मी त्यावेळी दहाव्या वर्गात शिकत होतो तर माझा लहान भाऊ अज्याप पांचवीला शिकत होता. मी म्युनीसिपल हायस्कुल मध्ये होतो तर अज्याप गव्हर्नमेंट हायस्कुल मध्ये होता.
मी आणि माझा लहान भाऊ अज्याप असे दोघेही यवतमाळ येथे वसंतराव नाईक होस्टेलमध्ये राहत होतो. हे होस्टेल बंजारा समाजाचे प्रतापसिंग आडे चालवित होते. त्यांनी त्याच वर्षी हे होस्टेल नव्याने ऊघडले होते. ते दिग्रस या तालुक्याच्या परिसरात राजकीय पुढारी होते. त्यांनी अनेक मोठमोठ्या गावात शाळा, होस्टेल काढल्या होत्या. त्यामुळे त्यांनी खेड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी चांगला हातभार लावला होता.
हे होस्टेल सुरुवातीला दारव्हा रोडवर होते. त्यावेळी पावसाळा सुरु होता. पाऊस आला की तेथील जागा ओली व्हायची. मग आम्हाला त्या ओल्या जागेवर खाली झोपावे लागत होते. काही दिवसाने ती जागा सोडून आमचं बाडबिस्तर डोक्यावर घेऊन पायीपायीच धामणगांव रोडवरच्या नव्यानच बांधलेल्या वास्तुमध्ये राहायला गेलो.
अज्यापची शाळा तशी लांब होती, गोधनी रोडवर. आमच्या होस्टेलपासून दिडक कोस तरी असेल. त्याला रोज इतक्या दूर जाणे येणे करणे फार त्रासदायक होत होते. माझी शाळा तशी त्याच्या शाळेपेक्षा जवळ म्हणजे आझाद मैदानाला लागून होती.
आमचे दोघांचेही पुस्तके, कपडे, साबन, तेल असे सर्वच सामान एका लाकडी पेटीत ठेवत होतो. ही पेटी बाबाने घरीच बनवून दिली होती. ती मी डोक्यावर यवतमाळला घेवून आलो होतो.
पावसात भिजू नये म्हणून बाबा जूनी, ठिगळं लावलेली छत्री घेवून द्यायचा. तहसिल ऑफिस जवळ एक छत्री दुरुस्त करणारा माणूस बसायचा. त्याच्याकडून बाबा छत्र्या घ्यायचा.
शाळेत मात्र अनवाणी पायानेच आम्ही दोघेही भाऊ चालत जात होतो. कारण बाबा तहसिल ऑफिस जवळ बसलेल्या एका चमारीन बाई कडून ज्या चपला विकत घ्यायच्या. त्या मोटारच्या टायरच्या असायच्या. त्या घालायला आम्हाला लाज वाटायची. म्हणून त्यापेक्षा आम्ही पायात चपलाच घालत नव्हतो.
एकदा होस्टेलमधील काही मुले थोड्याफार नविन-जुण्या चप्पला पायात घालून येत होते. तेव्हा त्यांच्यात हळूच कुजबूज चालायची. माझ्या लक्षांत आले की हे कुठूनतरी चप्पला चोरुन आणत असावेत. .
‘कारे या चप्पला कुठून आणता?’ मी त्यांना विचारले.
‘तुला पाहिजे कां? पाहिजे असेल तर चल संध्याकाळी माझ्या बरोबर…’ तो म्हणाला
सुरुवातीला माझं मन तयार होईना! माझ्या मनातल्या विचाराची दांडी सारखी वरखाली होत होती.
चप्पलासारख्या वस्तु चोरुन आणणे ही गोष्ट माझ्या सद्सद्वीवेक बुध्दिला पटत नव्हती. पण चप्पल घ्यायची ऎपत नसल्यामुळे आम्ही अनवाणी पायानेच चालत होतो. चप्पला घालून चाललेल्या इतर लोकांच्या पायाकडे पाहिल्यावर आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. त्यामुळे चोरीची कां असेना आमच्याही पायात चप्पला असाव्यात अशी इर्षा मनात उफाळून येत असे. चप्पलाच्या अत्यावश्यक गरजेमुळे आम्ही चोरीसारखे अश्लाध्य कृत्य करायला अगतीक झालो होतो. गरिबीने गांजलेले लोकं म्हणूनच चोरी करायला धजावत असतील हे त्यांच्या गुन्हेगारीमागील कारण असावं हे गुढ त्या प्रसंगाने मला उमगलं होतं. हृदयावर दगड ठेवून व मनाचा हिय्या करुन मी त्याच्या सोबत चालत गेलो.
