न विसरणारा दिवस

Submitted by rkjumle on 22 August, 2011 - 00:51

आमच्या गांवातील खूप लोकं १४ एप्रिलला दरवर्षी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी यवतमाळ शहरात जात असत. तेथे पाटीपूरा या ठिकाणी मिरवणूक, भजन, कव्वाली, भाषणे इत्यादी भरगच्च कार्यक्रम रात्रभर चालत असे. तेथील रोषणाई पाहून आमचे डोळे अक्षरश: दिपून जायचे. त्या सोहळ्याचा झगमगाट व भारावलेलं वातावरण पाहून आमचं मन उचंबळून यायचं. लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असे.

आजुबाजुच्या खेड्यापाड्यातील लोक बैलबंडी, रेंग्या, दमण्या जुतून किंवा पायीपायी व्यक्तीश: किंवा सहकुटूंब त्या कार्यक्रमाला न चुकता हजर राहत असत. या कार्यक्रमाचे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जबरदस्त आकर्षण होते.

प्रसिद्ध कव्वालीकार ‘नागोराव पाटनकर’ यांच्या कव्वालीचा कार्यक्रम सर्वांनाच आवडत असे. गायनाच्या सुरुवातीला फिड्डलच्या वाद्यांमधून झंकारणारे धुंद सुर हृदयाला भिडून जात होते. बराच वेळपर्यंत असा हा संगिताचा साज एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात असे. तो कव्वाली खूपच छान म्हणायचा… पटाचाराची कहानी जेव्हा तो गाऊन सांगायचा तेव्हा लोकांना अक्षरश: रडू कोसळत असे. इतकं ते गाणं भावनाशील होतं.

माझा मोठा भाऊ शामरावदादा नागोराव पाटनकरांचा शिष्य व खूप चाहता होता. आमच्या गांवामध्ये भजन मंडळ होतं. मोठादादा, नामदेवदादा, रामधनदादा, किसनदादा, उध्दवकाका, लक्ष्मणमावसा असे बरोबरीच्या वयाचे काही लोकं त्या भजन मंडळात होते.
दादा छानपैकी पेटी वाजवायचा. तसेच कव्वाली व गाणे सुध्दा म्हणायचा. दादाचा आवाज पहाडी पण काळजाला पाझर फोडणारा होता.

त्याला गांवातील लोकं ‘मास्तर’ किंवा कोणी ‘पेटकर’ म्हणायचे. त्याच्याच नांवाने ते भजन मंडळ ओळखल्या जात होते. त्यांच्या भजनामध्ये नेहमीच नागोराव पाटनकरांची कव्वाली, शेरशायरी तसेच कवी राजानंद गडपायले यांनी रचलेल्या गितांचा भरपूर समावेश असायचा. दादा त्यांची कव्वाली व गिते छान गात असे.

‘थांबारे दलितांनो,
असा निष्टूर करुनिया बेत,
नका रे उचलू भिमाचे प्रेत!’ या त्याच्या गाण्याने लोकांच्या डोळ्याला अक्षरश: पाणी येत असे.
नामदेव व रामधन हे दोघे आळीपाळीने तबला वाजवीत होते. नामदेवदादा सुध्दा कव्वाली व गाणे म्हणत होता. कुणीतरी झांज वाजवत होते. बाकी लोकं टाळ व चिपळ्या वाजवीत. मुळ गायकाने एक पद म्हटले की तेच पद एकसाथ सर्वजन म्हणत असत.

त्यांचे भजन मंडळ आजुबाजूंच्या खेड्यापाड्यात खूप गाजले होते. इतरही गांवात त्यांच्या भजनाचे कार्यक्रम होत असत. त्यांच्या भजनात आंबेडकर चळवळीतील जागृती गितांचा, भीम गितांचा व बुध्द गिते भरपूर असायचे. त्यांच्या भजनाने मनाला चटका लाऊन जायचा. खेड्यातील लोकांना तेच एक मनोरंजनाचे व जागृतीचे साधन होते. बुध्द, भीमांचे विचार, त्यांचा मोठेपणा, त्यांचे कार्य व कर्तृत्व, त्यांचा आदर्श त्या गितांतून प्रकट होत असे. त्यांच्या खणखणीत आवाजातील भजनाचा सूर सर्वत्र निनादू लागत असे.

