असं वाटतं झोप झाल्यावर?? की मी अजून स्वप्नात आहे !!?>
२० ऑक्टोबर २०११ ची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही.
कारण पूर्ण झोप झाल्यावर कसं वाटतं ते मी पहिल्यांदाच अनुभवलं. किंवा कदाचित पूर्वी अनुभवलं असेल तर ते इतक्या वर्षांपूर्वी असावं की मला आठवतच नाहीये. मला सध्या १० वर्षांनी तरूण झाल्यासारखं वाटतंय. यातला प्रत्येक शब्द खरा आहे. ही काल्पनिक कथा नाही तर एक वैद्यकिय सत्यकथा आहे.
मला आठवतंय तेव्हापासून मला झोप प्रचंड प्रिय आहे. कधीही कुठेही मला झोप लागते. इतकच नाही तर मी १० तास झोपून झाल्यावर परत झोपायला मिळाले तर मी परत ८-९ तास झोप काढलेली आहे. माझ्या जवळचे मित्रमंडळी नातेवाईक यांच्यात तो एक चेष्टेचा विषय आहे. दारुड्याला दारू मिळाली नाही तर तो जसा वागेल तसा मी झोप मिळाली नाही तर वागत असे. माझ्या आयुष्यातल्या अनेक संधी मी माझ्या झोपेत व्यत्यय येइल म्हणून मी जाणीवपूर्वक सोडून दिल्या आहेत.
गेले काहि वर्ष झोप आणखी कमी झाल्यासारखं वाटायचं. मी रात्री उशिरापर्यंत वेबवर काम करतो म्हणून हे असं होतं असं घरच्यांचं मत. झोपेत घोरणंही खूप वाढलं होतं. त्यामुळे इतका घोरत असतो सारखा आणि झोप कशी कमी होते तुझी असंही विचारलं जायचं. त्या घोरण्यामधे पण एक वेगळेपणा होता. मधेच ते थांबायचं. आणि माझ्या चेहर्यावर वेदना दिसायच्या आणि मी पुन्हा घोरायला लागायचो. मला उठवलं तर हे काहीही आठवायचं नाही.
यातच एक नवीन गोष्ट कळाली म्हणजे Sleep Apnea. भारतात हे कधी ऐकलं नव्हतं. डॉ, दाखवून sleep study केलि तर त्यात सगळं नॉर्मल होतं. डॉ. म्हणाला घोरण्यावर काही उपाय नाही. तुला झोप झाल्यासारखं वाटतंय ना मग काळजी नाही. पण झोप झाल्यावर काय वाटतं तेच मी विसरून गेलो होतो. त्यामुळे जे वाटतं तेच नॉर्मल असं वाटायचं.
मग एका मित्राची भेट झाली. त्यालाही Sleep Apnea नव्हता. त्याचं घोरण्यावर उपाय म्हणून एक ऑपरेशन झालं. आणि त्याचं आयुष्य बदललं (चांगल्या अर्थाने) असं तो म्हणायचा. मी डॉक्टरला विचारले तो म्हणाला तुला मी हे करायला सांगणार नाही कारण ते ऑपरेशनच यशस्वी होण्याची फक्त ५०% शक्यता असते. ऑपरेशन केलेले इतरही काहि भेटले. त्यांचं सगळ्यांचं आयुष्य बदललं होतं ऑपरेशन नंतर. पण डॉ. ही बरोबर होता कारण काही जणांना ३-४ वर्षांनी परत त्रास सुरु झाला होता.
त्यातच Sleep Apnea च्या मेडीकल डेफिनेशनबद्दल आणखी माहिती मिळाली. ती "आहे किंवा नाही " अशी गोष्ट नसते. तुमच्या झोपेत अमुक इतक्या टक्केवारीने जर तुम्ही तमुक करत असाल तर Sleep Apnea ठरतो. त्या टक्केवारिच्या खाली असाल तर तो धरत नाही. माझ्या मते मला तो आहे पण वैद्यकिय व्याखेच्या मर्यादा रेषेच्या थोडा खाली असावा.
