'देऊळ' आणि मायबोली' नविन लेखनात दिसले आणि मायबोलीने एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजकत्व स्विकारल्याचे वाचुन खरंच खूप अभिमान वाटला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन मायबोलीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच प्रकाशचित्र स्पर्धेची घोषणा झाली. यातील दुसर्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणुन माझं नाव घोषित झाले :-). नीलवेदने तर फोटो पोस्ट करायच्या आधीच सांगितले होते कि, "जिप्स्या, "देऊळ" या विषयावरच्या फोटोला तुलाच बक्षिस मिळणार, आणि त्यातील एक तिकिट मला पाहिजे आणि झालंही अगदी तसंच 'देऊळ' - प्रकाशचित्र स्पर्धा निकाल जाहिर झाला आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस मला जाहिर झाले. "देऊळ" चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी असे बक्षीसाचे स्वरुप होते. खरंतर मायबोलीवर या चित्रपटाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं यामुळे या चित्रपटाविषयी आकर्षण खुपच वाढले होते. त्यामुळे देऊळचा "फर्स्ट शो" पाहवयास मिळणार याचा कोण आनंद झाला होता.
दुसर्या दिवशी मंजुडीचा फोन आला आणि तिने चित्रपटाची वेळ, ठिकाण सगळं व्यवस्थित सांगितलं. आधी कबुल केल्याप्रमाणे प्रथम नीलला फोन करून येणार का विचारले असता काही कामानिमित्त त्याला जमण्यासारखे नव्हते. माझ्याकडची एक तिकिट तशीच असल्याने यो रॉक्स आणि मामीला विचारले, पण दोघांनाही अर्जंट कामं असल्याने जमण्यासारखे नव्हते. शेवटी माझ्या एका मित्राला प्रसाद कुलकर्णीला (मायबोली आयडी प्रकुल) तयार केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझीही हि पहिलीच वेळ असल्याने बराचसा आनंद आणि थोडीशी धाकधुक मनात घेऊन
ठिक ७:३० ला पीव्हीआर सिनेमा, फिनिक्स मॉल लोअर परळ, स्क्रिन नंबर सात इथे पोहचलो.
येथे पोहचल्यावर समोरच देऊळचे पोस्टर दिसले आणि त्यावर "मायबोलीचा" लोगो :-). पटकन एक फोटो काढुन घेतला ;-). थोड्याच वेळात मंजुडीही आली. तेव्हढ्या सगळ्या भागात त्यावेळेस आम्ही तीघेच होतो. इतर मायबोलीकर येण्याच्या आधीच आम्ही बक्षीस मिळाल्याच्या आणि प्रिमियर शोचा आनंद तिघांनी "Baskin Robbins" मधुन मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन साजरा केला.
सर्वप्रथम ठिक ७:३५ वाजता सुलभाताई देशपांडे यांचे आगमन झाले. त्यानंतर आठ वाजल्यानंतर एकेक तार्यांचे आगमन व्हायला सुरूवात झाली. याच तारे तारकांच्या मधे आपल्या मायबोलीकरांचेही एक एक करून आगमन व्हायला लागले आणि अगदी घरचे कार्य असल्याप्रमाणे मी आणि प्रसाद त्यांना अश्विनी, साधना, गजानन, आनंदयात्री यांना रीसीव्ह करायला खाली जात होतो. :फिदी:, त्यामुळे अधुन मधुन का होईना पण रेड कार्पेट सोहळा पाहता येत होता. हळुहळु मराठी चित्रपटसृष्टीतले एक एक तारे तारके हजर होऊ लागले आणि इतका वेळ शांत असलेला तो लाउंज गजबजु लागला. मंजुडीने सांगितल्याप्रमाणेच सगळे कलाकार घरगुती कौतुक समारंभाला यावे तसे अगदी जिव्हाळ्याने आलेले होते. यात गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, तुषार दळवी, विभावरी देशपांडे, मन्वा नाईक, प्रतिक्षा लोणकर, संदीप सावंत, ज्योती सुभाष, शर्वाणी पिल्ले, आतिषा नाईक, स्वानंद किरकिरे, स्मिता तांबे, नितीश भारद्वाज, प्रतिमा कुलकर्णी इ. कलाकारांनी हजेरी लावली होती. माझा पहिलाच अनुभव असल्याने सुरूवातीला सगळ्या सेलेब्रीटीजचे फोटो काढायला थोडासा बिचकत होतो, पण नंतर मात्र सर्रास फोटो काढायला लागलो पण तेव्हढ्यात मंजिरीला समीरने 'तुम्ही आत आल्याशिवाय मला स्क्रिनींग सुरू करता येणार नाही' असा आग्रह करत आत नेले होते. तिकिटे घेताना मंजिरीशी झालेली ओळख त्या गर्दीतही तो विसरला नव्हता, अगदी नावासकट. मायबोली किती स्पेशल आहे ते तेव्हा लक्षात आले. आमच्या जागा शोधुन एकदाचे स्थानापन्न झालो आणि माना वळवुन वळवुन अजुन कोणकोण आलेय हे पाहात होतो तोपर्यंत स्टेजवर निर्माते अभिजीत घोलप आले आणि सिनेमाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, कथा-पटकथाकार आणि मुख्य अभिनेता गिरीश कुलकर्णी, कार्यकारी निर्माते नितीन वैद्य, प्रसिद्धी प्रमुख समीर जोशी आणि राम कोंडिलकर यांची ओळख उपस्थित प्रेक्षकांना करून दिली.
अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासुनच चित्रपटाने पकड घ्यायला सुरुवात केली आणि आम्हीही त्या "मंगरूळ" गावचा एक भाग होऊन राहिलो. इरसाल गावच्या इरसाल माणसांप्रमाणे त्यांची नावेही तशीच इरसाल. कविता करणारा "पोएट्या", मुंबईत राहणारा "ऑडीयन्स", पत्रकार "महासंग्राम", जांबूवंतसिंग ऊर्फ टोम्या :फिदी:. खरं सांगायचा तर यातील प्रत्येकजण ती भूमिका अक्षरश: जगत होता. जेंव्हा केशा आजारी पडतो तेंव्हा गावच्या बायका घरात येऊन सांत्वन करताना "ताप आहे का?" ........."खरंच ताप आहे कि" म्हणतात तो प्रसंग तर अगदीच लाजवाब. यात ज्योती सुभाष, शर्वाणी पिल्ले, विभावरी देशपांडे, सरपंचबाई आतिशा नाईक यांचा अभिनय ग्रेटच. उषा नाडकर्णीचे "टराटरा फराफरा", काळा चष्मा घालुन टिव्ही बघणारी म्हातारी, सिरीयलच्या ब्रेकमध्ये स्वत:च्या पोराचे कौतुक करणारी आणि ब्रेक संपताच परत सिरीयल बघायला जाणारी आई, केश्या सोनालीबरोबर बोलत असताना नानाची होणारी घालमेल, शेवटचा नाणेघाटातला प्रसंग, केश्याला पिंकीने म्हटलेले "आय हेट यु" त्यावर केश्याचे "म्हंजी काय?" असा प्रश्न, इ. सारेच प्रसंग जबरदस्त. :-). नाना पाटेकरांच्या अभिनयाविषयी तर काय बोलावे? ग्रामसभेच्या वेळी भाषण करणारा नाना, सागरगोट्या/कांदाफोडी खेळणारा नाना, त्यांचे "शुन्य मिनिटातले" प्रत्येक काम, टोलनाक्यावर "टोल देऊ का?" असे विचारणे, त्यावर गावातल्याच पण त्या टोलनाक्यावर काम करणार्या मुलाने नका देऊ म्हटल्यावर "देतो ना" म्हणत केलेला अभिनय, बेरकी राजकारणी नानाने मस्तच रंगवलाय
नाना आणि दिलीप प्रभावळकरांमधील "अलिकडे आम्ही आहोत पलीकडे कायदा आणि आमच्या मधे भक्तांची रांग आहे. कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील" हा संवादही खासच. थोडक्यात काय तर सगळ्यांचे अभिनय, कथा, पंचेस, गाणी, सगळंच कसं मस्तच. :-), सुरुवातीला करडी गाईला हाका मारत धावणारा आणि तिच्यामृत्यू नंतरचा, देवळात देवालाच शोधायला निघालेला केश्या, गिरीश कुलकर्णींने अत्यंत सहज सुंदर अभिनय केला आहे. ऑलराऊंडर गिरीश कुलकर्णी बेस्टच. उत्तम अभिनय, संगीत, चित्रिकरण, दिग्दर्शन इ. गोष्टी चित्रपटाच्या जमेच्या बाजु आहेत. चित्रपटाचा शेवट हा देवळाचा "कळस" आहे.
बराच उशीर झाल्याने मध्यंतरानंतर मंजूडी, अश्विनी,साधना आणि साधनाची आई असे परत निघाले. आम्हाला (मी, प्रसाद, आनंदयात्री, जीडी & फॅमिली) मात्र मंगरूळ गावाने आणि गावकर्यांनी मोहिनी घातल्याने संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी आम्ही थांबलो.
