(सदर लेख म्हणजे रॉकस्टार सिनेमाची समीक्षा अथवा चित्रपट परीक्षण नाही. 'अभिप्राय' म्हणता येईल, फार तर. जरा जास्त लांबला आहे, म्हणून जुन्या धाग्यात न टाकता नवीन लेख टाकला.
ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही, पण नक्की पाहणार आहेत- त्यांनी शक्यतो हा लेख वाचू नये. काही उल्लेखांमुळे रसभंग होण्याची शक्यता आहे.)
------------------------------------------------------
अकरा-अकरा-अकरा च्या मुहूर्ताची यंदा दोन प्रमुख आकर्षणे होती. ऐश्वर्याचे बाळ आणि रॉकस्टार.
पैकी पहिल्या जागी अपेक्षाभंग झाला आहे. दुसरे आणि महत्वाचे आकर्षण होते इम्तियाज अलीच्या रॉकस्टारचे. या सिनेमाचा पहिला प्रोमो पाहिला, तेव्हापासून मी याची आतुरतेने वाट पाहत होतो. शनीवारी हा सिनेमा पाहिला आणि त्यानिमित्ताने जे काही वाटले ते इथे तुमच्याबरोबर शेअर करतो आहे.
इम्तियाज अली हा नव्या पिढीच्या दमदार दिग्दर्शकांपैकी आहे. याआधीचे त्याने तीनही चित्रपट- सोचा न था, जब वुई मेट आणि लव्ह आज कल- प्रेमकथा आहेत आणि रॉकस्टारही त्याला अपवाद नाही. काही ना काही प्रमाणात या तीनही सिनेमांचा रॉकस्टारवर प्रभाव असल्याचे जाणवते. टिपीकल हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाला भावणार्या प्रेमकथा आपल्या वेगळ्या मांडणीने, अधिक थेट आणि नैसर्गिक वाटणार्या पात्रयोजनेने, चटकदार संवांदांनी खुलवत नेण्याचे त्याचे कसब कौतुकास्पद आहे. 'रॉकस्टार' ला मात्र त्याने काहीशी वेगळी ट्रीटमेन्ट दिली आहे आणि त्यामुळेच त्याच्या या चित्रपटाबद्दलची उत्सुकता एरवीपेक्षा जास्त होती.
रॉकस्टार ही जनार्दन जाखड नामक दिल्लीच्या तरूणाची गोष्ट आहे. कॉलेजात 'जेजे' या टोपणनावाने ओळखला जाणारा हा बुजरा- काहीसा बावळट तरूण मनोमन 'जिम मॉरिसन' ला आपला आदर्श मानतो आणि त्याच्याप्रमाणेच रॉकस्टार होण्याचे स्वप्न तो उराशी बाळगून आहे. त्याचा Attitude अंगी बाणवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तो गिटार घेऊन दिल्लीच्या बसस्टॉपवर गाणे सादर करतो, ज्याची परिणती त्याची टिंगलटवाळी होण्यात आणि पोलिसांचा मार खाण्यात होते...
अशाच काही अर्थहीन दिवसांत त्याच्या कॅन्टीनचा इन्चार्ज- खटाना सर, जो त्याचा फ्रेन्ड, फिलॉसॉफर आणि गाईड वगैरे आहे- त्याला असा गुरूमंत्र देतो की तुझ्या आयुष्यात कसलीही ट्रॅजिडी नाही, त्यामुळे एका कलावंताला घडवणार्या वेदनेचा तुझ्यात संपूर्ण अभाव असल्याने तुझ्यातली कला बाहेर येत नाही. मग अशाच एका वेदनेच्या शोधात जेजे हीर कौल या काश्मिरी तरूणीशी फ्लर्ट करतो, तिचा नकार आल्यावर आपला प्रेमभंग झाल्याचे मानतो आणि त्यात वेदना शोधू पाहतो वगैरे.
