३ मिनिटाचा टॉक टाइम्....पल्लि

Submitted by पल्ली on 8 May, 2008 - 04:27

'हॅलो...हॅलो....प्लीज...!'
'हॅलो, कोण बोलतंय्...लाईन स्पष्ट नाहीये. मोठ्यान बोला....'
'हॅलो, समीर्...राजा मी बोलतेय रे. ऐक ना जरा....देवा....'
'हॅलो, कोणीच बोलत नाहीये...कोण आहे?'
'देवा, काय रे हे? तीनच मिनिटाचा टॉक टाईम. त्यात आवाजच पोचत नाहीये माझा त्याच्या पर्यंत. टॉक टाईम वाढवा ना...वाढवता कसा येत नाही...मला किती बोलायचंय समीरशी....'
'अरे कोण रडतंय पलिकडे...कोण आहे?'
'समीर, मी आहे रे तुझी सुमा..........'
'सुमे........'
'माझा आवाज पोचला तुझ्यापर्यंत. थँक्स देवा...'
'कोण मस्करी करतंय च्यायला....तुझ्या @#$*#.......ए....'
'अजुन शिव्या द्यायची सवय गेली नाही तुझी? कितिदा सांगितलं. आधी चेक करत जा कोण बोलतंय ते फोनवर?'
'सुमा.....खरंच ...तु आहेस?'
'का विश्वास बसत नाही ना. माझाही बसत नव्हता. पण माझ्या केलेल्या चांगल्या कामांबद्दल मला ही फॅसिलिटी मिळाली आहे....'
'सुमा....माझी सुमा...तु? ?'
'अरे प्लीज विश्वास ठेव. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. फक्त ३ मिनिटाचा टॉक टाइम् दिलाय ह्यांनी....'
'सुमा, का दूर गेलीस गं. माझ्याकडे, मनुकडे कोण बघणार?'
'मला जायला लागलं रे...मन्या कसा आहे? अभ्यास करतो का? वेळेवर जेवतो का? जास्त टि. व्ही. बघु नकोस म्हणावं....डोळे खराब होतात अश्यानं............माझी आठवण येते का रे त्याला?'
'तुझी आठवण प्रत्येक क्षणात आहे गं. माझ्या श्वासात आहे. हलणार्‍या पडद्यात आहे. झुलणार्‍या झुंबरात आहे. माझ्या मनात आहे, माझ्या डोळ्यात आहे.....माझ्या देहभर आहे गं........'
'अरेच्या तु कविता करायला लागलास की? सुधारणा आहे राजे...'
'तुझं हे 'राजे' म्हणणं खुप गोड वाटतं गं...आठवतं...पहिल्यांदा तुला जवळ खेचलं तर हलक्याशा रागानं म्हणाली होतीस्.....राजे, हे युद्ध नव्हे...जरा हळुवार...'
'हं...आणि अजुन पर्यंत धसमुसळेपणा कमी नाही झाला तुझा? खरंतर तेच मला आवडतं . वाघासारखं. रांगडं. मराठी माणसाला शोभेल असं...'
'ऍ हॅ..नेहमी तर तक्रार करतेस की....ऑफिसमध्ये मैत्रिणि चिडवतात म्हणुन....'
'मग्...तु जरा अतिच करतोस्......तुझं सगळंच अति. रागही अति आणि प्रेमही. किति रडलास तेव्हा....मला नव्हतं वाटलं तु एवढा हळवा असशील म्हणुन..'
'म्हणजे काय? च्यायला मी पण माणुस आहे...आणि तु! किति निवांत्...कसं काय जमतं तुला...'
'दोघांपैकी कुणीतरी एकानं संयम करावा लागतोच ना...म्हणुन तर आपल्याला फक्त मन्या झाला. नाहीतर तुझ्या नादांत्....तुला तर भानच नसतं कधी.'
'हा हा हा:'
'हसु नकोस'
'हसु नको तर काय करु? चंद्र्शेखर गोखलेचं छान वाक्य आहे गं....इथं वेडं असण्याचे फायदे आहेत, नाहितर शहाण्यासांठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत....'
