जंगल सफारी - क्रुगर नॅशनल पार्क - दक्षिण अफ्रिका - भाग ३ (अंतिम)

Submitted by शापित गंधर्व on 29 November, 2011 - 05:40

१८/१९/२० नोव्हेंबर ला तीन दिवसची क्रुगर नॅशनल पार्कची सफर करण्याचा योग आला. त्या जंगल सफारीचा हा वॄत्तांत.

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
जंगल सफारी - क्रुगर नॅशनल पार्क - दक्षिण अफ्रिका - भाग १
जंगल सफारी - क्रुगर नॅशनल पार्क - दक्षिण अफ्रिका - भाग २
----------------------------------------------------------------------------
दिवस दुसरा... स्कुकूझा ते सतारा कँप

पहाटे लवकर बाहेर पडायच म्हणुन रात्री झोपतांना ५:०० चा गजर लावुन झोपलो होतो. पण एकतर तो वाजलाच नाही किंवा वाजला असेल तर आम्हाला ऐकु नाही आला. ते तर नशिब की ५:३० च्या दरम्यान निसर्गाने जोरात हाक दिली (म्हणजे काय ते ओळखण्या इतपत माबोकर नक्किच हुशार आहेत) आणि मला जाग आली. निसर्ग राजाला शांत केलं आणि बाहेर आलो तर माझ्या आवाजाने (?) बायकोला पण जाग आलेली. तीला म्हटलं लवकर आवर, लगेच बाहेर पडु. पण पिल्लु अजुन झोपलेला. त्याला डिस्टर्ब करुन बाहेर यायला बायकोचं मन होईना. ती कॉटेजवरच थांबली आणि नाईलाजाने मी एकटाच बाहेर पडलो.
बाहेर पाऊस पडत होता. फार जोरात नाही पण सगळीकडे ओलं चिंब्ब झालं होत. काल संध्याकाळी दिसलेले तीन बंधुराज आता तरी उठले असतील आणि त्याच भागात दिसतील या आशेवर परत कालच्या त्या भागात गेलो. काल जिथे ते झोपले होते ती जागा आता रिकामी होती. आजुबाजुलाच कुठेतरी असतील म्हणुन त्या भागात बर्‍याच चकरा मारल्या. तब्बल दिड तास फिरत होतो पण काहिचं दिसलं नाही. हां, पुलावर बसलेले एक बबुन माकड तेव्हडे दिसले.

पुलावर बसलेले बबुन माकड

हताश होउन परत फिरलो. रेस्टकँपच्या जवळपास पोहोचलो तर सकाळी गेम ड्राईव्हला गेलेल्या गाड्या परत येतांना दिसल्या. त्यांच्या कडुन काही महिती मिळेल म्हणुन त्यांना थांबवले आणि विचारपुस केली. मी ज्या भागात फिरत होतो त्याच्या विरुध्द बाजुला फाबिनी गेट कडे दोन सिंह दिसल्याचे त्यांनी सांगितले. कॉमनली दिसणारे झेब्रा आणि जिराफ काल दिवस भरात दिसले नव्हते. त्यांच्या बद्दल विचारले आसता ते पण त्याच भागात (फाबिनी गेट) दिसतील अशी महिती मिळाली. म्हणुन मी माझा मोर्चा त्या विभागाकडे वळवला. फाबिनी गेट भाग खुप दुर होता. २० ते २५ किलोमीटर. वाटेत काल दिसलेले इंपाला, वाइल्ड बिस्ट, म्हशी असे सगळेच प्राणी दिसत होते. पण माझं टारगेट होतं चालते (बोलते) सिंह. इतरत्र कुठेही वेळ न दवडता शक्य तितक्या वेगात (५० किमी प्रती तास) फाबिनी गेट कडे सरकत होतो. मधेच एका ठिकाणी बर्‍याच गाड्या थांबलेल्या दिसल्या. कदचित सिंह असवा म्हणुन मी पण थांबलो. तर तिथे जंगली कुत्र्यांचे एक कुटूंब मस्ती करण्यात दंग होते. गुढगाभर वढलेल्या गवतात बेमालुम पणे मिसळुन गेले होते. पहिल्यांदाच मला माझ्या कारची उंची किती कमी आहे याची जाणीव झाली. खिडकी बाहेर डोके काढुन, उचकुन उचकुन प्रचि काढण्याचा प्रयत्न केला पण निट काही जमलं नाही.
पुर्ण वाढ झालेल्या जंगली कुत्र्यांची उंची साधारण २ फुट आणि वजन २५ ते ३० किलो असते. नेहमी कळपांत रहणारे हे कुत्रे शिकारीच्या मागे मैलो न मैल पाठलाग करतात. ४० कुत्र्यांपर्यंत संख्या असु शकणार्‍या कळपाचे नेतॄत्व वयोवृध्द नर/मादि करतात.

