π (२२/७)

Submitted by UlhasBhide on 23 January, 2011 - 23:11

π (२२/७)

तुझ्या शब्दांचे अर्थ लावत,
संदर्भ उलगडत,
अर्थ-संदर्भांच्या गुंत्यात
राहिलो घुटमळत;
तू आखलेल्या की
मीच कल्पिलेल्या
त्रिज्येने आरेखित
वर्तुळाच्या परीघावर….
……………………
अकस्मात्
त्रिज्या आकुंचून
तू आखलंस एक
पूर्ण वर्तुळ…..
स्पष्ट, रेखीव, ठसठसशीत…..
….. आक्रसलेल्या परीघाचं;
नि मी, वर्तुळाबाहेर….
दुभंगलेला,
पूर्वीच्याच कल्पित परीघावर
बिंदुमार्गाच्या न सुटणार्‍या
प्रमेयाच्या गर्तेत
π प्रमाणे थिजलेला.
-----------------------------------------------------

(इथे Piचे चिन्ह नीट उमटत नसल्याने
सोयीसाठी हे लिहावे लागत आहे.
π = Pi = २२/७
बिंदुमार्ग = Locus)

गुलमोहर: 

<<नि मी, वर्तुळाबाहेर….
दुभंगलेला,
पूर्वीच्याच कल्पित परीघावर
बिंदुमार्गाच्या न सुटणार्‍या
प्रमेयाच्या गर्तेत
π प्रमाणे थिजलेला<<<

भावल्या या ओळी! सुंदर!! Happy

फारच छान कविता....

मला आरतीची ''वर्तुळ'' ही कविता आणी भूषणजींच्या गझलेच्या ओळी आठवल्या...

वेगवेगळे परीघ व्यास एक आपला
एवढाच एक दैवदुर्विलास आपला

फारच सुंदर.

मुक्तछंदातून तुमची प्रतिभा अधिक उठावून दिसते.

तुलनेने लयबद्धतेत लिहायला अधिक मर्यादा येतात.

लयबद्धतेत लिहिणारा कवी मुक्तछंदातही तितक्याच ताकदीने आपल्या भावना व्यक्त करू शकतो.
हे सिद्ध केलंय तुम्ही. Happy

शाळेत माझं गणित अत्यंत कच्चं असल्याने, बोर्डाच्या परिक्षेत कशीबशी पास होण्यापुरती तयारी केली होती... त्यामूळेच बहुतेक तुझी ही कविता अजिबात झेपली नाही.. Sad

म्हटलं तर कळली. म्हटलं तर नाही.

π प्रमाणे थिजलेला.>>> म्हणजे काय?

@हंसा,
एक भा.प्र. π = Pi = २२/७ च का?>>>
कारण कोणत्याही वर्तुळाच्या परिघाला त्याच्या व्यासाने छेदले असता येणारं उत्तर २२/७ किंवा ३.१४ च असतं.
अर्थात हा अर्थ कवितेत कुठेच दिसत नाही.. म्हणून कळलीही.. नाहीही.

कविता सुंदरच.. पण मला अजून काहि सांगायचे आहे :
Happy

सध्या...
बदलते आहे कविंचे व्यवसाय स्वरूप
कवि? नव्हे, त्यांचे झाले आहे गणितज्ञ

कोण लिहिते आहे पाई
तर कोण वर्तुळाचे अंश

नापास झालो कष्टाने ह्या विषयात
तेन्व्हा संपले हे भयानक ग्रहण
मिळेल सोपे काही समजायला विचार करून
आलो कला क्षेत्रात शब्दांची काठ धरुन

मात्र,
कुणास सुट्ले पुर्व जन्माचे फळं
आले नशिबास 'भुमितीय' कविवर्ग
मांड्तात मात्र भन्नाट
आयुष्याची कलिष्ट गणित Happy

प्रथम सर्वांना धन्यवाद.

कवितेवर दोन्ही टोकांचे प्रतिसाद आलेत. काहींना समजली, आवडली इतकंच नव्हे तर या कवितेवरून प्रेरणा घेऊन आणखी दोन कविता त्याच दिवशी प्रकाशित झाल्या. तर, काही मित्रांनी कविता कळली नाही या स्वरूपाचे प्रांजळ प्रतिसाद दिले. हा मोकळेपणा मनाला भावला. यामुळे मला २ गोष्टी करणं गरजेचं वाटतं.
१) मी आत्मपरीक्षण करणं.
२) कवितेबद्दल थोडासा उलगडा करणं.

