कारणे (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 27 July, 2011 - 00:25

काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे

वेस आली आडवी अन् गाव तेथे थांबला
हेरली तेव्हाच मी ओलांडण्याची कारणे

वाचले सारे खुलासे लाजर्‍या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे

मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

माणक्या, रोहन, ऋतुवेद, भरत, वीरू, गुब्बे, कविता - थँक्स! Happy

ऋतुवेद, असं असलं तरी असंच असलं पाहिजे असं नाही! Lol
तुझ्या नवीन कवितेच्या प्रतिक्षेत...

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे

हे सारे शेर ..खणखणीत झालेत

खरे तर अख्खी गझलच ठेवणीतला दागिना झालिये..

नचीकेत खरेच
"काय होती वेदना आनंदण्याची कारणे?" या ओळीवर लिहिली गेलेली ..मला सर्वात आवडलेली ही तुझी गझल...जियो यार...

नचिकेत,
प्रभावी लिहीतोस तू फार...

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे! >> अतिसुंदर!!

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे>> मनात रेंगाळत राहिली ही वेदना....

शामराव - मनापासून thanks Happy

बागेश्री, मयुरेश, काय बोलू? लोभ असावा एवढंच सांगेन.. Happy

नचिकेत मस्तच

मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे >>> मस्तच

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे >>> हा ही आवडला... फक्त १% कमी कारण इथे चमकण्या'ची' मधला ची 'साठी' साठी आलाय आणि थोडा ऑड वाटतो म्हणून Happy

सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे! >>> बहारदार मिसरा

Pages