एक प्रतिभावान पटकथालेखक आणि ताकदीचे अभिनेते म्हणून गिरीश कुलकर्णी प्रसिद्ध आहेत. 'गिरणी', 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर' अशा लघुपटांतला-चित्रपटांतला अभिनय असो, किंवा 'वळू', 'विहीर' या चित्रपटांचं लेखन, गिरीश कुलकर्णी यांनी कायमच समीक्षकांना आणि रसिकांना आपल्या कामानं प्रभावित केलं आहे. 'देऊळ' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद त्यांनीच लिहिले आहेत, शिवाय एक महत्त्वाची व्यक्तिरेखाही त्यांनी साकारली आहे.
'देऊळ'बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गिरीश कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत...
’देऊळ’ची कथा तुला कशी सुचली?
’देऊळ’ची कथा सुचली तो नेमका क्षण मला सांगता येणार नाही. काय होतं, की अनेक गोष्टी तुमच्या मनात साचत जातात, आणि यथावकाश त्यांना गोळीबंद स्वरूप मिळतं. ’विहीर’ हा चित्रपट करत असताना त्या चित्रपटातली विहीर शोधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात फिरत होतो. त्यावेळी असं लक्षात आलं की, आपल्याकडचा ग्रामीण भाग फार वेगानं बदलतो आहे. शहरं खेड्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. यांमुळे अनेक गोष्टींबद्दलचा हव्यास इथल्या लोकांमध्ये निर्माण झाला आहे. या नव्या, चकचकीत शहरी जीवनशैलीला आपलंसं करण्याचा हव्यास ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये अर्थातच जास्त आहे. टिव्ही, मोबाइल यांच्यामुळे त्यांना बाहेरचं आकर्षक जग रोजच दिसतं, पण ते ज्या परिस्थितीत राहतात, ती फार वेगळी आहे. त्या परिस्थितीत त्यांना तशी चकचकीत जीवनशैली लाभणं शक्य नसतं. यामुळे झालंय काय की, ही परिस्थिती लवकर बदलण्याची एक घाई त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. शहरं बदलत चालली आहेत, तालुके बदलत चालले आहेत, त्यामुळे आपली खेडीसुद्धा लवकर बदलली पाहिजेत, असं त्यांना वाटतं. पण ’खेडी बदलली पाहिजेत’ म्हणजे नक्की काय? तर सुखासीन जीवन जगण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, ते ते सगळं मिळालं पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. असा हव्यास बाळगणार्या तरुणांना सत्ताकेंद्रं जवळ करतात. या तरुणांच्या ऊर्जेचा सत्ताकेंद्रांकडून स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करून घेतला जातो. सगळ्याच सत्ताकेंद्रांना, राजकीय पक्षांना ही युवाशक्ती जयजयकार करण्यासाठी, घोषणा देण्यासाठी हवी असते. त्यामुळे होतं काय की, या तरुणांच्या ऊर्जेतून काहीतरी विपरीत, नकारात्मक असंच जन्माला येतं.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये फिरताना हे चित्र मला अनेकदा दिसत होतं. शहरांमधलं दुसरं एक चित्र मला अस्वस्थ करत होतं. गेल्या काही वर्षांत मला सतत जाणवत होतं की, इथली माणसं सतत कशाच्या तरी मागे धावत असतात. आपल्याला नक्की काय हवंय, हे त्यांना अजिबातच माहीत नसतं. त्यातून प्रचंड मोठी असुरक्षितता जन्माला येत असते. असमाधान आणि परावलंबित्व यांचं विचित्र मिश्रण तयार होत असतं, आणि त्यातून मग देवभोळेपण वाढीस लागतं. म्हणजे एकीकडे आधुनिकतेचा जप करायचा आणि दुसरीकडे अंधश्रद्धांना खतपाणी घालायचं. अतिशय विरोधाभासी असं हे चित्र आहे! ही अशी चित्रं मनामध्ये साचत गेली की, तुम्हांला त्याबद्दल काहीतरी लिहावंसं वाटतं आणि त्यातून चित्रपटाची कथा तयार होते. मला ही जी चित्रं दिसली त्यांतून तयार झालेली कथा म्हणजे ’देऊळ’.
’देऊळ’मध्ये तुझी एक अतिशय महत्त्वाची अशी भूमिका आहे. त्याबद्दल सांगशील?
