'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे

Submitted by सावली on 3 August, 2011 - 21:48

'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे

साधारण दोन दशकांपूर्वी -
शाळेत आठवी, नववीच्या वर्गात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा झाली. विषय होता "अणुऊर्जा सामर्थ्य फायदे आणि तोटे". कसलाही विचार न करता आठवीतल्या मी आणि माझ्या मैत्रिणीने नाव नोंदवलं. आता या विषयावर माहिती मिळवायला हवी होती. तेव्हाच्या काळात इंटरनेट वगैरे काही नव्हतेच शिवाय मी राहत होते त्या ठिकाणी विज्ञानाची पुस्तके मिळणारी लायब्ररीही नव्हती. शाळेतली पुस्तके पुरेशी नव्हती. मग कुठल्या कुठल्या बाईंच्या घरी जाऊन, ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन खूप माहिती गोळा केली. स्पर्धेची तयारी म्हणून चार्टस वगैरे तयार केले. तेव्हा मिळणारा एक एक माहितीचा तुकडा अमूल्य होता. अणूचे विभाजन कसे होते, त्यापासून कशी प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते, मूलद्रव्याचे 'हाफ लाईफ'* वगैरे संकल्पना तेव्हा अभ्यासल्या. हे सगळं एकदम भारून टाकणारं होतं. मात्र त्या माहितीच्या तुकड्यांमधेच जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्ब बद्दल जेव्हा माहिती वाचली तेव्हा खूप भयानक वाटलं होतं. सगळंच उध्वस्त झालं म्हणजे काय झालं असेल याची कल्पनाही करता येत नव्हती. किरणोत्सर्ग झालेल्या माणसांच्या , मुलांच्या कथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. त्या 'मश्रूम क्लाऊड'** चे पाहिलेले चित्र मनावर पक्के कोरले गेले. नक्की आठवत नाही पण माझ्या तेव्हाच्या लिखाणात हे सगळे तोटेच फार दिसले असावेत असं वाटतंय. तेव्हाच केव्हातरी मी ठरवलं कि हिरोशिमा आणि नागासाकीला जाऊन तिथे काय झालंय ते एकदा बघायचेच. तिथे जाता येईल का? आता तिथे काय असेल हे सगळे प्रश्न त्या वयात पडलेच नव्हते.

जून २०११ -
मी स्वत:शीच ठरवलेल्या हिरोशिमा भेटीच्या गोष्टीला आता अनेक वर्ष उलटली होती. नशिबाने मला अगदी सहज जपान मधेच आणलं होतं. मात्र काही ना काही होऊन अजून प्लान न झालेली हिरोशिमा भेट यावर्षी मात्र ठरवूनच टाकली. आता हिरोशिमा तोक्यो सारखेच एक शहर आहे, तिथे कसल्याही खुणा नाहीत वगैरे माहिती आधीच कळली होती. पण माहिती असणे आणि उमजणे यात फरक आहेच. तिथे पोचल्यावर खरच या शहराने असे काही सहन केले असेल असे वाटलेच नाही. पण तेव्हाही मनात आलं कि जिथे अणुबॉम्ब टाकला ती जागा दूर असणार त्यामुळे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. सामान ठेवून लगेचच भर पावसात आम्ही ट्रामने निघालो 'गेम्बाकू दोम' अर्थात "हिरोशिमा आटोमीक बॉम्ब डोम" किंवा 'A-Bomb Dome' आणि 'हिरोशिमा पीस म्युझियम' बघायला. पण ते ठिकाण ट्रामनेही फार दूर नव्हते. या थांब्यावर उतरल्यावर पुन्हा एक धक्का बसला. ट्राम मधून उतरल्या उतरल्या लगेचच 'गेम्बाकू डोम' अगदी समोर उभा होता. जी बघायचे इतकी वर्ष मनात होते ती भग्न वास्तू अशी समोर उभी दिसल्यावर काय वाटले ते लिहिता येणार नाही. या वास्तूच्या अवती भवती फिरताना नकळतच ६६ वर्षापूर्वी या वास्तूचे जे स्वरूप असेल आणि काही क्षणांच्या त्या अवधीत जी उलथापालथ झाली असेल त्याची ओझरती, पुसटशी चित्रे मनःपटलावर तयार होऊन विरत होती. त्यांना निश्चित असे स्वरूप नव्हते पण त्या वेदना, दुख: जाणवत होती. कदाचित त्यावेळच्या तिथल्या सावल्या जशा भिंतींवर, दगडावर कोरल्या गेल्या तशाच कुणी सांगावे त्या भावनाही तिथल्या आसमंतात कोरल्या गेल्या असतील आणि तिथे जाणाऱ्यांना जाणवत असतील.

हा डोम 'आइओई' नदीच्या काठावर आहे. त्या बिल्डींगचे खरे नाव तीन वेळा बदलले आणि स्फोटाच्या वेळचे नाव होते 'हिरोशिमा इण्डस्ट्रिअल प्रमोशनल हॉल'. स्फोटानंतरच्या काही दशकात नवीन इमारती बांधताना पूर्वीचे सगळे साफ केले गेले. हा डोमही कदाचित गेला असता पण लोकांनी मागणी करून १९६६ साली याला अणुस्फोटाचे स्मारक करण्याचे ठरले. तेव्हा याचे नामकरण 'हिरोशिमा आटोमीक बॉम्ब डोम' किंवा 'A-Bomb Dome' असे केले गेले. १९९६ साली या डोम ला युनेस्कोने 'वर्ल्ड हेरीटेज' म्हणून मान्यता दिली. त्याची पडझड होऊ नये म्हणून डागडुजी करून आता आतमध्ये लोखंडाचे सपोर्ट वगैरे लावले आहेत.

