पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.
रोज रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट दुसर्या दिवशी फिरायची, बघायची, फोटु मारायचे. असं करता करता एक दिवशी संध्याकाळच्या सुमारास नाणेली गावात पोचलो. हि वाडी, ती वाडी असं करत करत एका ठिकाणी एक गंजकी पाटी पाह्यली गणपतिमंदिराची. पाटी बाण दाखवत होती त्या दिशेला एक पायवाटेसारखी वाट. निघालो. बरीच वळणं घेत शेवटी येऊन पोचलो ते एका अप्रतिम शांत, सुंदर अश्या जुन्या मंदीरापाशी
देवाकडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूने मंदिराकडे वाट येते. तिथून येऊन देवळाला सामोरे गेलो. हे असे
देऊळ नक्कीच बरंच जुनं होतं. सुंदर तर होतंच. देवळात कोणी चिटपाखरूही नाही. गाभार्यात एक छोटासा बल्ब लटकत होता. लोड शेडींगची वेळ संपली होती त्यामुळे तो उजळून निघाला.अंधार पडायला लागला होता. हे देऊळ पाह्यला परत यायचं असं ठरवून आम्ही निघालो.
दुसर्या दिवशी सकाळचेच आलो देवळात. आत्ताही देवळात कोणीही नव्हतं.
हा देवळाचा मंडप.
हा त्याचा डावा खण
हा उजवा खण
एकेक खांब जांभ्याच्या सुबक गोल चिर्याचा. आत्ता उखडलेली दिसत असली तरी शेणाने सारवली जात असलेली जमीन. उजव्या खणाच्या पलिकडे चिर्यांनी बांधून काढलेली छोटीशी विहीर.
एका बाजूने या देवळाचा पूर्ण फोटो काढायला पॅनोरमा प्रकरण वापरावे लागले.
देवळाचे सगळ्या बाजूंनी निरीक्षण करत, फोटो काढत फिरता फिरता काही गावकरी मंडळी देवळात येऊन गेली. गुरवाने येऊन पूजा केली बाप्पाची. सुंदर काळ्या कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती. देवळाच्या बांधकामातला साधेपणा मूर्तीत अजिब्बात नव्हता. दोन वेगळ्या काळात किंवा वेगळ्या शैलीत केले गेले असण्याची शक्यता नक्कीच वाटत होती. देवाच्या डोक्यातच प्रकाश पडावा अशी इच्छा असल्यासारखा बल्ब बरोबर देवाच्या डोक्याशी टांगत होता त्यामुळे आमच्या फोटुमधे जरा जास्तच उजेड पडला.
देऊळ कधीचं, किती वर्षं जुनं असं एकदोघांना विचारलं तर त्यांनी केवळ स्मितहास्यानेच उत्तर दिलं. गुरवनानांना विचारलं तर 'जुना आसां.' असं उत्तर मिळालं. मग दोन बाइकवीर आले. गावातलेच असावेत असं वाटत होतं. थाटमाटावरून गावच्या राजकारणात प्रवेश करत होत्साते वाटत होते. त्यांना देऊळ किती जुनं असं विचारलं असतं तर नक्की 'पांडवकालीन' असं उत्तर मिळालं असतं.
त्यांना आम्ही काही विचारायला गेलो नाही तरी तेच आले आम्हाला विचारायला.
'काल संध्याकाळी पण गाडी पाह्यली. काय विशेष? कुठून आलात? मुंबईला कुठे असता? काय करता?'
शूटींगच्या तयारीसाठी आलोय कळल्यावर प्रश्नांचा टोन बदलला. संशय कमी झाला.
'हे जुनं झालंय देऊळ. पार मोडायला आलंय. आता जीर्णोद्धार समिती झालीये स्थापन. लवकरच जीर्णोद्धार होणार देवळाचा! मग तेव्हा शूटींग घ्या तुम्ही. एकदम सुंदर असेल देऊळ.'
असा मोलाचा सल्ला देऊन ते बाइकवीर निघून गेले.
