सूड

Submitted by मिलन टोपकर on 9 October, 2011 - 12:46

"... आम्ही त्या खुन्याच्या शोधात आहोतच आणि मला खात्री आहे आम्ही लवकरच त्याला पकडू".
एसीपी सुहास आठवलेने त्याच्या भोवती गोळा झालेल्या सगळ्या वार्ताहर, चॅनलवाल्यांकडे पाहिले आणि आपल्या आश्वासक, दमदार आवाजात सांगितले. शहरातल्या अत्यंत घातकी खुन्याची केस त्याच्याकडे सोपवण्यात आलेली होती. आणि तो ती नक्की सोडवू शकेल असा विश्वास पोलीस खात्यालाच काय, आम जनतेला देखील होता. गेल्या २०-२५ दिवसात झालेल्या चार खुनांना वाचा फुटून खुनी नक्कीच पकडला जाईल असा विश्वास जमा झालेल्या वार्ताहरांना देखील होता. प्रश्न इतकाच होता, कधी? किती दिवसात? ह्चा चार खुनात अनेक साम्ये होती. सगळे खून चाकूच्या एक किंवा दोन जीवघेण्या वारात झालेले होते आणि खून झालेली प्रत्येक स्त्री ही एका प्रख्यात जाहिरात कंपनीतर्फे सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेली मॉडेल होती.
..............................................................
ती घरात एकटीच होती आणि कोचावर बसून टी.व्ही. वरच्या बातम्या पाहत होती. खून झालेल्या चार मॉडेलचे आधीच्या शो मधले फोटो आणि घटनास्थळी पडलेल्या त्यांच्या प्रेताचे फोटो बातम्यांमधे दाखवत होते. अंगावर काटा आणणारी दृश्ये ती देखील पाहत होती.
त्याच प्रख्यात कंपनीची तीही एक मॉडेल होती.
घराबाहेर पडण्याआधी पोलीस स्टेशनला फोन करायचा तिने विचार केला.
"हेलो. पोलीस स्टेशन? मी एसीपी सुहास आठवलेंशी बोलू शकते का?"
"कोण बोलताय? आठवले साहेब आता इथे नाहीत."
"मला त्यांना भेटायचे आहे. खूप महत्वाचे आहे. मला पोलीस संरक्षण हवे आहे. मी देखील एक मॉडेल आहे आणि मला भीती वाटते कि पुढचा खून माझाच होणार. ही केस आठवले साहेबांकडे आहे ना? मी त्यांच्याशी परस्पर बोलेन, मला त्यांचा मोबाईल नंबर किंवा घराचा पत्ता मिळेल का?" तिच्या आवाजांत कंप होता.
"नाही मॅडम. अशी माहिती आम्ही देऊ शकत नाही. आणि ह्या केस बाबतीत अनेक गोष्टींची शहानिशा चालू असताना केवळ असा फोन करून तुम्हाला पोलीस संरक्षण नाही मिळू शकणार. हां, तुम्ही प्रत्यक्ष इथे आलात आणि काही किरकोळ तांत्रिक बाबी पूर्ण केल्यात तर आम्ही मदत करू शकतो".
"ठीक आहे. धन्यवाद". अत्यंत निराशेने तिने फोन ठेवला.
पण सुहास आठवलेंचा फोन नंबर मिळवायचाच ह्या निश्चयाने तिने एक दोन ठिकाणी फोन केले आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता मिळवला. आता ती त्यांना प्रत्यक्षच भेटणार होती.
..........................................................
रात्रीचे ११ वाजले होते. तो तसा कंटाळलेला होता. दिवसभर खूप धावपळ झाली होती. टी. व्ही. वरच्या बातम्या आणि चर्चेमुळे सगळ्यांचे लक्षही वेधले गेले होते. पुढचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे होते. त्याचाच विचार करण्यात दिवस सगळा गेला होता. ह्या सगळ्यात त्याला भुकेचा विसर पडला होता. आता पोटात ढकलायला स्वतःकरता काही तरी बनवणे गरजेचे होते. त्याने ब्रेड आम्लेट करून खायचे ठरवले.
आम्लेट करता करता तो विचार करत होता, अश्या मोठ्या शहरात राहण्याचा खूप फायदा असतो. इथे राहून लोकांना, पोलिसांना चुकवणे, चकवणे कुणालाही सहज जमू शकते.
हातात प्लेट घेऊन तो टेबलापाशी आला. खाता खाताच तो उद्याच्या प्लॅनची मनात उजळणी करत होता. फोटो पहात होता. आता वेळ घालवणे त्याला परवडण्यासारखे नव्हते.
पण हे सगळे करत असताना आपल्यावर कुणाची पाळत आहे, आपल्याला कुणी पाहते, न्याहाळते आहे, ह्याची त्याला जाणीव नव्हती.
............................................................
सगळीकडे सामसूम आहे, कसलीही संशयास्पद हालचाल नाही ह्याची खात्री करून झाल्यावरच ती किचनच्या खिडकीजवळ आली. थोड्याश्या प्रयत्नांनी तिला ती उघडता आली. आत येऊन तिने आधी किचन आणि नंतर हॉलचा अंदाज घेतला. कसला तरी उग्र दर्प तिला जाणवला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून, अत्यंत काळजीपूर्वकपणे ती बेडरूम कडे निघाली. तिच्या हातात बॅटरी होता आणि स्वसंरक्षणाकरिता एक सुरा. आवाज न करता ती बेडरूम मधे शिरली.
