शिवखोड़ी

Submitted by डॅफोडिल्स on 19 February, 2009 - 00:30

शिवखोड़ी

कित्येक दिवसांपासून एकदा वैष्णोदेवी -कश्मिर करायचं मनात होतं. गेल्या डिसेंबरला योग आला. वैष्णोदेवी कट्रा बरेच जणांना माहित आहेच आणि दर वर्षी वेगळ्या वेगळ्या ऋतुंमध्ये भाविक त्रिकूट पर्वतावर जाऊन वैष्णोदेविचे दर्शन घेतात. परंतू कट्राजवळच एक शिवखोडी नामक श्रद्धास्थान सुद्धा आहे. ह्या शिवखोडी ची महिमा अपरंपार आहे. फार कमी लोकांना ह्याबद्द्ल माहित असेल. पण जो कुणी एकदातरी ह्या शिवखोडीला जाउन दर्शन करून येतो तो फार भाग्यवान म्हणला जातो. ह्या दर्शनाचा आणि शिवखोड़ीचा जो काही एक दोन तासांचा प्रवास आहे तो माझ्या मनःपटलावर अजूनही जसाच्या तसा तरळत आहे. आता तुम्ही म्हणाल हे शिवखोड़ी आहे तरी काय ? शिव नावाचा संदर्भ तसा तुम्ही सुजाण वाचकांनी लावलाही असेल. अगदी बरोबर... शंकर बाप्पा..

अगदी अजाणत्या वयापसून शंकड बप्पा माझा खुप आवडीचा देव. का तर त्याची सगळीच मंदिरं खूप छान असतात. छान म्हणजे वेगळी..मोठ्ठी..शांत.. निर्जन स्थळी..नदी किनारी...समुद्रकिनारी..सगळ्याच शंकराच्या मंदिरात निरव शांतता आणी मन प्रसन्न करणारी काहीतरी जादूई शक्ती असते.
मग ते गावातलं सिद्धेश्वर मंदीर असो.. नदीपल्याडचं केदारेश्वर असो.. की समुद्रतीरावरचं कुणकेश्वर असो..पुन्हा पुन्हा तिथे जाण्याचा मोह होतोच नक्की. प्रत्येक मंदिराची कथा निराळी आणि अद्भूत.. त्यांच्या अद्भूत विरागी स्वामी सारखी..

शिवखोड़ी ची कथाही तशीच.
अशी कथा आहे की एकदा बाबा औघड़दानी आशुतोष भगवान शिवजी कैलास पर्वतावर समाधीत लीन होते. काही वेळाने जेव्हा शिवजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी भस्मासूराला तप:श्चर्या करताना पाहिलं. त्याच्या कठिण तपस्येवर प्रसन्न होउन भगवान शंकरांनी त्या असूर श्रेष्ठाला आपल्या इच्छेनुसार वरदान मागावयास सांगितले. तेव्हा त्या असुराने शंकराला म्हटले "हे भगवन मी ज्याच्या मस्तकावर माझा हात ठेवीन तो भस्म होईल असा मला वर द्या " भगवन भोळे सांब "तथास्तू !" म्हणाले. परंतू वर मिळाल्यावर भस्मासूर सर्वशक्तीमान झाला. तिन्ही लोकाचा स्वामी बनायची त्याची इच्छा झाली.

पुढे नंतर एकदा कैलास पर्वतावर जाताना एके ठिकाणी शिव पार्वती विश्राम करित होते. तेव्हा त्या ठिकाणी भस्मासूर आला आणी त्यांच्याशी युध्द करू लागला. ज्या ठिकाणी युद्ध झाले ते स्थान म्हणजे 'रंशू' (रण+सू) नावाने विख्यात आहे. रण म्हणजे युद्ध आणि सू म्हणजे स्थान. भगवान शंकरानी आपल्या वरदानाच्या मर्यादा राखण्यासाठी तिथून जाण्याचे ठरवले. त्यांनी आपले त्रिशूळ फेकले आणि त्या पाठोपाठ पार्वतिला घेउन नंदिवर स्वार होउन ते त्रिशुळाच्या मागे मागे निघाले. ते त्रिशूळ एका पहाडात जाउन तिथे एक विशाल गुहा तयार झाली. भोलेनाथ मग देवी पार्वतिला घेउन गुहेत निघून गेले. त्यांनी आपल्या मायावी शक्तीने गुहेचे द्वार बंद करून घेतले. भस्मासूराने आत जाण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला प्रवेश करता आला नाही मग आत गुहेमध्ये शंकर समाधीस्त झाले. ह्याच स्थानाला शिवखोडी म्हणतात.

