आमंत्रण लेखनस्पर्धा - "आवताण ... लै वरताण" - आशूडी

Submitted by आशूडी on 2 September, 2011 - 23:58

राजहंस वॉशर्स अ‍ॅंड ड्रायक्लिनर्स

||श्री धुपाटणे महाराज प्रसन्न||
||श्री इस्त्रीमाता प्रसन्न||

आपल्या येथे आई धुलाईदेवीच्या आशीर्वादाने व सरकारच्या 'स्वच्छ कपडे हाच खरा दागिना' मोहीमे अंतर्गत 'विना चुरगळ उडे मरगळ' कार्यक्रमाच्या धोरणानुसार 'स्वस्त धुलाई केंद्र' धुपाटण्याच्या धूमधडाक्यात आणि इस्त्रीच्या कोमल करड्या पवित्र सुवासात स्थापन करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या सशुल्क धूतालयाचा लाभ घ्यावा व परिसर स्वच्छ राखण्यास नेसत्या वस्त्रानिशी सुरुवात करावी, यासाठी हे रोलप्रेस्ड कडक आमंत्रण!

'राजहंस' हा पक्षी जसा इतर पक्ष्यांपेक्षा खास वैशिष्ट्यपूर्ण आहे तसेच आपले धुलाई केंद्रही! उद्घाटन सोहळ्यास येण्यापूर्वी आपली खालील वैशिष्ट्ये जाणून घ्या.
१. येथे कपडे फक्त धुवून व इस्त्री करुन मिळतील. उसवून, शिवून मिळत नाहीत. त्यामुळे फाटके, फाटायला आलेले कपडे देऊ नयेत.
२. येथे साड्यांना फॉल पिको करुन मिळत नाहीत. कृपया चौकशी करु नये.
३. येथे केबल,नारळ,रद्दी,बस, रिक्षा इ. विषयी चौकशी करु नये.
४. कृपया मळलेले कपडे इस्त्रीला आणू नयेत. हा घोर अपमान इस्त्री मान खाली घालून सहन करणार नाही.
५. कपड्यांवर तेलाचे, चिखलाचे, ग्रीस ऑईलचे, रंगाचे, भाज्यांच्या रश्श्याचे, पाकाचे, घामाचे,बॉलपेनाचे, शाईचे, औषधांचे डाग असतील तर कपडे 'राजहंस' च्या दर्जाचे नसल्याचे सिध्द होऊन अपरिहार्यतेने स्वीकारले जाणार नाहीत. कृपया सहकार्य करावे.
६. वीज गेल्यास, पाऊस आल्यास, जास्त कडक ऊन असल्यास, वारा सुटल्यास कपडे वेळेत मिळणार नाहीत. 'राजहंस' च्या ग्राहकांची त्यावाचून अडावे इतकी आणीबाणी नाही हे आम्ही जाणतो.
७.'राजहंस' फक्त एकच रंग मानतो. शुभ्र धवल. तस्मात इतर रंग आले काय गेले काय, राहिले काय, उडले काय तमा नाही.
८.पांढर्‍या रंगाचा नमुना दुकानाबाहेर लावला जाईल. त्याच्याशी ८२.३०% जुळणारे कपडे 'पांढरे' म्हणून दाखल केले जातील. पिवळट, ऑफ व्हाईट हे पिवळट, ऑफव्हाईट्च गणले जातील.
९.सणासुदीच्या, लग्नसराईच्या मोसमात साड्यांसाठी एक महिना आधी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु होईल. आयत्या वेळी पसरलेल्या पदरावर इस्त्रीही फिरणार नाही.
१०. साड्या देताना, नवीन साडीचा घडीतला 'आधीचा' फोटो काढून सबमिट करावा. मळामुळे रंग बदलतात आणि तोच मूळ रंग असल्याची धारणा होते हा अनुभव आहे. मागून तक्रार चालणार नाही.
११.रुमाल, बनियन आणि फरशी, गाड्या पुसायची फडकी यातला फरक घरीच ओळखावा.
१२.आपले कपडे आपण ओळखावेत. लेबलीकरण आम्हाला मान्य नाही.
१३. खिसा फाटलेला, कापलेला आढळल्यास अ‍ॅडव्हान्स पेमेंट करावे लागेल.
१४. सर्वात महत्त्वाचे, कपडे देताना तारतम्य ठेवावे. लाज आणू नये.
१५. आणखी महत्त्वाचे, आज रोख. उद्याही रोखच.

तरी, आपण सर्वांनी दि. १५ ऑक्टोबर २०११ म्हणजेच जागतिक हस्तधुलाई दिनाच्या सुमुहूर्तावर स्वच्छ कपडे परिधान करुन स्वच्छ, शुभ्र कपड्यांच्या घड्यांसह निर्मळ शरीराने 'राजहंस वॉशर्स अ‍ॅंड ड्रायक्लिनर्स', स.दा. शिव पथ, डाळींब गेट, दुणे येथे सकाळी ठीक ५ वाजता अगत्य येणेचे करावे. येऊन गोंध़ळ घालू नये. दुकानाचे शटर उघडेपर्यंत राजहंसीय शांततेत राहून आमचे नाव राखावे. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयत्या वेळी पसरलेल्या पदरावर इस्त्रीही फिरणार नाही. >>>
.रुमाल, बनियन आणि फरशी, गाड्या पुसायची फडकी यातला फरक घरीच ओळखावा. >>>
कपडे देताना तारतम्य ठेवावे. लाज आणू नये. >>> Rofl

वीज गेल्यास, पाऊस आल्यास, जास्त कडक ऊन असल्यास, वारा सुटल्यास कपडे वेळेत मिळणार नाहीत. 'राजहंस' च्या ग्राहकांची त्यावाचून अडावे इतकी आणीबाणी नाही हे आम्ही जाणतो.
'राजहंस' फक्त एकच रंग मानतो. शुभ्र धवल. तस्मात इतर रंग आले काय गेले काय, राहिले काय, उडले काय तमा नाही.
>>>> हे आवडलं.

धम्माल लिहिलय.

मस्त Lol

७.'राजहंस' फक्त एकच रंग मानतो. शुभ्र धवल. तस्मात इतर रंग आले काय गेले काय, राहिले काय, उडले काय तमा नाही.
>>> भारी लिहिलंय! Lol

जबरीच एकदम Rofl
डाळींब गेट, आयत्या वेळी पसरलेल्या पदरावर इस्त्रीही फिरणार नाही. >>>
.रुमाल, बनियन आणि फरशी, गाड्या पुसायची फडकी यातला फरक घरीच ओळखावा. >>>> Rofl

जबराट Lol

- कपडे घरी आधी दोनदा स्वच्छ धुवून मगच इथे धुवायला देण्याचे धारिष्ट्य करावे.
- दुपारी राजहंस पहुडलेले असतात याची नोंद घ्यावी. मोत्याचा चारा दिलात तरी दुकान उघडणार नाही
- आम्हालां गिर्‍हाइक आणि कपडे आवडल्यासच (कपडे) स्वीकारले जातील. का? असे विचारल्यास अपमान केला जाईल. <तो सुद्धा आम्ही फुकट करत नाही याचीही नोंद घ्यावी>

Pages