चित्रपट परीक्षण: "आरक्षण"

Submitted by ज्ञानेश on 14 August, 2011 - 16:05

सिनेमा: आरक्षण
निर्माता, दिग्दर्शक, पटकथा: प्रकाश झा
प्रमुख भूमिका : माहितीये तुम्हाला.

आपण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधे बसलेले असतो. एकटे.
समोर एक देखणी तरूणी येऊन बसते. अर्थातच, एकटी ! ट्रेन यायला अवकाश असतो. आपण मनोमन सुखावतो. आपले डोळे आपल्या मेंदूच्या नियंत्रणात राहत नाहीत.
सरळ मोकळे केस, रेखीव चेहरा, सरळ धारदार नाक, नाजूक जीवणी, लांबसडक निमुळती बोटे, मोहक हास्य, साध्या साध्या हालचालीतला डौलदारपणा....
"तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी" वगैरे गझल आपल्याला सुचू लागते..

.. आणि त्याचक्षणी ती मुलगी आपली लांबसडक निमुळती बोटे आपल्या धारदार नाकाच्या नाकपुडीत घालून जोरजोराने नाक कोरू लागते !

अशा वेळी जसे वाटेल, तसे मला ’आरक्षण’ पाहून आल्यानंतर वाटले.

-----------------------------------------------------

सिनेमाची सुरूवात आश्वासक आहे. S. M. T. नावाचे भोपाळमधले एक प्रतिष्टित कॉलेज. त्या कॉलेजचा ’प्रभाकर आनंद’ नामक तत्त्वनिष्ठ प्राचार्य.
त्याच्या हाताखाली तयार झालेली अनेक अभ्यासू आणि होतकरू मुले.
त्याच मुलांपैकी एक- दीपक कुमार (सैफ) हा आपल्यासाठी नोकरीच्या शोधात आहे. या शोधादरम्यान त्याला काही जातीयवादी, कटू अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. त्याला SMT कॉलेजातच तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी (प्रभाकर आनंद यांच्या कृपेने) मिळते. प्राचार्यांची सुविद्य मुलगी पूर्वी (दीपिका) दीपकच्या प्रेमात आहे. सुशांत (प्रतिक बब्बर) हा त्यांचा आणखी एक मित्र आहे.

दरम्यानच्या काळात मंडल आयोगाच्या काही शिफारसी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लागू होतात, ज्यायोगे सरकारी संस्थांमधे OBC प्रवर्गासाठी आरक्षण वाढवले जाते. साहजिकच या निर्णयाने समाजात एकीकडे असंतोष, तर एकीकडे जल्लोष निर्माण होतो. त्याचे पडसाद महाविद्यालयात उमटू लागतात. मधल्या काळात एका मंत्र्याच्या भाच्याला प्रवेश देण्यावरून प्राचार्य आणि संस्थाचालकांचे खटके उडालेले असतात, त्याचा फायदा घेत ’मिथिलेश कुमार’ नामक खलनायकाचा (मनोज वाजपेयी) महाविद्यालयाच्या राजकारणात प्रभाव वाढतो.

पुढे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतभेद वाढल्याने दीपक आणि सुशांत परस्परांच्या विरोधात जातात. सगळ्या प्रमुख पात्रांचे परस्परांशी भांडण होते. प्राचार्यांचे पद जाते.
पुढे काय होते (किंवा होत नाही) ते पडद्यावर पाहणे संयुक्तिक ठरावे.