शिवखोड़ी म्हणजे शिव गुंफा. इथे निसर्गाने अजब जादू केलिये ति विसरणे शक्य नाही. उधमपूर जिल्ह्यात रंशू गावाजवळ असलेल्या शिवखोड़ीला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक म्हणजे कट्रावरून साधारण ८० कि.मी किंवा दुसरा थेट जम्मुहून ११० कि.मी. व्हाया अखनूर. आम्ही कट्राला मुक्कामी होतो म्हणून मग वैष्णोदेवीचे दर्शन करून दुसर्‍या दिवशी सकाळी शिवखोड़ी ला गेलो. टू बाय टू च्या बसेस कट्राला सकाळ पासून उभ्या असतात. चलो शिवखोड़ी शिवखोड़ी असं ओरडत ड्राईव्हर आणी त्यांचे हेल्पर्स बस भरून भरून घेउन जातात. आम्ही गेलो तेव्हा रस्त्याचे काम सुरू होते.. आमची टू बाय टू बस त्यात असा दगड धोंड्यांचा रस्ता..पोहोचेपर्यंत हाडं खिळखिळी होणार ह्याची आम्ही मनाशी खुणगाठ पक्की केली. त्यात भरीला ड्राईव्हरने त्याच्या करमणूकीसाठी काहितरी अशक्य कर्कश्य चिरक्या आवाजात गाणी लावली. गाणी हिंदी होती ह्या पलिकडे मला काहीही समजले नाही. वळणा वळणाच्या रस्त्याने बस धावत होती. कट्रामार्गे रस्त्यात बरिचशी प्रेक्षणिय स्थळे आहेत परतिच्या प्रवासात आपण ती करू असे कंडक्टर ने सांगितले.
waat.jpgवाट वळणाची....जीवाला या ओढी Happy

चिनाब नदीवरचा पूल ओलांडून आम्ही सरळ रंशू गाठलं बस थांबली.. आणि इथून पुढे तिन साडेतिन किलोमिटर पायी चालावं लागणार होतं. घोडे आणी पालखीची सोय आहे तिथे. स्थानिक लोकांच्या उपजिविकेचे साधन. छोटा श्रेयान सोबत असल्यामुळे आम्ही घोडे करायचं ठरवलं. जसजसे पुढे जाउ लागलो तसे उन तर दिसेनासे झालेच्..पण थंडीही भरपूर वाढली सुर्य असतानाही.. रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचच उंच हिरव्यागार डोंगराने सारं उन अडवलं होतं.. डोंगरावरच्या त्या गर्द हिरव्या रंगाच्या छटांमधून तो उनसावलीचा खेळ जितका रम्य वाटतो तितकाच तो मला नेहमीच अगम्यही वाटतो.

त्या अति उंच डोंगरावरून पुढे वर वर जाणारी ठिपक्यांएवढी माणसं शेळ्या मेंढ्या आणी एक दोन घोडे दिसले म्हणून सोबत असलेल्या घोडेवाल्याला मी विचारलं "हे इतके वर कुठे चालले आहेत ? " आपलं डोगरी भाषेतलं गाणं माझ्या प्रश्णामुळे त्याने थांबवल आणि सांगितलं की हे भटके गुर्जर लोक आहेत.. श्रीनगर ला जेव्हा बर्फ पडतं तेव्हा तिकडची घरं सोडून हे लोक काही महिने इकडे ह्या डोंगरमाथ्यावर येउन वस्ती करतात आणी काही महिन्यांनी पुन्हा श्रीनगरला परत जातात. वर त्यांचं अख्खं गाव वसलेलं असतं.. मी ऐकून अवाक झाले. पण पुढे श्रीनगर गुलमर्ग ला १० हजार फुट उंचावर बर्फात अर्ध्यावर बुडालेली त्यांची घरं बघितली तेव्हा खात्री पटली.