जीर्णोद्धार हा शब्द ऐकून जरा काळजाचा ठोका चुकल्यासारखंच झालं. चिर्याचे खांब दिसेनासे होऊन सिमेंटचे खांब येणार. त्याला ठराविक निळे, पिस्ता, गुलाबी, पिवळे ऑइलपेंट फासले जाणार. शेणाच्या जमिनीऐवजी घसरवणार्या चकचकीत फरश्या येणार. सिमेंटची स्लॅब येणार. देऊळ वाटावं म्हणून त्याला उगाच बिर्ला टाइपच्या महिरपी येणार आणि कोकणातल्या मंदीर वास्तुकलेचा अजून एक नमुना धारातीर्थी पडणार.
त्यात समितीतल्या कोणीतरी पैसे खाल्ले तर हे सगळंच काम तकलादू होणार आणि २-४ वर्षातच देवळाला पूर्ण अवकळा येणार. वाईट वाटलं खूप.
परत ३-४ महिन्यांनी कामासाठी त्या भागात जाणं झालं तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला नसल्याचं कळलं आणि आम्ही थोडं हुश्श केलं. देवळाकडे चक्कर मारली. आज देवळातली वर्दळ वाढलेली होती. पताका होत्या देवळात लावलेल्या.
गावकर्यांशी थोडी प्रश्नोत्तरे झाली. 'मायनिंगवाले नाही. शूटींगवाले आसंत' कळल्यावर लोकांना हुश्श झालं. जीर्णोद्धाराचा विषय निघाला. देवळाच्या सद्य वास्तूकलेचे सौंदर्य आम्ही नावाजत होतो. हे सौंदर्य असंच जपून जीर्णोद्धार केला जाऊ शकतो. असे आर्किटेक्ट लोक आहेत असं काय काय आम्ही आपल्या परीने सांगितलं. हसर्या आणि कीवयुक्त चेहर्यांनी त्यांनी ते ऐकून घेतलं. याहून आम्ही काय करणार होतो कुणास ठाऊक.
पर्वाच मैत्रिणीचा झारापहून फोन आला. नाणेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होतोय लवकरच. येत्या महिन्याभरात आलात तर बघायला मिळेल पूर्वीचं मंदीर. मग नाही. अशी बातमी तिने दिली. नाणेली गावाशी माझा तसा काहीच संबंध नसतानाही किंचित अस्वस्थ व्हायला झालंच.
जीर्णोद्धार आणि सौंदर्यदृष्टी यांचा एकमेकांशी संबंध का नसतो? चकचकीत ऑइलपेंटस, गुळगुळीत टाइल्स जमिनीला याच गोष्टीत सौंदर्य भरून राह्यलंय हे कुठे शिकवलं जातं? जुन्या प्रकारचं बांधकाम, जुन्या प्रकारचं अमुक तमुक हे काळाबरोबर लयाला जाणार हे मान्यच पण म्हणून कोणी ताजमहाल नव्याने बांधत नाही ना सिमेंट, ऑइलपेंट, टाइल्स लावून जीर्णोद्धाराच्या नावाखाली की कोणी रेम्ब्राँच्या पेंटींगवर परत नवीन पद्धतीने रंग मारत नाही लेटेस्ट स्टाइल म्हणून. आपली देवळं ही जरी जगातली आश्चर्यं किंवा मास्टरपीसेस नसली तरी त्या त्या वास्तूकलेचा नमुना आहेतच ना. त्या सगळ्या खुणा पारच पुसल्या जाऊन हे असं का आणि कसं होतं?
नाणेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होणार आहे याबद्दल मला अजूनतरी कल्पना नाही. तोपर्यंत 'सुखद धक्काच द्या हो बाप्पा!' अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे नाही का?
- नीरजा पटवर्धन
सगळेच फोटो आणि लिखाण फार
सगळेच फोटो आणि लिखाण फार बोलकं आणि आपल्यातलं, जवळचं वाटलं.
