तारीख- भाग २

Submitted by सुमेधा आदवडे on 21 February, 2009 - 01:34

तारीख भाग १----इथे वाचा http://www.maayboli.com/node/5836

करुणा अवाक होऊन त्या तारखेकडे बघत राहीली क्षणभर. काही तरी विचीत्र वाटत होतं. ही तारीख तेजस मावशीला पाहुन बोलला होता. तेही तिच्या मृत्युच्या ४-५ दिवस आधी. काय असेल त्याच्या मनात? हा निव्वळ योगायोग आहे की मावशी त्याच तारखेला गेली?
पण तेजसला नंतर पुन्हा असं काहीच झालं नव्हतं. त्या घटनेची आठवणही त्याने कधी काढली नाही. करुणानेही त्याला काही विचारलं नव्हतं या बाबतीत.
दरवाजातुन थंड वार्‍याची झुळुक येत होती. ती मनसोक्त तिच्या चेहऱ्यावर आदळत होती, डोक्यात आदळणाऱ्या विचारांसारखीच! आघात होत होते. पण ते कोण करतंय ते दिसत नव्हतं. काहीतरी विचीत्र आहे हे नक्की.
जानकी मावशी गेल्यानंतर आईची तब्येत खुप खालावली होती.करुणाला हे तिथे गेल्यावरच जाणवलं होतं. साहजीकच आईची मनःस्थिती बिघडली होती. ती बळजबरीने आईला स्वतःसोबत मुंबईला घेऊन आली. तेजस सोबत काही दिवस रहायला मिळेल म्हणुन आईनेही फार ताणुन धरलं नाही.
आजीला पाहुन तेजस फार खुश झाला होता. तिला त्याच्या खोलीत नवीनच लावलेली कार्टुन्सची चित्र, आणखी केलेले बदल, त्याची सायकल, नवीन गाड्या सगळं सगळं तो आजीला एक एक करुन आवर्जुन दाखवु लागला. आजीही रमली होती नातवासोबत. तसंही तिचा फार जीव त्याच्यावर. करुणालाही आता तिच्याकडे पाहुन बरं वाटत होतं. पण तिच्या डोक्यातलं विचारचक्र अजुनही चालु होतं.
रात्री झोपताना तिने श्रीकांतला गावी जानकी मावशीच्या घरी तेजस बरोबर घडलेली घटना, त्याची झालेली विचीत्र परिस्थिती सगळं सांगितलं. ते वर्णन करताना तेजसचे तेव्हा लाल झालेले डोळे तिला आठवले आणी तिच्या अंगावर काटा उभा राहीला.
"अगं, असं काही नसेल गं. तू काही भलतं-सलतं डोक्यात आणु नकोस" श्रीकांत म्हणाला
" अरे पण तेजस नेमकी तीच तारीख कसा म्हणाला? मावशी त्याच तारखेला कशी गेली? तुला हे सगळं विचीत्र नाही वाटत?" करुणाने पुन्हा तिचा विचार बोलुन दाखवला.
" कम ऑन करुणा, मला आईंनी स्वतः सांगितलं होतं जानकी मावशी किती आजारी होत्या. तू पण बघुन आली होतीस ना त्यांना. कोणी अगदीच बोलुन दाखवलं नसलं तरीही हे कधीही होणार ह्याची जाणीव सर्वांना आतुन होतीच ना. बी प्रॅक्टीकल डीअर." श्रीकांतने तिला समजावलं
" दुसरं काही नाही रे. तेजुला खरंच काही प्रॉब्लेम असला आणी आपलं दुर्लक्ष झालं तर? ह्याची मला भीती वाटते."
"करुणा, तेजसला पुन्हा तसं काही झालं का? आणी तू म्हणतेस तसं तेव्हा झालं ही असलं तरी तो किती नॉर्मल होता नंतर माझ्यासोबत बोलत होता तेव्हा. पाहिलंस ना तू?"
" हो रे. पण..."
"करुणा, तू खरंच काही असला विचार करु नकोस. आपला तेजु एकदम ठीक आहे. आणी आईंनी जर का तुझं हे सगळं ऐकलं तर त्यांना आणखी टेन्शन येईल. तुला माहीत आहे ना त्यांचा किती जीव आहे तेजुवर. आधीच त्यांची प्रकृती बरी नाही आहे. म्हणुन त्यांच्यासमोर तर मुळीच हे काही बोलु नकोस. चल, झोप आता. गुड नाईट"