मध्यांतराआधीचा अर्धा भाग अतिशय उत्कंठावर्धक आहे. घटनांचा वेग जबरदस्त आहे. पडद्यावर एकाच वेळी इतके काही घडत असते की आपण पूर्णपणे त्यात गुंतून जातो. याला जोड आहे ती प्रमुख पात्रांच्या उत्कृष्ट अभिनयाची, आणि त्याचबरोबर अतिशय खटकेबाज दर्जेदार संवादांची ! विशेषत: कॅन्टीनमधे दीपक, सुशांत आणि मिथिलेश यांच्यात झडलेले वाद आणि प्रत्युत्तरे विलक्षण ताकदीने लिहिली गेली आहेत. हॅट्स ऑफ टू प्रकाश झा ! तो एक प्रसंग संपूर्ण सिनेमाचा आत्मा आहे.. (किंवा होऊ शकला असता.) इतके सच्चे प्रसंग हिंदी सिनेमात अभावानेच पहायला मिळतात. असा प्रसंग लिहायला आणि सादर करायला गट्स लागतात. या सीनच्यावेळी अगदी मल्टिप्लेक्समधेही टाळ्या आणि शिट्या ऐकायला मिळतात, आणि त्याचे आपल्याला आश्चर्यही वाटत नाही. कारण आपणच त्या वाजवत असतो !! Happy

मध्यांतराआधीचा चित्रपट हा अशा काही प्रसंगांमुळे एका विशेष उंचीवर जातो, ज्यामुळे साहजिकच आपल्या अपेक्षा उंचावतात. "आता हा सर्व प्रपात आपल्याला कुठे नेणार" असा विचार करत आपण समोसे घेण्यासाठी निघतो.
आणि या उंचावलेल्या अपेक्षांनी आपण मध्यांतरात खाल्लेले समोसे पोटात गॅस निर्माण करतील, याची पुरेपूर व्यवस्था सेकंड हाफ करतो ! अचानक ’आरक्षण’ चे बोट नाकात जाते !!

स्पष्टच सांगायचं तर मध्यांतरानंतरचा सिनेमा हा निव्वळ वेळ आणि रील भरून काढण्यासाठी बनवलेला आहे. त्याचा ’आरक्षण’ या विषयाशी तितकाच संबंध आहे, जितका बेफिकीर यांचा मुक्तछंदाशी आहे.
या भागाचे नाव ’आरक्षण’ ऐवजी दुसरे काहीही ठेवले असते तरी चालले असते- उदा. पाठशाला, बदला, एहसान, एहसास, वक्त, दायरा, फासला, हौसला, जुनून.... अगदी काहीही ! फक्त ’आरक्षण’ सोडून- तुम्हाला याक्षणी आठवलेला पहिला हिंदी शब्द या चित्रपटाचे जास्त समर्पक शीर्षक होऊ शकते !

दुसर्‍या भागात मुद्द्यांचा संघर्ष अचानक दिसेनासा होतो, आणि व्यक्तींचा संघर्ष सुरू होतो. "मंडल आयोगाच्या शिफारसी आणि त्यानंतर देशातले क्रमाक्रमाने बदलत चाललेले वातावरण" या एका मोठ्या कॅनव्हासवर घडू पाहणारे कथानक अचानक जबरदस्तीने "दोन माणसांचा एका घरासाठी चाललेला खाजगी तंटा" या अत्यंत तोकड्या कागदाच्या पुडीत बांधले जाते. असे करण्यात प्रकाश झा यांनी नक्की काय साधले, हे आपल्याला कळू शकत नाही.
प्रकाश झा हे संवेदनशील दिग्दर्शक आहेत. सिनेमा पाहतांना आपल्याला असे वाटते की त्यांना खरोखर ’आरक्षण’ हा विषय मनाला कुठेतरी भिडला असावा, त्यांनी त्या भारावलेपणात सिनेमा करायला सुरूवात केली असावी, आणि अचानक त्यांना कसलातरी कंटाळा आल्याने त्यांनी घाईघाईत पुढचा सिनेमा ’उरकून’ टाकला असावा. त्यांनी ठरवले असते तर हा सिनेमा हिंदी सिनेमाने अभावानेच पाहिलेल्या उंचीवर घेऊन जाता येणे सहज शक्य होते ! An opportunity wasted.

चित्रपटाचे संगीत ठीक-ठाक आहे. (’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ पण ठीकठाकच होते- शंकरएहसानलॉय- तुम्हाला झालंय तरी काय?) गाणी प्रसून जोशीने लिहिलेली आहेत. ’शॉर्ट मे निपटाओ ना’ आणि ’उडान देखना’ ही दोन गाणी थिएटरच्या बाहेर आल्यावरही लक्षात राहण्याइतपत सुश्राव्य आहेत.