अणुस्फोटाचे केंद्र (हायपो सेंटर) या हॉल पासून साधारण दीडशे मीटर अंतरावर होते. बॉम्ब टाकताना तो या 'आइओई' नदीवर असलेल्या टी आकाराच्या ब्रिज वर टाकायचा असे ठरले होते पण (कदाचित लिमिटेड प्रिसिजन मुळे ) तो काहीशे मीटर बाजूला पडला. केंद्रापासून साधारण दोन किमी च्या परिसरातल्या जवळपास सगळ्याच इमारती घरे पार उध्वस्त झाली. हा डोम आणि अशाच एखाद दोन इमारती थोड्याफार उभ्या अवस्थेत राहिल्या. इतक्या प्रचंड उष्णतेत आणि दाबात हा डोम असा शिल्लक राहिला हे महद्आश्चर्यच. 'आइओई'वरचा T ब्रिज सुद्धा शिल्लक राहिला. पण तो ब्रिज म्हणे धक्क्यामुळे एकदा उंच वर उडून पुन्हा जागेवर बसला. दुरुस्त करून काही वर्ष तो पुन्हा वापरात होता. पुनर्बांधणी केलेल्या या ब्रिजवरूनच ट्राम जाते. स्फोटाच्या प्रचंड प्रकाशाने या ब्रिजवरच्या रस्त्यावर रेलिंग्ज च्या सावल्या कायमच्या छापल्या गेल्या होत्या. शेकडो लोकांनी भाजल्याच्या वेदना कमी करण्यासाठी या 'आइओई' नदीत उड्या टाकल्या होत्या. इतक्या जवळ असलेले फारसे कुणी बचावालेच नसल्याने हि नदी मृतदेहांनी भरून गेली होती.

त्याच परिसरात पुढे असलेल्या पीस म्युझियमची भव्य नवीनच बांधलेली इमारत आहे. डोमच्या इतिहासाचे प्रचंड ओझं वागवतच आम्ही पीस म्युझियम मध्ये शिरलो. आत गेल्यावर सुरुवातीलाच एक व्हिडियो दिसतो. त्यात एका टेस्ट साठी केलेला अणुस्फोट दाखवला आहे आणि 'मश्रूम क्लाऊड'ही दिसलाय. या स्फोटाचा हादरा इतका जबरदस्त वाटला कि काही क्षण मन सुन्न झाले. हि टेस्ट होती हे कळूनही फार कसतरीच वाटलं. पण अजून बरंच बाकी होतं. आत सुरवातीला दुसऱ्या महायुद्धाचा साधारण इतिहास आणि बरेच फोटो आहेत. त्यात जपान कसा या युद्धात गोवला गेला. हिरोशिमा सारखी शहरे कशी इन्डस्ट्रिअल सेंटर झाली अशा प्रकारची माहितीही आहे. या महायुद्धाच्या वेळी जपानची स्थिती फारच हलाखीची झाली होती. खाणपिणं, रोजच्या गरजेच्या वस्तू यांचा तुडवडा होता. १९४१ मध्ये जपान ने 'पर्ल हार्बर' वरचा हल्ला केला आणि अमेरिकेविरुद्ध खुले युद्ध सुरु झाले.हिरोशिमाच्या फॅक्टरीज मिलिटरी प्रॉडक्ट्स बनवायला लागल्या. सामान्य माणसेही युद्धात खेचली गेली. शहरांवरील रात्रीचे हल्ले वाचवण्यासाठी शहरांमध्ये ब्लॅक आउट्स करायला लागले. हिरोशिमामधल्या घरांसाठी बॉम्बशेल्टर वगैरेही तयार केली गेली. शाळेतली मुलेही वेगवेगळ्या मेहेनतीच्या कामाला जुंपली गेली. जपानच्या विविध भागातून बरीच मुले कामासाठी म्हणून हिरोशिमा सारख्या शहरात आणून ठेवली होती. असे म्हणतात कि वाढत वाढत हे प्रमाण इतके झाले कि १९४४ पर्यंत हिरोशिमाताल्या फॅक्टरीज मध्ये साधारण एक चतुर्थांश कामगार ही मुलं होती. मोठ्या मोठ्या आगीचा धोका टाळण्यासाठी जवळ जवळ असलेली घरे पाडून टाकण्यात आली आणि हिरोशिमामधले लोक बेघर झाले. भाज्या, खाद्यपदार्थ यांचा तुडवडा कमी करण्यासाठी शाळेच्या मैदानात मुलांकडून शेतीची व इतर कामे करून घेतली जाऊ लागली. स्फोटात याच सगळ्या मुलाना आपले जीव गमवावे लागले. त्या मुलांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी उभी असलेली देवी, शांततेचे प्रतिक म्हणून तयार केलेले ओरिगामीचे करोडो हंस या गोष्टी डोम च्या जवळपास ठेवलेल्या आहेत.

मेहेनतीची काम करणारी शाळेची मुले.

अमेरिकेने अणुबॉम्ब का बनवला ?
कमी अधिक प्रकारे या महायुद्धात सापडलेल्या सगळ्याच देशांची अशी परिस्थिती असावी. मग अमेरिकेने अणुबॉम्ब का बनवला ?
जर्मनीमध्ये १९३८ साली अणु विघटन (न्युक्लीअर फिजन) करून प्रचंड ऊर्जा निर्माण होते अशा प्रकारचा शोध लावला गेला होता. त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या युद्धात नवनवीन प्रकारची युद्ध सामुग्री वापरली गेली. या प्रचंड अणुऊर्जेचा वापर बॉम्ब बनवायला करणे ही यातीलच एक संकल्पना.

