स्वेटर विणताना शेजारी जोरात आवाज करत खेळण्यातील गाडी चालवत असलेल्या आपल्या नातवाला म्हणजे अमेयला आजींनी आवाज कमी करण्याचा सल्ला दिला आणि नेहमीप्रमाणेच तो न ऐकता अमेय उलट अधिक आवाज करू लागला. समोरच्या फोटोतील पतीच्या चेहर्याकडे सहज नजर गेली आणि आजींचा श्वास रोखला गेला. मनातील विचारांना व्यक्ततेचे अमूर्त स्वरूप मिळाले तसे विचार सैरावैरा डोळ्यातून वाहू लागले.
'तुम्ही म्हणायचात तसे नसते हो काहीच! माणसाची किंमत त्याच्या चालत असलेल्या हातापायांना आणि तो कमावत असलेल्या पैशांना मिळत असते. माणसाला ती स्वतःला मिळालेली वाटत असते हो. आवश्यकतेपासून अडगळ हा प्रवास अर्ध्यात थांबवून आणि मला एकटीला टाकून गेलात ते योग्यच केलेत. अडगळ नसते होता आले तुम्हाला. सहन नसते झाले. मलाही होत नाही आहे. पण माझे हातपाय चालत आहेत. मधुरा यायच्या आधी कुकर झालेला असतो. अमेयला जेवायला वाढायला आजी आहे. दोन्ही मोलकरणी व्यवस्थित सगळे काम करत आहेत वा नाही हे पाहायला सुपरव्हायजर आहे. एखादी आली नाही तर तिचे काम पटकन आवरून टाकायला सबस्टिट्यूट म्हणूनही आहेच मी. कुरियरवाले येतात, मोबाईल टेलिफोनवाले येऊन बिलाचे पैसे घेऊन जातात, सगळे बघायला मी आहे. इतकेच काय, रात्रीचा स्वयंपाक जवळपास मीच करते. ती फक्त आमटी किंवा कोशिंबीर करते. अजून पोळ्या सहज करते हो मी तुम्हाला आवडायच्या तशा. सकाळचा स्वयंपाक करायला आणि डबे भरायला बाई आहेच. वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करताना थोडेसे हात दुखतात. पण तेवढे केलेच पाहिजे. सासूबाई होत्या तेव्हा मी सून होते आणि स्वतः सासू झाल्यावरही सूनच आहे. पण तुम्ही सुटलात. अडगळ झाला नाहीत.'
"आज्जी भूक लागली......."
आजींनी अमेयला वाढले आणि त्याच्यापाशी बसून त्याच्याशी काहीबाही बोलत बसल्या. फार हट्टी वगैरे नव्हता शिवाय आजीची घरातील किंमत समजण्याइतका मोठा नव्हता. चार वर्षांचा होता. आता नवीन बाळ येणार म्हणून अनेक प्रश्न विचारायचा. तेवढीच मजा आजींना.
दुपारी तो झोपतो म्हणून पेटी वाजवायची नाही, संध्याकाळी सगळ्यांना कटकट होते म्हणून वाजवायची नाही, सकाळी सगळे घाईत असतात तेव्हा वाजवायची नाही. पेटी वाजवायची वेळ ठराविकच. संध्याकाळी पाच ते सहामध्ये वाजवा हवी तर.
भजनाच्या बायका यायच्या पूर्वी घरी. त्याचीही परवानगी घ्यायची. मुलाला आणि सुनेला अनौपचारिकपणे का होईना सांगायचे की आज भजनाच्या बायका येणार आहेत. मधुरा नाक मुरडायची किंवा अबोल राहायची. सारंग म्हणायचा, ""आई, काहीही करत असतेस तू, आता त्या सगळ्यांसाठी उगाच चहापाणी आणि खायला काहीतरी करत बसतील. तुला एकदा तरी बोलावतात का कुणी त्यांच्या घरी? आणि मग आम्हाला काही काम पडू नये म्हणून सगळी आवराआवरी स्वतः करत बसशील आणि रात्री दमून जाशील. काहीतरी आपलं करत बसायचं. आणि मी काय म्हणतो, तुमचं ते भजन काय इतकं दर्जेदार तरी आहे का की कुठे त्याचे कार्यक्रम वगैरे करता येतील. नुसता स्वतःचा छंद आहे तो. मग इतके कष्ट कशाला घेत बसायचे त्याचे?"
