दिनांक १३ आणि १४ औगस्ट २०११ रोजी सिंगापुरात तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्या संमेलनात सादर केलेली ही माझी कथा.
मोलकरीण- ही एक मोठ्ठी समस्या आहे असे जगातल्या सगळ्याच गृहिणींचे मत असते. समस्येचे नाव जरी तेच असले तरी, प्रत्येक ठिकाणची डोकेदुखी मात्र वेगवेगळी असते. सिंगापूरला मोलकरीणीला ’मेड’ म्हणतात. भारतातल्या सारख्या ह्या मेड्स दोन चार तासापुरत्या येऊन आपापली कामे करून जात नाहीत. तुमची मेड ही कुटुंबातलाच एक मेंबर होऊन तुमच्या घरात रहाते. ही गुणी-अवगुणी मेड मिळविणे जेवढे कठीण, तेवढेच झेपणे आणि संभाळणे देखील. जाऊ द्या झाले! जास्त काय बोलायचे?....जळे त्याला कळे....
*********************************************************************************
पार्टी संपल्यावर घरी परत येतांना माधुरीचा फ़्यूज उडाला होता. प्रशांतच्या पोटातील स्कॉच एव्हाना बसच्या प्रत्येक हिसक्याबरोबर गिरक्या घेत डोक्यात चढून बसली होती. त्या हळूवार चढत्या डुचकळण्यात तो गुंगला होता. पार्टीत ऐकलेली जगजीत सिंगचे गज़ल स्कॉचच्या गिरक्यांना झकास साथ देत होती. प्रॉब्लेम येवढाच होता, की माधुरीची कटकट मधूनच जगजीत सिंगला कट मारीत होती.
"समजते काय स्वत:ला? मोठा नोकराणीचा तोरा मिरवीत असते ही महाराणी." एरवी हे वाक्य मिसेस गायधनींना उद्देशून होते, की मिसेस टोपीवालांना ह्याचा अंदाज करणे प्रशांतला शक्य नव्हते. पण चार वर्षांच्या अनुभवांवरून तो एक नक्कीच शिकला होता- अधूनमधून बायकोची काही वाक्ये तरी कानातून मनात शिरू द्यावीत. त्यामुळे पार्टीतल्या गलक्यामधून देखील त्याने मिसेस गायधनींच्या नवीन मेडचा विषय बरोब्बर टिपला होता. तेव्हाच त्याला संभाव्य धोक्याचा अंदाज आला होता.
"हॅ! रोजरोज घरची उस्तवार मला नाही हो करावी लागत! एक मेड सोडून गेली, तर मेडची लाईन लावतील माझे मिस्टर."
मिसेस गायधनींच्या टोमण्याने माधुरीचे मुळातच अपरे असलेले नाक कटून आणखीनच छोटे झाले होते.एरवी घरी एकटा असतांना त्याने दोन बोटांच्या चिमटीत ते अपरे नाक पकडून तिला छळायचा चान्स सोडला नसता. पण प्रस्तुतची एकूण परिस्थितीच गंभीर होती. बसमधील बाजुच्या दोन चिनी माणसांना माधुरीचे मूळ संभाषण जरी कळत नसले, तरी तिच्या चढत्या आवाजाने त्यांना प्रशांतविषयी सहानुभूती वाटू लागली असावी. त्या दोघांची अगम्य चिनी भाषेत मौलिक चर्चा सुरू होती. बहुदा, बायकोशाहीने केलेली नवऱ्याची छळणूक - एक आंतरराष्ट्रीय समस्या असा एखादा विषय असावा. त्यामुळे तो मधूनच त्यांच्याकडे पाहून ओशाळवाणे हसत होता. तेव्हा माधुरी आणखीनच भडकली.
त्यांच्याकडे पाहून दात विचकायची काही गरज नाही. ह्या लोकांकडे दोन दोन मेड असतात. अर्जुनाला जसा मास्याचा डोळाच फक्त दिसत होता, तशी माधुरीला सर्वत्र मेड दिसू लागली.
माझे आई, उद्या मी एक मेडची फलटणच उभी करतो. आत्ता गप्प बस. प्रशांत करवादला.