'बघ आत्ता ही तुला भान नाही...३ मिनिटाचा टॉक टाइम् आहे फक्त माझ्याकडे.........'
'सुमे, थांब ना गं...त्यांना म्हणावं माझ्या नवर्‍यानंही खुप चांगली कामं केली आहेत्....त्याचाही मोबदला मलाच द्या म्हणावं...सुमा गं...'
'नको रे इतकी आर्त हाक मारुस्....कासाविस् होते रे....तु जेव्हा ऑफीसच्या टूरवर जायचास तेव्हा तु परत येइपर्यंत असं व्हायचं की ....आणि तु...तुझ्या गावी पण नसायचं. दमलोय म्हणायचास आणि तोंड फिरवुन झोपायचास्...मी वाट बघत बसायची वेड्यासारखी...'
'त्याचीच शिक्षा देतीयेस का मला...का गेलीस...?
'अहं...मी निदान फोन तरी लावला....'
'मी चुकलो गं .. पण आता परत ये. बास झालं...सुमे...'
'सुमे सुमे म्हणतोस. मस्का मारतोस आणि जिंकतोस दर वेळी.....'
'बरं बाई, मनापासुन म्हणतो... ये ना.....'
'त्या दिवशी बाथरुममध्ये मला शॉक लागला किति हाका मारल्या तुला.....तु आलाच नाहीस....'
'मी क्रिकेट बघतो, तुला आवडत नाही.....शेवटची ओव्हर होती. मला वाटलं नेहमीप्रमाणे...तु...'
'आता मी कशी रे परत येउ?...माझं बाळ्...माझा मन्या......त्याला सांभाळ रे....फक्त साडे चार वर्षाचा आहे रे तो... त्याला रागवत जाउ नकोस्.....तो सहसा रडत नाही...पण रडला की समज नक्कि काहितरी गडबड आहे. तुला नाही समजलं तर डॉक्टरांना दाखव सरळ्......माझं मनु........मना........'
'----सु---मा---गं....'
'राजे, तुम्ही ही एकटे राहु नका......एखादी..कुणी....मन्याला सांभाळेल अशी....'
'नको सांगुस सगळ्.....मला नाही जमणार तुझ्याशिवाय्......कपाटभर तुझ्या साड्यांचा वास्........देवघरात तुझ्या मंगळ्सुत्राचे मणी.....भिंतिवरचं तुझं लाडकं पोस्टर्.....तुझ्या कविता.......सगळं घर मला खायला उठतय गं सुमे.......तुझी कुकिंगची पुस्तकं.....तुझी निळी लाडकी ओढणी........तुझा इ-मेल चा निरुत्तरित आय डी....मन्याची शोधक बावरी नजर्...त्याच्या टप्पोर्‍या डोळ्यात चमकणारे ते २ थेंब......काळीज फाटतंय गं माझं....क्षमा तरी कुठं--कुणाला मागु मी. फार मोठी शिक्षा भोगतोय गं सुमे......सुमे....सुमा.....सुमा? सुमा?........सुमा????
लाईन तुटली?...टॉक टाईम संपला?...इतक्या चागल्या प्रेमळ माणसाला फक्त ३ मिनिटं......सुमे, तुझ्या सारखी खुप खुप चांगली माणसे असतील ना क्यु मध्ये....सगळ्यांना आपापल्या प्रिय व्यक्तीशी बोलायचं असेल......सुमे, आपल्या बोलण्यात मन्याशी तुझं बोलणंच नाही झालं गं.....मी अजुन खुप चांगला वागेन्.....माझा टॉक टाईम ही तुच घे......नाही तरी तुझ्या नंतर कुणाशी बोलण्या साठी टॉ़क टाईम घेणार मी......घे ना गं सुमे ३ मिनिटाचा टॉ़क टाईम वाढवुन्..............'