वर्तुळ, पाय, त्रिज्या, परीघ, बिंदूमार्ग या शालेय अभ्यास क्रमात येऊन गेलेल्या भौमितिक संज्ञांचा मर्यादित वापर कवितेमध्ये प्रतीकं म्हणून केला आहे. कविता गूढ नाही. नेहमीचीच, ’तो’ आणि ’ती’ यांची कहाणी आहे. ’तो’ प्रेम व्यक्त कसं करायचं, "तिच्या मनात काय असेल" या विवंचनेत गुंतून अव्यक्त राहिलेला.
तिला त्याच्या भावनांची कल्पना नसल्याने, ती स्वत:च्या आयुष्याचा जोडीदार निवडते. (तिने आखलेलं ’स्पष्ट, रेखीव, ठसठशीत वर्तुळ’)
त्यामुळे ’तो’ आता बहिस्थ बिंदू सारखा. तिच्या मनापर्यंत पोचण्याचा मार्ग न सापडलेला (बिंदुमार्गाच्या न सुटणार्‍या प्रमेयाच्या गर्तेत), आपल्याच चुकांवर अजूनही विचार करत पूर्वीच्याच अवस्थेत खिळलेला.... म्हणून "π सारखा थिजलेला" वर्तुळ कुठल्याही आकारचं असलं तरी π = 22/7 हा स्थिरांक. तो कधीच बदलत नाही. म्हणून खिळणं या संकल्पनेसाठी वापरलेलं प्रतीक.

(त्रिज्या, परीघ, बिंदूमार्ग ही प्रतीकं वापरताना त्यांचे भौमितिक गुणधर्म माहितगारांकडून तपासून घेतले होते.)
वर्तुळासंदर्भात बिंदूमार्गाच्या सूत्रांमध्ये ’पाय’ चा प्रत्यक्ष वापर होत नसला तरी वर्तुळ आणि ’पाय’ यांचा अतूट संबंध असल्याने ’पाय’ हे प्रतिक ’एकाच जागी खिळून राहणे’ याकरता सहजच वापरलं गेलं. π शब्द वाचल्यावर कदाचित वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा त्रिज्या/व्यास परीघ यांचं गुणोत्तर अशी काही मित्रांची दिशाभूल कदाचित झाली असावी असं वाटतंय.

असो .....
"कविता लिहिलीस ते बास झालं, आता स्पष्टीकरण आवर"
असं कोणी म्हणण्याआधी थांबतो आता.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे परत एकदा आभार.

सुंदर!!!
(जल्ला गेली २-३ वर्षं या π च्या पायात पाय घालून धावतोय, पण हे सुचलंच नाही कधी... :D)

पुन्हा एकदा अभिनंदन!! Happy

कोरड्या वेणा देण्यापेक्षा मराठीतल्या सुंदर,नादमधूर मऊ,मुलायम,कोमल,नाजूक शब्दांसाठी आग्रह धरला तर बरं होईल.प्रेम कवितेसाठी त्याची जास्त गरज वाटते. अर्थात त्यासाठी आतून तसे फूलून यायला हवे.नादमधूरता ही सहेतूक नसतेँ.तिला नैसर्गिक परिमाण असते,असावे लागते.तुमच्या कवितेतील भावना ठीक आहे पण त्या व्यक्त करायला एव्हढे आढेवेढे कशासाठी?एखाद्या नवागताने एखाद्याला कुठल्यातरी घराचा पत्ता विचारावा आणि त्याने सांगावे-इथून पुढे जा, डावीकडे जा,उजविकडे जा, सरळ जा,थोडं पुढे जा, उजविकडे मग पूढे मग डाविकडे आणि तिथे विचारा.असे नको व्हायला.

अप्रतिम सुंदर...
>> नि मी, वर्तुळाबाहेर….
दुभंगलेला,
पूर्वीच्याच कल्पित परीघावर
बिंदुमार्गाच्या न सुटणार्‍या
प्रमेयाच्या गर्तेत
π प्रमाणे थिजलेला.

अशक्य प्रतिमा.

तू आखलेल्या की
मीच कल्पिलेल्या -> मस्त!! Happy

तू आखलंस एक
पूर्ण वर्तुळ…..
स्पष्ट, रेखीव, ठसठसशीत…..
….. आक्रसलेल्या परीघाचं;
नि मी, वर्तुळाबाहेर….
दुभंगलेला,
पूर्वीच्याच कल्पित परीघावर
बिंदुमार्गाच्या न सुटणार्‍या
प्रमेयाच्या गर्तेत
π प्रमाणे थिजलेला.

खरोखर अशक्य प्रतिमा.!!!!
प्रचंड आवडली !!!!

खूपच आवडली ! किती चपखल -संकल्पना!
आयुष्यात पहिल्यांदा पाया बद्दल (pi) आपुलकी वाटली आहे!

बिंदूमार्ग म्हणजे काय? रेषा म्हणायचे आहे काय? बाकी कविता समजावून दिल्यावर कळाली, पण भावली नाही मनाला. Sad क्षमा असावी.

असल काही कविचं लिहू शकतो.
आम्ही कोण म्हणुनी काय पुसशी दाताड वेंगाडूनी,
आम्ही असू लाडके देवाचे.....