मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
-------------------------------------------------------------------
कशे आसंत सगळे? बरा मां?
पुढची पुरचुंडी सोडतंय त्याआधी
एक म्हणजे माका फ्रेंच, स्पॅनिश आणि बाकीचो भाषा येऊक नाय. स्पेलिंग आणि उच्चार यांचा मेळ जमतलाच असा काय नाय तर माफीच करून टाका. आणि दुसरं म्हणजे हयसरलो डिस्क्लेमर परत वाचा बघू.
वाचलात. समजला मां? आता येवा पुरचुंडी बघूक.
पुरचुंडीत पयलो रत्न आसां
द मिनिस्टर (L'exercice de l'etat) - पियेर शूलर या दिग्दर्शकाचा हा फ्रेंच चित्रपट. एका ट्रान्सपोर्ट मिनिस्टरच्या आयुष्यातील काही घडामोडींभोवती ही घटना घडते. एका प्रचंड मोठ्या अपघातापासून कथा सुरू होते. मंत्र्याचं अत्यंत तणावग्रस्त आणि धावपळीचं आयुष्य, हा मंत्री कुठल्याही 'टायटल्ड' घराण्यातला नसणं, त्याला जनतेची चाड असणं हे त्यातून उलगडत जातं. मंत्री आणि त्याचा ड्रायव्हर यांच्यातलं माणुसकीचं मैत्रीपूर्ण नातं आपल्याला दिसतं पण त्याचा पार टडोपा करत नाहीत. मग रेल्वेस्टेशन्सचे खाजगीकरण या मुद्द्यावरून राजकारणातले बेरिजवजाबाकीचे खेळ आपल्यापुढे यायला लागतात. शेवटी या मंत्र्याला दुसर्या खात्यावर टाकून खाजगीकरणाचे गाडे पुढे सरकते. राजकारणाचे खेळ, मैत्री या शब्दाचा पोकळपणा, 'टायटल' चा युरोपियन सोस, एकटेपणा अश्या सगळ्या गोष्टींना घेऊन सिनेमाची गाडी पुढे जाते. नुसत्या राजकारणाच्या कोरड्या खेळापेक्षा मानवी स्वभाव आणि नात्यांना स्पर्श करत कथा जाते त्यामुळे कंटाळा येत नाही.
हयसर आसंय एक बाभळी..
लास अॅकेशियास (Las acacias) - अर्जेंटिना आणि स्पेनची निर्मिती असलेला, पाब्लो जिऑर्जेयी (Pablo Giorgelli) या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. भाषा इस्पॅनोल (स्पॅनिश). पेरूग्वे ते ब्युनॉस आयर्स या रस्त्यावर ही कथा घडते. वर्षोनवर्षे याच रस्त्यावरून ट्रक चालवणारा एक ट्रक ड्रायव्हर रुबेनच्या आयुष्यातल्या वेगळ्या दिवसाची ही गोष्ट. प्रवासाच्या सुरूवातीला जेसिंता त्याच्या ट्रकमधे ब्युनॉस आयर्सपर्यंत लिफ्ट मागते. जेसिंताबरोबर तिची आठ महिन्यांची मुलगीही आहे. संपूर्ण प्रवासभर ते फारसे बोलत नाहीत पण तरी संपूर्ण अनोळखीपणापासून मैत्रीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो फार सुंदर. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या आयुष्याबद्दल भोचकपणे प्रश्न विचारून फुकटचे तत्वज्ञानाचे डोस ते एकमेकांना पाजत नाहीत. एकमेकांच्या खाजगीपणाचा आदर ठेवून एकमेकांचे प्रवासाचे साथी होतात, एकमेकांना गरज पडल्यास मदत करतात. या सगळ्यात छोट्या मुलीचं तिथं असणं हा पण एक सुंदर कॅटॅलिस्ट. चित्रपटाचा दिग्दर्शक स्क्रिनिंगनंतर बोलताना म्हणाला की मी लिहिलेल्या पहिल्या स्क्रिप्टमधे मी खूप बडबड लिहिली होती पण दुसर्या तिसर्या ड्राफ्टला येताना ती बडबड इतकी अनावश्यक वाटायला लागली आणि संवाद अगदी कमीतकमी झाले. जे काय प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं ते नुसत्या सीन्समधूनच पोचवता येईल हे लक्षात आलं. एकूणात चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाबद्दलचा हा डोस मला फार महत्वाचा वाटला. अभिनयाबद्दल रुबेन, जेसिंता आणि बेबी अनाही तिघांची दृष्ट काढायला हवी. चित्रपट बघायला हवा. उरलेला दिवस प्रसन्न होऊन जाईल.