पुढे अत्यंत रटाळ, प्रेडिक्टेबल आणि तद्दन फिल्मी पद्धतीने सत्याचा विजय होतो आणि आपण ढेकर देत थिएटरच्या बाहेर पडतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

(विशेष सूचना १ : सिनेमाला कुठल्याही कारणाने विरोध करणारे आणि वादंग निर्माण करणारे बैल आहेत.
विशेष सूचना २: हेमामालिनीचा स्क्रीन प्रेझेन्स आजही सुखावणारा आहे !
विशेष सूचना ३: प्रेक्षकांनी, विशेषत: मराठी प्रेक्षकांनी ’आमच्या स्मिताचा मुलगा’ म्हणून प्रतिकला पाहून गहिवरणे तात्काळ बंद करावे. तो राज बब्बरचा मुलगा आहे.)

माझे रेटिंग- दोन स्टार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरक्षण हा तद्दन फालतू चित्रपट आहे!
जेवढी hype मिळाली, त्याच्या किंचीतही लायकीचा नाही. प्रकाश झा ने निराशा केलीय. Second Half "आरक्षण" सोडून वेगळंच काही बोलत राहतो. First Half मधील अर्धा तास हा डोकं खाणारा आहे, काहीही लिंक लागत नाही.
स्मिता पाटीलच्या पोराने घोर निराशा केलीय. सुनिएल शेट्टीच्या लायकीचा हिरो आहे तो!

माझे २५० रुपये कचर्‍यात गेलेले आहेत. जाणकारांनी थेटरात जाणे टाळावे, काही वेगळं अपेक्षित नाही.

माझे रेटिंग - १ स्टार..

ज्ञानेश
वेगळं मत कदाचित पहिल्यांदाच..
ज्या सिनेमाला वाद होतो तो (फुकटसुद्धा ) पाहणे मी बंद केलेले आहे. जिंदगी ना मिले दोबारा आणि सिंघम अशा कुठल्याही स्टंटशिवाय चाललेले आणि करमणूक प्रधान सिनेमे पावडले. खरच वेळ छान जातो.
आणि चांगलं काही पहायचं असेल तर वर्ल्ड मूवीज वर खूप सिनेमे आहेत. आत्ताच मी इथेच कुठेतरी साँग ऑफ द स्पॅरोजबद्दल लिहीलं. एट बिलो पण असाच. अर्थात हे परीक्षण आरक्षणचं आहे त्याबद्दल सॉरी !

आणि त्याचक्षणी ती मुलगी आपली लांबसडक निमुळती बोटे आपल्या धारदार नाकाच्या नाकपुडीत घालून जोरजोराने नाक कोरू लागते ! >>> LOL ! काय सॉल्लीड परिक्षण आहे. Lol

चला माझे अडीचशे रुपये वाचलेत.
आता चित्रपट पाहायची गरज उरली नाही.

पण (घर बसल्या अकलेचे तारे तोडायला पैसे लागत नाही)

विलक्षण ताकदीने लिहिण्याची ताकद जर प्रकाश झा मध्ये असेल तर
चित्रपट तद्दन फालतू असूच शकत नाही.

चित्रपत जर तद्दन फालतू असेल तर
प्रकाश झा विलक्षण-बिलक्षण असूच शकत नाही.

...................................................................
(स्वगत - प्रकाश झाने त्याला हवे ते बेमालुमपणे साधलेले दिसते.)

संजय पवार यांनी नेमकं बोट ठेवलय. त्यांच्या म्हणण्यानुसार
"ज्यांना सिनेमा या माध्यमाची माहीती आहे ते सांगू शकतात कि ऐनवेळी सुचवलेले कट मान्य करून सिनेमा रिलीज करायला काय दिव्य करावं लागतं ते. वादग्रस्त संवाद वगळल्याने दृश्यांची कंटिन्युइटी राहत नाही तसच एक दोन बदल करण्यासाठी चोवीस तासाच्या आत कसं काय शूटिंग केलं असेल ते ही सांगता येत नाही "

कुठेतरी सिनेमा चालण्याविषयी शंका असल्यानेच संदर्भ नसलेले प्रोमोज आणि त्याला फोडणी म्हणून आरक्षण हे शिर्षक यामुले सिनेमाची वादग्रस्त ही छबी स्वतः झांनी केली आहे. वाद व्हावेत असंच त्यांना वाटत असावं.
झी न्यूज वरची ही प्रतिक्रिया नंतर अमोल परचुरे ने उचलून धरली. सिनेमात कट कुठेही नाहीत. हा सगळा ड्रामा असावा अशी शंका त्यामुळेच येते.

