त्याचे घर

Submitted by सावली on 13 November, 2011 - 20:46

त्याचे घर
'मोगरा फुलला' च्या २०११ दिवाळी अंकात पूर्व प्रकाशित.
--------------------------------------------

खरंतर हे जोडीदाराबरोबर मजा करण्याचं, संसार थाटण्याच वय त्याचं. पण का कोण जाणे, अजूनही तो तितकासा उत्साही नव्हताच. सगळ्या मित्रांना आपापले बस्तान बसवताना पाहून तो अस्वस्थ व्हायचा. पण त्यांच्या प्रथेप्रमाणे घरं बांधून मग जोडीदार शोधण्याचा उत्साह त्याच्यात अजूनही आला नव्हता. कुणी याबद्दल छेडलं कि लक्ष नसल्यासारखं करून तो हा प्रश्नच टाळायचा.

त्यादिवशीही असंच त्याचं उगीच इकडेतिकडे करणं चालू होतं. मात्र आजूबाजूला सगळेच एकदम आपापल्या कामात व्यग्र असल्याचे पाहून त्याला अजूनच कसंतरी वाटायला लागलं. एकटेपणाची भावना मनात घर करायला लागली.
"हम्म, चला आता संसाराच्या तयारीला लागायलाच हवं. जवळपासचे ओळखीतले सगळेच संसाराच्या पाशात अडकत आहेत. वय आहे तोवर आपणही विचार करायला हवाच." तो स्वत:शीच पुटपुटला.
"एक जोडीदारीण शोधायला हवी हे खरंच. पण त्या आधी एक घरही हवं. घर बांधायचं म्हणजे कमी का कटकट असते? आपणही एखाद्या गुहेबिहेत रहात असतो तर काय छान झालं असतं." त्याचा वैताग पुन्हा एकदा उफाळून वर आला.

आळस घालवण्यासाठी तो उठून आसपास चक्कर टाकायला निघाला. पुढच्याच वळणावर त्याचा एक जिवलग मित्र भेटला.
"काय मग? काय चालू आहे सध्या?" त्याने सहज चौकशी केली.
"एकदम मजेत. आजच तीला घेऊन जाणारे घर दाखवायला!" मित्राच्या उत्तराने तोच विषय समोर आला. इकडचं तिकडचं जुजबी बोलत मित्राला कटवून तो पुन्हा एकदा निघाला. आता पुन्हा कोणी भेटू नये म्हणून नेहेमीपेक्षा वेगळ्याच वाटेवर भरकटत राहिला. पण बहुतेक आज दिवस वाईटच होता त्याचा. या अशा दूरच्या जागीही त्याला पुन्हा एक जण ओळखीचा भेटला.
"काय इथे इतक्या दूर कसे काय?" त्या ओळखीच्याने हटकलेच.
"असंच, आलो फिरत फिरत. तुम्ही इथे कसे काय?" त्याने काहीच नं सुचून विचारले.
"अहो इथे या बाजूला घराचे मटेरियल चांगलं मिळतं. त्याच्याच शोधात आलो होतो. तुम्ही बांधताय कि नाही घर?" पुन्हा एकदा तोच विषय ऐकून तो खरच वैतागला. काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन कसाबसा निघाला. आता त्याच्याने पुढे जाववेना. काही खायची इच्छाही नव्हती म्हणून गुपचूप परत येऊन नेहेमीच्या आसऱ्याला बसला. 'आता उद्या मात्र आळस झटकून कामाला लागलंच पाहिजे' असा विचार करतच केव्हातरी झोपेच्या आधीन झाला.

सोनेरी किरणे घेऊन उगवलेला दुसरा दिवस मात्र एकदम छान होता. कालचा वैताग कुठल्या कुठे पळून गेला होता. सकाळीच सगळं आवरून तो उत्साहाने घरासाठीच्या जागेच्या शोधात निघाला. आपल्या भावी जोडीदारिणीला आवडेल अशी जागा त्याला शोधायची होती. 'दोघांच्या संसाराला सोयीची हवीच पण पुढे बाळालाही सोयीची हवी.' आपल्या या विचाराचे त्यालाच हसु आले. 'अजून नाही जोडीदाराचा पत्ता आणि आपण कुठल्या कुठे पोचलो !!'

