वांग्याचं भरीत वेगवेगळ्या पद्धतीने

Submitted by सायो on 17 March, 2009 - 11:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नारळाच्या दुधातलं वांग्याचं भरीतः वांगं, नारळाचं दूध्,हिरव्या मिरच्या, तूप्,जिरं, कांदा.
चिंच-गुळाचं वांग्याचं भरीतः वांगं, चिंच, गूळ, कांदा, काळा मसाला, मिरची, मीठ.
दही घालून वांग्याचं भरीतः वांगं, दही,हिरवी मिरची,हवं असल्यास दाण्याचं कूट, कोथिंबीर,मीठ

क्रमवार पाककृती: 

नारळाच्या दुधातलं वांग्याचं भरीतः
वांगं तेलाचा हात लावून गॅसवर भाजून घ्यावं. भाजून गार झालं की आतल्या गरात कांदा, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घालाव्यात. त्यातच नारळाचं दूध,मीठ घालावं. वरुन तूप-जिर्‍याची फोडणी द्यावी.

चिंच-गुळाचं वांग्याचं भरीतः
वांगं तेलाचा हात लावून भाजून घ्यावं. चिंचेचा कोळ काढून घ्यावा. वांग्याच्या गरात कांदा, मिरचीचा ठेचा, मीठ, काळा मसाला,गूळ, चिंचेचा कोळ घालून एकत्र करावं. वरुन तेलाची/तूपाची जिरं घालून फोडणी करावी.
लगेच खायचं असल्यास ह्या पद्धतीने करावं.
डब्यात द्यायचं असल्यास : वांगं भाजून घेऊन गर काढाचा. तेलाची फोडणी करुन कांदा, वांग्याचा गर, व बाकीचे जिन्नस घालून परतावं. वरुन कोथिंबीर घालावी.

दही घालून वांग्याचं भरीतः
वांगं भाजून घ्यावं. गार झाल्यावर गरात मिरच्या, दही,मीठ, दाण्याचं कूट घालून एकत्र करावं. वरून तूप-जिर्‍याची फोडणी द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
१ वांग साधारण दोन जणांना
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नारळाच्या दुधातल नव्हत खाल्लं कधी. करून बघितल पाहिजे.

सायो,
यासाठी इथे मिळते ते कॅन मधल नारळाच दूध वापरले तर चालेल का?

हो चालतं. मला नारळाच्या दुधातलंच जास्त आवडतं.

मस्तच, नारळाच्या दुधात नव्हतं केलं कधी. आता करुन बघते आणि खाते Happy

ह आपला पारंपारिक पदार्थ आहे. याच भरितात पोहे मिसळून पण खातात. छान लागतात.

मस्त आहेत प्रकार सायो.

अजुन एक प्रकार गावाकडे करतात भाजून सोललेले वांगे ताटात घ्यायचे (भारतातले वांगे चलते इथे १/४ वांगे घ्यावे लागेल) त्यात थोडे दाण्याचे कुट, थोडे लाल तिखट आणि मीठ घालायचे वरुन तेलाची धार आणि शेजारी बुक्कीने फोडलेला कांदा.

छान आहेत प्रकार सायो.
अजून काही-
वांगे, कच्चा कांदा, लाल तिखट, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर, कडिपत्ता, दही, फोडणी.
वांगे, मिरपूड, मीठ, भाजलेला लसूण मॅश करुन, दही किंवा sour cream. (हे डिप म्हणून पण वापरता येतं. असा एक प्रकार 'बाबागानुश' मैत्रेयीने लिहिला होता जुन्या मायबोलीत.)

मिनोती,लालू. तुमचेही प्रकार छान वाटतायत.

सायो, मस्तच कृती आहेत सगळ्या. पाणी सुटलं तोंडाला!

माहेरी भरताचा एक फेवरिट प्रकार:
कांदा, वांगं (त्याला चीर देऊन आत लसूण भरायचा), भरपूर तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो सगळं शेगडीवर किंवा फुफाट्यात भाजायचं. वांगं सोलून कुस्करायचं. त्यात उरलेलं बाकी कुस्करून एकत्र करायचं. तिखट मीठ घालून, वरून चरचरित फोडणी ओतायची. (बदल म्हणून आंब्याच्या लोणच्याचा ताजा मसाला तिखटाऐवजी घालायचा.) फुलक्या जर्‍या जाड्या आणि खमंग भाजून त्याला वरून तुपाचा हात लावायचा. भरताशी झकास लागतात!
(पुन्हा लाळेलं लागणार!)