प्रत्येक समाजाचा असा एक आतला आवाज असतो. ’देऊळ’मध्ये मी साकारलेली व्यक्तिरेखा त्या गावाच्या अंतर्मनाचा आवाज आहे. केशा हे मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नाव. केशा गुराखी आहे. त्याचं निसर्गावर अतिशय प्रेम आहे. तो निसर्गात रमतो. केशा निखळ आहे. रागावला तर तो खूप रागवतो, पण तेवढंच प्रेमही करतो. तो शांत असला तरी प्रसंगी आपला उद्वेगही व्यक्त करतो. संतापानं वेडापिसा होतो. तुमच्यामाझ्यासारखा तो सामान्य माणूस आहे. आजकालची सामान्य माणसं आपला आतला आवाज दाबतच जगत असतात. केशा मात्र आपल्या आतल्या आवाजाचा कौल घेतो, आणि त्याप्रमाणे वागतो. तो निष्क्रीय राहत नाही. गेल्या दशकात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे मध्यमवर्ग सुखवस्तू झाला, पण निष्क्रीयही झाला. हा वर्ग टीकाटिप्पणी करतो, पण स्वत:चा कम्फर्ट झोन सोडत नाही. त्यामुळे सत्ताकेंद्रं या वर्गाकडे ’ग्राहक’ म्हणूनच बघतात. या वर्गानं अधिक क्रियाशील होणं, व्यक्त होणं गरजेचं आहे, आणि ही सांकेतिकता माझ्या व्यक्तिरेखेचं मूळ आहे. अर्थात केशा करत असलेली कृती हे काही समस्यांवरचं उत्तर नाही. त्याच्या समजूतीनुसार त्यानं घेतलेला तो निर्णय आहे. पण असे निर्णय घेण्यासाठी जे धाडस लागतं, ते मला खूप महत्त्वाचं वाटतं, आणि अशा धाडसाला या कथेद्वारे एकप्रकारे पुरस्कृत केलं गेलं आहे, असं मला वाटतं. कारण आता जर आपण कृतिप्रवण झालो नाही, तर परिस्थिती अधिकच अवघड बनेल. लेखक म्हणून मला असं जाणवल्यानं मी केशाची व्यक्तिरेखा त्याप्रमाणे कथेत गुंफली.
’वळू’तला जीवन्या आणि ’देऊळ’मधला केशा या दोघांमध्ये काय फरक आहे?
तसं पाहिलं तर, जीवन्या आणि केशा यांची पठडी एकच असली, तरी दोघंही खूप वेगळे आहेत. सत्ताधार्यांच्या खूप जवळ असूनही जीवन्या आपलं निरलसपण टिकवून आहे. त्याची स्वत:ची अशी एक भूमिका आहे. कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर ठेवायचं हे त्याला बरोब्बर कळतं. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, हे त्याला नीट ठाऊक आहे. पण आपण अंगावर घेतलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव आहे, आणि ती पार पाडण्याचा त्याचा प्रयत्न आहे. केशा माणसांवर, निसर्गावर प्रेम करतो. त्याला सगळीच माणसं आपली वाटतात. पण नंतर त्याचा भ्रमनिरास होतो. अतिशय निराश होतो तो. आनंदात, दु:खी असताना टोकाच्या अशा प्रतिक्रिया तो देतो. आणि त्यातूनच कथा पुढे जाते. जीवन्यावर अशी कथा पुढे नेण्याची जबाबदारी नव्हती.
’वळू’, ’विहीर’,’देऊळ’ या चित्रपटांमध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत, आणि या व्यक्तिरेखांसाठी सशक्त अभिनेत्यांची योजना केली आहे. चित्रपट लिहितानाच ही पात्रयोजना तू करतोस का?
चित्रपट लिहीत असताना मला ती माणसं दिसत असतात. त्यामुळे पात्रयोजना करणं खूप सोपं होतं. बरेचदा असं होतं की, त्या व्यक्तिरेखांच्या लकबी आणि तुम्हांला माहीत असणार्या नटांच्या लकबी, या बर्याचशा सारख्या वाटतात. त्यांचं वागणं, बोलणं सारखं वाटतं. आणि मग आम्ही त्यांना चित्रपटात काम करण्याबद्दल विचारतो.
या चित्रपटात पुन्हा एकदा ज्योती सुभाष तुझ्या आईच्या भूमिकेत आहेत...
ज्योतीमावशीबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. तिचं असणंच खूप स्फूर्तिदायक असतं माझ्यासाठी. माझ्या चित्रपटांतल्या ’आई’मध्ये बरेचदा आदर्श स्त्रीचे गुण असतात. तरी ’वळू’, ’विहीर’ आणि ’देऊळ’ या तिन्ही चित्रपटांतली आई वेगवेगळी आहे. पण अशी आदर्श आई रंगवायची असेल, तर एकच नाव नेहमी डोळ्यांसमोर येतं, आणि ते म्हणजे ज्योतीमावशी. ’गाभ्रीचा पाऊस’मध्येही ती माझी आई होती. फार उत्कट, विविधरंगी भूमिका तिनं आजवर रंगवल्या आहेत, आणि त्यामुळे तिच्या पायांशी बसून शिकावं, असं मला नेहमी वाटतं. चित्रीकरणाच्या आधी भूमिकेसाठी खूप तयारी वगैरे करताना मी तिला पाहिलं नाहीये. पण तरीही व्यक्तिरेखेबद्दल ती समजून घेते, जाणून घेते, सूचना ऐकते. वयाचा, अनुभवाचा, ज्येष्ठतेचा तोरा ती कधीच मिरवत नाही. लेखक म्हणून थोडाफार अधिकार जो तुमच्याकडे येतो, त्याला स्मरून काही सूचना दिल्या तर ती न तक्रार करता ऐकते, त्यावर प्रश्न विचारते. फार मोठा गुण आहे हा.. अजून काय सांगू ज्योतीमावशीबद्दल? तिच्याबद्दल बोलताना खूप भवानिक व्हायला होतं. शब्दंच संपतात माझे..
