Lay’s, क्रांती आणि गांधी..

Submitted by मी मुक्ता.. on 17 August, 2011 - 06:02

काल टिव्हीवर अर्थातच लोकपाल चालू होतं सगळीकडे. मध्ये एक अ‍ॅड पाहिली Lay’s ची. तो तिला विचारतो "कँडल मार्च के बाद कँडल लाईट डिनर के लिये चले?" त्या अ‍ॅड बनवणार्‍याचं कौतुक करावं तेवढं कमी असं वाटलं खरच त्या क्षणी. किती मार्मिक भाष्य केलय. आणि बहुतेकदा अशा मोर्चामध्ये सहभागी होणार्‍या लोकांची धाव तिथवरच असते.
क्रांती - हा प्रचंड आकर्षक शब्द आहे.. थरारक.. आयुष्यात एक काळ तर नक्की असा असतो जेव्हा या शब्दाने भारुन जायला होतं. मलाही व्हायचं. क्रांतीविषयी आणि ती करणार्‍यांविषयी विशेष काहीतरी भरुन आल्यासारखं व्हायचं. स्वाभाविक आहे की अनेकांना असंच वाटत असेल. पण असं नाही वाटत का की क्रांती ही एक झिंग आहे. नशा आहे. मेणबत्त्या पेटवुन क्रांती करु पहाणार्‍यांना काय वाटतं? लोकपाल आलं आणि भ्रष्टाचार संपला असं होणार आहे का? लोकपाल हा रामबाण मार्ग आहे आणि अण्णा हजारे एकमेव तारणहार अशी परिस्थिती का निर्माण झालीये? मुळात जमाव हा असा समूह असतो ज्याला फक्त भावना असतात. जमावात कायमच बुद्धीचा अभाव दिसत आलाय. आणि अशा एक्सायटेड लोकांना भावनिक आवाहन करुन चिथवायला फारशा कौशल्याची गरज खरच असते का? पण त्याच लोकांना शहाणपणा शिकवायचं म्हटलं तर? ते तुलनेने कष्टाचं, वेळखाऊ आणि नॉन ग्लॅमरस काम आहे ना.. आणि आजच्या इंस्टंट जगात एवढा वेळ कोणाला आहे? लोकांना क्रांती हवीय. ही क्रांती एका रात्रीत संपते. इतिहास साक्ष आहे क्रांती अल्पजीवीच असते. एकीकडे लोकपाल मंजूर झाले की दुसरीकडे भ्रष्टाचार संपलाच हे चित्र किती बालिश आहे हा विचार या लोकांच्या मनाला नाही शिवत का? लोकपालासाठी आंदोलन करा हे सांगणं सोपं आहे.. करणं त्याहून सोपं.. पण भ्रष्टाचार घालवण्यासाठी जी मूल्यं रुजणं आवश्यक आहे, ती रुजवा.. त्यासाठी सलग १०-१५-२० किंवा त्याहीपुढे लागतील तितकी वर्षे सातत्याने प्रयत्न करत रहा हे सांगणं आणि लोकांना पटवुन देणं फार अवघड आहे आणि प्रत्यक्षात आणणं त्याहूनही अवघड. आणि कदाचित एवढी ताकद या काळातल्या गांधींमध्ये नसावी. स्वत:ला गांधी म्हणवणार्‍या किंवा त्यांना गांधी म्हणणार्‍या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे. खरचं गांधींची स्ट्रॅटेजी कोणी अभ्यासली आहे का नीट.? गांधींच्या यशाचं खरं श्रेय कशात होतं? त्यांनी उत्क्रांती घडवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (त्यांच्याविषयीची वैयक्तिक मतं आणि मतभेद बाजूला ठेवुन अर्थातच हे मान्य करावं लागेल.) त्यांनी लोकांना सहज आचरणात आणता येतील असं व्रतं दिली. आणि व्रत हे कधीच इंस्टंट निकाल देत नाही. उपवास करा, प्रार्थना करा, खादीच वापरा वगैरे वगैरे.. एका दिवसात निकाल हमखास अशी हमी त्यांनी कधीच दिली नाही. ही व्रतं सामान्य माणूस आचरणात आणू शकत होता. त्यांच्या या हाकेने स्वातंत्रलढ्यातला स्त्रियांचा सहभाग वाढला हे सत्य आहे. लढा सर्वव्यापी झाला. आजच्या या सो कॉल्ड दुसर्‍या (की तिसर्‍या?) स्वातंत्रलढ्यात नक्की काय चालू आहे? हे गांधीवादी गांधींचा मार्ग खरच अनुसरतायेत का?
क्रांतीची झिंग उतरल्यावर लाँग टर्म मध्ये जे काही प्रयत्न करावे लागतात त्याची कल्पना लोकांना नसते आणि दुर्दैवाने ती जाणिव करुन देणारे नेतेही कमीच असतात. आपला स्वातंत्र्यलढाही क्रांतीच होती पण लोकांची ही झिंग लगेच उतरली. फक्त स्वातंत्र्य मिळून प्रश्न सुटतील या भ्रमाचा भोपळा फुटायला फार वेळ नाही लागला. ६० च्या दशकात रोटी, कपडा और मकान साठी पुन्हा क्रांती करावी लागेल अशीच परिस्थिती होती. असो, समाजसुधारकांनी त्या आधी केलेला कार्याचा परिणाम म्हणुन हे स्वातंत्र्य कसंबसं का होईना निभवता आलं. (कसंबसं नाही म्हणता येणार खरंतर. आपली लोकशाही चालतेय हे खूप मोठं यश आहे. ग्रामिण भागातल्या महिला जेव्हा एकत्र येऊन दारुचे गुत्ते बंद करतात तेव्हा कळतं आपल्या लोकशाहीचं जनमानसातलं रुजलेपण..) आणि त्यामुळेच लोकशाही आहे की दडपशाही हा प्रश्न विचारणार्‍यांचा अतिशय राग येतो. अरे, लोकशाही नसती तर हा विरोध करु शकलो असतो का आपण? चीनचा Tiananmen Square प्रसंग तर सगळ्या जगाला माहित आहे.
