'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे
साधारण दोन दशकांपूर्वी -
शाळेत आठवी, नववीच्या वर्गात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा झाली. विषय होता "अणुऊर्जा सामर्थ्य फायदे आणि तोटे". कसलाही विचार न करता आठवीतल्या मी आणि माझ्या मैत्रिणीने नाव नोंदवलं. आता या विषयावर माहिती मिळवायला हवी होती. तेव्हाच्या काळात इंटरनेट वगैरे काही नव्हतेच शिवाय मी राहत होते त्या ठिकाणी विज्ञानाची पुस्तके मिळणारी लायब्ररीही नव्हती. शाळेतली पुस्तके पुरेशी नव्हती. मग कुठल्या कुठल्या बाईंच्या घरी जाऊन, ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन खूप माहिती गोळा केली. स्पर्धेची तयारी म्हणून चार्टस वगैरे तयार केले. तेव्हा मिळणारा एक एक माहितीचा तुकडा अमूल्य होता. अणूचे विभाजन कसे होते, त्यापासून कशी प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते, मूलद्रव्याचे 'हाफ लाईफ'* वगैरे संकल्पना तेव्हा अभ्यासल्या. हे सगळं एकदम भारून टाकणारं होतं. मात्र त्या माहितीच्या तुकड्यांमधेच जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्ब बद्दल जेव्हा माहिती वाचली तेव्हा खूप भयानक वाटलं होतं. सगळंच उध्वस्त झालं म्हणजे काय झालं असेल याची कल्पनाही करता येत नव्हती. किरणोत्सर्ग झालेल्या माणसांच्या , मुलांच्या कथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. त्या 'मश्रूम क्लाऊड'** चे पाहिलेले चित्र मनावर पक्के कोरले गेले. नक्की आठवत नाही पण माझ्या तेव्हाच्या लिखाणात हे सगळे तोटेच फार दिसले असावेत असं वाटतंय. तेव्हाच केव्हातरी मी ठरवलं कि हिरोशिमा आणि नागासाकीला जाऊन तिथे काय झालंय ते एकदा बघायचेच. तिथे जाता येईल का? आता तिथे काय असेल हे सगळे प्रश्न त्या वयात पडलेच नव्हते.
जून २०११ -
मी स्वत:शीच ठरवलेल्या हिरोशिमा भेटीच्या गोष्टीला आता अनेक वर्ष उलटली होती. नशिबाने मला अगदी सहज जपान मधेच आणलं होतं. मात्र काही ना काही होऊन अजून प्लान न झालेली हिरोशिमा भेट यावर्षी मात्र ठरवूनच टाकली. आता हिरोशिमा तोक्यो सारखेच एक शहर आहे, तिथे कसल्याही खुणा नाहीत वगैरे माहिती आधीच कळली होती. पण माहिती असणे आणि उमजणे यात फरक आहेच. तिथे पोचल्यावर खरच या शहराने असे काही सहन केले असेल असे वाटलेच नाही. पण तेव्हाही मनात आलं कि जिथे अणुबॉम्ब टाकला ती जागा दूर असणार त्यामुळे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. सामान ठेवून लगेचच भर पावसात आम्ही ट्रामने निघालो 'गेम्बाकू दोम' अर्थात "हिरोशिमा आटोमीक बॉम्ब डोम" किंवा 'A-Bomb Dome' आणि 'हिरोशिमा पीस म्युझियम' बघायला. पण ते ठिकाण ट्रामनेही फार दूर नव्हते. या थांब्यावर उतरल्यावर पुन्हा एक धक्का बसला. ट्राम मधून उतरल्या उतरल्या लगेचच 'गेम्बाकू डोम' अगदी समोर उभा होता. जी बघायचे इतकी वर्ष मनात होते ती भग्न वास्तू अशी समोर उभी दिसल्यावर काय वाटले ते लिहिता येणार नाही. या वास्तूच्या अवती भवती फिरताना नकळतच ६६ वर्षापूर्वी या वास्तूचे जे स्वरूप असेल आणि काही क्षणांच्या त्या अवधीत जी उलथापालथ झाली असेल त्याची ओझरती, पुसटशी चित्रे मनःपटलावर तयार होऊन विरत होती. त्यांना निश्चित असे स्वरूप नव्हते पण त्या वेदना, दुख: जाणवत होती. कदाचित त्यावेळच्या तिथल्या सावल्या जशा भिंतींवर, दगडावर कोरल्या गेल्या तशाच कुणी सांगावे त्या भावनाही तिथल्या आसमंतात कोरल्या गेल्या असतील आणि तिथे जाणाऱ्यांना जाणवत असतील.