इथे आहे लंकेतून आलेला भुरभुर पाऊस
ऑगस्ट ड्रिझल (Nikini Vassa) - मी बघितलेला पहिला श्रीलंकन चित्रपट. दिग्दर्शन अरूणा जयवर्दना या दिग्दर्शकाचे. संपूर्ण चित्रपटात मृत्यू प्रमुखस्थानी आहे. पण चित्रपट खूप जड इत्यादी नाही. सोमलता ही मृतदेहांना साफ करून, मेकप करून चांगले कपडे घालून पुरण्यासाठी तयार करण्याचे काम करत असते. वडिलांच्या नंतर हे काम तिच्याकडे आलेले आहे. तिने लग्न केलेले नाही या कारणास्तव गावात तिच्याबद्दल वाईट साईट चर्चा करणारे खूप आहेत. गावासाठी स्वतःच्या खर्चातून एक स्मशान बांधून द्यावे जेणेकरून आपल्याला थोडी तरी प्रतिष्ठा मिळेल गावात असा सोमलताचा विचार आहे. या कामादरम्यान सोमलताची भेट एका आर्किटेक्टशी होते. जो गावातलाच असूनही गावाच्या मानसिकतेपेक्षा वेगळा असतो. दोघांचं वेगळेपण त्यांना जवळ आणतं. पण स्मशान बांधणे आणि त्यातून सोमलताला मिळू शकणारी प्रतिष्ठा हे गावातल्या तिच्या प्रतिस्पर्ध्याला (मृतदेह साफ करण्याच्या धंद्यातला प्रतिस्पर्धी) पचणारं नसतं. त्याची ताकद आणि वजन गावात भरपूर आहे. त्यामुळे त्यावरून खूप मोठं राजकारण सुरू होतं. शेवटी सोमलताचा यात खून होतो. सिनेमा संपतो. श्रीलंकन गावातलं वातावरण आपल्यासाठी एकाचवेळी अनोळखी आणि ओळखीचं वाटतं. सोमलताची व्यक्तिरेखा करणार्या अभिनेत्रीचा चेहरा वेगळाच सुंदर आणि अभिनयक्षमता अफाट आहे. एकदा बघावा असा.
हयसर अमेरिकेतल्या त्रासलेल्या सुंदर्या आसत!
डॅम्झेल्स इन डिस्ट्रेस - शीर्षक वाचूनच बारीकसं फिदी टाइपचं हसू येतं. सगळा सिनेमा त्याच धर्तीवर आहे. गुडीगुडी हॉलिवूड स्टाइल मशी अमेरिकन कॉलेज ड्रामा प्रकारच्या फिल्म्सवर स्पूफ आहे(काय मराठी आहे वा वा!) . व्हिट स्टिलमन हा दिग्दर्शक. ज्यांना हॉटशॉटस, स्क्रीम असे स्पूफ सिनेमे आवडले असतील त्यांनी जरूर बघाच. जास्त काही सांगण्याची जरूरच नाही.
