पुस्तकाचं नाव - परत मायभूमीकडे
लेखक - डॉ. संग्राम पाटील
प्रकाशक - समकालीन प्रकाशन
प्रथम आवृत्ती - ६ मार्च, २०११
-------------------------------------------------------------
बारामतीहून पासष्ट किलोमीटरांवर असलेल्या एका गावात एका जोडप्याला दोन महिन्यांपूर्वी एकाच वेळी पाच मुलं झाली. शेतात मोलमजुरी करणारं हे जोडपं. सातव्या महिन्यातच बाळंतपण झालं. मुलं अपुर्या दिवसांची, आणि शेवटच्या दिवसापर्यंत बाई शेतात राबत होती. सोनोग्राफी सोडाच, पण साध्या लोहाच्या गोळ्या घेण्यासाठीही ती गावातल्या आरोग्य केंद्रात गेली नव्हती. बाळंतपणही सुइणीनं घरीच केलं. मुलं इतकी अशक्त की फारशी हालचालही करत नव्हती. मग सुईणच आईला आणि मुलांना आरोग्य केंद्रात घेऊन गेली. तिथले डॉक्टर सलाइन लावणे आणि तापाच्या गोळ्या देणे, याशिवाय काही करू शकत नव्हते. या बाळांची काळजी घेण्याची सोय तिथे नव्हती. डॉक्टर म्हणाले, बारामतीला घेऊन जा, इथे काही ही मुलं जगत नाहीत. गावात अॅम्ब्युलन्स नव्हती. तालुक्याच्या गावातल्या अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर रजेवर होता, आणि तिची चाकं पंक्चर झाली होती. मग मुलांच्या वडलांनी आपल्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, आणि एक जीप भाड्याने घेऊन बारामतीला निघाले. रस्त्यावर भरपूर खड्डे होते. जीप उसळल्यामुळे मुलांना त्रास होऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले होते. पाचांपैकी दोन मुलं वाटेतच गेली. उरलेली तिघं बारामतीच्या दवाखान्यात दुसर्या दिवशी गेली.
बारामती हे राजधानीचं शहर. इथे अत्याधुनिक हॉस्पिटलं आहेत, पण काही किलोमीटरांवर असलेल्या गावांमध्ये मात्र बाळांची काळजी घेण्याची सोय नाही, अॅम्ब्युलन्सही नाही. बारामतीत विमानतळ आहे, पण जवळच्या गावांतले रस्ते मात्र आजारी माणसांना थेट वर पोहोचवण्याचं सामर्थ्य असलेले. आपण स्वतंत्र होऊन पासष्ट वर्षं झाली, तरी आपल्या देशात अजूनही मूलभूत सोयींची वानवा आहे. चांगले रस्ते नाहीत, गावांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचलेली नाही. वीज नाही, पाणी नाही. आणि सर्वांवर कळस म्हणजे भ्रष्टाचार. त्या फेविकॉलच्या एका जाहिरातीत एका मोठ्ठ्या बसला असंख्य माणसं चिकटून बसलेली असतात. त्या माणसांचं ओझं वागवत ती बस हलतडुलत, सावकाश रस्त्यावरून चालत असते. आपला भारत देशही मला कधीकधी तसाच वाटतो.
भारतातल्या एकूण व्यवस्थेला कंटाळलेल्यांना परदेशातलं सुखासीन आयुष्य मोहात पाडतंच. त्यामुळे एकदा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात गेल्यानंतर भारतात परत येणार्यांची संख्या तशी अगदी कमी आहे. पण परदेशातून भारतातल्या व्यवस्थेवर टीका करणार्यांची संख्या मात्र भरपूर असते. 'बी द चेंज यू वाँट टु बी', असं गांधीजी म्हटले होते, त्याकडे फारसं लक्ष कोणी देत नाही. जर तुम्हांला काही बदल घडावा असं वाटत असेल, तर तुम्हीच तो घडवून आणला पाहिजे. कमीत कमी त्या प्रक्रियेत सहभागी तरी व्हायला पहिजे. वास्तविक, व्यवस्थेला दूषणं न देत बसता बदल घडवून आणण्याच्या इच्छेने काम करणार्यांची संख्या आपल्याकडे तशी कमी नाही. लहान मुलांसाठी, वेश्यांसाठी, आदिवाशांसाठी, प्राण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करणार्या संस्था आणि व्यक्ती अनेक आहेत. भ्रष्टाचार, हिंसा, जातीयता यांच्याविरुद्ध लढा देणारेही खूप. पण आपली व्यवस्थाच अशी आहे, की कितीही केलं तरी ते अपुरंच पडावं. मात्र चांगला बदल घडवून आणण्याचा वसा घेतलेली ही मंडळी न थकता, न कुरकुरता काम करतच राहतात.
