अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)

कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.

कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)

२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.

३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.

४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!

५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.

६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.

७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.

८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.

९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.

१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)

आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.

त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी

काय करावे?

१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.

२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.

३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.

४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.

५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.

६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.

७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.

८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.

९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.

१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.

काय करू नये?

१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.

२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.

३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.

४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.

५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.

७. परदेशांत लग्न करणे टाळा.

८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.

९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.

१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.

११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.

१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.

१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.

१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.

परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :

list_indian_women.pdf (115.95 KB)

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :

http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx

तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?

१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.

२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.

३. कारवाई

अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.

आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.

इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.

तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :

क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.

संपर्क तपशील :

Contact for NRI Marriages Case

Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002

Telephone Numbers : +91 - 11 - 23234918
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

वरील माहितीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, माहितीची भर घातल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद!

-- अरुंधती

माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकु, अतिशय महत्वाची आणि उदबोधक माहिती देऊन तू असंख्य उपवर मुलींच्या पालकांचे दुवा मिळविले आहेस. धन्यवाद !!!!!!!!!

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

ज्यांना हा लेख कोणाला ईमेलने पाठवायचा असेल त्यांनी लेखाची लिंक पाठवलीत तरी चालेल. फेबुवरही द्यायची तर लिंक द्या.

प्रिंट घेणार असाल तर मायबोली संस्थळाचा लोगो व संकलक लेखिकेचे नाव त्यात असू देत. हे सगळे तुम्ही माहिती ज्यांना द्याल त्यांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी आहे.

अशोक, सुशिक्षित म्हणवणार्‍यांकडून खरे तर अशा चुका अपेक्षित नाहीत. परंतु आंधळेपणाने मोहाला बळी पडणारे अनेकजण असतात. असो.

रुनी, तू म्हणतेस त्यातही तथ्य आहे. तुम्ही सर्व मित्रमंडळींनी तुमच्या केवळ एन आर आय म्हणून लग्न जमत नसलेल्या मित्रांची शिफारस करायला सुरुवात करा. Happy

केदार, हो, अशा केसेस मीही ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत व माहितीत आहेत.

अश्विनीमामी, देशात जर नातेवाईक/ मित्रमंडळींचं जाळं असेल तर भारतातल्या स्थळाची माहिती काढणं तेवढं अवघड नसतं. अर्थात तरीही फसवणुकीच्या केसेस होतच राहतात.
प्रिनप्शल अ‍ॅग्रिमेन्ट्स बद्दल इथे माहिती वाचा : http://legalserviceindia.com/article/l284-Pre-nuptial-agreements.html

अरुंधती,
खुप महत्वाची माहिती मिळाली !
अशा घटनांमध्ये ठरवुन फसवणुक करण्यार्‍यांमध्ये मुलींच किंवा स्त्रियांच प्रमाण देखील खुप वाढताना दिसत आहे

होय अनिल, आमच्या दूरच्या नात्यातील ओळखीत मध्यंतरी अशी एक केस झाली की मुलीने फक्त परदेशी जायला मिळावं म्हणून लग्न केलं, नंतर लक्षात आलं की ती मुलगी मानसिक दृष्ट्या विकल आहे. आता समुपदेशन, उपचार वगैरे सुरू आहेत असे ऐकले! परंतु त्या सर्व खेळात दोन व्यक्ती व त्यांच्या आजूबाजूचे सर्व यांच्या आयुष्याचा काय खेळखंडोबा होतो ते पाहिले की संपूर्ण चौकशी, खात्री करून मगच लग्नाचा निर्णय घेण्यातील महत्त्व कळते.

होय होय (येस येसच्या चालीवर) अकु नेहेमीच खूप वेगवेगळ्या विषयांवर उपयुक्त माहिती देत असते.
अनेक धन्यवाद अकु.

अरुंधती,
अनुमोदन !

शंशाकजी,
अनुमोदन !
लेख नेहमी अभ्यासपुर्ण असतात
Happy

अकु, नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती.
माझ्यातर्फे आणखी काहि मुद्दे,
१) त्या देशातील भारतीय दूतावासाचा पत्ता, नंबर वगैरे आधीच बघून ठेवावे.
२) तिथल्या शेजारी पाजारी रहात असलेल्या लोकांची ओळख करुन घ्यावी. त्यांच्या संपर्काचे फोन नंबर्स नातेवाइकांना कळवून ठेवावेत.
३) बाकिची संपर्क माध्यमे कधी कधी उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्यावेळी उपयोगी पडावीत म्हणून इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स जवळ असावीत. हि मोठ्या पोस्ट ऑफिसात मिळतात. ती वापरुन कुठूनही भारतात पत्र पाठवता येते. अर्थातच आठवणीने लेखन साहित्यही जवळ ठेवावे.
४) शक्यतो परतीचे विमान तिकिट काढता येईल इतके रोख डॉलर्स सतत जवळ ठेवावेत.

अकु, धन्यवाद Happy तुझी विषयांची निवड अगदी चपखल असते. विषय चर्विचर्वण न झालेला असतो आणि लेख तर अफाट माहितीपुर्ण असतात. लेखातली आकडेवारी वाचून धक्का बसला.

