रसग्रहण स्पर्धा: स्मरणसाखळी- ले. वसंत बळवंत आगाशे

Submitted by NDA on 30 August, 2011 - 14:26

images.jpgस्मरणसाखळी
लेखक: वसंत बळवंत आगाशे
प्रकाशक: भारद्वाज प्रकाशन, कोथरुड, पुणे
प्रथमावृत्ती: १ मे २०११
मूल्य: रू. २००/-

विविध क्षेत्रातील व्यक्तींनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून अनेक विषयांवर वेळोवेळी केलेलं सदरलेखन पुस्तकरुपाने प्रसिद्ध झालं आहे आणि अशी पुस्तकं रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत. या मालिकेत शोभेल असं 'स्मरणसाखळी' हे पुस्तक पुण्याच्या ‘भारद्वाज प्रकाशन’ने प्रकाशित केलं आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षं आघाडीवर राहून कार्यरत असलेलं मिरज शहरातील एक व्यक्तीमत्व म्हणजे कै. वसंत बळवंत आगाशे. मिरजेतील मिरज हायस्कूल व ज्युबिली कन्याशाळा येथे ३१ वर्षं शिक्षकी व्यवसाय केलेल्या वसंत आगाशेंना १९८० साली महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग वाचनमाले’च्या पुनर्संपादनात वसंत आगाशे यांचा मोलाचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मराठी भाषा समितीचे वसंत आगाशे सहा वर्षं सदस्य होते. इयत्ता ९वी च्या मराठी (द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तकाच्या संपादनात त्यांचा प्रमुख सहभागही होता. या शैक्षणिक कार्याबरोबरच मिरज येथील ‘मिरज विद्यार्थी संघा’च्या ८५ वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या आयोजनात एक कार्यकर्ता, कार्यवाह, अध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून वसंत आगाशेंचा सुमारे ६४वर्षं सक्रीय सहभाग होता. अशा भूमिका पार पाडत असताना, वसंत आगाशे यांचा अनेक नामवंत व्यक्तींशी संबंध आला. या यादीत राजकारणी, साहित्यिक, कलावंत अशा अनेकांचा समावेश आहे. ह्या सगळ्यांच्या आठवणी तसेच स्वतः अनुभवलेल्या-अभ्यासलेल्या अनेक घटनांनी युक्त अशी एक लेखमाला वसंत आगाशे यांनी २००६ साली दै. लोकमतच्या सांगली आवृत्तीसाठी लिहिली होती. दर सोमवारी ‘गुडमॉर्निंग’ या सदरात प्रसिद्ध होणार्‍या या लेखमालेतील ३५ निवडक लेख एकत्र संपादित करून ‘स्मरणसाखळी’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला भेटतात साहित्यसम्राट न. चिं. केळकर, नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर, श्री. म. माटे, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके आणि पु. ल. देशपांडे हे साहित्यिक. यातील बहुतेकांशी लेखकाचा व्यक्तिगत परिचय होता त्यामुळे ह्या व्यक्तिंविषयी यापूर्वी अनेक वेळा वाचलेलं असेल (किंवा नसेल) तरिही नवीन माहिती मिळते.

आचार्य अत्र्यांबरोबर लेखकाने अनेक वर्षं काम केलं असल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक विस्ताराने माहिती या पुस्तकात आहे. अत्र्यांबरोबर त्यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यात वास्तव्यास असताना तिथे झालेली गाडगेबाबांची भेट असो किंवा काही वर्षांनंतर त्याच बंगल्यात अत्यंत उत्स्फूर्तपणे आचार्यांनी केलेली आपली शेवटची कविता असो, या दोन्ही आठवणी तितक्याच हृद्य आहेत. प्रबोधनकार ठाकर्‍यांशी वैचारिक मतभेद होण्यापूर्वी असलेली अत्र्यांची मैत्री एका लेखात दिसतेच पण अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतानासुद्धा लेखन करणारे, पुस्तक उघडल्यावर एका झटक्यात दोन पानं diagonally वाचणारे अष्टपैलू अत्रे रेखाटणारे लेख, आचार्य अत्र्यांचं आपल्याला माहित असलेलं व्यक्तिमत्व अधिकच उत्तुंग करतात. अत्रे आणि ना. सी. फडके यांच्या भाषणांची व वक्तृत्वांच्या शैलींची तुलना करणार्‍या एका अभ्यासपूर्ण लेखाचाही पुस्तकात अंतर्भाव आहे.