त्यावेळी लग्नकार्य रात्रीला लागत असे. लग्न लागल्यावर लोकांच्या जेवणाच्या पंगती उठल्या की लगेच भजनाची तयारी सुरु व्हायची. भजन ऎकण्यासाठी लोक लग्न मंडपात जमायचे. खेड्यात लग्नाला आलेल्या सर्व लोकांची झोपण्याची व्यवस्था करणे कठीन व्ह्यायची. अशावेळी लोक भजन ऎकण्यासाठी रात्रभर जागे राहायचे. मुलं-बाळं, म्हातारे-कोतारे तेथेच पाय दुमडून आडवे होत. कधीकधी एखाद्या लग्नात लॉउडस्पिकर असायचा. गावांतले काही लोकं मग घरुनच सकाळपर्यंत गाणे ऎकत राहायचे. त्यांच्या वाद्याच्या व आवाजाच्या स्वरांनी सारं आसमंत पुलकित होवून जात असे. अशावेळी त्यांच्या मनात आनंदाची पहाट उगवली नसेल तरच नवल !

मी सुध्दा त्यांच्या भजनाच्या गाण्यांनी भारावून जात होतो. त्यामुळे मला गिते रचण्याची प्रेरणा पण मिळायची. तसा मी एकांतात बसून प्रयत्न करुन पाहत होतो. एका वहीत ते लिहून काढले होते. परंतु ते जमले की नाही तेही कळत नव्हते. कारण ते कोणाला दाखविण्याची हिम्मत होत नव्हती. कदाचीत चुकले तर… म्हणून भिती वाटत होती. नंतर ती वही कुठे गेली काही कळले नाही.

मी सुध्दा दरवर्षी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या किवा लहान दादासोबत जात होतो. लहान दादा देवदास मरुन पांच-सहा वर्षे झाली असतील. जेव्हा तो होता तेव्हा तो हमखास मला घेऊन जायचा. चालता चालता थकलो की मला उचलून खांद्यावर घेऊन चालायचा. मी त्याच्या अंगावरचा होतो.
एकदा कोळंबी या गांवला बाबाने आंबराई विकत घेतली होती. तेथे आई, बाबा, देवदासदादा सोबत मी पण राहत होतो. हे गांव शहरापासून सहा-सात कोस व आमच्या चौधरा या गावांपासून तिनक… कोस दूर होते. आमच्या गावांपासून ते कोळंबी पर्यंत घनदाट जंगलच जंगल होते.

बाबांनी एकदा त्या जंगलातील एक गोष्ट सांगितली होती. कोळंबीवरुन मेलेल्या ढोराचे वाळलेले कातडे डोक्यावर घेऊन यवतमाळला विकण्यासाठी जात होते. ते एकटेच होते. त्यावेळी भर जंगलातून जात असतांना चार-पांच जंगली कुत्र्यांचे झुंड आडवे झाले. त्या जंगली कुत्र्यांना पाहून बाबाची घाबरगुंडी ऊडाली. पण त्यांनी प्रसंगावधान राखून एका मोठ्या दगडाच्या खडकावर ते डोक्यावरचे कातडे जोरात आदळले. त्याचा इतका मोठा आवाज झाला होता की ते कुत्रे घाबरुन दुर पळून गेले.
देवदासदादाने कच्चे आंबे बैलगाडीत भरून आणले होते. त्याच्या सोबत त्या गाडीने मी पण यवतमाळला आलो होतो. रात्रभर गाडी कार्यक्रमाच्या जवळपास ठेऊन आम्ही कार्यक्रम पाहत होतो. तेथे काही खाण्याच्या वस्तू विकायला होत्या. दादा मला भजे, गुलगुले, आलुबोंडा, जिलेबी अशासारखे काही पदार्थ खाऊ घालत होता. त्यामुळे माझी मजाच मजा झाली होती. दुसर्या दिवशी सकाळी आंबे पिकवीण्यासाठी माच टाकायला भाड्याने घेतलेल्या खोलीवर नेले होते.

मोठा दादा शामराव बहुदा त्याच्या बरोबरीच्या किवा भजन मंडळीच्या लोकांसोबत. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जात असे. मी त्यावेळेस माझ्या मित्रांसोबत किवा घरच्या लोकांसोबत जायचा. मी त्यावेळी नववी मध्ये शिकत होतो.

