ती परतीची वाट होती.
एका काळापासुन ह्याच वाटेवर पुढे पुढे धावत होतो. नदी-नाल्यांतून, राना-वनांतुन, झुडुपांतून, काट्यांतून मार्ग काढत होतो. मृगजळा मागे पळत होतो स्वतहालाच छळत होतो. वाटेत काय भेटले नी काय सुटले ह्याचा कधी हिशोब केला नव्हता. पुढे जाताना कधी मागे पाहीलेही नव्हते कोणाचे ऐकलेही नव्हते. चूक-बरोबर, चांगले-वाईट, खरं-खोटं... तेव्हां कसलाच विचार केला नव्हता.
वेड्या मनाच्या हाकेला मी ही हात दिला होता आणी डोळ्यांत स्वप्न घेउन निघालो होतो दूर च्या प्रवासाला. कदाचीत कधीच् न संपणारा प्रवास...
दूर कुठे तरी जाउन अवनी आणी अंबर सुद्धा एकत्र येतात!... त्या क्षितीजा पलिकडे म्हणे कुठलेच अंतर "अंतर" उरत नाही. सगळं विश्वच एकटवतं एकाच ठिकाणी. डोंगर, द़र्या, नदया, सागर, झाडे सगळेच लांब त्या क्षितीजाशी एकत्र जमलेले दिसतात. चंद्र, सुर्य ही तीथेच तर येतात धरेला भेटायला... दररोज... अगदी न चुकता!
तेव्हा मलाही त्या क्षितीजाचीच् ओढ होती. तीथेच मला माझं हरवलेलं विश्व भेटणार होतं... कदाचीत!
...................................................................................
पण... पण आता मात्र ती परतीची वाट होती.
आता डोळ्यांत स्वप्न उरलं नव्हतं. क्षितीजा कडे जाण्याची ओढ नव्हती. कोणत्याही सुखाची आस नव्हती. सतत टोचणा़ऱया आठवणीही नव्हत्या.
गेली कितीतरी वर्षे ह्या वाटेवर धावता-धावता स्वतहालाच हरवून बसलो होतो आता मात्र स्वतहाच स्वत:च्या शोधात निघालो होतो.
परतीच्या मार्गावर, एकांत जंगलातून चालता चालता सांज उलटून कधीच काळोख पसरला होता. एकेरी वाटेत पुन्हा सोबतीला फ़क्त चंद्र होता आणी सोबत होता आठवणींचा शितल वारा. एक एक पाउल मोजुन मापुन पडत होते. अशातच्, त्या भयाण शांततेत झुडुपांमागे कसलीशी चाहूल झाली.
थोडं घाबरतच मी त्या दिशेने वळालो. नीटं पाहीलं तसं तीथे बरेचशे लहान लहान जीव दिसले.
काळोख्या अंधारात दबकुन बसलेले,
त्या भयाण वातावरणात एकटेच असलेले,
वाटेत कुठे तरी फ़सलेले,
आणी स्वतहाशीच रुसलेले.
कधी ह्याच वाटेत रमलेले,
मग धावता-धावता दमलेले,
शेवटी नशिबा पुढे नमलेले,
आणी एकमेकांच्या सोबतीला एकत्र जमलेले.
... अगदी माझ्या सारखे, माझ्या इतकेच एकटे.
ते गोंडस होते.
ते निरागस होते.
ते शांत होते.
ते अबोल होते.
ते अनेक होते, ते असंख्य होते तरी एकटेच होते.
... ते "शब्द" होते !!
काही मायबोलीतले,
काही परप्रांतातले,
काही रोजच्याच व्यव्हारातले,
काही फ़क्त राजाच्या दरबारातले,
काही गंगेसोबत वाहत-वाहत आलेले,
काही समुद्रांपलिकडले पण इथलेच झालेले,
काही इतिहासातून आलेले,
काही इतिहासजमा झालेले,
... ते "शब्द" होते.
मी त्यांच्या कडे पाहीले. मोठ्या आशेने तेही माझ्या कडे बघत होते.
आयुष्याच्या जंगलातून एकट्याने प्रवास करुन मी ही आता कंटाळलो होतो. मलाही कुणाची साथ हवीच होती. त्या एकाकी जंगलात मला त्यांची आणी त्यांना माझी ’गरज’ होती... कदाचीत.
"गरज... किती महत्वाची असते ही गरज! कुठल्याही नाते-संबंधात ही गरज ’मधे’ नसली की सगळं व्यर्थे! कोणी कोणासाठी कितीही काहीही केले तरी गरज जर दोन्ही बाजुंनी नसली की त्या ’कितीही काहीही’ करण्याला काहीच अर्थ उरत नाही. सगळं जग फ़क्त गरजांवरच चालतं".