नाझी आणि हिटलरच्या भयाने 'Leó Szilárd' आणि काही जर्मन शास्त्रज्ञ अमेरिकेत पळून गेले होते. त्यांची अशी खात्री होती कि जर्मनी अणुऊर्जेवर आधीच प्रयोग करून बॉम्ब बनवत आहे. म्हणून त्यांनी आईनस्टाईनला भरीस पाडून अमेरिकेच्या तेव्हाच्या अध्यक्ष रूझवेल्ट यांना एक पत्र लिहावयास लावले. त्यानुसार नवीन प्रकारच्या बॉम्बबद्दल प्रयोग करण्याची परवानगी मागितली गेली आणि ती मिळालीही. बहुधा हा सगळ्या जगासाठीच एक काळाकुट्ट दिवस असावा. याप्रकारे हे प्रयोग सुरु झाले.

पुढे १९४२ मध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरु झाला. अमेरिकेसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. तीन वर्ष आणि २ बिलियन डॉलर्स याचा चुराडा करून १९४५ साली जगातला पहिला अणुबॉम्ब तयार झाला. १६ जुलै १९४५ साली जगातल्या पहिल्या अणुबॉम्बची मेक्सिको मध्ये चाचणी केली गेली.

मॅनहॅटन प्रोजेक्ट

पहिल्या अणुबॉम्बची चाचणी

त्याआधीच म्हणजे १९४३ सालापासूनच युद्धात जपान वरचढ ठरतोय हे लक्षात घेऊन अमेरिका जर्मनी ऐवजी जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा विचार करायला लागले. १९४४ सालापर्यंत मात्र जपानची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तेव्हा सोवियेत युनियनच्या सहकार्याने जपान मध्ये घुसून युद्ध थांबवणे किंवा जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरणे असे दोन उपाय होते. सोविएत संघाचा वरचष्मा टाळण्यासाठी आणि शिवाय खर्च झालेले २ बिलियन डॉलर उपयोगी आणले हे दाखवण्यासाठी १८ सप्टेंबर १९४४ या दिवशी अणुबॉम्ब वापरणे हा ऊपाय निवडला गेला.

आता जपान हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. पण या प्रोजेक्ट वर काम करणार्यांना त्याची बरीचशी कल्पना होतीच. तरिही या परिणामांचा नीट अभ्यास करण्यासाठी म्हणून त्यांना अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो, योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन २५ जुलै रोजी हिरोशिमा, कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित तोक्योचे नाव नसण्याचे कारण म्हणजे तोक्यो मध्ये युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली.

६ ऑगस्ट १९४५
नेहेमीसारखाच उगवलेला हा दिवस हिरोशिमासाठी इतका वाईट ठरणार आहे याची हिरोशिमावासियांना कल्पना असण्याचे काही कारणच नव्हते. मात्र बॉम्बिंगची 'ऑफिशिअल प्रोसेस' आणि तयारी आदल्या रात्रीच सुरु झाली होती. तेव्हा 'विज्युअल बॉम्बिंग' सगळ्यात विश्वासार्ह असल्याने तेच करण्यात येणार होते. पहाटेच तीनियान, मारियाना बेटावरून वातावरणाचा आढावा घेणारी विमाने निघाली. आकाश निरभ्र असल्याने हिरोशिमाचा प्लॅन नक्की झाला. त्यानंतर B-29 जातीची तीन विमाने निघाली. त्यातल्या पहिल्या enola gay नावाच्या विमानात "लिटील बॉय"$ नामक अणुबॉम्ब होता. नाव 'लिटील बॉय' असले तरी १३००० टन इतकी त्याची क्षमता होती. आणि हा 'युरेनियम-२३५' वापरून तयार करण्यात आला होता. 'युरेनियम-२३५'चे 'हाफ लाईफ' ७०० मिलियन वर्षे इतके आहे. त्याच्या मागच्या विमानात तापमान, दाब इत्यादी मोजणारी यंत्रे होती आणि शेवटचे विमान फोटोग्राफीसाठी होते. अमेरिकेने स्वताच्या प्रयोगाच्या सिद्धांतासाठी तापमान आणि इतर अनेक गोष्टी मोजणारी उपकरणेही बॉम्बिंग करण्यात येणारया भागाच्या आसपास टाकली.

सकाळी ८:१५ मिनिटांनी enola gay ने ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या T ब्रिज वर टाकला. काही सेकंद फ्री फॉल झाल्यावर तो बॉम्ब जमिनीपासून साधारण ६०० मी उंचीवर T ब्रिजच्या जवळच असलेल्या शिमा हॉस्पिटलच्यावर हवेतच फुटला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण झाला. त्यानंतरच्या दोन तीन सेकंदात आगीचा एक प्रचंड लोळ तयार झाला. क्षणाभरातच तो लोळ तीन किमीच्या परिसरात पसरला आणि काही क्षणांसाठी त्या भागातले तापमान ३००० डिग्री सेल्सियस च्या पुढे पोचले. त्या आगीचा आणि धुराचा 'मश्रूम क्लाऊड' तयार झाला, जो कित्येक किमी अंतरावरूनही दिसला. त्यानंतरच्या काही सेकंदात जोरदार हवेचा दाब तयार होऊन मोठठा हवेचा धक्का बसला. हे सगळे व्हायला आपल्याला विचार करायला लागतोय त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ लागला.

