’मी ना, केस रंगवायचं म्हणतेय.... अगदीच कसेतरीच दिसतायत... तुमच्या लक्षातही आलं नसेल दोघांच्या...’, एका निवान्त गुरूवारी संध्याकाळी मी आमच्या अस्ताव्यस्तं पसरलेल्या कुटुंबात... म्हणजे कुटुंब इन-मिन-तीन माणसांचं... पण अक्षरश: खोलीभssssर पसरलेलं. तर... माझा केस रंगवण्याचा विचार सुतोवाच का काय म्हणतात त्या पद्धतीने केला.
अशाच एका गुरूवारी लेकाने आपण मिशी आणि कल्ले काढून टाकत असल्याचा उल्लेख जाताजाता करावा तसा केला होता. दुसर्या दिवशी किल्लीने दार उघडून, घरात आलेला गुंड आपला मुलगाच असून आता त्याच्या कल्ल्यांना जोडून असलेला समस्तं केशसंभार लॉन मॉवर फिरवल्यासारखा मोकळा केलेला आहे असं लक्षात आलं तेव्हा...
मी खुर्चीत बसल्याजागी रुतले होते आणि नवरा बसल्या जागेवरून उडाला होता. ’अरे, मी जिवंत आहे अजून....’ पासून त्याने सुरू केलेला संवाद, ’लो मेन्टेनन्स स्टाईल....’, ’अरे, आज्जी बेशुद्ध पडेल हे बघून..’, ’मुळ्ळीच नाही... तिला माहितीये मी तोळा करतोय ते, तिनेच सांगितला हा शब्दं...’, ’हीच फॅशन आहे...’, ’कर काय वाट्टेल ते...’ अशी स्टेशनं घेत शेवटी,
’बाबा, आज आजोबा असते तर, तुमचे पैसे वाचवल्याबद्दल मला शाब्बासकी मिळाली असती’, ह्यावर संपला.
त्यामुळे तेव्हापासून घरातल्या कुणाच्याही केसांच्याबाबतीतले निर्णय घरातल्या सगळ्यांनी मिळून घ्यायचे असा ठराव मी आणि नवर्याने मांडला आणि त्याच्या केसांच्या स्टाईलच्या पुढच्या बदलाच्यावेळी हा ठराव त्याला लागू होतो हे नम्रपणे नमूद करून मगच लेकाने तो मानला.
बायका जसं एकाचवेळी अनेक कामं करू शकतात तसं पुरुष करू शकत नाहीत ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोघं कशातही गर्कं असताना मी बोलणे! ऐकूच येत नाही...
’.... मग? रंगवू ना?’ मी परत एकदा मालगाडीला धक्का दिला.
’.... असं एकदम टोकाला जायला काय झालं तुला? मी मागेच म्हटलं होतं. करूया की... तू एकटीने कशाला? मी पण येतो ना... आपण सगळेच करू’, मी हादरून बघितलं. तरी हे पुढे चालूच, ’एका बाजूचं तू रंगव, बाकीच्या तीन बाजू आम्ही दोघं करू... एकाच वीकेंडला रंगवलं पाहिजे असं थोडच आहे?’
मला एकदम मी चार वेगवेगळ्या रंगांमधे डोक्याच्या चार दिशा रंगवून, कानाला, भुवयांवर वगैरे ठिकठिकाणी भोकं पाडून त्यात चित्रविचित्र बाळ्या अडकवून चाललेय असं दिसायला लागलं....
माझी बाबांकडे बघण्याची दृष्टी बघून लेकाने बाबाला समजावलं, ’बाबा, तुम्ही ना, नीट ऐकतच नाही.... प्रत्येकाने वेगवेगळी रूम करून कसं चालेल?.... आणि आधीच सांगतो... तुम्ही बाकीच्या घराला काय लावायचं ते लावा. माझ्या खोलीचा रंग....’
मी तितक्याच अगम्य दृष्टीने आता त्याच्या कडेही बघतेय हे न बघताच हे म्हणाले, ’घराचा रंग? डोकं-बिकं फिरलं का काय तुझं? आपल्या कुंपणाला रंग द्यायचं म्हणतेय ती... तू म्हणजे... नीट ऐकत जा जरा, गाढ....’.
