शेवटचं वळण- बॉस

Submitted by चौकट राजा on 8 September, 2011 - 14:49

अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.

"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्‍या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...

इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काजलमॅडम नाव मोबाईलवर दिसताच तो जवळ जवळ उडालाच.

"आता कशाला केला या बयेने फोन??" पुटपुटतच त्याने कॉल घेतला.

"अभिजीत." हॅलो वगैरे बोलायची पद्धती आता संपुष्टातच आलेली आहे. "कितना सीन हुआ?"

"काजल, आत्ता एक शिफ्ट संपलीये. पाचवा सीन चालू आहे. अजून दोन सीन होतील"

"रब्बिश, अजून चार सीन घ्यायला सांग त्या आझमीला. आणि लवकरच एक नविन कॅरेक्टर घालायचं सीरीयलमधे. त्याची बॅकग्राऊंड तयार करायला सांग आजच्या एपिसोडमधे" काजलने फोन कट केला.

अभिजीत हातातला फोन जवळ जवळ फेकूनच देणार होता. साला.. काय आयुष्य आहे आपलं... गेली पंधरा वर्षं या लाईनमधे स्ट्रगलच स्ट्रगल केला आणि आता कुठे जरा चांगली पोझिशन मिळत होती तर ही बया आणून बसवली आपल्या डोक्यावर. बँकग्ग्राऊंड कोण बनवणार? रायटर की डिरेक्टर? आणि कोण कॅरेक्टर? बुवा आहे का बाई ते तरी सांगायचे कष्ट घ्यायचे होते. इतक्यात स्पॉटने चहाचा कप आणून दिला.

"साब, आता काय करायचं?" आझमी त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.

"नेक्स्ट सीन. काजलमॅडमचा फोन होता, पुढचे पण सीन घेऊन टाक."

आझमीने त्याच्याकडे दयाद्र नजरेने पाह्यलं. एखाद्या लहान बाळाला गणित समजावल्यासारखा बघत तो म्हणाला.
"आता सगुणाच्या लग्नाचा सीन घेतला. पुढचा सीन रायटरने सगुणाच्या एक्स बॉयफ्रेंड जेलमधून पळून जातो असा घेतलाय. सेट डीझायनरवाल्याने बंगल्याचाच सेट अजून चार दिवस कायम ठेवायचा ठरवलाय. आता मी काय करू?"

अभिजीत हसला. काय करू म्हणून मलाच काय विचारतोस?

"सगुणाच्या बिदाईचा सीन घेऊन टाक."

"पण रायटरने तो सीन अजून दिला नाहिये"
अभिजीत मूग गिळल्यासारखा चहा प्यायला. अरे साल्या बिदाईच्या सीनला रायटर लागत नाय रे. बादलीभर ग्लिसरीन लागतं... सांग कधी कळणार तुला...

सांग कधी कळणार तुला.. अभिजीतच्या मनामधे गाण्याची धून आपोआप वाजायला लागली.

भाव माझ्या मनातला... आज तरी ती येइल का सेटवर.. हा एकच प्रश्न सतत त्याच्या मनामधे नाचत राहिला. खरंतर जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्या मनामधे तिच्यासाठी पुष्कळ गाणी वाजून गेली होती. अगदी त्याच्या मनाचा एफेम रेडिओ झाला होता. सावरी..सावरी... सावरी...जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासूनच...

सावरी. आसावरी चित्तरंजन. त्याच्या प्रोड्युसरची मुलगी. अभिजीत भानावर आला. हे प्रकरण आपल्या हातामधले नाही हे त्याला कधीच समजलेले होते. पण काय करणार दिल है के मानता नही... टणॅव, टणॅव...

खरंतर सावरीबद्दल अभिजीतच्या मनात हा विचार यायला आणि सेटवर एक पॉश इंपोर्टेड गाडी येऊन थांबायला एकच वेळ झाला. त्याचबरोबर एक सुगंधाची लकेर सर्व आसमानात पसरली. आणि सावरी गाडीतून खाली उतरली.

अभिजीतचे हृदय जागच्याजागी टणाटणा उड्या मारू लागले. सावरी मेकप रूममधे जाईस्तोवर अभिजीत नजरेने तिचा पाठलाग करत होता.