जंगली कुत्र्यांचे कुटूंब

मला माझं टारगेट विसरुन चालणार नव्हतं. विरुध्द दिशेच्या एका गाडीवाल्याला सिंहांबद्दल विचारले. त्याला पण ते दिसले होते. मग वेळ न दवडता परत फाबिनी गेटच्या दिशेने प्रवास चालु केला. थोडासा चढ चढुन खालच्या बाजुला उतरलो. या भागात बरेच मोकळे रान दिसत होते. खुप लांबवर आत झाडीत एक जिराफ चा कळप दिसला. पण खुपचं लांब होता तो. कॅमेरा झुमून झुमून कंटाळला पण जिराफ काही फ्रेम मधे फिट झालेच नाहित. पुढे सरकलो आणि सरकत सरकत फाबिनी गेट पर्यंत पोहोचलो पण चालते (बोलते) सिंह काही दिसले नाहीत. परत एकदा हताश मनाने गाडी रेस्टकँप कडे वळवली. परतिच्या वटेवर चिखलात मस्ती करणारे दोन हत्ती दिसले. तिथेच पुढे थोड्या अंतरावर दोन/तीन झेब्र्यांनी दर्शन दिले.
१.३ मिटर पर्यंत उंची असणार्‍या या झेब्र्यांचे वजन २९० ते ३४० किलो असते. बर्‍याच वेळा हे वाइल्ड बिस्ट किंवा इंपालाच्या कळपांसोबत चरतांना दिसतात. आपल्या पट्यापट्यांच्या शरीराचा उपयोग ते स्वसंरक्षणासाठी खुबिने करुन घेतात. चरतांना ते नेहमी जवळ जवळ उभे रहातात जेणे करुन तो एक मोठा प्राणी भासावा आणि शिकारी संभ्रमित व्हावा.

झेब्रा
चिखलात मस्ती करणारे हत्ती

कॉटेजवर परत आलो तर बायको व्हरांड्यात बसुन चहाचा अस्वाद घेत होती आणि पिल्लु तिथेच बजुला खेळतं होता. मी पण मग पटापट आवरलं आणि सकाळचा नाष्टा उरकला.
आज रात्रीचा मुक्काम सतरा रेस्टकँप मधे होता. स्कुकूझा ते सतारा ९० कि.मी. अंतर आज पार करायचं होत. अर्थात हातात भरपुर वेळ होता. पण मधेच कधी कुठे किती वेळ थांबायला लागेल याचा नेम नव्हता म्हणुन लवकरच निघालो. निघण्याआधी स्कुकूझा रेस्टकँप वर फोटो सेशन उरकले.

स्कुकूझा रेस्टकँप मधे आम्ही रहिलो होतो ते कॉटेज
इतर काही कॉटेजेस
पिल्लु

कँप मधुन बाहेर पडुन सताराच्या रस्त्याला लागलो तोच एक हत्तींचा कळप दिसला. नदिवर पाणि प्यायला आलेला.
फोटो मधे मागे जो ब्रिज दिसतो आहे तो साबी नदिवरचा रेल्वेचा ब्रिज आहे. खुप वर्षांपसुन वापरात नाही तो. स्कुकूझा रेस्टकॅम्प चे सुरवातीचे नाव "साबी ब्रिज कँप" होते जे १९३६ मधे बदलुन स्कुकूझा केले गेले.

