दिवाळी अंक २०११

Submitted by भरत. on 1 November, 2011 - 01:41

हितगुज दिवाळी अंक २०११ वाचून झाला, आता बाकीच्या अंकांकडे मोहरा वळवुया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या तरी नुसतेच अंक चाळणे चालू आहे.

ऋतुरंगचा ’माझं जन्मघर विशेषांक’ आहे. पहिलाच लेख गुलजारचा. वाचताना राहून राहून, त्यांच्याच शब्दांत वाचायला आवडले असते असे वाटत राहते. आरती अंकलीकर- टिकेकर यांचा ’माझं अवकाश’ छान आहे. मजेत, सुखात गेलेल्या बालपणाचे वर्णन करायचे नसते हा शिरस्ता त्यांनी मोडला आहे. एकाच विषयावरचे, ’आमच्या वेळी’ची प्रचंड लांबलेली तान असे वीसेक लेख सलग वाचणे मात्र अवघड आहे.
अक्षर : एक पेपर तीन संपादक हा प्रकाश अकोलकर यांचा महाराष्ट्र टाइम्सच्या तीन संपादकांवरचा लेख मी महाराष्ट्र टाइम्स कधीही वाचलेला नसूनही इंटरेस्टींग वाटला.
दीपावलीचे देवदत्त पाडेकरकृत मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे. यात नंदिनी आत्मसिद्ध यांनी मंटोवर लिहिले आहे. शरद वर्दे ऑस्ट्रेलियात पोचलेले दिसत आहेत.
लोकसत्तामध्ये स्टीव्ह जॉब्सवर ’अ‍ॅपलचा आत्मा’ - तुषार देवरस यांनी लिहिला आहे. सत्यदेव दुबेंवर चक्क पाच लेख आहेत....लेखक : अमोल पालेकर, विजय केंकरे, निपुण धर्माधिकारी, किशोर कदम आणि अतुल पेठे.
पुरुष स्पंदनं मधे नॅन्सी स्मिथ रचित फ़ॉर एव्हरी वुमन या कवितेचा अनुवाद आहे.
मुक्त शब्दच्या ’श्रीमंत’ अंकाच्या मुखपृष्ठावर हळदणकरांचे ’ग्लो ऑफ़ होप’ हे सुंदर चित्र आहे. त्याविषयी प्रभाकर कोलते यांनी लिहिले आहे. विचारतुला ही दोन व्यक्तींवरील तुलनात्मक लेखांची मालिका आहे. संपादकांच्या शब्दांत : मिथ्यकथांपासून क्रिकेटपर्यंत आणि नाटकापासून उद्योगविश्वापर्यंत, तसेच भूतकाळापासून वर्तमानकाळापर्यंत घडण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सांस्कृतिक संदर्भाचा आडवा छेद घेण्याचा प्रयत्न विचारतुला मधून केला आहे.

बरं झालं हे सुरू केलंत ते.
माझे अजून घ्यायचेत अंक. आणि लायब्ररीही आहे. लिस्ट होऊन जाईल. Happy

मी उत्तम कथा वाचला. ठिक आहे. काही कथा जाम सो सो. काही बर्‍या.

सत्यदेव दुबेंवर चक्क पाच लेख आहेत....<< चक्क का? पद्मभूषण मिळालं यावर्षी त्यांना हे माहित नाही का? ते महत्वाचं नाहीये? FYI मराठी थिएटरसंदर्भात पण भरपूर काम केलंय त्यांनी.

मयेकर, 'वळवूया' ना? Happy

नुसतेच घेतलेत अंक. अजून एकही वाचलेला नाही.

कालनिर्णयच्या अंकात एम एफ हुसेन यांच्यावर लेख आहे(त). त्यांची काही चित्रेही.
लोकसत्ताचा ह्यावेळचा अंक आवडला. लेख, मुलाखती चांगल्या वाटताहेत.
अनुभवचा अंकही चांगला वाटतो आहे.