सारंग ऑफिसला निघायच्या घाईत इतकी वाक्ये बोलायचा. अमेय त्याच्याबरोबर शाळेत जायचा आणि रिक्षेने घरी यायचा. सारंगच्या पाठोपाठ 'येते' असे सांगण्याची तसदीही न घेता मधुरा ऑफिसला निघून जायची. आपण खिडकीत उभे राहायचे आणि हात करतीय का ते बघायचे. आठवड्यात कधीतरी एकदा हात करायची वर पाहून. तेवढेच प्रेम.
मग भजनाच्या बायकांना संध्याकाळची आठवण करायला फोन करायचा म्हटले की मधुराची कुजबूज आठवायची. 'काय फोनची बिलं येत आहेत हल्ली' असे मध्येच म्हणायची. मग स्वतःच बाहेर निघून एकेकीला घरी जाऊन आठवण करून द्यायची आणि येताना रवा किंवा काहीतरी घेऊन यायचे. मग कधी एकदा सगळ्या येतायत आणि भजन सुरू होतय आणि मग गप्पा मारत शिरा किंवा उपमा आणि चहा होतो याची प्रतीक्षा करत बसायचं......
अडगळीची वाढीव अडगळ म्हणजे भजन आपलं.
"मी नाही दही खाणार."
अमेयला दही आवडत नाही म्हणून ती वाटी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवत आजींनी टेबल आवरले. अमेय आता खेळत खेळत पेंगायला लागला. पुन्हा फोटोकडे पाहत आजी मनातच विचार केल्याप्रमाणे फोटोशी संवाद साधू लागल्या.
' तुम्ही गेल्यानंतरही दीड वर्षे भजन चाललं आपल्या घरी. नंतर मग कुणालाच आवडत नाही आणि सारखे काही ना काही बोलतात म्हणून शेवटी मीच बंद केलं. आता संध्याकाळी थोडीशी पेटी वाजवते आणि सगळ्या बायका खाली सोसायटीत एका ठिकाणी बसतात तिथे जाऊन बसते. साडेसहाला मधुरा येते त्या आधी घरात परत यायचं असतं. बाकी काही नाही. कधी एकदा पाच वाजतात याची वाट पाहत असते.
हे तिघे सारखे जेवायला बाहेर जातात. काही वेळा मग काही करावेच लागत नाही. सकाळचेच पुरते मला. सगळ्या बायका विचारतात की भजन बंद का केलेत. मी सांगते की आमच्या शेजारपाजार्यांना थोडा त्रास झाला असे वाटले म्हणून बंद केले. मध्ये एकदा ज्येष्ठ नागरिक संघात पेटी वाजवली होती. पण तिथेही बाकी वेळा नुसती भाषणेच चाललेली असतात त्यामुळे जावेसे वाटत नाही.
तुम्ही होतात तेव्हाची गोष्ट वेगळी होती हो. आपण सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जायचो. भजन असले तर तुम्ही भजनाच्या काही ओळी म्हणून आम्हाला साथ द्यायचात. तुम्ही असलात की सारंग आणि मधुराही जरा दबून असायचे. हसत खेळत दिवस जायचे. आपण भाजी आणायचो, मी तुम्हाला आवडणारे पदार्थ करायचे. मलाही तेव्हा त्यात आनंद मिळायचा. इतकेच काय, कधी दमले असले तर तुम्ही चक्क पायही चेपायचात. कपाळावर थोपटायचात. परवा सारंगला म्हणाले कणकण वाटतीय तर म्हणाला उगाच फिरत जाऊ नकोस संध्याकाळची, चांगले नोकर चाकर ठेवलेत नीट आराम कर. विचारायलाही आला नाही रात्री की आता कसं वाटतंय.