मी कपाळावर थाडकन मारलेल्या हातामुळे दोघांनी माझ्याकडे एकदम बघितलं आणि एकाचवेळी विचारलं, ’कशाला रंग लावायचाय नक्की?’
मग झालेला गलका साधारणपणे अशा वळणांनी गेला....
’केस? कुणाचे?’...
’आई, का पण? असेच मस्तं दिसतायत... अजून थोड्या दिवसांनी समोरून इंदिरा गांधींसारखी दिसशील... सॉलिड’
’नको... तुला काय नको ते सुचतय? माझेपण पांढरे होतायत. पण मी माझे रंगवायचे म्हणतोय का?’
’बाबा, रंगवण्याइतके केस हवेत....’
’ए, गप्प. मेंदी लावणारेस? ए माझे आई, नको... डोक्यावर भगव्या पताका घेऊन फिरल्यासारखं दिसतं ते...’
’आई, ’तू ब्लाँन्ड का नाहीस?’ असं मी खूप लहान असताना तुला विचारलं होतं... ते विसरून जा... मी चुकलो, आईशप्पथ... तुझी शप्पथ’
’तुम्ही दोघे या, रंग निवडायला, मग तर झालं?’
’मी? मी कशाला? तुझ्या साड्या घ्यायलाही मी लागत नाही तुला बरोबर... कसल्याही रंगाच्या घेऊन येतेस... केसांना रंग निवडायला मी कशाला हवा? काठ, पदर, जर... रेशीम काही बघायचं नस्तं....’
’ए, मला नको ओढूस हं त्यात... कोणताही रंग लाव... आपल्याला चालेल.. मला काय...’
यावर मी फक्तं, ’ठीकय... मी आणेन रंग’, इतकं सरळ शब्दात, शांत स्वरात म्हटल्यावर दोघेही सटपटले. मी नक्की काय डोक्यावर थापून घेईन ह्याची कल्पना नसल्याने किंबहुना माझ्याबद्दलची तशी खात्रीच असल्याने बहुतेक... दोघेही यायला तयार झाले.
*****************************************************
’कुठे मिळत असतील डोक्याला लावायचे चांगले रंग?’ ह्या नवर्याच्या प्रश्नाचं मला हसू यायचं खरतर काही कारण नव्हतं. चिडून नवर्याने लेकाला विचारलं. त्याने ’गुगल सर्च’ मारतो म्हटल्यावर मात्रं मला हसून हसून मी पडणार असं वाटलं. शॅम्पू लावणारी घरात मी एकटीच.... नवर्याचा कध्धी पासून "तोच चंद्रमा नभात" आहे... आणि मुलाने मैदान साफ-सुथरं ठेवलय... तर शॅम्पू बिंपू लावणारी घरात मी एकटीच असल्याने तसल्या सेक्शनमधे जाऊन भंजाळण्याची वेळ दोघांपैकी कुणावरही आली नाहीये.
"सुपर मार्केट? तुझ्या केसाला लावायचा रंग तिथून आणायचा?", नवर्याने अशा स्वरात हे प्रश्नं विचारले की माझे केस हे नक्की हिलरीबाई किंवा मिसेस ओबामा ह्यांच्या लेव्हलचे महत्वाचे आहेत असं मला वाटायला लागलं.
"नाहीतर चांगल्याशा केमिस्ट..." मला माझं वाक्य फक्तं ऑफिसात पूर्णं करता येतं.
"केमिस्ट? केसांना रंग हवाय का औषध?", केमिस्टकडे औषधं सोडल्यास अजून काय काय मिळतं ते औषधही न घेणार्याला कसं कळेल?
गूगल सर्चमधे गुल झालेला मुलगा जेव्हा बाहेर आला, तेव्हा एकदम समाधीतून बाहेर आल्यासारखा "ज्ञानी" वगैरे दिसत होता. आपल्या डोक्यावरच्या काटेरी ब्रशवरून हात फिरवत त्याने केसांना रंग लावणं किती विघातक हे तो सांगताना, मी माझ्याच डोक्यावर रंगच घालणारय का, अणुबॉम्ब ते मलाच कळेना.
"बघ, अजून विचार कर....", नवरा सुरूवात करणार होताच. पण मीही मग वाक्यं पुरच करू दिलं नाही. मधेच विचारलं, "बरं, मग कुठे मिळतं म्हणायचं हे वीष... का शस्त्रं... का बॉम्ब?"