हा डोम 'आइओई' नदीच्या काठावर आहे. त्या बिल्डींगचे खरे नाव तीन वेळा बदलले आणि स्फोटाच्या वेळचे नाव होते 'हिरोशिमा इण्डस्ट्रिअल प्रमोशनल हॉल'. स्फोटानंतरच्या काही दशकात नवीन इमारती बांधताना पूर्वीचे सगळे साफ केले गेले. हा डोमही कदाचित गेला असता पण लोकांनी मागणी करून १९६६ साली याला अणुस्फोटाचे स्मारक करण्याचे ठरले. तेव्हा याचे नामकरण 'हिरोशिमा आटोमीक बॉम्ब डोम' किंवा 'A-Bomb Dome' असे केले गेले. १९९६ साली या डोम ला युनेस्कोने 'वर्ल्ड हेरीटेज' म्हणून मान्यता दिली. त्याची पडझड होऊ नये म्हणून डागडुजी करून आता आतमध्ये लोखंडाचे सपोर्ट वगैरे लावले आहेत.
अणुस्फोटाचे केंद्र (हायपो सेंटर) या हॉल पासून साधारण दीडशे मीटर अंतरावर होते. बॉम्ब टाकताना तो या 'आइओई' नदीवर असलेल्या टी आकाराच्या ब्रिज वर टाकायचा असे ठरले होते पण (कदाचित लिमिटेड प्रिसिजन मुळे ) तो काहीशे मीटर बाजूला पडला. केंद्रापासून साधारण दोन किमी च्या परिसरातल्या जवळपास सगळ्याच इमारती घरे पार उध्वस्त झाली. हा डोम आणि अशाच एखाद दोन इमारती थोड्याफार उभ्या अवस्थेत राहिल्या. इतक्या प्रचंड उष्णतेत आणि दाबात हा डोम असा शिल्लक राहिला हे महद्आश्चर्यच. 'आइओई'वरचा T ब्रिज सुद्धा शिल्लक राहिला. पण तो ब्रिज म्हणे धक्क्यामुळे एकदा उंच वर उडून पुन्हा जागेवर बसला. दुरुस्त करून काही वर्ष तो पुन्हा वापरात होता. पुनर्बांधणी केलेल्या या ब्रिजवरूनच ट्राम जाते. स्फोटाच्या प्रचंड प्रकाशाने या ब्रिजवरच्या रस्त्यावर रेलिंग्ज च्या सावल्या कायमच्या छापल्या गेल्या होत्या. शेकडो लोकांनी भाजल्याच्या वेदना कमी करण्यासाठी या 'आइओई' नदीत उड्या टाकल्या होत्या. इतक्या जवळ असलेले फारसे कुणी बचावालेच नसल्याने हि नदी मृतदेहांनी भरून गेली होती.
त्याच परिसरात पुढे असलेल्या पीस म्युझियमची भव्य नवीनच बांधलेली इमारत आहे. डोमच्या इतिहासाचे प्रचंड ओझं वागवतच आम्ही पीस म्युझियम मध्ये शिरलो. आत गेल्यावर सुरुवातीलाच एक व्हिडियो दिसतो. त्यात एका टेस्ट साठी केलेला अणुस्फोट दाखवला आहे आणि 'मश्रूम क्लाऊड'ही दिसलाय. या स्फोटाचा हादरा इतका जबरदस्त वाटला कि काही क्षण मन सुन्न झाले. हि टेस्ट होती हे कळूनही फार कसतरीच वाटलं. पण अजून बरंच बाकी होतं. आत सुरवातीला दुसऱ्या महायुद्धाचा साधारण इतिहास आणि बरेच फोटो आहेत. त्यात जपान कसा या युद्धात गोवला गेला. हिरोशिमा सारखी शहरे कशी इन्डस्ट्रिअल सेंटर झाली अशा प्रकारची माहितीही आहे. या महायुद्धाच्या वेळी जपानची स्थिती फारच हलाखीची झाली होती. खाणपिणं, रोजच्या गरजेच्या वस्तू यांचा तुडवडा होता. १९४१ मध्ये जपान ने 'पर्ल हार्बर' वरचा हल्ला केला आणि अमेरिकेविरुद्ध खुले युद्ध सुरु झाले.हिरोशिमाच्या फॅक्टरीज मिलिटरी प्रॉडक्ट्स बनवायला लागल्या. सामान्य माणसेही युद्धात खेचली गेली. शहरांवरील रात्रीचे हल्ले वाचवण्यासाठी शहरांमध्ये ब्लॅक आउट्स करायला लागले. हिरोशिमामधल्या घरांसाठी बॉम्बशेल्टर वगैरेही तयार केली गेली. शाळेतली मुलेही वेगवेगळ्या मेहेनतीच्या कामाला जुंपली गेली. जपानच्या विविध भागातून बरीच मुले कामासाठी म्हणून हिरोशिमा सारख्या शहरात आणून ठेवली होती. असे म्हणतात कि वाढत वाढत हे प्रमाण इतके झाले कि १९४४ पर्यंत हिरोशिमाताल्या फॅक्टरीज मध्ये साधारण एक चतुर्थांश कामगार ही मुलं होती. मोठ्या मोठ्या आगीचा धोका टाळण्यासाठी जवळ जवळ असलेली घरे पाडून टाकण्यात आली आणि हिरोशिमामधले लोक बेघर झाले. भाज्या, खाद्यपदार्थ यांचा तुडवडा कमी करण्यासाठी शाळेच्या मैदानात मुलांकडून शेतीची व इतर कामे करून घेतली जाऊ लागली. स्फोटात याच सगळ्या मुलाना आपले जीव गमवावे लागले. त्या मुलांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी उभी असलेली देवी, शांततेचे प्रतिक म्हणून तयार केलेले ओरिगामीचे करोडो हंस या गोष्टी डोम च्या जवळपास ठेवलेल्या आहेत.