ती खोली अस्ताव्यस्त आणि अस्वच्छ होती. आपल्या शोधक नजरेने तिने खोलीची पाहणी केली. कसलाही आवाज नाही, संशयास्पद हालचाल नाही ह्याची खात्री पटल्यावर तिने खोलीतले कपाट उघडले.
कपाटातल्या वस्तूंची फारशी उलथापालथ न करता तिला हवे ते मिळाले. काही फोटो असलेले ते एक पाकीट होते. सगळे फोटो मुलींचे होते आणि त्यातल्या बहुसंख्य फोटोंवर एक खुण होती. तिला जाणवले की खुण असलेल्या मुलींचे खुन झालेले होते. ज्या फोटोंवर खुण नव्हती त्या मुली तिला माहित होत्या. त्या तिच्याच कंपनीतल्या होत्या.
.............................................................
ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेली नवीन मॉडेल होती. तिच्या रुपाची चर्चा तर होतीच पण मॉडेल असूनही तिच्या अभिनयाची देखील वाखाणणी होत होती. सौंदर्य स्पर्धा जिंकून काही दिवस, महिने होताच तिला अनेक जाहिराती मिळाल्या होत्या. मिळत होत्या. आणि पैसा देखील. फॅशनच्या जगात असूनही ती फारशी निर्ढावलेली नव्हती. म्हणूनच कदाचित जास्त लोकप्रिय होती. आयुष्य तिला स्वप्नवत वाटू लागले होते.
एका रात्री पार्टी संपवून काही मित्र, मैत्रिणींबरोबर घरी जात असताना तिने आपल्याला मिळालेल्या ह्या यशाचा, पैशाचा, प्रसिद्धीचा अभिमानाने उल्लेख केला. नवीन प्रोजेक्ट कुठले आहेत ते सांगितले.
"परमेश्वराचे कसे आणि किती आभार मानू तेच कळत नाही" ती प्रसन्नपणे म्हणाली. तिच्या मनावर, मेंदूवर नुकत्याच घेतलेल्या वाईनचाही अंमल होताच.
"हो न. आम्हाला माहित आहे" तिची एक मैत्रीण म्हणाली.
आणि तिला काही समजायच्या आत अचानक कुणीतरी तिला रस्त्यावर ढकलून दिले. तिचा तोल गेला आणि मागून येणाऱ्या ट्रकची तिला धडक बसली. ती लांब फेकली गेली. काही कळण्याआधीच तिची शुद्ध हरपली.
आपल्याला किती दिवसांनी जाग आली हे तिला कळले नाही. पण भोवतालची जाणीव होत जाताना तिला कळले, ती हॉस्पिटलमधे आहे आणि तिच्या पलंगाभोवती मित्र, मैत्रिणींचा गराडा पडला आहे. तिने डोळे उघडताच त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद तिला दिसला.
तिला नंतर कळत गेले की अपघाताने तिचा चेहेरा विद्रूप झाला आहे आणि आता ती पूर्वीसारखी सुंदर, देखणी मॉडेल उरलेले नाही.
तिची गरज संपल्यामुळे कंपनीने तिचे कंत्राटही रद्द केले.
..............................................................
तिला बेडरूमच्या बाहेर कसलासा आवाज ऐकू आला. कुणीतरी पाय न वाजवता बेडरूम जवळ येत असल्याचा. तिच्या हातात ते फोटोंचे पाकीट होते आणि डोळ्यात पाणी. पण आपल्या श्वासांचादेखील आवाज होणार नाही ह्याची काळजी घेत तिने फोटोंचे ते पाकीट पर्समध्ये ठेवले. हातातल्या सुर्‍यावरची पकड घट्ट करून ती खोलीच्या बाहेर आली.
................................................................
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच तिने टी. व्ही. लावला. प्रत्येक चॅनेलवर तीच बातमी होती.
"तुम्ही पाहू शकताय, अत्यंत हुशार अधिकारी म्हणून ह्या केसची उकल करण्याकरता त्यांची नेमणूक झाली होती. पण आपल्या जीवाची बाजी लावून तपास करणारे एसीपी सुहास आठवले ह्यांना आशा पद्धतीने मृत्यू येईल ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. काल रात्री त्यांच्या राहत्या घरी कुणीतरी सुऱ्याने भोसकून त्यांचा खुन केला आहे. त्यांच्या प्रेताजवळ एक बॅटरी सापडली आहे. पोलीस त्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत". वार्ताहर पोटतिडकीने सांगत होती.
बातम्या बघत असतानाच, तिने हातातल्या त्याच्या फोटोवर फुली मारली आणि शेजारी, तशीच खुण केलेल्या इतर चार मुलींच्या फोटो जवळ ठेऊन दिला.
तिच्या चेहर्‍यावर त्यावेळी मंद स्मित झळकत होते.
.................................................................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मिलन - एकदम छान रहस्यकथा लिहिली आहेत. विचार करायला लावणारी. अशाच अजून येऊद्यात.