"आता ही बघणार आहे ही सीरीयल." आझमी म्हणाला. अभिजीतला भानावर यायला अजून पाच क्षण गेलेल. "म्हणजे तो जाड्या येणार नाही रोज?"

"नाही, तो वेगळी सीरीयल बनवतोय, मारूती जमादार डिरेक्टर घेतलाय." आझमी म्हणाला. मारूती जमादारने या आधी ओळीने चार पिक्चर सुपरडुपर फ्लॉप दिलेत.

तितक्यात मेकपरूमाम्धून अभिजीतला बोलावणे आले. सावरी तिथेच असेल या उद्देशाने त्याला भरपूर उत्साह आला आणि तो नाचत नाचत मेकपरूममधे गेला.

"अहो, ऐकलं का?" सावरीच्या या वाक्याने अभिजीत सुपरमॅनसारखा उडाला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं. सावरीला कॉन्व्हेंट मराठी येत आणि आपलं नाव तिच्या लक्षात नसल्याने तिला आपल्याला अशी आदरार्थी हाक मारलेली आहे. "मेनका कायतरी म्हणतेय. तुम्ही पण म्हणा तिच्यासोबत"

मेनका मॅडम ( हे अर्थातच तिचे खरे नाव नव्हते.) हातातल्या कागदावरचे डायलॉग वाचत होत्या. अभिजीत हताशपणे खाली बसला आणि मेनका सोडून इतराचे डायलॉग वाचायला लागला.

सावरी तोपर्यंत सेटवर निघून गेली. तिथे आझमी सेट डिझायनरला काहीतरी समजावत होता. "हाय.." सावरी त्याला म्हणाली.

"हॅलो मॅडम"

"व्हॉट्स दिस? आझमी, मी तुला कितीवेळा सांगले की मला मॅडम सांगू नका. सावरी सांग ना.." लाडात ती म्हणाली.

"माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती वेळा सांगली आपलं चुकलं बोलली तरी..." आझमी हसला.

"आझमी, मी तुला एक विचारू?"

"विचार ना!"

"तू माझ्यासोबत आज येशील? डिनरला?"

आझमी जागच्याजागी धसकला. सावरी आपल्याला डिनरला बोलावते??? तेही इतकं गोड गोड बोलत.. आयला ही पण सीरीयल हातातून गेली का काय?? नक्की विचार काय आहे काय हिचा?

अभिजीत तेच तेच डायलॉग वाचून वैतागला. मेनका मात्र अजून प्रॅक्टिस करू म्हणत होतीच. इतक्यात स्पॉट धावर मेकपरूममधे आला. काजल मॅडम आयेली है, असे सांगून गेला.

मेनका मॅडम अचानक उठून उभी राहिली. आरश्यामधे स्वतःचा मेकप नीट आहे की नाही ते बघितले. आणि अभिजीतला म्हणाली. "अभिजीत, आता तू सेटवर जा. आझमीला सांग मी तासाभरात सीनसाठी येते."

"तासाभरात? पण सेट तयार आहे. तुम्ही पण रेडी आहात. मग हा सीन पटकन घेऊन टाकू. "

मेनका मॅडम एकदम लाजून हसली. "काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, ते झाले की सीन घेऊ ना.. तू जा ना तवर सेटवर"

अभिजीत चिडून उठला. काजलला दिवसाभरात चार चार सीन शूट करायची घाई आणि ही म्हणे तासाभराने येणार. मेनकाचे काम असून असून काय असणार? चॅनलवाले परत एखादा डान्सचा प्रोग्राम करत असतील त्यामधे हिचे नाव आतातरी येऊ दे म्हणून काजलच्या हातापाया पडायच्या असतील, दुसरे असून असून काय असणार?.

तो उठून बाहेर येऊन बसला. त्याने खिशामधले पत्र पुन्हा काढून वाचले.

सीरीयलसाठी लिहिणार्‍या तीन चार लोकांकडून त्याने हे पत्र लिहून घेतले होते. सावरीला देण्यासाठी. पत्राची सुरूवातच मुळात "ओ मोरी प्यारी सावरिया" अशी सुंदर होती. आज सावरीला हे पत्र द्यायचेच. आपल्या मनातल्या भावना तिलाच सांगायच्या असे त्याने मनोमन ठरवले होते. हातातले पत्र त्याने पुन्हा खिशात ठेवले आणि तो सावरी जिथे बसली होती तिथे निघाला....