मेहेनतीची काम करणारी शाळेची मुले.
अमेरिकेने अणुबॉम्ब का बनवला ?
कमी अधिक प्रकारे या महायुद्धात सापडलेल्या सगळ्याच देशांची अशी परिस्थिती असावी. मग अमेरिकेने अणुबॉम्ब का बनवला ?
जर्मनीमध्ये १९३८ साली अणु विघटन (न्युक्लीअर फिजन) करून प्रचंड ऊर्जा निर्माण होते अशा प्रकारचा शोध लावला गेला होता. त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या युद्धात नवनवीन प्रकारची युद्ध सामुग्री वापरली गेली. या प्रचंड अणुऊर्जेचा वापर बॉम्ब बनवायला करणे ही यातीलच एक संकल्पना.
नाझी आणि हिटलरच्या भयाने 'Leó Szilárd' आणि काही जर्मन शास्त्रज्ञ अमेरिकेत पळून गेले होते. त्यांची अशी खात्री होती कि जर्मनी अणुऊर्जेवर आधीच प्रयोग करून बॉम्ब बनवत आहे. म्हणून त्यांनी आईनस्टाईनला भरीस पाडून अमेरिकेच्या तेव्हाच्या अध्यक्ष रूझवेल्ट यांना एक पत्र लिहावयास लावले. त्यानुसार नवीन प्रकारच्या बॉम्बबद्दल प्रयोग करण्याची परवानगी मागितली गेली आणि ती मिळालीही. बहुधा हा सगळ्या जगासाठीच एक काळाकुट्ट दिवस असावा. याप्रकारे हे प्रयोग सुरु झाले.
पुढे १९४२ मध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरु झाला. अमेरिकेसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. तीन वर्ष आणि २ बिलियन डॉलर्स याचा चुराडा करून १९४५ साली जगातला पहिला अणुबॉम्ब तयार झाला. १६ जुलै १९४५ साली जगातल्या पहिल्या अणुबॉम्बची मेक्सिको मध्ये चाचणी केली गेली.
मॅनहॅटन प्रोजेक्ट
पहिल्या अणुबॉम्बची चाचणी
त्याआधीच म्हणजे १९४३ सालापासूनच युद्धात जपान वरचढ ठरतोय हे लक्षात घेऊन अमेरिका जर्मनी ऐवजी जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा विचार करायला लागले. १९४४ सालापर्यंत मात्र जपानची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तेव्हा सोवियेत युनियनच्या सहकार्याने जपान मध्ये घुसून युद्ध थांबवणे किंवा जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरणे असे दोन उपाय होते. सोविएत संघाचा वरचष्मा टाळण्यासाठी आणि शिवाय खर्च झालेले २ बिलियन डॉलर उपयोगी आणले हे दाखवण्यासाठी १८ सप्टेंबर १९४४ या दिवशी अणुबॉम्ब वापरणे हा ऊपाय निवडला गेला.
आता जपान हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. पण या प्रोजेक्ट वर काम करणार्यांना त्याची बरीचशी कल्पना होतीच. तरिही या परिणामांचा नीट अभ्यास करण्यासाठी म्हणून त्यांना अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो, योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन २५ जुलै रोजी हिरोशिमा, कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित तोक्योचे नाव नसण्याचे कारण म्हणजे तोक्यो मध्ये युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली.
६ ऑगस्ट १९४५
नेहेमीसारखाच उगवलेला हा दिवस हिरोशिमासाठी इतका वाईट ठरणार आहे याची हिरोशिमावासियांना कल्पना असण्याचे काही कारणच नव्हते. मात्र बॉम्बिंगची 'ऑफिशिअल प्रोसेस' आणि तयारी आदल्या रात्रीच सुरु झाली होती. तेव्हा 'विज्युअल बॉम्बिंग' सगळ्यात विश्वासार्ह असल्याने तेच करण्यात येणार होते. पहाटेच तीनियान, मारियाना बेटावरून वातावरणाचा आढावा घेणारी विमाने निघाली. आकाश निरभ्र असल्याने हिरोशिमाचा प्लॅन नक्की झाला. त्यानंतर B-29 जातीची तीन विमाने निघाली. त्यातल्या पहिल्या enola gay नावाच्या विमानात "लिटील बॉय"$ नामक अणुबॉम्ब होता. नाव 'लिटील बॉय' असले तरी १३००० टन इतकी त्याची क्षमता होती. आणि हा 'युरेनियम-२३५' वापरून तयार करण्यात आला होता. 'युरेनियम-२३५'चे 'हाफ लाईफ' ७०० मिलियन वर्षे इतके आहे. त्याच्या मागच्या विमानात तापमान, दाब इत्यादी मोजणारी यंत्रे होती आणि शेवटचे विमान फोटोग्राफीसाठी होते. अमेरिकेने स्वताच्या प्रयोगाच्या सिद्धांतासाठी तापमान आणि इतर अनेक गोष्टी मोजणारी उपकरणेही बॉम्बिंग करण्यात येणारया भागाच्या आसपास टाकली.