तिथे प्रत्यक्ष असलेल्या लोकांना तर विचार करायलाही वेळ मिळाला नाही. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. दोन, तीन किमीच्या परिसरातल सगळं सगळंच उद्वस्त झालं. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या#. हजारो माणसे भाजली. आणि ती वेदना टाळण्यासाठी त्यांनी पाण्यात, नदीत उड्या मारल्या. अनेकांची त्वचा शरीरापासून वेगळी झाली. इतकी प्रचंड उष्णता आणि किरणोत्सर्ग यांनी श्वासमार्ग आणि अन्नमार्ग भाजून निघाले. आणि त्यामुळे लोकांचे हालहाल झाले. हजारो माणसे भाजल्याने मेली, जी वाचली ती काही तासात तीव्र किरणोत्सर्गाने आणि भाजल्याच्या जखमांनी मुत्यूमुखी पडली. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही. स्फोट होऊन दोन तासांनी पहिला फोटो घेतला गेला. शाळेतल्या टीन एज मुलांच्या ग्रुपचा. भाजलेले, गोंधळलेले,घाबरलेले, भकास अवस्थेतले. फोटोग्राफर म्हणतो "माझी फोटो घ्यायची हिम्मतच होत नव्हती. पण खूप हिम्मत करून काढलाच. मग थोडा धीर आला आणि गरज म्हणून फोटो काढत गेलो." त्या पहिल्या फोटोचा फोटो काढायचीसुद्धा माझी हिम्मत झाली नाही.

हा स्फोटापासून ७ किमी अंतरावरून स्फोटानंतर काही मिनिटात दिसलेला मश्रूम क्लाऊड

स्फोटानंतर -

इतक्या सगळ्या उत्पातानन्तरही अमेरिकेने दुसरा बॉम्ब "फॅट मॅन" नागासाकीवर टाकलाच. जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी विनाअट शरणागती पत्करली. ती नसती पत्करली तर कदाचित तिसरा अणुबॉम्बही पडला असता. तशा ऑर्डर्सही निघाल्या होत्या. मात्र जपानच्या शरणागतीमुळे दुसरे महायुद्ध संपले. स्फोट तर होऊन गेला. पण पुढचे काळे भविष्य अजून जपानी लोकांना कळलेच नव्हते. स्फोटानंतर किरणोत्सर्गी काळा पाऊस पडला. स्फोटात जखमी झालेले आणि वाचलेलेही बरेच जण पुढच्या काही दिवसात तीव्र किरणोत्सर्गामुळे मृत्यू पावले. त्यातही केसातून कंगवा फिरवताच मुलांचे सगळेच्या सगळे केस हातात आलेल्या आया, नखे , केस गळून गेलेली माणसे होती. स्फोटाच्या वेळी जन्मही न झालेली पण आपली बुद्धी आणि आकलन क्षमता घालवून बसलेली बाळं होती. आणि अजुनही न लिहवता येणारया असंख्य गोष्टी इथल्या माणसांना भोगाव्या लागल्या. तेवढ्यातही त्यांचे भोग संपले होते का? तर नाही. स्फोटानंतरच्या काही वर्षात कॅन्सरचे आणि ल्युकेमियाचे प्रमाण खूप वाढले. जी मुले त्यावेळी लहान होती त्यांना पुढच्या चार ते पाच वर्षात कॅन्सर ने गाठले. त्यातलीच एक 'सादाको सासाकी'. तिने बरं होण्यासाठी एक हजार ओरिगामीचे हंस करायचे ठरवले पण नियतीला ते मंजूर नव्हतेच. असेच अनेक अभागी जीव त्या २ बिलियन डॉलर च्या खर्चाला राजमान्यता देण्याच्या प्रयत्नात मूत्यू पावले. अमेरिकेने मात्र हिरोशिमा आणि नागासाकी हि शहरे नागरी वस्तीची असल्याची माहिती बराच काळ दडवून ठेवली. पुढला बराच काळ हि दोन ठिकाणे फक्त मिलिटरीचे अड्डे असल्याचे भासवण्यात आले होते.

#1 - काळ्या पावसाचे ओघळ

#२ वाकलेले लोखंडी दरवाजे

#३ भग्न मूर्ती

#४ वितळून चिकटलेल्या काचेच्या बाटल्या

#५, #६ वितळलेल्या टाईल्स आणि क्रोकरी

सादाकोने केलेले ओरीगामिचे हंस

राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी -
जपान्यांच मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खरंतर जपानी मिलिटरीला हिरोशिमामधल्या स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज यायलाही आणि बाहेरून मदत मिळायलाही काही तास गेले. अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. पण तरी बॉम्बस्फोट झाल्यानंतरच्या काही तासात मदत कार्य वेगाने चालू झाले. हिरोशिमाताल्याच जगल्या वाचलेल्या लोकांनी रस्ते आणि दळणवळण नीट करायचे प्रयत्न सुरु केले. चक्क दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काही भागातला वीजपुरवठा सुरळीत केला. स्फोटापासूनच्या तीन दिवसात शहराच्या बरयाच भागात ट्राम सर्विस चालू झाली. हायपो सेंटर पासून फक्त १.९ किमी वर असलेल्या हिरोशिमा स्टेशनलाही स्फोटाचा हादरा बसलेला होता. पण जिवंत असलेल्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने दुसऱ्या दिवशी 'उजीनो' नावाची एक ट्रेन लाईन चालू झाली आणि आठ तारखेला दुसरी ट्रेन लाईनही चालू झाली. या जागी पुढची ७५ वर्षे काहीही उगवणार नाही असे बोलले जात असताना ऑटममध्ये काही ठिकाणी जमिनीतून फुटलेल्या अन्कुरांमुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. पीस म्युझियमच्या बाहेर असलेले आसागिरीचे एक झाडही असेच आतून जळून गेलेले पण त्यालाही पालवी फुटली. या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे लोकांना जगण्याची उमेद मिळाली. त्या आसागीरीच्या झाडाचे एक हृदयस्पर्शी गाणे तिथे ऐकता येते. गाण्याचे बोल या जुन्या जखमा न विसरताही उमेदीचे जगण्याची आशा देतात. इथल्या लोकांच्या परिश्रमाने आणि उमेदीने काही वर्षातच जपान पुन्हा एक महासत्ता म्हणून गणला जाऊ लागला. राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी जपानच्या रूपाने सगळ्यांना दिसला. आता आज ६६ वर्षांनी या घावाची कुठलीच दृश्य खुण दिसत नाही. पण जुन्या हिरोशिमाच्या लोकांच्या मनात हा घाव अजून तसाच आहे. दर वर्षी ६ ऑगस्ट ला 'आइओइ' नदीच्या काठी जमून लोक मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. नदीत दिवे सोडतात. आजही हिरोशिमाचे महापौर जगात कुठेही 'न्युक्लीअर टेस्ट' केली कि तिथल्या राष्ट्राध्याक्षाना पत्र पाठवतात. आज पर्यंत अशी एकूण ५९५ पत्रे त्यांनी पाठवली आहेत.