तितक्यात काजल कारमधून खाली उतरली. तिच्या हातामधे एक भला मोठा खोका होता.

**************************************************

"अभिजीत, हे आपल्याकडे आलेले काही नवीन अ‍ॅक्टर्सचे पोर्टफोलियो आहेत. त्यातून दोन चार सिलेक्ट कर नवीन कॅरेक्टरसाठी. आणि मला संध्याकाळपर्यंत पाठवून दे." असं म्हणून ती सेट वर जाणार तेवढ्यात तिला मेनका मॅडमनी मेकपरूममधे यायची खूण केली आणि ती तिकडे गेली.

अभिजीतचा तिळपापड झाला. "च्यायला, घरचं झालं थोडं आणि व्याह्यानी धाडलं घोडं. आता काय काय करायचं मी एकट्यानी?" असं स्वतःशीच पुटपुटत तो खोका उचलू लागला तेवढ्यात आवाज आला, "हे न्यू अ‍ॅक्टर्सचे अ‍ॅप्लिकेशन्स आहेत ना?"

अभिजीत वैतागून म्हणाला, "हो! आता त्यांचं विविध कलादर्शन बघायचा प्रोग्राम आहे. या तुम्ही पण या.." आणि दुसर्‍याच क्षणी त्याला प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीचा बोध झाला. कसं कुणास ठाऊक पण सावरी आत्ताचं काजलचं बोलणं ऐकून चक्क अभिजीतकडे आली होती. ती पुढे काहीतरी म्हणाली पण अभिजीत कुठेतरी हरवून गेला होता. त्याला आजूबाजूचं काही कळत नव्हत, अचानक त्याच्या ह्रुदयाची धडधड दुप्पट झाली होती, एका मंद सुगंधानी तो मोहरून गेला होता, तिच्या डोळ्यांशिवाय त्याला काही दिसतच नव्हतं, त्याच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या, त्याचे शब्द घशातच अडकले होते.

"सांगा ना, घ्याल का तुम्ही?" सावरी विचारत होती, "अं, हो हो..." अभिजीत काहीतरी बोलून गेला. सावरीला प्रचंड आनंद झाला. "किती स्वीट आहात तुम्ही" असं म्हणून तिनी अभिजीतच्या हातावर हात ठेवला. त्यामुळे परत एकदा अभिजीतच्या ह्रुदयाची धडधड दुप्पट, कानाच्या पाळ्या गरम वगैरे वगैरे झालं.

"मग कधी बघताय?" तिनी विचारलं.

"अं, काय?..काय बघू?" अभिजीत जरा भानावर येत होता.

"माझी अ‍ॅक्टिंग. माझीपण ऑडिशन घेणार ना तुम्ही?" सावरी अजूनच लाडात येऊन म्हणाली.

"अं, हो. घेतो ना. थोड्या वेळानी घेतो."

"ओके. मी आलेच" असं म्हणून सावरी मेकअपरूमकडे गेली. आभिजीतनी आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या नशीबाला धन्यवाद दिले. "काय संधी मिळाली आहे राव! ह्या निमित्तानी आता सावरीबरोबर स्पेशल वेळ घालवायला मिळणार आणि तिच्यासमोर खूप भाव पण खायला मिळणार. आणि तेव्हाच चांगली संधी साधून तिला ते पत्र देऊन टाकतो. किंवा स्वतःच सांगतो ना. क्या बात हे.." गालातल्या गालात हसत अभिजीत मागे वळाला तर समोरच आझमी पण तसाच हसत उभा!

"काय साब, एकदम खूष आज?" आझमीनी विचारलं.

"काही नाही असच" अभिजीतला काय बोलावं सुचेना.

आझमीनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि डोळे मिचकावत म्हणाला,"इस प्यार के चक्कर मे संभलना मेरे दोस्त, कही हातसे सबकुछ ना चला जाये."

आणि मग अभिजीतला साक्षात्कार झाला कि तो काय करून बसलाय! प्रोड्यूसरच्या मुलीला त्यानी ऑडीशनचं प्रॉमीस दिलं होतं! "हिला एकतर मराठी येत नाही. अ‍ॅक्टिंगची तर बोंबच आहे. आणि तसं हिला म्हणालो तर ती चिडणार, बापाला सांगणार आणि तिचा बाप आपल्याला हाकलून देणार आणि जर तिला चांगलं म्हणालो तर नंतर काजल मला कच्चा खाणार. म्हणजे ईकडे आड आणि तिकडे विहिर! तरीच हा आझमी तिला घास घालत नव्हता. आणि साला आता मला हसतोय. ए आझमी, आता काय करू रे?" अभिजीत काकुळतीला आला.