"आताशा मी ही ठरवलं होतं. आता गरजे शिवाय कोणासाठीच काहीच करायचं नाही. गरज असेल तर समोरचा स्वतहून येईल. स्वतहून हात पुढे करेल. कोणी स्वताहून हात पुढे केल्याशिवाय आपणही पुढाकार घ्यायचा नाही... मग आयुष्य एकटं जगावं लागलं तरीही चालेल".
मी त्यांच्या कडे पून्हा पाहीले, त्यांच्या डोळ्यांत ती "गरज" शोधण्यासाठी. त्या सर्वांनीच हात पुढे केलेले होते. त्यांच्या हातात एक अबोल "हाक" होती आणी अनेक वचने होती त्यांच्या त्या निरागस डोळ्यांत.
"काही वचने दयायची किंवा घ्यायची नसतात, ती फ़क्त पाळायची असतात. डोळ्यांनीच डोळ्यांना सांगायची असतात आणी खोल कुठेतरी हळुवारपणे जपायची असतात."
अशीच कित्येक वचने मी ही कधी कितीतरी वर्षे पाळली होती. काही स्वप्नाशी केलेली वचने तर काही स्वतहाशीच् केलेली. खूप खूप जपली होती... अगदी गरज नसतांना सुद्धा!
पण आता मात्र दोन्हीं बाजुंनी गरज होती. आशा होती. हाक होती. वचने ही होती... पण तरी... तरी कुठल्याश्या भितीने माझा हात त्यांच्या कडे जात नव्हता. माझे डोळे त्यांच्या कडे स्थिरावत नव्हते.
कसली भिती?
"एखाद्या गोष्टीत स्वतहाला गुंतवून घेणं किती सोपं असतं. पण जेव्हां कधी हा गुंता सोडवायची वेळ येते तेव्हा तो सुटता सुटत नाही. कच्चे धागे-दोरे सुद्धा तेव्हा तुटता तुटत नाहीत. आणी मग हे अर्धवट तुटलेले धागे-दोरे, गुंत्याचे अवशेष छळत रहातात... आयुष्यभर !!"
"वणवा पेटायला एखादाच क्षण पूरेसा असतो पण तो विझता-विझता एक काळ निघून जातो. आणी विझल्यावरही धूराचे, राखेचे निशाण डोळ्यांत टोचतच रहातात ना?"
गरज !!... पून्हा आलीच मधे ही गरज. आयुष्याच्या एकाकी जंगलात मला त्यांची गरज होती. गरज मोठी असली की भिती सुद्धा कशी लांब पळुन जाते. खरच, किती महत्वाची असते ही "गरज"!!
त्या गरजे पायीच मी कळत-नकळत हात पुढे केला. पाणावलेले डोळे मिटले. आणी आपल्या सर्वस्वाने त्यांना हाक दिली.
ते ही आले. ते पायाशी घुटमळले. ते हातावर झुलले. ते मानेशी लोंबले. ते अंगाशी झोंबले. ते पाठीवर चढले. ते खांद्यावर बसले. ते इवलेशे जीव सर्वस्वाने मला बिलगले !!
ते अनेक स्पर्ष आणी ते क्षण !
माझ्या संपूर्ण शरीरातून विजेचा संचार करवणारे ते क्षण होते.
मला पहील्यांदा प्रेमाचा साक्षातकार घडवणारे ते क्षण होते.
तुटलेल्या स्वप्नाच्या काचांना डोळ्यातच वितळवणारे ते क्षण होते.
हृदयातल्या दुखांना हृदयातच् विरघळवणारे ते क्षण होते.
ते अनेक जीव आणी मी, आता एकजीव झालो होतो.
जणु मी त्यांच्या साठी आणी ते फ़क्त माझ्या साठीच होते...
...................................................................................
आता शब्दच माझे आहेत आणी मी शब्दांचा आहे.
आधी "स्वप्न" होतं, आता "शब्द" आहेत.
दुखां मधे, सुखां मधे,
सणां मधे, वारां मधे,
ग्रीष्मात, थंडीत आणी
पावसाच्या जलधारां मधे
मी स्वप्नालाच हाक दयायचो
आणी विणुन जाळं शब्दांच
मी स्वप्नालाच बोलवायचो
...पण, स्वप्न कधी माझ्यासाठी आलंच नाही.
काव्यां मधे, गाण्यां मधे,
गजलां मधे, गीतां मधे,
संगीतात, सुरांत आणी
प्रेमाच्या कवीतां मधे
मी स्वप्नालाच शोधायचो
आणी करून बहाणा शब्दांचा
मी स्वप्नालाच मिळवायचो
...पण, स्वप्न कधी माझं झालंच नाही.