सकाळी ८:१५ मिनिटांनी enola gay ने ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या T ब्रिज वर टाकला. काही सेकंद फ्री फॉल झाल्यावर तो बॉम्ब जमिनीपासून साधारण ६०० मी उंचीवर T ब्रिजच्या जवळच असलेल्या शिमा हॉस्पिटलच्यावर हवेतच फुटला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण झाला. त्यानंतरच्या दोन तीन सेकंदात आगीचा एक प्रचंड लोळ तयार झाला. क्षणाभरातच तो लोळ तीन किमीच्या परिसरात पसरला आणि काही क्षणांसाठी त्या भागातले तापमान ३००० डिग्री सेल्सियस च्या पुढे पोचले. त्या आगीचा आणि धुराचा 'मश्रूम क्लाऊड' तयार झाला, जो कित्येक किमी अंतरावरूनही दिसला. त्यानंतरच्या काही सेकंदात जोरदार हवेचा दाब तयार होऊन मोठठा हवेचा धक्का बसला. हे सगळे व्हायला आपल्याला विचार करायला लागतोय त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ लागला.
तिथे प्रत्यक्ष असलेल्या लोकांना तर विचार करायलाही वेळ मिळाला नाही. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. दोन, तीन किमीच्या परिसरातल सगळं सगळंच उद्वस्त झालं. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या#. हजारो माणसे भाजली. आणि ती वेदना टाळण्यासाठी त्यांनी पाण्यात, नदीत उड्या मारल्या. अनेकांची त्वचा शरीरापासून वेगळी झाली. इतकी प्रचंड उष्णता आणि किरणोत्सर्ग यांनी श्वासमार्ग आणि अन्नमार्ग भाजून निघाले. आणि त्यामुळे लोकांचे हालहाल झाले. हजारो माणसे भाजल्याने मेली, जी वाचली ती काही तासात तीव्र किरणोत्सर्गाने आणि भाजल्याच्या जखमांनी मुत्यूमुखी पडली. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही. स्फोट होऊन दोन तासांनी पहिला फोटो घेतला गेला. शाळेतल्या टीन एज मुलांच्या ग्रुपचा. भाजलेले, गोंधळलेले,घाबरलेले, भकास अवस्थेतले. फोटोग्राफर म्हणतो "माझी फोटो घ्यायची हिम्मतच होत नव्हती. पण खूप हिम्मत करून काढलाच. मग थोडा धीर आला आणि गरज म्हणून फोटो काढत गेलो." त्या पहिल्या फोटोचा फोटो काढायचीसुद्धा माझी हिम्मत झाली नाही.
हा स्फोटापासून ७ किमी अंतरावरून स्फोटानंतर काही मिनिटात दिसलेला मश्रूम क्लाऊड
स्फोटानंतर -
इतक्या सगळ्या उत्पातानन्तरही अमेरिकेने दुसरा बॉम्ब "फॅट मॅन" नागासाकीवर टाकलाच. जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी विनाअट शरणागती पत्करली. ती नसती पत्करली तर कदाचित तिसरा अणुबॉम्बही पडला असता. तशा ऑर्डर्सही निघाल्या होत्या. मात्र जपानच्या शरणागतीमुळे दुसरे महायुद्ध संपले. स्फोट तर होऊन गेला. पण पुढचे काळे भविष्य अजून जपानी लोकांना कळलेच नव्हते. स्फोटानंतर किरणोत्सर्गी काळा पाऊस पडला. स्फोटात जखमी झालेले आणि वाचलेलेही बरेच जण पुढच्या काही दिवसात तीव्र किरणोत्सर्गामुळे मृत्यू पावले. त्यातही केसातून कंगवा फिरवताच मुलांचे सगळेच्या सगळे केस हातात आलेल्या आया, नखे , केस गळून गेलेली माणसे होती. स्फोटाच्या वेळी जन्मही न झालेली पण आपली बुद्धी आणि आकलन क्षमता घालवून बसलेली बाळं होती. आणि अजुनही न लिहवता येणारया असंख्य गोष्टी इथल्या माणसांना भोगाव्या लागल्या. तेवढ्यातही त्यांचे भोग संपले होते का? तर नाही. स्फोटानंतरच्या काही वर्षात कॅन्सरचे आणि ल्युकेमियाचे प्रमाण खूप वाढले. जी मुले त्यावेळी लहान होती त्यांना पुढच्या चार ते पाच वर्षात कॅन्सर ने गाठले. त्यातलीच एक 'सादाको सासाकी'. तिने बरं होण्यासाठी एक हजार ओरिगामीचे हंस करायचे ठरवले पण नियतीला ते मंजूर नव्हतेच. असेच अनेक अभागी जीव त्या २ बिलियन डॉलर च्या खर्चाला राजमान्यता देण्याच्या प्रयत्नात मूत्यू पावले. अमेरिकेने मात्र हिरोशिमा आणि नागासाकी हि शहरे नागरी वस्तीची असल्याची माहिती बराच काळ दडवून ठेवली. पुढला बराच काळ हि दोन ठिकाणे फक्त मिलिटरीचे अड्डे असल्याचे भासवण्यात आले होते.
