पोटचा - भाग ३ (अंतिम)

Submitted by दाद on 31 March, 2008 - 23:25

भाग १ - http://www.maayboli.com/node/1558
भाग २ - http://www.maayboli.com/node/1566

........
आणि दरवाज्यात एक सुद्दृढ सावली पडली.... ओळखीची अधीर पावलं अन ’छोटी आई’ अशी त्याच्या अंतर्मनालाही साद घालणारी हाक ऐकू येऊनसुद्धा त्यांनी मान उचलली नाही. उलट असहाय्यपणे एकाबाजूला मान टाकून त्या, तोंडात चादरीचा बोळा घेऊन स्फुंदू लागल्या.

.... देवा, याक्षणी उचल, ह्यातून सोडव... ही विटंबना नको.... संजूबाबाने ह्यातलं काहीही करायला नकोय मला.... छे छे... विपरित आहे... अगदी लाजिरवाणं... नको नको....

..........
खोलीत आल्या आल्या संजयने प्रकार ओळखला.... तसाच धावत तो नर्मदाबाईंच्या बिछान्याशी गेला.
’छोटी आई, छोटी आई... अगं मी आलोय. इतकं होईपर्यंत कळवलं नाहीस मला... मी कुणीच नाही काय तुझा....’ आवेगाने नर्मदाबाईंच्या जवळ येत म्हणाला....

’संजूबाबा.....’, नर्मदाबाईना शब्दं फुटेना. तरीही धीर करून बोलल्याच, ’दुरून बोल रे, जवळ नको येऊस.... घाण आहे इथे....’

'अगं .... असं काय ....' संजयने बोलायचा प्रयत्नं केला पण नर्मदाबाईच्या चेहर्‍यावरच्या वेदना आणि त्याहीपेक्षा त्याच्याकडे बघायचं टाळत दु:खातिरेकाने 'नाही नाही' हलणारी मान....

संजय आल्या पावली खोलीबाहेर निघून गेला..... धुमसत्या हुंदक्यात बुडालेल्या नर्मदाबाई आणि काय करावं ते न कळून दरवाज्यात उभे पुरोहितबुवा....

काही वेळातच बालदी भर गरम पाणी, विसाणाचं पाणी, साबण, कपडे, पंचा असं सगळं घेऊन गडीबाबू खोलीत आला.... आणि त्याच्या मागे संजय. प्रवासातले कपडे बदलले होते. मलमलीचा सदरा, घरातला लेंगा अशा घरगुती वेषात आला.... आणि त्यांने आपल्यामागे खोलीचं दार लावून घेतलं....

’छोटी आई, आई.... इकडे माझ्याकडे बघ..... मी हे सगळं स्वच्छ करणारय.... नर्सबाई आल्या नाहीयेत आणि कुणी येईपर्यंत..... तुला अशीच.... अशीच ठेवणं मला जमणार नाही.... पटणार नाही ते’ संजय जमेल तितक्या मृदू पण दृढ स्वरात नर्मदाबाईंना समजवायचा प्रयत्नं करीत होता.

’संजूबाबा, पाया पडत्ये तुझ्या.... मी तुला निकराचं सांगत्ये.... आजवर कुणाकडून काही करून घ्यावं लागलं नाही.... देवाने हे दिवस दाखवलेत... त्याला माझी ना नाही.... पण तुझ्याकडून हे करून घ्यायचं? ... तूझ्याकडून... तू... तू एक.... ही विटंबना.... हे सहन होत नाही... मी जीभ हासडून प्राण देईन....’ नर्मदाबाई आवेशाने जमेल तसा विरोध करत होत्या. ’तुझ्याकडून नाही.... तू... काही झालं तरी तू....’

पण त्या वाक्य पूर्णं करू शकल्या नाही. त्यांचा उद्वेगाने हलणारा चेहरा आपल्या मजबुत हातांच्या ओंजळीत संजयने धरला होता.... आणि त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं....
’का थांबलीस छोटी आई? बोल ना... काही झालं तरी मी.... बोल.... मी तुझा पोटचा पोर कुठाय... हेच ना? ... हेच बोलणार होतीस ना? मी... मी तुझ्यासाठी एक... एक परपुरूष आहे....’

संजयचं हे इतकं स्पष्टं बोलणं दोघांनाही कातरत गेलं. नर्मदाबाईनी चेहरा वळवण्याचा निष्फळ प्रयत्नं केला.