हत्तींचा कळप आणि मागे दिसणारा रेल्वेचा ब्रिज

हळु हळु आम्ही सतारा रेस्टकँप कडे सरकत होतो. वाटेत बरेच पक्षी आणि प्राणी दिसत होते. शक्य होईल आणि योग्य वाटेल तिथे थांबुन भरपुर प्रचि घेतले.

असेच फिरत असतांना आत दुरवर एका तळ्याकाठी हत्तींचा कळप दिसला. जवळ जाता येत का पाहु म्हणुन मुख्यरस्ता सोडुन मातीच्या रस्त्यावर गाडी घुसवली. पण थोड्याच अंतरावर जाऊन तो मातीचा रस्ता संपला. हत्तींपर्यंत आम्ही पोहोचु शकलो नाही. मुख्य रस्त्याला यायला गाडी परत फिरवली. थोडेसेचं अंतर आलो होतो आणि मधेच बयको ओरडायलाच लागली.....
अहो.. तो बघा .. तो बघा..
काय?
अहो तो.
अगं कायsss?
सिंह!!!
सिंह? कुठे?
तो.. तिकडे...
मी आपला मठ्ठासारखा सगळी कडे बघतोय पण मला काही तो वनराज दिसेना. या सगळ्या गोंधळात ब्रेक दाबला आणि गाडी होती तिथे उभी केली.
अगं कुठेय?
तो.. तिकडे गेला...
गेला?
तुम्ही गाडी पुढे घ्या ना... हा.. आजुन थोडी....
मला काही दिसत नव्हतं. बायको सांगते म्हणुन मी हळु हळु पुढे जात होतो आणि अचानक मला तो दिसला. रस्त्याच्या उजव्या बाजुला होता तो. लगेच गाडी पुढे दामटली. पण हाय रे देवा!!! तो पर्यंत त्याने रस्ता क्रॉस करायला सुरवात केली होती आणि दोनच मिनिटात तो आमच्या समोरुन बाजुच्या झाडीत दिसेनासा झाला. त्याला रस्ता क्रॉस करु दिला नसता तर तो बरेच अंतर आमच्या गाडीला पॅरलल चलत राहिला असता आणि आम्हाला भरपुर प्रचि कढायची संधी मिळाली असती. पण म्हणतात ना "नसीब XX तो क्या करेगा पांडू".
तिथेच बाजुला तीन म्हशी बसल्या होत्या. वनराज ह्यांच्या साठी दबा धरुन बसला असेल तर बरेच काही रोमांचकारी बघयला मिळेल म्हणुन तिथेच थांबलो. बराच वेळ थांबुन पण काहीच हलचाल दिसेना मग त्यांना तिथेच सोडुन आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरु केला.

सिंह

मजल दर मजल करीत साधारण ५:०० वाजता सतारा रेस्टकँप ला पोहोचलो. रिसेप्शन वरुन आमच्या कॉटेजची चावी तर घेतली पण कॉटेजवर जायचे मन होईना. अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हीटी मॅप वर नजर टाकली तर तो कँपच्या आसपास सिंह दिसल्याचे सुचित करत होता. मग काय, परत गाडीत बसलो आणि मॅपवर दाखवलेल्या विभागाकडे चालु पडलो. ५/६ किमी अंतरावर २/३ गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या म्हणुन थांबलो तर आजुबाजूला काहीच दिसेना. थांबलेल्या गाडीवाल्याला विचारलं तर त्याने दुर झाडाकडे बोट दखवलं तेव्हा त्यांच्या थांबण्याच कारण समजल. तीन सिंहीणी त्या झाडाखाली झोपल्या होत्या. मधेच एखादी आळोखे पिळोखे द्यायची आणि परत झोपायची. आजुन दुसरीकडे शोधाशोध करण्यापेक्षा इथेच थांबु म्हणुन गाडी बंद करुन तिथेच थांबलो. पण या बहिणी पण कालच्या बंधुराजांप्रमाणेच आळशी. अजिबात उठेचना. वाट बघुन बघुन कंटाळलो. दरम्यान आमच्या पिल्लुचं डायपर पण चेंज करुन झालं पण त्या बहिणींना आमची किंव आली नाही. ६:१५ वाजुन गेलेले. ६:३० ला कँपचे दरवाजे बंद होतात. त्या नंतर कँप मधे प्रवेश करायचा तर फाइन भरावा लागतो. ते टाळण्यासाठी त्या बहिणींना तिथेच सोडुन रेस्टकँपवर परतलो.

