अंतरीचे धावे
लेख़क : भानू काळे
प्रकाशक मौज प्रकाशन
प्रकाशन: जून २००९
'अंतरीचे धावे' च्या निमित्ताने ..
वृत्तपत्रे आणि मासिके यातले बरेचसे चांगले वाचन हे योगायोगाने होत असते. मी ५-७ वर्षांपूर्वी मद्रासला राहात असताना मुंबईला भेटायला आलो की वडील 'म.टा' 'लोकमुद्रा' वगैरेची जपून ठेवलेली कात्रणे मला देत असत (कारण तिथे मराठी कसे मिळणार?!). एका पुरवणीत संपादकांनी भानू काळेंचे 'बदलता भारत' या पुस्तकातले मनोगतच छापले होते. ते मला खूप आवडलेच, पण त्याचबरोबर 'अंतर्नाद' नावाचे मराठी भाषा आणि समाज याला वाहिलेले एक छोटेखानी मासिक गेले कित्येक वर्षे काळे पति-पत्नी चालवितात हेही कळले. मग प्रथम 'बदलता भारत' चा फडशा पाडणे आणि तत्परतेने अंतर्नादचा वर्गणीदार होणे आणि त्यातून विविध विषयांवर होणाऱ्या लेखनाचा आस्वाद घेणे या गोष्टी ओघाने आल्याच! बरेचसे अंक वाचल्यावर आपण अंतर्नादचे वर्गणीदार आधीच का झालो नाही याची खंत वाटू लागली, त्यात इतरांच्या लेखनाबरोबर संपादकांच्या स्वतःच्या शैलीचाही सिंहाचा वाटा आहे. सुदैवाने अंतर्नादच्या सुरुवातीपासून २00७पर्यंत वेळोवेळी त्यांनी लिहिलेली मनोगते आणि दीर्घ लेख याचे संकलन मौज प्रकाशन गृहाने 'अंतरीचे धावे' या नवीन संग्रहात केले आहे, त्याची ओळख सुजाण वाचकांना व्हावी हाच या लेखाचा प्रपंच.
यातला पहिलाच लेख महात्मा आणि हरीलाल या बापलेकांच्या तणावपूर्ण संबंधांवरील "प्रकाशाची पडछाया" या अनुवादित पुस्तकावर आहे. हरीलाल हा गांधींचा तुमच्या आमच्या सारखा नैसर्गिक आवडी निवडी व आकांक्षा असणारा मुलगा. गांधींच्या काहीश्या टोकाच्या भूमिकांमुळे मनात व घरात झालेला कोंडमारा व पुढे जगात झालेली शोभा याचा सारांश काळे यांनी फार संयमाने रंगविला आहे! 'रंगविला' शब्द अशासाठी की हा लेख एका कादंबरीवर आहे याचे भान त्यांनी राखलेले आहे. आजही समाजातल्या यशस्वी किवा प्रसिद्ध व्यक्तींच्या घरात थोड्याबहुत फरकाने हेच घडत असेल का?
हा लेख संपतो ना संपतो तोच आर एम लाला यांचे टाटा समूहाशी असलेले संबंध व त्यांनी समर्थपणे वर्णन केलेली जे आर डी यांची जडण-घडण यावर एक सुंदर लेख येतो. त्यातल्या मोजक्याच गोष्टी व्यवस्थापन शैली, ऐयर इंडियाबद्दलचे त्यांचे प्रेम आणि पुढे त्यातूनच त्यांच्या वाट्याला आलेली कटूता यावर काळे छान टिप्पणी करताना दिसतात. एखादी कंपनी निव्वळ नफ्याइतकेच महत्त्व सामाजिक बांधिलकी आणि Human Resources या गोष्टींनाही देऊ शकते याचा प्रत्यय येतो. अर्थात १९९१ नंतर रतन टाटांच्या नेतृत्त्वाखाली टाटा ग्रुप बराच बदलला आहे खरा. परंतु आपला मूळ पंथ त्यांनी सोडलेला नाही, हे मी स्वतः जमशेदपूर आणि कुर्ग येथे गेल्या ४-५ वर्षात अनभवलले आहे. एवढंच काय पण ती वृत्ती त्यांच्या काही suppliersकडेही मी अनुभवलेली आहे, तो निव्वळ योगयोग नव्हे! हे दोन लेख वाचकांची पकड घेतात.