आणि माझंच म्हणणं खरं हा प्रकार तर हुकूमशहांनादेखिल परवडत नाही तर लोकशाहीत का चालावा? उपोषण करण्याचे नियम पोलिसांनी दिलेले. मान्यतेसाठी वेळही. तरीही माझ्याच मनाप्रमाणे मी करणार असा हट्ट करुन कसं चालेल? की तुरुंगात गेलो की ग्लोरिफीकेशन होतं, हवा तापते हे विचार खरच आले नव्हते नियम नाकारण्यापूर्वी मनात? आपल्याला लोकशाहीने जो मार्ग आखून दिलाय तो पाळला पाहिजे याविषयी कोणाचं दुमत असायचं काहीच कारण नाही. संसद हे आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे. आत्मा आहे. एखादा माणूस किंवा समूह स्वतःला संसदेपेक्षा मोठा समजायला लागणं हे लोकशाहीला घातक नाही का? 'माझाच मसूदा बरोबर' हा कुठला अट्टहास? कोणत्याही शहाण्यासुरत्या माणसाला पटावं असं हे वर्तन नाहीये. स्वतःला संसदेपेक्षा मोठं समजायचा अधिकार न्यायालयालाही नाही. न्यायालयही संसदेच्या किंवा प्रशासनाच्या कामकाजात प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ नाही करु शकत. ज्युडिशिअल ओव्हररीच च्या मुसक्या आवळल्यात तिथेही मग कोणत्याही माणसाची (भले तो कितीही ग्रेट असो) काय कथा.. उद्या मी पण म्हणते, महिलांना १००% आरक्षण द्या नाहीतर आत्मदहन करते, मग काय संसदेने मान्य करावं.? राज्यघटना लवचिक असणं वेगळं आणि ती कोणी मनाप्रमाणे वाकवायचा प्रयत्न करणं किंवा तशी इच्छा धरणं वेगळं. आपण जेव्हा रीपब्लिक म्हणतो तेव्हा त्याच्या व्याख्येत हे लिहिलय की लिखित घटनेच्या मार्गाने गोष्टी घडायला हव्यात.. फक्त बहुमत म्हणून एखादी गोष्ट नाही मान्य होऊ शकत. एखादा कायदा नाही होऊ शकत.. घटना, तत्वं, सारासार विचार, भविष्यकालीन परिणाम या सगळ्यांचा विचार करावा लागतो. काही काळापूर्वीच न्यायालयानेही हे विधान केलं होतं.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली तारणहार मानसिकता. अण्णा आले आणि देश बदलला असं काही होतं का कधी? पण हा विचार करतो कोण.? फॅन्सी नावं असलेल्या कॉलेलात जाणारी. त्याहून फॅन्सी कपडे घातलेली आणि त्याहून फॅन्सी गाड्यांवर फिरणारी मुलं-मुली अण्णांच्या नावाने घोषणा देताना पाहिली. तो अगदीच 'नेत्रसुखद' अनुभव होता.. खूप मुद्दे आहेत.. पण परिस्थिती अशी आहे की लोकपालला विरोध केला तर भ्रष्टाचारला पाठींबा देताय असे म्हणतील लोक. पण मुळात लोकपालचा अभ्यास केलाय किती लोकांनी. आज जी मुलं पाहिली त्यात ५% लोकांनापण माहिती असेल असं काही वाटलं नाही.
प्रश्न लोकपालचा आहेच पण साधनशुचितेचाही आहे. असो.. खूप काही डोक्यात होतं. कदाचित लोकांची मतं वेगळी असतीलही. लोकशाही आहे त्यामुळे अशी मतं असण्याचं आणि मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच. पण याही प्रश्नांचा विचार व्हावा असं वाटलं. भ्रष्टाचार एका दिवसात जन्माला नाही आला त्यामुळे एका दिवसात नष्टही नाही होणार. पुढची किंवा कदाचित त्याही पुढची पिढी भ्रष्टाचारमुक्त भारत पाहू शकेल पण त्यासाठी आतापासून सर्वांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि आंदोलन करण्यापेक्षा नक्कीच प्रभावी आहे ते. भलेही त्याचे रीझल्ट उद्या किंवा परवा दिसणार नाहीत पण ते जास्त टिकतील हे नक्की...!
------------------------------------------------------------------------------------
दोन्ही (किंवा असतील तितक्या) बाजू तसेच लोकपाल बाजूला ठेवुन जरा घटनांकडे पहाताना अजून काही गोष्टी लक्षात आल्या.