अजूनही घेतलेत, पण धड चाळायलाही झाले नाहीयेत, तेह्वा थोडंफार वाचून झाल्यावर काय काय आवडलं हे लिहिते. अंतर्नादचा दिवाळी अंक घ्यायचा आहे अजून. दोनदा चौकशी केली, तोवर आला नव्हता. आता आला असावा.

ह्या वेळी दिअंच्या किंमती कायच्या काय आहेत Sad

माझे दिवाळी अंक रत्नागिरीत घेतलेत. कुठले वाचणेबल आहेत ते इथे बघून ठरवेन आणि इकडे मागवेन. Happy

मायबोलीवर दिवाळी अंकाची खरेदी काय अजून जमतच नाहिये.

''आकंठ'' दिवाळी अंक यंदाचा हिंदी कथा विशेषांक आहे.

हिंदीतील सर्वोत्तम कथा अनुवादित करुन वाचकांसाठी सादर केल्या आहेत.
या आधी,उर्दू,तामिळ्,गुजराती,बंगाली विशेषांक अगदी संग्राह्य झाले आहेत.

आकंठ च्या यंदाच्या अंकात मी यशपाल यांची ''ज्ञानदान'' ही कथा अनुवादित केली आहे. Happy
किंमत ७५ रुपये.

संपादक---- रंगनाथ चोरमुले
कार्यकारी संपादक.---- डॉ.राम पंडीत

मौज आजच आलाय माझ्याकडे. वाचला नाही अजून. मधु मंगेश कर्णिक, संजीव लाटकर, भारत सासणे, विजया राजाध्यक्ष यांच्या कथा दिसत आहेत. कविता खूप आहेत. पन्नासेक. त्यात प्रथितयश पण. 'बदलता समाज..' वरचा मोठा परिसंवाद दिसत आहे. मागच्या दोन्ही वर्षांपेक्षा यावेळचा मौज बरा वाटतो आहे.

अनुभव, अक्षर, किस्त्रीम, दीपावली इ. पण आलेत. अजून बघितले नाही.

कालनिर्णय नक्की घेणार.
लोकसत्ताने निराशा केलेली मागल्या वेळेस. शैलजा, थोडे डिटेल्स देणार काय?

हो, आरती.

--

युनिक फीचर्सचा 'अनुभव' नेहमीच नावाला जागणारा असतो. विश्वास पाटलांनी मात्र थोडी निराशा केली (चीन- युआन श्वांग, शांघाय, शियॉन). त्याच विषयावर लिहिलेल्या निळू दामलेंकडून फार अपेक्षा नाहीत. पण वाचायला हवं. (लवासा विचारसरणीची कल्पना तरी येईल. Proud असंही, 'आपला प्रॉब्लेम तरी काय, राजेहो' असंच काही तरी शीर्षक आहे.)

'अनुभव'चा संपूर्ण 'कलर्ड-ग्लेझ्ड' अंक हाताळायला बरं वाटतंय. इतर अंकांनो, पाने पाहिजे तर थोडी कमी असू देत, फॉन्ट अजून किंचित लहान असू देत, किंमत पाहिजे तर पाचदहा रुपये जास्त असू देत, लेखकांबाबत थोडेफार नवीन प्रयोग असू देत; पण नवीन वाचक येऊ देत. तुमचे अंक वर्षानुवर्षे आवडणारी पिढी जुनी झाली, नामशेष झाली, तर काय करणार तुम्ही? जुनं 'महात्म्य' वगैरेला आंजारत गोंजारत मोठे दिवाळी अंक (कमीत कमी दृष्य रूप) बदलत नाहीत, याची चिंता वाटतेय. आपल्याला वाटून काही फायदा नाही, त्यांना वाटली पाहिजे. सत्यकथासारखे लोप पावले, यांची काय कथा?

'दिवाळी अंकांचे अर्थकारण' हा महत्वाचा भाग आहे, हे मान्य आहे.

तुमचे अंक वर्षानुवर्षे आवडणारी पिढी जुनी झाली, नामशेष झाली, तर काय करणार तुम्ही? >>> अगदी. अगदी साजिरा.