ऎहॅहॅहॅ! म्हणे फलटणच उभी करतो. कशाला? जनानखाना बाळगायचा आहे का? एक मेड पाळण्याची ऐपत नाही, अन निघाले फलटण उभी करायला. तोंड पहा!
आता मिस्टर गायधनींनी मेडची लाईन लावली, तर मिसेस गायधनी कौतुकाने भर सभेत ते सांगतात. मी मेडची फलटण उभी करण्याची गोष्टच नुसती केली, तर ही बाई येवढी चिडली कशी?.... हे विचारायची हिम्मत प्रशांतने केली नाही. शिवाय बायकांचे लॉजिक उलटेच असते, हे तो आत्तापर्यंत शिकला होता. त्यामुळे तो डोळे मिटून जगजित सिंगच्या गज़लचे विखुरलेले तुकडे शोधू लागला.
घरी पोहोचायला रात्रीचे बारा वाजले होते. झोप अनावर झाली होती. प्रशांतने आल्याआल्या बूट कोपऱ्यात भिरकावले, आणि नेसत्या कपड्यांनीच तो पलंगावर कोसळला.
हे बघ- इथे कोणी नोकर बसलेले नाहीत तुझे बूट उचलून ठेवायला! माधुरीचे हे वाक्य त्याच्या घोरण्यात त्याला समजणे शक्यच नव्हते. दोन वर्षांच्या राजूला घेऊन ती तणतणत दुसऱ्या बेडरूममधे जायला लागली, हे मात्र प्रशांतला बरोब्बर कळले असावे. कारण त्या पठ्ठ्याने मोकळ्या पलंगावर मस्तपैकी आडवेतिडवे पसरून आणखीनच वरची पट्टी पकडली.
रविवार सकाळच्या ’कारांगुनीऽऽऽ’ ह्या रद्दीवाल्याच्या आरोळ्यांनी प्रशांत जागा झाला. सकाळचे नऊ तरी वाजले असावेत. डोके जड झाले होते. काल डोक्यात हळुवार गिरक्या घेणारी स्कॉच आता पोटात पोहचून गरगरायला लागली होती. ह्यावेळेस कोणी आयतामायता गरमागरम चहा व आम्लेट आणून दिले असते, तर प्रशांतने त्याला मागेल ते बक्षीस दिले असते. माधूरी अजून झोपलेलीच असावी, किंवा तसे दाखवित असावी. राजू बाजूलाच लोळत आईचे केस खरेच आहेत किंवा कसे हे तपासून पहात असावा. तोपर्यंत तरी तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. पण प्रशांतची चाहूल लागताच मात्र तिने एक धपाटा राजूच्या पाठीत घालून त्याचा रेडिओ चालू करून दिला. तेव्हा प्रशांतने सूज्ञपणे तिला चहा मागण्याचा बेत तहकूब केला, आणि रडणाऱ्या राजूला घेऊन तो स्वयंपाकघराकडे वळला.
मी पण उठतेच आहे. माझा पण चहा कर. ह्या आज्ञेचे उल्लंघन करण्याची त्याच्यात ताकद उरली नव्हती.
स्वयंपाकघरातील दृष्य पाहून त्याच्या पोटात गोळाच उठला. सिंकमधे काल दुपारच्या भांड्य़ांचा ढीग पडला होता. त्यात उपसाउपशी करून तो चहाचे भांडे शोधू लागला. ते शोधतांना त्याची मुद्दाम दाणदाण आवाज करण्याची योजना मुळीच नव्हती. त्या आवाजाचे फायदे मात्र दोन झाले. एक म्हणजे, माधुरी उठून किचनमधे आली. दुसरे म्हणजे, रॅकवरचे चहाचे पातेले काढीन तिने दाणकन गॅसवर आदळले.
“काल सकाळी चहा केला होता. ते पातेले काय अजून सिंकमधेच रहाणार आहे? आहे ना मी फुकटाची मोलकरीण कामे करायला!” ती कडाडली.
’मग बाई गं, सिंकमधे खरकट्या भांड्यांचा येवढा ढीग कसा?’ –हा प्रश्न तिला विचारण्यात अर्थ नव्हता. बायकांचे लॉजिक! त्यापुढे बृहस्पती देखील मात खाणार!