१) या आंदोलनातून लोकपालाची निर्मिती झाली तरी भ्रष्टाचार १००% जाणार नाही हे सगळ्यांचच मत आहे पण तो बर्‍याच अंशी कमी होईल असाही विश्वास आहे. ही एक बाब झाली पण यानंतरच्या आंदोलनाच्या विषयांची यादी जाहिर झाली आहे ती विचार करण्याजोगी आहे. अश्या किती गोष्टी आपण आंदोलन करुन पदरात पाडून घेणार आहोत. काही काळानंतरही लोकांचा उत्साह असाच राहिल याची शाश्वती नाही. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करायला लागणे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य पण नाही. अशी आंदोलन करायची वेळ येऊ नये म्हणून काही लाँग टर्म उपाययोजना ( म्हणजे अर्थातच समाजसुधारणा आणि सामाजिक जागृती) करण्याची नितांत गरज आहे. आपली क्रयशक्ती अशा आंदोलनात वारंवार खर्च होणे हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अस्थिरता निर्माण करणारं आहे.

२) जगावर जागतिक महामंदीचं अजून एक सावट येऊ घातलं असताना आपल्या देशातील सगळ्या नियोजनकारांची डोकी देशांतर्गत वाटाघाटीत व्यस्त रहावी याची परिणाम गंभीर होऊ शकतात. परकिय गुंतवणूकदारांनी आधीच प्रश्न विचारयला सुरुवात केलीये. दुर्दैवाने अशी परिस्थिती उद्भवली तर सगळ्यात पहिला बळी मेणबत्तीधारी समाज असणार आहे.

३) आंदोलनात प्रत्यक्ष ऐकलेल्या काही प्रतिक्रिया,
"चल यार.! FC पे आये है तो जाके आते है उस सेल मे.."
"टोपी तर मिळेल.. जाऊन येऊ"
"फोटो काढ! फोटो काढ! FB वर टाकता येईल"

४) आंदोलन चालुच आहे आणि अहिंसात्मक मार्गाने चालु आहे तर काळी फित बांधून आपापली कामं करत राहिलो तर? सरकारवर दबाव येईलच..

गुलमोहर: 

पराग आपण म्हणता तसे होऊ नये, यासाठी लोकांची मानसिकता बदलावी लागेल. मुक्ता यांनी जे लिहिले आहे ते यासंदर्भातच आहे. गांधींनी लोकांना छोट्या छोट्या गोष्टींनी प्रेरित केले असले तरी ऑगस्ट १९४२ मधे त्यांना सुद्धा आंदोलन सुरू करावेच लागले हे विसरता येणार नाही.
आपल्याकडे दुर्दैव आहे की लोकांची मानसिकता बदलवणे हे कर्मकठिण काम आहे. तशी ती बाहेरून बदलविण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने जर ठरविले की मी स्वतः खुप चांगला वागेन तरी बर्‍याच समस्यांचा निकाल लागेल.

सन २०११---- जन लोकपाल विधेयक मंजूर.

सन २०१५---- लोकपालाने भ्रष्टाचार केल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी म्हणून अण्णांचे जंतरमंतरवर प्राणांतिक उपोषण सुरु. >>
पराग, आपल्याल हे हसण्यावरी नेण्याइतपत सोपे वाटते का??