उगिचच पुस्तकी अजिबात वाटलं नाही.
फोटोफीचर आणि लिखाण दोन्हीही
फोटोफीचर आणि लिखाण दोन्हीही आवडेश!
नीधप, अनुमोदन. छान फोटो आणि
नीधप, अनुमोदन. छान फोटो आणि लेख.
कोळिसरेचे लक्ष्मीकेशव मंदिर पण अशाच जीर्णोद्धाराचा बळी ठरलय.
कोकणातली मंदिरं म्हणजे खरंतर घरासारखीच असतात. भव्यता, भल्यामोठ्या पूजा, कैच्याकै असणारं सोवळंओवळं असं काहीही नस्तं पण तरी तिथे देव भेटल्यासारखा वाटतं.
जयगडमधे कर्हाटेश्वर म्हणून एक अप्रतिम सुंदर मंदिर आहे. या मंदिराचे लोकेशनच इतके ग्रेट आहे, की तिथे गेलं की आपोआप मन शांत होते. कॉलेजात असताना लेक्चर्र्स चुकवून आम्ही इकडे फिरायला जायचो. (अख्खा ग्रूप.)
दुर्दैवाने जेएस डब्ल्यूचा प्रोजेक्ट या देवळाच्या शंभर फुटावर आहे. त्यानीच या देवळाचा जीर्णोद्धार केलाय. मात्र मूळ देवळाला (अजून्तरी) हात लावलेला नव्हता. आता वर्षभरात झालं असल्यास माहित नाही. तरीदेखील आजूबाजूचं वातावरण बदललंच
नी... कोकणातल्या बहुतेक
नी...
कोकणातल्या बहुतेक देवालय/ मंदिरांच्या समोर तुळशी वॄन्दावन असतेच. त्यामागची भावना/ श्रद्धा काय?, हे मात्र आज पर्यन्त मला समजलेलं नाही. बहुतेक गणपती मंदिरांत 'ऊंदीरा'चं स्थान हे श्री गणपतीच्या पायाकडेच असल्याचं दिसून येतं. आता हल्लीच्या काळात बांधलेल्या 'गणपती' मंदीरात 'उंदिर मामा'ना वेगळं स्थान दिलं जातं...
जीर्णोद्धारा बाबतः- पर्यावरण रक्षण या लेबल खाली कोकणातल्या बहुतेक 'जांभ्या दगडां'च्या खाणींवर, आणी वॄक्षतोडिवर बरीच शासकीय नियंत्रणं आलीत. त्यामुळे या आणि अश्या जुन्या देवळांची/ मंदिरांची योग्य डागडुजी करुन निगा राखणं (आहे त्याच साच्या मधे), आता दिवसें-दिवस कठीण होत जातंय. आणी याचाच फायदा (?) तथाकथीत 'राजकीय व्यक्तीमत्वां'नी घ्यायला सुरुवात केली. मंदीर/ देवळाचा 'जीर्णोद्धार' या भावने पेक्षाही, 'राजकीय हेतूने केलेली ऊत्पन्नाची सोय' हीच एक प्रबळ भावना, या अशा जुन्या देवळांच्या 'आधुनिकी करणा' मागे ठळकपणे दिसते... कालाचा महीमा...
पण या जुन्या मंदिरांचे चिरे
पण या जुन्या मंदिरांचे चिरे इतके भक्कम असतात की तेच परत वापरता येऊ शकतात की हो मास्तर..
पण बरोबरे तुम्ही म्हणताय ते.
मूर्ती एकदम वेधक आहे. टाईल्स,
मूर्ती एकदम वेधक आहे.
टाईल्स, चकाचक दिवे, भडक रंग हे फक्त शहरातच का? आमच्याकडेही हवे- अशी त्यामागची मानसिकता असावी. तशी ही मंदिरं एकदम घरगुती दिसतात, असतात, त्यामुळे त्यात काही सौंदर्य आहे, वारसा आहे ह्याची मुळात त्यांना जाणिव होत नसावी.