ते एक क्षुल्लक राहिलंच असल्याने, ते शोधायला लेकाला परत गूगल समाधीत जावं लागलं.
दुपारी जssssरा डोळा लागला आणि झोपेत कुणीतरी मोठ्ठी चेन सॉ घेऊन, दबक्या पावलांनी चालत, माझे केस कातरायला येतंय असलं काहीतरी स्वप्नं पडलं आणि मी दचकून जागी झाले. तर माझ्याहीपेक्षा भेदरलेल्या चेहर्याने माझा दैत्य मुलगा हातात कातरी घेऊन उभा होता.
"ए... काय करतोयस?" मी ओरडून विचारलं.
"केव्हढ्याने दचकलीस? मीपण घाबरलो ना. आणि ओरडतेस काय? बाबा म्हणाले की, तिला यायचं नसेल तर केसांचं सॅम्पल घेऊन ये... मी काय झोपेत कापणार नव्हतो. तुला उठवणारच होतो..."
मी कपाळावर हात मारला.
****************************************************
सहकुटुंब सहपरिवार आम्ही कुठेही गेलो तरी मुक्कामी पोचल्यावर आपसूक तीन दिशांना भरकटतो. केमिस्टच्या दुकानात गेल्यावर तेच झालं. दुकान कसलं, मोठ्ठं सुपरमार्केटच होतं. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं सोडल्यास, सगळं आपलं आपण घ्यायचं, शेल्फवरून.
रंग - हे प्रसाधन असेल अशी खात्री असल्याने, नवरा मेकपच्या भागात गेला. तिथल्या एका विक्रेतीला "पर्मनंन्ट कलर" विषयी आपल्यामते प्रगल्भ प्रश्नं विचारून मुलगा दुसर्याच भागात गेला.
मी "केसांची काळजी" असं स्पष्टपणे लिहिलेल्या भागात प्रवेश केला. एकोणसत्तर कंपन्यांच्या एकशेसत्तर बाटल्या!
तिथे असलेल्या रंगांच्या छटा बघून मला काय घेऊ आणि काय नको असं दोन्ही न होता, फक्तं काय घेऊ नको ते नक्की कळलं.
"काय बायका आहेत तरी, नीटपणे बघूही देत नाहीत..." असं तणतणत नवरा मला शोधत आलाच. मला वाटलं की, तिथे असलेल्या इतर स्त्री खरिददारांनी नवर्याला काही बघूच दिलं नाहीये. चष्मा घरी विसरून आल्यामुळे "एका विशिष्टं अंतरावरचंच वाचता येतं" ह्या त्यांच्या "भोपूर्झा" अवस्थेत कोणतेही अपघात होऊ शकतात. बायकांच्या घोळक्यात तर गंभीरच.
पण प्रकार तो नव्हताच. चाळीशी न लावता आलेल्या ह्या पुरुषमाणसाला मेकपच्या भागात सखोल आणि सुदूर निरिक्षण करीत हिंडताना पाहून, मौलिक मदतीची अत्त्यावश्यकता आहे अशी जाणीव झालेल्या समस्तं विक्रेत्या, पुरुषदाक्षिण्य दाखवायला नव्हे, पण "बरा मिळला बकरा", ह्या नैसर्गिक भावनेने हातातलं टाकून धावल्या होत्या.
पाच मिनिटात जेव्हा आठव्यांदा "नाही, मी ठीकय. मदत नकोय" किंवा "मदत नकोय. मी नुस्तच बघतोय" किंवा त्याच बाईला परत "धन्यवाद. काही लागलं तर तुम्हालाच शोधून बोलवेन" असलं सांगण्याची वेळ आली तेव्हा नवरा वैतागलाच असणार.
मला वाटतं, "मदत घेणे" हा, पुरुषांच्यालेखी गुन्हा असणार बहुतेक. त्यातही "बायकांकडून मदत घेणे" हा तर "वैश्विक क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी" लेव्हलचा गंभीर वगैरे असणार.
तर....
’आणि... तू इथे काय करतेयस? रंग घ्यायचाय आधी. ते सोडून काहीही इतर बघत हिंडू...’, बोलता बोलता विशिष्टं अंतरावर आल्यावर त्यांना त्या एकोणसत्तर गुणिले एकशेसत्तर बाटल्यांचं विराटदर्शन एकाचवेळी झालं असावं.