आंबेडकर जयंतीचा दिवस म्हणजे आमच्यासाठी मोठा खुषीचा दिवस असायचा.
त्यावर्षी दादाने जांब या गांवातील आंब्याचे झाडे विकत घेतले होते. माझ्या गांवापासून ते एक-दिड कोस दूर असेल. ते राखण्यासाठी मी सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत तेथे राहत होतो. वानरांनी, पाखरांनी आंब्याची नासाडी करु नये किंवा कोणी आंबे चोरु नयेत म्हणून मला प्रत्येक झाडाजवळ फिरफिर फिरुन लक्ष ठेवावे लागत होते. कडक उन्हाने अंगाची लाही-लाही व्हायची. डोकं गरम व्हायच तर पाय भाजून निघायचं. डोळ्याची आग व्हायची. गरम गरम थेंब थेंब लघवी यायची. सारखी उन्हाळी लागायची. घामाने पुर्ण अंग ओलंचिंब होवून जात असे. अंगातले कपडे भिजून जात असे.
कधी कधी अकाली पाऊस पडायचा तर कधी कधी त्यासोबत गारा पण पडायच्या. वाराधून व गराडा सुटायची. आंब्याच्या डांग्या तुटून पडायच्या. खूप नुकसान व्हायचं. खाली जमिनीवर कैर्याच्या सातरा पडायच्या. त्या वेचता वेचता कधी कधी रात्र व्हायची. त्याचा ढिग रचून दुसर्‍या दिवशी सकाळी शहरात बाजारात विकायला न्यायचे. त्यामुळे जीवाची मोठी तळमळ, तडफड व मन:स्ताप व्हायचा.

काही झाडे शेताच्या मधोमध होते. काही झाडे दोन शेताच्या धूर्याला लागून तर काही झाडे नाल्याजवळील धूर्याला लागून होते.

संध्याकाळी दादा रात्रीची जागल करण्यासाठी यायचा. रात्रभर तो तेथेच राहायचा. मी त्याला पाहिलं…! ‘भिती’ अशी कधी त्याला वाटतच नव्हती! ते आंब्याचे शेत तसे गांवापासून दूर होते. तरीही तो तेथे एकटाच जागल करायचा. कधीकधी तो शहरात गेला की तेथून परत येतांना त्याला रात्र व्हायची. तरीही तो अंधार्या रात्री एकटाच परत यायचा. अशा वेळी आई त्याला नेहमी म्हणायची, ‘मोठा हिंडगोडा आहे बाप्पा… अंधार न अंधार पडून जाते. तरी पत्ता राहत नाही. दिवसा-ढवळ्या अंधार पडायच्या आंत घरी येत जानं बाबा…’ असे म्हणून ती आपली काळजी व्यक्त करीत असे.
दादाने विहिरीजवळ एक मळा बांधला होता. त्यावर गवत टाकले होते. दादा रात्रीला तेथूनच पहारा करायचा.

आमच्या आंब्याच्या बाजुच्या शेतातील आंबे आमच्या गांवात राहणार्या दयाराम आबाजीने विकत घेतले होते.

लोकं त्याला दयाराम बुढ्ढा म्हणायचे. म्हातारा होता पण टनक होता. काठीच्या आधाराने झपाझप पावले टाकत चालायचा. कष्टातलं शरीर होतं त्याचं! तो वेळप्रसंग पाहून आबाजीच्या नात्याने कधीकधी माझी थट्टा पण करायचा.

तो एक आमच्या गांवातील उद्योगी व्यक्ती होता. जसे आंब्याच्या मोसमात तो आंब्याचा व्यापार करायचा, त्याचप्रकारे इतर मोसमात तो काही ना काही तरी विकत घ्यायचा व विकायचा. निंबु, सिताफळ, जांब सारखी फळे निघाले की त्या मोसमात तो ते फळे विकायला तो बाहेर पडायचा. परंतु त्याने कोणाकडे मोलमजूरी केल्याचे मी कधी पाहिले नाही.

त्याच्या घरी एकेकाळी दुकान पण होते. परंतु नंतर ते मोडले. गांवातील लोकांना बहुदा उधारीत सामान घेण्याची सवय लागली होती. मग ती उधारी वसुली करण्यास नाकी नऊ येत असे. काही बेईमान लोकं पैसे देत नसत त्यांच्याशी भांडण करणे शांत वृतीच्या लोकांना सहसा जमत नसे. अशा लोकांकडे उधारी पचून जायची. म्हणून कदाचीत त्यांनी दुकान बंद केले असावे.