#1 - काळ्या पावसाचे ओघळ
#२ वाकलेले लोखंडी दरवाजे
#३ भग्न मूर्ती
#४ वितळून चिकटलेल्या काचेच्या बाटल्या
#५, #६ वितळलेल्या टाईल्स आणि क्रोकरी
सादाकोने केलेले ओरीगामिचे हंस
राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी -
जपान्यांच मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खरंतर जपानी मिलिटरीला हिरोशिमामधल्या स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज यायलाही आणि बाहेरून मदत मिळायलाही काही तास गेले. अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. पण तरी बॉम्बस्फोट झाल्यानंतरच्या काही तासात मदत कार्य वेगाने चालू झाले. हिरोशिमाताल्याच जगल्या वाचलेल्या लोकांनी रस्ते आणि दळणवळण नीट करायचे प्रयत्न सुरु केले. चक्क दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काही भागातला वीजपुरवठा सुरळीत केला. स्फोटापासूनच्या तीन दिवसात शहराच्या बरयाच भागात ट्राम सर्विस चालू झाली. हायपो सेंटर पासून फक्त १.९ किमी वर असलेल्या हिरोशिमा स्टेशनलाही स्फोटाचा हादरा बसलेला होता. पण जिवंत असलेल्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने दुसऱ्या दिवशी 'उजीनो' नावाची एक ट्रेन लाईन चालू झाली आणि आठ तारखेला दुसरी ट्रेन लाईनही चालू झाली. या जागी पुढची ७५ वर्षे काहीही उगवणार नाही असे बोलले जात असताना ऑटममध्ये काही ठिकाणी जमिनीतून फुटलेल्या अन्कुरांमुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. पीस म्युझियमच्या बाहेर असलेले आसागिरीचे एक झाडही असेच आतून जळून गेलेले पण त्यालाही पालवी फुटली. या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे लोकांना जगण्याची उमेद मिळाली. त्या आसागीरीच्या झाडाचे एक हृदयस्पर्शी गाणे तिथे ऐकता येते. गाण्याचे बोल या जुन्या जखमा न विसरताही उमेदीचे जगण्याची आशा देतात. इथल्या लोकांच्या परिश्रमाने आणि उमेदीने काही वर्षातच जपान पुन्हा एक महासत्ता म्हणून गणला जाऊ लागला. राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी जपानच्या रूपाने सगळ्यांना दिसला. आता आज ६६ वर्षांनी या घावाची कुठलीच दृश्य खुण दिसत नाही. पण जुन्या हिरोशिमाच्या लोकांच्या मनात हा घाव अजून तसाच आहे. दर वर्षी ६ ऑगस्ट ला 'आइओइ' नदीच्या काठी जमून लोक मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. नदीत दिवे सोडतात. आजही हिरोशिमाचे महापौर जगात कुठेही 'न्युक्लीअर टेस्ट' केली कि तिथल्या राष्ट्राध्याक्षाना पत्र पाठवतात. आज पर्यंत अशी एकूण ५९५ पत्रे त्यांनी पाठवली आहेत.
अओगिरीचे गाणे इथे ऐकता येईल
हिरोशिमाच्या मेयरने पाठवलेले एक पत्र
बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वाचताना किंवा त्यासंबंधी सिनेमे बघताना जपानी सैनिक अतिशय क्रूर होते असे भासवले जाते. ते कडवे राष्ट्रभक्त होते आणि आहेतही. नेहेमीच्या बोलण्या वागण्यात त्यांची राष्ट्रभक्ती दिसून येणार नाही. पण जेव्हा त्यांचा देश कुठल्याही संकटात असतो किंवा अगदी एखादा खेळाचा जागतिक पातळीवरचा सामना असतो तेव्हा सगळे जपानी एका वेगळ्याच राष्ट्रभक्तीने भारून गेल्यासारखे वाटतात. पण क्रूरता मात्र कुठे दिसत नाही. जर ती मूळ रक्तात होती तर आताही दिसायला हवी होती. एका जपानी मित्राला या बाबतीत जेव्हा विचारले तेव्हा त्याने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे होते, "इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो"!