डॉ. संग्राम आणि डॉ. नूपुर पाटील हे दांपत्यही गेली काही वर्षं खेड्यातल्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी झटत आहे. भारतातला भ्रष्टाचार, वैद्यकीय क्षेत्रात बोकाळलेले गैरव्यवहार यांविषयी दुरून भाष्य न करता स्वतःच्या वर्तणुकीतून त्यात बदल घडवायचा प्रयत्न हे दोघं करत आहेत. आपली ही कहाणी त्यांनी मांडली आहे 'परत मायभूमीकडे' या पुस्तकात. संग्राम पाटलांचा हा प्रवास दहिगाव नावाच्या अतिशय अप्रगत खेड्यापासून सुरू होतो, तो पुण्यामार्गे जाऊन तब्बल पाच वर्षे स्थिरावतो इंग्लंडमध्ये. तिथल्या सुखसोयी, पैसे, मान या गोष्टींनी पाटलांना मोहात पाडतो. आणि मग धोपटमार्गाला चाट देऊन अतिशय वेगळं वळण घेऊन परत येतो तो जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल या तशा अनुल्लेखनीय गावी. एरंडोलला उभारलेलं हॉस्पिटल, सुरू केलेली शाळा, या प्रवासात आलेल्या अनेक अडचणी, विविध प्रसंग, हा मार्ग आखायला कारणीभूत ठरलेल्या घटना, भारतातली, विशेषतः खेड्यांमधली दयनीय आरोग्यस्थिती, त्यावर उपाय शोधण्यासाठी सुरू केलेलं सामाजिक कार्य आणि त्यात मिळणारं यश या सगळ्याची सुरस पण सत्यकथा म्हणजे 'परत मायभूमीकडे'.
पाटलांचं प्राथमिक शिक्षण झालं दहिगाव या खेड्यात. अगदी बेताच्या आर्थिक परिस्थितीत. आईवडिलांनी आर्थिक परिस्थिती सुधारायला रात्रंदिवस घेतलेले कष्ट, गावातली गरिबी, अस्वच्छता, उकिरडे, हागणदार्या, त्यांतून उद्भवणारे रोग या सगळ्या गोष्टी पाहत ते वाढले. खेड्यात वेळीच उपचार न झाल्यामुळे जीव गमावलेले बापूकाका, घरगुती उपचारांत वेळ दवडल्यामुळे मृत्यू पावलेला चुलतभाऊ करण, 'अपघातानं' आगीत भाजून यमसदनी जाणार्या अनेक नवविवाहिता या घटनाही त्यांना अस्वस्थ करत. गावात कधीतरी पेटी घेऊन फिरणार्या डॉक्टरांनी त्यांच्या भावाच्या भळभळ वाहणार्या खोकेला टाके घालायला पैशांअभावी दिलेला नकार त्यांच्या मनात खोलवर रुतला. या सगळ्या घटना पाहून त्यांचा 'आपल्या कुटुंबियांसाठी, गावबांधवांसाठी आपण डॉक्टर व्हायलाच हवं' हा विचार पक्का झाला.
पुण्यात बी.जे. महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस केलं. तिथे त्यांना भेटली मूळची विदर्भातली, पुण्यात सधन कुटुंबात वाढलेली नूपुर. आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीत खूप तफावत असूनही 'डॉक्टर होऊन ग्रामीण / आदिवासी भागात काम करायचंय' एवढ्या एका विचारानं त्या दोघांना जवळ आणलं. पुढच्या प्रवासात त्यांना भारतीय आरोग्यसेवेला लागलेलं गैरमार्गांचं आणि भ्रष्टाचाराचं ग्रहण जवळून पाहायला मिळालं. आपल्या सुपरवायझर्सची पद्धतशीर चमचेगिरी करणं, त्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे लाटणं, परीक्षकांना पैसे चारणं हे सगळं त्यांनी पाहिलं. याला कंटाळून, आणि परिपूर्ण वैद्यकीय ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगून, आणि गाठीला चार पैसेही कमावून होतील, नवीन अनुभव मिळतील अशा विचारांनी संग्राम व नूपुर पाटलांनी काही वर्षांसाठी इंग्लंडला जायचं ठरवलं. इंग्लंडमध्ये असताना नोकरी मिळेपर्यंत पैशांची चणचण असल्यामुळे पाटलांना फार कठीण परिस्थितीत राहावं लागलं.