’काय कमाल आहे... केसांच्या प्रॉडक्ट्स साठी जर वेगळा सेक्शन आहे तर तसा बोर्ड नको लावायला?’ असं त्यांनी त्या बोर्डखाली उभं राहून विचारलं.
सात जन्मं हाच नवरा वगैरेवर माझा दृढ विश्वास आहे. एक नवरा घासून-पुसून सुधारायचा तर सात तरी लागणारच. अजूनही लागतील, काय सांगता येत नाही.
मी हातात मला हवा होता तो एक रंग घेऊन, त्याच्या ऍडमधे ती बया उभी असते, तशीच उभी होते. एका विशिष्टं अंतरावर उभं राहून ह्यांना रंग दिसेल आणि "इन्ग्रेडियंट्स" वाचता येतील असं धरून.
तेव्हढ्यात एक तळहातात मावेल एव्हढुशी बाटली घेऊन लेक आला. बाटली माझ्या डोक्याजवळ धरून म्हाणाला, "हा जास्तं डार्क आहे पण... चालेल."
मग माझ्या हातातल्या बाटलीकडे एकदा डोळे विस्फारून बघितल्यावर त्याने अक्कल पाजळी, ’एव्हढा रंग? अख्ख्या सिडनीतल्या बायकांना पुरेल. हा बघ. पर्मनंन्ट आहे. ह्याच्यावर लिहिलय की, एक मिटर बाय पाच मिटरला पुरेल... तुझ्या केसांना तर थेंब-थेंब..."
"तू आहेस तशीच थांब. आधी ह्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते बघू, दे... आणि स्वस्तं दिसतोय.. उगीच काय फॅन्सी... आणि एकाच सेक्शनमधे सगळे रंग ठेवायला काय जातं ह्या...", चष्मा नसला की, ह्यांना वाचण्यासाठी बॉलरसारखा स्टार्ट घ्यावा लागतो मला (अजूनतरी) नाही. त्यामुळे ह्यांनी स्टार्ट घ्यायला सुरूवात करायच्या आधी मी वाचलं, "गाढवा, कापड रंगवायचा रंग घेऊन आलायस.... ठेऊन ये आधी"
"तरीच. मला वाटलच हा... कायतरी जाम गोंधळ आहे. कारण ब्लॉंन्ड सापडलाच नाही. आणि इतकी छोटी बाटली कशी असेल म्हटलं? पण मला वाटलं माझे केस बघून तिने छोट्या बाटल्यांच्या सेक्शनमधे...", असलं पुटपुटत मुलगा बाटली ह्याच सेक्शनमधे कुठेतरी ठेवायला गेला.
"ए, आधी नेऊन जागच्या जागी ठेऊन ये. किमान इथे तरी ठेऊ नकोस. आपल्यासारखच कुणीतरी नेईल घरी डोक्याचा रंग समजून", इती हे.
एकाच भागात एकाच कुटूंबातली तीनच माणसं किती गोंधळ घालू शकतात?
"हा बघ, हा पण पर्मनंट आहे.", हे.
"बाबा, इथले सगळेच पर्मनंट आहेत.", लेक.
"चला, म्हणजे परत परत घ्यायला नको", हे.
"अहो, केस वाढणार नाहीत का?", मी.
"मग कापून घे", लेक.
"अरे, अकलेच्या कांद्या, आतून बाहेर येणारे केस पांढरेच असणार नाहीत का?", मी.
"तुझे केस म्हणजे काय वैतागय... त्यापेक्षा बाबांचे केस बरे. काहीच करायला नको... आणि अकलेचा खांदा म्हणजे काय? नवीन नावय", लेक.
"ज्याच्या खांद्यावर अक्कल नाही तो! कळलं?", हे.
"मग ते बिन-अकलेच्या खांद्या म्हणायला पा...", लेक.
मी थांबवलं दोघांनाही. नाहीतर अजून किती वेळ हे चाललं असतं कुणास ठाऊक.
"आयुर्वेदिक रंग आहेत का इथे?", हे तिथल्या एका विक्रेतीला मदतीला बोलावून.