धन्स सर्वांचे.

दिनेशदा, अगदी उपयुक्त सूचना. इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स सारख्या गोष्टींचा नवख्या देशात, तुमच्यापाशी स्वतःची काही संपर्क सुविधा (फोन/ मोबाईल/ लॅपटॉप/ इंटरनेट इत्यादी) नसेल तर फारच चांगला उपयोग होऊ शकतो.

अकु छान माहिती पूर्ण लेख.

आपण दिलेल्या ३००००/१२०० इत्यादी आकड्यांमधे मराठी उदाहरणे किती आहेत याची आकडेवारी आहे काय?. आणि ती भारतातल्या लग्न मोडणार्‍या घटनांपेक्षा सांखिकी दृष्टीने खूप जास्ती आहेत काय?. अर्थात परदेशात लग्न मोडणे जास्ती कठीण परिस्थिती आणत असेल यात वाद नाही.
एकूण काय आज कालच्या जगात नीट स्वतः माहिती काढणे याला पर्याय नाही.

सध्या मात्र भारतातल्या मराठी मुली भारतातच रहाण्याचे पसंत करतात असे दिसते. १० पैकी ८. विवाह मंडळात स्पष्ट लिहीलेले असते. त्यांचही बरोबरच आहे. एक-दोन मुलांपैकी असतात आई बापांना. नोकरीही चांगली असते. कशाला बाहेर जातील.

धन्स मृनिश.

विक्रम३११, मराठी लग्नांची आकडेवारी तशी वेगळी उपलब्ध नाही. ही आकडेवारी सरसकट आहे, मात्र त्यात पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरयाणा इत्यादी राज्यांतील प्रमाण जास्त आहे. पंजाबात हे प्रमाण सर्वाधिक आहे. अर्थात याचा अर्थ हा नव्हे की मराठी मुलांमुलींना हे प्रश्न येत नाहीत. त्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे इतकेच! पाश्चात्य राष्ट्रांमध्ये लग्न होऊन जाणार्‍या नवपरिणित वधूंना तेथील कायदेव्यवस्था, मदत यंत्रणा इत्यादींमुळे तुलनेने कमी प्रश्न येतात, परंतु काही देशांत, उदा. आखाती देश, जिथे कायदेव्यवस्था व संस्कृती सर्वस्वी भिन्न आहे अशा देशांमध्ये नवीन लग्न झालेल्या मुलीला प्रश्न आल्यास त्याची तीव्रता अधिक जाणवते.

लेख खुप चांगला आहे. पण फक्त मुलींच्या बाबतीत नाही तर NRI मुलेही फसली आहेत. माझ्या ओळखीच्या ३ अश्या व्यक्ति आहेत ज्यांना मुलींकडून फटका बसला आहे. तेव्हा तुम्ही सुचविलेल्या सुचना दोघांनाही लागू होतात. एकच बाजू व्यक्त न करता हा ले़ख लिहीला असता तर अधिक खुलुन आला असता! पण डोळे उघड्णी होत आहे हे चांगले आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बेलवलकर. लेखात स्पष्ट उल्लेख आहेत की परिस्थिती उलटही असू शकते. तुम्ही म्हणता तशा काही केसेस गेल्या काही महिन्यांमध्ये मीही ऐकल्या आहेत. परंतु त्यांचे प्रमाण लक्षणीय म्हणावे असे खरोखरीच आहे का? फसवणूक ही दोन्ही पक्षांकडून होऊ शकते ह्यात वादच नाही. परंतु व्हिसा व आर्थिक दृष्ट्या अवलंबून असलेल्या, त्या देशाची - तेथील कायदे कानूनाची व मदत यंत्रणेची माहिती नसलेल्या नवविवाहित मुलींच्या बाबत ही फसवणूक घडली तर त्यांच्यावर अतिशय मुश्किलीची वेळ येते. म्हणून हा लेखनप्रपंच. जर मुलांवर अशी वेळ आलीच तरी लग्नाअगोदर मुलांमुलींनी एकमेकांची काय माहिती घ्यावी ह्याविषयी लेखात तपशीलवार माहिती दिलेलीच आहे.

ही प्रतिक्रिय फारच तोकचि आहे. सुरुवात हे कुथ्ल्य तरि सम्पर्कतुन्च होते. केस चि पुर्न महिति अस्ल्यशिवय असे अनुमान काध्ने गैर वतते. शब्दन्च वापर पन योग्य नहि.

अरुंधती, नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण आणि उपयुक्त लेख. या प्रकारची कोणतीही मदत लागली तर ह्या लेखाचा संदर्भ नक्कीच दिल्या जाणार. ग्रेट वर्क. धन्यवाद !

अतिशय अतिशय उपयुक्तं माहिती, अरुंधती. तुझं खरच कौतुक आहे. ही इतकी माहिती संकलित करून इथे दिलियेस. ह्या विषयामागची कळकळ जाणवतेच.

अरूंधती माहीती, लेख आणि त्यात दिलेले सर्व मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत.
माझ्या बाजूने एक अ‍ॅड करावेसे वाटते.