पुस्तकाची शोभा खर्‍या अर्थाने वाढते ती बालगंधर्वांवरील लेखांमुळे. बालगंधर्व हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक दैवत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बालगंधर्व’ चित्रपटाने मराठी रंगभूमीच्या गंधर्वयुगाबद्दल पुन्हा एकदा अनेकांच्या मनात कुतूहल उत्पन्न केलं. या पार्श्वभूमीवर हे लेख बालगंधर्वांचं चरित्र संक्षिप्त रुपात आपल्यासमोर उलगडतात. बालगंधर्वांनी रंगभूमीवरच्या कारकिर्दीची सुरुवात मिरजेतील तेव्हाच्या सरकारी थिएटरपासून केली. त्यांच्या ह्या पदार्पणाचं वर्णन करणारा व त्यामागचा इतिहास थोडक्यात सांगणारा लेख पुस्तकात आहे. बालगंधर्वांवरील इतर लेखांमधून गंधर्व नाटक मंडळींचे दौरे, बालगंधर्वांचा अभिनय व संगीत, त्यांचं औदार्य, मंदिरात होणारी त्यांची भजनं याबद्दल सुरस कथा वाचायला मिळतात. त्या काळातील नाटकांची हँडबिलं, तिकिटाचे दर, तिकिटांवर असलेल्या सूचना इत्यादिंची वर्णनं करणारा एक मजेशीर लेखही ह्या पुस्तकात आहे शिवाय आचार्य अत्र्यांच्या प्रयत्नातून लेखकाला प्रत्यक्ष बालगंधर्वांशी चर्चा करून त्यांचं चरित्र लिहिण्याची संधी मिळता मिळता कशी हुकली याची कथाही एका लेखात वर्णन केली आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या ऐतिहासिक कागदपत्र तपासण्याच्या ध्यासाच्या गमतीशीर आठवणीही आपल्याला एका लेखात वाचायला मिळतात तर एका लेखातून मराठीतले ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर यांची स्वतः तयार केलेला ज्ञानकोश, स्वतःच दारोदारी जाऊन विकण्याची चिकाटी अधोरेखित होते. या आणि अशा इतर अनेक व्यक्तिचित्रांबरोबरच पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे हेदखिल आपल्याला ह्या पुस्तकात आठवणींच्या स्वरूपात भेटतात.

’स्मरणसाखळी’मध्ये व्यक्तीचित्रांबरोबरच इतरही काही माहितीपूर्ण व प्रासंगिक लेख आपल्याला वाचायला मिळतात. देवनागरीमधील मुद्रणकलेचा प्रारंभ मिरजेत कसा झाला यामागचा मनोरंजक इतिहास, १९०६-०७च्या सुमारास मिरजच्या सरकारी थिएटरात एका नाटकाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक व राजर्षी शाहू महाराज यांची झालेली भेट, भारताच्या फाळणीच्या समर्थनार्थ चक्रवर्ती राजगोपालाचारींची मिरजेत झालेली प्रक्षोभक सभा, पुण्यात सर परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानात झालेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्यूंजय सोहळा आणि याप्रसंगी झालेली एस.एम. जोशी, सेनापती बापट इत्यादींची भाषणे आणि नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांच्या पत्नीने १९१८ साली मिरजेत अस्पृश्यता निवारण कार्यासाठी केलेला हळदीकुंकू समारंभ यांची वर्णनं असलेले वैविध्यपूर्ण लेखही पुस्तकात समाविष्ट केले आहेत.