’देऊळ’मध्ये नसीरुद्दीन शाह, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे अशा फार मोठ्या कलाकारांबरोबर तू काम केलं आहेस..
या नटांबरोबर एका चित्रचौकटीत असणं, यासारखी सौभाग्याची दुसरी गोष्ट नाही. या चौघांनीही गेली तीसचाळीस वर्षं नाटक, दूरदर्शन, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. समरसून जगलेले, जगणं कळलेले असे हे अतिशय बुद्धिमान नट आहेत. त्यांचा प्रत्येकाचा बाज, लहेजा वेगवेगळा आहे. त्यांच्याबरोबर काम करताना स्वप्नपूर्तीचा विलक्षण आनंद असतो, आणि त्याच वेळी पोटात भीतीचा गोळाही असतो. त्यांच्यासमोर आपल्या तोंडातून शब्द फुटेल की नाही, आपले संवाद विसरून आपण त्यांचा अभिनयच बघत राहू का, अशी भीती असते. पण या चौघांबरोबर काम करणं, हे माझ्यासाठी भीतीदायक असण्यापेक्षा रोमहर्षक जास्त होतं. त्यांच्यासमोर माझा निभाव लागला की नाही, हे चित्रपट बघून प्रेक्षकांनी ठरवायचं आहे.
***
मस्तच!!! विहीर मधली गिरीशची
मस्तच!!!
विहीर मधली गिरीशची भूमिका मला आवडली आहे.
विस्तृत मुलाखत आवडली.
विस्तृत मुलाखत आवडली. रत्नपारखी आहे गिरीष हे परत एकदा दाखवून दिलंय.
सही! गिरीश मला नेहमीच अतिशय
सही! गिरीश मला नेहमीच अतिशय बुद्धिमान अभिनेता वाटत आला आहे. 'गंध' आणि 'विहीर' मधल्या भुमिका प्रचंड छाप सोडून जाणार्या, अस्वस्थ करणार्या होत्या. 'केशा'च्या भुमिकेबद्दल उत्सुकता आहे.
ही मुलाखत खूप आवडली. मला
ही मुलाखत खूप आवडली. मला गाभ्रीचा पाऊस मधली त्याची भुमिका खूप आवडली होती. ज्योती सुभाष तर आवडतेच.
मुलाखत आवडली.
मुलाखत आवडली.
छान झाली आहे मुलाखत. पहिल्या
छान झाली आहे मुलाखत. पहिल्या प्रश्नाचं विस्तृत उत्तर चिंतनीय आहे.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर मेचके
पहिल्या प्रश्नाचे उत्तर मेचके आहे, हेच विचार आपणही (कधीमधी-क्वचित) करतो हे जाणवते (अन करतो तेव्हा ते वैयक्तिक असहाय्यतेवर डागण्या देतात हे ही आठवले), त्यात मान्डलेल्या कथासूत्राकरता हा चित्रपट बघितलाच पाहिजे
सुंदर मुलाखत! पहिल्या
सुंदर मुलाखत!
पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाही अंतर्मुख करतं.
मला दुसर्या प्रश्नाचे
मला दुसर्या प्रश्नाचे उत्तरही आवडले.
मस्त मुलाखत
मस्त मुलाखत
मस्तच
मस्तच
गिरीश कुलकर्णीनी चित्रपट
गिरीश कुलकर्णीनी चित्रपट व्यापून टाकलाय! खूप खूप अभिनंदन!
केशा फारच आवडला.
मुलाखत वाचण्याआधी
मुलाखत वाचण्याआधी चित्रपटाबद्दल. अतिशय जबरदस्त चित्रपट. गिरीश कुलकर्णी यांचे काम फारच मस्त. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत तुफान आहे चित्रपट.
मुलाखत मस्त झाली आहे.
मुलाखत मस्त झाली आहे.
खूप छान मुलाखत. मी तुमचा
खूप छान मुलाखत. मी तुमचा माहेर मधील लेख ही वाचला आहे. तुमची एकत्रित फिल्मोग्राफी बघणार.
पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.