आमच्याही पिकलेल्या आंब्याचे पैसे बरेच लोकांकडे राहिले होते. त्यातले बरेचसे पैसे पचले होते.
आंबे पाडाला आल्यानंतर कच्चे आंबे उतरवून घ्यावे लागत असे. आमच्या गांवातील सुरेभान आंबे उतरवीण्याचे काम सराईतपणे करायचा. तो आंब्याच्या झाडावर सहज चढायचा. खुडीने आंबे तोडायचा. तोडलेले आंबे टोपल्यात टाकून टोपले दोरीने खाली सोडायचा. आम्ही ते सर्व आंबे खाली काढून घेत होतो. त्यातील पाडाचे आंबे निवडून खात होतो. परत तो रिकामे टोपले दोरीने वर ओढून घायचा. त्याला त्याची मजुरी म्हणून त्याने तोडलेल्या आंब्याच्या प्रमाणात काही आंबे द्यावे लागत असे.
दादा मग घरीच माच टाकायचा. आंबे पिकले की गावांतील लोकं बहुदा उधारीतच घेऊन जायचे. काही आंबे गावात खपत असे. बाकी आंबे यवतमाळ च्या आठवडी बाजारात किंवा इतर दिवशी मजुरांच्या डोक्यावर टोपले घेऊन किंवा भाड्याच्या बैल बंडीने मंडईत हर्रासात विकण्यासाठी अडत्याकडे घेऊन जात असे.

दयाराम आबाजीचे व आमच्या आंबराईच्या मध्ये एक नाला होता. मी सकाळी चहा घेऊन आंबराईत येत असे. तो उशीरा यायचा. येतांना माझी भाकर घेऊन यायचा. तोपर्यंत त्याचे आंबे मला राखावे लागत होते.

घरुन अनवानी पायानेच रस्ता तुडवत चालत यावे लागत होते. खेड्यातील गरीब लोकांप्रमाणे माझ्या पायात सुध्दा त्यावेळी चप्पल नव्हती. कारण चप्पल ही काय अत्यावश्यक गरज आहे व त्यासाठी पैसा खर्च केलाच पाहिजे असे कोणालाच वाटत नसे. त्यांना अनवानी पायानेच उन्हा-तान्हात, पाण्या-पावसात नद्या-नाल्यात, माती-चिखलात, दगड-धोंड्यात, डोंगर-दर्यात, झाडा-झुडपात, गवता-काडीत व काट्या-कुट्यात चालण्याची सवय झालेली असे. चपला सहसा अशा खराब रस्त्याने टिकत नसत. काही लोकं मोटारीच्या रबरी टायरच्या वाहाणा वापरीत. ह्या वाहाणा लवकर झिजत नसत. इतर चपला पेक्षा त्या स्वस्तात मिळत. मला अशा वाहाणा घालायची फार लाज वाटायची. एखाद्या वेळेस अशी चप्पल घातली असेल कदाचीत! परंतु सहसा मी घालत नव्हतो. चामडी चपला तर लवकर झिजुन खराब व्हायच्या. त्या वजनाने जड जड, फटक फटक वाजणार्या होत्या…त्याच्या टाचेला घोड्याच्या पायाला ठोकतात तसे नाला लावीत असत. अशाही चपला मी घालत नव्हतो. खरं म्हणजे मी घालत नव्हतो असे म्हणण्यापेक्षा चप्पल विकत घेण्याची ऎपतच नव्हती असं म्हणता येईल. त्यापेक्षा अनवानी पायाने चालण्याचीच खूप सवय झाली होती.
उन्हाळ्याचे दिवसं असल्यामुळे सुर्य खूप तापत होता. आंगाची लाही लाही व्हायची. दोन्हिही कानाला उन्हाच्या गरम झांका लागायचा. उन्हाने डोळ्याची आग व्हायची. संपुर्ण आंग घामाने भिजून जायचे. आंगातील कपडे ओलेचिंब व्हायचे. कपड्यावर कुत्र्याने लघवी केल्यप्रमाणे घामाचे ओघळ पडायचे.