मी चिऊ

तोच तर कळीचा मुद्दा आहे. अण्णांना लोकपाल भ्रष्टाचार करणारच नाही हे कशावरून म्हणता असं शेखर गुप्तांनी विचारलं तेव्हां ते फक्त आता हे बिल आलंच पाहीजे इतकंच म्हणत राहीले.

अनिल, लोकपाल देखील भ्रष्टाचार करेल म्हणून हे बिल येऊ नये का ? मग तसे तर स्वातंत्र्यच मिळायला नको होते. अण्णांनी काय उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे ? जे मोठे भ्रष्टाचारी आहेत त्यांना का नाही प्रश्न विचारत मेडिया ?

अनिल,

पण मला अस वाटत की, "कायदा पाळला जाणार नाही म्हणुन तो बनवूच नये" हे कितपत योग्य आहे?

उदयवन्,उत्तम पोस्ट.

मी_ चिऊ,

मला हे मुळीच हसण्यावारी न्यायचे नाही आहे. पण लोकपाल आपल्यातलाच असेल हे विसरता कामा नये.

पोलीस आपल्यातलेच असतात्,ते पैसे खातात आणि भ्रष्टाचार वाढतो

नेते आपल्यातलेच असतात्,ते ही पैसे खातात.

नोकरशाही आपल्यातलीच आहे. ते ही पैसे खातात.

आणि कुणी तरी देणारं आहे म्हणून घेणारे आहेत.

लोकपाल बिल अण्णा म्हणताहेत तसंच मंजूर व्हावं म्हणून आंदोलनं करणारी,कँडल मार्च काढणारी तरुणाई भ्रष्टाचार मुक्त आहे,असं आपल्याला वाटतं का?

हेच तरुण्,सिग्नलवर बेफाम गाड्या हाकतात्,व ट्रॅफिक पोलिसाने पकडताच चिरीमिरी देऊन सुटका करुन घेतात.

हेच तरुण आपल्याला अ‍ॅडमिशन मिळावं म्हणून हव्या त्या कॉलेजात डोनेशन्स भरुन प्रवेश घेतात.

दवाखान्यात पहिला नंबर मिळावा म्हणून वॉर्डबॉयला पैसे देतात.

पोस्ट-मॉर्टेम लवकर होवून डेड बॉडी लवकर मिळावी,म्हणून अधिकारी,कर्मचार्‍यांना पैसे चारतात.

गॅसला लवकर नंबर लागावा,म्हणून गॅसवाल्याला पाचपंचवीस रुपये जास्त देतात.

हा वरचा प्रकार सुद्धा भ्रष्टाचार याच सदरात मोडतो. पण ,असो.

आंदोलनाला मिळालेली मिडिया हाईप व ग्लॅमर याने आकर्षित होवून तरुणाइ यात सामील झाली आहे. अण्णांना पाठिंबा देणं हे एक स्टाईल स्टेटमेंट ठरलं आहे. भले लोकपाल किस चिडिया का नाम है? हे माहीत नसलं तरी चालेल. Biggrin

आपल्या सार्वभौम देशात्,संसदेला संसदेचे काम करु द्यावे. व आपण सुजाण नागरिकासमान मतदानाचा अधिकार सुयोग्य प्रकाराने बजावावा.

चर्चा चालू असू द्या.

उदय आपल्या सगळ्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण द्यायचे तर वेळ लागेल,
तुर्तास एकच उत्तर ते म्हणजे "चांगल्या कारणासाठी क्रांती होत असेल तर ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सबकुछ जायज है"

महेश

जी गोष्ट मी जन्माला घालावी म्हणून आग्रह धरत असेन त्याबद्दलच्या शंकासमाधानाची किमान जबाबदारी माझीच असेल असं मला वाटतं. अण्णांच्या जनलोकपालबद्दलच्या शंका शेखर गुप्तांनी कुणाला विचाराव्यात असं तुम्हाला वाटतं ?

मी ती लिंक शोधतोय. पाहील्यावर मत बनवता येईल.

आपल्या सार्वभौम देशात्,संसदेला संसदेचे काम करु द्यावे. व आपण सुजाण नागरिकासमान मतदानाचा अधिकार सुयोग्य प्रकाराने बजावावा.>>
हे म्हणजे स्वताच्या घरात चोरी होत असताना आपण फक्त समोर बसुन बघत रहवे अस वाटत, आपल काम पोलिसन बोलवणे.. ते करावे आणि सुजाण नागरिका समान शांत बसावे..