.... खरं सांगू का? मला नाही राहायचे येथे. वृद्धाश्रमात जायचे आहे. तेथे मला एक ओळख आहे. मी सहज त्या जोहरेबाईंबरोबर तीन दिवस राहिले होते ना? तेव्हा पाहिले मी. किती प्रेम करतात सगळे एकमेकांवर. खूप गप्पा मारतात, खेळतात जमेल तसे. तिथे कार्यक्रमही खूप असतात. मी पेटी वाजवते समजल्यावर तर तीनही दिवस मला पेटीचा कार्यक्रमच करायला लावला त्यांनी. ऐका ना. जाऊ का हो खरंच वृद्धाश्रमात? काही नाही हो, फक्त अमेयची थोडीशी अडचण होईल. त्याला ठेवतील पाळणाघरात वगैरे.
खरं सांगू का? दुसरी अडचण वेगळीच आहे. या दोघांना बेअब्रू झाल्यासारखी वाटते त्यात म्हणे. पण मला सांगा, माझी रोजच निराशा होते, रोजच सन्मानापासून मी वंचित राहते यावर उपाय काय आहे? तुम्हाला माहीत आहे? तुम्ही गेल्यावर ह्यांना नवीन फ्लॅटसाठी म्हणून तुम्ही माझ्या नावाने ठेवलेल्या साडे तीन लाखांपैकी एक लाख दिले मी. त्या दिवशी मलाही जेवायला बाहेर घेऊन गेले. तेथे मी चुकून डोसा खाईन म्हणाले तर हसले. म्हणे येथे असले काही मिळत नाही. मग त्यांनीच काहीतरी मागवले आणि ते मी खाल्ले.
त्यानंतर नेहमीचेच सगळे सुरू झाले. अजून फ्लॅटसाठी दोन लाख हवे आहेत. मी सरळ सांगितले की मी आता पैसे देणार नाही. मला सांगा, यावर म्हातार्या आणि एकट्या असलेल्या आईशी भांडावे का? शेवटी मी आणखीन पन्नास हजार दिले. मला वृद्धाश्रमातील सगळे जण म्हणत आहेत की आमच्यासाठी तरी येथे राहायला या. सोसायटीतल्या सगळ्या बायका म्हणत आहेत की आमच्याकडे भजन करा. पण रोज पेटी कोण उचलून नेणार आणणार? तुम्ही एक दोनदा नेली होतीत पेटी कोणाकोणाकडे. पेटी दुरुस्त करून घ्यायला हवी आहे. पण ते कोण करणार आता? कुणाला सांगू शकते मी हक्काने? एक दोनदा म्हणाले तर सारंग म्हणतो की हवीय कशाला पेटी? आता तर भजनही बंद झाले आहे. वृद्धाश्रमात फक्त महिना दोन हजार रुपये दिले की सगळं बघतात म्हणे. म्हणजे दवाखान्याचा वगैरे खर्च नाही करत ते लोक. पण निदान राहणे, जेवण खाण वगैरे तरी होतेच. दोन लाख भागिले दोन हजार म्हणजे शंभर महिने झाले नाही का हो? म्हणजे अजून निदान आठ वर्षे तरी झालीच की? जाऊ का? सांगा ना?....'
घराची बेल वाजली. कुरियरवाला कसलेतरी पाकीट देऊन गेला. सारंगच्या कामाचे असणार म्हणून आजींनी ते तसेच टिपॉयवर ठेवले. पुन्हा स्वेटर विणत बसल्या. जन्माला येणार असलेल्या बाळासाठी. हा कसला भडक कलर म्हणून त्या लोकरीवर सारंगने टीका केली होती. पण असूदेत म्हणून आजी तो स्वेटर विणतच राहिल्या होत्या.
'तुम्हाला मी एक सांगू? तुम्ही खरे तर खूप दुष्ट आहात दुष्ट. एकटेच गेलात पुढे. मी तुमच्यासाठी माझे माहेर सोडून आले होते आणि जाताना मला नेले नाहीत. आता माझे स्वतःचे, एकटीचे, हक्काचे असे कोणीच नाही. आणि माझे हे वय आता सत्तरी ओलांडून पुढे गेले आहे केव्हाच. अंग थकलं आहे. करवत नाही काहीच. पण करत राहावं लागतं. नाहीतर पूर्णपणे अडगळ होईन मी. तुम्ही माझ्यासाठी काही तरतूदही केली नाहीत ना? एक पैसे सोडले तर? मी आता चहा करत आहे. घेणार का अर्धा कप? मला नेहमी दुपारचा चहा तुम्हीच करून द्यायचात.'