अनवानी पायानेच रणरणत्या उन्हात चालावे लागे. गाडीच्या चाकाने, गायी-ढोराच्या खुराने गुळगूळीत झालेल्या मातीवर पाय ठेवला की जणूकाही विस्तवाच्या जळत्या निखार्यावर पाय टाकला की काय असे वाटत असे. रस्त्यावरील बारीक-सारीक गोट्यावर पाय आणखीनच भाजून निघायचे. बाभळीचा किंवा चिल्हाटीचा काटा पायात रुतला की तिव्र कळा यायच्या. मग बाभळीचा दुसरा अनकुचिदार व मोठा काटा शोधून पायात रुतलेला काटा काढावा लागत असे. ‘काट्यानेच काटा काढावा’ अशी म्हण कदाचीत त्यामुळेच पडली असावी. काटा जास्तच खोलवर रुतलेला असेल तर मात्र तो काट्याने काढणे शक्य होत नसे. अशावेळी तो काटा दिवसभर तसाच पायात ठेवून संध्याकाळी घरी गेल्यावर सुईने खोरुन काढावे लागत असे. तरीही जर निघाला नाहीच तर रुतलेल्या काट्याच्या आजुबाजूची जागा खोरुन त्यात खायचे तेल टाकून ठेवावे लागे. दुसर्या दिवशी भोवतालची जागा जोराने पिळल्याने तो काटा वर येत असे. काही लहान-सहान काटे तर तसेच पायात मुरत असत. त्याच्या काळसर चोंदा पायाच्या तळव्याला दिसत असत.

एकदा मी वाल्ह्याच्या खारीतून पायवाटेने माझ्या वावरात जात होतो. त्यावेळी त्याच्या खारीत नुकतेच पर्हाटीचे कोंब बाहेर आले होते. त्यामुळे त्या कोंबाला कुणी पायाने तुडवून त्या वाटेने जाऊ नये म्हणून त्याने रस्त्यात बाभळीचे काटे रोवून ठेवले होते. मी नेहमीप्रमाणे उड्या मारत चाललो असतांना अचानक एक काटा माझ्या पायात घुसला. त्याने मला इतक्या तिव्र वेदना झाल्या की मी गपकन खाली बसलो. कसातरी मी लंगडत लंगडत वावरात न जाता घरी परत आलो. घरी येऊन तो काटा सुईने काढायला लागलो. पण तो काटा इतका खोलवर घुसला होता की निघता निघेना! खूप आग होत होती. आई घरी आल्यावर तिने काट्याच्या आजुबाजूची जागा खोरुन त्यात खायचे तेल टाकले.
दुसर्‍या दिवशी सकाळी भोवतालची जागा जोराने पिळल्यामुळे तो काटा बाहेर आला.
दुपार झाली की विहिरीजवळच्या आंब्याच्या झाडाखाली भाकर खात होतो. पाडाच्या आंब्याच्या रसासोबत भाकर खाण्यात काही औरच मजा यायची. घरुन एका कागदाच्या पुडीत मिरची, मिठ आणायची. कधीकधी एखाद्या खोबर्या सारख्या लागणार्या कच्च्या आंब्यासोबत तिखट, मिठ टाकून भाकर खात होतो.

कोळंबीच्या आंबराईच्या विहिरीत खूप झींगे असायचे. मी बालटी बालटीने पाणी काढून बालटीच्या तोंडाला फडके लाऊन डोहणात ओतत राहायचा. मग त्या फडक्यात झिंगे जमा व्हायचे. असा हा झिंग्यासोबतचा खेळ पुरेसे झिंगे जमा होई पर्यंत बराच वेळ पर्यंत चालत राहायचा. संध्याकाळी आई त्या झिंग्याची मस्तपैकी चमचमीत चटणी करायची. भगवान बुध्दांच्या शिकवणीतील ‘प्राणीमात्राची हिंसा करु नये’ हे तत्व त्यावेळेस खरं तर उमगलंच नव्हतं.