बराच वेळ शोधाशोध केल्यावर एक चांगली जागा नजरेत भरलीच त्याच्या. 'आजचा दिवस एकदम भारीच आहे. आज जागा शोधायला सुरुवात केली काय आणि ही जागा आवडली काय! सगळंच कसं जुळून येतंय. आता दोन चार दिवसात या जागेचं ठरवून टाकलं पाहिजे. नाहीतर हातची जायची.' असा विचार करतच तो जागेच्या आसपास भटकून आला. आसपासचा परिसर पाहिल्याशिवाय जागा कशी आहे ते कळणारच नाही हे त्याला नक्की माहीत होतं.पुढचे दोन चार दिवस धावपळीतच गेले. पण जागा मात्र याच्या नावे झालीच.

'आता आळसाला थारा नाही. लवकरात लवकर घर बांधायला घ्यायला हवं. आपल्या गावात काही मजूर वगैरे मिळत नाहीत. आपलं आपल्यालाच बघायला हवंय सगळं.' असा विचार करत त्याने घराची आरेखणी करायला घेतली.

आपण इतके भराभर काम आटोपू शकतोय याबद्दल त्याचे त्यालाच खूप आश्चर्य वाटत होते. घर बांधणी वाटते तितकी कठीण नाहीये आणि उपजत असलेल्या कौशल्याने काम फारच लवकर होतंय हे पाहून तो स्वतः वरच खुश होता. चांगल्या प्रतीच्या बांधकाम साहित्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधणे. ते सामान घेऊन येणे हे सगळे खरेतर फार वेळखाऊ होते. पण कुठल्याशा अनामिक उत्साहाने त्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचा चंग बांधला होता.

अर्ध्यावर बांधकाम होत आले होते. त्यादिवशी बाहेरून पाहाणी करताना अचानक त्याला ती दिसली. तिची नजरही खरेतर त्याच्यावरच होती. त्या पहिल्याच नजर भेटीने दोघांच्याही मनात चलबिचल झाली. पण त्याने फारसे काही न दाखवता पुन्हा एकदा कामात व्यग्र असल्याचा आव आणला. मन मात्र तिचीच चाहूल घेत होतं. पुढचा काही काळ असाच एकमेकांकडे बघण्यात गेले. नाही म्हणायला घराचे काम थोडे थंडावलेच. त्यादिवशी धीर करून त्याने तिच्याशी गप्पा मारल्या. आधी अशाच आजूबाजूच्या, मग थोड्या आवडी निवडी आणि मग मनातल्या गुजगोष्टी. त्या गप्पा सरत्या सरू नयेत असेच त्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही हे ही खरेच. पुन्हा लवकरच भेटण्याच्या आणाभाका घेऊन दोघे आपापल्या रस्त्याने निघून गेले.

आता मात्र घराकडे थोडं लक्ष द्यायला हवं. तीला आवडेल असं घर सजवायलाही हवं हे त्याला प्रकर्षाने वाटून गेलं. 'बाहेरचा भाग होतोच आहे बांधून, पण थोडं आतूनही सजवूयात आणि तीला दाखवूयात' असा विचार करत दुसऱ्यादिवशी सक्काळीच लवकर उठून तो आतल्या सजावटीच्या तयारीला लागला. पुढच्या एकदोन दिवसात त्याने आतल्या भिंती छान सारवून गुळगुळीत केल्या. त्यांच्या प्रथेप्रमाणे पानाफुलांची नक्षी करून सजवल्या. उद्या भेटल्यावर तीला घर बघायचे आमंत्रण देण्याचे मनाशी ठरवून तो स्वप्नांच्या गावात निघून गेला.

दुसऱ्या दिवशीची भेट पुन्हा नेहेमीच सारखी नवीन आणि नव्याने ओढ लावणारी ठरली. हलकेच तीचा हात हातात घेत त्याने तीला घरी येण्याबद्दल विचारलं. लाजत लाजत तिनेही होकार दिला आणि तो आनंदाच्या झुल्यावर झुलायला लागला. त्यादिवशी ठरल्याप्रमाणे तो तीला घेऊन घरापाशी आला. अजून थोडं बांधकाम बाकी होतं पण तरी स्वतः बांधलेले घर तीला दाखवण्याचे त्याला भारीच अप्रूप होतं. घरात येताच तिच्यासाठी सजवलेली भिंत पाहून ती अगदी हरखून गेली. घरातच त्याने तीला आपली जोडीदार बनण्याविषयी विचारले आणि तीच्या होकाराने सगळे घर आनंदाने भरून गेले.