"चांगल्या कारणासाठी क्रांती होत असेल तर ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सबकुछ जायज है">>>>>>>>>>>>> भले वेळ लागु द्या....पण द्याच उत्तर......
हिटलर सुध्दा आधी गोड गोडच वाटत होता......... Happy (मी अण्णांची त्याच्याशी तुलना करत नाही आहे) आणि तो होता सुध्दा बरोबर...पण त्याला "ग" ची बाधा झाली आणि नाझ्यांचे कत्लेआम सुरु केले तिथुन तो चुकला....

अनिल माझे म्हणणे आहे की या प्रकारची शंका विचारून उगीच कोंडीत पकडण्यापेक्षा पाठिंबा द्यावा. कारण या असल्या प्रश्नांना अन्त नाही. मग लोकपालावर लक्ष ठेवण्यासाठी अजुन कोणी नेमला आणि त्याने पण भ्रष्टाचार केला तर, इ. इ.

मी चिऊ,

कायदा बनवणे हे संसदेचे काम आहे. संसदेत पाठवलेले लोक काय मूर्ख आहेत का? आणि अण्णा तेवढे विचारवंत.

अण्णांनी आपले म्हणणे आपल्या क्षेत्रातील खासदाराला पटवून सांगावे,त्या द्वारे संसदेत मांडावे.

नाहीतर पंतप्रधान्,राष्ट्रपती यांचेशी पत्रव्यवहार करावा.

नाहीतर स्वता संसदेत खासदार म्हणून प्रवेश करावा.

हे सगळे होत नसेल तर राज्यसभेत विशेष परवाणगी घेउन तिथे सिविल सोसायटी चे सदस्य जाउन चर्चा करु शकता.

आणि तरीही उपोषण हवेच असेल्,तर जंतरमंतर किंवा रामलीला मैदानच कश्याला? राळेगणसिद्धीतच करता येते की.

आणि चोरी /किंवा गुन्हा होत असताना शांत बसणे हे सुजाण नागरिकाचे काम नव्हे. त्या गुन्ह्यास सुजाण नागरिक म्हणून विरोध करावा हेच योग्य. पण त्या चोरीचा आणि अण्णांच्या आंदोलनाचा बादरायणी संबंध उगाच जोडू नका.

उदयवन हे म्हणजे जरा अतीच होत आहे. अण्णा आणि हिटलर यांची तुलना म्हणजे काहीच्या काहीच.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार, पण मग तुम्ही वेताळाप्रमाणे निघून जाणार का Happy Light 1

उदयवन हे म्हणजे जरा अतीच होत आहे. अण्णा आणि हिटलर यांची तुलना म्हणजे काहीच्या काहीच.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार, पण मग तुम्ही वेताळाप्रमाणे निघून जाणार का >>>>>>>

महेश्,ही चर्चा आहे. चर्चेचा उ द्देश्य तथ्ये समोर यावी असा असतो. चर्चेत सहभागी असणारा वेताळाप्रमाणे निघून जावा असा नसतो.

आणि उदयवन स्पष्ट म्हणाले आहेत की मी अण्णांची हिटलरशी तुलना करत नाहीये.

पराग आपण जे म्हणता त्यातल्या बहुतेक गोष्टी आधी करून झाल्या आहेत असे मला वाटते (विशेषतः पत्रव्यवहार इ.) आणि तरी सरकार दाद लागू देईना म्हणून आंदोलनाचा उपाय अवलंबला आहे.

कायदा बनवणे हे संसदेचे काम आहे. संसदेत पाठवलेले लोक काय मूर्ख आहेत का? आणि अण्णा तेवढे विचारवंत.>> मुर्ख नाहीतच.. म्हणुन तर ते हे विधेयक मंजूरीला पण देत नाहीयेत. अर्थात स्वताच्या पायावर दगड कोण पाडुन घेणार

वेताळाप्रमाणे निघून जावा असा नसतो.>>>>>>>>> ते असे असते महेश साहेब... आमचे ऑफिस ५.३० ला बंद होते..त्यानंतर आम्ही २४ मोबाईल वर ऑनलाईन असतो...आनि त्यावरुन मराठी टाईप करता येत नाही....आणि इंग्रजी टाईप केले तर मला चालात नाही...मराठी वेबसाईट वर मराठीच लिहावी...इंग्रजी गरजे पुरतीच असावी...
तुम्ही उत्तरे तर द्या.....मग मी वेताळ होईल की विक्रम हे मला ठरवु द्या ना...... Happy

मी_ चिऊ,आपण संसदीय लोकशाहीत आहोत. संसदेवर विश्वास असावाच.