गुलमोहर: 

<<<'त्या दिवशी बाथरुममध्ये मला शॉक लागला किति हाका मारल्या तुला.....तु आलाच नाहीस....'
'मी क्रिकेट बघतो, तुला आवडत नाही.....शेवटची ओव्हर होती. मला वाटलं नेहमीप्रमाणे...तु...' >>>>> ??
कथा आवडली , पण हे काही पटल नाही ... घरात बायको कळ्वळुन ओरडतीय आणि हा शेवटची ओव्हर निवांतपणे बघुच कसा शकतो ?

सुमे......सुमा गं...'

'नको रे इतकी आर्त हाक मारुस्....कासाविस् होते रे....

खरच अगदी कासाविस् करुन सोड्लत्....

अगदी घायाळ झालो ओ....जीव तुटतोय ओ....

इतक्या चागल्या प्रेमळ माणसाला फक्त ३ मिनिटं ??

का का पण असे होते नेहमी ?

...

हो हो ........... हे अगदि खरय. मि हे अनुभवते. अता तर भरित भर म्हणजे IPL सुरु झालय. deepurza तुम्हाला हे पटवुन घ्यायला हव..................

छान आहे कथा! आवडली!!

खुप छान जमलीय कथा...
आधी खुप lightly वाचायला घेतली...
पण पुढे खुपच Serious व्हायला झाले...
.....
..

श्या राव कसलं वाइट वाटल वाचुन. अगतिकपणा.......................
.............................................................
** गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो, तिसर्‍या अवस्थेत पोचल्यावरच तो लक्षात येतो **
आणि बहुतेक वेळा माणसामधल मेतकुट बिघडवतोच.

मस्त आहे कल्पना. पण कथा थोडि अजुन वाढवायला हवि होति. म्हणजे संभाषण जरि ३ मिनि. असल तरि अधि थोडि पार्श्वभुमि असति तर अजुन चांगलि झालि असति.

सर्वांचे आभार्......सस्पेन्स ठेवायचा असल्यान आधी पार्श्वभुमी मुद्दामुन दिली नाही. आय पी एल मुळे काहीच ऐकु येत नसतं बर्‍याचदा. शिवाय ती बाथरुमच्या आत असल्यानं त्याला निट ऐकु आलं नसावं. परिस्थितीचं गांभिर्य कळलं नसावं पण ती त्याला कायम्ची सोडुन गेलीय हे समजतंय की नाही. थोडं स्पष्ट करु का?

पल्ले, सुटलीयेस.... भन्नाट वेगाने, सगळीचकडे. तिकडे कविता आणि इथे कथा.
जियो!

ही 'टॉक'ची कल्पना चांगलीये आणि मांडलीयेसही छान. तुला नक्की कुठे कलाटणी द्यायचीये ते नक्की जमलय... तिचं दूर जाणं, त्याच्या अवतीभवती तिच्या खुणा, लहानग्यासाठी तडफड... सुंदर उतरलय. त्या दोघांचं... फक्तं दोघांचं असं जे नाजुक विश्व आहे, ते ही थोडक्यात पण किती छान उमटलय.

आता नवर्‍याच्या निष्काळजीपणातला नक्की कोणता आयटम वापरायचा ते तू ठरवलस पण ते अनेकांना पटेलच असं नाही.... मलाही पटलं नाही. मुळात तो त्याचा निष्काळजीपणा असण्याची मलातरी गरज वाटली नाही. नेहमीच्या आयुष्यातला एक अपघात होऊ शकला असता... अचानक, न सांगता-सवरता तिचं भरल्या ताटावरून उठून जाणं... पुरलं असतं....

पण ही कथा किती आटोपशीर आणि किती परिणामकारक... बयो, मस्तच! लिहीत रहा हा माझा आग्रह आहे Happy

छान लिहिले आहेस ग. आवडले. हं, काही गोष्टी खटकतात, पण शेवटी ही एक कथा आहे... छान!