वेगवेगळ्या कारणांमुळे तुमच्या घशाचे स्नायू झोपेत शिथील पडतात आणि त्यामुळे श्वासनलिकेत अडचण येऊन घोरण्याचा आवाज वाढतो. कधी कधी ते शिथील स्नायू श्वास घ्यायला अडचण करतात. हे मेंदूला कळले तर मेंदूचा काहि भाग जागा होतो. स्नायू पुन्हा आखडले जातात. श्वसनमार्ग पुन्हा मोकळा होतो. आणि पुन्हा मेंदू झोपी जातो. पण हे फक्त काही सेकंदात होते त्यामुळे त्या व्यक्तीला हे होते आहे याची काहिच जाणीव नसते. पण हे एका तासात अनेकदा होते. त्यामुळे REM नावाचा अत्यंत महत्वाचा झोपेचा टप्पा मेंदू गाठू शकत नाही. त्यामुळे जरी तो माणूस ७ तास झोपला असला तरी त्याचा मेंदू २-३ तासच झोपला असू शकतो. इतकंच नाहि तर झोपेतच हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
यावर बरेच उपाय आहेत. तोंडावर एक प्रकारचा मास्क घालून झोपणे हा बराच कॉमन असलेला उपाय मी केला नाही. Breath right नावाच्या नाकाला लावायच्या पट्ट्या मिळतात त्याचा काही उपाय झाला नाही. ऑपरेशन करावे याच्या विचारात होतो पण केले नाही.
वेबवर snoremender नावाचा एक उपाय सापडला. करुन तर पाहू म्हणून ते मागवले आणि तेंव्हापासून माझी सकाळ बदलली आहे. ही जाहिरात नाही तर माझ्या दृष्टिने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. पण आता फक्त चार आठवडे होतायत. त्यामुळे हे किती दिवस टिकेल माहिती नाही म्हणून इतक्यातच इतरांना सुचवणार नाही. हे लंडनहून येते. इथे अमेरिकेत स्वस्तात काही मिळेल का याच्या शोधात आहे. याचे काही दुष्परिणाम होतात का याचाही शोध घेतो आहे.
पहिले दोन आठवडे सकाळी जबडा चांगलाच दुखायचा (उठल्यावर अर्धा तास). आता दुखत नाही पण अजूनही काही दात, दाढा सकाळी थोड्यावेळ दुखतात. पण उठल्यावर जो ताजेपणा मिळतो त्याच्यापुढे हे दु:ख काहीच नाही. ही अतिशयोक्ती वाटेल. माझा मित्र ऑपरेशन नंतर म्हणाला तेंव्हा मलाही तसेच वाटले. पण वर्षानुवर्षे पुरेशी झोप न मिळाल्यानंतर जेंव्हा ती मिळते तेंव्हा काय वाटते ते शब्दात सांगणे अशक्य आहे.
तुमच्या माहितीत कुणी घोरत असेल तर कृपया जरूर हा लेख वाचायला द्या. सगळेच घोरणे धोकादायक असते असे नाही. पण विशेषतः मधेच ते बंद होऊन एकदम परत चालु होत असेल ते चांगले नाहि. आपल्याला ती व्यक्ती काय मस्त झोपली आहे असे वाटत असते. पण खरे तर घोरण्यामुळे त्या व्यक्तीलाही झोप मिळत नसते आणि त्याच्या नकळत त्याचे आयुष्य धोक्याकडे वाटचाल करत असते.
माहितीत नव्हे, घरातच आहे
माहितीत नव्हे, घरातच आहे घोरणारी व्यक्ती. हे वाचायला द्यायलाच हवं.
वेबवर snoremender नावाचा एक
वेबवर snoremender नावाचा एक उपाय सापडला. करुन तर पाहू म्हणून ते मागवले हे splint सारखं आहे का ?
पहिले दोन आठवडे सकाळी जबडा चांगलाच दुखायचा (उठल्यावर अर्धा तास). आता दुखत नाही पण अजूनही काही दात, दाढा सकाळी थोड्यावेळ दुखतात. ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की ते कदाचीत तुमच्या जबड्याच्या आकाराप्रमाणे नाहिये. ज्यामुळे TMJ (tempomendibular joint disorder) चा त्रास होतं आहे. इकडे nuero dentist custom made splints करुन देतात अशाप्रकारच्या disorders साठी. स्प्लिंट नीट बसायला साधारण ४-६ आठवडे लागतात. non custom made splints शक्यतो टाळ्याव्यात. उपाया पेक्षा अपाय होण्याचा जास्ती संभव. अनुभव !
घोरण्याबद्दलचे अनेक उपाय शोधत
घोरण्याबद्दलचे अनेक उपाय शोधत असता एका उपायाबद्दल माहिती कळाली पण त्याची उपयुक्तता किती याबद्दल माहिती नाही. एका संशोधन अहवालानुसार नियमीत गाण्याने घोरणे कमी होऊ शकते. पण घरातल्या मंडळीनी "आधी तुझं घोरण ऐकायचं आणि आता गाणं पण??" अस म्हणून माझा विचार हाणून पाडला.