आजी उठल्या आणि स्वेटर टिपॉयवर ठेवताना त्यांचे लक्ष सहज पुन्हा त्या पाकिटाकडे गेले. नाव वाचून त्यांना नवलच वाटले. 'श्रीमती जयश्री खांडेकर.'
घाईघाईने पाकीट उघडले.
कोणत्यातरी कंपनीचे पॉश पत्र होते ते. कैलासवासी चंद्रकांत खांडेकर यांनी आमच्याकडे केलेल्या शेअर गुंतवणुकीच्या नॉमिनी आपण असल्याने हा सहा लाख शहात्तर हजार रुपयांचा धनादेश आपल्या नावाने पाठवण्यात येत आहे. आपणही हे पैसे आमच्याकडे गुंतवल्यास आम्ही आपले ऋणी राहू.
आयुष्याची दिशा या वयात एका झटक्यात बदलली होती. तेवढ्यात बेल वाजली. चवथा महिना असलेली मधुरा लवकर घरी आलेली होती. तिने पाकीट आणि सासूचा चेहरा पाहून विचारले.
"कसलं पत्रं आहे?"
"ह्यांनी शेअर घेतले होते. चेक आला आहे. पावणे सात लाखांचा चेक आहे. माझ्या नावाने."
हुरळून अभिनंदन करून सारंगला ती बातमी देण्यासाठी मोबाईल हातात धरलेल्या पाठमोर्या मधुराकडे पाहताना आजींच्या मनात वेगळेच विचार चाललेले होते. सारंग घेत असलेला नवीन फ्लॅट आठ लाखांचा होता. सध्याच्या घराची किंमत होती दहा लाख. वृद्धाश्रमात अस्तित्वाला सन्मान होता. मुलांची प्रगती हेच कर्तव्य ही भावना प्रबळ होती. ज्येष्ठ नागरिक संघाला देणगी दिली तर तेथे महत्त्वाचे पद मिळून उरलेल्या आयुष्याला आकार येणार होता. पैसे पुन्हा त्याच कंपनीत गुंतवले तर व्याज मिळत राहणार होते.
एवढे पर्याय उपलब्ध असताना आजी वेगळाच विचार करत होत्या...
पुढे ????????????????????????????
***************************
दुसर्या दिवशी संध्याकाळी मधुरा आणि सारंग घरी आले तशा आजी निघायच्याच तयारीत होत्या.
मधुरा: आई इतक्या सन्ध्याकाळी कुठे फिरायला चाललात
आजी: अग कोपर्यावर मल्टीप्लेक्समध्ये "बालगंधर्व" लागलीय ना! साडे नौपर्यंत येइन परत.
मधुरा: आई जेवण..
आजी: अग हो सकाळी मी छान शेपुची भाजी बनविली होती. काय मस्त झालीये. तुमच्यासाठीच ठेवली.
तु फक्त चपात्या कर. माझ्यासाठी २ ठेउन दे तसे पण मी रात्री फार जेवत नाही. अमेयने अगदीच कंटाळा केला तर त्याच्यासाठी थोडी शिकरण आहेच.
मधुराला एकदम काही बोलायलाच सुचेना त्यात शेपुच्या भाजीच्या आठवणीने तिची विचारशक्तिही थंडावली. दुपारी सारंग आणि ती बाहेर लन्चला गेले होते आता पुन्हा बाहेर जावेसे पण वाटत नव्हते. मुकाट्याने ती तयारीला लागली.
*******************************
तिसर्या दिवशी सारंग घरी आला येताना मेल चेक करतो तर आजीच्या नावाने अजुन एक पाकिट.
घरी येउन त्याने ते आजीकडे दिले. सगळ्याच्याच डोळ्यात उत्सुकता होती. आजी बाहेर एकदम चकाचक
नवीन मोबाइल बाहेर काढत सारंगला म्हणाल्या अरे आता याच आठवड्यात भजनाचा प्रोग्राम ठेवला आहे बराच काळ भजन झाले नव्हते म्ह्टले पुन्हा चालु करु. मला बरीच फोनाफोनी करावी लागते म्हटले तुमचा खोळंबा नको व्हायला. आणि बरे का या वर्षी आम्ही कला अकादमी च्या भजन स्पर्धेत पण भाग घेणार आहोत.