प्रत्येकानी आवर्जुन चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. एका दर्जेदार चित्रपटाचा प्रिमियर शो मायबोलीमुळे पाहवयास मिळाल्याबद्दल मायबोलीचे मनापासुन आभार!!!!!!
सगळेच गडबडीत असल्याने कलाकारांसोबत मायबोलीकरांचे फोटो घेता आले नाही पण प्रिमियर शोच्या वेळेस टिपलेली काही हि प्रकाशचित्रे. पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याने सेलेब्रीटीजचे फोटो काढायला थोडासा बिचकत होतो. त्यातीलच हे काहि निवडक फोटो:
नाना पाटेकर
दिलीप प्रभावळकर
स्वानंद किरकिरे
सोनाली कुलकर्णी/मोहन आगाशे
मोहन आगाशे
सोनाली कुलकर्णी
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, नितीन वैद्य,समीर जोशी, राम कोंडिलकर
नितीश भारद्वाज
गिरीश कुलकर्णी
तुषार दळवी
उषा नाडकर्णी
उमेश कुलकर्णी आणि मन्वा नाईक
स्मिता तांबे
मिता सावरकर
प्रतिक्षा लोणकर
प्रतिमा कुलकर्णी
>>मराठी सिनेमाला लोक काय
>>मराठी सिनेमाला लोक काय ऑस्करसारखे गाऊन-टक्स घालून येणार काय
पौर्णिमा, ग्रेट मुद्दा गं. माझ्या लक्षातच आले नाही बघ.
मंजूडी, सांगू का? तांबेबाईंच्या मागे पॉपकॉर्न घ्यायला गजा उभा आहे.
जिप्स्या अभिनंदन. छान फोटो
जिप्स्या अभिनंदन. छान फोटो आणि वृतांत.
मस्तच.................
मस्तच.................
जिप्सी, खुप छान फोटो आणि
जिप्सी, खुप छान फोटो आणि शब्दांकन. अभिनंदन हे सगळं प्रत्यक्श अनुभवू शकलात म्हणून.
चित्रपटाविषयी प्रत्येक वाक्याशी सहमत. अप्रतिम कास्टिंग. प्रत्येक पात्र आणि प्रसंग प्रत्येक कलावंताने जिवंत केला आहे. नसिरुद्दीन शहाचे दर्शन ही सुखद. नाना, गिरिश आणि प्रभावळकरांविषयी बोलायला शब्द अपुरे. यातील गाण्यांचाही आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे.
जिप्सी, मस्त फोटो आणि
जिप्सी, मस्त फोटो आणि वृत्तांत! मला वाटतं तुला उद्या देव दिसला तरी तू आधी फोटो काढशील आणि मग पुढचं काय ते बोलशील.
मस्त वृत्तांत, नी फोटो.
मस्त वृत्तांत, नी फोटो.
जिप्सी, मस्त फोटो आणि वृत्तांत! मला वाटतं तुला उद्या देव दिसला तरी तू आधी फोटो काढशील आणि मग पुढचं काय ते बोलशील. >>> गुड १
जिप्सी, मस्त फोटो आणि
जिप्सी, मस्त फोटो आणि वृत्तांत!
शेवटच्या फोटोतील ते
शेवटच्या फोटोतील ते चष्मेवाले, भांबावलेले सद् गृहस्थ कोण?
फारच छान वृत्तांत... फोटोज्
फारच छान वृत्तांत...
फोटोज् पण खास..
लय भारी...
धन्यवाद लोक्स स्वप्ना,
धन्यवाद लोक्स
स्वप्ना,
खूप क्लियर अन सुंदर फोटो व
खूप क्लियर अन सुंदर फोटो व वृत्तांत सुध्दा.
खूपच छान.
खूपच छान.
झकास वृतांत आणि फोटो. ह्या
झकास वृतांत आणि फोटो. ह्या शनिवारी सिनेमा पाहिला. मलाही आवडला. मायबोलीचा लोगो पाहुन खूप खूप छान वाटलं.
छान फोटॉ आणि लिखाण ही! सिनेमा
छान फोटॉ आणि लिखाण ही! सिनेमा आवडला पण मध्यंतरानंतर जरा आवरला असता तर बरं असं वाटलं.
पहिल्या नंबरात फोटो आल्याबद्दल मनापासून अभिनंदन!
असेच उत्तरोत्तर यश मिळव!
एकदम जीवंत वृत्तांत मला
एकदम जीवंत वृत्तांत मला आयुष्यात दोन व्यक्तींना भेटण्याची भयंकर इच्छा आहे, नाना आणि शर्मिला टागोर... कुणाचा वट असेल तर प्लीज मला भेटवा
Pages