शरण आता धाव अंबे

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 18 October, 2011 - 06:47

खरं तर हे गीत मला नवरात्रात द्यायचे होते. पण वेळच मिळाला नाही.ह्यातील सगळी नावं "देवी महात्म" यामधील आहेत. दुसरी ओळ "रुपं देही.." ही पण अर्गला स्तोत्रातील आहे.

शरण आता धाव अंबे वरदे माहुरवासिनी
रुपं देही जयं देही यशो देही द्विषोजही ||

महालक्ष्मी अंबिके जगदंब मायामोहिनी
किती रूपे नटसी माते रेणुके कुलस्वामिनी
तूच दुर्गा, क्षमा, धात्री, शिवा, नंदा, भ्रामरी
तूच, स्वाहा, स्वधा, काली, भद्रकाली, कपालिनी ||शरण आता...

रक्तबीजा नाव तूझे सार्थ करि नारायणी
जाग अंबे शताक्षी तू देवि महिषोन्मूलिनी
अन्न देही धान्य देही माते तू शाकांबरी
येई रूपे कालिके तू चंडमुंडविनाशिनी || शरण आता...

नमस्तुत्ये नमस्तुत्ये नमो देवी भगवते
नमो माते रेणुकाई देवि माते शारदे
नमो अंबे तूळजाई नमो तुज जोगेश्वरी
दावि तूझे रूप कोठे पाहु तुज येडेश्वरी || शरण आता...

मधूकैटभमर्दिनी तू होई दु:खविनाशिनी
धाव आता महालक्ष्मी हारी संकट वैष्णवी
घातली पायी मिठी मी दीन, चामुंडेश्वरी
नको सारू दूर आता ठाव देई अंतरी || शरण आता...

गुलमोहर: 

देवीची अनेक नांवे, तिचे गुणविशेष आणि तिला घातलेलं साकडं ..... सगळं छान जमून आलंय.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
फक्त, "शरण आता धाव अंबे वरदे माहुरवासिनी" ही धृपदातली ओळ
(प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीनुसार) दुसरी असायला हवी होती असं वाटतं.

अप्रतिम रचना! लय तर इतकी सुरेख आहे की गीत व्हावं याचं!

शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीत 'दु:खविनाशिनी' असं संपादन करावं ही नम्र विनंती. बहुधा ती टंकनचूक असावी.

क्रांति चूक दाखवून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. ती टंकणचूकच होती.