अओगिरीचे गाणे इथे ऐकता येईल


हिरोशिमाच्या मेयरने पाठवलेले एक पत्र

बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वाचताना किंवा त्यासंबंधी सिनेमे बघताना जपानी सैनिक अतिशय क्रूर होते असे भासवले जाते. ते कडवे राष्ट्रभक्त होते आणि आहेतही. नेहेमीच्या बोलण्या वागण्यात त्यांची राष्ट्रभक्ती दिसून येणार नाही. पण जेव्हा त्यांचा देश कुठल्याही संकटात असतो किंवा अगदी एखादा खेळाचा जागतिक पातळीवरचा सामना असतो तेव्हा सगळे जपानी एका वेगळ्याच राष्ट्रभक्तीने भारून गेल्यासारखे वाटतात. पण क्रूरता मात्र कुठे दिसत नाही. जर ती मूळ रक्तात होती तर आताही दिसायला हवी होती. एका जपानी मित्राला या बाबतीत जेव्हा विचारले तेव्हा त्याने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे होते, "इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो"!

पुन्हा एकदा जून २०११-
जपानचे दुर्दैव म्हणावे का काय ते कळत नाही. ज्या जपानने कधी अणुबॉम्ब बनवला नाही, किंवा त्याला मदतही केली नाही त्या जपानला दुसऱ्या महायुद्धात दोन वेळा आणि आता पुन्हा एकदा किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागतेय. जपान या प्रसंगातून नक्कीच मार्ग काढणार हे आहेच. अणु उर्जेचा सामर्थ्य म्हणून केलेला वापरही जर किरणोत्सर्गाचा धोका आपल्यापुढे ठेवत असेल तर उर्जा म्हणून दुसऱ्या पर्यायांकडे बघण्याची गरज आहे. जपान या आपत्तीमुळे बाबतीत एखादा नवीन पायंडा पाडून जगाला 'क्लीन एनर्जी' कडे नेणार का ही विचार करण्याची गोष्ट आहे.

जगाला शांतीचा संदेश देणार्‍या या बुद्धाची भंगलेली मुर्ती बरेच काही सांगुन जाते!

*हाफ लाईफ - एखादे किरणोत्सर्गी मुलद्रव्य असलेल्यापेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला हाफलाईफ असे म्हणतात.

** मश्रूम क्लाऊड - अणुबॉम्बचा स्फोट झाल्यावर धुअराला, धूर , आग अशा मिश्रणाचा एक मोठ्ठा ढग दिसतो, त्याचा आकार मश्रूम सारखा दिसतो, म्हणून त्याला मश्रूम क्लाऊड म्हणतात.

#सावल्या - प्रचंड उष्णता आणि प्रकाशामुळे काही वस्तू, सजीव यांच्या सावल्या भिंतीवर उमटल्या गेल्या. म्हणजे सावली पडलेले भाग सोडून बाजूची भिंत ब्लीच झाले आणि सावलीचा भाग तसाच काळा राहिला.

$ लिटील बॉय हे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नावं आहे. याबद्दल अधिक तांत्रिक माहिती इथे मिळेल.http://en.wikipedia.org/wiki/Little_Boy

---------------------
हा लेख माझ्या ब्लॉगवरही वाचता येईल.
http://prakashraan.blogspot.com/2011/08/blog-post.html

-हा लेख इतरांना वाचायला द्यायचा असल्यास कृपया लेखाची इथली किंवा ब्लॉगवरची लिंक द्या.
-या लेखात वापरलेले जे फोटो हिरोशिमा पिस म्युझियम मधे काढले आहेत त्याखाली तसे नमुद केले आहे. आणि इथे ते फोटो फक्त माहिती म्हणुन वापरलेले आहेत. या म्युझियम मधे फोटो काढायला परवानगी आहे.
- शुद्धलेखन सहाय्यासाठी मंजिरीचे मनापासुन आभार.

गुलमोहर: 

सावली,

अभ्यासपूर्ण, समयोचित लेख संपूर्ण गांभिर्याने आणि अत्यंत स्पष्ट, संतुलित शब्दांत लिहिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद! अणुशक्तीचे तथाकथित अभ्यासकही इतका माहितीपूर्ण आणि वाचकांस निष्कर्षांप्रत नेणारा लेख सहजी लिहू शकणार नाहीत.