एवढ्याने करुणाचे विचार थांबले नव्हते. पण एका अर्थी श्रीकांतचं म्हणणंही तिला पटलं होतं. तिला आईची पण काळजी होतीच. म्हणुन ती आळे-बळे सगळे विचार बाजुला सारुन झोपी गेली.

आई मुंबईला येऊनही बरेच दिवस झाले होते. तिचा तेजस बरोबर छान वेळ जात होता. त्याचीही सुट्टीच होती. हल्ली रोज नवीन फर्माईश असायची छोट्या साहेबांची आजीकडे. आज हेच बनव, उद्या ते कर, आपण इकडे जाऊया, हे करुया, हा खेळ खेळुया. आजी म्हणजे जणु त्याच्या वयाची त्याची मैत्रीणच झाली होती.
************************
तेजसची शाळा चालु व्हायला एकच आठवडा बाकी होता. करुणाची धावपळ पुन्हा चालु झाली होती. त्याची नवीन पुस्तकं-वह्या, दप्तर, पावसाळा चालु होणार असल्यामुळे रेनी शुज, रेनकोट सगळ्याची खरेदी चालु होती. अशीच एका दिवशी खरेदी साठी करुणा आणी श्रीकांत दोघेही बाहेर गेली होती. परत आली तेव्हा तेजस झोपला होता. आजी त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती.
" काय गं आई, ताप आला की काय ह्याला? दुपार पर्यंत तर ठीक होता. काही खायला गेला होता का बाहेर?" करुणाने त्याच्या रूम मध्ये पाऊल टाकताच विचारलं. श्रीकांतने जवळ जाऊन हात लावुन बघितलं . अंग चांगलंच गरम होतं त्याचं.
"नाही गं बाहेर कुठचा जातोय. मघाशी झोपुन उठला तेव्हा मी त्याच्यासाठी काही खायला आणायला म्हणुन स्वयंपाकघरात गेले. परत आले तर हा माझ्याकडे बघत होता. एकटक बघतच राहीला थोडा वेळ. मग काय झालं कुणास ठाऊक, अचानक थरथरू लागला गं. मी जवळ जायला पुढे सरले तर माझ्याकडे बोट दाखवून जोरजोरात ओरडु लागला, "८ जुन, १९९५.....८जुन, १९९५" कुणास ठाऊक काय आहे या तारखेला. मग त्याच्या जवळ गेले तर मला मिठी मारुन जोरजोरात रडु लागला. सगळं अंग थंड पडलं होतं पोराचं. मला कळेच ना काय झालंय ह्याला. आणी डोळे बघितले तर अरे देवा!!!!!!लाल लाल झाले होते नुसते. त्याला आधी शांत केला आणी खाऊ भरवायला गेले तर नको म्हणाला. मग तापच चढला पोराला. काय झालं कुणास ठाऊक माझ्या तेजुला. दॄष्ट लागली असेल हो कोणाची." आईने काळजीच्या स्वरात सगळं सांगितलं

ती दोघं स्तब्ध होऊन सगळं ऐकत होती. करुणाच्या तर पोटात गोळाच आला सगळं ऐकुन. तीच्या चिंतेच्या विषारी वेलीला हळूहळू खतपाणीच मिळत चाललं होतं. श्रीकांतने डॉक्टरांना बोलवलं होतं. सकाळपर्यंत तेजसचा ताप पुर्ण उतरला होता.