झाडाखाली झोपलेल्या तीन सिंहीणी

चावी आधिच घेतलेली होती त्यामुळे कुठेही न थांबता सरळ कॉटेजवर आलो आणि फ्रेश झालो. बायकोने फक्कड चहा बनवला. चहाचे कप घेउन अंगणात बैठक मांडली आणि त्या शांत-रम्य वातावरणात दिवसभाराच्या भटकंतीची उजळणी सुरु झाली. माझी प्रभात फेरी सोडली तर आजचा दिवस सत्कार्णी लागला होता. बायको तर खुपचं खुष होती. सर्व साधारण पणे सिंह हत्ती सारखे मोठे प्राणी कोणाला तरी आधिच दिसलेले असतात. इतर गाड्या थांबलेल्या आहेत म्हणुन आपण पण थांबतो आणि आपल्याला ते प्राणी दिसतात. पण आज दुपारी दिसलेला वनराज बयकोला सर्व प्रथम दिसला होता म्हणुन स्वारी एकदम खुषीत होती.
दोन दिवसच्या या जंगल भटकंतीत आम्हाला बरेच वेगवेगळे पक्षी दिसले. असं म्हणतात की क्रुगर नॅशनल पार्क मधे ५१७ जातीचे पक्षी बघायला मिळतात. त्यातले २५३ इथले स्थानिक आहेत तर बाकीचे स्थालांतर करुन येथे येतात. मला पक्ष्यांबद्दल जास्त माहिती नाही. एखादा रंगबेरंगी पक्षी दिसला की त्याचे प्रचि काढायचे इतकेच केले. त्यातले काही निवडक प्रचि येथे देतो आहे.

क्रुगर नॅशनल पार्क मधे दिसलेले पक्षी

कदाचीत आम्ही त्यांच्या घारात केलेल्या घुसखोरीचा निषेध म्हणुन बर्‍याच प्राण्यांनी वेळोवेळी आमचा "रस्ता रोको" केले. हे बघा.

रस्ता रोको
इतर काही निवडक प्रचि

आता अंधार पडु लागला होता. आम्हि रात्रीच्या जेवणाच्या तयरीला लागलो. जंगी बेत होता आज. बार्बेक्यू चिकन, सलाड आणि सोबत गार्लीक ब्रेड. भन्नाट जमुन आलं होत सगळ. मस्त आडवा हात मारला कोंबडीवर आणि झोपायला गेलो.