दुपारी जेवल्यावर सुस्ती घालविण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या सावलीत मातीवर टॉवेल टाकून व उश्यामध्ये दगड किंवा मातीचा ढेकूळ घेऊन आराम करायचो. मातीचे बारीक खडे पाठीला सारखे रुतत असायचे. आंग टाकलं की थोड्या वेळाने तेथील सावली जाऊन पुन्हा तोंडावर ऊन यायची. त्यामुळे सारखी जागा बदलवत राहावे लागत असे. कसंतरी उठ-बस करत थोडाफार आराम करता येत होता. कधीकधी शेत नांगरले किंवा वखरले तर त्या मातीच्या ढेकळात खाली आंग टाकायची पंचाईत व्हायची. अशा वेळेस ते ढेकळे फोडुन बारीक करावे लागत होते. नंतरच आंग टाकता येत होते. मळा होता पण दुपारची त्यावर उन येत असल्यामुळे त्याचा काही उपयोग होत नव्हता.

मी त्यावेळी नेहमी गळ्यामध्ये एक स्वस्तातला टॉवेल वापरत होतो. हा टॉवेल डोक्याला बांधायला, कानं झाकायला, हातपाय पुसायला व झोपतांना खाली टाकायला उपयोगात यायचा. त्यामुळे खेड्यातील बहुतेक लोकं टॉवेल किवा शेला गळ्याभोवती गुंडाळून घेत असत. शेतीवर काम करणारे लोकं गायी-ढोरांना पाणी पाजायला दुपारी आणि संध्याकाळी विहिरीवर येत असत. कधीकधी शेत नांगरून-वखरून झाले असेल तर लाकडी नांगर किवा वखर काडवनावर टाकून त्यांचे बैलं ओढत ओढत घरी घेऊन जात असत. ते विहिरी जवळूनच पायवाटेने घरी जात असत. त्यामुळे त्यांचेवर पुर्णपणे लक्ष ठेवावे लागत होते.
कधीकधी वानरांचा कळप यायचा. एकदा ते झाडावर चढले की त्यांना खाली उतरवीने फार कठिण होत असे. आंब्याची खूप नासाडी व्हायची. या झाडावरुन हाकलले की दुसर्‍या झाडावर जायचे. हातामध्ये गुल्लेर राहायची. त्या गुल्लेरांने नेम धरुन दगड मारावा लागत असे. गुल्लेर पाहिली की वानरं घाबरुन जायचे. झाडाच्या वर शेंड्यावर जाऊन बसायचे. तेव्हा त्यांना दगड मारणे कठिन होऊन जायचे. कधीकधी नेमके घरी जातांना अश्या वानरांच्या झुंडी यायच्या. तेव्हा अंधार पडेपर्यंत त्यांना हुसकाऊन लावणे अत्यंत गरजेचे होत असे. तसे ते रात्रभर झाडांवर चिडीचुप होऊन बसत. परंतु दुसर्‍या दिवशी सकाळी मात्र काय धिंगाणा घालून आंब्याची नासाडी करतील ते काही सांगता येत नव्हते!

एकदा गोधणीला बाबाने आंबराई घेतली होती. आम्ही सर्व आई, बाबा, बाई व अज्याप आंबराईत बांधलेल्या एका झोपडीत राहत होतो. तेथे एका वानराला गुल्लेरचा दगड लागला होता. तो मुर्च्छित होऊन खाली पडला होता. त्याला आम्ही पाणी पाजले. पण तो वाचला नाही. गुल्लेरच्या दगडाने पाखरं, मीठ्ठू तर बरेच मेलेत. पाडाला आलेल्या आंब्याला चोचीने टोच्या मारुन खायचे. पुर्ण तर कधी खातच नव्हते. अर्धवट खायचे. फोडला की तो सोडून दुसरा खायचे. कधी असा आंबा गळून खाली पडायचा. मग तो अर्धवट खाल्लेला आंबा आम्ही खायचो. पाखरांनी खाल्लेला आंबा गोड लागतो, अशी आई सांगत असे. म्हणून असा आंबा फेकून न देता चवीने आम्ही खात होतो.

त्या दिवशी आंबेडकर जयंती आली होती. सर्व लोकं लगबगीने सकाळपासून जयंतीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तयारी करीत होते. त्या दिवशी लोकं स्वच्छ कपडे धुवून कार्यक्रमाला जात असत. मी सुध्दा जाण्याच्या कल्पनेने सुखाऊन गेलो होतो.