करुणा रात्रभर झोपु शकली नव्हती. आपल्याला जे वाटतंय ते जर का खरं असलं, तर आई पण.............
नाही....असं काही होणार नाही. तिला आधी समजावणार्‍या श्रीकांतचीही मनःस्थिती काही वेगळी नव्हती.तोही फार चिंतेत होता. सगळ्यावर उपाय म्हणुन त्या दोघांना समोर एकच रस्ता दिसत होता. तेजसला एका चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जायचा निर्णय दोघांनी रात्रीच घेतला होता.तिने स्वतःला बजावलं, काही वाईट होणार नाही. आता यापुढे एकही वेडा वाकडा विचार डोक्यात आणणार नाही मी. पण तेजसच तिला हे सगळं विसरुन देत नव्हता. त्याची मनःस्थिती फार बिगडली होती.
ह्या घटनेनंतर तेजस खुप शांत झाला होता. त्याची आजीशी चालु असणारी बडबड, रोजचे खेळ सगळं स्थिरावलं होतं. त्याचा ताप उतरला असला तरीही तो काही नीट खात-पीत नव्हता. बर्‍याचदा आजीला मिठी मारुन खुप रडायचा. आजीचा जीव वर खाली होत होता तेजुसाठी. तिचे सगळ्या देवांना नवस बोलुन झाले तेजसला बरं वाटावं म्हणुन.
*******************
तेजसची शाळा सुरू व्हायच्या एक दिवस आधी श्रीकांत आणी करुणा त्याला डॉ.देसाईं कडे घेऊन गेले होते. डॉ. देसाई फार नावाजलेले आणी हुशार मनोविकार तज्ञ होते. तेजसला आजीबात बाहेर जायचं नव्हतं. कसातरी त्याला बळजबरीने तयार केला होता श्रीकांतने. डॉ. देसाईंच्या केबिन मध्ये जाताना त्याला भिती वाटली. तो आत येऊन बसायला तयार नव्हता. दारातच उभा राहीला.
" तेजस, इकडे येऊन बस बाळा." डॉक्टर म्हणाले.त्याने मान हलवुन तिथुनच नकार दर्शवला.
" तेजु आत ये रे. हे बघ, डॉक्टर काकांकडे एक गम्मत आहे. ते दाखवणार आहेत तुला" श्रीकांत त्याचे मन वळवु लागला.पण तेजस काही हलला नाही. करुणा त्याला आणण्यासाठी खुर्चीवरुन ऊठू लागली. डॉ.देसाईंनी तिला हातानेच बसण्याची खुण केली.
" तेजस, आपण थोड्या गप्पा मारुया का?" डॉक्टर त्याला म्हणाले.तेजस काहीही बोलला नाही. त्याच्या चेहर्‍यावर कसलेच भाव नव्हते.
"बरं. तुला बोलायचं नाही आहे ना?" त्यांनी पुन्हा विचारलं. त्याने पुन्हा नकारर्थी मान हलवली.
" ठीक आहे. आपण एक खेळ खेळुया आता. चालेल?" तो त्यांच्याकडेच लक्ष देत होता. म्हणुन ते पुढे बोलु लागले.
"हे बघ, ह्या खेळाचे नाव "मन वाचन" असं आहे. आता मी तुझ्या मनातली आणी तुझ्याबद्दल एक एक गोष्ट सांगेन. ती जर बरोबर असेल, तर तू एक पाऊल पुढे यायचं खुर्चीजवळ आणी चूक असेल तर एक पाऊल मागे जायचं दाराकडे. तू खुर्चीपर्यंत पोचलास तर इथे बस आणी दरवाजाजवळच राहीलास तर बाहेर निघुन जा. कबुल?"
कुणास ठाऊक त्याला खेळात रुची वाटली होती म्हणुन की तिथुन बाहेर पडायला मिळेल म्हणुन, पण ह्यावेळी त्याने होकार दिला. डॉ. देसाईंनी आपल्या कपाळाला दोन्ही बाजुंनी दोन दोन बोटांनी धरुन हलकाच दाब दिला, डोकं चेपताना देतात तसा.ते बोलु लागले.
"तुला माझी भिती वाटते". हे ऐकुन तेजस एक पाऊल पुढे सरकला.
"तुला बाहेरचे खेळ, मातीत खेळायचे खेळ खुप आवडतात. जसं गोट्या खेळणं वगरे." तेजस आणखी एक पाऊल पुढे आला.