मी स्तंभित! आणि मुलगा आपण ह्या दोघांचे मुलगा नाही हे दाखवण्यात गर्कं. निव्वळ "कर्मधर्मसंयोगाच्या योगायोगाने" तीन इंडियन दिसणारी माणसं ह्या भागात आत्ता आहेत आणि त्या दोघांशी ह्या तिसर्याचा दूरान्वयेही काहीही संबंध मुळी सुद्धा नाही... अशा अविर्भावात बाटल्या बघत बघत झपाझप चालत दुसर्या टोकाला गेला.
तिला भारतीय आयुर्वेदाबद्दल नीट पण थोडक्यात समजावून सांगितल्यावरही तिने आपलं "नाही" हेच उत्तर कायम ठेवल्याने हे थोडेसे निराश का काय म्हणतात तसे दिसायला लागले होते. ती निघून गेल्यावर लेक तरा तरा परत आला आणि, ’आयुर्वेदिक? बाबा, आता होमिओपथिक रंग विचाराल.. तुमचं काही खरं नाही".
दोन टोकांना अदृश्य होऊन, जरा वेळाने, काखेत दोन, दोन्ही हातात दोन अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या किंचित वेगवेगळ्या शेड्स घेऊन दोघेही घामाघूम होऊन परत आले. सगळ्यात आधी मी उचललेली बाटली दाखवली.... मला हवंय ते मिळाल्याचा आनंद होता म्हणण्यापेक्षा नशिबातली आजची तंगडतोड संपली ह्याचाच आनंद व्यक्तं करून, आपापले रंग परत ठेऊनही आले.
"हा रंग लावला की डोक्यावर तेल घालता येतं का विचार", हा नवर्याचा आग्रह आम्ही दोघांनीही मुळापासून खोडला.
(आजच्या दिवसातली तंगडतोड संपली असं म्हणणार्याच्या.....)
पैसे देताना तिथल्या सुंदरीने ह्याच्याबरोबर, रंग जास्तं दिवस टिकेल असा शॅम्पू घ्यायला हवा असं सुचवताच परत आम्ही शॅम्पू घ्यायला गेलो. परत आल्यावर, त्याच कंपनीचा घेतला तर केमिकल्स अनमॅच होऊन रिऍक्शन येण्याची शक्यता नसते म्हटल्यावर परत जाऊन घेतला होता तो ठेवला आणि त्याच कंपनीचा शॅम्पू घेऊन आलो. टवळी, कंडिशनरबद्दल त्याचवेळी बोलली असती तर काय बिघडत होतं?
’एव्हढ्या वेळात मी अठरावेळा केस कापले असते आणि अठराशेवेळा दाढी केली असती’ असं लेक म्हणाला. आणि बाबा काही बोलायच्या आत, ’बाबा पण. फक्तं उलट. अठरा वेळा दाढी आणि अठराशेवेळा केस!’
हे सगळं दर वेळी परत परत करायचं? ह्या विचाराने त्या दोघांचेही उरलेसुरले केस गळून पडायच्या आधीच मी म्हटलं, ’हा रंग कसा उतरतोय ते बघू. मग माझा मी घेऊन येत जाईन, तुम्हाला नको त्रास’.
’पण हा रंग हवा तसा नाही आला तर?’ असं विचारायची लेकाला काय गरज होती?
*****************************************************
रवीवारी संध्याकाळी एकांच्यात अठराव्या वाढदिवसाला जायचं होतं. अर्थात चिरंजीव येणार होतेच बरोबर.
किमान अठ्ठेचाळीस तास आधी त्याची ऍलर्जी टेस्ट घ्यायची आहे, हे रंग लावायच्या पाच मिनिटं आधी आठवून फायदा नाही हे लक्षात आल्याने, मी मोबाईलमधे रिमाइंडर लावला होता. तो वाजला तेव्हा मी स्वयंपाकघरात आणि फोन बाहेरच्या खोलीत. "कसला अलार्म? तूच वाचून सांग रे... जोरात सांग", हे लेकाला सांगण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्याने वाचून दाखवलंही...आलेल्या पाहुण्यांच्यासमोर.