houses.jpgभटक्या लोकांची बर्फातली रिकामी घरं
वळणा वळणाच्या वाटेने पुढे निघालो.. सोबत एक नदीही आहे.. आम्ही गेलो तेव्हा पाणी फारच थोडं होतं झर्‍याईतकं .. पण दुध नुसतं..पांढरं शुभ्र. "इसे दूध गंगा कहते है |" घोडेवाल्याने सांगितलं. ह्या साडेतिन किलोमिटर मध्येही काही ठिकाणी चढणीला रस्त्याचं काम सुरू होतं चढणिची वळणं म्हणजे हेयर् पिन टर्न्स.. घोड्यावरून जाताना भयानक भिती वाटत होती. पोटात गोळा येऊन कधी एकदा उतरु असं व्हायचं.
paani.jpgदूध गंगेचा खळाळता प्रवाह

अखेरीस उंच काही पायर्‍या दिसू लागल्या आणी घोडा थांबला. गुफा दिसली. साधारण साठ एक पायर्‍या चढून गेल्यावर गुहेला सुरुवात होते. गुफेचं प्रवेशद्वार पंधरा फुट रुंद आणी विस फुट उंच. पुढे मोठ्ठ असणारं गुहेचं मुख पाहून कल्पनाही येत नाही पुढचा अर्धा तास आपण कुठे आणी कसे जाणार आहोत ते. अनायसे लोकांच्या मुखातुन जय भोले बाबा की ! जय भोले जय भंडारी !.. असे सुरु होते.
गुहेच्या डाव्या बाजूला एक बाबा भस्म विभूती लाउन धूनी लाउन बसलेले. त्याना नमस्कार केल्यावर ते भाविकांच्या कपाळाला आशिर्वादात्मक विभूती लावतात.

100_0088.jpgगुहेचे मुख्य प्रवेशद्वार
मग सुरु होतो तो अरूंद गुहेचा प्रवास. गुहेत बराच अंधार आहे. आता ठिकठिकाणी लाईट लावलेले आहेत. बरेचदा आपल्या डोक्याजवळच येतात. आपल्याकडे एखादा टॉर्च ठेवायला हवा अश्या ठिकाणी. मला प्रथमतः खुप भिती वाटली ह्या अश्या अरूंद गुहेत आपण जातो आहोत.. घुसमटलो तर काय ? लाईट गेले तर काय ? पण अश्या ठिकाणी कुठे जाउन बसले असतिल शंकर ही उत्सुकताही तितकीच होती. बरेचदा प्रबळ ईच्छाशक्तीच आपलं बळ बनते.

साधारणतः १०० मिटर दूर अंतर कधी पुर्ण झोपून तर कधी वाकून तर कधी तिरकं तारकं होउन आणि कधी पाच सात पाहिर्‍या चढून पार करत होतो. मध्येच एक बर्‍या पैकी रुंद ठिकाणी काही लोक छोटी छोटी दगडं रचून काहितरी करत होते. मी कुतुहलानं विचारलं असता असं समजलं की इथे ह्या छोट्याश्या दगडांनी जो घर बनवतो त्याला भोले बाबा खुदका बडा घर देते है | सगळे बनवत होते मग आम्हीही बनवलं. मजल दर मजल करत शेवटी मंदिरात.. गुहेत पोहोचलो. निसर्गाचा चमत्कारच तो. समोरच लगेच शिवलींगाचं दर्शन घडतं. भगवान आशुतोष औघड़दानी बाबा शिव. शिव लिंगावर कामधेनू गाईची आकृती आपोआप तयार झालेली दिसते. तिच्या थनातून शिवलिंगावर सतत जलाभिषेक केल्यासारखे पाण्याचे थेंब अहोरात्र पडत असतात.