नोकरी मिळाल्यानंतर मात्र अतिशय वेगानं त्यांचं आयुष्य स्थिरस्थावर झालं, सुबत्ता आली. एका नोकरीनंतर दुसरी नोकरी, नवीन गाडी, घर, केवळ भारतातच नव्हे तर परदेशांमध्येही गुंतवणुकी असा प्रगतीचा झपाट्यानं चढणारा आलेख पाटलांनी आक्रमिला. पुढीच पाच वर्षांच्या काळात ब्रिटिश वैद्यकीय सेवेतले, तसेच दैनंदिन जीवनातले अनेक बरेवाईट अनुभव त्यांना आले. मात्र परदेशातलं राहणीमान त्यांना आवडलं. तिथले लोक फारसे आवडले नसले, तरी सुखासीन जीवनशैली त्यांना भावली. इतकी की, ब्रिटिशांची कार्यमग्नता आणि कार्यतत्परता, समता, शिस्तबद्ध वाहतूक, पारदर्शकता यांबरोबरच तिथला पैसा, सुखसोयी, सुबत्ता यांचं पाटलांनी केलेलं वर्णन बरेचदा अमेरिकेवर लिहिल्या गेलेल्या कणेकरी लेखांची आठवण करून देतं. परंतु उत्तम करिअर, गडगंज पैसा, प्रतिष्ठा या नेत्रदीपक प्रगतीवरच ही गोष्ट संपत नाही. अतिशय गरीब गावात, वंचित समाजात वाढलेला एक हुशार मुलगा कष्ट घेतो, घवघवीत यश मिळवून डॉक्टर बनतो, परदेशात जातो, आणि आयुष्यात यशस्वी होतो, एवढीच ही एक 'सक्सेस स्टोरी' नाही. पाटील यापुढे जातात, सर्व सुखसुविधांना तिलांजली देत, आपल्याला असलेल्या सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवत पुन्हा भारतात परततात.
पूर्वीपासूनच ग्रामीण भागातले उपचारांशिवाय मृत्यू पावणारे रुग्ण त्यांना खुणावत होते. आपल्या देशाला आपली प्रचंड गरज आहे या भावनेनं त्यांच्या मनात घर केलं. इंग्लंडला येण्याआधीच अभय आणि राणी बंग यांच्यापासून ते प्रेरित झाले होते. आपले अनुभव आणि नैपुण्य आपल्या देशवासीयांच्या कामी आणण्यासाठी भारतात परतण्याचा त्यांचा विचार पक्का झाला आणि मागास एरंडोलची निवड करून त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा झालेला प्रादुर्भाव, व्यसनाधीनता, गर्भलिंगनिदान असे प्रश्न हाताळण्यासाठी, तसंच शैक्षणिक क्षेत्रातही काम सुरू करण्यासाठी 'सम्यक फाउंडेशन' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. सुसज्ज रुग्णालय त्यांनी सुरू केलंय. डॉ. नूपुर या खानदेशातल्या एकमेव बालनेत्रतज्ज्ञ आहेत. तिथल्या रुग्णांनी या दोघांना मनापासून स्वीकारलं आहे. जोमानं सुरू केलेल्या या कामाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
आता एक जरा वेगळी वाटलेली बाब. एरंडोल इथे सुरू केलेलं हॉस्पिटल, नुकतीच सुरू केलेली शाळा याविषयी आपण पुस्तकात वाचतो. ’ह्यांच्या कामाला आत्ता कुठे मूर्त स्वरूप येतंय. हे करतायत हे काम स्पृहणीय नक्कीच आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुकही करावं तेवढं थोडंच आहे. पण काम सुरू करून इतका कमी काळ झालेला असताना एवढ्यात पुस्तक काढायची यांना घाई काय होती?’ असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. कारण अश्या अनेक स्फूर्तीदायी कहाण्या, चरित्रं आपण वाचलेली असतात. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांत आपापला ठसा उमटवणारे लोक आपण पाहिलेले असतात. अभय आणि राणी बंग आहेत, प्रकाश - मंदा आमटे आहेत, 'चाकाची खुर्ची'वाल्या नसीमा हुरजूक आपल्याला माहीत आहेत. विंचूदंशाशी लढा दिलेले हिंमतराव बावीसकर, अनेक अनाथ मुलांची आई झालेल्या सिंधूताई सपकाळ, मुक्तांगण चालवणारे अवचट असे अनेक 'रिअल लाइफ हीरोज्' आपल्या समोर आहेत. मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यावर पुस्तकं आहेत, त्यांची व्याख्यानं आपण ऐकली असतील. काम सुरू केल्यानंतर अनेक वर्षांनी, किंवा काही दशकांनीही जगासमोर प्रसिद्धीस आलेले हे सामाजिक कार्यकर्ते, आणि नुकत्याच सुरू केलेल्या कामाविषयी पुस्तक लिहून आपल्यासमोर आलेले संग्राम आणि नूपुर पाटील यांत असा फरक का दिसतो?