नाहीतर चला, आपणही जावू या अण्णा,किंवा उदयवन म्हणतात त्याप्रमाणे एका डिक्टेटरशीप कडे.

<<<'संसदेने आमचेच बिक पास करावे', या अण्णांच्या वक्तव्याचा कृपया संदर्भ देणार का? गेले काही दिवस अण्णांच्या सहकार्‍यांच्या मुलाखतीत त्यांनी कधीही असा उल्लेख केलेला नाही. संसदेसमोर आमचं बिल मांडलं जाऊन त्यावर चर्चा व्हावी, असंच म्हटल्यांचं मी ऐकलं आहे.>>>

अण्णांच्या यापूर्वीच्या उपोषणानंतर लोकपाल बिलाचा मसुदा ठरवण्यासाठी दहा सदस्यीय समिती घोषित करण्यात आली त्यावेळीच अण्णांनी हे बिल संसदेत संमत होण्यासाठी १५ ऑगस्टची मुदत घालून दिली. तोवर मसुदा समितीचे कामही सुरू झालेले नव्हते. तेव्हाची अण्णांची ही विधाने.

http://daily.bhaskar.com/article/NAT-TOP-will-go-on-fast-if-lokpal-bill-... :
August 15 is our deadline. Either we celebrate that day or Anna again goes on fast," she said (किरण बेदी)
"There is a criticism that I am indulging in blackmail. People may say so. I will continue to do this blackmail till my last breath for people's good...I am doing this for the benefit of the country."

संसदेत लोकपाल विधेयकात दुरुस्त्या सुचविल्या गेल्या तर त्या मान्य कराल का यावर "If there is a good suggestion, we will accept. We are seeking people's views on the provisions of the bill.... We would accept even if Parliament makes a good amendment to improve the bill," he said.
इथे भाषांतरातला बदल लक्षात घेतला तरी संसदेने सुचवलेला बदल 'चांगला की वाईट' हे आम्ही ठरवू हा आविर्भाव लपत नाही.

मी एखाद्या निवडणुकीला उभा राहिलो तर निवडून येणार नाही, कारण मतदारांना वाटायला माझ्याकडे पैसे, साड्या, दारूच्या बाटल्या नाहीत, असं म्हणून लोकशाहीवर, निवडणूक प्रक्रियेवर आणि मतदाराच्या सारासार बुद्धीबद्दल त्यांनी अविश्वासच व्यक्त केलाय. फेसबुकनेशनच्या जनतेचेही हेच तर मत असते सामान्य मतदाराबद्दल.

ज्या प्रकारे हा मुद्दा हाताळला जातोय ते पाहून यामागे फार मोठी चाल खेळली जातेय काय अशी शंका येतेय!

घटनाक्रम -
१. सोनिया गांधी मॅडम विदेशात निघून गेल्यात. नक्की काय आजार आहे की नाही हे कुणालाच माहिती नाही. काँग्रेसच्या गोटातून याबद्दल ब्र ही निघत नाही.
२. काही दिवसांपूर्वी प्रत्येक न्यूज चॅनल वर मनमोहन सिंग यांची प्रतिमा कशी ढासळली आहे, आणि "अमूल बेबी" राहुलबाबा यांच्याच रूपात जनता नवीन पंतप्रधान पाहतेय याची पूर्णपणे जाहिरात करण्यात आली.
३. सरकार आण्णा हजारे मुद्दा हाताळण्यात सपशेल आपटलंय. या सगळ्याचं खापर "मनमोहन सिंग" यांच्या माथी फोडून त्यांना नैतिकतेच्या मुद्द्यावरून पायऊतार केलं गेलं तर नवल वाटणार नाही.
४. असं घडलंच तर राहुलबाबा यांची बिनविरोध निवडणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५. आण्णांचं उपोषण थांबवून नंतर संसदेत त्या विधेयकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जावू शकतात.

अरुंधती कुलकर्णी

बरं, मग?

अण्णांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> हटवादीपणा सोडावा.. माझंच खरं म्हणणं सोडावं.

लोकांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> लोकांना करता येण्यासारखं बरंच काही आहे. त्यांनी सगळ्यात आधी तपासून पहावं की यातून सुटण्यासाठी कायदा झाला तर किती सातत्याने आणि कुठवर ते पाळणार आहेत्/त्यासाठी रोजचे प्रयत्न करणार आहेत.. (१-२ दिवसांचे वा आठवड्यांचे आंदोलन सोडता दैनंदिन पातळीवरील प्रयत्न)

फॅन्सी कपड्यांतल्या तरुणाईनं काय करावं असं आपल्याला वाटतं?>> मेडिया आणि स्टाईल स्टेट्मेंट सोडून जरा मोठा विचार करावा. आपलं वागणंही तपासून पहावं.

भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या व ग्रासलेल्या लोकांनी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे?>> केवळ कंटाळा आला म्हणून आगीतून फुफाट्यात पडू नये.

पुढारी, राज्यकर्त्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> योग्य लोकांना जनतेने निवडून दिलं तर ते योग्य ते करतीलच. तूर्तास हा मुद्दा योग्य मार्गाने/शांततापूर्वक हाताळावा.

मीडियावाल्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> न्यूजव्हॅल्यू आणि नाटकांच्या मागे न जाता खरी परिस्थिती मांडावी.

अण्णांनी अहिंसेचा मार्ग सोडून हिंसेचा मार्ग धरायचा का?>> नाही

उपोषणे, आंदोलन, पदयात्रा सोडून जाळपोळ, मारामारी,दंगल करावी असे म्हणणे आहे का?>> नाही

कोणत्या प्रकारे आपल्या मागण्या मांडायच्या व लावून धरायच्या मग? लावून धरणे आणि ताणणे यात फरक आहे.

लोकशाहीत आणखी काय उपाय असतात ह्याखेरीज?>> आखलेल्या नियमांत आंदोलन करणे.

तुमच्याकडे जर उपाय असेल तर जरूर सुचवा.>> सुचवले.

झालंच तर उदयवन यांची पोस्ट पहा.

अण्णांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> हटवादीपणा सोडावा.. माझंच खरं म्हणणं सोडावं.

>> असं त्यानी केल्याचं पटवून द्यावे.

लोकांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> लोकांना करता येण्यासारखं बरंच काही आहे. त्यांनी सगळ्यात आधी तपासून पहावं की यातून सुटण्यासाठी कायदा झाला तर किती सातत्याने आणि कुठवर ते पाळणार आहेत्/त्यासाठी रोजचे प्रयत्न करणार आहेत.. (१-२ दिवसांचे वा आठवड्यांचे आंदोलन सोडता दैनंदिन पातळीवरील प्रयत्न)

काहीही विनोदी लिहताय. आधी कायदा होऊ दे मग तो पाळणार ना? कायदा व्हायच्या आधीच तो पाळण्याचा प्रयत्न कसा करता येइल? लोकाना जर बरंच काही करता येत असेल तर सध्या जे काही लोककरत आहेत त्याला विरोध कशाला?

फॅन्सी कपड्यांतल्या तरुणाईनं काय करावं असं आपल्याला वाटतं?>> मेडिया आणि स्टाईल स्टेट्मेंट सोडून जरा मोठा विचार करावा. आपलं वागणंही तपासून पहावं.

>>>> तपासून पाहिल्यावर काय करावं???

भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या व ग्रासलेल्या लोकांनी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे?>> केवळ कंटाळा आला म्हणून आगीतून फुफाट्यात पडू नये.>>> काय करू नये हे सांगितलंत. काय करावं हे सांगणे अपेक्षित आहे.

पुढारी, राज्यकर्त्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> योग्य लोकांना जनतेने निवडून दिलं तर ते योग्य ते करतीलच. तूर्तास हा मुद्दा योग्य मार्गाने/शांततापूर्वक हाताळावा>> म्हणजे नक्की काय करावं.????

मीडियावाल्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतं?>> न्यूजव्हॅल्यू आणि नाटकांच्या मागे न जाता खरी परिस्थिती मांडावी.>>> न्युज व्हॅल्यु या शब्दाचा अर्थ आपल्याला समजलाय का? मीडीया खरी परिस्थिती मांडत नाही हे अनुमान कशावरून??

कोणत्या प्रकारे आपल्या मागण्या मांडायच्या व लावून धरायच्या मग? लावून धरणे आणि ताणणे यात फरक आहे.>> कुणी लावून धरलय आणि ताणून धरलय? आणि नक्की काय फरक आहे??

आखलेल्या नियमांत आंदोलन करणे.>> उदाहराणे द्या. काय नियम आखले आहेत आणि कुणी आखले आहेत त्याची माहिती द्या.

===============================================\

मुक्ता, त्याच चर्चेत तुम्हाला आधी काही प्रश्न मीच विचारलेले आहेत. त्याची उत्तरे द्या ना.

आणि नुसता शब्दखेळ नको, तो मला चांगलाच जमतो काहीतरी ठोस मुद्दे द्या. Proud दिवे घ्या.

निगेटीव्ह लिहुन मी पॉजिटिव्ह लिहिले आहे हे सांगावे लागते इथेच हा लेख वाया गेला.