>>> ऋतुरंगचा ’माझं जन्मघर विशेषांक’ आहे. पहिलाच लेख गुलजारचा. वाचताना राहून राहून, त्यांच्याच शब्दांत वाचायला आवडले असते असे वाटत राहते . . . एकाच विषयावरचे, ’आमच्या वेळी’ची प्रचंड लांबलेली तान असे वीसेक लेख सलग वाचणे मात्र अवघड आहे.

सहमत. सुरवातीचे २-३ लेख वाचल्यावर उरलेला अंक अतिशय कंटाळवाणा आहे.

"साप्ताहिक सकाळ"च्या अंकाची छपाई उत्तम आहे, पण १-२ लेख वगळता अंक फारसा चांगला नाही. बाकी अजून वाचले नाहीत.

ऋतुरंग 'माझं जन्मघर' विशेषांक असला तरी बहुतेकांनी आपण राहिलेल्या वेगवेगळ्या घरांचे वर्णन आणि त्या अनुषंगाने आयुष्याचा घटनाक्रम याबद्दल लिहिले आहे.
माझे घर जळाले त्याची गोष्ट -दिनकर रायकर आणि आयुष्य तिथेच आहे - अरुण जाखडे हे दोन लक्षात राहतील.

शहरातल्या फक्त एकाच घराचे वर्णन आहे: गिरगावातल्या झावबावाडीवर घराच्या
आसपास या सदरात :'....आणि मोकळे आकाश' - प्रदीप म्हापसेकर.

पक्ष्यांची घरटी या लेखात बी एस कुलकर्णी यांनी पक्ष्यांच्या गृहबांधणीचे आणि बालसंगोपनाचे वर्णन केले आहे. राखी तितिर पक्ष्याचे जमिनीत, गवतात बांधलेले घरटे, त्यातली अंडी जवळून पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी त्या पक्ष्याचा थरकाप उडवीत, त्याच्या फूटभर इतके जवळ जाऊन त्यांनी आपले पक्षीप्रेम सिद्ध केले आहे.

इथे इतिहास घडला या सदरातले तुकोबांचे घर (सदानंद मोरे) गायकवाडांचा वाडा {शंभर वर्षांपूर्वी पुण्यातला दरवान भैय्या होता?}(अरविंद व्य. गोखले) आणि शेक्सपिअर हाऊस (कुमार नवाथे) असे सर्व लेख इंटरेस्टिंग. (शंभर वर्षांपूर्वी पुण्यातला दरवान भैय्या होता?)
इथे आणि तिथे या लेखात दिलीप चावरे यांनी ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याबाबत पाश्चात्य देशांत आणि आपल्याकडला फरक मांडला आहे. हे नव्याने सांगितले गेले नसले तरी पुन्हा पुन्हा सांगितले गेले पाहिजे असेच आहे.

साप्ताहिक सकाळचा अंक चाळला. मुखपृष्ठावर ती दबंगवाली अभिनेत्री. !!
कागद चांगला आहे. एवढेच सांगण्यासारखे आहे. Proud
पैसे घेऊन छापलेल्या काही जाहिरातींची छपाईसुद्धा चांगली नाही.

त्यात खालील उल्लेखनीय वाटले. अजून बाकीचे वाचते आहे.
- युनिक फीचर्सचा पुण्यातील मुठा नदीच्या प्रदुषणावरचा लेख.
- पद्मिनी बिनीवाले यांचे 'बाळघर' आणि मल्लिका अमरशेख यांचे लेखन

काल सह्याद्री वाहिनीच्या अमृतवेल या कार्यक्रमात दिवाळी अंकांबद्दल चर्चा होती. 'चिन्ह'चे सतीश नाईक यांनी चिन्ह हा अंक निव्वळ मागणीवर चालतो आहे, त्याची माहिती फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचते आहे ही माहिती दिली. दिवाळी अंकाची किंमत ६०० रुपये.
चिन्हच्या 'नग्नता : मनातली आणि चित्रातली' या विशेषंकाच्या संपादिका शर्मिला फडके यांनी 'पुरुषस्पंदनं' मध्ये लिहिले आहे.