मंदिराचे फोटो सुंदर आलेत.
मंदिराचे फोटो सुंदर आलेत. मूर्ती वेगळीच दिसतेय, या मंदिरातली असेल असं वाटत नाही.
जिर्णोद्धाराबद्दल पौर्णिमेला अनुमोदन.
खूप सुरेख फोटो. पहिल्या
खूप सुरेख फोटो.
पहिल्या फोटोतील वातावरण एखाद्या प्राचीन कथेसाठी परफेक्ट. चांदीचे दागिने घातलेली, ब्राउन/ मॅजेंटा वस्त्र नेसलेली ब्राम्हणी खांबामागून डोकावते आहे असे वाट्ते.
तुझे नाव रांगोळी घातल्यासारखे आले आहे ते छान.
डाव्या/ उजव्या ओवरीत राहावे असे वाट्ते आहे.
माझ्या डोक्यात खूप दिवस एक ऑइल पेंटिंगचा विषय आहे. असेच देऊळ. ओवरीतला भटक्याचा संसार. झोळीत झोपविलेले बाळ. देवापुढच्या समई/ दिव्याचा प्रकाश. मूर्ती बॅक ग्राउंड मध्ये अर्धवट. ओवरीत स्वयंपाक करणारी बाई. तीन दगडांची चूल व त्यावर मातीच्या भांड्यात रटरट्णारा भात. त्यातून निघणारी वाफ. चुलीतल्या अग्नीची प्रभा बाईच्या तोंडावर. शेजारी अन्नाची वाट बघणारा थकलेला बाप.
काँपोझिशन फिट आहे पण हातात तेवढी कला आहे कि नाही माहित नाही. फोटो वरून स्फूर्ती घेउन
पेन्सिलने रेखाटून बघते.
जीर्णोद्धारा बद्दल सर्व मतांना अनुमोदन. पुण्यातले आमच्या घराजवळचे पांचाळेश्वराचे मंदिरही
असेच रंगवून खराब केले होते. ते जुने मंदिरच आपले वाट्त असे.
पॅनोरमा प्रकरण सुंदरच जमले
पॅनोरमा प्रकरण सुंदरच जमले आहे.
मूर्ती अप्रतिमच आहे. मूर्तीचा दुसरा फोटो असल्यास नक्की द्या इथे.
नीधप.. छानच लिहीले आहेस नि
नीधप.. छानच लिहीले आहेस नि फोटो पण मस्त.. मागेच जाउन आलो तेव्हा बहुतांशी मंदीरे जीर्णोद्धाराच्या नावाखाली चकचकीत केलेली दिसली.. पण खांब मात्र अजुन ओळख करून देतात.. कधी जमेल तेव्हा फोटो टाकेनच..
काही मंदिरांच्यात चकचकीत रंग
काही मंदिरांच्यात चकचकीत रंग असले तरी मांडणी पूर्वीचीच असते. ही अशी बरीच दोडामार्ग तालुक्यात आहेत. त्यातली काही चांगली पण दिसतात.
पुण्यातील तुळशीबागेतील राम
पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिराचा पण जिर्णोद्धार सुरु आहे. बघु तिथे काय करतात. आधीचे देउळ मस्त होते.
बापरे तुबा मधलं ते सुंदर देऊळ
बापरे
तुबा मधलं ते सुंदर देऊळ आणि चौकातली मस्त रिकामी जागा.. लहानपणच्या केवढ्या तरी आठवणी.. तो साधेपणा आणि शांतपणा रहायला हवा टिकून.
फोटोफिचर मस्त. देऊळ आणि
फोटोफिचर मस्त. देऊळ आणि आजूबाजुचा परिसर खुप आवडला. एकदम शांत वाटले.
देऊळ आणि आतली मुर्ती एकमेकांना अजिबात शोभत नाही. कोणीतरी साऊथमधल्या देवळातली मुर्ती उचलुन आणुन इथे ठेवल्यासारखी वाटते. कदाचित मुळ मुर्ती खराब झाल्यावर कोणीतरी दुसरी मुर्ती आणुन ठेवली असेल.
