"कोंबडी आधी की अंडं?"

Submitted by आदित्य डोंगरे on 4 November, 2011 - 12:02

"कोंबडी आधी की अंडं?"
मानवजातीला आजपर्यंत अनेक सनातन,कूट प्रश्न पडलेले आहेत, ज्यांची उत्तरं अजूनतरी मिळालेली नाहीत. पण त्या सर्व प्रश्नांचे विषयही तसेच तोलामोलाचे, भारी होते! पण अश्या एक नव्हे दोन सनातन प्रश्नांचा विषय झालेलं आहे ते साधसुधं,सरळ,सोप्पं "अंडं"! हे एक महदाश्चर्यच नाही का? ते प्रश्न म्हणजे "कोंबडी आधी की अंडं?" आणि "अंडं veg की non-veg?". हे प्रश्न विचारले जातात तेच अश्या अविर्भावात की त्यांचं उत्तर मिळणं हे विचारणारयालाही अपेक्षित नसतं.
पण एक दिवस मी असं ठरवलं की या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायचीच. या प्रश्नांची खरी उत्तरं एका अंड्याशिवाय कोण देऊ शकणार? त्यामुळे मी एका अंड्यालाच हे विचारायचं ठरवलं. मग मी एका बरयापैकी बुद्धिवान, (आणि रिकामटेकड्या) दिसणारया अंड्याला गाठलं, आणि त्याच्यापुढे पहिला प्रश्न टाकला."कोंबडी आधी की अंडं?" ते चमकलंच. "एवढे माणसासारखे माणूस असून एवढं माहीत नाही?"
सनातन प्रश्नाचं उत्तर मिळणार असल्यामुळे मी एका फ़डतूस अंड्याने केलेला अपमान गिळला मुकाट्याने.
अंडं ऐटीत बोलू लागलं "आपण जर कालचक्र उलटं फ़िरवत गेलो ना, तर आपण अश्या काळात जावून पोहोचू की जिथे कोंबडी हा प्राणी अस्तित्वात नव्हता. पण हो! त्य काळात अंडी अस्तित्वात होती!....अहो डायनोसोर ची! डायनोसोर अंडी घालत होते माहित आहे ना? अहो जगातील पहिली कोंबडी ही अंड्यातूनच जन्मली की, पण कोंबडीच्या नव्हे, कोंबडीच्या पूर्वजाच्या अंड्यातून. हां, आता तुम्ही कोंबडीचं अंडं अधी की कोंबडी आधी असं specifically विचारलंत, तर कोंबडी आधी, पण नुसतंच अंडं म्हणालात तर ते कोंबडीच्या आधीच जन्मले हो!"
मी अवाक. बुद्धीवान माणसाला ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही ते एका क्षुल्लक अंड्याने किती झटकन दिलं! मी उत्साहाने दुसरा प्रश्न विचारला "अंडे veg असते की non-veg?" यावर मात्र थोडा विचार करून ते अंडं म्हणालं की "ह प्रश्न जरा तात्विक वगैरे आहे, माझ्या ओळखीचं एक अंडं तत्त्वज्ञानाचं प्राध्यापक आहे, आपण त्यांनाच विचारू."
माझ्या मित्र अंड्याच्या ओळखीमुळे आम्हाला कशीबशी प्राध्यापक साहेबांची appointment मिळाली. माझा प्रश्न ऐकून, माझ्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकून प्राध्यापक महोदय बोलते झाले "या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी veg व non-veg या शब्दांची व्याख्या करायला हवी. शास्त्रीय द्रुष्ट्या, वनस्पतीपासून मिळालेले ते veg व प्राण्यांपासून मिळालेले ते non-veg अशी सोपी व्याख्या आहे. या व्याख्येप्रमाणे कोंबडीपासून मिळालेले अंडे हे non-vegच आहे. पण यात गोची अशी आहे, की दूध सुद्धा गायीपासूनच मिळते की महाराजा! मग दूध पण non-veg झाले की! उद्या एखादे कर्मठ सोवळे रावसाहेब तुम्हाला सांगू लागले की अंडे हे non-veg आहे, तर खुशाल हो म्हणा त्यांना, पण त्यांना सांगा की तुमच्या व्याख्येप्रमाणे सात्विक दूधही non-veg आहे, आणि मग त्यांचा चेहेरा पहा.