त्याने मला आझाद मैदानाजवळील महादेव मंदिराजवळ नेले होते. तेथे महाशिवरात्रीचा उत्सव असल्यामुळे एकप्रकारची यात्राच भरली होती. मंदिराच्या बाहेर जागोजागी चप्पला-जोड्यांचे ढिगच्या ढिग पडले होते. बायका, मुले, माणसं येत व पायातली वहान काढून मंदिरात जात. तेव्हा आम्ही तेथे आजुबाजूला त्यांच्या वहानाकडे चोरट्या नजरेने पाहत घुटमळत राहत होतो.
‘घाल ही चप्पल आणि जा पटकन… तिकडे लांब दूर थांब… मी येतोच.’ माझ्या पायाच्या आकाराची चप्पल एकाने काढून ठेवल्याबरोबर तो मला हळूच म्हणाला.
त्यालाही चप्पल पाहिजे होती. कारण त्याने आदल्या दिवशी जी चप्पल आणली ती त्याला न आवडल्यामुळे कुणाला तरी दिली होती. म्हणून त्याला तेथेच थांबायचे होते.
माझ्याही मनाची तयारी झाली होती. मी पटकन ती चप्पल पायात घातली आणि कुरुकुरु चालायला लागलो. मी दूर लांबपर्यंत आमच्या होस्टेलच्या आडव्या रोडने जावून त्याची वाट पाहत ऊभा राहीलो.
एवढी चांगली देखणी चप्पल मी पहिल्यांदा पायात घातली खरी. पण मनात विचाराचं काहूर माजलं होतं. चप्पलवाला समजा एकाएकी माझ्यासमोर आला तर माझी काय अवस्था होईल? या भितीने माझ्या सर्वांगाला घाम फुटला होता. छाती धडधड करीत होती.
चौर्यकर्म क्षणात मनाला कसं भुरळ पाडतं पण त्याचे परिणाम मात्र दु:खद असते, ही भावना माझ्या मनात खदखदायला लागली होती. स्वत:च्या मालकीच्या वस्तूचा उपभोग घेण्यात जेवढा आनंद आणि सुरक्षितता मिळते तेवढा चोरीच्या वस्तूत मिळत नाही ही जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.
तो मुलगा अजुनही आला नव्हता. त्याला पकडले तर नाही ना? अशी शंका-कुशंका मनात घिरट्या घालू लागल्या होत्या. त्याला जर पकडले तर तो माझेही नांव सांगेल. मग मी सुध्दा पकडला जाईनू. पुढे त्यां लोकांची शिवीगाळ, मारझोड, पोलीस स्टेशनची जीवघेणी वागणूक व शेवटी जेलची हवा… बापरे… हे सारं चित्र माझ्या डोळ्यासमोर तराळत होतं. अशी ती भयावह परिस्थिती पाहून मी हबकलोच!
गुन्हेगार म्हणून जीवनात काळा धब्बा लागेल. आतापर्यंत केलेला शिक्षणासाठीचा सारा खडतर प्रवास मातीमोल होवून जाईल. पुढलं सारं भविष्य बरबाद होईल. कुणाला तोंड दाखवणे मुश्किल होईल. जेलमध्ये सडत राहावं लागेल. कशाला या भानगडीत पडलो? असं वाटायला लागलं होतं. त्यापेक्षा अनवाणी पायानेच चालणे बरे! म्हणून मी रोडच्या आडोश्याला कडूनिंबाच्या झाडाजवळ गेलो. तेथे चप्पल काढून ठेवणार एवढ्यात त्याचा आवाज आला.
‘अरे काय करतोस?’ तो म्हणाला.
‘मी येथे चप्पल काढून ठेवणार होतो. तु लवकर आला नाहीस ना? म्हणून मी घाबरलो होतो. मला वाटले तु पकडला गेला की काय?. मला नको ही चप्पल.’ असे म्हणून मी चप्पल काढायला लागलो.