^ Pai, Irumee; Lo, Stephen; Wolf, Dennis; ajieker, Azgher (2008). "The effect of singing on snoring and daytime somnolence". Sleep and Breathing 12 (3): 265–268. doi:10.1007/s11325-007-0159-1. PMID 18183444. http://www.springerlink.com/content/r771q473w2p108r6/. Retrieved 9 January 2011
Splints आणि TMJ बद्दल
Splints आणि TMJ बद्दल पहिल्यांदाच कळाले. धन्यवाद. माझ्या डेन्टीस्ट्ला विचारून पाहतो. सध्या झोपेवर इतका खूष आहे की या सगळ्या धोक्यांकडे दुर्लक्ष होते आहे.
snoremender झोपताना घातले की तुमचा खालचा जबडा किंचीत पुढे राहील असे करते त्यामुळे घशातले स्नायू खाली सरकत नाही.
>>आधी तुझं घोरण ऐकायचं आणि
>>आधी तुझं घोरण ऐकायचं आणि आता गाणं पण??>> बरोबर आहे. घोरणं ऐकावं लागण्याचं दु:ख ऐकणार्यालाच माहीत. घोरणार्याला काय त्याचं?
TMJ आणी sleep apnea यांचा खुप
TMJ आणी sleep apnea यांचा खुप जवळचा संबंध आहे. गुगल वर नक्की लेख मिळतीलच. माझ्या कडचे मिळाले तर स्कॅन करुन टाकेन. cutom made splints खर्चीक आणी वेळखाऊ आहेच ( splint adjust करायला दर आठवड्याला जावं लागतं) पण हे होणार्या त्रासासमोर कधीतरी काहीच वाटत नाही.
snoremender झोपताना घातले की तुमचा खालचा जबडा किंचीत पुढे राहील असे करते त्यामुळे घशातले स्नायू खाली सरकत नाही.
exactly, custom made splint हेच करतं, पण आता तुम्हाला जो त्रास(दाढ दुखी वै.) होतो आहे ह्याचा अर्थ ते जबड्यात नीट बसत नाहीये...जरुर विचारा आणी तो/ती splint adjust करुन देत असतील तर करुन घ्या.
अजयः छान माहिती. आता
अजयः
छान माहिती. आता नवर्याला जरा प्रेमाने कोपर मारीन. बिच्चारा!
सायो:
घरोघरी मातीच्या चुली. मला वाटत प्रत्येक घरात एक घोरणारी व्यक्ती असतेच. वजनाचा आणि घोरण्याचा खूप संबध आहे.
विनः
तुझी माहिती तर खूपच उपयुक्त. नवरे कंपनीच घोरण आणि त्यावरचे उपाय हा विषय उद्या अजेंडावर घेउया.
चांगली माहिती. खरंच आपल्याला
चांगली माहिती. खरंच आपल्याला झोपणारा गाढ झोपला आहे असेच वाटते.
नवर्याची बरीच लक्षणे मिळती जुळती आहेत. अजून माहिती नक्कीच मिळवून वाचेन.
धन्यवाद!!
घोरणं ऐकावं लागण्याचं दु:ख
घोरणं ऐकावं लागण्याचं दु:ख ऐकणार्यालाच माहीत. घोरणार्याला काय त्याचं? >> मोदक
चांगली माहिती. धन्यवाद अजय.
उत्तम लेख. चांगली झोप अतिशय
उत्तम लेख. चांगली झोप अतिशय महत्त्वाची आहे आरोग्यासाठी. अनुमोदन. अजून लिहीणार विचार करून.
वर्षानुवर्षे पुरेशी झोप न
वर्षानुवर्षे पुरेशी झोप न मिळाल्यानंतर जेंव्हा ती मिळते तेंव्हा काय वाटते ते शब्दात सांगणे अशक्य आहे.>>>
हा अनुभव खरच घ्यावासा वाटतो. म्हणजे आपल्याला जी मिळते ती झोप चांगलीच असते असा ग्रह निघून जाईल. हा लेख फार आवडला. घोरणे ही 'स्लीपिंग डिसऑर्डर' आहे इतकेच माहीत होते. बेडही फार मऊ वगैरे न असता काहीसा टणक (फर्म) असल्यास झोप चांगली मिळते असा मात्र एक अनुभव आहे. मला एक अनुभव येत आहे. झोप अगदी लागणार अशा क्षणी अचानक श्वास अडकतो आणि घोरण्यासारखा आवाज एक सेकंदच येतो आणि झोप जाते. मग पुन्हा दोन तीनदा तसे झाल्यानंतर झोप लागते. माहीत नाही की हे काय असावे. पण आता जरा टेन्शनच आले आहे. असो! लेख आवडलाच.