याच कार्यक्रमात कळले की महाराष्ट्र टाइम्सचे हे पन्नासावे वर्ष असल्याने यंदाचा अंक सिंहावलोकनपर आहे. मटाच्या विविध पुरवण्यांतून प्रकाशित झालेल्या लेखनातले वेचक साहित्य दिवाळी अंकात आहेत. आरती प्रभू, सुरेश भट ही नावे कानावर पडली.
मिळून सार्‍याजणी या अंकात लक्ष्मण लोंढे यांचा 'महामानवाचे मातीचे पाय' हा आइन्सटाईनवरील लेख आहे. मारिया मिएस,माधुरी पुरंदरे, संजय पवार, सोनाली कुलकर्णी यांच्यावर लेख /त्यांच्या मुलाखती आहेत.
विद्या बाळ यांनी भ्रष्टाचाराविरोधात 'आता जबाबदारी आपलीच' कोणती ते लिहिले आहे. (अक्षरच्या संपादकांनी भ्रष्टाचाराला विरोध करण्याची शपथ घेण्याविषयी लिहिले आहे).
मिळून सार्‍याजणीचा विशेष विभाग 'वेश्याव्यवसाय : आपली तुपली नैतिक गोची'.
"पितृसत्तेमध्ये विवहव्यवस्था आणि वेश्याव्यवसाय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवाहाच्या चौकटीत जगणार्‍यां स्त्री-पुरुषांच्या वागण्याबोलण्यात एक नैतिकतेचा 'दर्प' असतो. विवाहाच्या चौकटीबाहेरच्या वेश्यांना तुच्छ लेखण्याचा जणू त्यांना परवाना मिळाला आहे ,अशा थाटात ते बोलत असतात. विवाह हा अनेकदा स्त्रियांसाठी उपजीविकेचा मार्ग असतो"- संपादकीयातून.
"अशापैकी, तशापैकी म्हणजे काय ते मला माहीत नाही. फक्त मी नाही म्हटलंय हे मला माहीत आहे आणि ते तुम्ही समजून घ्यावं." - मनीषा गुप्ते लिखित लेखातून.

रहस्यकथा, गूढकथा इ. च्या चाहत्यांसाठी असलेला "धनंजय" वाचला.
कथा ठीकठीकच आहेत पण त्यात एक (माझ्यासाठी तरी नविन ) कथा प्रकार "फ्लॅश फिक्षन" वाचला.

फ्लॅश फिक्शनः चमकुन, उडुन जाणार्‍या फ्लॅश सारखी ती कथा एका नजरेतुन वाचुन झाली पाहिजे. टप्प्याटप्प्याने वाचायची गरज पडता कामा नये. नजरेच्या एका टप्प्यात येइल असा तिचा आकार असावा-शक्यतो १००० शब्दाच्या आत. पण कथेचे सर्व निकष सांभाळले गेलेच पाहिजेत..कथाविषय पाहिजे, पात्रे पाहिजेत, प्रसंग आणि प्रसंगानुरुप संवाद, वर्णन पाहिजे, भावभावना पाहिजेत आणि जी कल्पना मांडायची ती तेवढ्या शब्दात वाचकांपर्यंत संपुर्णपणे पोहोचलीच पाहिजे.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट्स दिलेल्या आहेतः
www.flashfictiononline.com
www.bestsciencefictionstories.com
www.anotherrealm.com
www.55fiction.com

मेघश्री दळवी या लेखिकेच्या उद्या (१००० शब्द) , निळाई (५०० शब्द), खेळ (१९० शब्द) या विज्ञानकथा आहेत. मला तरी आवडल्या.