आणि अण्णानी हटवादी पणा सोडावा वगैरे प्रतिक्रिया ठिक आहे पण सगळ्या तुम्हाला अनुमोदन देणार्‍यांचेच फक्त भरभरुन आभार मानता आहात. त्यामुळे लेखाचा हेतू दुसर्‍या बाजुनी विचार व्हावा या पेक्षा मी असा विचार मांडला "माझीच वाह वा!!!" असा वाटतो आहे. आणि तुम्हाला विरोध करणार्‍यांना "तुमच्यासाठी हेमाशेपो" म्हणुन अगदी कट्टी घेता आहात.

हे सगळं वाचुन देखिल लोक तुम्हाला लोक प्रतिक्रिया देत आहेत, त्या तुमच्या लेखाला नसुन अण्णा हजारेंना त्यानी दिलेला पाठिंबा आहे.
तुमचा मुद्दा योग्य असेलही, पण तो मांडताना तुम्ही चुकला आहात, किंवा तुम्ही तो इतरां पर्यत पोहचवू शकला नाहीत, किवां तुमचा अभ्यास कमी पडतो आहे विषयावर.
तुमच असं मत आहे की जो सरकारी कारभारात, रस्त्यावर भ्रष्टाचार चालतो तो बंद व्हावा म्हणुन लोकांनीच लाच देण बंद कराव. सगळे चांगले वागले तर आंदोलनाची काय गरज? त्या मुळे हे आंदोलन ही अण्णांची हौस आहे आणि लोक ती पुरवाता आहेत.

अहो पण सगळे चांगले वागले तर पोलिस, कायदा, देश, धर्म, नियम कशाची गरजच नाही. तुमचे विचार भाबडे आणि निर्मळ आहेत पण हे जग नाही. तुमच्या भ्रष्टाचारच्या कक्षा ह्या हवालदार, सरकारी नोकरीतला तळागाळातला नोकर वर्ग,, सामान्य माणुस इतक्याच आहेत. कुठल्या मंत्र्याला किती वेळा लाच दिली आहे तुम्ही? आत्ता पर्यंत झालेल्या घोटाळा हा तुम्हाला मिडीया ने न सांगता कळाला होता का? तुम्हाला हे आंदोलन आज दिसत आहे पण ह्या साठी सिव्हील सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी गेले बरेच महिने आपल्या संविधानाचा, इतर देशातिल कायद्यांचा अभ्यास केला आहे. काही अनेक महीने ते अनेक नेत्यांशी आणि संस्थांशी चर्चा करता आहेत. कळकळीने प्रयत्न करत आहेत. अहिंसा आणि उपोशन हे शस्त्र तेंव्हाच वापरतात जेंव्हा आपला शत्रू आपल्या पेक्षा जास्त तादवान आहे आणि तो कुणाला तरी उत्तर देण्यास बांधिल आहे. तालिबान विरुद्ध आणि अतिरेक्यां विरुद्ध का नाही कुणी उपोषण करत? अण्णा आणि त्याच्या बरोबरचे सहकारी देखिल फार मुर्रब्बी आहेत, त्यांची नावं गुगल वर शोधा तुमच्या लक्षात येईल. त्यांना हे माहीत आहे की हा लढा ते कुणा विरुद्ध लढता आहेत आणि तो कसा लढावा. येड्या गबाळ्याच काम नाही हे, आपलं अहोभाग्य की ते जनतेसाठी लढता आहेत आणि आपल्या येणार्‍या पिढ्यांसाठी लढता आहेत.
जरा गुगलवर शोधल्यास बरिच महीती मिळेल. ती तुम्ही शोधली आहे किंवा ह्या बाबींचा विचार करुन लिहिलेला लेख आहे असे वाटत नाही, म्हणुन बहुतेक प्रतिक्रिया "एकांगी लेख आहे" अशा आहेत.
"कुणी मेकअप केला म्हणुन त्या व्यक्ती चारित्र खराब आहे, कारण चारीत्र्य खरब असणारे सगळेच मेकअप करतात" हे विधान हास्यास्पद आणि गैरवाटल्यास तुम्ही तुमचा लेख निट अभ्यास करुन पुन्हा एकदा दुसर्‍याचा म्हणुन वाचावा. तुमच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया आणि इतरांनी मांडलेल्या विचारांचा तुम्ही आदर करु शकाल आणि इतरांना पटेल आणि आदर वाटेल असा लेख लिहू शकाल. मग मोजक्याच लोकांचे आभार मानण्याची गरज भासणार नाही.

पटल तर घ्या, नाहीतर माफ करा.

Pages

Back to top