शिवलिंगाच्या डाव्या बाजूला पिंडिच्या रुपात पार्वतीचे दर्शन होते. कार्तिकेयाच्या मुर्तीच्या दोन फुट उंचावर पंचमुखी गणेश विराजमान आहेत. इथेच एक शंखाचं चिन्ह बनलेलं आहे. पुजारी सांगत होते की इथे ८४ कोटी देवता वास करतात. आता सुधारिकरणात मुख्य गुहेत ज्याला मंदीर म्हणतात त्या साधारण दहा बाय दहा च्या ठिकाणी फरश्या बसवलेल्या आहेत पण गुहेत वर बघितल्यास निसर्गाची किमया अद्भूत वाटते. गुहेच्या खडकांचे तर्‍हे तर्‍हेचे आकार नकाशे बघुन आपल्यासारख्या भाविकांना तिथे शंकर बप्पाचा शेषनाग दिसतो तर कुणाला कार्तिकेयाचा मोर. त्रिशूल शेषनाग आणी संपुर्ण दरबार तर आपल्याला पुजारीच दाखवतात गुहेची माहिती देताना. ह्याच गुहेत महाकाली महासरस्वती आणी पाच पांडवांच्या पिंडी सुद्धा आहेत. उजव्या बाजूला गौरी कुंड, गौरी गणेश, लक्ष्मी नारायण आहेत. ह्याच गुहेतला रस्ता पुढे अमरनाथ ला जातो. पण सध्या तो बंद करून ठेवला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं.

दर्शन झालं Happy सगळं डोळ्यात आणी मनात साठवून ठेवलं. आता परत कसं जायचं ? पुन्हा त्याच अवघड वाटेने ? तर नाही.. भाविकांच्या सोईसाठी दोन मिनिटात बाहेर येता येईल असा मोठा मार्ग क्रूत्रिम गुहा आता तिथे बनवलेली आहे. तिकडून आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय एक गुजराथी शेठ आपल्या शेठाणीला ह्याच मार्गाने आत दर्शनाला घेउन जात होता. क्या करे साईज मेटर् करता है नी.. स्मित करीत म्हणाला.

दर्शन करून बाहेर येईपर्यंत दुपारचे चार होउन गेले होते. आज जेवण झालेच नव्हते. पुन्हा घोडयावरून खाली उतरून बाहेर आलो. तर बस फारच दूर उभी आहे असं सहप्रवाशांनी सांगितलं. मग बस कडे चालत जाता जाता वाटेत जी चार दोन दुकानं वजा हॉटेल्स दिसली तिथे चौकशी करत करत एका ठिकाणी मस्त पैकी गरमा गरम पोळी - भाजी (चपाती-सब्जी) आणि चहा घेऊन परतीच्या वाटेवर निघालो. अन्धार वाढत चालला होता आणी डिसेंबर एन्ड ची थंडी.. धुकंही.

सकाळी कंडक्टर ने सांगितल्या प्रमाणे अजुन एक दोन ठिकाणी गाडी थांबणार होती. एक मन वाटत होतं नको आता उतरायला थंडी मी म्हणत होती. पण बरेच जणांनी सांगितलं होतं नौ देवीया नक्की बघून या.
कट्रापासून ५ कि. मी. वर आगार जितो नामक एक स्थान आहे. असं म्हणतात की ह्या ठिकाणी जितो बाबांना साक्षात वैष्णोदेवी ने दर्शन दिलं होतं. इथे एक बावडी -विहीर आहे. ज्या कुणा स्त्रियांची मुलं जगत नाहित त्यांनी जर पौर्णिमेला इथे स्नान करून विभूती लावली तर त्या सुखी होतात असं मानतात. म्हणून इथे पौर्णिमेला भाविकांची आणि श्रद्धाळूंची गर्दी असते. ह्या जितो बाबाचं आम्ही बसमधूनच दर्शन केलं. आणि पुढे निघालो.