बार्बेक्यू
दिवस तिसरा... सतारा ते ऑरपन गेट
आज पहाटे गजर वाजायच्या आधिच जाग आली. आज पण पिल्लु झोपलेलाच होता म्हणुन एकटाच बाहेर पडलो. काल संध्याकाळी तिन सिंहीणी दिसल्या होत्या त्या भागात जावे की दुसरी कडे कुठे या विचारात कँप पासुन थोडेच अंतर आलो होतो तर समोर एक गाडी थांबलेली दिसली. ती गाडी थांबली होती तिथेच रस्त्याच्या उजव्या बाजुला म्हशींचा एक मोठा कळप चरतं होता. गेल्या दोन दिवसात इतक्या म्हशी बघितल्या होत्या की त्यांच्या बद्दल आता काही अप्रुप राहील नव्हतं. म्हणुन थांबलेल्या त्या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाणार तोच त्या ड्रायव्हरने हात बाहेर कढुन मला थांबवले आणि डावीकडे गवतात बघ असा इशारा केला. गुढगाभर वाढलेल्या त्या गवतात एक सिंहीण दबा धरुन बसली होती. आमच्याकडे पुर्ण दुर्लक्ष करुन त्या म्हशींकडे नजरलावुन बसलेली. आई शप्पथ! कसला क्षण होता तो. आत्ता आठवलं तरी अंगावर काटा येतो. पाचं एक मिनिटात रस्त्याच्या उजव्या बाजुला चरणार्‍या त्या म्हशी रस्ता क्रॉस करुन सिंहीण बसली होती त्या (रस्त्याच्या डाव्या) बाजुला येऊ लागल्या आणि काय झालं कुणास ठाउक. इतका वेळ दबा धरुन बसलेली ती सिंहीण उठुन आत जंगलात जाऊ लागली. मला हा चान्स सोडायचा नव्हता. मी पण गाडी वळवली आणि ती ज्या दिशेला चालत गेली त्या दिशेने तिच्यावर लक्ष ठेवत पुढे सरकु लागलो. गुढगाभर वाढलेलं गवत आणि कारच्या कमी उंचीमुळे मधेच ती मल दिसायची मधेच नाहिशी व्हायची. मी धिर न सोडता तीचा पाठलाग करत होतो. आणि मधेच हे काय? अजुन एक सिंहीण. लगेच तीसरी. वॉव! बहुतेक काल संध्याकाळी बघितलेल्या तीन बहिणी होत्या त्या. म्हटल व्वा. आज शिकार करणार्‍या सिंहीणीचा लाइव्ह शो बघायला मिळणार बहुतेक असा विचार करत होतो तोच.. अरे बापरे!!! चौथी सिंहीण ती पण दोन बछड्यां सोबत. क्या नसिब है! व्वा!! चार सिंहीणी आणि दोन बछडे त्या मुक्त जंगलात फिरतांना पाहुन धन्य धन्य झालो. आता मला त्या गवतात दबा धरुन बसलेल्या पहिल्या सिंहीणीचे रहस्य कळले. ती शिकार करण्यासाठी तिथे थांबली नव्हती. बहुतेक मी तिथे पोहोचायच्या आधी तिन सिंहीणी आणि बछडे तिथुन पास झाले असावेत आणि बछडे सुरक्षीत अंतरावर पोहोचेपर्यंत म्हशींना थोपवुन धरण्या साठी ती सिंहीण तिथे बसली असावी. माझ्या या विचाराला दुजोरा देणारी घटना लगेचच घडली. मागुन भरभर पुढे सरकणार्‍या म्हशींना टाळण्यासाठी सिंहीणींनी रस्ता क्रॉस करुन दुसर्‍या बाजुस जाण्याचे ठरवले आणि एक सिंहीण रस्त्याच्या मधोमध येऊन उभी राहिली. माझ्या मागे खुप गाड्या थांबल्या होत्या. मला ही संधी घालवायची नव्हती. आधिच सगळ्यांच्या पुढे होतो ते आजुन पुढे झालो आणि गाडी सरळ रस्त्यावर आडवी उभी केली जेणेकरून दुसरी कुठली गाडी मधे घुसू शकणार नाही. या गडबडीत मी सिंहीणीच्या खुपच जवळ पोहोचलो होतो. फार फार तर १० मिटर अंतरावर असणारी ती सिंहीण माझ्या कडे अशा नजरेने बघत होती जणु मल म्हणत होती "आहेस तिथेच थांब, पुढे आलास तर फडशा पाडीन". तिला साथ द्यायला आणखी दोन सिंहीणी रस्त्यावर आल्या. बछड्यांना सुरक्षीत पणे रस्ता क्रॉस करता यावा म्हणुन त्या तिघी संपुर्ण रस्ता अडवुन चौथ्या सिंहीणीची आणि बछड्यांची वाट बघत उभ्या होत्या. माझ्या मागे गाड्यांची तोबा गर्दी झाली होती. तब्बल १५ मिनिट त्या सिंहीणी रस्त्याच्या मधोमध उभ्या होत्या. पण इतक्या सार्‍या गाड्यांमुळे असेल कदाचित, चौथी सिंहीण काही रस्त्यावर यायला तयार नव्हती. इतक्यात एका महाभागाने त्याची गाडी माझ्या गाडीच्या पुढे घसवली आणि रस्त्यावरच्या त्या तिन सिंहिणी बिचकल्या. आमच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकुन बछडे असलेल्या भागात नाहिशा झाल्या. मनातल्या मनात इतक्या शिव्या घातल्या त्या गाडीवाल्याला. XXXX मुळे चार सिंहीणी आणि दोन बछड्यांची मोकळ्या रस्त्यावर प्रचि काढण्याची माझी एक चांगली संधी हुकली होती.
माझी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तिथेच बसुन राहीलो. सिंहीणी दिसेनाशा झाल्यावर हळु हळु सगळ्या गाड्या निघुन गेल्या. मी तिथेच थांबलो होतो. कदाचित सामसुम झाल्यावर सिंहीणी परत रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करतील या आशेवर. पण नशिबाने पाठ फिरवली होती. पहाटे पाच वाजता आलेलो आणि आता आठ वाजले तरी तिथेच होतो. आता जास्त वेळ थांबु शकत नव्हतो. दहा वाजता चेकआउट करायच होतं म्हणुन कॉटेज वर परतलो.