तो म्हणाला, ‘असा घाबरु नकोस. काही होत नाही. घाल चप्पल आणि चल माझ्यासंग पटंपटं…’ असं तो निर्ढावलेल्या सुरात म्हणाला.
काय करावे ते मला काही कळायच्या आतच त्याने माझा हात पकडून मला ओढत ओढत नेवू लागला.
‘चल लवकर लवकर… नाहीतर चप्पलवाला येईल न् आपल्याला पकडतील.’ असं म्हणून तो मला घाबरायला लागला. मी घाबरत घाबरत होस्टेलमध्ये आलो. पण ती चप्पल पायात असेपर्यंत मला सारखी धाकधूक वाटत होती. रस्त्यात कोणी माझ्या पायाकडे पाहत तर नाही ना? अशी शंकाकुशंका मला चाटून जात होती.
तहसील ऑफीसजवळ रोडला लागून मामा ढोंगेचं सायकलचं दुकान होतं. तो लोकांना सायकली भाड्याने देत होता व सायकल दुरुस्तीचं पण काम करीत असायचा. दादाचं व या मामाचं खूप जमायचं. दोघेही मस्त गोष्टी करीत राहायचे. त्यांचं आमच्या गांवाजवळील बरबडा या गांवला शेत होतं. ते कुणाला तरी वाहून घालत होते. दादा काही कामानिमित्त यवतमाळला आला की तो तेथे त्या दुकानात ठेवलेल्या पेटीवर पेपर वाचत बसायचा. त्या पेटीत त्यांचे सायकल दुरुस्तीचं सामान असायचं.
मला काही काम पडलं किंवा दादाला भेटायचं असलं की मी त्या दुकानात जात होतो. कुठे जायचं असलं की तेथूनच भाड्याने सायकल घेत होतो.
कधी कधी मी तहसील कार्यालया जवळ गेलो की तेथे गारूडी दिसायचा. डमरु वाजवून लोकांचे लक्ष वेधून घेत होता. मग पोरसोरं व माणसं त्याच्या भोवताल जमत होते. एखाद्यावेळेस रंगिबेरंगी झबले घातलेले वानर व वानरीन मस्त गमती जमती करायचे. मग वानराच्या हातात कटोरा देवून लोकांकडून पैसे जमा करायचा.
कधी कधी एखाद्या गारुड्याकडे मुंगूस बांधलेला दिसायचा. दोरीचा साप करुन त्याची लढाई मुंगसासोबत लावून देण्याची बतावणी करायचा. जमलेले लोकं दोरीचा साप व लढाई पाहण्यासाठी तेथे खिळून बसायचे. मग तो हळूच दंतमंजनच्या पुड्या काढून विकायचा. त्यासाठी कुणाला तरी मंजनाने दात घासून त्याच्या थुंकीमध्ये दातात असलेला किडा मंजनाने निघाला अशी काहीतरी क्लुप्ती लढवून भासवत होता. पण तो दोरीचा साप बनवून त्याची मुंगूसासोबत लढाई करुन काही दाखवयाचा नाही. फक्त त्याची लालूच दाखवून लोकांना शेवटपर्यंत बसवून ठेवायचा.
कधी त्याच्या सोबतच्या मुलावर जादु केल्याचा आंव आणून त्याला झोपवत असे. एखाद्या माणसाला हात लावल्यावर त्या मुलाला म्हणायचा, ‘जंबुरे इसे पहचान. इसने क्या पहना है.’ मग तो मुलगा बरोबर त्याने पॅंट-पायजमा घातला की धोतर नेसला ते सांगायचा. खेळ संपायच्या आधी अशा काहीतरी युक्त्या-क्लुप्त्या, हातचलाख्या करुन भारावलेल्या अवस्थेत लोकांकडून पैसे गोळा करायचा. मला वेळ असला किंवा वेळ घालवयाचा असला की मी त्यांचे असे खेळ पाहण्यात दंग होवून जात होतो.