हे दोघेही बाहेर जाणारेत म्हणजे लुडबुडणार नाहीत अशी निवांत वेळ शोधून काढली. पण होळी-रंगपंचमीचा सण असल्यासारखं, ’कधी लावणार?’, ’कधी रंग लावणार?’" हे इतक्यावेळा झालं की, शेवटी ते निघायच्या दोनच मिनिटं आधी रंग खलवला. त्या ट्यूबमधून बाहेर आलेली पांढरी पेस्ट बघून दोघांचेही डोळे त्याच रंगात बदलतात का काय असं वाटलं, मला. मी सांगून बघितलं. कौन बनेगा करोडपती मधल्यासारखी एका मैत्रिणीची "लाईफ़" लाईन मी मिळवून ठेवली होती... तिनेही सांगितलं की, लावल्यावर तो बरोबर येतो. आता ह्या मैत्रिणीच्या डोक्यावर ह्यांनी काळा सोडून बाकी सगळे रंग बघितल्याने ह्या दोघांचा तिच्यावर विश्वास बसल्याचं दिसत नव्हतं.
रोगण थापून ठरलेला वेळ मायबोलीवर टीपी-बीपी करून झालं.. धुवून-टॉवेलने सुकवून झालं. हे दोघे खूपच उशीराने घरी आले तेच प्रचंड टेन्शन घेतलेल्या चेहर्यानेच. मी डोक्याला टॉवेल गुंडाळून बाहेर आले.
मरणपंथाला लागलेल्या एखाद्या रोग्याविषयी कसं विचारतात, तसं ह्यांनी डोळ्यांनीच विचारलं, ’काय?’
मीही "आहे, धुगधुगी" अशा अर्थाचेच डोळे केले.
"इंग्रजीत किंवा मराठीत बोला... फायनली कोणता रंग आलाय?", लेक.
"अरे, रंग ना... आय मीन आता... आजचा दिवस असूदे. उद्या हे फिक्स करता येतं... बहुतेक", मी.
"म्हणजे? चॉकलेटी बिकलेटी रंग झाला का काय? का करडा?", माझ्या केसांचा काळा आणि ट्यूबमधून येणारा पांढरा मिळून करडा होऊ शकतो... ह्यांचं बरोबरच होतं.
"आई.. मी साफ सांगतो.. वीग लाऊन ये आज येणार तर... नाहीतर मी तुझ्याबरोबर येणार नाही... अशीच येणार असलीस तर...", लेकाने म्हटलं आणि ह्यांनीसुद्धा मान हलवली. तोंड कोरडं पडल्याने असेल कदाचित, पण बोलले नाहीत.
"अरे, हो. मला वाटलच. काही गोंधळ झाला तर आयत्यावेळी धावाधाव नको म्हणून मी वीग आणूनच ठेवलाय. आधी मूळ रंग एकदा बघून घ्या... एकदाच हं..." असं म्हणून मी टॉवेल सोडला.
नवरा खुर्चीतून उडाला आणि लेकाने आरोळी ठोकली... कारण माझ्या डोक्यावर भडक्क गुलाबी रंगाचं शिप्तर होतं.
मी चेहरा हातांच्या ओंजळीत ठेऊन लपवला... दोघेही हताश चेहर्याने बघताहेत... असं बोटांच्या फटीतून बघून हळू... गुलाबी केसांचा वीग उतरवला आणि बसल्या जागेवरून तावातावाने उठून दोघे माझ्यापर्यंत पोचायच्या आधी आतल्या खोलीत पळाले.
समाप्तं!
त.टी.: पात्रं खरी पण सगळेच प्रसंग खरे नाहीत.
(No subject)
सहीच दाद !!!
सहीच दाद !!!
(No subject)
मस्त
मस्त लिहिलंय...
सही ! *** Entropy :
***
Entropy : It isn't what it used to be.
मस्तच.
मस्तच.
मस्त मस्त
मस्त मस्त मस्त!!!
- सुरुचि
अरे..
अरे.. बघितलंच नव्हतं इकडे! शलाका, कसले सही पंचेस गं!
<<<सात जन्मं हाच नवरा वगैरेवर माझा दृढ विश्वास आहे. एक नवरा घासून-पुसून सुधारायचा तर सात तरी लागणारच. >>>
अगदी!
(No subject)
एक नवरा
एक नवरा घासून-पुसून सुधारायचा तर सात तरी लागणारच >>
नंबरी!