चार सिंहीणी आणि दोन बछडे

अंघोळ आणि नाष्टा करुन दहा वाजता चेकआउट केलं. ऑरपन गेट मधुन पार्कच्या बाहेर पडायचा प्लॅन होता. सतारा ते ऑरपन गेट अंतर ४८ किमी. बिग फाईव्ह मधले चार प्राणी आम्हाला पहिल्याच दिवशी दिसले होते. पण पाचवा प्राणी चित्ता/बिबळ्या आम्हाला अजुन दिसला नव्हता. शेवटच्या ४८ किमीच्या प्रवासात तरी तो कुठेतरी दिसेल म्हणुन आम्ही हळुहळू शक्य तिथे मुख्य रस्ता सोडुन मातीच्या रस्त्याने फिरत ऑरपन गेट कडे सरकत होतो. वाटेत बरेच प्राणी दिसत होते. यथा अवकाश ४८ किमी अंतर पार झाले पण चित्ता/बिबळ्या ने दर्शन दिलेच नाही.

शेवटी आमची क्रुगर ची ही ट्रिप बिग फाईव्ह मधल्या पाचव्या प्राण्याच्या दर्शना शिवाय अर्धवट राहिली असे मनातुन हळहळत पण परत एकदा क्रुगरची ट्रिप करायचीच असा निर्धार करुन आम्ही पार्क च्या बाहेर पडलो.

!!!समाप्त!!!

तळ टिप - आमची क्रुगरची ही ट्रिप सर्वार्थाने ज्यांच्या मुळे संस्मरणीय ठरली ते आमचे दोन साथीदार.

निकॉन डी ९० आणि पेंटेक्स के २००

गुलमोहर: 

या लेख मालिकेतील पहिल्या दोन भागांना भरभरुन प्रतिसाद दिल्या बद्दल समस्त माबोकरांचे आभार. खरं तर लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. स्फुर्ती मिळाली ती मायबोली कडुनच. म्हणुन मझी ही पहिली वहिली लेखमालिका मायबोली आणि माबोकरांना समर्पित.
लोभ असु द्या हि विनंती. __/|\__

मस्त मालिका! यावेळचे फोटो तर सुरेखच आहेत, कॉटेज, बार्बेक्यूसह..
तुमच्या छोट्यानेही ट्रीप एन्जॉय केलेली दिसते एकदम. Happy

शापित गंधर्वः
अगदी मनापासून धन्यवाद, क्रुगर नॅशनल पार्क ची सफर घडवून आणल्याबद्दल. एक सो एक फोटो बघून तर मन खूष झाल.