आणि या १७ पोटुश्या पोरी
१७ गर्ल्स (17 Filles) - २००८ मधे एका अमेरिकन हायस्कूलमधे घडलेल्या 'प्रेग्नंसी पॅक्ट' या घटनेवरून प्रेरणा घेऊन बनवलेला हा फ्रेंच चित्रपट. म्युरिएल आणि डेल्फिन कोलिन या बहिणींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. यातल्या म्युरिएल कोलिनने किस्लॉव्हस्कीच्या 'थ्री कलर्स' आणि इतर अनेक फिल्म्ससाठी कॅमेरा डिपार्टमेंटमधे काम केले आहे. फ्रान्समधल्या समुद्रकिनार्याला लागून असलेल्या एका छोट्याश्या गावी ही कथा घडते. एका हायस्कूलमधल्या १६ वर्षाच्या काही मैत्रिणी एकत्र गरोदर रहायचं ठरवतात आणि एकत्र राहून मुलांना वाढवायचं ठरवतात त्याची ही गोष्ट. कॅमेरा वर्क अप्रतिम. फिल्म बाकी ठिकठाक असली तरी सगळ्या टिनेजर मुली आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेर्यासमोर आल्या आहेत हे बघता त्यांच्या अभिनयाला आणि दोन्ही दिग्दर्शक ताईंना टोप्या उडवून सलाम!!
आता उरलंसुरलं...
काही फिल्म्स बाकी आवडल्या नाहीत फारश्या पण त्यातली दिग्दर्शकीय प्रयोगशीलता आणि प्रामाणिकपणा फार महत्वाचा वाटला. यात एक इराणी फिल्म 'मोर्निंग' आणि रोमेनियन फिल्म 'बेस्ट इंटेशन्स' यांचा खास उल्लेख करायला हवा.
ही अजून एक पुरचुंडी पाह्यलेल्या आणि राह्यलेल्या पश्चात्तापाची..
पाह्यलेल्या पश्चात्तापाचो पतेरो
१ - सगळ्यात मोठा पश्चात्ताप 'मेलनकोलिया' - झेक रिपब्लिकची निर्मिती असलेला टिपिकल साय-फाय धर्तीचा हॉलिवूडी विंग्रजी चित्रपट. फिल्मच्या सुरूवातीची १० मिनिटे टायटल्स, काही अॅनिमेशन असा एक टॅब्लो आहे. तो अप्रतिम आहे पण त्यानंतर फिल्म बघायची काहीही गरज नाही. व्हिज्युअली उत्कृष्ट असली तरी कमालीची कंटाळवाणी आहे. आणि सगळ्याला 'काय उगाच?' हा प्रश्न आहेच. मेलनकोलिया नावाचा एक ग्रह पृथ्वीवर आदळून सगळं जग नष्ट करून टाकणार असतो त्यामुळे अतिप्रचंड श्रीमंत लोक वेड्यावेड्यासारखे विचित्र वागू लागतात त्याची गोष्ट आहे. या चित्रपटाचे आयएमडिबी रेटिंग बरेच आहे. त्यामुले २ तास रांगेत तंबू ठोकून हा चित्रपट बघितला आणि स्वतःचे डोके फोडून घ्यावेसे वाटले.
२ - ब्रेकफास्ट लंच डिनर - साउथ इस्ट एशियामधल्या तीन देशातील तीन दिग्दर्शक बायांनी केलेला हा चित्रपट. वेगवेगळ्या तीन जेवणाच्या तीन वेगळ्या गोष्टी. पण मूळ विषय प्रेम हा आहे. असे क्याटलॉगबुकात लिवलेले. कमालीची संथ हाताळणी. हॉटेलमधे १ मुलगी बसून बॉयफ्रेंडची वाट बघते. त्याला १५ मिनिटे उशीर होतो तर आपणही 'रियल टाइम' मधे १५ मिनिटे घालवतो असला खेळ. आणि त्याने काही होत नाही, कथा पुढे सरकत नाही. प्रेम कंटाळवाणे असते यापलिकडे काही अनुभव मिळत नाही.. दुसरी कथेचा कंटाळा इतका कंटाळवाणा झाला की कंटाळून आम्ही बाहेर पडलो.