जीर्णोद्धार भानगडीत माझ्या गावाचे देऊळही असेच गुलाबी पिवळे झाले जावेसे वाटत नाही तिथे. जीर्णोद्धार करणा-यांचा हेतू चांगला असतो पण त्याचबरोबर 'चांगले म्हणजे एकदम शहरी स्टाईलचे' ही भावना गावातल्या ब-याच लोकांमध्ये मी पाहिलीय. मुळ मंदिर पाहुन पाहुन ते कंटाळलेले असतात आणि जुन्या गोष्टी जुन्यासारख्याच राखुन का ठेवायच्या हेही त्यांना माहिती नसते.
सुंदर..एकदम जुनं-मिस्टिरिअस
सुंदर..एकदम जुनं-मिस्टिरिअस दिसतय देउळ आणि वातावरण !
मूर्ति खरच साउथ स्टाइल ची आहे.
फारच सुंदर मंदिर
फारच सुंदर मंदिर आहे...श्या...त्याचा जिर्णोद्धार झाला असणार आता...
फक्त मंदिरेच नाही कोल्हापूर भागात किल्ल्यांची पण वाट लावलीये...चिऱ्यांचे बुरुज ढासळल्यानंतर त्यावर चक्क विटांचे बांधकाम करून गेरू फासलेत...आणि बुरुजावर जायला डांबरी रस्ता..बाजूने सामाजिक वनिकरणात लावलेली झाडे...
आशूचँप तुम्ही या महिनाअखेरीस
आशूचँप तुम्ही या महिनाअखेरीस जाणार आहात तर कदाचित मिळू शकेल तुम्हाला हे देऊळ बघायला.
आवडलं मंदिर अन टिप्पणीही.
आवडलं मंदिर अन टिप्पणीही. कोकणात अडिवरे गावाला आमची कुलदेवी आहे, तिथे दर्शनाला एकदा गेले असताना तिथे कुलदेवही गावाबाहेर आहे असे कळले. ते मंदिरही असच नितांतसुंदर आहे, दाट झाडीने वेढलेले.. कॅमेराच काय, मोबाईलही नव्हता जवळ म्हणून फोटो नाहीत.
कोकणात अडिवरे गावाला आमची
कोकणात अडिवरे गावाला आमची कुलदेवी आहे,>> महालक्ष्मी का???
हे अडिवर्यातले मंदिर कोकणाला भेट देणार्यानी जरूर बघा. महालक्ष्मी/महाकाली आणि महासरस्वती अशा देवी आहेत. शंकराचर्यानी बौद्ध धर्मातील विद्वानाचा इथे वादविवादामधे पराभव केला होता आणि त्यानंतर या देवीची स्थापना केली अशी कथा इथे सांगितली जाते.
कोकणात बर्याचदा साऊथ स्टाईलच्या किंवा परदेशी स्टाईलच्या मूर्ती दिसतात. केळशीच्या सूर्यमंदिरातला सूर्यनारायण तर इराणी आहे, पंप शू घालून उभा आहे. तसेच, आता आडगावं अथवा खेडेगावं वाटणारी कित्येक गावं पूर्वीच्या काळी बंदरं/वखार म्हणून प्रसिद्ध होती त्यामुळे आता निर्जन वाटणारी देवळं तेव्हा "गजबजलेली" असणारच.
वरदा येतेय का मायबोलीवर? तिच्याकडून या मूर्तीची कूळकथा ऐकायला मजा येइल....
कसलं गुढरम्य देऊळ आहे.. किती
कसलं गुढरम्य देऊळ आहे.. किती पिढ्यांचं काय काय बघितलं असेल त्याने!
सहीच फोटो आणि वर्णन. विशेषतः पहिला फोटो.