जेवणाचीही फार काळजी नको, वर्षातन एकदाच आपण करतो मी सगुणाला सांगुन घेइन करुन.
सारंगलाही आता काही बोलायला फारसे उरले नव्हते.
********************************
हळुहळु आजीने आपले मतस्वातंत्र्य घरातच प्रस्थापित केले होते. तिला ग्रुहित धरुन चालाणार नाही हे
दोघेही समजुन चुकले होते अशातच रविवारी चहा पिताना आजीने बॉम्ब टाकला.
आजी: मधुरा तुला ती जोहरा आठवते आपली वृद्धाश्रमातील.
मधुरा: हो! ठीक आहे ना ती.
आजी: अग तिला काय व्हायला! तिच्या मुलाची छोटी लायब्ररी आहे. म्हणत होता कोण मिळत नाही दुपारी साम्भाळायला. मी बोलले नाहीतरी अमेय शाळेत गेला की मला कंटाळाच येतो घरी. सगुणा नाहीतरी सर्व करतेच तिला थोडा पगार वाढवुन देउ, ती बनवेल जेवण आणि मी जात जाइन लाय्ब्ररीत दुपारी. काही पुस्तके पण वाचुन काढीन नवी.
आजीच्या हातच्या जेवणाची तर सर्वांनाच चटक लागलेली.
सारंगः पण आई तु कशाला एवढी धडपड करतेस. आपल्याला का गरज आहे?
आजी: मला गरज आहे, मल चालत बोलत राहिले पाहिजे नाहीतर काय घरी बसुन बसुन तब्येत खराब होइल.
दोघांनी थोडा वाद घातला पण आजीपुढे काही चालले नाही.
*********************************
५ वर्षे अशीच गेली.
आजीनी काय काय नाय केले या पाच वर्षात.
चक्क पहिला परदेश प्रवास थायलंड केला तो पण त्यांनी स्वतः केलेल्या कमाईतुन. व्रुद्धाश्रमातील
२ मैत्रिणींना पण स्पॉन्सर केले. अमेय पण गेला सोबत.
आजी मनाशीच विचार करत होत्या
खरोखरच काय चुकले आपले याआधी. आपण स्वतःलाच बिचार्या समजत होतो म्हणुनच सर्वजण आपल्याला तसेच वागवत. मी सासुरवास काढला तेंव्हा प्रत्येक अपमानाच्या वेळी म्हणे की माझ्या सुनेला असे कधीच वागवणार नाही मग आज त्यांच्या सुखाचे वैषम्य का वाटावे मला? अर्थात हे सुखाचे दिवस यायला पैशाचा पण आधार लागलाच ते पाठबळ नसते तर जमले असते का? पण कितिसा पैसा वापरला आपण? ते पावणे सात लाख तसेच आहेत उलट काही व्याजच जमा झालय. पैशापेक्षा जास्त उपयोगी पडला तो या पैशाने दिलेला आत्मविश्वास, आणि जपलेली प्रक्रुती. पण हे कायमच राहिल असे नाही.
अमेयच्या १०वीच्या परिक्षेला आजीने स्वतः होउन अभ्यासाला मदत केली. पाठांतर तयार करण्यात अमेयला खुपच मदत झाली आजिची. अमेयचा रिझल्ट लागला तेंव्हा सारंग आणि मधुरा दोघे हेलावुन गेले होते.
शेवटी आपला आनंद बराचसा आपल्याच हातात असतो नाही.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
निलिमा, कृपया धागा सार्वजनिक
निलिमा, कृपया धागा सार्वजनिक करा.
छान! मी बोलले नाहीतरी चिन्मय
छान!
मी बोलले नाहीतरी चिन्मय शाळेत गेला की मला कंटाळाच येतो घरी>>> इथे अमेय करणार का?
मस्त लिहीलेय .. अगदी आदर्श
मस्त लिहीलेय .. अगदी आदर्श शेवट..
आवडला शेवट..
आवडला शेवट..
धन्यवाद वत्सला, संयोजक धागा
धन्यवाद वत्सला, संयोजक
धागा आता सार्वजनिक केला आहे.
छान आहे कथा.
छान आहे कथा.