काळे स्वतः एके काळी मुद्रण-व्यवसायात होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी बरीच मुशाफिरी केली आहे. साहजिकच त्यांनी 'इंडिया टुडे'चे सर्वेसर्वा अरुण पुरी यांची वाटचाल फार आत्मीयतेने आणि या क्षेत्रातल्या बारकाव्यासह मांडली आहे. चांगल्या समाजाभिमुख (त्याचप्रमाणे चटकदार) विषयांवर अद्ययावत तंत्रद्यानाचा वापर करून एक मासिक निघते आणि निव्वळ अभ्यासपूर्ण लेख व आकर्षकता यामुळे ते दिवसेंदिवस लोकप्रिय होत जाते ही कल्पनाच ८० मधे करवत नसे! माझे इंग्रजी मासिके वाचायचे वेडही 'इंडिया टुडे'पासूनचेच. पत्रकारांना त्यांनी त्यावेळी दिलेल्या सोयी आणि स्वातंत्र्य हे आज ३० वर्षानंतर बऱ्याच ठिकाणी मिळत नसतील. आणि आणीबाणी व दहशतीच्या काळात एखादी बातमी खरी असेल तर ती छापण्याचे धारिष्ट्य -- हे तरी आज कुठे दिसते? बरीचशी पत्रकार मंडळी, नेते आणि नोकरशहा यांच्यात मिलीभगत वाटते. त्यामुळे अरुण पुरीन्सारख्या व्यक्तीबद्दल अचंबा वाटतो. पत्रकारितेच्या (आणि इतरही!) क्षेत्रात पुढे नाव कमावलेली अरुण शौरी, प्रनोय रॉय, वीर सिंघवी, प्रभू चावला वगैरे मंडळी हा द्रष्टा नसता तर कुठे राहिली असती हाही प्रश्न मनात येऊन जातो (त्यातल्या किती जणांनी आज खरी 'पत्रकारिता' चालवली आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे!). काळे यांनी या लेखच शेवट फार सुंदर केला आहे, "तसे पाहिले तर अंतर्नाद आणि इंडिया टुडे यात कसलेही साम्य नाही. तरीही तो मी आवडीने वाचतो आणि त्याच्याविषयी माझ्या मनात आदराची भावना आहे"
शांता शेळकेंवरची त्यांची आदरांजली ही एका अतिशय गुणी परंतु हाडामासाच्या एका लेखिकेचे मूल्यमापनही आहे. शांताबाई किती व्यासंगी, अभ्यासू तितक्याच साध्या आणि भावूक होत्या याची प्रचीती हा लेख वाचताना येते. "त्यांचे इंग्रजी वाचन किती चौफेर होते याची कल्पना त्यांच्या मराठ्मोळ्या अवताराकडे बघून पटकन येत नसे" अशा अर्थाचे त्यांचे प्रांजळ आणि अचूक निरीक्षण मला खूप भावले! एका बाईने त्या काळात कविता, लेखन, गीत व पटकथालेखन या काहीश्या पुरुषी प्रांतात स्वतःचा स्पष्ट ठसा उलटवला (माझयामते अगदी गदिमा किंवा खेबुडकर यांच्या तोडीस तोड!) याचे ते तोंड भरून कौतुक करतात. "हे श्यामसुंदर राजसा" किव्वा "तोच चंद्रमा नभात" या गाण्यांचे चपखल आणि चालीनुरूप शब्द त्याचीच साक्ष देतात. त्याचबरोबर एक संपादक म्हणून जाणवलेले स्वभावविशेष, त्याचप्रमाणे हरहुन्नरी वृत्तीमुळे त्यांच्या "legacy"ला आलेल्या मर्यादा यावरही ते स्पष्टपणे लिहितात, पण तेही शान्ताबाइन्वरच्या जिव्हाळ्यापोटीच! मृत्युलेखात अतिरंजित कौतुकच व्हायला पाहिजे का हा मुद्दा ते नकळतपणे मांडतात. एक मर्यादा ठेवून असे प्रांजळ विश्लेषण लिहिले तर वाचकांना गेलेली व्यक्ती कदाचित जास्त जवळची वाटेल.