आझमीनी नुसते खांदे उडवले. अभिजीत कपाळाला हात लावून बसला.

"ए आझमी, तू तिला डिनरला घेऊन जा ना. काहीतरी सांगून पटव तिला. म्हणाव हे अ‍ॅक्टिंग वगैरे कशाला करतेस? प्रोड्यूसर रहा कि"

"तूम्हीच सांगा ना ते साब. मी छोटा माणूस, आमचं कसं ऐकणार ती?"

"आयला ह्या आझमीच्या.. " अभिजीत वैतागला. "तिला खरं काय ते सांगून टाकतो. तशीही आता नोकरी गेल्यातच जमा आहे. खरं सांगितलं तर कदाचित ती समजून घेईल आणि नोकरी वाचेल. पण मग माझं प्रेम? नको नको तसं नको. प्रेमाचं आधी सांगतो आणि मग आक्टिंगचं. पण मग ती चिडली तर? त्यापेक्षा काहीच सांगत नाही. पण मग काजलला काय सांगु?" काय करावं त्याला काही सुचेना.

"अभिजीत... "

काजलची हाक ऐकून तो ताड्कन उठला. काजल त्याच्या शेजारी येऊन उभी होती. तिच्या चेहेर्‍यावर राग होता.

"वॉक विथ मी टू द कार." अभिजीत तिच्या मागे मागे निघाला.

"तू आसावरीची ऑडीशन घेणार आहेस?"

"अं, हो. म्हणजे तीच आली माझ्याकडे. मी स्वतःहून सांगीतलं नाही तिला. पण मग तिनी विचारल्यावर काय करणार ना.. ती शेवटी चित्तरंजन साहेबांची मुलगी आहे ना, तिला कसं..."

"मी ते सगळं विचारलं?"

अभिजीत मान खाली घालून म्हणाला,"नाही".

काजल गाडीपाशी पोहोचली. दार उघडून बसायच्या ऐवजी मागे वळाली.

"अभिजीत, वुई आर प्रोफेशनल्स. अ‍ॅन्ड आय एक्स्पेक्ट प्रोफेशनलिसम फ्रॉम यू. इन एव्ह्री सेन्स."

"सॉरी काजल."

काजलचा चेहेरा बदलला. "इट्स ओके. अश्या गोष्टी होतात आणि त्यातूनच शिकायचं असतं. डोंट वरी. आय हॅव गॉट युवर बॅक."

"म्हणजे?" अभिजीत गोंधळला.

काजल हसली, "मी बोलले तिच्याशी. सिरियल मधे येणारं नवीन कॅरेक्टर मेल आहे फिमेल नाही असं सांगितलय तिला. आत्ता तिची ऑडीशन घे आणि नंतर काही रोल आला तर बघू असं सांग."

अभिजीतचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. "थँक यू सो मच काजल."

"डोंट मेंशन ईट. अभिजीत, तू सेटवर खूप कष्ट करतोस. तुझं डेडिकेशन मला आवडतं. आणि पुढच्या एखाद्या सिरियल मधे तुला प्रोमोट करायचा विचार पण आहे माझा. आय नो, आय अ‍ॅम हार्ड ऑन यू समटाईमस. पण मलासुद्धा बॉस आहे आणि मलापण त्याच्या ऑर्डर्स सांभाळाव्या लागतात. आफ्टरऑल वुई आर प्रोफेशनल्स, राईट?"

"राईट."

"बाय द वे, मेनका ईज गेटिंग मॅरिड. नंतर काही दिवस सुट्टीवर जायचं म्हणतीये. ती गायब होण्याआधी तिच्या सीन्सचं शूटींग संपेल असं बघ. ओके?"

"ओके."

अभिजीत काजलच्या वळून जाणार्‍या गाडीकडे बघत दोन मिनिटं उभा राहिला. आज पहिल्यांदाच त्याला त्याची बॉस 'समजली' होती.

*****************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users