तर रविवारची सुरवात अशी दणदणीत झाली. कालच्या स्फोटानंतर त्याने अंदाज केला होताच, की आता लवकरच हार मानावी लागणार. आजच्या हल्ल्यानंतर त्याला काळूनच चुकले, की आता जास्त दिवस किल्ला लाढवणे नामुमकीन आहे. आजच शरणांगती पत्करावी लागणार! चहा पितापिता प्रशांत निदान तहनाम्यात कमीत कमी नुकसानीचे कलम कसे घालता येईल ह्याची योजना बनवू लागला.
मधू, अग तुला घरातली कामे करायला मी होता होईल ती मदत करतोच ना? आणि मेड ठेवायची म्हणजे थोडा का खर्च आहे? निदान आठ-नऊशे तर पाहीजेच दरमहा. अजून घराचे लोन देखील फिटतेच आहे. रोज मी एम आर टी- बसमधे धक्के खात ऑफीसमधे जातो-येतो. कार घ्यायचा फक्त विचारच सुरू आहे......
कारचा उल्लेख करून एक मोठीच घोडचूक प्रशांतने केली होती. पण आता उशीर झाला होता.
हो! त्या कारच्या डोंबल्यावर घालायला तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. आणि बायको रोज घरात मरमर मरते, तुमची उष्टी खरकटी काढते, तिचे कष्ट वाचवायला तुमच्याकडे आठ-नऊशे रुपडे नाहीत! हीच तुमच्या लेखी बायकोची किंमत!
सोयीस्करपणे बायका डॉलर्सना डॉलर्स, रुपये किंवा रुपडे, काय वाट्टेल ते म्हणतात!
अग, पण कार घेतली आहे का मी? आणि काय गं, मेड आली की तुला घरात सर्व वेळ नुसती बसून कंटाळा नाही येणार?
त्याची काळजी तुला नको करायला. मी नोकरी करणार आहे. मला घरातल्या फालतू कामांचाच कंटाळा आला आहे. त्यापेक्षा रोज मस्त टिपटॉप कपडे घालून, टिकटॉक सॅंडिल्स उडवीत जायचे, एयरकॉन ऑफीसमधे बसून ऐटीत काम करायचे केव्हाही शतपटीनी चांगले!
हे म्हणतांना माधुरीने आपल्या अपऱ्या नाकाची गुंजडी करून डावीकडे अशा झटक्यात उडविली, की प्रशांतचा खातमाच झाला. माधुरीला केव्हा कुठले शस्त्र वापरायचे ह्याची चांगलीच जाण होती. तो थोडावेळ तिच्या टिपटॉप कपडे घातलेल्या रुबाबदार रुपात अडकूनच पडला.
अन मग राजूकडे कोण पहाणार? भानावर येऊन त्याने निर्वाणीचा प्रयत्न केला.
अरे मग मेड किस काम की? ती राजूला सांभाळेल, सकाळ संध्याकाळ स्वयंपाकपाणी करेल, साफसफाई करेल. आपण दोघांनी मस्त रुबाबात ऑफीसमधे जायचे, मजा करायची. तिने लोभसवाणे चित्र उभे केले.
पण राजू रहाणार आहे का तिच्याजवळ? त्याला तर तुझ्यावाचून एक मिनीट राहवत नाही.
होईल सवय!
अग, पण मेडबरोबर राहून त्याला वाईट सवयी लागतील, त्याच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होईल, ह्याचा काही विचार केला आहेस का तू?
राजूला काही होत नाही. तू स्वत:ला सांभाळ म्हणजे झाले. संभाषणाची गाडी अनपेक्षीतपणे त्याच्यावर चाल करून आली, तसा त्याने माधुरीला पांढरा बावटा आणि मेडला हिरवा बावटा दाखविला.