दारिद्र्याने पिचलेले गरीब लोंक असेच त्या डमरुवाल्या जादुगारासारखे राजकारणी लोकाना फसत असतील नाही कां? राजकारण्यांनी दिलेल्या ‘गरिबी हटाव’ च्या आश्वासनाला बळी पडून लोकं आपल्या उध्दाराची वाट पाहत पिढ्यान् पिढ्या त्यांनाच मतदान करुन त्यांच्या हातात प्रत्येकवेळी सत्ता सोपवित आले होते. मला तर दोघांचाही धंदा सारखाच वाटत होता!
एकदा आमच्या गांवाजवळील घोडखिंडी गांवाच्या चिंपट महाराजानेही अशीच बनवाबनवी करुन लोकांना जंगलातून जमा केलेल्या सस्याच्या लेंड्या औषधी म्हणून विकल्या होत्या. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.’ असे म्हणतात तेच खरं!
कधी कधी तेथे कोल्हाट्याचा खेळ दिसला की मी तेथेच खिळून बसत होतो. एक लहानसी चार-पांच वर्षाची मुलगी बापाने विशिष्ट काडीने वाजवविलेल्या ढोलकीच्या व आईने बदडलेल्या ताटाच्या आवाजाच्या तालावर करामती करुन दाखवायची. ती एका छोट्याशा रींगातून आपलं संपुर्ण शरीर आळोखेपिळोखे देवून अलगद काढायची. आपल्या शरीराला इतकी वाकवायची की जणू काही तिचं शरीर रबराचं बनलेलं होतं असंच वाटत होतं. ढोलकी व ताटाच्या निनादावर काठीचा आधार घेऊन, डोक्यावरच्या चुंबळीवर एकावर एक असे दोन गडवे ठेवून दोरीवर मागे पुढे सरकणे व मध्येच नाचणे, एका पायावर उभी राहणे अशी तिची कसरत तल्लीन होवून पाहत होतो. काठीच्या आधारानेच ती मुलगी आपलं संतुलन सांभाळत होता. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सुध्दा सद्सद्विवेकबुध्दीची व सारासार विचाराची काठी घेऊन जर चाललो तर खाली कोसळण्याची भिती राहणार नाही. असं ते सत्य ती मुलगी मला शिकवून गेली होती. त्या मुलीची हिम्मत, निर्धार आणि दृढता मनात साठवून नव्या उमेदीने मी वर्गात जावून बसत होतो.
आमच्या होस्टेलजवळ थोडं दूर एक विहीर होती. तेथून आम्ही पाणी आणत होतो. सुट्टीच्या दिवशी तेथे कपडे धूत होतो. त्या विहीरीजवळ एक रिठ्याचं झाड होतं. त्याला कुटून त्याला भिजवल्यावर त्याचा साबनासारखा फेस येत होता. त्या रिठ्याला दगडावर घासून आम्ही एकमेकाला चटके पण देण्यात मजा घेत होतो.
आमच्या होस्टेलमध्ये अनेक जातीचे मुले होते. त्यात मी, अज्याप व धवणे नांवाचा मुलगा बौध्द होतो, आडे, पवार बंजारी होते, कुमरे गोंड होता, सिध्दीकी मुस्लिम होता, वाणी कुनबी होता. सरोदी हा सरोदी जातीचा होता, तर शिरगिरे हा धनगर होता.
होस्टेलमधील मुले अनेक स्वभावाचे होते. बहुतेक मु्लं गरिबीचे चटके सोसतच शिक्षण घेत होते. धवणे व शिरगिरे हे दोघेही फारच मजाकी होते. त्यांच्या हसवण्यामुळे आमचं मन कसं प्रसन्न होत होतं. माणसानं दु:खी न राहता आनंदी राहावे म्हणजे दु:ख सहन करण्याची ताकद मिळते अशी शिकवन ते नकळत देवून जात होते. शिरगिरे या मुलाला काहीही बोलले, किवा शिव्या दिल्या तरी त्याला राग मुळी येतच नव्हता असा तो निर्विकार स्वभावाचा होता.
सरोदी नांवाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात सरोदीचा धंदा करीत होता. सरोदी म्हणजे लोकांचे भविष्य पाहणारी जात. कास्तकारांचे पिक-पाणी निघाले की हे लोकं लोकांचे भविष्य पाहण्यासाठी गांवोगांवी भटकंती करीत असत. एकटांगी धोतर, पांढरा सदरा, खांद्यावर पांढरा शेला, गळ्यात लांब कश्याचा थैला व कपाळावर उभा कुंकवाचा टिळा असं त्यांचं सोज्वळ रुप दिसायचं. तो अडाणी, देवभोळे, अंधश्रदाळू खेडूत लोकांना कसे गंडवत होतो ते आम्हाला मोकळेपणाने सांगायचा. त्यातील गमती जमती मस्त खुलवून सांगत होता.