कालांतराने त्यांची मैत्री होते आणि हीर तिच्या (पूर्व-नियोजित) लग्नानंतर विदेशात निघून जाते. लग्नाआधी ती तिच्या काही खट्याळ इच्छा (देशी दारू पिणे, बी ग्रेड सिनेमे पाहणे इ.) जेजेकरवी पूर्ण करून घेते. या काळात त्यांच्या निखळ मैत्रीत काही प्रेमाचे रंग भरू लागलेले असतात.
कालांतराने जेजेची कौटुंबिक कलहामुळे घरातून हकालपट्टी होते आणि तो काही दिवस एका दर्ग्याच्या आश्रयाने राहतो. आता त्याचे दिवस बदलत असतात आणि त्याला संगीतविश्वात थोडीफार संधी मिळू लागलेली असते. त्याचाच एक भाग म्हणून तो विदेशात जातो, हीरला पुन्हा भेटतो आणि त्यांची 'केमिस्ट्री' परत जमायला लागते. एव्हाना जनार्दनचा 'जॉर्डन' झालेला असतो !
आता हे जे सर्व काही घडते- ते फक्त चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या भागात, इंटरव्हलच्या आधी घडून जाते. हा भाग वेगवान आहे, आणि उत्तम जमला आहे. जॉर्डन आणि हीरच्या केमिस्ट्रामधे जब वी मेटच्या आदित्य आणि गीतच्या केमिस्ट्रीचे traits दिसतात. इथेही उत्तरार्धात उदास बनलेल्या नायिकेला नंतर यशस्वी झालेला नायक उभारी देतांना दिसतो. लव्ह आज कल मधल्या 'मीरा' प्रमाणे इथेही नायिकेचे लग्न झालेले असते आणि लग्नानंतर तिला आपल्या खर्या प्रेमाची ओळख पटते. हे सर्व सिग्नेचर इम्तियाज अलीचे आहे असे दिसते, पण या गोंधळात 'रॉकस्टार' जॉर्डनच्या जडणघडणीचा सांधा कुठेतरी निसटतो आणि पुढे तो सिनेमाभर सापडतच नाही.
माझी रॉकस्टारबद्दल एकच तक्रार आहे, की त्याचे आयुष्य त्याच्या संगीताला न्याय देत नाही. त्याच्या संगीतात असणारी intensity नक्की कुठून आली, हे माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला कळत नाही. इंटरव्हलच्या नंतर भारतात आलेला जॉर्डन जेव्हा हातात गिटार घेऊन 'साड्डा हक..' म्हणत पडद्याला आग लावत असतो, तेव्हा तो आपल्या विवाहीत मैत्रिणीला वाटेल तेव्हा 'किस' आणि 'हग' करण्याच्या हक्काबद्दल बोलतो आहे- हे काही केल्या पचनी पडत नाही. तो ज्या नष्ट झालेल्या जंगलातल्या हरवलेल्या पक्ष्यांचे दु:ख गातो, ते पक्षी प्रेक्षक म्हणून ना आपल्याला दिसतात, ना जॉर्डनला कधी दिसलेले असल्याचे वाटते. त्यामुळे त्याचे एकूणच दु:ख नकली वाटू लागते आणि त्याचे सर्व अवसान उसने वाटू लागते. हा नक्कीच रणबीरच्या अभिनयाचा दोष नाही- अभिनय बावनकशी आहे. हा दोष माझ्यामते दिग्दर्शकाचा आणि पटकथेचा आहे. जॉर्डनचे राऊडी, वाईल्ड होणे प्रेक्षणीय असले तरी त्याची समाधानकारक कारणमिमांसा देण्यात पटकथा कमी पडते.
