प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - जित

Submitted by जित on 10 September, 2011 - 01:08

ह्या राजश्री वाल्यांच्या लग्नात बरे नवरदेवाला सगळे बसल्याजागी मिळते, जाऊदे सत्य कटू असते हेच खरे. माफ करा हे राजश्रीचे चित्रपट बघून पाल्हाळ लावायची सवयच लागलीय. तर काय सांगत होतो मी, हां माझा आत्तापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रवास.

"अरे नुसता काय बसला आहेस देवाला नमस्कार कर". "गाढवा उघड्या डोक्याने नाही, टोपी घाल". "जरा पाणी दे रे". "बघ रे खालतून कोण हाक मारतय". "आटप लवकर आता, उशीर होतोय". "बहीण कुठाय तुझी ?"
एक ना दोन, जो येतो, तो मलाच प्रश्न करून जातो. अहो आजचा दीवसतरी मला शांत बसू द्या, माझच लग्न आहे हो आज (मी आपला पु.ल.नी म्हटल्याप्रमाणे, मराठी बाणा, फक्त मनात). खर सांगू का म्हणतात ना की पुण्यातल्या दुकानांमधे सगळ्यात दूर्लक्षीलेली वस्तू म्हणजे गिर्‍हाईक, त्याच चालीवर म्हणता येईल की लग्नामधे वराच्या घरात सगळ्यात दूर्लक्षीलेली वस्तू म्हणजे नवरदेव. मला लवकर आटप म्हणणार्‍या या सार्‍या माझ्या माम्या, मावश्या, काक्या स्वतः मात्र तयारी कारायला अर्धा अर्धा तास घेत होत्या ... प्रत्येकी. वर कारण काय तर म्हणे तिथे जाऊन आम्हालाच सारी काम करायची आहेत, तूला काय नुसत बसायच आहे, नंतर काय आम्हाला तयारी करायला वेळ नाही मिळणार.

शेवटी झाल्या एकदाच्या सार्‍या तयार्‍या आणि बाहेर पडणार तितक्यात एका दूरच्या मावशीने "थांबा" म्हणून बाँब टाकला. आता काय तर म्हणे काहीतरी विधी राहीला जो अर्थातच ती सोडून इतर कोणालाच माहीत नव्हता. मग परत त्या विषयावर चर्चा. मला तर वाटत होत की तो सन्नी ओरडतोना तारीख पे तारीख तस "विधी वर विधी, बस तेवढच करा, लग्न नको" तस ओरडाव, पण लक्ष कोण देत हो. शेवटी त्या विधीने पुढचा अर्धा तास खाल्ला. तोपर्यंत घड्याळाने ४.१५ ही वेळ दाखवायला सुरूवात केली होती पण मला मात्र १२ वाजलेले दीसायला लागलेले. अहो ५.१० चा मुहूर्त आणि अजून आम्ही घरातच. न जाणो भटजीबुवा मुहुर्त गेला म्हणायचे आणि मग बसा परत एक वर्ष वाट बघत. अहो त्याच काय आहे की, मी रहातो अमेरिकेमधे पोटापाण्यासाठी. आठवड्याभराने माझ अमेरिकेच परतीच विमान आणि परत सुट्टी मिळायला मग एक वर्ष तर लागणार ना. तर असा सगळा घोळ आहे. पण ते राहूद्या. पुन्हा मी त्या चंद्रकांता मालिकेसारखा भरकटत चाललोय. राजश्री इफेक्ट दुसर काय.

आता एकदाचे गाडीत बसलो तर गाडी पटकन चालू होईना. १० मिनिट तिच्या मिनतवार्‍या केल्यावर ती सुरू झाली. आधी आवारातल्या पार्कींगच्या ट्रॅफिकमधून तिला बाहेर काढून, त्यानंतर रस्त्यावरच्या ट्रॅफिकमधून आणि खड्ड्यांतून (अहो मुंबईतल प्रवासवर्णन लिहायच आणि खड्डयांचा ऊल्लेख नाही अस कस होईल) लग्नाच्या हॉलवर पोचेपर्यंत ४.४५ वाजून गेलेले. मग गाडीसमोर वरातीच नाचण (अहो दुसर्‍यांच्या लग्नात नाचायला लोकांना कसला ऊत्साह, जस काही आयुष्यात परत कधी नाचायलाच मिळणार नाही, आणि नाचाचे प्रकार तरी किती, अगदी शाहरुखच्या छैया छैय्या पासून ते नाना पाटेकरच्या तिरंगामधल्या नाचापर्यंत) ईत्यादी प्रकार झाल्यावर शेवटी ५ ला एकदाचा मंडपामधे पोचलो, तेव्हा कळल की वधूपक्ष कधीचेच येऊन वाट बघताहेत.

तितक्यात कोणितरी मोठ्याने रडायला लागल आणि मी दचकून इथे तिथे बघतोय कोण तर कोणीच दिसेना. मग लक्षात आल की लग्नाच्या संगीताची सीडी चालू केली होती आणि स्पिकर्सची सगळी अ‍ॅड्जस्टमेंट होईपर्यंत त्या आवाजाने वेगळेच रूप धारण केले होते. शेवटी बर्‍याच वेगवेगळ्या सप्तकांतून जाऊन एकदाच ते लग्नसंगीत त्याच्या मूळ पदावर आल आणि सगळ्यांचे कान शांत झाले.