आणि मुलगा आपण ह्या दोघांचे मुलगा नाही हे दाखवण्यात गर्कं. >>
होळीची सुरुवात या रंगाने झाली.. मजा आली.
----------------------
इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..
एकच लंबर
-----------------------------------------
सह्हीच !
एकदम मस्त
एकदम मस्त लिहिता तुम्ही ! हसून हसून पुरेवाट !!
मस्त
मस्त विनोदी रंग भरलेत दाद तुम्ही लेखात!
(No subject)
<<<सात जन्मं
<<<सात जन्मं हाच नवरा वगैरेवर माझा दृढ विश्वास आहे. एक नवरा घासून-पुसून सुधारायचा तर सात तरी लागणारच. अजूनही लागतील, काय सांगता येत नाही.>>>
ग्रेट! काय सॉलिड पंच आहेत! व्वा!
चार-पाच दिवसापूर्वी अशीच "सात जन्म एक पति" वगैरे कल्पना असलेली कविता आली होती. फक्त कवयित्रीने आणखी एक जन्म वाढवून मागितला होता. तिची आठवण आली.
केसांच्या बाबतीत माझी काय गंमत झाली ते इथे पब्लिकमध्ये सांगत नाही.
शरद
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा;
कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
लोटपोट
खलास!
खलास!
'ह्यांच्या' कमी केसांवरचे पंचेस खास- esp. अठरा वेळा दाढी आणि अठराशेवेळा केस!
-----------------------------------
Its all in your mind!
सोल्लेट
(No subject)
...........................
................................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................
मस्त धमाल
मस्त धमाल आली वाचायला.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
दाद उच्चतम
दाद उच्चतम !
हसुन हसुन पाणी आलं डोळ्यात!
सह्ही!
सह्ही! नवर्याला वाचायला पाठवलाय! त्यातले सात जन्माचे वाक्य अधोरेखित करून! आणि मी सरळ पार्लरला जात असल्यामुळे तो कसा सुखात आहे ह्याची टिपणी जोडून!
सध्या कुठचा रंग झालाय?
>>बाबा
>>बाबा म्हणाले की, तिला यायचं नसेल तर केसांचं सॅम्पल घेऊन ये... मी काय झोपेत कापणार नव्हतो. तुला उठवणारच होतो...
>>सात जन्मं हाच नवरा वगैरेवर माझा दृढ विश्वास आहे. एक नवरा घासून-पुसून सुधारायचा तर सात तरी लागणारच. अजूनही लागतील, काय सांगता येत नाही.
सह्हिच !!! हसताना हातातली पाण्याची बाटली दोनदा खाली पाडली... सारे ऑफिस माझ्याकडे पाहत होते....
दाद ...
काय धम्माल
काय धम्माल लिहीलंय
>>मला एकदम मी चार वेगवेगळ्या रंगांमधे डोक्याच्या चार दिशा रंगवून, कानाला, भुवयांवर वगैरे ठिकठिकाणी भोकं पाडून त्यात चित्रविचित्र बाळ्या अडकवून चाललेय असं दिसायला लागलं....
>> ते एक क्षुल्लक राहिलंच असल्याने, ते शोधायला लेकाला परत गूगल समाधीत जावं लागलं.

>> एक मिटर बाय पाच मिटरला पुरेल... तुझ्या केसांना तर थेंब-थेंब..."
>> "म्हणजे? चॉकलेटी बिकलेटी रंग झाला का काय? का करडा?", माझ्या केसांचा काळा आणि ट्यूबमधून येणारा पांढरा मिळून करडा होऊ शकतो...

जबरदस्त हसले.
बाकी एक शंका आहे. त्यांचा बकरा करण्यासाठी आणलेला भडक्क गुलाबी रंगाचा विग "आता आणलाच आहे तर वाया कशाला घालवा?" या मराठी तत्वानुसार वापरतेस ना अधूनमधून?
खी खी खी
खी खी खी
मज्जा आली
*****************
सुमेधा पुनकर
*****************
जबरा ग ....
जबरी
जबरी
अशक्य
अशक्य लिहते बाई तु! एकदम जबरी, चाबुक...
>>>>सात जन्मं हाच नवरा वगैरेवर माझा दृढ विश्वास आहे. एक नवरा घासून-पुसून सुधारायचा तर सात तरी लागणारच.>>> अगदि अगदि...
Pages