आगार जितो पासून चार कि. मि. वर नौ देवियां नावाचं एक ठिकाण आहे. ह्या ९ देवी पिंडीच्या रुपात एका गुहेत स्थित आहेत. रस्त्यापासून जरा आत थोड्याश्या पायर्‍या उतरून गेलं की ही गुहा आहे. पायर्‍यांच्या उजव्या बाजूला जुळझुळ पाणी वहात होते. पायर्‍याही ओल्याच होत्या. आणी लाईनमध्ये उभं राहून थंड बर्फासारख्या पाण्यात पाय झोंबत होते. ह्या गुहेत जायला अतिशय अरुंद रस्ता आहे आणि गुहासुद्धा इतकी छोटीशी आहे की एकावेळी जेमतेम दोन तिन जण आत असू शकतिल.. अर्धवट बसू शकतिल.. उभे रहाणे तर शक्यच नाही. म्हणून गुहेबाहेरची रांग पुढे सरकायला इतका वेळ होत होता. ह्या नौ देविया च्या गुहेतही निसर्गनिर्मित तर्‍हेतर्‍हेचे आकार आहेत.. गणपती, झोपलेला मारुती, कबुतर, लक्ष्मिच्या पावलाचा ठसा आहे. आत गुरूजी बसलेले असतात आणी आपल्याला हे सगळ सांगुन म्हणतात "अपनी इच्छासे जो भी चढाना है चढाईये !" Happy भक्तही हे सारं गुहेतलं निसर्ग निर्मित वैभव बघून खुश होतात.
naumata.jpgनौमाता जवळच्या खडकांचा गुहेचा हा फोटो.. दूरून बघताना हा दगड असेल वाटत नाही.

चलो चलो लेट हो गये है| कंडक्टर चा आवाज आला. बसकडे निघालो. दुसर्‍या दिवशी पुढे श्रिनगर ला निघायचं होतं. रात्र आणी थंडी वाढत चालली होती आणी दिवसभाराचा थकवाही. बसमध्ये केव्हा झोप लागली कळलेही नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच वर्णन! Happy खुपच फिरुन आलात की! Happy
फोटोबिटो नाही का काढता आले?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान वर्णन ! फोटो असतील तर नक्की टाका Happy
-----------------------------------------
सह्हीच !

छान वर्णन, कधी नावही ऐकले नव्हते या जागेचे. फोटो हवाच.

धन्स ! Happy टाकले दोन फोटोज.
प्रवासाचे फोटो खूप आहेत पण साईज मॅटर्स Happy जसे एडीट होतिल तसे टाकते.
ह्या फोटोत दिसणार्‍या पायर्‍या सुरू होण्याआधी आपल्याला सगळे सामान क्लॉक रूम मध्ये ठेवावे लागते. Sad
त्यामुळे आतल्या निमुळत्या वाटेचे गुहेचे फोटो काढणे शक्य नव्ह्ते.

डॅफो, मस्त लिहीलं आहेस. नक्की असतील ते फोटो टाक. त्याशिवाय प्रवासवर्णनाला मजा नाही Happy
पण बरोबर आहे तुझं. सुरक्षेच्या कारणासाठी कॅमेरा बर्‍याचदा जमा करावा लागतो Sad
----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!