"हे बंध रेशमाचे" नाटकात शांता शेळके लिहून गेल्या आहेत

विसरून जाय जेव्हा, माणूस माणसाला
जाळीत ये जगाला, विक्राळ एक ज्वाला

पुसतात डाग तेही, धर्मांध आक्रमांचे
तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे

मला हे नेहमीच अणुस्फोटांना उद्देशूनच लिहिले असावे असे वाटत आलेले आहे.

अणु उर्जेचा सामर्थ्य म्हणून केलेला वापरही जर किरणोत्सर्गाचा धोका आपल्यापुढे ठेवत असेल तर उर्जा म्हणून दुसऱ्या पर्यायांकडे बघण्याची गरज आहे. जपान या आपत्तीमुळे बाबतीत एखादा नवीन पायंडा पाडून जगाला 'क्लीन एनर्जी' कडे नेणार का ही विचार करण्याची गोष्ट आहे.>>>>>> अगदी. अगदी.

जपानच का? भारतानेही स्वच्छ, शुद्ध सौर ऊर्जेची कास धरावी हेच अंतिमत: श्रेयस्कर आहे. बाटलीतून काढलेला राक्षस जर पुन्हा बाटलीत भरणे शक्य नसेल तर मग तो बाहेर काढावाच का?

आशिष,धन्यवाद. हाच कोन, हीच ती कमान.

स्वप्नाली, तू म्हणतेस ते खरंच आहे (सुफळ नाही ते), पण माझ्या जगाकडुन एवढ्या मोठ्या अपेक्षा नाहीत हल्ली.. तेवढ्यापुरते (का होईना), मुलांच्या मनात एक बीज रोवले गेले ना, तेवढे मात्र करायचे. सतत. निर्ममोनिरहंकारसमदु:खसु:खसमी.

गोळेकाका,
आधीच्याही ओळी लिहा ना प्लीज, त्याही समर्पक आहेत.
पथ, जात, धर्म, किंवा, नाते ही ज्या न ठावे,
ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे,
हृदयात जागणार्‍या अतिगुढ *संभ्रमाचे (*बरोबरे का?)
तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे.

अतिशय छान लेख आहे...... वाचलेला इतिहास परत एकदा उजळला........

पर्ल हार्बर चा हल्ला जो झाला......त्याला जपान ची ऐतिहासीक घोडचुक म्हणुन बघितले जाते.. कारण तो पर्यंत अमेरिका फक्त मित्र राष्ट्रांना मदत करत होती...प्रत्यक्ष युध्दात भाग घेतला नव्हता... तटस्थ होती.. अमेरिकेच्या पॅसिफिक सागरातल्या हलचाली रोखण्याकरीता त्याच बरोबर पर्ल हार्बर मधुन मिळणारी मदत थांबवण्यासाठी हा हल्ला केला..कारण जपान वर हल्ला करण्या साठी पॅसिफिक महासागरात पर्ल हार्बर हे बेट मित्र राष्ट्रांकरीता महत्वाचे होते..पण..प्रत्यक्षात पर्ल हार्बर हा फक्त रसद आणि औषधी मदत पोहचवण्याकरीताच वापरात येत होता..(माझ्या माहीती प्रमाणे..) इथेच जपान ने चुक केली.. त्यामुळे अमेरिकामधे जपान बद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली....कारण पर्ल हार्बर च्या हल्ल्यात नाविक तळ तर उध्दवस्त झालाच त्याच बरोबर तिथे असणारे कित्येक डॉक्टर्स ,नर्सेस, जखमी या सुध्दा मृत्युमुखी पडले.......

त्याचबरोबर जर्मनी ने माघार घेतल्यावर सुध्दा जपान ने शरणागती पत्करली नव्हती.. म्हणुन हा हल्ला झाला...
हा बॉम्ब टाकणार्या पायलेट ला सुध्दा कल्पना नव्हती आपण कोणता बॉम्ब टाकतोय आणि त्याचा परिणाम काय असणार आहे.....बॉम्ब टाकल्यानंतर चे विदारक दृश्य बघितल्यानंतर त्याने त्याच दिवशी सेवेतुन निवृती घेतली..

सावली ~
अणुबॉम्ब आणि त्यानंतरच्या त्या पाशवी घटना याची माहिती अगदी शाळेपासून वाचत आलो असताही आज तुमच्या या लेखाने जशी विस्तृत्व माहिती मिळाली तशी महायुद्धावरच्या पुस्तकातही मिळाली नसती. अगदी ' मराठी विकी' वर तुमचा लेख गेला पाहिजे इतका तो अभ्यासपूर्ण आहे.

'लिटल बॉय' (की "लिटील बॉय"?) आणि "इनोला गे' बद्दल तुम्ही सविस्तर लिहिले आहेच, पण या निमित्ताने 'पॉल टिबेट्स' या त्या पायलटबद्दल दोन ओळी. त्या भीषण नरसंहारानंतरची चित्रे पाहिल्यावर जगाची जी प्रतिक्रीया उमटली आणि अणुबॉम्बविषयी जी चर्चा सर्वत्र सुरू झाली तिचा पॉलवर परिणाम होणे साहजिकच होते. महायुद्धानंतरही तो सैन्यात होता आणि १९६६ मध्ये तर ब्रिगेडिअर जनरलचे पद त्याला देण्यात आले. निवृत्तीनंतर १९७५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत टिबेट्स म्हणाला होता "मी ८० हजार लोकांच्या मृत्युला कारणीभूत झालो याचा मला बिलकुल अभिमान वाटत नाही."