"तुला तुझ्या आईशिवाय कुठेही रहायला आवडत नाही." तो अजुन पुढे सरकला
"तुझ्याकडे एक सिक्रेट आहे, पण ते तुला सांगायचं नाही आहे मला." तेजस आता खुर्चीपासुन दोन पावलांच्या अंतरावर होता.
करुणा आणी श्रीकांत टक लावुन त्याच्याकडे पाहत होते. आता डॉक्टरांसोबत त्या दोघांनाही पुर्ण विश्वास बसला होता की तेजस आणखी दोन पावलं चालुन त्या खुर्चीत नक्की बसेल आणी डॉक्टरांशी बोलेल, मोकळा होईल.
"तुझे सीक्रेट तुझ्या एका खुप आवडत्या माणसाशी संबंधीत आहे" डॉ.देसाईंनी पुन्हा बोलायला सुरूवात केली.
तेजस आणखी एक पाऊल पुढे सरकला. करुणा आणी श्रीकांतला आता बरीच आशा वाटत होती. आता डॉ.देसाईंना वाटलं की हा येईलच जवळ, म्हणुन त्यांनी जास्त विचार केला नाही. त्याच्या गळ्यातल्या चैनीकडे त्यांचं लक्ष गेलं.
" ही चैन तुला तुझ्या बाबांनी घेतली आहे." डॉक्टरांनी ह्या वेळी खडा टाकला.
तेजस चक्क एक पाऊल मागे सरकला. " आजीने दिली होती, मागच्या वाढदिवसाला." एवढंच बोलला.
"तुला शाळेत कधी पनीशमेंट होत नाही. तू तसा शहाण्या मुलासारखा वागतोस शाळेत"
" एकदा एका मुलीचा टीफीन दुसर्‍या मुलाने खाल्ला आणी ती रडत होती. मी त्या मुलाला मारलं. टीचरने मला पनीश केलं" बोलतच मागे सरकला पुन्हा. करुणाला आता काळजी वाटु लागली पुन्हा.
आणखी काही बोलायच्या आतच तेजस दरवाजा उघडुन शांतपणे बाहेर गेला. करुणा उठु लागली, डॉक्टरांनी तिला थांबवलं
"थांबा मिसेस. गोखले. मला तेजसच्या वागण्यात मागच्या काही दिवसां मध्ये घडलेल्या बदलांविषयी संपुर्ण डीटेल्स हवे आहेत."
"मी तेजसला बघतो." म्हणत श्रीकांत बाहेर गेला.
करुणाने डॉ.देसाईंना तेजसबरोबर घडलेल्या दोन्ही घटना, त्यावेळची आणी त्यानंतरची त्याची परिस्थिती, त्याचं वागणं सगळं सांगितलं.
"ठीक आहे मिसेस. गोखले. मी ह्या केसचा आणखी व्यवस्थित खोलात अभ्यास करतो, मग तुम्हाला बोलावतो पुन्हा. झालंच तर आपल्याला तेजसच्या काही टेस्ट्स करुन घ्याव्या लागतील. मी कळवतो तुम्हाला."
तिच्या डोळ्यात प्रत्येक आजारी माणसाच्या सोबत असणार्‍या माणसाच्या डोळ्यात असतो तोच प्रश्न वजा चिंता होती. तिने ती बोलुन दाखवलीच
"डॉक्टर, माझा तेजु बरा होईल ना नक्की?"
" ओ यस, तुम्ही काळजी करु नका हो. सर्व ठीक होईल."
करुणा आणी श्रीकांत तेजसला घेऊन घरी परत आले.
*************************
सोमवारी पाच तारखेला तेजसची शाळा चालु झाली. करुणाचं रुटीन पुन्हा चालु झालं होतं. तो शाळेत जाईपर्यंत सकाळी तिला एक क्षण बसायलाही मिळायचं नाही. पण त्याचा अबोला, निरसता अजुनही तिच्या मनाला टोचत होती. पण कुठेतरी मनात डॉ.देसाईंमुळे आशा वाटत होती की हे फार काळ राहणार नाही. आजीच्याही जीवाला घोर लागला होता नातवामुळे. तेजस पुन्हा पहिल्यासारखा हसता खेळता व्हावा म्हणुन तिने गुरूवारी घरी अभिषेक घालायचं ठरवलं. "माझ्या तेजुला बरं वाटल्याशिवाय मी देवालाही गप्प बसुन देणार नाही." तिने करुणाला सांगितलं होतं. तिच्या श्रद्धेवर करुणालाही विश्वास होता.