घराचे उरलेले बांधकाम मात्र दोघांनी जोडीने केले. आतल्या सजावटी बद्दल तिच्या खास सुचना होत्या. तीने तीला हवे तसे अगदी छान सजवून घेतले. तीच्या सहवासाने आणि मदतीने त्याच्या उत्साहाला पारावार नव्हता. कधी एकदा घर पूर्ण होतंय आणि आपण एकत्र राहायला जातोय असे त्याला होऊन गेले. आणि शेवटी एकदा तो दिवस उजाडला.

एका सोनेरी संध्याकाळच्या गोरज मुहुर्तावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्यांनी गृहप्रवेश केला. आपल्या हातांनी बांधलेलं घर पुन्हा पुन्हा कौतुकाने पहाण्यात दोघे गुंग झाले. इतक्यात 'जरा बाहेर जाऊन आलोच गं' असं म्हणत तो बाहेर गेला. 'थांब आता रात्रीचा कुठे..? ' अशी साद घालेपर्यंत तो दिसेनासाही झाला. ती एकटीच त्या अंधारया घरात त्याची वाट बघत राहिली.

बऱ्याच वेळाने तो आला, चोचीत काहीतरी घेऊन. आपल्या खोप्याच्या चिंचोळ्या दारातून आत शिरत आपण आल्याची वर्दी त्याने तीला दिली. ती थोडी रुसलीच होती. त्याने हळूच चोचीतले चार काजवे घराच्या कोनाड्यात ठेवले. त्या प्रकाशदिव्यांनी सुगरणीचा खोपा उजळून निघाला.आता मात्र तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून गेला आणि त्याची जागा कौतुक आणि प्रेमाने घेतली.

झाडावर टांगलेल्या आणि वारयाने झुलणाऱ्या त्या खोप्यात सुगरणीचे ते जोडपं सुखाने नांदू लागलं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

गोडम्बी कथा आहे...
खूपच सुन्दर.....
(हा "गोडम्बी " शब्द मा.बो. चि देणगी आहे.)
पु. ले. शु.

छान

आई गं!
कित्ती क्युट! Happy
मस्त सुसाट वेग असलेली अन अगदी अनपेक्षितपणे संपलेली कथा!
ते सुगरणीचं घर पाहून हरखून जाणं, मग तो बाहेर गेल्यावर रुसून बसणं, आणि काजवे पाहून पुन्हा उल्हसित होणं, हे सगळं अगदी डोळ्यासमोर घडतय असं वाटलं.पुलेशु.

इटुकली कथा वाचुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासुन आभार Happy
मोगराफुलला वर असलेला फोटो मी काढलेला नाहीये. आणि माझ्याकडे सुगरण पक्षाचे फोटो नाहीयेत इथे टाकायला. नाहीतर नक्की टाकला असता.

सावली कथा आवडली.
पण, मी मला वाटतं, घरटे बांधणीचे काम सुगरणीचे असते.
तुझ्यानुसार घर बांधणीचे काम त्याने चालू केले आणि नंतर दोघांनी मिळून ते पूर्ण केले.

सावली कथा सुंदर. मोजक्या शब्दात मांडलीय. पण शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला. शेवटही खूप छान
खूप आवडली.

धन्यवाद चमकी, सुरेखा आणि मी मनी म्यांऊ ,
मी मनी म्यांऊ , नाही. घरटे सुगरण बांधतो. अर्धे किंवा अधिक बांधुन झाल्यावर मादीला दाखवतो. तीला पसंद पडले तरच पुढचे काम करतो. हे असे अर्धे घर पसंद पडल्यानंतर काही वेळा मादी घरटे पूर्ण करण्यास मदत करते. अन्यथा नर एकटा घरटे पूर्ण करतो.

अरे ही सुगरणांची कथा होति काय.......?
मी तर अगदि एखादा मुलगा घर बांधत आहे असे रंजन करत होते. सहीच. नाही तर अशी मुलेच कुठे आहेत जी स्वःहस्ते घर सजवुन ( बांधणे तर दुरचं) आपल्या बायकोला अथवा प्रेयसीला ते दाखवतील......?
९०% तरी नाहीत. अपवादही असतीलच.
पु.ले.शु.
बाकि कथा एकदम झक्कास झाली.

मस्त गोड कथा
मी शेवटच्या पॅरा पर्यंत हिरो हिरॉईन इमॅजिन केलेले शेवटी वेगळंच जोडपं रिविल झालं. Happy