नियतीची क्रूर चेष्टा अशी की, दीड-दोन लाख लोकांच्या मृत्युला [तांत्रिकदृष्ट्या का होईना] कारणीभूत होणारी ही व्यक्ती चक्क ९२ वर्षे जिवंत राहिली. अगदी अलिकडे म्हणजे नोव्हेंबर २००७ मध्ये त्याचे निधन झाले. मात्र मृत्युपत्रात त्याने आपले थडगे उभे करू नये किंवा कोणताही स्मृतीफलकही दहन जागेवर लावू नये अशी सक्त सूचना दिली होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचे दफन न करता दहन करण्यात आले.

असो. एक माहितीपूर्ण लेख वाचावयास (आणि तोही सचित्र) मिळाला याबद्दल सावली यांचे आभार मानतो.

"त्याने त्याच दिवशी सेवेतुन निवृती घेतली....."

नाही, उदय. तो [पॉल टिबेट्स] पायलट सेवेतच होता. १९६६ मध्ये निवृत्त झाला. इतकेच नव्हे तर निवृत्तीनंतर शहरअंतर्गत खाजगी विमानसेवाही त्याने चालू केली होती.

नरेंद्र गोळे, धन्यवाद. लेख लिहिताना खुप मानसिक त्रास झालेला आहे.
भारताने करायला हवे हे अगदी खरे. फक्त आता राक्षस बाटलीच्या बाहेर आहेच. हि तंत्रज्ञान असलेल्या सर्वच देशांकडे अनेक अणुबॉम्ब आहेत. रशिया, अमेरिकेकडे शेकड्यात, भारत, पाकिस्तान कडेही साधारण ९० आहेत. (हि माहिती म्युझियम मधे मिळालेली आहे, कमी जास्त असु शकते) यापैकी काही जरी चुकीच्या हातात गेले तर काय होईल विचारच केलेला बरा.
रैना <<मुलांच्या मनात एक बीज रोवले गेले ना, तेवढे मात्र करायचे>> Happy
अशोक, धन्यवाद. खरेच. बाकिचे लिहीताना पायलट 'पॉल टिबेट्स' बद्दल लिहीणे राहुनच गेले. इथे लिहील्याबद्दल आभार. एनोला गे आणि बॉम्बच्या रचनेबद्दल अजुनही खुप जास्त माहिती उपलब्ध आहे. पण इथे ते तांत्रिक डिटेल्स देणे टाळले आहे.

धन्यवाद .......अशोक जी.....कारण माझ्या वाचनात आलेले की त्याने निवृती घेतलेली.......मग तो नागासाकी वर टाकणारा होता का............की को- पायलट होता..........कोणीतरी घेतलेली होती.....आणि त्याने निषेध सुध्दा व्यक्त केलेला.....नाव आठवत नाही..मला आता

"...नागासाकी वर टाकणारा ..."

उदय ~~ त्याचे नाव चार्ल्स स्वीनी. हा देखील सेवानिवृत्त झाला नाही. याला तर पॉलच्या अगोदर ब्रिगेडिअरचे प्रमोशन मिळाले होते. सन २००४ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी बोस्टनच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याचे वयोमानानुसार निधन झाले.

धन्यवाद.. अशोकजी.............माहीती दिल्याबद्दल........माझ्या वरच्या माहीती मधे अजुन काही चुका असल्यास नक्की सांगावे...त्यायोगे माझ्याजवळ असणारी माहीती खरोखरच चुक आहे की बरोबर हे सुध्दा कळेल...

बापरे... भयानक... लेख वाचतानाच डोळ्यात पाणी आलं.. प्रत्यक्ष ती जागा पाहताना काय होत असेल... आणि यातुन गेलेल्या जपानी लोकांबद्दल तर कल्पनाही करवत नाही... Sad
आतापर्यंत जे काही वाचलं त्यापेक्षा परिस्थिती कितीतरी पटीने भयंकर असल्याचं फोटो बघुन जाणवलं >>>> अनुमोदन
एवढ्या विद्ध्वंसानंतरही दुसरे अण्वस्त्र कसेकाय टाकले... केवढे हे क्रौर्य... मला वाटते हा कृरपणा येतो तो आपण आणि इतर असा फरक केल्यामुळे. इतरही आपल्यासारखीच माणसे आहेत याचा विसर पडल्यामुळे Sad

उदय ~ "माझ्या वरच्या माहीती मधे अजुन काही चुका असल्यास नक्की सांगावे" असे जे तुम्ही म्हटले आहे ते मला वाटते "पर्ल हार्बर" घटनेविषयी असावे. तसे असेल तर इथे त्याबद्दल लिहिले तर चर्चा मूळ धाग्याशीच निगडीत राहील.

"अमेरिकेच्या पॅसिफिक सागरातल्या हलचाली रोखण्याकरीता त्याच बरोबर पर्ल हार्बर मधुन मिळणारी मदत थांबवण्यासाठी हा हल्ला केला.." असे तुम्ही अनुमान तिथे दिले आहे. त्यात किंचित बदल करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात जपानला स्वतः पॅसिफिकमध्ये आपले नाविक सामर्थ्य वाढवायचे होते आणि जोपर्यंत हवाई बेटाच्या अवतीभवती अमेरिकेचे नौदल तिथे पुर्‍या ताकदीनीशी केन्द्रीत आहे, तो पर्यंत जपान नाविक दलाला आपले असे 'साम्राज्य वाढविणे' या दृष्टीकोणातून हालचाल करणे दुरापास्त होते. राक्षसी सामर्थ्याच्या 'नेवाडा', अ‍ॅरिझोना', 'टेनेसी', 'व्हर्जिनिया', 'मेरीलॅण्ड' आदी नावाच्या युद्धनौका पर्ल हार्बरमध्ये पुर्‍या ताकदीनीशी तरंगताना पाहताना जपान सैन्याला स्वतंत्रपणे हातपाय पसरविणे शक्यच नव्हते.