‘एखादा धनवान माणूस किंवा बाईला हेरुन त्यांना भविष्याच्या बाबतीत घाबरुन सोडत होतो. मग त्यांच्या जीवनात अरिष्ट आणणार्या राहू, केतू, शनी सारख्या ग्रहांना शांत करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे किंवा सोन्याच्या अंगठ्या लुबाडत होतो. त्यातूनच मी वर्षभर माझ्या शिक्षणाचा व कुटूंबाच्या पालनपोषानाचा खर्च भागवत होतो.’ असं तो सांगायचा.
येथे मात्र कोणीही जातीभेद पाळत नव्हते. सर्वजन एकाच पंक्तीत जेवायला बसत होतो. एकत्र अभ्यास करीत होतो. झोपत होतो. आम्ही एकत्र बसलो की मग गप्पा गोष्टी, गमती जमती, हास्यविनोद, गाणे म्हणण्यात रंगून जात होतो.
एकदा आडे नांवाच्या एका बंजारा मुलाने स्वत:च मस्त मालमसाला टाकून व तेलाची चमचमीत फोडणी देवून आलूची भाजी बणवली होती. आम्ही अशी तेलाची चपचपीत भाजी पहिल्यांदा पाहिली होती. एरवी आम्हाला हायब्रीडची भाकर किवा मैद्याच्या पोळ्या. सोबत पातळ वरण व अशीतशी भाजी मिळायची. ही भाजी डब्ब्यात घेवून आम्ही त्याच्या गांवला डब्बा पार्टीला गेलो होतो. त्याचं गांव तसं दहा-बारा कोस तरी असेल. आम्ही पाच-सहाजन भाड्याच्या सायकलने त्याच्या घरी गेलो होतो. त्याने घरात टाकलेल्या बाजेवर आम्हाला आपुलकीने बसवीले होते. आमच्या गांवच्या बंजाराच्या मनातून अशी बाट न करण्याची भावना कधी जाईल असा विचार माझ्या मनात शिरुन गेला होता.
एकदा आम्ही काही मुले भाड्याच्या सायकली काढून कळंबच्या यात्रेला गेलो होतो, कळंब हे गांव यवतमाळपासून जवळपास विसक मैल असेल. सायकल चालवून मी पार थकून गेलो होतो. सारखे पायडल मारुन माझे पाय खूप दुखत होते. तेथे आम्ही एका टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहिला होता. नंतर आम्ही एका मुलाच्या ओळखीचा मठ होता. तेथे जावून जेवण केले व तेथेच झोपलो होतो. दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परत आलो.
होस्टेलला लागंणारे सामान म्हणजे स्वयंपाकासाठी लाकडं, पिठ दळून आणणे, भाजीपाला आणणे, होस्टेल सारवणे, विहिरीवरुन पाणी भरणे असे कामे आम्हीच मु्ले करीत होतो.
आमच्या वार्डनचं नांव मनवर होतं. मी नववी पास झाल्यावर आम्ही आता शिक्षणाला कुठे राहावे असा प्रश्न पडला होता. मी ढोंगेच्या दुकानात बसलो होतो. तेव्हा ‘सिंहगर्जना’ हा यवतमाळचा पेपर मी वाचला होता. त्यात वसंतराव नाईक होस्टेलची जाहिरात होती. माझ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मी त्यात दिलेल्या पत्त्यावर मला व माझ्या लहान भावाला प्रवेश द्यावा असे मनवर सरांना पत्र लिहिले होते.
नंतर त्यांची भेट घेतल्यावर आम्हा दोघांना होस्टेलमध्ये प्रवेश दिल्याने मी आनंदीत झालो होतो.
आम्हाला जेवणात कधी हायब्रीड, मिलोच्या भाकरी तर कधी मैद्याच्या-गव्हाच्या पोळ्या, एखादी भाजी व पातळ वरण मिळत असे. एखाद्या सणाला गोडधोड खायला मिळायचं तेव्हा आमची मजाच व्हायची.