सुरुवातीच्या काळात जेव्हा कामाची घडी बसवायची असते, विविध उपक्रम हाती घेऊन पार पाडायचे असतात, नवीन संस्था स्थापन करायच्या असतात तेव्हा दोनच हात पुरे पडणं शक्य नसतं. मनुष्यबळाची खूप गरज असते. शिवाय प्रचंड आर्थिक पाठबळाचीही गरज असते. आपल्या आणि आपल्या समाजाच्या दुर्दैवानं, डोंगराएवढं काम करून झाल्यानंतरच हे बाकीचे लोक चर्चेत आले. यांनी उभ्या केलेल्या एवढ्या मोठ्या सामाजिक कार्यामागचे कष्ट लोकांना खूप उशिरा समजले. यांच्या कामाला वेळीच प्रसिद्धी मिळाली असती, तर कदाचित त्यांना जी ओढाताण, कष्ट यांतून जावं लागलं ते काही प्रमाणात कमी झालं असतं. यांच्या सामाजिक चळवळीत सामील होण्यासाठी अनेक कार्यकर्ते सुरुवातीपासूनच यांना कदाचित लाभले असते. आपण परदेशातून परत येऊन हे काम करतोय म्हणून आपण कसे 'ग्रेट' आहोत असा सूर पुस्तक वाचताना मुळीच जाणवत नाही. त्यामुळे स्वतः प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी उतावीळ होऊन हे पुस्तक लिहिलंय असं वाटत नाही. उलट या पुस्तकामुळे जर अधिक लोकांपर्यंत आपलं काम पोचलं, अनेकांपुढे आपले विचार पोचले, या कामाची गरज लोकांना खरंच पटली, तर मदतीचे अनेक हात स्वतःहून पुढे सरसावतील, अशी आशा हे पुस्तक लवकर प्रकाशित करण्यामागे असावी असं वाटतं.
डॉ. अभय बंगांनी त्यांच्या सुरेख प्रस्तावनेत वैद्यकीय सेवेतल्या गैरव्यवहारांबद्दल आणि हल्लीच्या तरुणाईबद्दल भाष्य केलं आहे. डॉक्टरकी ही सेवा नसून धंदा झाला आहे, असं आपण हल्ली सतत ऐकत असतो. कट प्रॅक्टिस, गमावलेली विश्वासार्हता यांमुळे प्रत्येक डॉक्टराकडे साशंक नजरेने बघितलं जातं. पण आपल्या रुग्णांची मनोभावे सेवा करणारेही असंख्य डॉक्टर आहेत. डॉ. आरोळे, डॉ. विकास - भारती आमटे, डॉ. रवी - स्मिता कोल्हे यांनी घडवून आणलेले बदल तर खूप व्यापक आहेत. ही परंपरा डॉ. संग्राम आणि डॉ. नूपुर पुढे चालवत असले, तरी आपला मार्ग न सापडणार्या इतर असंख्य तरुणांचं काय? व्यवसाय, संपत्ती, सुरक्षितता एकीकडे, तर समाजातल्या समस्या दुसरीकडे. मग आपल्या शिक्षणाचं प्रयोजन काय? केवळ पैसा मिळवणं की त्या शिक्षणाचा वापर करून स्वत:बरोबर इतरांनाही पुढे नेणं? आजच्या तरुणांना हा दुसरा मार्ग स्वीकारणं खरं म्हणजे कठीण नाही. संग्राम पाटलांना जे दहीगावात दिसलं, मेळघाटात दिसलं, ते आपण रोजच अवतीभवती पाहत असतो. त्यामुळे इच्छा असेल, तर हा मार्ग सहज निवडता येतो.