३ - अरेंज्ड हॅपिनेस - काश्मिरमधल्या एका अॅरेंज मॅरेज कम प्रेमाची ही कथा आहे असं सिनॉप्सिस सांगतो. क्याटलॉगबुकात वाचून सिनेमा बघावासा वाटतो. वैधानिक इशारा की हा चित्रपट फिक्शन फिचर नसून माहितीपट आहे. एक स्वीडनची मुलगी, साउथमधल्या एका काश्मिर एम्पोरियममधे गालिचे बिलिचे विकणार्या एका तरूणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्या काश्मिरमधल्या घरी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गेली. बहिणीचे लग्न अॅरेंज्ड मॅरेज होते. तिथे गेल्यावर गोरी मेमचे आणि त्या तरूणाचे अफेअर अजूनतरी जाहिर केलेले नाही. ही पार्श्वभूमी. या गोर्या स्विडीश मुलीने लग्नाच्या सगळ्या विधींचे केलेले चित्रण ही आख्खी फिल्म. महान कंटाळा
४ - लव्ह यू टिल डेथ - एल वाय टि डी - रफिल एलियास या अॅडफिल्ममेकरने ही हिंदी फिल्म केलीये. सिनेमा चालू व्हायच्या आधी स्वतःच्याच चित्रपटाबद्दल नको इतके ग्रेट बोलून घेतले या सगळ्या टिमने. आणि चित्रपट रद्दी, सी ग्रेड, चीप, सॉफ्ट पोर्नो स्वरूपाची...
बघायचे राहून गेलेले बरेच पश्चात्ताप आहेत. कॅटलॉग वाचत गेले तर जेवढे बघितलेत त्याच्या दुप्पट राह्यलेले पश्चात्ताप होतील. पण हे काही अगदीच महत्वाचे...
१. पिना - पिना बॉश या नृत्यकर्मीवर असलेली ही डॉक्यु. डॉक्यु थ्रीडी आहे. आणि ज्यांना बघायला मिळाली ते बहुतेक सगळेच स्तुती करताना थकत नाहीयेत. माझं नशिब कधी उघडेल कुणास ठाऊक..
२. फाउस्ट - गोथ च्या फाउस्ट या ट्रॅजेडीचे अॅडप्टेशन. महोत्सवात डोक्याचे सॅच्युरेशन झाल्यावर शेवटी बघायला मिळाली. जड आहे आणि बरंच रक्त, आतडी असलं काय काय आहे. माझी कपॅसिटी संपली होती त्यामुळे १० मिनिटात उठून आले. फिल्म इंटरेस्टिंग असणार होती.
अशी आमची जत्रा संपन्न झाली. दर्शन तर घडले. देव पावण्याची वाट बघूच आता.
(समाप्त)
- नीरजा पटवर्धन
वॉव.. ही पुरचुंडी???
वॉव.. ही पुरचुंडी??? तुझ्याकडं तर भलं मोट्टं बाड दिस्तंय! .
आणी तुझ्या एक्सपर्ट कमेंट्स मुळे 'कंटाळवाणे' सिनेमा पाहण्यापासून आमची सुटका झाली..
आता लिस्ट नव्याने बनवलीये .. कधी ,कसे बघायला मिळतील.. ???
मस्तच अशाच पुरचुंड्या
मस्तच
अशाच पुरचुंड्या मोकळ्या होऊदेत आणि आम्हाला जत्रेला नाही जाता आलं तरी काय मिसलंय याचा समग्र साक्षेपी वृत्तांत मिळूदेत..
अजून काय काय बघायचं राहिलंय, वाचायचं राहिलंय याची यादी रोज वाढतच चाल्लीये मारुतीच्या शेपटासारखी!