त्यानंतरचे पंधरा दिवस माधुरीला अक्षरश: मेडचे वेडच जणू लागले होते. स्ट्रेट टाईम्समधील जी पाने पेपर आल्याबरोबर न उघडता रद्दीत जात, आता फक्त तीच वाचली जाऊ लागली. माधुरीचे वेगवेगळ्या एजन्सीजला फोन करणे, मैत्रीणींबरोबर रोजच्या चर्चा, दुसरा विषयच नाही. ईंडोनेशियन ठेवणार, का फिलीपिनो? पण नकोच बाई. आणि त्यांना आपला स्वयंपाकपण येणार नाही. त्यापेक्षा श्रीलंकनच बरी. निदान आपल्या पद्धतीचे तरी बनवून वाढेल.
त्या एजन्सीजचे तऱ्हेतऱ्हेचे कॉन्ट्रॅक्ट्स, फार्माबाजी, टर्म्स अॅंड कंडिशन्स ह्यांची डोकेफोड मात्र सोयीस्कररित्या प्रशांतच्याच माथ्यावर पडली. कारण तो पुरुषांचा प्रांत! रिपॅट्रीएशनची जबाबदारी, मेडिकलची जबाबदारी, सिक्युरिटी बॉन्ड, शिवाय गॅरंटीड रिप्लेसमेंट. पॅकेज डील! सारे काही एजन्सीज करायला तयार होत्या. ऑफ कोर्स, फॉर अ फी! जणू मेड म्हणजे एक कमोडिटीच! पेपर्समधे मेडचा बाजारच उघडला होता जणू. हे सिक्युरिटी बॉन्ड प्रकरण मात्र पचवायला प्रशांतला जरा जाडच गेले. मेड जर प्रेग्नंट राहिली, तर सिक्युरिटी बॉन्ड जप्त होणार.... म्हणे हो! कदाचित सांगणारा प्रशांतचे पाय खेचीत असेल. त्याचे काय जाते? प्रशांतला मात्र रात्री झोपेत, चार चार प्रेग्नंट मेड्सनी आपल्या भोवती हातात सिक्युरिटी बॉन्ड नाचवित फेर धरल्याची स्वप्ने पडू लागली.
नोकराणीचा आणि नोकरीचा शोध, दोन्ही शोध एकदाचे फळास आले. प्रशांतने मनातल्या मनात हिशोब केला. मेडचा खर्च, माधुरीचा एम आर टी- बस, टिपटॉप कपडे, बाहेरचे लंच, सर्व खर्च वजा केला, तर माधुरी जवळजवळ फुकटातच आठ तास बाहेर नोकरी करणार होती. पण होऊन जाऊ दे! आपल्या स्वत:च्याच घरची कामे स्वत:च्या कलाने करण्यापेक्षा, तिला ऑफिसमधली खर्डेघाशी अन ताबेदारी बरी वाटत असेल, तर वाटो बापुडी.
सुबलक्ष्मीने आल्याआल्या घराचा ताबा तर व्यवस्थित घेतला.चाळीस-पंचेचाळीसची मॅचुअर्ड बाई वाटत होती. राहणी नीटनेटकी होती. ईंग्लीशबिंग्लीश बरी समजत होती. माधुरीने तिला सगळे नियम समजाऊन दिले. ब्रेकफास्टला काय करायचे, राजुच्या दुधच्य़ा वेळा, दुधात साखर किती घालायची, धुतलेले कपडे कुठे ठेवायचे, हजार ईंन्स्ट्रक्शन्स. तिला इंडियन कुकींग येतच असल्याने तो प्रश्न नव्हता. तिला चार दिवस तयार करून मगच माधुरी नोकरीला जाणार होती.
मेड आल्यावर सगळ्यात आधी प्रॉब्लेम हा झाला, की प्रशांतला आपल्याच घरात परक्यासारखे वाटू लागले. काही मोठ्याने बोलायची, ओरडायची सोयच राहिली नाही. कोणीतरी परकी बाई आपले संभाषण ऐकत असेल, ही कल्पनाच पचनी पडायला जड होती. सगळी प्रायव्हसी नष्ट झाली. आपल्या स्वत:च्या घरातील फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन गेले. अर्ध्या चड्डीत उघडेवाघडे वावरण्याचे स्वातंत्र्य गेले.
छान झाले! तुला जरा शिस्त लागेल! ही माधुरीची त्यावरची टिप्पणी होती.