नंतर समोर बघतो तर अनेक न ओळखणारे लोक ऊभे. कोणी प्रेमाने, कोणी कौतुकाने॓, कोणी अगदी लहानपणापासून ओळखतोय याला अशा चेहर्‍याने, कोणी आता आमच्या मुलीच कस होणार अशा भावाने तर कोणी बिचारा! याच कस होणार अशा चेहर्‍याने आपले माझ्याकडे बघताहेत. मी मात्र एक त्यातले माझे सासरे सोडल्यास कोणालाही ओळखत नसल्याने जमतील तितके दात दाखवून हसायचा प्रयत्न करत होतो, काय माहिती कोणते जवळचे नातेवाईक आणि कोणते लांबचे. मग परत पायवरून पाणी घालणे, कपाळभर टिळा लावणे, पूजा वगैरे सोपस्कार झाल्यावर एकदाची माझी सुटका झाली.

आत गेलो तर भटजीबुवा तयारीतच बसले होते, त्यांनी एकदा माझ्याकडे, माझ्या कपड्यांकडे बघीतल आणि माझ्या जीन्स टिशर्ट कडे बघून आजकालची मुल अगदीच वाया गेली आहेत असा चेहरा केला. मी लगेचच कपडे बदलून आलो असे सांगून तिथून पळ काढला, न सांगो मला त्याच कपड्यांत बसवायचे लग्नाला. जाता जाता ते अगम्य भाषेत काहीतरी बोलले, नंतर कळल की ते सांगत होते ५ मिनिट राहिली आहेत मुहुर्ताला. मला तर त्यांच सगळच बोलण मंत्रोच्चारांसारख वाटत होत. हे सगळे भटजी लोक काय बोलतात मला आजपर्यंत कधीच नीट कळल नाही, फक्त मधले मधले शब्द ऐकू येतात. मला वाटत पूर्ण शब्द कळले तर पूजा सांगायचे लायसन्स मिळत नसेल.

शेवटी एकदाचा मी कपडे बदलायच्या खोलीजवळ पोचलो, तर तिथे हे भले मोठे कुलूप. मग त्या मंडपवाल्याला बोलवून ते उघडून घेईपर्यंत अजून पाच मिनिट गेली. तितक्यात माझा एक मावसभाऊ ओरडत आला की भटजीबुवा बोलवताहेत. मी तसाच जायला निघालो परत तर म्हणतो अरे लग्नासाठी बोलवताहेत कपडे तर बदल. अस्सा राग आला होता ना त्याचा, हा कधीही एका झटक्यात पूर्ण निरोप देत नाही, आपल्यालाच प्रश्ण विचारून सगळा निरोप काढून घ्यावा लागतो ह्याच्याकडन.

मग लगेच तयारी करून पळालो ते थेट भटजीबुवांच्या समोर जाऊनच थांबलो. "आलात का? या", आपण पैसे मागायला आलेल्या मित्राकडे ज्या नजरेने पाहतो तशा काहीश्या नजरेने बघत ते म्हणाले. तिथे कळले नवरी अजून तयार होतेय, अरे मग मला कशाला घाई करायला लावलीत? काय करणार नवरदेव पडलो ना (आज कळतय आयुष्यभर अशीच वाट बघायला लागणार ह्याची ती नांदी होती). १० मिनीट वाट पाहिल्यानंतर एकद्याच्या बाईसाहेब आल्या आणि भटजीबुवांनी विधी चालू केले. त्यांनी होम पेटवायला सुरूवात केलीच होती की तो माझा मगासचाच मावसभाऊ केकाटला, "अहो भटजी इथे नाही, हा एसी हॉल आहे, धूर झाला तर स्प्रिंकलर्स चालू होतील". हा तर माझ्या लग्नावरच ऊठला होता, अरे होम पेटवायचा नाही तर सप्तपदी कशी होणार? शेवटी त्या हॉलच्या मालकाला फोन लावला तेव्हा कळले की हॉलच्या बाहेर थोडी मोकळी जागा आहे तिथे होम पेटवू शकता. मग काय निघाली आमची वरात बाहेर. मुहूर्त आधीच टळलेला असल्याने भटजीबुवांची घाई चालूच होती. त्यांनी सगळ्यांना सांगू पण नाही दीले. शेळ्या हाकतात तसे आम्हाला हाकत घेऊन गेले बाहेर. त्यामुळे ज्या काही चतूर लोकांचे लक्ष होते ते आले पाठोपाठ आणि बाकी सगळे हॉलमधे आतच. अशा रितीने आलेल्या पाहुण्यांच्या अर्ध्या अनुपस्थितीतच सप्तपदी, कान पिरगळणे (इथे माझ्या बायकोच्या भावाने असा काही कान पिळला .. जाऊ दे) वगैरे विधी आटपून आम्ही पुन्हा आत.

नशिबाने ह्या पुढचे सारे विधी कुठलीही विघ्न न येता नीटपणे आणि वेळेत पार पडले आणि माझा तो प्रवास संपून दुसरा प्रवास चालू झाला, त्याचे प्रवासवर्णन पुन्हा केव्हातरी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.