प्रफुल्ल, अनुसुया - माझ्या मते खून सुहास आठवले नाही तर अपघातानंतर चेहरा विद्रुप झालेली "ती" करते आहे. कारण ती तिच्यावर झालेल्या अन्यायाचा 'सूड' घेते आहे. तीच सुहासवर पाळत ठेवून होती आणि त्याच्या चाललेल्या तपासाबद्दल माहिती काढायला ती त्याच्या घरात शिरली. आणि नेमका तो घरी परत आला. (तिसर्‍या परिछेदातला 'तो' म्हणजे सुहास आहे, जो त्या मोठ्या शहरामधे एकटाच रहात असावा. आणि तो दुसर्‍या परिछेदातल्या 'ती' ला भेटायला गेला असावा)

ता.क. - मिलन व इतर वाचक - माझा तर्क बरोबर आहे का? अजून कोणाचे काही वेगळे विचार असतील तर ऐकायला आवडेल.

नाही कळली...

प्रफुल्ल, अनुसुया - माझ्या मते खून सुहास आठवले नाही तर अपघातानंतर चेहरा विद्रुप झालेली "ती" करते आहे. >> मग हे काय...,

अश्या मोठ्या शहरात राहण्याचा खूप फायदा असतो. इथे राहून लोकांना, पोलिसांना चुकवणे, चकवणे कुणालाही सहज जमू शकते.
हातात प्लेट घेऊन तो टेबलापाशी आला. खाता खाताच तो उद्याच्या प्लॅनची मनात उजळणी करत होता. फोटो पहात होता. आता वेळ घालवणे त्याला परवडण्यासारखे नव्हते.
>>>>>>>>>>>>>>>'तो' का घाबरत होता...कसला प्लान आखत होता. (प्लान आखुन तोच मेला).

चातक -

तो घाबरत नव्हता, विचार करत होता. त्याचा प्लॅन खून करण्याचा नव्हताच. कदाचित "ती"वर पाळत ठेवून पकडायचा होता. आणि "ती"ने खून केलेल्या मुलींच्या पुर्वेतिहासातून त्याला तिच्यावर संशय आला असणार हे "ती" ने पण ओळखले व त्याची खात्री करायला ती त्याच्या घरात शिरली.

शिवाय, खून करण्यामागे 'सूड' (कथेचे नाव) हा हेतू "ती"चाच असू शकतो, सुहास आठवलेचा नाही.

अश्या मोठ्या शहरात राहण्याचा खूप फायदा असतो. इथे राहून लोकांना, पोलिसांना चुकवणे, चकवणे कुणालाही सहज जमू शकते.

या वाक्यामुळे वाचकांची दिशाभूल होते. अन्यथा सस्पेन्स ओळखता येण्यासारखा आहे.
कथा ठीक वाटली.

चौकट राजा,

तुमचा विचार बरोबर आहे. "तो" विचार करत होता. खुन्याच्या मनात काय विचार असतील ह्याचा. "अश्या मोठ्या शहरात राहण्याचा खूप फायदा असतो. इथे राहून लोकांना, पोलिसांना चुकवणे, चकवणे कुणालाही सहज जमू शकते" ह्या वाक्यातून हेच सुचवायचा हेतू होता. शिवाय रहस्यकथेत अश्या वाक्यांनी चकवा देणे चुकीचे नाही. त्यामुळे किती छान परिणाम होते ते आपण पहातोच आहोत.

चातक, ज्ञानेश,

एकदा "तो" म्हणजे एसीपी सुहास आठवले हे कळले की, "दिवसभर खूप धावपळ झाली होती. टी. व्ही. वरच्या बातम्या आणि चर्चेमुळे सगळ्यांचे लक्षही वेधले गेले होते. पुढचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे होते" आणि "हातात प्लेट घेऊन तो टेबलापाशी आला. खाता खाताच तो उद्याच्या प्लॅनची मनात उजळणी करत होता. फोटो पहात होता. आता वेळ घालवणे त्याला परवडण्यासारखे नव्हते" ह्या वाक्यांचा अर्थ आणि संदर्भ देखिल स्पष्ट होईल. रहस्यकथेत दिशाभूल अपेक्षित असते न?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

छान