अस्त

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दिवसभर बहुदा कुठे-कुठे फिरल्यामुळे ग्लानी येत होती. येथील सुर्यास्त खूप प्रसिद्ध होता - रोज एक वेगळा अनुभव म्हणे. तिकडेच आमची बस थांबकळत निघाली होती. जास्त वेळ उरला नसल्याने सर्वच मनातल्या मनात का होईना रस्त्यावरील गर्दीला शिव्या देत होते. बसच्या डाव्या बाजुला पश्चीम होती व सलग असलेल्या उत्तुंग इमारतीं दरम्यान असलेल्या रस्त्यांच्या बारक्या फटी अचानक प्रकाश वाढवुन खुणावत होत्या, आकर्षीत करत होत्या, चुळबुळ वाढवत होत्या.

अचानक बसची गती कमी झाली व डावीकडे जाऊन थांबली. ज्यानी कुणी इमर्जन्सी स्टॉप मागीतला होता त्याचा उद्धार करत त्याच्याबरोबर अजुनही काही लोक उतरले. आता अजुन उशीर होणार. उतरलेल्यांचे कॅमेरे तयारच होते. मशीनगनच्या अधाशीपणाने आजुबाजुचे सगळे टिपणे सुरु झाले.

वर काही पतंगी उडत होत्या. एकाने आपला हाय-झुम कॅमेरा त्यावर रोखला व पटापट १०-१२ फोटो टिपले.
तो: या पतंगावरची जपानी मांजर किती मस्त आहे ना?
ती: अरे हो की, जबरीच आहे.
अजुन २-४ कॅमेरे तिकडे वळले, पण निघायची नांदी झाल्याने सर्व लगेच परतले व बस निघाली पुढे.

येथील खास सुर्यास्त बघण्याच्या इतरांच्या आनंदात व्यत्यय येऊ नये म्हणुन पुलावर बसेसना बंदी होती. धरणाच्या पायथ्याशी बसेस थांबायच्या व तेथुन चढुन वर जायचे. गेला अजुन थोडा वेळ - आणि शक्ती.
अर्ध्या पायऱ्या चढेपर्यंत थकलो होतो. तिथे लिफ्टवजा काहीतरी दिसताच सतत शॉर्टकट शोधणारे माझे मन हरखले. आत एक गडी पेंगत बसला होता. मी आत शिरताच 'चलायचं का?' असं काही तरी मोघम पुटपुटला. मी मानेनेच होकार भरला. दूरदेशात असे खरेतर करायला नको. मानेची कोणती दिशा काय अभिप्रेत करेल कुणास ठाऊक?

दोन-चार व्यवस्थीत श्वास घेऊन हृदयाचे ठोके पुर्ववत होतात न होताच माझ्या लक्षात आले की आपण वर न जाता खाली जातो आहोत. यळक्षज्ञ! हुकणार नक्कीच सुर्यास्त. आणि जितक्या पायऱ्या चढलो होतो त्यापेक्षा जास्त खोल जात होतो. भुगर्भात. कुठे चलण्याबद्दल विचारले याने कुणास ठाऊक. त्याला पुढे होऊन विचारणार इतक्यात लिफ्ट थांबली व एका प्रशस्त बगीच्यात उघडली. माझा भांबावलेला चेहरा त्याला दिसु न देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत मी बाहेर पडलो.

दोन वळणे घेउन बागेतील तो छोटा रस्ता काही टुमदार झोपडीवजा घरांजवळ पोचला. कोणता तरी रिसॉर्ट असावा. काय करावे या विचारात गढलो असतांनाच एक गार्ड येऊन माझी कोणती झोपडी आहे असे विचारु लागला. नक्कीच त्या लिफ्टवाल्याने त्याला सांगीतले असणार. दूरवरच्या एका गटाकडे बोट दाखवत मी: 'एका मित्राची वाट पाहतो आहे'. त्याने त्याचे समाधान झाल्यासारखे वाटले व तो पसार झाला. तो जातो न जातो, तितक्यात खरच माझा मित्र दूरुन येतांना दिसला. तो इथे आहे हे ही मला माहीत नव्हते.
मी: 'अरे, तु इथे कसा?'
तो: 'मी तुला तेच विचारणार होतो - तु इथे कसा म्हणुन'
मी: 'पण मी आधी विचारले'
तो: 'माहीत नाही'
मी: 'काय माहीत नाही?'
तो: 'की मी इथे कसा?'
मी: 'म्हणजे?'
तो: 'विश्वास नाही बसणार तुझा. मी एका मॉल मधे एका मित्राबरोबर होतो, एका रेस्टरुममधे गेलो, आणि अचानक मी या बागेत होतो.'
मी: 'हम्म, बसायला नको, पण बसतो आहे विश्वास'
मग मी त्याला माझी कथा सांगीतली. नशीबाने त्याच्याजवळ सेलफोन होता. आम्ही तेथील खुर्च्यांवर - पुन्हा डोकावुन गेलेल्या गार्डच्या नाकावर टिच्चुन - बसलो व मित्राने फोन बाहेर काढला.

विषय: 
प्रकार: 

मग मी त्याला माझी कथा सांगीतली. नशीबाने त्याच्याजवळ सेलफोन होता. आम्ही तेथील खुर्च्यांवर - पुन्हा डोकावुन गेलेल्या गार्डच्या नाकावर टिच्चुन - बसलो व मित्राने फोन बाहेर काढला. >> आता आज याच्या पुढचे स्वप्न पडणार का? Happy तसे पडले तर नंतरच्या भागात काय झाले ते पण लिहाच! Happy

Back to top