'ब्रायटनची छत्री' व 'असाही एक भारत भाग्यविधाता' या लेखांत परकियांच्या सुज्ञपाणाचे व दूरदर्शीपणाचे दर्शन ते घडवितात. शास्त्रीजी, रवीन्द्रनाथ, कोशकार केतकर हे व्यक्तीपर लेख आणि धार्मिक/सामाजिक प्रश्नांवर लिहिलेले तात्कालिक लेख यातून एक गुणग्राहक संपादक आपल्याला भेटतो. हल्लीच्या गल्लाभरू आणि बाजारू संस्कृतीवरही त्यांची टिप्पणे वाचनीय आहेत. त्यात काहीसा भाबडा परंतु आशावादी सूर आहे, मात्र अतिरेकी आदर्शवाद नाही. नवनवी उत्पादने, सुखसोयी याच्या आपण पूर्णतः आधीन होऊ नये एवढे ते हलकेच सुचवतात. नाहीतर "विदेशी गाड्या जाळा" "कोक त्यागा" "इंग्रजी सोडा" हे लोकांना सांगणारे नेते, विचारवंत आपल्या खाजगी आयुष्यात काय करतात हे आपण TV वर पाहतोच!
एका छोट्या मासिकाचे पालन संपादन करताना आलेल्या अडचणी पण त्यातून मिळणारे आंतरिक समाधान यावर एका लेखात त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. मी वाचलेल्या चिंतनपर लेखांपैकी तो एक सर्वोत्तम लेख आहे, आणि त्यात कुठेही हुतात्मा झाल्याचा सूर नाही! आपण जाणीवपूर्वक एक कार्यायज्ञ मांडला आहे आणि मराठी माणसाला यथाशक्ती सकस आणि शुद्ध लेखन देत रहाणे हेच त्याचं ब्रीद व हीच त्यांची उर्जा हे वाचकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांना चिंता असलीच तर मासिक स्वबळावर दीर्घकाळ कसे तगेल, कालानुरूप त्यात काय बदल झाले पाहिजेत, आणि ते करताना मूळ उद्देश व निष्ठावंत वर्गणीदार यांच्यावर अन्याय होणार नाही ना याची आहे! "सत्यकथा" बंद करण्यामागची श्री पु भागवतांची भूमिका (जी त्यांनी एक लेखात मांडली होती, आणि पुढे "सत्यकथा" बन्द करावे लागले) आणि भानू काळेंचा हा लेख यात मनाला चटका लागणारे साधर्म्य आहे. परंतु ते कटू वास्तव आहे आणि हे आपण वाचकांनीच बदलायचे आहे. आज ४-५ जणांचे कुटुंब उडप्याच्या हॉटेलात जेवायला गेले तर जितके बिल होते तितकीच अंतर्नाद्ची वार्षिक वर्गणी आहे! मग १० कोटीच्या महाराष्ट्रात ३००० पेक्षा ज्यास्त वर्गणीदार का मिळू नयेत? शेकडो कोटींचे व्यापार करणारे आणि समाजात "मराठी" म्हणून मिरवणारे उद्योजक अंतर्नादसारख्या उपक्रमांना भरभरून जाहिराती का देऊ शकत नाहीत हे प्रश्न मलाही पडतात. जणू काही आपण मराठी सांभाळण्याची जबाबदारी फक्त काळेन्साख्या लोकांवर सोयीस्करपणे टाकून मोकळे होतो.