बुधवारी डॉक्टर देसाईंनी सांगितलेल्या टेस्ट्स साठी तेजसला पुन्हा त्यांच्याकडे नेलं होतं. त्यांच्या असिसटंटने सगळ्या टेस्ट्स केल्या आणी रीपोर्ट्स पुढच्या आठवड्यात मिळतील असं सांगितलं होतं.
गुरूवारी ८ तारखेला सकाळी अभिषेक अटपल्यावर करुणा बाजारात गेली होती. आई घरीच देवाजवळ बसुन प्रार्थना करत होती. करुणाला घरी पोचायला उशीरच झाला होता. घराजवळ पोचताच तिला खुप गर्दी दिसली. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय झालं माझ्या घरात? तिला अचानक धडधडु लागलं. ती जवळजवळ पळतच दाराकडे पोचली. गर्दीतुन वाट काढत घरात शिरते तर.......समोरचं चित्र पाहुन तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
आई निपचीत पडुन होती खाली फर्शीवर....गतप्राण!!! तिला भोवळ येऊन ती तिथेच खाली पडली. शेजार्‍यांनी श्रीकांतला कळवलं होतं, आईंना हार्ट अटॅक आल्याचं. कोणी घरात तर नव्हतच, पण असतं तरी सगळं इतकं पटकन झालं आणी इतकं भयंकर होतं की काही करायला अवधी ही नव्हता आणी संधीही.
करुणाची अवस्था फार वाईट होती. तीला कितीतरी दिवस तर आई गेली या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. आता आतुन तेजुसाठी काही आणेल, माझा तेजु म्हणुन त्याला जवळ घेऊन गोष्ट सांगेल, आता स्वयंपाकघरात जाऊन काही बनवेल असं तिला सारखं वाटत होतं. ती श्रीकांतला सारखं म्हणायची, "पाहीलंस तू? जानकी मावशी गेली ह्याला योगायोग म्हणाला होतास, पण आई सुद्धा तेजु म्हणाला होता त्याच तारखेला गेली, आणी ती चांगली चालती फिरती होती, व्यवस्थित होती. याअधी तिला कधीच ह्रुदयविकार नव्हता."
श्रीकांतही फार चिंतेत होता. त्यालाही काही सुचत नव्हतं या परिस्थितीत काय करावं,करुणाला कसं सावरावं आणी तेजसला कधी बरं वाटेल.
तेजस तर आजीच्या मृत्युनंतर आणखी खालावला होता. घरात सगळीकडे सुन्नता पसरली होती. सर्वत्र कोंदट वातावरण होतं. कोणाचा कोणाशी तालमेळ नव्हता.