राजुला आधीच समजाऊन सांगितले होते, की आई ऑफ़िसमधे जाणार, व ही सुब्बूऑंटी तुझ्यापाशी राहील. त्याला ते कितपत कळले कोण जाणे! पण बहुदा नसावेच. कारण पहिले कित्येक दिवस, ’आज त्याने रडून गोंधळ घातला’ असे सुबलक्ष्मी रोज संध्याकाळी सांगत होती. राजू तर माधुरी आल्याआल्या जो तिला चिकटायचा, तो झोपेतही तिच्या गळ्याभोवतीचा हात काढत नसे. दिवसभराच्या धकाधकीने ती दमलेली असल्याने तिला ते ब्लेसिंग ईन डिसगाईस वाटत असेल अशी प्रशांतला दाट शंका होती.
महिनाभरात राजूत मात्र खूप फरक जाणवू लागला. एक तर तो खूप चिडचिडा झाला. त्याच्या मनासारखे झाले नाही की खूप आकांडतांडव करायचा. सुब्बूऑंटी येऊन आपल्याला घेणार, खाऊ देणार हे त्याला पक्के कळून चुकले होते. आता तर त्याला आईमधे पण येवढा ईंटरेस्ट वाटत नव्हता. कारण आई-बाबांपेक्षा त्याचे जग सुब्बूऑंटीमधेच जास्त घोटाळत होते. एकदा त्याच्या बोलण्यात यम यन यस ऐकले मात्र, अन प्रशांत जाम भडकला. रविवारी त्याच्या बरोबर खेळण्यात वेळ घालण्याचे त्याने ठरविले.
राजू बेटा, जा बरे, तुझ्या कार घेऊन ये. मला चालवून दाखव. चहा झाल्यावर त्याने राजूला बोलाविले. राजूने आपल्या सगळ्या कार टेबलवर लाऊन ठेवल्य़ा. लगोलग किचनमधे जाऊन एका ग्लासात पाणी आणले. एक टिश्यू घेऊन साऱ्या कार साफ करायला लागला.
मी रोज सकाली सगल्या कार क्लीन करनार आहे. हा सगळा सुब्बूऑंटीबरोबर रोज सकाळी खाली मेड्सच्या टोळक्यामधे रहाण्याचा परिणाम! प्रशांत वैतागला. माहित नाही आणखी काय काय शिकतो तिथे!
राजूवर होणाऱ्या संभाव्य परिणामांना घाबरून माधुरीने बरीच रिस्ट्रीक्शन्स सुब्बलक्ष्मीवर घातली. त्याला घेऊन खाली जाऊ नकोस. त्याला जास्त लाडावू नकोस वगैरे. हे कंट्रोल्स सुब्बलक्ष्मीला जाचक होऊ लागले, की आणखी काही कारण होते माहित नाही. पण हळुहळू तिच्या वागण्यात फरक होऊ लागला हे नक्की. एक दिवस सकाळी तिचे डोके दुखत होते म्हणून प्रशांतने चहा केला. दुसरे दिवस संध्याकाळी कायसे झाले म्हणून ती झोपून होती. एकदा पोट दुखले म्हणून अर्ध्या रात्रीत क्लिनीकमधे जायची वेळ आणली. अरे बापरे! सिक्युरिटी बॉन्ड गेला! सुदैवाने तसे काही नव्हते. पण डॉक्टरच्या बोडख्यावर पैसे गेले, वर वैताग वेगळा. तिचे काय बिघडले होते, कोण जाणे!
एकदा माधुरी ऑफ़िसला जायच्या गडबडीत असतांना ती ’मॅडाऽऽम लूऽक’ करीत धावत आली. तिच्या हातावर लांबलचक तांबडे वळ उमटले होते. प्रशांत तर घाबरूनच गेला. ’अग भाजले का?’ तर, ’नो मॅडाऽऽम, आलवेज कम लाईक दॅट!’ आता काय बोलणार! त्या दिवशीच नेमका स्ट्रेट टाईम्समधला ’मेड अॅबूज’ असे मोठ्ठे हेडिंग असलेला लेख, दोन वेळा टेबलवर कसा काय उघडून पडलेला होता, ह्याचा प्रशांत विचारच करीत राहीला.