'ही तर केवळ सुरुवात आहे' असं खुद्द संग्राम पाटीलच पुस्तकाच्या शेवटी म्हणतात. अजून किशोरावस्थेत असलेल्या या चळवळीला जाणकारांकडून नेमकं मार्गदर्शन मिळावं, समविचारी लोकांना या चळवळीत सामील होता यावं असा आशावाद या पुस्तकामागे आहे, असं मला वाटतं. भारतातली तरुणाई हे भारताचं बलस्थान, असं वारंवार म्हटलं जातं. तरुणाईची ऊर्जा याच देशाच्या विकासासाठी खर्च व्हावी, असं अनेकजण अनेकदा म्हणत असतात. पण नक्की करायचं काय, हे कोणी सांगत नाही. एका विवेकी तरुणाचा हा डोळस प्रवास आजच्या तरुणांना योग्य मार्ग दाखवेल असं वाटतं.
खुपच छान माहिती. याला
खुपच छान माहिती. याला प्रतिसाद का मिळाले नाहीत?
उत्तम धागा इतर लोकानी पहावा
उत्तम धागा इतर लोकानी पहावा म्हणुन हा प्रतिसाद.
सुंदर पुस्तक आणी छान परिक्षण.
सुंदर पुस्तक आणी छान परिक्षण.
सुरेख पुस्तकाची ओळख करून
सुरेख पुस्तकाची ओळख करून दिलीस आर्फी. मिळवून वाचणार नक्की
'आदर्शवादी डॉक्टर' असे पात्र
'आदर्शवादी डॉक्टर' असे पात्र नजरेसमोर ठेवून चित्रपट कथा लिहिल्या जातात (उदा. अनुराधा, तेरे मेरे सपने) पण प्रत्यक्ष जीवनातही असे डॉक्टर अगोदरच्या सर्व सुखसोयीवर पाणी सोडून एका विशिष्ट ध्येयाने समाज कार्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचा संकल्प सोडतात त्यावेळी घरची आणि बाहेरचेदेखील त्यांची तसल्या 'मूर्खपणाच्या संकल्पने'ची चेष्टाच करतात. अशावेळी त्याकडे अजिबात लक्ष न देता आपली वाटचाल अथकपणे चालू ठेवण्यार्यांच्या जिद्दीला आपण सर्वसामान्यांनी सलामच केला पाहिजे. डॉ.संग्राम पाटील आणि त्यांच्या तितक्याच जिद्दीच्या सुविद्य पत्नी डॉ.नुपूर पाटील यांच्या आदर्शवत कार्याचा तितकाच चांगला परिचय या निमित्ताने आर्फी यानी करून दिला आहे असे म्हणावे लागेल.
"इतका कमी काळ झालेला असताना एवढ्यात पुस्तक काढायची यांना घाई काय होती?” असा प्रश्न पडणे साहजिकच आहे, पण पुढे आर्फी यानीच म्हटल्याप्रमाणे आजच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात अशा एखाद्या ध्येयवादी जोडप्याची कहाणी जर आत्ताच सर्वत्र जाणे त्यांच्या कार्याच्या दृष्टीने उपयुक्त होणार असेल तर या पुस्तकाच्या प्रकाशनाचे प्रयोजन ठीकच आहे असे म्हटले पाहिजे.
डॉक्टरांच्या कार्यास शुभेच्छा देतानाच आर्फी यानाही इतक्या चांगल्या कार्याची इथल्या माध्यमाद्वारे आम्हास योग्य ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद.
छान परिक्षण...!
छान परिक्षण...!
एका उत्तम काम करणार्या
एका उत्तम काम करणार्या डॉक्टर दा.पत्याची तितकीच उत्तम ओळख.
चांगल्या पुस्तकाची ओळख करुन
चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद आर्फी. नक्की वाचणार.
पण काम सुरू करून इतका कमी काळ
पण काम सुरू करून इतका कमी काळ झालेला असताना एवढ्यात पुस्तक काढायची यांना घाई काय होती? >>
शाब्बास आर्फी.
डोळे उघडे ठेवून वाचण्याला दाद. हा प्रश्न आणि उत्तर दोन्ही आवडले.
सुरेख लिहिले आहेस आर्फी!
सुरेख लिहिले आहेस आर्फी!
उत्तम रसग्रहण !
उत्तम रसग्रहण !
पुस्तकाचा चांगला परिचय करून
पुस्तकाचा चांगला परिचय करून दिला आहे.
संग्रामशी माझी व्यक्तिगत ओळख आहे.
बाकी बारामतीला राजधानीचा दर्जा मिळाल्याचे मला माहीत नव्हते.