दाद तु म्हणतेस ते खर आहे , पण ज्यांच्या नवर्यांना TV च वेड आहे ते अशेच असतात. घरि आलेल्या पाहुण्यांशि सुदधा बोलायच नाहि, मुलगा जवळ येउन बिलगतो त्याला अगदि झिड्कारुन लावयच, मुलाने जर कार्टुन बघयचा हट्ट केला तर त्याला थोबादित खायचि वेल येते. बायकोला तर ........... विरंगुळा जेव्हा वेड बनतो तेव्हा असे अपघात घड्णारच. बायकोलाहि आपलि गरज आहे , तिच्याशिहि दोन गप्पा मारव्या, ते तर दुरच, हे TV बघतच झोपणार. बायको स्वयंपाक करतेय तेव्हा मुलाच्या अभ्यासाचि जबाब्दारि घेण तर नकोच.

तुम्हिच सांगा अशावेलि काय करायच ते...... कुठल्या प्रकारे सुसंक्रुत नवर्याला सम्जावयाचे ते..............

पल्लि, धुसर दिसतय ग सगळं, एकदम सुंदर लिवलय बग.

Happy
सगळ्यांचे आभार.
दाद गं दाद. आभारी!
मला एकदा भजी तळताना भाजलं. हाका मारुनही माझ्या एरव्ही प्रेमळ असणार्‍या नवरा आला नाही. तेव्हा वर्ल्ड कप चालु होतं....तो म्हणतो त्याला ऐकुच आलं नही. खरं सांगतेय. क्रिकेट्चं वेड कुठल्या थरापर्यंत जातं मला विचारा मित्रहो....:-(
मिने, पुढच्या वेळी हलकं फुलकं लिहिन गं तुझ्या साठी खास.....

पल्लवीताई.... खुपच ह्रदयस्पर्शी लिखाण आहे ! यु स्ट्राईक द राईट कॉर्ड ऑफ रीडर्स !

फक्त नवर्‍या च्या क्रिकेट प्रेमाला दोष देउ नका, सास बहु अगदी अती तन्मयतेने पाहणार्‍या बयांच्या घरची अवस्था पण अशीच असते....

हे गुलमोहर आहे व्ही न सी नव्हे याचे भान असुद्या! Light 1 या सुंदर लेखाचा आंनद घ्यावा...

पल्लि, वेगळी कल्पना आवडली मला.

अरे व्वा. कथेतही चांगलीच गती आहे. अप्रतिम. हा वेगळा विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन.

अगदि वेगळि आणि ह्रदयद्रावक कथा. फारच छान लिहिलिस कथा.

अगदी वेगळी आणि छान कथा आहे. मनाला स्पर्शून गेली.

सुंदर!.... कल्पना वेगळी आणि परीणामकारकरीत्या फुलवलीस!
गंमत म्हणजे जे आहे ते फक्त संवादातच!छानच!

आभार तुम्हा सार्‍यांचे!
पुढच्या कथेवर विचार चालु आहे प्रोत्साहन मिळाल्यामुळे Happy

पल्ली,

इतक्या लहान मुलाच्या आईला का मारलत हो? वाईट वाटते असे वाचायला मग ते कल्पनेतले का असेना..

फारच छान कथा..लिहित रहा! कृपया पुढची कथा सुखांत कराल का?:)

धन्यवाद.

पल्ली
खुपच छान. वाचताना डोळ्यात पानी आल.

पल्ली, सर्वांनी सांगितलं तेच मी सांगणार.... इथे सगळ्यात जास्ती मला तुमची कथा आवडली...
अतिशय परिणामकारक.... एका आईच्या मनातली बाळाची काळजी, नवर्‍यावरचं प्रेम, शिवाय नवर्‍याचं तिच्यावरचं प्रेम सगळंच सुंदर रेखाटलंयंत तुम्ही....

पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा! Happy

खूप छान!अजुन काही सांगायला शब्द नाहीत...
..प्रज्ञा

Pages