हे पुस्तक वाचून काळे हे काय ताकदीचे लेखक, संपादक आहेत याची कल्पना येते आणि लगेच जाणवते की हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून अग्र/लेख लिहिणारे संपादक नाहीत. अर्थात मासिक असल्याने तात्कालिक घटनावरही ते मोजक्या शब्दात भाष्य करताना दिसतात. परंतु अर्थकारण, राजकारण, जागतिकीकरण आणि त्याचे मराठी समाजावर व भाषेवर होणारे बरेवाईट परिणाम हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे व त्यात ते खरे रमतात. आणि ते करताना उसनं ढोंग आणण्यापेक्षा सुसंस्कृत, शहरी व मध्यमवर्गीय या आपल्या कक्षा ते सोडत नाहीत. बहुतांशी स्वतः अनुभवलेल्या (यथाशक्ती प्रवास किवा शोधयात्रा करून) व स्वतःला भावलेल्या गोष्टींवरच ते मोकळेपणे लिहितात. शिवाय त्यात राणा भीमदेवी थाटाचे लेखन नसते किंवा "मी सांगत नव्हतो?" ही आत्मप्रौढीही नसते. आपला मुद्दा माहितीचा आधारावर ते सभ्यपणे पण नेटाने मांडत राहतात. वरवर अनाग्रही वाटणारे हे लेखन डोळसपणे वाचले तर आपल्याला अंतर्मुख करून जाते. म्हणूनच या संग्रहाचे नाव शीर्षक अतिशय सार्थ आहे हे वाचकांनाही जाणवेल.
वा! सुरेख पुस्तकाचा परिचय.
वा! सुरेख पुस्तकाचा परिचय. नक्की मिळवून वाचणार.
छान परिचय. धन्यवाद.
छान परिचय. धन्यवाद.
रैना +१ अमेरिकेत
रैना +१
अमेरिकेत राहणार्यांना 'अंतर्नाद' चं वर्गणीदार इंटरनेट वरून होता येतं का?
हे पुस्तक वाचून काळे हे काय
हे पुस्तक वाचून काळे हे काय ताकदीचे लेखक, संपादक आहेत याची कल्पना येते आणि लगेच जाणवते की हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून अग्र/लेख लिहिणारे संपादक नाहीत>>> अगदी.
सुंदर परिक्षण. बदलता भारत आवडलं होतं. आता हे सुद्धा वाचायला हवं.
सुंदर परिक्षण. परवाच टण्याने
सुंदर परिक्षण. परवाच टण्याने पण ह्या पुस्तकाबद्दल लिहिले कुठे तरी.
प्रकाशन जून २००९ अंतर्नादचे
प्रकाशन जून २००९
अंतर्नादचे तुम्ही अमेरिकेत पण वर्गणीदार होवू शकता. मराठीत माझ्या माहितीतल्या थोडक्या वाचनीय मासिकांपैकी एक आहे. bhanukale@gmail.com वर त्यांना संपर्क करून विचारू शकता.
'मी वाचलेले पुस्तक' ह्या धाग्यावर लिहिले होते बहुदा मी. ह्यातले बहुसंख्य लेख वाचनीय आहेत. काळ्यांची एक संपादक म्हणुन असलेली नजर ह्या लेखातूनही दिसते. पण काही लेख उगाच प्रवचनीय वाटतात. ते साहित्याशी, कलेशी (चित्रपट श्वासवरील लेख) वा नियतकालिके/पत्रकारिता (अंतर्नादच्या दशकपुर्तीवरचा लेख वा इंडिया टूडेवरचा लेख) संबंधित विषयांवर जेव्हा लिहितात (मग भले गांधी-हरिलाल ह्यांच्यावरचा लेख जरी रुढार्थाने साहित्यिक लेख नसला तरी एका पुस्तकाचे रसग्रहण अश्या अंगानेच येतो) तेव्हा त्यांच्या लिखाणाचा दर्जा उत्तमच आहे. पण 'बाजारु संस्कृतीच्या विळख्यात' वगैरे लेखात ते अगदी दवणे पातळीचे वाटतात. पण हे पुस्तक नक्कीच वाचनीय (तसेच अंतर्नाद मासिकदेखील).
थॅन्क्यू टण्या.
थॅन्क्यू टण्या.
मस्त परिचय. रसग्रहण आवडलं.
मस्त परिचय. रसग्रहण आवडलं.