सिनेमात खर्या अर्थाने नायक-नायिकेचा विरह होतच नाही. कारण तिचे लग्न होऊन ती विदेशात जाते तोवर दोघेही स्पष्टपणे प्रेमात पडलेले नसतात. तिच्या जाण्याने दोघांनाही विशेष फरक पडला आहे असे दिसत नाही. एका अटळ शोकांतिकेकडे नेण्यासाठी विरहाच्या दु:खाच्या मसाला कमी पडतो आहे असे दिग्दर्शकाला वाटल्यामुळेच की काय, पण उत्तरार्धात नायिकेच्या असाध्य आजाराचे उपकथानक जोडले गेले आहे. हे माझ्यामते अनावश्यक होते. त्यातच 'हीर' म्हणून नर्गिस फाकरी आपल्या अभिनयाचा कुठलाही ठसा पाडत नाही. तिचा आजार प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यात अपयशी ठरतो.
उत्तरार्धात बरीच गाणी आहेत, आणि ती सर्व चांगली आहेत. पण जॉर्डनची गाणी आणि त्याची प्रेमकथा नंतर समांतर चालत राहतात. त्यांचा एकमेकांशी संबंध आहे असे वाटत नाही.
'रॉकस्टार' ची गाणी हा खरं तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. काहींना ती गाणी आवडलेली नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. सर्वार्थाने पाथ-ब्रेकिंग असे हे संगीत आहे. मी जर समीक्षक असतो, तर रॉकस्टारला साडेतीन स्टार दिले असते. रेहमान, इर्शाद कामिल आणि मोहित चौहानला प्रत्येकी एक स्टार, आणि रणबीरला अर्धा. (यात इम्तियाज अलीचा एक आणि नर्गिस फाकरीचा अर्धा स्टार पडला असता तर हा एक अविस्मरणीय सिनेमा झाला असता. असो.)
रॉकस्टारचे प्रत्येक गाणे अद्वितीय आहे. कुठलेही एक गाणे निवडणे कठीण आहे. आणि मी हे गेल्या महिनाभर शेकडो वेळा ही गाणी ऐकल्यानंतर म्हणतो आहे. या सिनेमानंतर मी इर्शाद कामिलचा पंखा झालो आहे. त्याच्या या ओळी पहा-
'कागा रे कागा रे मोरी इतनी अरज तोसे, चुन चुन खाईयो मास..
खाईयो ना तू नैना मोरे, खाईयो ना तू नैना, मोहे पिया के मिलन की आस "
किंवा-
"मैने यही सोचा है अक्सर,
तू भी, मै भी सभी है शीशे
खुदही को हम सभी में देखे.."
किंवा
"सौ दर्द बदन पर फैले है
हर करम के कपडे मैले है.."
कोण्याही संवेदनशील माणसाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे हे शब्द आहेत. गेल्या कित्येक वर्षात मी हिंदी सिनेमाच्या गाण्यात एवढे ’काव्य’ असलेले पाहिले नाही. ही गाणी नुसती ऐकण्यासाठी नाहीत, ही अनुभवण्याची चीज आहे. तुमच्या मनातली प्रत्येक व्यक्त-अव्यक्त भावना तुम्हाला रॉकस्टारच्या अल्बममधे सापडेल !
आणि रेहमानची थोरवी तर काय वर्णावी ! इंडस्ट्रीत इतकी वर्षे काढल्यानंतरही या माणसाकडे देण्यासारखे इतके काही शिल्लक आहे- हे पाहून आश्चर्य वाटतेच, पण त्याहून जास्त अभिमान वाटतो. रेहमान हा आमच्या पिढीचा पंचमदा आहे. आजकालचे वयस्कर लोक जसे पंचमदाच्या आठवणीने नॉस्टाल्जिक होतात, तसे आम्ही म्हातारे झाल्यावर रेहमानच्या आठवणी काढत आमच्या पोरांना पकवू.
मोहिन चौहानने प्रत्येक गाणे अगदी क-ड-क म्हटले आहे. आणि हॅट्स ऑफ टू द लेटेस्ट कपूर फॉर मेकिंग दीज सॉंग्ज अलाईव्ह ऑन स्क्रीन ! रणबीर हा कपूर घराण्याची लिगसी चालवण्यास तैय्यार आहे, हे रॉकस्टारने सिद्ध केले आहे.