*********************************************
थोड्या दिवसांनी डॉ.देसाईंचा फोन आला . त्यांनी करुणा आणी श्रीकांतला भेटायला बोलावलं होतं. श्रीकांतने सुट्टी घेतली होती त्या दिवशी.तेजस शाळेत गेला असताना ती दोघे डॉक्टरांकडे गेली . डॉक्टरांचा गंभीर चेहरा पाहुन दोघांनाही फार चिंता वाटु लागली.
"मिसेस.गोखलेंनी सांगितलेल्या माहितीनुसार आणी त्याच्या केलेल्या टेस्ट्स च्या आधारे मी तेजसची केस स्टडी केली आहे." डॉक्टर म्हणाले.
"काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर?" श्रीकांतने विचारलं
"प्रॉब्लेम तसा काहीच नाही. तसं पहिलं तर तुमचा मुलगा एकदम ठीक आहे. मुळात हा काही आजार नाहीच आहे. मिस्टर ऍण्ड मिसेस गोखले, लहान मुलांचं मन खरंच ओल्या मातीसारखं असतं, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तर ते घेतच पण आजु-बाजुला, घरच्या किंवा बाहेरच्या वातावरणाचा, होणार्‍या बदलांचा त्यावर सर्वात जास्त परीणाम होतो. एखादी छोटीशी घटना किंवा प्रसंग, एखादी पाहीलेली ऐकलेली गोष्ट जी आपल्या दॄष्टीने नगण्य असते, तीही त्यांच्या मनावर परीणाम करु शकते. मग त्यांच्यावर त्या घटनेचं किंवा गोष्टीची धुळ चढते, ती झटकण्याचं काम आपणच करायला हवं. आणखी एक गोष्ट अशी की आपल्या मेंदुत प्रत्येक क्षणाला काही रासायनीक बदल होत असतात जे आपल्या वागण्याला प्रभावीत करत असतात. काही वेळेस, ह्या बदलांमुळे आपल्यात किंवा आपल्या वागण्यात काही नवीन गोष्टी येतात, किंवा आपण म्हणुया नवीन शक्ती निर्माण होतात, ज्या काही वेळा दिसत नाहीत, पण काही वेळा इतक्या प्रखर असतात, की त्या आपल्यालाच काय पण आपल्या आजु-बाजुच्या लोकांनाही जाणवल्याशिवाय राहत नाही.तेजस मध्येही एक अशी शक्ती निर्माण झाली आहे."
दोघंही एकदम संभ्रमीत होऊन पाहत होती त्यांच्याकडे.
"कसल्या शक्ती बद्दल बोलताय तुम्ही डॉक्टर?" श्रीकांतने दोघांच्या मनातली शंका विचारली.
" युअर चाईल्ड हॅस गॉट सिक्स्थ सेन्स मिस्टर.गोखले. त्याला समोरच्या माणसाच्या मृत्युची तारीख, काही दिवस अगोदरच कळते. तुमच्या मुलाला मृत्युची चाहुल आधीच लागते" ते दोघांच्या डोळ्यात बघुन म्हणाले.