मी शहरातल्या शाळेत शिकत असल्यामूळे मला शाळेतील वर्गमित्र एखाद्या वेळेस भेटू शकतात. म्हणून कपडे स्वच्छ असले पाहिजे, असे मला मनोमन वाटत होते. मला संध्याकाळी मित्रांसोबत जायचे असल्यामुळे मी आंबराईत येण्यापुर्वी कपडे धुण्यासाठी सोबत दुकानातून दगडी साबण विकत आणला होता. तो इतर साबणापेक्षा स्वस्त होता.

माझ्याकडे त्यावेळी अंगात घातलेला फक्त एकच ड्रेस म्हणजे पैजामा व शर्ट होता. दोन्हिही कपडे पांढर्‍या रंगाचे होते. पैजामा पायाजवळ उभा चिरलेला होता. काट्याकुट्यातून जातांना, किंवा झाडा-झुडपाच्या खूपटाला लागून तो फाटला असावा. तो एखाद्या देशाच्या नकाशाप्रमाणे चित्रविचीत्ररित्या फाटल्यामुळे त्याला शिवता पण येत नव्हते. त्यामुळे त्याच्या फाटलेल्या चिंध्या एकमेकाला धरुन बांधल्या होत्या. कधिकधी रागाने मीच तो जिर्ण झालेला कपडा फाडून टाकायचा. कारण कपडे फाटल्याशिवाय आम्हा भावंडांना मोठा दादा किवा बाबा नविन कपडे घेऊन द्यायचा नाही, असा तो प्रघात होता. सणावाराला म्हणजे पोळा किवा दिवाळीला किवा शाळा सुरु झाली की नविन कपडे मिळायचे. तोपर्यंत जुन्याच कपड्याने भागवावे लागत होते.

एखाद्या वेळेस बाबा चिंधी बाजारात घेऊन जायचेत. श्रीमंत लोकं काही दिवस वापरुन किवा थोडा कुठे फाटला असेल, डाग पडला असेल किंवा मयत झाला असेल तेव्हा ते कपडे बोहारणीला विकत असत. मग ते कपडे रविवारच्या आठवडी बाजारात विकायला यायचेत. त्या बाजाराला ‘चिंधी बाजार’ म्हणत असत. गरीब लोकं बिनदिक्कतपणे ते वापरलेले कपडे विकत घ्यायचे. त्यावेळेस ते कोणीतरी वापरलेले आहेत याचे काही सोयरसुतक वाटत नव्हते. कपडे म्हणजे कपडे ! ते जुने वापरलेले असो की नविन ! त्यातच आम्ही खुषीने हुरळून जायचो… एक एक कपडा घालून पाहत असे. तो जर लहान मोठा झाला की तो काढून दुसरा घालून पाहत असे. अशारितीने कपडे घालण्यात व काढण्याच्या प्रक्रियेत मोठी मजा वाटायची. जेव्हा नविन कपडे शिवण्यासाठी टेलर माप घेत असे, तेव्हा तो क्षण अत्यंत आनंददायक वाटत असे. गालातल्या गालात बर्‍याच वेळपर्यंत आनंदाच्या उकळ्या फुटत राहायच्या.

दुपारी व संध्याकाळी लोकं गुरा ढोरांना पाणी पाजण्यासाठी तेथे आणीत असत. तेथे एखाद्या होडीप्रमाणे कोरलेल्या लाकडी हौदात विहिरीतील पाणी फुटक्या बालटीने काढुन त्यात ओतायचे. त्या हौदाला डोहण असे म्हणत असत. पाणी काढता काढता एक-अर्धे पाणी त्या विहिरीतच सांडायचे. ऊरलेले पाणी तो डोहणात ओतायचा. पाणी ओतल्याबरोबर गुरे ढोरे ते पाणी गटागटा पिऊन संपवून टाकायचे. बालटी कॊणी नेऊ नये म्हणून मुद्दाम विहिरीवर फुटकी बालटी ठेवीत असावेत.
वानरे पण तेथे पाणी प्यायला याचचेत. पाणी पिण्यासाठी एक एक वानर विहिरीत उतरायचे. त्याचवेळेस इतर वानरे पाहारा देत राहायचे. त्यांचे ते पाणी पिण्याचे दृष्य मी बराच वेळ न्याहाळत राहायचो. वानराचे ते उष्टे व गढूळ पाणी पिण्यास त्यावेळी काहीच वावगे वाटत नव्हते.