When it comes to music of Rockstar, I can sing for hours !
मला कळते आहे की हा लेख अंमळ लांबत चालला आहे. इथपर्यंत तुम्ही वाचत आला असाल, तर पुढचे थोडेसेही वाचा ! कारण हा उल्लेख केला नाही तर हा सगळाच लेख व्यर्थ ठरेल.
सगळ्यात शेवटी आठवण काढूया आपल्या लाडक्या शम्मी कपूरची. सिनेमा पहायला जाईपर्यंत मला ठाऊक नव्हते की शम्मी कपूर या सिनेमात आहे. त्यांचा रोल अप्रतिम झाला आहे. शेहनाई आणि गिटारची जुगलबंदीही अविस्मरणीय !
शम्मीचे पडद्यावरचे हे शेवटचेच दर्शन ! त्याला पाहतांना मनात कालवाकालव होते. We miss you, Mr. Shamsher Raj kapoor !
सारांश- रॉकस्टारची भट्टी पाहिजे तशी जमलेली नाही. विशेषत: सेकंड हाफमधे एडिटर झोपी गेला असल्याचे जाणवते. पण तरीही, त्याच्या अविस्मरणीय संगीतासाठी, रणबीरच्या अभिनयासाठी, आणि एका मनापासून केलेल्या प्रयत्नासाठी रॉकस्टार पहावा. There are very few movies which have their heart at the right place- RockStar is one of them. एरवीही आपण एखाद्या युद्ध हरलेल्या राजाचे त्याच्या पराक्रमासाठी कौतुक करतो, क्रिकेटमधे एखाद्या सुटलेल्या कॅचलाही ’वेल ट्राय’ म्हणत शाबासकी देतो. मला रॉकस्टारचे जे कौतुक आहे, ते या जातीचे आहे !
-------------इति लेखनसीमा--------------------
छान
छान
>> 'कागा रे कागा रे मोरी इतनी
>> 'कागा रे कागा रे मोरी इतनी अरज तोसे, चुन चुन खाईयो मास..
खाईयो ना तू नैना मोरे, खाईयो ना तू नैना, मोहे पिया के मिलन की आस "
>>
हे आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतय. हा दोहा आहे का?
>> 'कागा रे कागा रे मोरी इतनी
>> 'कागा रे कागा रे मोरी इतनी अरज तोसे, चुन चुन खाईयो मास..
खाईयो ना तू नैना मोरे, खाईयो ना तू नैना, मोहे पिया के मिलन की आस "
>>
हे आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतय. हा दोहा आहे का?
http://www.youtube.com/watch?v=QDgvtAvt4Qw&feature=related
'कागा रे' कैलाश खेर च्या
'कागा रे' कैलाश खेर च्या आवाजात ऐकलय, ' नी मै जाणा जोगी दे नाल'.
http://www.dishant.com/jukebox.php?songid=46968
कागा सब तन खैयो मेरा चुन चुन खाइयो मास
दो नैना मत खाइयो मोहे पिया मिलन कि आस
नी मै जाणा नी मै जाणा नी मै जाणा.. जाणा , जोगी दे नाल..
इम्तियाज अलीची बाकी एक सिग्नेचर स्टाइल कायम रहाते.. लग्नाच्या बाबतीत कनफ्युस्ड , चूकीची डिसिजन घेणारी तरुणपिढी !
सोचा न था- जब वी मेट- ल आज कल आणि रॉकस्टार सगळीकडे हे आहेच :).
तरीही आवडले मला इम्तियाज अलीची सगळे मुव्हीज.
रॉकस्टार रॉक्स .. रणबीर-रेहमान-मोहित -कामिल मस्तं !
हा कबीराचा दोहा आहे पण
हा कबीराचा दोहा आहे पण बर्याच जणांनी तो लिरिक्समध्ये आणि शास्त्रीय संगीताच्या चीजांत वापरला आहे...
छान अभिप्रय ! मी नक्की पाहणार
छान अभिप्रय !