करुणा आणी श्रीकांत डोळ्याची पापणीही लवुन न देता, डॉक्टरांकडे बघत होते. त्यांनी जे ऐकलं होतं ते कल्पनेच्या किती पलिकडचं होतं हे कोणी सांगायलाच नको होतं.
"पण हे कसं शक्य आहे डॉक्टर? याअधी लहानपणापासुन तर तेजुला कधी......" करुणाने सगळं बळ एकटवुन म्ह्टलं
"मिसेस. गोखले, मी म्ह्टलं ना तुम्हाला. आपल्या मेंदुत होणार्‍या बदलांमुळे अशा शक्ती निर्माण होतात, त्यांना वेळे-काळाचं कसलंही बंधन नाही. कदाचीत काही वेळेत तेजसची ही शक्ती नष्ट ही होईल. पण आता त्याचं सिक्स्थ सेन्स बळावलं आहे, हेच सत्य आहे"
"पण मग त्याचा अबोला, शांत राहणं, कशातही इंटरेस्ट न घेणं हे ह्याच शक्ती मुळे आहे ना? यावर उपाय काय मग?" श्रीकांत म्हणाला
" नाही पण आणी हो पण. म्हणजे असं बघा, हे सगळं जेव्हा पहिल्यांदा त्याला जाणवलं तेव्हा ते काय आहे, त्याचा स्विकार कसा करावा हे त्याला कळलंच नाही, जे कोणाबरोबरही होऊ शकतं. एवढ्या लहान मुलाकडुन तशी अपेक्षाही नाही. आणी नंतर जेव्हा ते त्याला समजलं तेव्हा त्याच्या एकदम जवळच्या व्यक्तीची, त्याच्या आजीच्या मृत्युची चाहुल त्याला लागली होती. तो यामुळे फार घाबरला होता. आपली आजी आपल्याला सोडुन जाईल या कल्पनेनंच त्याला अर्धा खाऊन टाकला होता.म्हणुन घरात कोणाला सांगायलाही तो घाबरलाच असेल. आणी म्हणुन त्याला डीप्रेशन आलं असेल. ते काही काळात ठीक होईल."
दोघंही कान टवकारुन ऐकत होते.
" मी अधी सांगितल्याप्रमाणे हा कसलाही आजार नाही. साहजिकच यावर कसलाही उपाय नाही. किंबहुना ही एक शक्तीच आहे, एक प्लस पॉईंट आहे त्याचा. तुमचा मुलगा खुप वेगळा आहे. ही इज अ स्पेशल बॉय. टेक केअर ऒफ़ हिम."
करुणा आणी श्रीकांतच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या धक्कादायक गोष्टीची त्यांना जाणीव झाली होती. आणी ह्या गोष्टीबरोबर त्यांना पुढचं आयुष्य काढायचं होतं. हे चांगलं की वाईट, आपलं सुदैव की दुर्दैव हे समजण्याचं बळही नव्हतं त्यांच्याकडे. ती दोघे घरी आली.
*******************************************************
काही महिन्यांनंतर, करुणा एके दिवशी बाजारातुन घरी येत होती. रस्त्यावर नेहमीसारखीच फार ट्राफिक होती. तेजस शाळेतुन घरी आला असेल म्हणुन ती पटापट पावलं उचलत घरी निघाली होती. तेवढ्यात मोबाईल वाजला.
"हॅलो, मिसेस. गोखले, मी तेजसची क्लास टीचर बोलतीये. तुमची फॅमीली कुठे सुट्टीवर बाहेर चालली आहे का?"
"नाही मॅडम. असं का विचारताय? काय झालं?." करुणाला अश्चर्य वाटलं.
" नाही, काल रीसेस मध्ये तेजसला काही मुलांनी टॉयलेट मध्ये खुप विचीत्र वागताना पाहीलं. तो म्हणे अचानक थरथरू लागला. त्याचे डोळे लाल झाले होते. आणी आरशात पाहुन जोरजोरात ओरडत होता," २५ जानेवारी, १९९६" नंतर ठीक झाला तो आपोआप. आम्हाला काही कळत नव्हतं. म्हटलं उद्याची आणी पुढे शनीवार आणी रविवारची सुट्टी असल्यामुळे तुम्ही कुठे बाहेर चालला असाल म्हणुन तेजस ही तारीख म्हणाला असेल. त्याची अवस्था खुप वाईट होती,म्हणुन तुम्हाला विचारायला मी फोन केला,आजच २५ जानेवारी आहे ना...."