WRT ऑगस्ट ड्रिझल (Nikini
WRT ऑगस्ट ड्रिझल (Nikini Vassa) ===>
आकासा कुसुम(प्रसन्ना विथांगे) हा एक सुंदर श्रीलंकन चित्रपट. प्रत्येक फ्रेम मधून जाणीवपूर्वक feminine ओघ शांतपणे पाझरत ठेवलेला खास चित्रपट.
http://en.wikipedia.org/wiki/Akasa_Kusum
www.akasakusum.com
लास ऑकेशियास आणि ऑगस्ट ड्रिझल
लास ऑकेशियास आणि ऑगस्ट ड्रिझल बघायला जास्त आवडेल.
नी, आभारी आहे. सुंदर चित्रपटांची झटॅक आणि क्लास ओळख करून दिल्याबद्दल.
संपूर्ण सीरीज अतिशय चांगली व
संपूर्ण सीरीज अतिशय चांगली व माहिती पूर्ण आहे. पूर्वी असे फेस्टिवलचे सिनेमे दूरदर्शन वर दिसत असत,. केबलच्या जमान्यात ते सर्व हरवले आहे.
वर्ल्ड मूव्हिज आणि
वर्ल्ड मूव्हिज आणि एन्डिटिव्ही ल्युमिए या चॅनेल्सवर दिसतात काही काही.
संपूर्ण मालिका आवडली.
संपूर्ण मालिका आवडली.
नी, हाही भाग छान जमलाय.
नी, हाही भाग छान जमलाय. ब्रेकफास्ट लंच डिनर टाईप एक सिनेमा बघितला होता. मला स्वत:ला असले संथ सिनेमे फार बोर करतात.
माझ्या जर्नो मित्राने पिनाबद्दल बरंच काही सांगितलय. मला पण बघायची आहे. डीव्हीडी मिळते का बघू.
नी, मस्त लेख ! 'मामि'ची छान
नी, मस्त लेख ! 'मामि'ची छान सफर घडवलीस त्याबद्दल धन्स.
'तुनळी'वर शोधल्यावर काहींच्या जोडण्या मिळाल्या [झलक फक्त], गरजवंतांसाठी देतोय -
MY LITTLE PRINCESS (2011)
http://www.youtube.com/watch?v=hQL2bPpkT2U&feature=related
THE MIRROR NEVER LIES (2011)
http://www.youtube.com/watch?v=Ifc5K9LUrg0
LAS ACACIAS (2011)
http://www.youtube.com/watch?v=D-fK1fKMEA4
EVEN THE RAIN (2011)
http://www.youtube.com/watch?v=hbpdeI0ugGc
MIL CRETINS (2011 subt. english)
http://www.youtube.com/watch?v=tIpjDgrXnKg
जहबहरीही. धन्यवाद नी. निल्या-
जहबहरीही. धन्यवाद नी.
निल्या- धन्यवाद. आयते दिलेत.
मस्त पुरचुंडी नी लास अकेशियस
मस्त पुरचुंडी नी
लास अकेशियस आणि ऑगस्ट ड्रीझल खुप बघावेसे वाटताहेत.
मस्तच रंगली जत्रा....
मस्तच रंगली जत्रा....
वा मस्तच, पुरचुंड्या धन्यवाद
वा मस्तच, पुरचुंड्या
धन्यवाद पोहोचवल्या बद्दल
हा लेखसुद्धा छान. पहायच्या (
हा लेखसुद्धा छान. पहायच्या ( आणि न पहायच्या ) चित्रपटांची यादी बनवायला ह्या लेखांची नक्कीच मदत होईल.:)
छान ओळख करुन दिली आहेस.
छान ओळख करुन दिली आहेस. तिनही भाग आज वाचले.
पुर्वी सकाळ मटा मध्ये यायच्या अशा चित्रपट ओळ्खी. फार भक्तीभावाने वाचायचे मी.
इफ्फीला जाणार होते १० दिवस
इफ्फीला जाणार होते १० दिवस आणि मग तेव्हा रोजचे रोज ओळखी करून द्यायचं ठरवलं होतं. पण आता इफ्फीला जायचंच माझं कॅन्सल झालं कामामुळे..
वाचलं पब्लिक