आपल्या सिनेम्यांनी सारा घोटाळा करून ठेवला आहे. चकचकीत भडक रंगांची फिल्मासिटी स्टाईल मंदिरं, आणि त्यातले हिरो हिरविनिंच्या नवसाला पावणारे ग्लॅमरस देव. हे सारे बघणारे आपण- शहरांतले नि खेड्यांतलेही. का नाही होणार मग असले ग्लॉसी जॉर्णोद्धार. या असल्या मंदिरांत देव राहत असेल, असं काय वाटत नाही बुवा.
छान फोटोज ... आणी त्याबद्दल
छान फोटोज ...
आणी त्याबद्दल जे लिहिलय ते पण भावुन गेल...
जुन ते सोनं..
छान लिहिलंय. भावना अगदि थेट
छान लिहिलंय. भावना अगदि थेट पोचल्या.
छान मंदिर आहे!
छान मंदिर आहे!
मला वाटतं... कोकणाची मुंबईकडे
मला वाटतं...
कोकणाची मुंबईकडे बघायची एक मानसिक वॄत्ती आहे.. जे तिकडे गेले, ते शिकले, सिमेंटच्या घरात राहू लागले, त्यांच्याकडे गाड्या आल्या, परदेशाच्या ट्रीपा आल्या, आणि जे गावी राहिले ते तसेच राहिले.
त्यामुळे जे मुंबईला आहे तेच बरोबर, तेच नवीन, तेच चांगले या भावनेतून हे बदल होताहेत.
म्हणून शेणाने सारवलेली जमीन निकृष्ट आणि टाईल्स चांगल्या, कौलारू घर बेकार पण सिमेंटची छप्परं चांगली अशी सगळी भावना झालीय. त्यात आता शेणाने सारवायला ही कुणी तयार नाही, आणि नळे परतायला (वर्षाच्या वर्षाला कौलं साफसूफ करून परत लावायला) माणसं ही नाहीत. तेव्हा 'काळाप्रमाणे बदल' हेच खरं..
देवळातल्या मूर्ती मात्र हल्ली बाहेरून (राजस्थान मधून) आणल्या जातात. कोकणात मुर्तीकार (दगडावर काम करणारे) कधी दिसले नाहीत..
पूनमचा किंवा आत्ता देसाईंनी
पूनमचा किंवा आत्ता देसाईंनी मांडलेला मुद्दा पटण्यासारखा आहेच.
काळाचा महिमा खरंच.
स्थापत्याची आयडेन्टिटी टिकवूनही नावीन्य आणणे हे अशक्य नसतं हे माहित झालं तर लोकांचे विचार बदलतील का? मी असंच चिंतन म्हणून हा प्रश्न विचारतेय.
नि, एकदम मस्त लेख. या
नि, एकदम मस्त लेख. या नवरात्रांत गांवी जायचं ठरवतोय, तेव्हा खास मूर्तीसाठी जाऊन बघेन. एकदा वालावलच्या लक्ष्मिनारायणाकडे बसलो असतांना तिथल्या पुजारी आजोबांनी देवळातल्या जुन्या काळ्याशार दगडी काढून नविन चकाचक फरशा बसवण्यावरुन एवढ्या गाळी घातलेल्या...!!
गणपतीच्या बाजूच्या रिद्धी-सिद्धीही दिसत आहेत.
तरी वालावलच्या लक्ष्मीनारायण
तरी वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराचं बरचसं सौंदर्य अबाधित आहे. म्हणजे २००३ मधे तरी होतं. नंतरचं माहित नाही.
आवडलं फोटो फिचर. गणेशाची
आवडलं फोटो फिचर. गणेशाची मूर्ती किती सुंदर आहे. उत्तम स्थितीत आहे. खूप मस्त.
सुंदर
सुंदर
मस्त फोटो आणि लेख. ईस्टमनकलर
मस्त फोटो आणि लेख.
ईस्टमनकलर जीर्णोद्धार बघवत नाहीत हे खरं आहे. नुसतं रूप बदलत नाही, सगळी संस्कृतीच बदलते त्या स्थानाची असं वाटतं. असो.
Pages