पण आपल्या भारत देशात veg व non-veg ची अजून एक व्याख्या केली जाते. ह्त्त्या करून मिळवलेले ते non-veg व हत्त्या न करता मिळालेले ते veg. या व्याख्येप्रमाणे आजकालची जीव नसलेली broiler अंडी तरी veg. ठरतील. पण साधारणपणे veg. समजली जाणारी अन्न, धान्य, भाज्या, थोडक्यात म्हणजे शेती करून मिळवलेली सर्व अन्न, non-veg ठरतील, कारण शेती मध्ये वनस्पती उपटून किंवा कापून, म्हणजे वनस्पती ची ह्त्त्या करून अन्न मिळवले जाते. मग veg. उरलं तरी काय? तर अंडं, दूध, आणि फ़ळे! म्हणजे मागील व्याख्येत non-veg ठरलेल्या २ पदार्थांनी या व्याख्येत veg. म्हणून हजेरी लावलेली आहे. आता अश्या परिस्थितीत आपण काय करू शकतो सांगा पाहू तुम्हीच..........."
".............ताव मारण्या व्यतिरिक्त काहीही नाही!" प्राध्यापक महाशयांचे प्रवचन ऐकून पोटात कावळे कोकलू लागले होते, त्यामुळे मी उद्गारलो. मग प्राध्यापकांच्या लक्षात आलं की एका भुकेलेल्या मनुष्यप्राण्यासमोर बसलेले आपण एक अंडे आहोत. स्वतःच्या धोक्याच्या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे त्यांना घाम फ़ुटला आणि त्यांनी मला जवळ जवळ हाकलून देत मुलाखत आटोपती घेतली.
दोन सनातन प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे मी नोबेल प्राईज वगैरे ची स्वप्ने पहात चाललो होतो, इतक्यात मला असं वाटलं की मागून कुणीतरी धापा टाकत येत आहे व मला हाक मारत आहे. मी पाहिले तर ते रिकामटेकडे अंडे व प्राध्यापक अंडे माझ्या मगून धावत आले होते, मी थांबल्यावर तेही थांबले व थोडा दम खावून मग बोलू लागले ," तुमचे सनातन प्रश्न काय झटक्यात सोडवले आम्ही, नाही का? पण एक मिनिट थांबा,......या प्रश्नांनी जगाच्या सुरुवातीपासून अक्षरशः असंख्य गप्पा, संवाद...वाद, यामध्ये मनोरंजनाचा मसाला पेरलेला आहे. तेव्हा आमची अशी विनंती आहे की दोन घटका करमणुकीसाठी वाद घालायला लोकांसाठी हे प्रश्न असेच अनुत्तरित सोडून देवूया....तेव्हा आम्ही दिलेली उत्तरे तुम्हे गुप्त ठेवलीत तर बरे होईल, कसे?"
अंड्यांमध्ये झालेल्या या माणुसकी च्या दर्शनाने मला गहिवर-बिहिवर आला हो अगदी. पण निःस्वार्थीपणा करायला मी काय अंडं आहे का? मी तद्दन माणूस असल्यामुळे मला प्रसिद्धीची हाव आहे, त्यामुळे मला काही हा लेख लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. तेव्हा या सनातन प्रश्नांची उत्तरे एकदम गुप्त ठेवण्याची जबाबदारी मी वाचकहो, तुमच्यावर टाकत आहे. धन्यवाद!!!

गुलमोहर: 

अंडे कि कोंबडी हा खरोखरच डोक खाणारा प्रश्न आहे त्यामुळे तुमच्या अंडे महाशयांनी सांगितलेले उत्तर खरे समजतो . पण अंडे हे नॉनवेजच आहे .

भारीय तत्वज्ञान Lol
पण कोंबड्यावर का म्हणुन अन्याय ? हे असचं असतं , नेहमी जिकडे तिकडे पुरुष आणि कोंबड्याची परवडच होते Proud

अंड्यांमध्ये झालेल्या या माणुसकी च्या दर्शनाने >> इथे 'माणुसकी' ऐवजी 'अंडुसकी' असायला हव नाही का?? Proud