राजनितीच्या वेळी सुद्धा सोनिया गांधीच्या भूमिकेत कतरिना कैफ अशी हवा वर्षभर निर्माण केली गेली होती. प्रतय्क्षात सिनेमात तसं काहीच नव्हतं

चित्रपटाचा आरक्षण या विषयाशी संबंध नाही, तर असे नाव देऊन फुकट प्रसिद्धीची सोय करायचा विचार होता की काय?
राजनीतीचा दाखला आहेच.

झा साहेबांची पत गेली म्हणायची.
पुढचा सिनेमा लोकपाल, काँग्रेस किंवा जी२ स्पेक्ट्रम नावाने काढला तरी पब्लिक विश्वास ठेवणार नाही...
कि ठेवेलच ?

मध्यांतरानंतरचा सिनेमा हा निव्वळ वेळ आणि रील भरून काढण्यासाठी बनवलेला आहे. त्याचा ’आरक्षण’ या विषयाशी तितकाच संबंध आहे, जितका बेफिकीर यांचा मुक्तछंदाशी आहे.

Biggrin

आरक्षण या नावामुळे या चित्रपटास वारेमाप प्रसिद्धी मिळालेली आहे.मात्र प्रकाश झा सारख्या सिद्ध हस्तास या अवडंबराची आवश्यकता नसतानाही हा '' आरक्षणाचा'' फार्स कशाला असा प्रश्न पिक्चर पाहिल्यावर पडतो. असो..

उत्तम परीक्षण ज्ञानेश. कुणी नाककोरणं देता का? Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सगळ्यांना.

@सांजसंध्या-
एखाद्या सिनेमाबद्दल वादंग उठणे हा काही त्याला टाळण्याचा निकष असू नये, असे मला वाटते.
तू लिहिलेले सिनेमे नक्कीच चांगले आहेत ! Happy

@मुटे साहेब-

विलक्षण ताकदीने लिहिण्याची ताकद जर प्रकाश झा मध्ये असेल तर
चित्रपट तद्दन फालतू असूच शकत नाही.

चित्रपत जर तद्दन फालतू असेल तर
प्रकाश झा विलक्षण-बिलक्षण असूच शकत नाही.

आता हे वाक्य बघा-

सचिन महान फलंदाज असेल तर शून्यावर बाद होऊच शकत नाही.
आणि तो शून्यावर बाद झाला असेल तर महान फलंदाज असूच शकत नाही. Happy

मला वाटतं, एवढं उदाहरण पुरेसं आहे.

चित्रपट हे शेवटी टीमवर्क आहे. अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाची असली तरी यश-अपयशाला अनेक फॅक्टर्स प्रभावित करतात. एखादवेळी भट्टी जमते, तर कधी बिघडते. प्रकाश झा यांनी याआधी राहुल, अपहरण, गंगाजल यासारखे सिनेमे दिले आहेत, तेव्हा एका सिनेमाच्या अपयशाने त्यांना असे राईट ऑफ करता येणार नाही.
प्रकाश झा यांची शैली साधारण अशी आहे की वास्तवात घडलेली एखादी घटना त्यांच्या सिनेमाचे मध्यवर्ती कथासूत्र असते, आणि त्याभोवती इतर प्रसंग उभे केलेले असतात. उदा. बिहारमधल्या एका गावात गुंडाच्या डोळ्यात गावकर्‍यांनी अ‍ॅसिड ओतले- त्या घटनेने प्रेरित होवून बनवलेला "गंगाजल" किंवा बिहारमधल्याच स्थितीवरचा 'अपहरण' किंवा दत्तक मूल संकल्पनेवर आधारित 'दिल क्या करे' इत्यादि.
आता 'आरक्षण' हा विषय केंद्रस्थानी ठेऊन सिनेमा करायचा तर त्याला पूर्ण न्याय दिला गेला पाहिजे. एक - दोन प्रसंगात गुंडाळण्याइतका सोपा विषय नाही हा ! त्यामुळे मध्यांतरानंतर सिनेमा भरकटल्यासारखा वाटतो.