स्वप्न माझं, माझ्या डोळ्यांतच राहीलं
स्वप्न माझं, पाणी-पाणी होउन वाहीलं
आता शब्द डोळ्यांतुन हृदयात उतरतात
हृदयात उतरुन जुन्या जखमाही भरतात
स्वप्न माझं मला पाखरासारखं छळायच
जवळ गेलो की ते लांबच-लांब पळायच
शब्द, बनुन फ़ुलं, कधी माझ्यासाठी हसतात
गप्पा मारत निवांत, माझ्यासवे ते बसतात
स्वप्न माझं नेहेमीच खंत करायचं
माझ्यात उणीवाच का ते नेहेमी शोधायचं
शब्द आता मला सामर्थ्य देतात
माझ्या जीवनालाही ते नवे अर्थ देतात
स्वप्न हसवं होतं पण फ़सवं होतं
सुखाची आस दाखवून नेहेमीच रडवायचं
शब्द शांत आहेत पण सच्चे आहेत
कधी दुखं देऊनही ते मलाच घडवतात
स्वप्नान माझ्या, जाता जाता ही रडवलं
सांगायचं ते काही आणी भलतंच काही घडवलं
शब्द तेव्हा ही माझ्याच साथी ला होते
सोबत जळतांना, बनुन तेल ते वाती ला होते
स्वप्न, स्वप्न, स्वप्न, स्वप्न
आधी चोहीकडे स्वप्नच होतं
माझ्या शब्दा-शब्दां मधे स्वप्नच होतं
आता दाही दिशा शब्दच आहेत
...आता स्वप्नातही शब्दच आहेत !!
- नरेन्द्र सिंह [२०/०१/२००८]
http://www.narendra-s.blogspot.com/
जी. ए.
जी. ए. ह्यांची आठ्वण झाली...
Thanks sneha -
Thanks sneha
- नरेन्द्र
हे
हे एलकुन्चवार च्या नाटकातले वाटते ?
हे जे काही
हे जे काही आहे... ते अतीव सुंदर आहे.
निशःब्द
निशःब्द करुन सोडलंस मित्रा ! अप्रतिम !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
अप्रतिम!!.
अप्रतिम!!. सुरेख. मायबोलीवरील माझ्या वाचनात आलेल्या साहित्यामधे हे सर्वोत्तम आहे. उत्कृष्ट.
जीयो. आणि असेच अजुन वाचायला मीळु दे.
खूपच
खूपच सुंदर...!!!
मलापण
मलापण आवडले.
सतिश
सतिश कदम
नितान्त सुन्दर मित्रा
अप्रतिम
हे तुम्ही
हे तुम्ही लिहीले आहे का? (गैरसमज करुन घेऊ नये, पण फार मॅच्युअर्ड लिखान आहे म्हणून.)
तुम्ही लिहीले असेल तर केवळ अप्रतिम आहे. केवळ अप्रतिम.
Thanks daad, vishal, varsha,
Thanks daad, vishal, varsha, shra, sunidhee, satish, kedar... Thank you very much
तुम्हां सर्वांना हा लेख आवडला आणी त्याहून महत्वाचे म्हणजे तुम्ही ते प्रतिसादातून व्यक्त केले त्या बद्दल खूप धन्यवाद!
- नरेन्द्र
अप्रतिम!!. सुरेख. मायबोलीवरील
अप्रतिम!!. सुरेख. मायबोलीवरील माझ्या वाचनात आलेल्या साहित्यामधे हे सर्वोत्तम आहे. उत्कृष्ट
जोशीका़कांशी सहमत... निव्वळ
जोशीका़कांशी सहमत...
निव्वळ अप्रतिम !
सगळ्या मायबोलीकराशी सहमत.
सगळ्या मायबोलीकराशी सहमत.
मी पण सगळ्यांशी सह्मत ...
मी पण सगळ्यांशी सह्मत ... फारच सुन्दर लिहिलयं..
निव्वळ अप्रतिम!!!!!
खुपच सुरेख !!!
खुपच सुरेख !!!
"काही वचने दयायची किंवा
"काही वचने दयायची किंवा घ्यायची नसतात, ती फ़क्त पाळायची असतात. डोळ्यांनीच डोळ्यांना सांगायची असतात आणी खोल कुठेतरी हळुवारपणे जपायची असतात."
>> अप्रतिम!!
आज ७-८ वर्ष नंतर हा लेख वाचला
आज ७-८ वर्ष नंतर हा लेख वाचला... खरंच माझ्या वाचनात आलेल्या मराठी साहित्या मध्ये हा टॉप १० मध्ये ठेवता येण्या सारखा लेख आहे...
शब्दांची भेट आणि शब्दांचे माहात्म्य... अगदी कल्पनाच इतकी सुरेख आहे.
आणखी काही लिहिला आहे का तुम्ही? कृपया मायबोली वर टाका. वाचायला आवडेल.
प्रसाद जोशी, पुणे