पुन्हा एकदा जून २०११-
जपानचे दुर्दैव म्हणावे का काय ते कळत नाही. ज्या जपानने कधी अणुबॉम्ब बनवला नाही, किंवा त्याला मदतही केली नाही त्या जपानला दुसऱ्या महायुद्धात दोन वेळा आणि आता पुन्हा एकदा किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागतेय. जपान या प्रसंगातून नक्कीच मार्ग काढणार हे आहेच. अणु उर्जेचा सामर्थ्य म्हणून केलेला वापरही जर किरणोत्सर्गाचा धोका आपल्यापुढे ठेवत असेल तर उर्जा म्हणून दुसऱ्या पर्यायांकडे बघण्याची गरज आहे. जपान या आपत्तीमुळे बाबतीत एखादा नवीन पायंडा पाडून जगाला 'क्लीन एनर्जी' कडे नेणार का ही विचार करण्याची गोष्ट आहे.
जगाला शांतीचा संदेश देणार्या या बुद्धाची भंगलेली मुर्ती बरेच काही सांगुन जाते!
*हाफ लाईफ - एखादे किरणोत्सर्गी मुलद्रव्य असलेल्यापेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला हाफलाईफ असे म्हणतात.
** मश्रूम क्लाऊड - अणुबॉम्बचा स्फोट झाल्यावर धुअराला, धूर , आग अशा मिश्रणाचा एक मोठ्ठा ढग दिसतो, त्याचा आकार मश्रूम सारखा दिसतो, म्हणून त्याला मश्रूम क्लाऊड म्हणतात.
#सावल्या - प्रचंड उष्णता आणि प्रकाशामुळे काही वस्तू, सजीव यांच्या सावल्या भिंतीवर उमटल्या गेल्या. म्हणजे सावली पडलेले भाग सोडून बाजूची भिंत ब्लीच झाले आणि सावलीचा भाग तसाच काळा राहिला.
$ लिटील बॉय हे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नावं आहे. याबद्दल अधिक तांत्रिक माहिती इथे मिळेल.http://en.wikipedia.org/wiki/Little_Boy
---------------------
हा लेख माझ्या ब्लॉगवरही वाचता येईल.
http://prakashraan.blogspot.com/2011/08/blog-post.html
-हा लेख इतरांना वाचायला द्यायचा असल्यास कृपया लेखाची इथली किंवा ब्लॉगवरची लिंक द्या.
-या लेखात वापरलेले जे फोटो हिरोशिमा पिस म्युझियम मधे काढले आहेत त्याखाली तसे नमुद केले आहे. आणि इथे ते फोटो फक्त माहिती म्हणुन वापरलेले आहेत. या म्युझियम मधे फोटो काढायला परवानगी आहे.
- शुद्धलेखन सहाय्यासाठी मंजिरीचे मनापासुन आभार.
.
.
अंगावर काटा आला आत्ता परत
अंगावर काटा आला आत्ता परत वाचताना फोटोंमुळे भयानकता अजुनच जाणवत्ये
मनात बरीच खळबळ माजल्ये. पण नाही लिहु शकत आत्ता!
सुरेख लिहिले आहेस
सुरेख लिहिले आहेस सावली.
'कोकुरा' बद्दल वेदर चॅनलवर एक डॉक्युमेन्टरी पाहिली होती. "When Weather Changed History" मध्ये. 'कोकुरा'च नक्की केले होते पण तिथे ढगाळ वातावरण होते म्हणून..
यावरुन Kokura's luck असा शब्दप्रयोगही निघाला.
छान माहिती आणि फोटो!
छान माहिती आणि फोटो!
सावली, खुप छान लिहीलय्स...
सावली, खुप छान लिहीलय्स... अंगावर काटा आला नुसतं वाचुन सुद्धा
भयाण....
भयाण....
छान लिहिलसं , हिरोशिमा
छान लिहिलसं , हिरोशिमा नागसाकी विषयी आतापर्यंत जे काही वाचलं त्यापेक्षा परिस्थिती कितीतरी पटीने भयंकर असल्याचं फोटो बघुन जाणवलं
बापरे !! अंगावर काटा आला
बापरे !! अंगावर काटा आला वाचताना..
सुरेख लिहिलयस !
अतिशय चांगला लेख ! इतिहासातलं
अतिशय चांगला लेख !
इतिहासातलं एक काळंकुट्ट पान अमेरिकेच्या अमेरिकेच्या नांवावर !
खरंच काटा आला अंगावर वाचताना.
खरंच काटा आला अंगावर वाचताना.
हिरोशिमा नागसाकी विषयी आतापर्यंत जे काही वाचलं त्यापेक्षा परिस्थिती कितीतरी पटीने भयंकर असल्याचं फोटो बघुन जाणवलं>>>>अनुमोदन.
काय प्रतिक्रिया लिहावी तेच
काय प्रतिक्रिया लिहावी तेच कळत नाहीये.
समयोचित आणि मेहनतपूर्ण लेख.