नोटः इतका अवांतर फापटपसारा लिहिण्याचे (स्वार्थी) कारण..जर या नवीन कथा प्रकारासाठी मायबोलीने काही उपक्रम केला तर आम्हाला चांगल्या कथा इथे वाचायला मिळतील Happy

चिन्हचा नग्नता विशेषांक अप्रतिमच आहे. अगदी संग्रही ठेवावा असा. उत्तम प्रकारे छापलेली अनेक महत्वाची पेंटींग्ज असल्याने किंमत जास्त असणारच आहे पण तरी टोटली वर्थ इट. तो दिवाळी अंक कुठेय पण? जुलैमधे प्रसिद्ध झाला होता तो. माझी कॉपी ऑगस्टमधे आली माझ्याकडे. वार्षिक एक अंक असतो त्यांचा दृश्य कलासंदर्भाने एकेका विषयाला घेऊन.

मिळून सार्‍याजणीच्या अंकात वेश्याव्यवसाय करणार्‍यांच्या बरोबर/त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्थांतून काम करणार्‍यांनी लिहिलेल्या लेखांतून व्यक्त झालेल्या विचारांवर आणि अशा संस्थांच्या कामावरही कविता महाजन यांनी आपल्या लेखातून एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह काढले आहे.
मंगला सामंत यांचा लेख चांगलाच स्फोटक आहे.
माधुरी पुरंदरेंवरचा लेख आवडला. (एखाद्या व्यक्तीवर लिहिताना तिच्या न पटलेल्या गोष्टींसाठी आपल्याला पटेल असे स्पष्टीकरण शोधलेच पाहिजे का?नुसतं आहे ते स्वीकारून पुढे जावं की.) तसाच सोकुलवरचा सचिन कुंडलकर यांनी लिहिलेला.
पद्मजा फाटक यांचा लेखही आवडला.

प्रज्ञा दया पवार यांच्या कथेत कोसून(कोसना हे हिंदी क्रियापद), तितरबितर झाले असे शब्दप्रयोग आहेत.

अंतर्नादच्या अंकात 'मराठीपण जपणे म्हणजे नेमके काय?' या विषयावर परिसंवाद आहे. मराठी भाषेत घुसू पाहणार्‍या हिंदी शब्द आणि शब्दरचनांबद्दल एक लेख सलील कुलकर्णी यांनी अंतर्नादच्या एका (मासिक) अंकात या वर्षातच लिहिला होता. त्याला धरून दोन्ही बाजूनी प्रतिसादांची खडाखडी गेले काही महिने चालू होती. तेव्हा यालाच धरून एक जंगी सामना होईन जाऊ दे असे अंतर्नादच्या संपादकांनी ठरवलेले दिसते आहे. सलील कुलकर्णी आणि इंदूरचे (ते इंदौरचे असे लिहितात) श्रीकांत तारे यांनी आपल्या त्याच भूमिका पुन्हा मांडलेल्या दिसल्या. नीलिमा गुंडी, विन्य सहस्रबुद्धे, दिनकर गांगल हे काही परिसंवादक.
कमल देसाईंबद्दल अनिल अवचट यांनी लिहिले आहे. (हे वाक्य अनिल अवचट यांनी या अंकात कमल देसाईंबद्दल लिहिले आहे असे वाचावे!)
मीरा सहस्रबुद्धे यांच्या तेरा कविता आहेत.

भरत Lol

माहेरचा अंक बराचसा वाचला.
इरावती कुलकर्णी म्हणजे आपली अरुंधती का? आरतीताईंची मुलाखत घेतली आहे. काही भाग आवडला.
साजिर्‍याची 'दरजा'कथा सुरेख नेहमीप्रमाणेच.
नीरजाची कथाही छान. लेखनाची क्रिया किती एकमितीय असते. अवघड असते ते उतरवून काढणे. चिन्मयचा लेख छान.
कलापिनी कोमकलींच्या आठवणी आवडल्या. राहुल देशपांडेच्याही. प्रामाणिक सूर वाटला, तो भावला.
कुंडलकरांचे स्वतःच्या आत्महत्येच्या प्रयत्नावरील 'फिक्षन' ची शैली अफाट आहे.. मस्ट रीड. त्यात मध्येच चौकटीत 'मेनकाची' जाहिरात. काहीही...
मंगला गोडबोल्यांची कथा आवडली.
आनंद बंग यांचा लेख वाचनीय.
गीतांजली (अतुल) कुलकर्णी यांनी घेतलेला सहजीवनाचा वेध घिसापिटा नव्हता. त्यामुळे फारच वाचनीय. दोघेही इंट्रेस्टिंग आहेत. त्यांचे ग्रीन लाईफस्टाईल स्वीकारण्याचे धैर्य आवडले.