माधुरीला वेगळीच चिंता लागली होती. उद्या असेच वळ राजूच्या हातावर आले, तर काय? ह्या विचारांनी तिची झोपच गेली. तर प्रशांतची घाबरगुंडी उडाली होती. स्ट्रेट टाईम्समधे आपले नांव मेडअॅब्यूजच्या न्यूजमधे सिंगापूरभर झळकणार म्हणून.
हे पहा माधुरी, आता आपला हा अॅब्यूज खूप झाला. हिला उद्याच्या उद्या पाठवून दे.
अरे पण कॉंट्रॅक्टप्रमाणे तीन महिन्यांच्या आधी तिला परत पाठवले, तर तिचे एयर टिकीट आपल्यालाच भरावे लागेल.
आय डोन्ट केअर! उद्या स्ट्रेट टाईम्समधे आपले नांव झळकले, तर आपल्या सगळ्यांचीच एयर टिकीटे काढावी लागतील. ते काऽही नाही. शी मस्ट गो.
सुब्बलक्ष्मी तर गेली. त्यानंतर दुसरी मेड मिळणे जरा कठीणच गेले. फ़िलीपिनो ठेवायची का म्हणून प्रशांतने भितभितच सुचविले. मादुरीने जरा संशयाने त्याच्याकडे पाहिले. पण त्याचा भाबडा चेहरा पाहिल्यावर तिला आपल्या शंका घेण्याचीच लाज वाटली. मग दुसरी मिळत नाही म्हणून, फ़िलीपिनो ज्युलीची कारकीर्द सुरू झाली. आता तिचे वय तिशीतले होते, हा काय तिच्या बिचारीचा दोष होता? पण तिच्या वयामुळे माधुरी उगाचच तिच्यावर खार खाऊन होती असे प्रशांतला कधीकधी वाटू लागले. ती ज्युलीवर बरेच लक्ष ठेवून असायची. ज्युलीने कोणाला फोन केला, की हिचा जीव वरखाली व्हायचा.
आता ती यंग मुलगी! रविवारी सुट्टीच्या दिवशी जाते बिचारी लकी प्लाझामधे मैत्रिणींना भेटायला! तिचे तरी ह्या परदेशात कोण होते?
पण माधुरीची आपली एकच रट. तुला माहित नाही. एक दिवस तुझा सिक्युरिटी बॉन्ड जाईल तेव्हा कळेल.
तुझा सिक्युरिटी बॉन्ड म्हटल्यावर प्रशांत हडबडला. काय होते, की ज्युलीविषयी त्याला जरा सॉफ़्ट कॉर्नर होता. रोज संध्याकाळी ’सर सर’ करीत त्याला आपुलकीने चहा, स्प्रिंगरोल्स आणून द्यायची, हसून बोलायची. सुब्बलक्ष्मीसारखा एरंडेल प्यायल्याप्रमाणे चेहरा नव्हता तिचा. जरा घरात रौनक होती. तेवढेच बरे वाटायचे. माधुरीला ह्या सॉफ़्ट कॉर्नरची जरा पण शंका आली असती, तर तिने प्रशांतला सुतावरून स्वर्गात नाही, पण नरकात नक्की पोहचवले असते! तेव्हा उद्या हिने बाहेर दिवे लावले, खरेच सिक्युरिटी बॉन्ड जाण्याची पाळी आली, अन वर ह्या संशयी बयेने आपल्यालाच जाब विचारला तर कसे? तो एकदम घामाघूमच झाला. त्या दिवसानंतर ज्युली ह्याच्याकडे पाहून हसली, की हा गॅसवर!
असे दिवस जात होते. एक दिवस मात्र कमालच झाली. माधुरीला तिचे ब्रेसलेट सापडत नव्हते.
अरे तू पाहिलेस का?
तूच महा वेंधळी! कुठेही काढून ठेवतेस.
ज्युली, हॅव यू सीन माय ब्रेसलेट?
नो मॅडाम!