यम्म्म, हे वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय.

wow. एकापेक्षा एक recipe आहेत. नारळाच दुध किंवा शेंगदाण्याचा कुट. अफलातुन लागत असणार आहे.:)नक्की करुन बघणार
मी वरती लालु ने दिलय त्या पद्धतीने करते. पण फोडणी नाही देत.
सगळ्यात पहिल्यांदा आज म्रु च्या रेसिपीने करणार. आंब्याच्या लोणच्याचा मसाला घालुन . वाचुनच कधी एकदा खाईन अस झालय.
.......................................................................................................
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन. Proud

पुन्हा लाळेलं लागणार! >> मृ, किती ते पाणी सुटतंय तोंडाला .. लाळेरं सुध्दा म्हणता येत नाहीये .. :p

माझ्या सासरी केला जाणारा एक वेगळा प्रकार..
तेलावर हिंग-जिर्‍याची फोडणीकरायची. बारिक चिरुन आलं,लसुण, हिरवी मिरची ,कांदा, टोमॅटो हे क्रमाक्रमाने घालुन परतायचे. त्यात हळद, गरम मसाला घालायचा व मटार घालुन थोडावेळ झाकुन शिजवायचं. मटार शिजले की भाजलेले वांगे घालायचे व पाच मिनिट कमी गॅसवर झाकुन वाफ येवु द्यायची. नंतर वरुन चिरलेली भरपुर कोथिंबीर घालायची.
पार्टी मध्ये वैगरे करायला छान वाटतं....

वान्ग्याच्या लहान फोडी तेल मोहोरी व तिखट घालून खमन्ग परतायच्या,गार झाल्याकी कच्चा कान्दा, मीठ, ,साखर,सायीचे दही घालायचे उन्हाळ्यात दुपारी खायला सही लागते! भाजा,सोला अशी मेहेनत करावी लागत नाही!

हल्ली असे करते मैत्रिणीचे पाहुन.
कांदे फोडणीत छान खरपुस परतल्यावर, हिरवी वा रंगीत (शक्यतो लाल) ढबु मिरची चे बारीक तुकडे कापुन टाकायचे व ते पण छान खरपुस परतायचे. मगच टोमॅटो घालुन परतायचे. टोमॅटो ढेपाळले की वांग्याचा लगदा घालायचा. मग थोडा गरम मसाला व लाल तिखट व मीठ, आंअबटाला थोडेस्से आमचुर पावडर. २-४ मिनिटे शिजवुन बुडबुडे येऊ दिले की गॅस बंद व वरुन कोथिंबीर. जे काही तयार होते ते छान लागते.

अजून एक सोप्पा आणि छान प्रकार :

१. वांग्याच्या फोडी करून सालासकट कढईत तेलावर परतायच्या (झाकण घालून - वांग चांगलं मऊ व्हायला हवं)
२. जराश्या थंड झाल्या की त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, कच्चा बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ घालायचं
३. हाताने सगळं एकत्र कुस्करून कालवून घ्यायचं
४. भरीत तयार....ज्वारी/बाजरी ची भाकरी, मिरची चा ठेचा आणि हे भरीत...वाह वाह !!

छान

सौदी अरेबियावाले तिळाचे तेल घालून बाबागनोअश करतात ना ?

आमच्या शेजार्‍यांकडे किंचित वेगळ्या पद्धतीने करतात. केले की मला आवडते म्हणून थोडे आणून देतात.
वांगे तेलाचा हात लावून भाजून एका मोठ्या पातेल्याखाली पूर्ण झाकून ठेवतात. यामुळे सालीला पोपडे येऊन ती लवकर सुटते म्हणतात.
दहा-पंधरा मिरीगोटे, (वांग्याच्या आकाराप्रमाणे), एक दोन बेताच्या लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतात. मिरीगोटे साधारण भरड झाले की त्यात थोडे ओले खोबरे घालून वाटतात. मग त्यातच वांग्याचा गर घालून एक सेकंद फिरवतात. भांड्यात आयत्या वेळी वाटण, बारीक चिरलेला कांदा, दही, हवी तर थोडीशीच कोथिंबीर, मीठ, साखर घालून एकत्र करतात. मिर्‍याचा झणझणीत ताजा वास मला आवडतो.

>>सौदी अरेबियावाले तिळाचे तेल घालून बाबागनोअश करतात ना ?>> करत असतील ब्वा. काये की मी सौदी अरेबियात गेलेले नाही अजून.
जामोप्या, आज तुम्ही संत वॅलेंटाईन दिवसाच्या शुभ मुहुर्तावर हा बीबी वर काढलात का? आणि तो ही भरीताचा? Wink

हा धागा बघितलाच नव्हता.

मला नारळाचं दुध तसंच चिंच-गुळाचं भरीत दोन्ही आवडतात. बाबागनुशपेक्षा मुतब्बल आवडतं मला.

हीरा, तुमची रेसिपी मी मिस केली होती. मस्त वाटतेय ही सुद्धा.
मी अमेरिकेत भारतासारखी गर असलेली वांगी पाहिली नाहीत त्यामुळे माझं भरीत केलं जात नाही अजिबात.