एकंदरित अंक छानच. बर्‍याच वर्षांनंतर 'माहेर' वाचला असेन. ते सुद्धा मायबोलीकरांमुळे. मुखपृष्ठ तेवढे बोर वाटले.

>इरावती कुलकर्णी म्हणजे आपली अरुंधती का? आरतीताईंची मुलाखत घेतली आहे. काही भाग आवडला. > मलाही अरुच वाटली.
कलापिनी कोमकली ह्यांचे कथनही आवडले. ह्या अंकातले अजून इतकेच झालेय वाचून. ह्या वर्षी फारच बॅकलॉग राहतो आहे.
>मुखपृष्ठ तेवढे बोर वाटले. >> हो.

भरतना अनुमोदन.
'मिळून सार्‍याजणी' च्या अंकातील वेश्याव्यवसायावरील विशेष विभाग उत्कृष्ट झाला आहे. याला म्हणतात काम, एखाद्या विषयाचा आढावा. वाचकाला तुच्छ न लेखता तरीही सत्य मांडण्याचे, डोळे उघडवण्याचे कसब आहे त्याला _/\_
विशेष विभागाचे संपादक- उत्पल चंदावार. टेरिफिक काम झालं आहे.
-वर भरतने नमुद केलेला मनीषा गुप्तेंचा 'वेश्याव्यवसाय व कुटुंबव्यवस्था: पितृसत्तेच्या नाण्याच्या दोन बाजू' हा लेख अफाट आहे. तो लेख वाचला आणि गरगरले अक्षरश:
- मंगला सामंतांचा 'वैश्यांमागील भारतीय रहस्ये' हा लेख मला जरा स्त्रीवादाच्या काहीश्या भरात लिहील्यासारखा वाटला. पटला नाही. त्यात काही कच्चे दुवेही वाटले. कदाचित पूर्वसंस्कार, शिकलेला इतिहास पुसायची माझी कुवत नसावी.
-डॉक्टर कुलकर्ण्यांचा एडस वरील लेख आणि आढावा चांगला वाटला.
-मीना शेषु यांचा 'ते सुरवातीचे दिवस..' यात सांगलीकर्‍हाड मधील वेश्याप्रश्न सामाजिक कार्यकर्ती म्हणून हाताळतानाचे अनुभव, अतिशय प्रामाणिक, अभिनिवेशविरहीत वाटला. फार आवडला.
-सुषमा देशपांड्यांचा नाटक बसवतानाचा ठिक.
- डॉ साहनींचा 'गरीबी, श्रमबाजार आणि वेश्याव्यवसाय' यात आकडेवारीसंदर्भात जे मांडले आहे ते डोळे उघडणारा आहे.
- रेखा देशपांड्यांचा 'चंद्रमुखीच्या प्रदेशात' वरवरचा वाटला अगदी. त्या मानाने संगीता ढमढेरेंचा 'माध्यमातील सेक्सवर्कर. भोंगळ विधाने, ठोकळबाज चित्रण' हा चांगला वाटला.