-'बेफिकीर'!
अजय उपयोगी माहिती. खुप
अजय उपयोगी माहिती. खुप धन्यवाद.
हा उपाय नेहेमी करावा लागतो कि कालांतराने बंद करावा लागतो?
अजय, माझ्या परिचयातील काही
अजय, माझ्या परिचयातील काही व्यक्तींचा घोरण्याचा व झोपेचा प्रश्न प्राणायाम, नाडीशोधन प्राणायामाने कमी झाला आहे. तुम्ही कधी प्रयोग केला नसेल तर जरूर करून बघा. उपाय होईल - न होईल माहिती नाही, पण अपाय तर नक्कीच होणार नाही.
माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद.
खुप उपयुक्त माहीती अजय.
खुप उपयुक्त माहीती अजय. माझ्या ऑफीसातील दोघेजण गेली ५-६ वर्षे स्लीपअॅप साठी एक यंत्र वापरत आहेत. त्यांच्यापैकि एकाचा श्वास स्लीपअॅप टेस्ट केली असता एका तासात ४७ वेळा खंडीत झाल्याचे निदर्शनास आले होते. हे स्लीपअॅप मशीन काही मेडीकल इंशुरन्स कंपन्यांच्या प्लान्समध्ये समाविष्ट आहे. स्लीपअॅपनीयाकडे दुर्लक्ष केल्यास प्रकृतीवर गंभीर परिणाम होउ शकतात.
@बेफिकीर तुम्हाला झोप
@बेफिकीर
तुम्हाला झोप लागल्यावरही हे होते काय या कडे लक्ष ठेवायला सांगा (तुम्हाला स्वतःला ते समजणार नाही). कदाचित सध्या ही फक्त सुरुवात असू शकते. माझे असे पूर्वी मधूनच होत असे. पण तेव्हडेच होत असेल तर धोक्याचे नसावे. कारण आपण जागेपणा आणि निद्रा याच्या सीमारेषेवर असताना इकडून तिकडे जात असतो.
@सावली
हा उपाय माझ्यासाठी तरी बहुतेक कायमचा , रोज रात्री झोपताना आहे (जोपर्यंत मी ऑपरेशन करून घेत नाही).
सगळ्यांनाच हा उपाय करायची गरज आहे असे नाही. खालीपैकी कुठल्याही उपायाचा मला फायदा झाला नाही. पण इतरांना होऊ शकतो.
१) एका कुशीवर किंवा पोटावर झोपून पहा (लागू पडला तर हा सगळ्या सोपा)
२) वजन कमी करून पहा
३)डोक्याखाली जास्त उशा किंवा थोडे कलते (डोके, धड पायापेक्षा शक्य तितके वर येईल) असे झोपून पहा
@अरूंधती
याबाबतीत माझे मत थोडे वेगळे आहे. म्हणजे पाणायामाला माझा विरोध नाही आणि त्याचा फायदा होईलही.
पण जर उपाय झाला नाही (म्हणजे काहीच बदल न होता घालवलेला वेळ) हा इथे अपायकारक आहे. प्राणायामाचे उपाय चालू असतानाच इतरही उपाय चालू असतील तर हरकत नाही.
@विकास
इथे लिहल्याबद्दल धन्यवाद. आपल्याकडे घोरणे हा चेष्टेवारी नेण्याचा विषय समजतात आणि काही प्रकारचे घोरणे तितके धोकादायक नसेलही. पण याची गंभीर बाजू मला समजल्यावर जास्तीत जास्त लोकांना ते समजावे म्हणून मी इथे लिहले.
माहितीबद्दल धन्यवाद अजय.
माहितीबद्दल धन्यवाद अजय.
माहिती बद्द्ल
माहिती बद्द्ल धन्यवाद !!!!!!!!!!!!
लंडनहून येते. इथे अमेरिकेत
लंडनहून येते. इथे अमेरिकेत स्वस्तात काही मिळेल का याच्या शोधात आहे. >>
काल रात्री NBC वर अॅड पाहिली. $२९.९९ बोथ वे शिपिंग अशी अमेरिकेत किंमत आहे. पण मला तसा उपयोग नसल्यामुळे मी नंबर लिहून घेतला नाही. परत कळाला तर देईन इथे.
फार पूर्वी फ्रेन्ड्सच्या एका एपिसोड मध्ये जोई हे प्रॉडक्ट तोंडात घालून झोपताना दाखवला आहे. कदाचित अमेरिकेत मिळत असावे फक्त तेंव्हा जाडी थोडी जास्त दिसली.