ह्या लेखांमध्ये उल्लेख केलेले अनेक प्रसंग किंवा आठवणी लेखकाच्या वेगवेगळ्या वयातील असल्यामुळे मिरज शहराला लाभलेला अनेक वर्षांचा संपन्न सांस्कृतिक वारसा त्यातून अधोरेखित होतो. या पुस्तकात ज्या व्यक्तिंची शब्दचित्रं आलेली आहेत त्या सर्व व्यक्ती महाराष्ट्राची पराकोटीची आदरस्थानं आहेत. पण पुस्तकातील लेख केवळ त्या व्यक्तिंबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल तांत्रिक माहिती देत नाहीत तर त्या व्यक्तिंचे अज्ञात पैलू आणि संवेदनाशील अंतरंग आपल्यासमोर उलगडून दाखवतात. तसेच ह्या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने येणाऱ्या घटनांचे, सभांचे किंवा कार्यक्रमांचे उल्लेख त्या त्या वेळच्या केवळ मिरजेच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि क्वचित देशाच्याही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर प्रकाश टाकतात. त्यामुळे ज्यांनी ह्या व्यक्ती पाहिल्या आहेत अथवा हा काळ प्रत्यक्ष अनुभवला आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी हे अनुभवलं नाही अशा दोघांसाठीही ह्या पुस्तकाचं वाचन हा केवळ माहिती मिळवणं यापलिकडे जाऊन अत्यंत आनंददायी अनुभव ठरतो.

वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करताना शब्दमर्यादा, कालमर्यादा यासारखी अनेक बंधनं असतात. ही बंधनं पाळूनसुद्धा लेखकाने आपले अनुभव अतिशय सुस्पष्टपणे व आखीव स्वरूपात मांडले आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे पुस्तकातील लेख हे वृत्तपत्रातील सदरासाठी लिहिलेले असले तरी त्याची भाषा मात्र वृत्तनिवेदनासरखी यांत्रिक नाही तर ललितरम्य आणि प्रभावी आहे. वृत्तपत्रातील सदरांचं संकलन असलेलं पुस्तक वाचताना अनेकदा काळाचे संदर्भ हरवल्याने पुस्तक कंटाळवाणं होण्याचा संभव असतो. परंतु ‘स्मरणसाखळी’मधील लेख वृत्तपत्रीय सदराचा भाग असूनही केवळ प्रासंगिक हेतूने लिहिले गेले नसल्यामुळे कुठेच रटाळपणा किंवा एकसुरीपणा जाणवत नाही. उलट प्रत्येक लेखागणिक उलगडत जाणारी विविधता अधिकाधिक प्रासादिक होत जाते. त्यामुळे पुस्तक वाचून झाल्यावर, सदरलेखनाच्या मर्यादेत हे लेखन झालं नसतं तर वाचक अधिक समृद्ध झाला असता या भावनेने हुरहूर लागून राहते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

NDA,
रसग्रहण उत्तम लिहिलं आहे आपण. आपल्याला आवडलेल्या अजून काही पुस्तकांबद्दल वाचायला नक्की आवडेल.

अरे हे वाचलेच नव्हते. वाचायलाच पाहिजे.
वसंतराव आगाश्यांनी मी पाहिले ते तसे थकलेलेच होते. ते अतिशय मृदू होते - तरुणपणी पण तसेच होते की नाही माहिती नाही - पण म्हातारे असताना तरी एकदम सौम्य असत. कितीतरी वेळा ते राहायचे त्या वाड्यात गेलो असेन - माझ्या घरापासून ५ मिनिटे चालत अंतरावर. त्यामुळे आमच्या विटी-दांडू, क्रिकेट, सायकल हाणणे परिघात त्यांचे घर यायचे. मिरजेतील 'खरे मंदिर वाचनालय' (मिरज विद्यार्थी संघ) हे खरे वसंतरावांचे प्रांगण आणि वसंत व्याख्यानमाला हे त्यांचे अपत्य. मला कित्येक वर्षं म्हणजे पुण्यात गेल्यावर तिथेही वसंत व्याख्यानमाला होते हे माहिती होईपर्यंत मिरजेतील वसंत व्याख्यानमालेचे नाव वसंतराव आगाश्यांवरूनच पडलेले आहे असे वाटे. त्यांच्याशी पुस्तके/लेखकांबद्दल मात्र तेव्हा कधी बोललो नाही याचे वैषम्य फार वाटते. जवळून बघितलेला मराठी साहित्याशी संबंध असलेला ते एकमेव ओळखीचे गृहस्थ होते (तद् नंतर चिन्मय दामल्यांशी ओळख झाली तेव्हा ते दुसरे).