समयोचित आणि मेहनतपूर्ण लेख. या लेखात दिलेले फोटो पहिल्यांदाच पाहण्यात आलेत. बाराला दहा कमी या पुस्तकातही अणुबाँबचा इतिहास चांगला दिलाय.
सावली फार अभ्यासपूर्वक आणी
सावली फार अभ्यासपूर्वक आणी आंतरिक तळमळीने लिहिले आहेस. अतिशय सुंदर लेखन.
"इतिहास हा जेत्यानी लिहिलेला असतो" खरयं
जपानी लोकं खरचं खूप शांतता प्रिय वाटतात. नेहमी बोलताना हसून बोलतात व त्यांचे कमरेत वाकून अभिनंदन करणे खूप आवडते. चिमुकल्या देशावर किती संकटे यावीत.
सुरेख लिहीले आहेस
सुरेख लिहीले आहेस स्वप्नाली.
बापरे, हिरोशिमा पीसम्युझियम आणि गेनबाकु-डोम याला भेट देऊन आल्यावर डोक्यात कोणी बत्ता घातल्यासारखे वाटते. श्वास घ्यायलाही त्रास होतो थोडा वेळ.
सादाको आणि पेपर क्रेन्सचाही एक फोटो टाक ना, आणि बाहेरच्या मेमोरियलचा. ते मेमोरियल इतके सुरेख कोनसाधुन तयार केले आहे, की म्युझियमकडुन पाहताना बरोबर त्या मेमोरियलच्या कमानीतून गेनबाकु डोम दिसतो. फार हृद्य आहे ते. आपल्या मागे संग्रहालय (त्या सर्व भग्न अवशेषांचे), समोर मेमोरियलची कमान आणि त्यातून दिसणारी ती उध्वस्त डोमची प्रतिकृती. वर निळे आकाश आणि खाली फुलांचे ताटवे. नक्की कुठली गोष्ट खरी आहे तेच कळत नाही. आणि हे सर्वच खरे आहे हे जाणवून तर विष्णण व्हायला होते.
तसेच मुलांसाठी म्हणून जी अँटीवॉर-अँटी न्युक गोष्टींची परंपरा तयार झाली त्याबद्दलही लिही प्लीज.
नि:शब्द केलंत... फार फार
नि:शब्द केलंत...
फार फार सुंदर लेख...
अभिनंदन!
इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो - १००% सहमत..
नक्की कुठली गोष्ट खरी आहे तेच
नक्की कुठली गोष्ट खरी आहे तेच कळत नाही. आणि हे सर्वच खरे आहे हे जाणवून तर विष्णण व्हायला होते. >>
अगदी अगदी रैना!!
जपान्यांच्या भरारीबद्दल मेड
जपान्यांच्या भरारीबद्दल मेड इन जपान हे पुस्तक बरच भाष्य करतं..
जबरदस्त लेख ! मानवाच्या
जबरदस्त लेख !
मानवाच्या कृरपणाचा एक ठळक नमुना ! मग त्या हिटलरलाच केवळ कृरकर्मा का म्हणावे?
धन्स सावली !!
राखेतून जन्म घेणारा फिनिक्स
राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी जपानच्या रूपाने सगळ्यांना दिसला...
जपानला अभिवादन
माहितीपुर्ण लिहिलेय, सुंदर
माहितीपुर्ण लिहिलेय, सुंदर आणि छान तरी कसं म्हणू ?
लालू हो कोकुरोचे नशिब ढगांनी
लालू हो कोकुरोचे नशिब ढगांनी बदलले, तसेच नागासाकीचेही. नागासाकीवर टाकलेला बॉम्ब जास्त मोठा २१ टन चा होता. पण इंधन संपल्याने आणि आकाश निरभ्र नसल्याने तो एका दरीत टाकावा लागला, त्यामुळे हानी फार कमी झाली.
काही वाचलं त्यापेक्षा परिस्थिती कितीतरी पटीने भयंकर >>हो खरच. पण हे फोटो फक्त काही टक्के सत्य दाखवत आहेत . बाकिच्या फोटोचे फोटो मी काढले नाहीत. तेवढी हिंमत नव्हती.
निराली , शांतताप्रिय असले तरी त्यांची राष्ट्रभक्ती मात्र प्रखर आहे. ती 'झेंडावंदन' वगैरे सारख्या गोष्टीतुन न दाखवता ते गरज पडेल तेव्हा दाखवतात.
रैना, म्युझियम बघुन परत आलो तेव्हा डोके बधिर झाले होते. "I am not the same as before.." असे काहिसे फिलिंग आले होते.
पेपर क्रेन्स चा फोटो आहे वर, सादाको चा फोटो काढला नाही. आणि तु म्हणतेयस त्या कोनातुनही फोटो नाहीये. आम्ही गेलो तेव्हा प्रचंड पाऊस कोसळत होता. डोमचा फोटो काढेपर्यंत दोनचार मिनीटे उघडीप होती फक्त.