'आरक्षण' सारखा विषय एक - दोन प्रसंगात गुंडाळण्याइतका सोपा विषय नाही, हेही ज्याला कळत नाही त्याला विलक्षण प्रतिभावंत म्हणण्याचे मी धाडस करू शकणार नाही, नाईलाज आहे- दिल है के मानता नही - क्या करे?

तुम्ही म्हणणार असाल तर मात्र मी अडथळा करणार नाही. Happy

---------------------------------------------------
सचिन शुन्यावर बाद होतानाही त्याची प्रतिभा किंवा महानता लपून राहात नाही. (असे माझे निरिक्षण आहे. इतरांनी मानलेच पाहिजे, असा अजाबात आग्रह नाही.)

होय. मी पण माझ्या वरील पोष्टीत "पिपली लाईव्ह" चा संदर्भ देणारच होतो. पण पोष्ट लांबू नये, म्हणून टाळले.
मला एवढेच म्हणायचे की,
शेतकरी आत्महत्त्या, आरक्षण, बलात्कार, या सारखे विषय ज्याला मांडायचे त्याने अभ्यासपूर्वक, मेहनत घेऊन आणि विषयाची निट हाताळणी करूनच मांडले पाहीजे.

अशा संवेदनशील विषयाचे मुर्खासारखे सादरीकरण केले जाऊ नये.

ज्ञानेश

एक करेक्शन.. ज्या सिनेमाला मुद्दाम वाद घडवून आणला जातो... असं वाचावं. Happy
सुरूवातीला नाही पाहिला कि नंतर रिपोर्ट्स मिळतातच. नसेल चांगला तर थेटरातून उतरतो आणि चांगला असेल तर आपल्याला कळतच ( पैसे वाचवण्यावर भर असलेल्या माझ्यासारख्यांचं हे लॉजिक Happy )

>>>>.. आणि त्याचक्षणी ती मुलगी आपली लांबसडक निमुळती बोटे आपल्या धारदार नाकाच्या नाकपुडीत घालून जोरजोराने नाक कोरू लागते !
Rofl

सिनेमा बघायचा चान्स तर नाहीच, पण परीक्षण लई आवडलं.

मुटेसाहेब, पीपली लाईव्ह स्टाईल सुरू होऊ नका ही नम्र विनंती. दॅट वॉज व्हेरी बॅड अ‍ॅक्च्युली. समाजाशी बांधिलकी असलेल्या विषयांवर तळमळीने बोलणे, काही करणे वेगळे; आणि ज्या मुद्द्यांशी समाजाची बांधिलकी नाही, असे 'तुम्हाला' वाटत असलेल्या विषयांवर स्वतःचाच पराभव होईल अशा शैलीतून आणि मुद्द्यांतून बोलणे वेगळे. तुमचे हेतू, ज्ञान आणि आवाका- याबद्दल मला अर्थातच आदर आहे- हे कृपया ध्यानात घ्या. Happy

'आरक्षण'ने उत्सुकता चाळवली होती, आणि काहीही करून तो बघणार असं मी ठरवलं होतं. इंटर्व्हलला चहा प्यावा लागणं, ही तो तोपर्यंत आवडल्याची एक पावती होती. कास्टचं कौतुक, अभिनयाचं कौतुक, प्रकाश झाच्या इंटेलिजंन्सचे कौतुक... असा सारा सोहळा. आधी चांगली कामगिरी करणार्‍यांना पण नंतर नाकर्ते झालेल्या सार्‍यांच्या वाट्याला, ते नाकर्ते होऊनही नंतर बराच काळ हे येत असावे. आपल्या परंपरेला अनुसरून त्यांनी नंतर कितीही फालतूपण केला, तरी ते जुने पुण्य त्यांना तारत असावे. आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधी बाजूने मते मांडणार्‍या, कृती करणार्‍या पात्रांना बघून खरंच छान वाटलं होतं; आणि तिथेच या बाजूंपैकी कोणती बरोबर-चूक हे ठरवायची इच्छाही मेली होती. एका मस्त प्लॉटवर फँटॅस्टिक खेळ बघायला मिळेल असे वाटले होते.