मीपण गेले आहे इथे.
अगदी पानभर वर्णन लिहीले पण पोस्ट करताना गायब झाले.
बघते परत एकदा लिहून.
माझा एक चुलत भाऊ दरवर्षी वैष्णोदेवीला जायचा. मग ते झाल्यावर शिवखोड़ी. नन्तर आम्ही बाकीची भावन्डे आणि कुटुम्बिय जायला लागलो. घरचे-बाहेरचे मित्र असा खुप मोठा ग्रुप असयचा.
मी ९४-९५ ला पहील्यान्दा गेले. तेव्हा तिथे खाली चहाच्या टपरीशिवाय काहीही नव्हते. अगदी ओढ्यापर्यन्त बस जायची. अगदी कच्चामातीचा रस्ता.
गुहेत काहीही लाइट्स नाहीत. काळामिट्ट आन्धार म्हणजे काय ते इथे अनुभवले (मी मुम्बैची). अगदी चाचपडत-सरपटत कडेकपारीतून जावे लागायचे. पण फार मजा यायची. नन्तर आतले ते मोठे दालन आणि शंकराची ध्यानस्त आकॄती / (पिन्डी ??). आम्हाला तेव्हा तिथल्या पुजारयाने तसे सान्गितले होते. आतल्या त्या सर्व नैसर्गिक आकॄती. फारच अचबित करणार्या. तोपर्यन्त मी stalactite कधीच बघितले नव्हते. फार अविस्मरणिय. ह्या गुहेतून अमरनाथला जायचा रस्ता आहे (असे म्हणतात )
नन्तर ९८ पर्यन्त गुहेत सर्व लाइट्स आले. आता भाऊ म्हणतो खूप बदलले आहे. जवळ जवळ वैष्णोदेवीसारखी व्यवस्था झाली आहे.
पाकीस्तानची सीमा इथुन जवळ आहे. (कधी मॅप मध्ये बघितले नाही). पण अगदी जाण्यासारखे ठिकाण.

नुसता लेख वाचुनच थक्क होऊन जातो. काल हा लेख वाचल्यावर नेट वर आणखी माहीती शोधली. तेव्हा गुहेतील काही फोटो खालील लिंक वर सापडले. ते बघुन अजुन थक्क झालो. कसे काय जमते हे तुम्हा लोकांना .... Happy
http://www.liveindia.com/maa/visit6.html
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

सतिश , धन्यवाद Happy लिंकबद्दल .
-----------------------------------------
सह्हीच !

छान लिहिले आहेस डॅफो. फोटो पण आवडले.

लिंक बद्द्ल धन्स सतिश Happy
कसे काय जमते हे तुम्हा लोकांना .... >>> विशेष म्हणजे आम्ही सर्वांनी..पावणेचार वर्षांचा छोटा श्रेयान आजी-आजोबां सोबत हे सारं अनुभवत होता. एवढ्या बिकट सरपटून जाणार्‍या गुहेच्या वाटेत त्याने फक्त एकदा आपल्या आजोबांना विचारलं ,"शंकल बप्पा कसे गेले आजोबा इथून ? ते पन झोपूनच गेले का क्लाँलिंग कलत ?" खरं कौतूक तर आजी आजोबांचं त्यांची इच्छाशक्ती अफाट आहे. Happy

कमाल आहे. खुप पुर्वी (बेचाळीस वर्ष) सहा वर्ष जम्मू प्रांतात होतो. पण शिवकोडीचे नांव ऐकल्याचे आठवत नाही. जाणे तर दूरच. गंमत म्हणजे वैश्णोदेवीला सुद्धा जावू शकलो नाही इतके जवळ असुन. लोक म्हणायचे ' देवी का बुलावा ' यायला लागतो. तेच खरं! पण अम्रनाथचे दर्शन मात्र घडले. पहलगाम-शेषनाग पहीला पडाव. दुसरे दिवशी शेषनाग- पंचतरणी- अम्ररनाथ गुहा-शेषनाग. तिसरे दिवशी चंदनवाडीमार्गे पहलगाम व श्रीनगर. तो थरार काही वेगळा होता. त्याबद्द्ल पुन्हा केंव्हातरी................
पण निदान इतक्या वर्षानी का होईना शिवकोडिचे दर्शन झाले हे काय कमी आहे. धन्यवाद !!

खुप छान वर्णन लिहीले आहे आणि फोटो पण छान. मी वैष्णोदेवीला गेले आहे पण हे माहित नव्हते. पुढच्यावेळी नक्की जाईन.

सुरेख वर्णन डॅफो ... जायला हवे एकदा Happy

डॅफो एकदम छान माहीती दिलीस. फोटो पण छान आलेत.
सतीश लिंक बद्दल धन्यवाद.
माझ्या भटकंती करण्यासाठीच्या ठिकाणांच्या यादीत आजून हे एक ठिकाण वाढले.

kup chan vachun mala kadi vaishnav devi jate ase zale hai
me tar tumchya barobar guhet shirte ase vatat hote vachtana
chan mahiti dile

Nanda