डॉ संजीवनी कुलकर्णींनी करुन दिलेला माधुरी पुरंदरेंचा परिचय, त्यांच्या कार्याचा आढावा सुरेख आहे.
आढावा समीक्षकी नाही, आवही नाही, त्यामुळे तो हृदयाला हात घालतो. शंभरापैकी ९०. (जराssशिक साखर कमी चालली असती. ) पण माधुरीताईंबद्दलची काही वाक्य केवळ फ्रेम करुन लावावीत अशी आहेत. त्यांच्यासारखे एक जरी पुस्तक लिहीता आले, एक जरी गाणे गाता आले, तर मी धन्य होईन.
' ती करते ते नेहमीच नेमकं, सुंदर, विलक्षण, असं कसं असतं ?' या पहिल्या वाक्यापासून अनुमोदन.

आणि संपादकीय कसे असावे याचादेखील वस्तुपाठ आहे.

संजयपवारांवरील लेख 'कल्पकतेचा आधुनिक प्रवास' बोर वाटला. काहीच नाविन्य नाही. ठोकळेबाज.

' ती करते ते नेहमीच नेमकं, सुंदर, विलक्षण, असं कसं असतं ?' <<<
अंक वाचला नाहीये पण माधुरीताईंना जेवढं अनुभवलंय तेवढ्यावरून हे वाक्य करोडो मोदकांच्या क्वालिटीचं आहे. Happy

अंतर्नादच्या 'मराठीपण जपणे म्हणजे नेमके काय?' या परिसंवादातले ज्ञानेश्वर मुळे, वसुंधरा पेंडसे नाईक, भाग्यश्री बारलिंगे, भूषण निगळे यांचे लेख आवडले. दिनकर गांगलांनी बर्‍याच फुग्यांना टाचण्या लावल्या आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांचा लेख खूप आवडला. उपग्रहातून मराठी मानसिकतेची छायाचित्रे आणि चिकित्सा केल्यासारखा दृष्टिकोण वाटला.
दिनकर गांगलांचे `महाराष्ट्रात सर्वत्र सध्या कुमार केतकर, अभय बंग आणि अरुणा ढेरे या तीन व्यक्तींबद्दल कुतूहल, प्रेम आणि आदर आहे' हे निरीक्षण वाचून बरे वाटले.
कोसळलेला महाराष्ट्र - अरविन्द पारसनीस आणि सर्वसामान्य मराठी माणूस - अवधूत परळकर(या लेखात आरसेच आरसे आहेत!) हे पण आवडले.
या संपूर्ण परिसंवादात आणि मराठी माणसाबद्दलच्या अन्य काहे लेखांत मराठी अस्मितेचा झेंडा आणि दंडुका घेणार्‍या लोकांबद्दल एकही चांगले वाक्य नाही. त्या मंडळींनाही या परिसंवादासाठी लिहिते केले पाहिजे होते.
तसेच मराठीपणाच्या संदर्भात मराठी नाटक आणि संगीत यांचा अनुल्लेख ठळकपणे जाणवला.
विमल रॉय : कलात्मक सामाजिकता : स्वाती कर्वे हा लेख वाचल्यावर 'ते' काही चित्रपट परत पहायला हवेत असे वाटायला लागले.
नाटक आणि चित्रपट : तौलनिक अभ्यासाच्या काही दिशा हा विजय पाडळकरांचा लेख वाचताना सांगितलेल्या गोष्टी ऑब्व्हियस वाटल्या तरी सगळे एकत्र वाचायला आवडले.
पान १४८ वरची राज्य्य मराठी विकास संस्थेच्या प्रकाशनांची पुसट आणि सूक्ष्म अक्षरांतली जाहिरात मराठीच्या सद्यस्थितीची जाणीव करून देण्यासाठी तशी छापली असावी (का?).
कमल देसाईंचा अलीकडचा आवडता लेखक हॅरी पॉटर होता अशी माहिती अनिल अवचट यांचा लेख वाचून मिळाली.
गेल्यावर्षीचा अंतर्नादचा अंक मुळीच आवडला नव्हता. यावर्षीचा छान वाटला.

मी अजून कुठलाच दिवाळी अंक वाचला नाहीये. अक्षरचा अंक चाळला होता, त्यात 'सागरीका घोष' यांचा लेख खूप छान आहे. सगळ्यांनी वाचावाच असा आहे.

Pages