जबरी Happy

शापित गंधर्व - मस्तच मजा आली - तुमच पिल्लु फार गोड आहे, रंगीत पक्षी तर अफलातुन.
झाडावर बसलेले बबुन चे पिल्लु पाहुन पुन्हा खुप हसलो, या लेख मालिकेमुळे - ऑफिसात एकाचे नवीन नामकरण झाले आहे Wink
पु.ले.शु. Happy

सर्व फोटो सुंदरच, पण पक्ष्यांचे फोटो कित्ती कित्ती सुंदर - जणू काही तुम्ही फोटो काढताय म्हटल्यावर अगदी पोज देउन बसलेत जसे.........
<<आमची क्रुगरची ही ट्रिप सर्वार्थाने ज्यांच्या मुळे संस्मरणीय ठरली ते आमचे दोन साथीदार.>>> साथीदारांनाही - त्यांना समर्थपणे हाताळू शकणारे हात, डोळे, डोके यांचा अभिमानच वाटत असणार........
सर्व वर्णनही सुर्रेखच.........
मनापासून धन्यवाद.........

अप्रतिम फोटोस....केवळ खल्लास...
तुमच्या साथीदारांच्या केव्हापासून शोधात होतो....आत्ता दिसले...बेस्ट राव एकदम....
अर्थात नुसते साथीदार चांगले असून उपयोग नाही...त्यांची साथसंगत योग्य पद्धतीने करण्यालाच जास्त महत्व...
सगळ्याच फोटोत लाईट इफेक्ट इतक्या उत्तमपणे साधला गेलाय की तोड नाही...एकेक फोटो प्रदर्शनीय आहे...
पिल्लू पण खूप गोंडस आहे...त्याला बघायला मिळाले का नाही काही प्राणी...

केवळ अप्रतिम....................
असे नजारे केवळ डिस्कवरीवरच पहायला मिळतात असे नाही.
मा.बो.वर सुध्दा पहायला मिळतात............

पुन्हा एकदा अप्रतिम......
तुम्ही खुपच नशिबवान आहात.......

वा! शापित गंधर्व, तुम्ही तर कमाल केलीत. पहिलीच लेखमालिका म्हणताय, आणि एवढं सुरेख लिहिलंय. फोटोग्राफीपण अप्रतिम ! तुमच्याकडच्या दोन कला तर आम्ही पाहिल्याच! पण तुम्ही 'शापित गंधर्व' हे नाव घेतल्यामुळे गाण्याची कला सुद्धा तुम्हाला अवगत असणार असं वाटतंय!
पक्ष्यामधे एवढी रंगसंगती ! काय मॅचिंग केलंय त्यांनी!!!!!!!! Happy
<<<झाडावर बसलेले बबुन चे पिल्लु पाहुन पुन्हा खुप हसलो, या लेख मालिकेमुळे - ऑफिसात एकाचे नवीन नामकरण झाले आ<<<>>>> ईनमीनतीन बारशाच्या घुगर्‍या वगैरे वाटल्या की नाही? Happy

अप्रतिम फोटु ... खुप छान लिव्हलय Happy
घरबसल्या तुमच्यामुळे जंगल सफारी करता आली ....... धन्यवाद Happy

शा.गन्धर्व. :- तुमची लेखमालिका खुपच सुरेख झाली.. सगळे फोटो पण एक से एक आलेत..
तुमच्यामुळे आमची एक चांगली सफर घर बसल्या घडली. खुपच मस्त वाटले.

प्रज्ञा १२३ ला १०० % अनुमोदन : गाण्याच्या बाबतीत.
तुमचे तीनही भाग निवडक १० त टाकताना खुप आनंद होतोय. Happy

Pages