मग वाटाघाटीतून मध्यम मार्ग निघणे दुरापास्त आहे हे निश्चित झाल्यावरच थेट "सरप्राईझ अटॅक" करूनच अमेरिकेची कोंडी करावी ही विचार जपानी मनामध्ये घट्ट बसला. त्याला सैन्याच्या कमांडर मंडळीचीही साथ होतीच. ७ डिसेंबर १९४१ हीच तारीख हल्ल्यासाठी निवडायची का ? तर तो देखील 'सरप्राईज' साठी योग्य दिवस होता ~ रविवारची सकाळ ~ सार्‍या जपानी सैन्याला माहीत होते की रविवार हा अमेरिकन लोकांचा - म्हणजेच पर्ल हार्बरस्थित नौसेन्याचाही - साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने ते हल्ला झाला तर "गाफील" स्थितीत सापडतील....झालेही अगदी तसेच.

जे झाले त्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिसादात लिहिलेले आहेच.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना..........
लेख फारच सुंदर, अभ्यासपूर्ण.
वेगवेगळ्या आपत्तीतून प्रयत्नपूर्वक, जिद्दीने बाहेर पडणार्‍या जपानी लोकांचे कौतुक करावे थोडेच.

वाचुन अंगावर काटा आला. जपानवर अजुनही संकटे येतच आहेत्,पण तरीही हे राष्ट्र हार न मानता स्वाभिमानाने परत उभे रहात आहे.

सुन्न होतं असा लेख वाचला की! मानवी महत्त्वाकांक्षा, क्रौर्य आणि हिंसेतूनही माणसाच्या, खास करून जपानी लोकांच्या अपार जिद्दीची ताकद दिसून येते. पण किती वेळ चालणार असे? कधीपर्यंत? की हे विलयाचे मानवनिर्मित चक्र असेच चालू राहणार?

माहितीपुर्ण लेख. आतापर्यंत फक्त वाचल होत पुस्तकात तेव्हा ही तीव्रता कळली होती पण आज इथले फोटो तुझा प्रत्यक्ष भेटीतला अनुभव बघुन आतपर्यंत पोचली.
सुरेख मांडणी, कुठेही फापटपसारा नाही.

फारच भयानक आहे हे सगळे! आज परीयन्त ह्या विषयावर भरपूर वाचले पण तुमचा लेख मनाला जास्त भीडला. वेदना खोल परीयन्त पोह्चल्या.

सुन्न व्हायला होतं दरवेळी हिरोशिमा-नागासाकीबद्दल काहीही वाचलं की !!
त्या स्मारकापुढे जपानी माणसं ढसाढसा रडत असणारच, पण मला वाटतं मी जर कधी ते स्मारक पहायला गेले तर मलाही तिथे रडू फुटेल. Sad

नवीन सहस्त्रक सुरू झाल्यावर टाईम्स वृत्तपत्र समूहाने 'Great People of the 20th century' म्हणून एक जाडजूड, घसघशीत संग्रह प्रकाशित केला होता. राजकारणी, समाजकारणी, लोकनेते, शास्त्रज्ञ, कलाकार, नट, तत्त्ववेत्ते अश्या अनेक प्रकारांत तो विभागलेला होता. प्रत्येक विभागात अनेक महान लोकांबद्दल बर्‍यापैकी सविस्तर माहिती होती. तो संग्रह अगदी योगायोगाने माझ्या हातात पडला होता. तेव्हा वाचायला जवळ दुसरं काही नसल्याने मी तो अथपासून इतिपर्यंत अगदी बारकाईने वाचून काढला होता. त्यात आईनस्टाईनवरच्या प्रकरणात शेवटी आईनस्टाईनचा समुद्राकाठी उभा असलेला पाठमोरा फोटो दिला होता आणि खाली लिहिलं होतं की अणुबाँबच्या विध्वंसाने आईनस्टाईनला खूप नैराश्य आलं होतं. आपल्या संशोधनाचे असे भयंकरच्याही पलिकडचे परिणाम होतील याची सुरूवातीलाच कल्पना आली असती तर आपण अमेरिकेला याकामी मदत केलीच नसती असं त्यानं नंतर सांगितलं होतं. उतारवयात त्यानं ही बाब खूप मनाला लावून घेतली होती म्हणे.
याबाबतीत त्या संग्राहकांनी आईनस्टाईन आणि गांधीजी यांच्यातलं एक विलक्षण साम्यही दाखवून दिलं होतं - की या दोघांनीही जन्मभर ज्या गोष्टीचा ध्यास घेतला, पाठपुरावा केला त्या गोष्टी अंतिमतः अगदी विपरित अर्थाने प्रत्यक्षात वापरल्या गेल्या. (मूळचं इंग्रजी वाक्य खूप टचिंग आहे. मला कदाचित आत्ता ते नीट मांडता येत नाहीये.)

डिस्कव्हरी वर काही वर्षांपूर्वी एक फिल्म पाहिली होती. तसच आणखीही काही फिल्म्स पाहण्यात आल्या होत्या. त्यात हिरोशिमा आणि नागासिकी मधील पीडीतांचे आक्षेपार्ह फोटोज होते. आक्षेपार्ह हा शब्द तसा सापेक्ष आहे.. कारण परिणाम दाखवण्यासाठी ते गरजेचंही आहे. डिस्कवरी ची फिल्म त्या मानानं डिसेंट होती. त्यात मुलाखतीही होत्या.

ते फोटोज पाहणं हा मात्र भयानक अनुभव आहे.

Pages