करुणाचे हात-पाय गळुन पडल्यासारखं झालं तिला. ती सरळ पळतच सुटली घराकडे. तीचे हुंदके ऐकुन रस्त्यावरची लोकं तिला बघताहेत ह्या सगळ्याकडे पाहण्याचं तिला भानही नव्हतं. ती त्यांच्या बिल्डींग जवळ पोचली. आणी तिचं लक्ष अचानक वर टेरेस वर गेलं. ती अवाक होऊन पाहु लागली. तेजस बॉलशी खेळता खेळता त्याचा बॉल खालच्या खिडकीच्या सज्जावर अडकला होता. तो कठड्यावर चढुन, खाली वाकुन बॉल काढायचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या हाताला बॉल मिळत नव्हता . ती त्याला कठड्यावरुन दूर व्हायला सांगणार तेव्हाच तो आणखी वाकला आणी त्याचा तोल गेला.................

"तेजस............" करुणाची किंकाळी ऐकुन सगळी बिल्डींगची लोकं जमा झाली होती.

समाप्त

गुलमोहर: 

कथा छान जमली आहे. पण शेवट मात्र मला वाचवला नाहि. अस खरच जर का कुणाच्या आयुश्यात असेल तर ? विचार करुन पण जीवचा थरकाप होतो.

क्षणभर सर्व अवयव थंड पडतात गोष्ट वाचल्यानंतर! परिणामकारक अंत!

शरद

शेवट अगदी सुन्न करुन गेला.
आवडली पन असा शेवट वाचल्यावर छान, सुरेख तरी कसा म्हणु? Sad

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

खुप सुन्न केलस.
-----------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

कथा आवडली. लिहिण्याची हातोटी छान आहे.
पण एक सांगू का? जरा तारीख्-वार यांचा गोंधळ झाला आहे. सोमवारी ५ जून असेल तर गुरुवारी ९ जून कसा असेल?
प्राची....

सर्वांचे आभार. प्राची, खुप धन्यवाद! चूक सुधारली आहे. ह्या कथेच्या शेवटाचा मी आधीच विचार केला होता. तो परिणामकारक असावा म्हणुन असा करावा लागला. वास्तवात असं काही झालं तर काय याचा विचार करुन मलाही फार त्रास झाला.
*****************
सुमेधा पुनकर
*****************

गोष्ट म्हणून चांगली.. पण ... Sad

सुमेधा, जबरदस्तं आहे हे कथानक आणि तू हाताळलयसही छानच. (अशा शक्तीचं मनोवैज्ञानिक कारण छान दिलयस.)
कथेचा शेवट जसा हवा तस्सा परिणाम करणारा झालाय.
सुरेख कथा.

छान कथा.... दाद म्हणाली ते बरोबर आहे... कथेचा शेवट परिणामकारक आहे. Happy

माफ करा, पण ही कथा मला 'द सिक्स्थ सेन्स' या सिनेमावरून घेतल्यासारखी वाटली. त्या सिनेमातही एका लहान मुलाला सहाव्या इंद्रियाद्वारे भुतं दिसत असतात. या कथेमध्ये डॉ. देसाई एक पाऊल पुढे एक पाऊल मागे हा जो खेळ तेजसबरोबर खेळतात तो ही त्या सिनेमात दाखवला आहे. हा संपूर्ण योगायोग असू शकतो.

धन्यवाद मंडळी! सचीन, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. 'द सिक्स्थ सेन्स' हा माझा खुप आवडता सिनेमा आहे. त्या कंसेप्ट वरुनच मला ही कथा सुचली होती. त्यामुळे हा योगायोग नाही, मी तो खेळ मुद्दामच घेतला आहे कथेत Happy
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

अशीच गोष्ट माझ्या दूरच्या नातेवाईकाच्या चारेक वर्षाच्या मुलाच्या बाबतीत घडली होती. तो मुलगा रस्त्यावरील एका अपघातात बळी पडला. बोलता यायला लागल्यावर 'मी तुम्हाला रस्त्यावर सोडून जाणार' असं खूपदा म्हणत असे. या वाक्याचा अर्थ सगळ्यांना नंतर उमगला. Sad