एकदा आमच्यापेक्षा काही मोठ्या मुलांनी फिस्ट द्यावी म्हणून वार्डनच्या मागे तगादा लावला होता. पण तो काही केल्या मानत नव्हता. म्हणून रात्रीला तो त्याच्या खोलीत झोपलेला असतांना त्याच्या दरवाज्यावर थाप मारायचे. कधी कधी दगडं मारायचे. असे काहीतरी भानामतीचे प्रकार वास्तुशांती न केल्यामुळे होस्टेलमध्ये होत आहेत, असे म्हणून त्याला घाबरवून सोडत होते.
एकदा आम्ही सर्वजन झोपलो असतांना अज्यापला बाहेरच्या दरवाज्याजवळ चालत जातांना मी पाहिले होते. तो झोपेत चालतो म्हणून मी घाबरलो होतो. तेव्हा आम्ही सर्वजन बसलो असतांना धवणे या मुलाने आपल्या अंगात देव आल्याचं नाटक करुन घुमत होता.
‘या जागेची वास्तुशांती करा. नाहीतर मी एकएकाला खावून टाकीन.’ असं तो घुमतांना बडबडत होता.
शेवटी एक दिवस फिस्ट देवून वार्डनला मुलांच्या समोर झुकावेच लागले! पण धवणेचं देव अंगात येण्याचं सारं बिंग मात्र त्यानंतर फुटलं होतं.
कधी कधी आमच्या होस्टेलचे चालक प्रतापसिंग आडे होस्टेलवर येत असत. ते आले की आम्ही सर्वजन चिडीचूप होवून जात होतो. त्यांची मराठी भाषा म्हणजे बंजारी-गोर भाषेचं मिश्रन असायचं.
एकदा ते वसंतराव नाईकांना घेवून आले होते. त्यावेळी ते महाराष्टाचे मुख्यमंत्री होते. ते आल्यामुळे आम्हाला मोठा गर्व वाटला होता. त्यांची गाडी आमच्या होस्टेलच्या दरवाज्याजवळ येवून थांबली होती. त्यांना आम्हाला अगदी जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं होतं. ते दिसायला सुंदर, गोरेपान व जाडजूड बांध्याचे होते. एखाद्या राजबिंड्या सारखं त्यांच रुप होतं. त्यांनी कोट, पॅंट घातला होता. त्यांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाने आम्ही अक्षरश: भारावून गेलो होतो. त्यांच्याकडे आम्ही मोठ्या कुतूहलाने पाहत होतो. ते आपल्याच मागासवर्गिय समाजाचे असल्यामुळे आमचा उर मोठ्या अभिमानाने भरुन आला होता.
त्यांच्या बाबतीत मी पेपरमध्ये वाचलं होतं की त्यांनी ‘कसेल त्याची जमीन, ज्यांच्या हातात रुमणं तो शेतकरी’ यासाठी कुळकायदा, अतिरिक्त जमीन, वहिवाटी, नवाटी असे कित्येक कायदे करुन शेतमजुरांना शेतकरी बनविले होते. त्यांनी भरपूर उत्पन्न देणारे हायब्रिडचे पिके आणले होते. मजुरांना रोजगारांची हमी देणारी योजना आंणली होती. ते बंजारा समाजातील पहिले वकील व सत्तेचे अनेक पदे भुषवणारे राजकारणी पुढारी होते. त्यामुळे ते बंजारा समाजाचे दैवत मानले जात होते.
एकदा निवडणूक आली होती. तेव्हा प्रतापसिंग आडे आमच्या होस्टेलवर आले होते. त्यांनी आम्हा मुलांना आपाआपल्या गांवला जावून कॉंग्रेसच्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी सांगितले होते. घरी जाण्यासाठी त्यांनी तिकीटचे पैसे पण दिले होते.
आम्ही गांवला न जाता गोधनी या गांवला गेलो होतो. तेथे बाबाने जांबाचा म्हणजे पेरुचा बगीचा घेतला होता. आई, बाबा व बाई त्या बगिच्यात झोपडीमध्ये राहत होते. कोणत्या झाडाचे जांब गोड लागतात ते बाईला विचारुन मी जांबाच्या झाडावर चढत होतो. मग पिकलेले जांब तोडून तेथेच फस्त करीत होतो.