खेळ नंतर गंडला. सपशेल रडीचा डाव खेळला प्रकाश झा. आरक्षणावर अवाक्षरही नाही मध्यंतरानंतर. इंटर्व्हलच्या आधी इंटेलिजन्स आणि आशयाच्या नावाखाली झाकली गेलेली जुनाट शैली इंटर्व्हलनंतर अक्षरशः भर चौकात चड्डी काढल्यागत उघडी पडली.

बघू नका प्लीज. दयनीय पार्श्वभूमीवर महास्टार देखील कसे अक्षरशः उघडे-नागडे पडतात- याचे 'आरक्षण' मधला अमिताभ बच्चन हे उत्तम उदाहरण आहे. असे भाबडेभंपकस्वतःलाचफसवणारे रोल्स करणे त्याने आता प्लीज थांबवावे.

माझे पूर्ण मार्क्स सैफ अली खानला. तेवढाच दिलासा. बाकी सारे भिकार- मनोज वाजपेयीसकट. आणि तो सो-कॉल्ड्-इंटेलिजंट प्रतीक बब्बर तर अजिबात पुन्हा बघायची इच्छा राहिलेली नाही.

अतिवाईट. गर्दी कमी म्हणजे सिनेमा चांगला असणार- हा समज कधी कधी धुळीस मिळतो. चालायचंच. आपण प्रयत्न करण सोडायचं नाही.

अरेरे Sad प्रतिक केवळ २ सिनेमांनंतर माझा एकदम फेव आहे! अन "ब्लू ब्लडेड" सैफ ला दलित रोल कितपत झेपेल याचीही उत्सुकता होती, पण आता न बघणे बरे असे दिसतेय! Uhoh

तसा चित्रपट छान आहे.....पण बहुदा चित्रपटाची पटकथा लिहित असताना....झा यांनी नको ते वाद उद्व्भवनार नाहीत..असे वाटल्याने थोडी कल्पना बदलेली असावी..कारण आरक्षणावर जर विरोधी भाष्य दाखवले तरी वाद होनार आणी त्या बाजुने दाखवले तरी वाद होणार...यामुळे झा यांना सुवर्णमध्य काढण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटले गेले...सैफ अली दलित दाखवल्या गेल्याने फार वर्षानी दलित वर्गाला एक देखणा चेहरा मिळाला आहे..नाही तर दलित दाखवताना सदैव गरीब, लाचार, पिचलेले दाखवुन या वर्गाला नेहमीच वाईट चेहरा मिळाला आहे.. मनोज वाजपेयी सारखा कलावंताने अमिताभ च्या समोर उभे राहुन जो काही अभिनय केला आहे त्यास तोड नाही.. या चित्रपटात अजय देवगण आणि नाना पाटेकर यांना सारखे डोळे शोधत होते....या दोघांना पुरक असा विषय होता..बहुतेक ही दोघे नसल्यानेच चित्रपट भरकटला....

भारी परिक्षण! पार शेवटच्या सूचनेपर्यंत! Happy

आरक्षण हा शब्दच इतका स्फोटक आहे, की त्यावर बॅलन्स्ड सिनेमा काढणं फार कौशल्याचं काम आहे. प्रकाश झाची शैली भडक आहेच. त्यातून हा विषय. नो वन्डर तो घरंगळला. टीव्हीवर येईलच, पाहूया तेव्हा Happy

रच्याकने, 'मृत्यूदंड'ही त्याचाच ना?

प्रतिक बद्दल अगदी अगदी...सुनिल शेट्टी,राज बब्बर यांच्याच रांगेत.

परीक्षण भारी.

छान

Pages

Back to top