परदेशात, भारतीय स्त्रीहक्कावर काम करणार्‍या एनजीओज ची लिस्ट ही ठेवावी बरोबर परदेशात जाताना, कारण या संस्था आऊट ऑफ द वे जाऊन मदत करतात.
काही कारणास्तव परदेशातून भारतात आपापल्या जबाबदारीवर यायचे असेल तर या संस्था खूप मदत करतात. उदा. महत्वाची कागदपत्रं/दागिने/पासपोर्ट इ. असा ऐवज या संस्थांकडे आधीच जमा करता येतो.

दक्षिणा, चांगली सूचना.

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! Happy

सुशिक्शित असणे आणि सुसन्स्क्रुत असणे ह्यात जमिन अस्मानाचा फरक आहे!

लेख चांगला व माहीतीपूर्ण आहेच ह्यात शंका नाही. पण मुलांची पण फसवणूक होऊ शकते ह्यावर पण थोडा भर किंवा त्याचा पण आधार लेखात बऱ्यापैकी हवा होता.

आजकाल परदेशात जाणाऱ्या किंवा इच्छुक असणाऱ्या मुलींची संख्या खुपच कमी झाली आहे. लग्न ठरवून करण्याची वेळ आलीच तर आजकालच्या रीतीप्रमाणे मुला-मुलीचे बोलणे-चर्चा-स्वभावाची पारख किंवा तत्सम एकमेकांची मते जुळवुन बघण्याचा प्रकार आधीच होतो. सगळे ठीक वाटले, पटले तर मुलांकडून (तिच्या आणि त्याच्या) आई वडिलांना हिरवी झेंडी दाखवली जाते आणि मगच आई वडिल ह्या लग्नाच्या चित्रात येतात. मग तुम्ही त्या घराची माहीती काढता. (आधी माहीती काढून ठेवायला हरकत नाही पण जर का ३-४ (मुलगा अथवा मुलगी) असतील तर प्रत्येकाची माहीती..परगांवातील असतील तर अजूनच कठिण पडते. एकदा सगळे नीट पुढे गेले तर चौकशी करू म्हंटले तर ज्याबद्दल संमति झाली आहे त्या घराबद्दल काही कमीज्यास्तं कळले तरी मुलगा-मुलगी इतके दिवस गप्पा मारून विचार जमत असतील तर कुठेतरी एकमेकात गुंतायला लागलेली असतात. अशा वेळी आई वडिलांनी काय करायला पाहीजे हे कळत नाही.

अमेरिकेत असलेल्या पण दुसऱ्या धर्माच्या मुलाशीआई वडिलांनी लग्न करू न दिल्यामुळे चलाख मुलगी आपल्याच जाती-धर्माच्या अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या मुलाला फसवून मतलबी लग्नं करून अमेरिकेत प्रवेश घेण्याचा पर्याय शोधते....तिथे असलेल्या त्याच्या घरावर व मालमत्तेवर हक्कं दाखवणे सुरू करते. नंतर त्या परधर्माच्या मुलाला व ह्या मुलीला फावणारच. व फसलेल्या मुलाची छळवणूक ही होणारच.

ह्यात माहीती काढली तर घराणे चांगलेच होते, लोक चांगलेच होते हेच प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले... कोणी कोणावर शंका घ्यावी. अशा मुलींच्या अशा करामतींचा बाकी परिवाराला काहीच अंदाज नसतो. तुम्हाला मिळालेली- तुम्ही काढलेली माहीती पण बरोबरच असते.

अशा फसवणूक झालेल्या मुलांनी काय करावे? तुलनेत कमी असू शकतात पण मुलींसारखी मुले पण फसण्याचे आजकाल प्रमाण खुपच वाढले आहे. त्यामुळे फक्त मुलींची फसवणूक होते असे म्हणणे चुकीचे आहे..किंवा ह्याला पण तितकेच महत्व देण्याची वेळ आली आहे.

परदेशातील आणि भारतातील लग्नाचे कायदे-नियम वेगळे आहेत. त्या-त्या प्रमाणे पुढे जावे लागते.
लग्नसंस्था आणि त्यावरील विश्वास आजकालच्या पीढीमधे कमी होतांना दिसतो. स्वतःसाठीच जगणारी पीढी आजकाल पुढे येतेय.

इतकेच सांगणे होते... Happy

अशा फसवणूक झालेल्या मुलांनी काय करावे? तुलनेत कमी असू शकतात पण मुलींसारखी मुले पण फसण्याचे आजकाल प्रमाण खुपच वाढले आहे. त्यामुळे फक्त मुलींची फसवणूक होते असे म्हणणे चुकीचे आहे..किंवा ह्याला पण तितकेच महत्व देण्याची वेळ आली आहे.

>> ... सहमत, मुलिन्प्रमाणे मुलान्ना सहानुभुति सुद्धा मिळत नाहि. तुलनेत कमी ? माझ्या मर्यादित सम्पर्कात मी मुलान्चि फसवणूक हॉताना जास्ती बघितले.

Pages