’छोटी आई, एक जन्मं दिला नाहीस इतकच.... पण सगळं सगळं तूच केलयस.... तुझ्या हातून पहिला मऊ भात, तुझ्या हाती ग म भ न, तुझं बोट धरून पहिलं पाऊल....
.... जावळ करताना इतका रडलो होतो, पण सगळ्यांचा विरोध पत्करून तूच शास्त्राचे म्हणून एका बाजूचे केस कात्रीने कापले होतेस.... आत्तिआज्जीने सांगितलय सगळं.... माझं सगळं पहिलं तुझ्या हातीच गं.... शाळेतून उन्हातानाचं आल्यावर तुला मिठी मारल्यावर तुझ्या गार-गार पोटाचा गालांना होणारा स्पर्शं, तुझ्याकडून डोकं पुसुन घेताना कानाशी होणारी तुझ्या बांगड्यांची किणकिण, मी रात्रं-रात्रं जागून अभ्यास करताना तिथेच आराम-खुर्चीत बसून तुझं पेंगणं, मोठ्या आत्तीआज्जीला एकदा उलटुन बोललो तेव्हा तुझ्या हातचा खाल्लेला मार, मी खोटं बोलल्याबद्दल तू धरलेला उपास आणि मग आपण दोघांनी रडत-रडत देवघरात खाल्लेला नैवेद्य.... आणि तुझ्या रोजच्या जेवणात... शेवटल्या ताकभातात लोणच्याचं बोट लावून माझा हक्काचा घास.... मुंजीत... आता ह्यानंतर शास्त्राने तुझं उष्टं मी खायचं नाही... म्हणून मातृभोजनाला किती कातर झाली होतीस......माझ्या सगळ्याच आजारपणात तुझं रात्रं-रात्रं उशाशी जागणं.... ह्यातलं काय तुझ्या पोटच्यासाठी वेगळं होणार होतं... वेगळं करणार होतीस.....

’आई... छोटी आई, माझ्यासाठी तुझं स्वत:चं बाळ गमावलयस... हे मला माहीत नाही असं तुला वाटतं? ....जन्मदाते वडील.... दादांपेक्षाही मला तू जास्तं जवळची हे मी तुला सांगायचं?’

’छोटी आई, एक सांगतो..... मी तुझ्या पोटीचा नाही हे मला माहीतच नव्हतं, तू कधी जाणवू दिलं नाहीस.... आणि कळलं तोपर्यंत.... तोपर्यंत कधीचाच तुझाच होऊन गेलो होतो... ते कसं विसरू ते सांग...’

आता नर्मदाबाईंनी डोळे उघडले होते आणि एकटक संजयकडे बघत होत्या...

’...... आपल्याशी थोडं तुसडेपणाने वागणार्‍या आक्का आत्येने मानपानाचं निमित्तं करून मुंजीत मला आशिर्वाद द्यायचं नाकारलं होतं, आठवतं? कळत्या वयात तो अपमान सहन न होऊन मी तुझ्याकडे रडत आलो होतो.... तेव्हा तूच माझी समजूत काढली होतीस... जा त्यांच्या पाया पड... त्यांच्या आशिर्वादावर तुझा अधिकार आहे.... आक्कात्ये सारखी बाई नमली होती.. मला हाती धरून त्यांच्या पायावर डोकं टेकायला लावलस तेव्हा....
आई.... छोटी आई, आता तुझी सेवा करायचा माझा अधिकार तू नाकारतेयस.... मला हाती धरणारं, तुला समजावणारं घरात कुणी मोठं राहिलं नाही.... मीहून तुझ्या पायी डोकं ठेवलं तर करू देशील मला हे?.... देशील माझा अधिकार मला....’
संजयचा आवाज भावनावेगाने चढला होता.... हात थरथरत होते, डोळ्यात पाणी साठलं होतं....

पोटच्यापेक्षाही जवळचं होऊन जाब विचारणारा हा त्यांचा तरूण लेक.... नर्मदाबाईंच्या नजरेत माईना.... धडपडत उठतं व्हायचा प्रयत्नं करू लागल्या.... त्याला कवेत घेण्यासाठी.....

आपल्या छोट्या आईची ती गदगदणारी थकली कुडी, तिच्या पसरलेल्या हातांसकट संजयने आपल्या मिठीत घेतली...

समाप्त

गुलमोहर: 

खुप दिवसानी काहितरी वाचताना डोळ्यात पाणी आल.

व्वा दाद!!! नेहमी सारखंच छान....

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

शरद यांना अनुमोदन.
ही साधी सुधी "शलाका" नव्हेच, ही तर "परमेश्वरी शलाका" .....
- आपल्या शांत, स्निग्ध, सात्विक, सोज्वळ तेजाने कितीयेक अंतःकरणे निववणारी........"तापहीन मार्तंडांच्या" जातकुळीतली !
नवलकारी शलाका - कधी अंतःकरणे निववणारी, तर कधी अंतर्दीप उजळवून टाकणारी !
कुठेही ही "शलाका" बघणार्‍याला अंधारी आणत नाही तर त्याची "नजर" स्वच्छ निर्मळ करते, कधी नवी दिठी देते....
वर्णनापलिकडली........ एक अतिअद्भुत शलाका - "परमेश्वरी शलाका"

बापरे शशांक... प्लीज...
प्रच्चंड कौतुक चाललय... मला कितीही छान वाटत असलं तरी.. नकोच ते. तुम्हाला वाटतय तितकं अतिअद्भुत नाहीये... अद्भुतही नाहीये.
मी विनंती करते. इतकही कौतुक माणसाचं करू नये... लोभ असावा.

Pages