मी सुध्दा फूटक्या बालटीने पाणी काढून ती तोंडाला लाऊन पित हो्तो. त्या पाण्यात कधीकधी कचरा किंवा वळवळ करणारे कसले तरी जंतु दिसायचे. मग बालटीच्या तोंडाला खांद्यावरचा मळकट झालेला टॉवेल लाऊन पाणी गाळून पित होतो.

दुपारचा सूर्य थोडा कलल्यानंतर मी बालटीने पाणी काढून कपड्याला ओले केले. दगडी साबणाने विहिरीजवळील एका दगडावर कपडे घासायला लागलो. एकतर त्याला फ़ेस येत नव्हता. दगडीच साबण तो…! काही केल्या उगाळत नव्हता… कपड्यावर आंब्याच्या रसाचे पिवळसर व तेलकट डाग ठिकठिकाणी पडले होते. शिवाय त्या कपड्यावर घामाचे ओघळ पडलेले होते. त्यामुळे कितीही घासले तरी ते डाग काही केल्या निघत नव्हते. अशी दुरावस्था पाहून माझ्या डोळ्यामधुन पाणी यायला वेळ लागला नाही. डोळ्यातून टपाटप आसू गळायला लागले. सारखा रडत होतो व कपडे खसाखसा घासत होतो. परंतु कपड्याचा मळ, डाग जसा होता तसाच राहत होता. तो काही केल्या निघतच नव्हता.
संध्याकाळ होत आली. आता मी जाऊ शकत नाही याची तिव्रतेने जाणीव होत आली. मी मुळूमुळू रडत होतो व टॉवेलने गालावर ओघळणारे आसू सारखे पुसत होतो. शेवटी कपडे थोडे सोकल्यावर अंगावर घालून घेतले.

दयाराम आबाजी झाकट पडल्यावर माझ्याजवळ आला. आम्ही रोज दोघेही त्यावेळेस घरी जाण्यास निघत होतो.

तो मला म्हणाला, ‘कारे आज तू आंबेडकर बाबाच्या जयंतीला गेला नाहीस?’

मी मान हलवूनच, ‘नाही’ म्हटले.

पुढे तो काहीच बोलला नाही. कदाचीत त्याने माझी केविलवाणी अवस्था ओळखली असावी. दारिद्र्यात पिचलेल्या लोकांना एकमेकांच्या भावनांची जाणीव असते तेच खरं! मुक्या मुक्यानेच ते एकमेकांचे दु:ख पचवून घेतात!

असा तो दिवस आठवला की माझे डोळे आताही पाणावल्याशिवाय राहत नाही. माझ्या जीवनातील तो कधिही न विसरणारा असा तो भीम जयंतीचा दिवस होता!

गुलमोहर: 

वेगळंच आणि खुप छान लिखाण आहे. अजुन वाचायला आवडेल. खुपसे शब्द कळले नाहीत, पण वाक्यातल्या संदर्भातुन समजुन घेण्याचा प्रयत्न केला. इतकं मनापासुन लिहिलं आहे, त्यामुळे भिडलं ते माझ्याही मनाला.

खूप सुंदर वर्णनशैली. ललित प्रकारामध्ये हवं होतं.
र्‍या हा शब्द shift + r + y + a + a असा लिहितात.

अजून ललित वाचायला आवडेल.

dreamgirl
आपल्या सुचनेप्रमाणे मी दुरुस्त्या केल्या आहेत. सदर कथा “अशा होत्या त्या काटेरी वाटा” या माझ्या आत्मकथनातील असून बाकीच्या कथा rkjumlechyakatha.wordpress.com वर आहेत.
आपल्या उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद...

संकेतस्थळाला नक्कीच भेट देइन. वर्णनशैली थोडी जेष्ठ ललितलेखक शंकर सखाराम यांच्यासारखी वाटली. गावातील वर्णन वाचायला नेहमीच छान वाटतं, साध्या सहज ओघवत्या शैलीमध्ये असेल तर त्यातील अस्सलपण जास्त भावतं. लिहीत राहा. शुभेच्छा!

छान लिहीताय..लिहीत रहा असेच.. अनुभव खूपच स्पष्ट आणि खणखणीत मांडताय. आत्ताही फार खटकतंय असं नाही पण थोडं एडिटिंग कराल हळूहळू तर अजून छान होईल.