मी नक्की पाहणार आहे- तरी ही वाचलं :-).
हा चित्रपटासंबंधीचा लेख आहे
हा चित्रपटासंबंधीचा लेख आहे तेव्हा पुढच्या वेळी असे लेख लिहतांना गुलमोहरात विभागात साहित्य म्हणून न लिहीता कृपया हितगुज-चित्रपट विभागात नवीन लेखानाचा धागा काढून लिहीणार का.
धन्यवाद
- मदत समिती
मी पण पाहणार, हा लेख
मी पण पाहणार, हा लेख वाचल्याने माझा रॉकस्टारच्या संगीताबद्दल अन एकंदरीत चित्रपटाबद्दल झालेला गैरसमज दूर तर झालाच पण आता तो पहायला जावे असेही वाटू लागले आहे.
मस्त लिहिलय.. खरंतर
मस्त लिहिलय..
खरंतर गाण्यांविषयी स्वतंत्र लिहायला हवं...
मस्त लिहीले आहे! एकदम वाचनीय
मस्त लिहीले आहे! एकदम वाचनीय झाला आहे लेख. १४ गाणी आहेत म्हंटल्यावर ती गाणी आवडेपर्यंत तरी हा चित्रपट पाहण्याचे चान्सेस कमी आहेत पण हे खूप छान लिहीले आहे.
चांगल लिहलय.. पाहीला चित्रपट
चांगल लिहलय..:स्मित:
पाहीला चित्रपट पण तितका नाही आवडला.
चित्रपटाबद्दल बोलणं योग्य
चित्रपटाबद्दल बोलणं योग्य नाही. (कारण अजून बघितला नाही) पण चित्रपटाच्या मार्केटिंग कॅम्पेनला पूर्ण स्टार्स. खूप दिवसानी प्रोमोज हे फक्त आनी फक्त गाण्याचेच दिसले. एखाद दुसरे डायलॉगचे ट्रेलर आहेत पण ब्रँड्सचे नाहीत हे नशीब.
शम्मी कपूर या चित्रपटात असूनदेखील त्याची जाहिरात न करणे हा संवेदनशील्तेचा भाग आहे. सध्या चित्रपटाची जाहिरात बघतोय का प्रॉडक्ट्सची असा प्रश्न रा.वनने निर्माण केला होता. त्यामानाने रॉकस्टार चित्रपटाबद्दलच बोलतो. इतर कॅम्पेन आणी पी आरदेखील अग्रेसीव्हली केलेले नाही. लव्ह आजकलच्या प्रमोशनम्धे इम्तियाझ स्वत:देखील जास्त दिसत होता, यावेळेला अजिबात दिसत नाहीये. हे अजून एक वैशिष्ट्य.
मनापासून लिहिले आहेस ज्ञानेश!
मनापासून लिहिले आहेस ज्ञानेश! आवडले!
छान लिहिले आहे.. कागा कागा या
छान लिहिले आहे..
कागा कागा या ओळी, पिया मिलन कि आस (मनोजकुमार, अमिता) मधल्या शीर्षकगीताच्या सुरवातीला आहेत. गाणे लताच्या आवाजात आहे.
छॉन लेख. मी गाण्यांची सीडी
छॉन लेख. मी गाण्यांची सीडी विकत घेइन. अजून एखादी फुट्कळ प्रेमकथा बघण्यात वेळ वाया जायाला नको.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार मानतो.
"कागा रे" हा कबीराचा दोहा आहे, याची मला कल्पना नव्हती. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! याआधीही अनेकांनी त्याचा वापर केला आहे असे दिसते.
@रुनी पॉटर/मदत समिती-
विभाग निवडण्यात चूक झाली खरी. क्षमस्व. माबोचे विभाग मला अद्याप नीटसे समजलेले नाहीत.
पुढल्या वेळी नक्कीच दुरूस्ती करेन.
गाण्यांबद्दल वेगळे लिहिणार
गाण्यांबद्दल वेगळे लिहिणार का?? वाचायला आवडेल.