सगळे घर शोधून झाले. ब्रेसलेटचा पत्ताच नाही. माधुरीला रडायलाच यायला लागले. मात्र तिने भान राखून काहितरी कामासाठी जुलीला खाली पाठवले, व लगबग तिच्या कपाटात शोध घेतला. आणि काय आश्चर्य! ज्युलीच्या कपाटात माधुरीचे ब्रेसलेट तर मिळालेच, पण दोन सोन्याच्या बांगड्या देखील होत्या. ईंडियन डिझाईनच्या त्या बांगड्या ज्युलीच्या नक्कीच नसणार! कोणाच्या होत्या ते ज्युलीच जाणे!
अग तूच चुकून तिच्या कपाटात ठेवले असशील.
मी काय पागल झाले आहे तिच्या कपाटात माझे ब्रेसलेट ठेवायला? माधुरीने तणतणत एक अजबच गोष्ट केली. आपले ब्रेसलेट काढून कपाट बंद करून ठेवले.
अग तू तिला सांगणार नाहीस?
नाही, ब्रेसलेट दिसले नाही की बघुया तिची रिअॅक्शन.
ती रिअॅक्शन कधी दिसलीच नाही. कपाटात आता ब्रेसलेट नाही हे ज्युलीने कधी दर्शविलेच नाही. त्यामुळे प्रशांत तिला बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला तयार होता. कोणास ठाऊक! खरेच तिला माहित देखील नसेल की आपल्या कपाटात ब्रेसलेट होते म्हणून! माधुरीचे विमेन्स ईन्स्टिंक्ट मात्र तिला ठामपणे सांगत होते की ज्युलीनेच ते चोरले होते! खरे खोटे भगवानच जाणे.
ह्या साऱ्या नाटकांनी माधुरी पार वैतागून गेली होती. ऑफिसचे रोजचे जाणे येणे ह्यात तिचे नऊ दहा तास जात होते. थकूनभागून घरी आल्यावर राजूचा मलूल चेहरा तिला बघवत नव्हता. नोकरी आणि नोकराणी ही बेरीज वजाबाकी बरीचशी नुकसानीतच जात होती. एक दिवस प्रशांत आणि माधुरीने व्यवस्थित विचार करून काही निर्णय घेतले. माधुरीने नोकरी आणि नोकराणी सोडली. प्रशांतने झक्कपैकी डिशवॉशर आणले. माधुरी पारंपारीक भारतीय गृहिणीसारखी घरगृहस्थी सांभाळू लागली. सारा आनंदीआनंद झाला.
*******************************************************************************
उपसंहार
प्रशांत आणि माधुरीने झकास पार्टी अरेंज करून मिस्टर व मिसेस गायधनींना जेवायला बोलाविले. माधुरीने सगळा स्वयंपाक स्वत: केला होता. प्रशांतने सुट्टी घेऊन तिला बरीच मदत केली. रात्री जेवणे वगैरे झाल्यावर मिसेस गायधनींने विचारलेच.
हे काय माधुरी? येवढे तू एकटीनेच केलेस? तुझ्याकडे तर मेड होती ना?
छे! आम्हाला नाही लागत मेडबीड! आम्हीच आहोत ना मेड फॉर ईच अदर! प्रशांत आणि माधुरी कोरसमधे उत्तरले!
छान लिहिलय. आवडलं. राजू
छान लिहिलय. आवडलं.
राजू बाजूलाच लोळत आईचे केस खरेच आहेत किंवा कसे हे तपासून पहात असावा. तोपर्यंत तरी तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. पण प्रशांतची चाहूल लागताच मात्र तिने एक धपाटा राजूच्या पाठीत घालून त्याचा रेडिओ चालू करून दिला >>>>
चांगलिये
चांगलिये
Aavdali, ithe mi kalach sign
Aavdali, ithe mi kalach sign in kelay. ajun nit maahiti nahi.
छान आहे. मेड चे किस्से सांगु
छान आहे. मेड चे किस्से सांगु तेव्हढे थोडे.
छान आहे. आवडली...
छान आहे. आवडली...
सही...!
सही...!
झकास.............
झकास.............
मस्त.... एकदम चुरचुरीत....
मस्त.... एकदम चुरचुरीत....
भारीच!
भारीच!