तसंही मी गांवला जावून कॉंग्रेसचा प्रचार केलाही नसता. त्यावेळी राजकारणातलं फारसं मला काही कळत नव्हतं. पण ‘कॉंग्रेस हे जळते घर आहे त्यात जावू नका.’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याचे मी दादा कडून ऎकले होते. दादा म्हणजे माझा मोठा भाऊ शामराव हा रिपब्लीकन पार्टीचा पुढारी होता ना… गांवचा सरपंच होता तो… ते कॉंग्रेसपक्षाचे विरोधकच होते. मला सुध्दा या पक्षाबाबत कधिही आपूलकी वाटली नाही.
माझी मॅट्रीकची परिक्षा तोंडावर आली होती तेव्हा मी खूप अभ्यास करीत होतो. आणखी एकदोन मुलं मॅट्रीकला होते. त्यांच्यासोबत जवळपास परिक्षा होईपर्यंत रात्रभर जागत होतो. झोपेच्या डुलक्या येऊ नये म्हणून आम्ही राहून राहून चहा करुन पित होतो. सारखं तासन् तास पुस्तकात डोक्स खुपसून राहतांना चहाची सोबत त्यावेळी मोलाची वाटत होती.
माझ्या परिक्षेचं केंद्र गव्हर्नमेंट हायस्कुल मध्ये होतं. ही शाळा बरीच लांब होती. इतक्या दूर मला परिक्षा संपेपर्यंत रोज पैदल जावे लागत होते. त्यामुळे मी एक तास तरी आधिच निघत होतो.
मी पेपर सोडवत असतांना कधिकधि माझं लक्ष माझ्या समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एका मुलाकडं जायच. तो इकडे तिकडे पाहून हळूव खिश्यातून कागदाचा तुकडा काढायचा व त्यातून पाहून पेपर सोडवायचा. त्याला कॉपी करायची कशी हिम्मत होत होती कां? विद्यार्थी जीवनात मी कधीच कॉपीचा विचार मनात आणला नव्हता.
माझ्या घरी कोठ्यात शाळा भरायची. माझी पुतनी संघमित्रा तेव्हा सहाव्या वर्गात शिकत होती. तिने मला सांगितले होते की शाळेतल्या लाकडी पेटीत मास्तराने प्रश्नपत्रिका ठेवलेल्या आहेत. परंतू त्या चोरुन पाहण्यास मी नकार दिला होता. असं काहीतरी खोटेपणा करण्यासाठी माझं मन कधीच धजत नव्हतं.
परिक्षेत माझे सारे पेपर चांगले गेले होते. त्यामुळे मी मॅट्रीकची परिक्षा नक्कीच पास होईन अशी मला दुर्दम्य आशा होती. परंतु मी कदाचीत थर्ड क्लास मध्ये पास होईन असे वाटत होते. म्हणून मी जेव्हा निकाल पाहण्यासाठी शाळेतल्या नोटीस बोर्डवर चिपकवलेली यादी पाहायला लागलो तेव्हा माझी उत्कंठा शिगेला पोहचली होती.
मी पहिल्यांदा थर्ड क्लासची यादी पाहिली. मला त्यात माझं नांव दिसलं नाही. तेव्हा माझ्या मनात धस्स झालं. नंतर मी सेकंड क्लासची यादी पाहायला लागलो. तेव्हाही माझं नांव त्यात दिसेना. मला वाटले आता मी नापास झालो. म्हणून मी खूप घाबरलो. माझी छाती धडधड करायला लागली.
तेवढ्यात एक मुलगा ओरडून मला म्हणाला, ‘अरे जुमळे… तुझं नांव या फर्स्ट क्लासच्या यादीत आहे.’ तेव्हा माझ्या मनावरचं सारं दडपन खाडकन उतरलं. मला खरच वाटेना… मी पुन:पुन: त्या फर्स्ट क्लासच्या यादीत नांव पाहून खात्री करुन घेत होतो. मग माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. जीवनात काहीतरी गवसल्याचा आनंद माझ्या चेहर्यावर उमटलं.