ही माहिती नविन आहे. धन्यवाद
ही माहिती नविन आहे. धन्यवाद अजय.
चांगली माहिती! अजून घरातल्या
चांगली माहिती! अजून घरातल्या घोरासुराला कुशीवर वळून झोपणे हा उपाय चालतोय म्हणून बरंय्!!:स्मित:
अजय, माझ्या बहीणीला गेल्या २
अजय,
माझ्या बहीणीला गेल्या २ महीन्यापासून झोपेचा त्रास होतो आहे. ती कधीही झोपते. सकाळी १० ला झोपली की ४ ला उठते. परत ८ ला झोपली की मध्यरात्री ३ ला उठते. All her tests are normal. (blood, urine, MRI, EEG, ECG etc.) Doctors say its depression and anxiety. She snores while sleeping. She feels dizzy before sleeping. Doctors say its not narcolepsy. She was very active before. Now also when she wakes up she doesn’t feel depressed to the extent that she can faint. Don’t know what to do.
फारच उपयुक्त माहिती. धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती. धन्यवाद अजय.
समीरचा लेख वाचून इथे फीड्बॅक
समीरचा लेख वाचून इथे फीड्बॅक द्यायची आठवण झाली. हा लेख वाचून आणि मग एकदा अजयशी बोलून मी न्यूयॉर्कमधील स्लीप डिसॉर्डर इंस्टिट्यूटमध्ये तपासणीसाठी गेलो. त्यांनी रात्रभर तिथे झोपायला बोलावून तपासण्या केल्या आणि very severe sleep apnea आहे असे निदान झाले. त्यांच्या मते मी एका रात्रीत ४५०-५०० वेळा श्वास अडकून जागा होत होतो. CPAP नावाचे एक उपकरण मी गेले वर्षभर वापरत आहे, ज्याचा चांगला उपयोग झाला. हे उपकरण म्हणजे उपचार नाही तर मास्कद्वारे नाकातून ठराविक दाबाने हवा ढकलत रहाणारे उपकरण आहे.
भारतात ह्या टेस्ट्स आणि ते
भारतात ह्या टेस्ट्स आणि ते उपकरण उपलब्ध आहे का याबाबत कोणाला काही माहिती असल्यास द्यावी.
प्राणायमाच्या एका प्रकारात
प्राणायमाच्या एका प्रकारात 'उज्जयी" प्रकार आहे. तो केला तर बर्याच अंशी हा त्रास कमी होतो. प्रयत्न करुन पहा. आशा आहे उपयोग होईल.
माझ्या आईला नुकताच स्लीप
माझ्या आईला नुकताच स्लीप अप्निया च निदान झालंय . तिला नासिकचा डॉक्टरांनी CPAP हे फिलिप्स कंपनी च उपकरण घ्यायला सुचवलय . भारतात त्याची किमत साधारण ६०००० रुपये आहे. मी अमेरिकेतून घेवून हे यंत्र तिला पाठवू शकते का? कि ते तिथेच घेण जास्त चांगल राहील. तसाच ह्या यंत्राला काही मेंटेनन्स असतो का?
दिविजा, भारतातच घेतलेलं
दिविजा, भारतातच घेतलेलं चांगलं.
कारण किमान वर्षातून एकदा तरी त्याचे काहितरी इश्यूज निघतात.
मास्कपण अधूनमधून बदलावा लागतो. कधी बॅटरी जळते.
रिलायबल सोर्स कडून असे सीपॅप घ्यावे जे वॉरंटी किंवा किमान पोस्ट सेल्स सर्विसींगची जबाबदारी घेतील.
दिविजा, सध्या भारतातच घ्या.
दिविजा,
सध्या भारतातच घ्या. भविष्यात अमेरिकेत या फिल्डमधे क्रांती घडवणारे यंत्र येते आहे. पण सध्या त्याच्या चाचण्या चालू आहेत. हे उपलब्ध झाले की बाकी सगळी cpap अवजड वाटायला लागतील.
http://www.fundairing.com/#first-ever-micro-cpap
http://bostinno.streetwise.co/2015/06/17/burlington-startup-funds-sleep-...
धन्यवाद साती आणि अजय. @अजय
धन्यवाद साती आणि अजय.
@अजय >>लवकरच अशी यंत्र आली तर फार बर होइल. पण सध्या हा आजार आहे हेच मान्य होवून त्यावर उपचार शक्य झाले आहेत हे हि नसे थोडके …
Pages