय घेऊन सुरांच्या बाबतीत खरे आहे ते भाष्य कथेतून केल्याबद्दल आपला आभारी आहे. ह्यातले बर्‍याच अंशी प्रत्येक गाणार्‍याला अनुभवायला येते.

Happy

ज ब र द स्त...........अनपेक्षित शेवट

oops!
अशीच reaction आली..आपोआप!
एक नंबर!

completely.....speechless............!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
निव्वळ अप्रतिम..........!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बेफिकीर,

कथा उत्कंठावर्धक आहे. शेवटी ती त्याला सोडून जातेय की काय असं वाटंत होतं. पण अनपेक्षितपणे त्यालाच दूर केलं. जर दोन्ही 'सा' हवे होते तर रवीला संपवलं कशाला...?

रसिकाच्या मनात काय वादळं चालली असतील याचा अंदाज येत नाही.

शेवट असा काहीसा असता तर थोडीफार संगती लागली असती.

"मला दोन्ही 'सा' हवे होते. पण नाही रे मिळू शकत! हे सारं असह्य होतंय. मी हरलेय. तुला दुखवायचं जिवावर आलं होतं. अक्षरश:!! म्हणूनंच ते लोणचं मीही खाणारेय रे!!"

अर्थात हे माझं वैयक्तिक मत. लेखकाचा अधिकार अबाधित! Happy

आ.न.,
-गा.पै.

मीच तसा 'सा' लावू शकते. रियाझाशिवाय तसा 'सा' लताबाई लावू शकतात. आणि रियाझाशिवायच मीही! रियाझ करून या 'सा' पर्यंत पोचणारे अगणित गायक झाले आणि होत राहतील रवी! पण गळ्यातच सर्वात सुस्पष्ट रेघेचा 'सा' लावणार्‍या आम्ही दोघीच!>>>>
हे नायिकेचे विचार धक्कादायक वाटले!! पण गाणं करणारी ''ती'' असं काही करेल हा अजून धक्का!!!

पहिल्यांदा वाचल्यावर काही निर्ण्य घेता आला नाही..........!
म्हणुन दुसर्‍यांदा वाचली.
तर... तुमची नायिका खुपच फारवर्ड निघाली!

धक्कातंत्र- कहानी मे ट्विस्ट आवडला. Happy
कहाणीबद्दल तसे म्हणू शकत नाही. हा सुरेल 'सा' वाटला नाही. हा बेसूर (किंवा भेसूर) 'स्वा' वाटला. स्वार्थातला 'स्वा'. स्वाहाकाराचा 'स्वा'.

Pages

Back to top