अँटीवॉर-अँटी न्युक गोष्टींची परंपरा>> मला खुप काही माहिती नाहिये याबद्दल. पण शोधुन लिहेन नक्की. इथे लोकांना याविषयी काही विचारले तर ते उत्तर द्यायला नाखुष असतात. ती जखम परकियांसमोर पुन्हा वर काढावी अशी बहुधा त्यांची इच्छा नसते.
जबरदस्त लेख. शास्त्रीय
जबरदस्त लेख. शास्त्रीय ज्ञानाचा असा का वापर केला गेला असावा. ह्या हल्ल्याचा ट्रिगर जो पर्ल हार्बर हल्ला त्यावरही एक लेख लिहायला हवा. त्यातही जीवितहानी झाली आहे.
मानवी इतिहासातील एक भयानक दिवस.
.
.
भयंकर आहे हे सारं. आधीही
भयंकर आहे हे सारं. आधीही कितीवेळा वाचलं, फिल्म्स पाहील्या या घटनेसंदर्भातल्या तरी प्रत्येक वेळी नव्याने अंगावर शहारे उमटत रहातात. मानवी क्रौर्याची, सूडाची परिसिमा.
माहीतीपुर्ण लेख..! मी नुकतचं
माहीतीपुर्ण लेख..!
मी नुकतचं वि. ग. कानिटकरांचं 'नाझी : भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक वाचून संपवलं. त्यात या जपान हल्ल्याबद्दलची माहीती होती पण इतकी सवित्सर नव्हती.
मंजिरी, सावली, आम्ही गेलो
मंजिरी, सावली,
आम्ही गेलो होतो ना, तेव्हा तिथे शेकडो शाळकरी मोठी मुले (आठवा: त्यांचे टीनेजर्स अवतार आणि बोलणे), नेमकी संयुक्तराष्ट्रसंघाचे कसल्यातरी कॉन्फरंस निमीत्त हिरोशिमा भेट असला पूर्ण गदारोळ होता. त्या ज्या वितळलेल्या त्वचेच्या लोकांच्या आणि आगीच्या प्रतिकृती आहेत ना, तिथे.. एक जपानी बाई चक्कं ढसाढसा र ड ली. जपानी लोकांच्या भावनांची अभिव्यक्ती आणि अशी सार्वजनिक ! आपल्याला माहितीये किती अब्रहण्यम असतं ते. मी तरी चार वर्षात पाहिलेले एकमेव उदाहरण !
ती मुलं सुद्धा हेलावलेली पाहिली. त्या संग्रहालयाचा हेतू सुफळ झाला.
सावली,
"I am not the same as before.." >> खरंय.
माझ्याकडे आहे तो फोटो. टाकते काही दिवसात.
अगं हो की, तू सादाकोचे पेपर क्रेन्स टाकले आहेस. सॉरी हाँ.
फार भयंकर. पुन्हा भविष्यात
फार भयंकर. पुन्हा भविष्यात असले काही जगाच्या पाठीवर कुठेही होणार नाही अशी आशा.
सावली, कळकळीने लिहिले आहेस. २
सावली, कळकळीने लिहिले आहेस.
२ फोटो मी ही टाकतो.
हिरोशीमातील सद्यस्थीती:
खरोकर फिनिक्स पक्षाप्रमाणे हिरोशीमा पुन्हा उभे झाले आहे.
प्रत्येक अणुचाचणी नंतर हिरोशीमातील मेयर अणुखोर देशाच्या मुख्याला एक तार पाठवतो. भारतापर्यंत पोचलेला हा प्रसादः
आता या सर्वातुन एक जमेची गोष्ट, निसर्गाच्या - ने, जिवनाच्या - उसळुन पुन्हा वर येण्याच्या प्रक्रियेची. असे म्हंटल्या जात होते की ६०-७० वर्षांपर्यंत काहीच तिथे जगणार नाही. पण बाँब स्फोटानंतर १-२ वर्षांमध्येच काही नवी रोपे दिसु लागली होती ...
रैना/सावली, हा तो कोनवाला. हे
रैना/सावली, हा तो कोनवाला. हे सर्व २००८ मधील आहेत.
रैना त्या प्रतिकृती भयानक
रैना त्या प्रतिकृती भयानक आहेत खरच. इतर लोकांचे फोटो सुद्धा बघवत नाहीत.
संग्रहालयाचा हेतू सुफळ झाला>> नाही गं खरच. तिथेच बघितलेस ना किती देशांकडे किती अण्वास्त्र आहेत यांचे मॉडेल आहे ते शिवाय अजुनही बनतातच आहेत.
प्लिज टाक तो म्युझियमचा फोटो नंतर.
काही जगाच्या पाठीवर कुठेही होणार नाही अशी आशा> आपण फक्त आशाच करु शकतो गं.
aschig, धन्यवाद.
पण बाँब स्फोटानंतर १-२ वर्षांमध्येच >> नाही त्याच वर्षी ऑटम मधे, म्हणजे ३ महिन्यातच.
नविन फोटो साठीसुद्धा धन्यवाद अश्चिग.
Pages