मला सर्व विषय मिळून सदुसष्ट पॉइंट चार टक्के मार्क्स् पडले होते. केमेस्ट्रीत अंशी टक्के म्हणजे डिस्टींक्शन होतं. तर गणीतात त्र्याहत्तर टक्के म्हणजे दोन मार्काने डिस्टींक्शन गेलं होतं. इतरही विषयात मला चांगले मार्क्स् पडले होते.
मी आनंद आणि उल्हासाच्या भरात टनान् उड्या मारत गोधनी गांवाला कधी पोहचलो ते कळलच नाही. गोधनीला त्यावेळी बाबाने जांबाच्या बगिच्या नंतर त्याच वाडीतील आमराई विकत घेतली होती. मी अज्याप, बाई, आई व बाबा तेथेच राहत होतो.
मी आल्याबरोबर आईला पास झाल्याचं सांगितलं. तिला खूप आनंद झाला. तिने झोपडीतून गुळाचा खडा आणून माझ्या तोंडात पटकन टाकला. त्याचबरोबर माझ्या गालाचा व कपाळाचा पटापट मुका घेतला.
खूप दिवसाने आईला भेटलो किंवा तिला माझं काही कौतुक करायचं असलं की ती अशीच माझ्या गालाचा व कपाळाचा मुका घेत असे. त्यावेळी आईने मला काहितरी खाऊ दिला की काय असंच वाटत राहायचे.
आई शिवाय अज्याप, बाई, बाबा सारेच माझ्या भोवताल जमा झालेत. त्यांना ही गोड बातमी कळायला वेळ लागला नाही. सारेच खूष झालेत. सर्वांनी माझं भरभरुन कौतूक केलं. मग मी सार्यांच्या कौतूकात नहात होतो.
शिक्षणातला एक मोठा महत्वाचा टप्पा मी पार केला होता. त्या आनंदाची अनुभूती शब्दात सांगणं कठीणच! डोळे डबडबून आले होते. आसवांनी डोळ्यात इतकी दाटी केली होती, की माझ्या पापण्यांना त्यांना थोपवणं अशक्य झालं होतं. अतीव आनंदाने माझे डोळे अखंड पाझरायला लागले होते. खरंच ते रोमांचक आणि आनंदायी क्षण माझ्या डोळ्यासमोर आले की आजही त्याच दिमाखात झळाळत राहतं.
असा तो मॅट्रिकचा निकाल मी माझ्या मनाच्या खोल गाभ्यात साठवून ठेवला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
टिप:- सदर कथा “अशा होत्या त्या काटेरी वाटा” या माझ्या आत्मकथनातील आहे. बाकीच्या कथा rkjumlechy
akatha.wordpress.com वर आहेत.
मॅट्रिकचा निकाल
Submitted by rkjumle on 16 August, 2011 - 05:09
गुलमोहर:
शेअर करा
चांगली लिहीलीये कथा..
चांगली लिहीलीये कथा..
छान , ओघवते आहे लिखाण
छान , ओघवते आहे लिखाण
खूप छान आणि भावस्पर्शी.
खूप छान आणि भावस्पर्शी. आवडलं.
फारच सुंदर लिखाण केलयत
फारच सुंदर लिखाण केलयत तुम्ही..
सुन्दर लेखन आहे. उपरा ची आठवण
सुन्दर लेखन आहे.
उपरा ची आठवण झाली.
सुंदर!!!!!!!
सुंदर!!!!!!!
सुंदर! माझ्या दहावीच्या
सुंदर!
माझ्या दहावीच्या निकालाची आठवण आली.
खूप आवडले.
खूप आवडले.
खुपच छान लिहिले आहेत. शिकताना
खुपच छान लिहिले आहेत.
शिकताना येणार्या इतक्या अडचणींची फारशी जाणिवही नव्हती.
जुमाळेजी, तुम्ही भोगलेले कष्ट
जुमाळेजी,
तुम्ही भोगलेले कष्ट वाचुन डोळे पाणावले. तुमच्या शिक्षण घेण्याची जिद्दीला सलाम. मी अभ्यासाला कंटाळायचो. तुम्ही तर ज्या वयात शिकायच त्या वयात जगण्याच्या धडपडीला सामोरे गेलात. तुमची जिद्द पाहिली आणि कळल आम्ही किती सुखात होतो.