या दु ... कानात उ

Submitted by मामी on 19 July, 2011 - 13:18

आजचीच गोष्ट. बॅंकेत काम होतं म्हणून भर पावसात चाकंतोड करत दीपक टॉकीजजवळच्या बॅंकेत गेले होते. नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचे म्हणून त्या त्या एरीयातली दोन्-चार कामं असतातच बरोबर. म्हणून कालच आणलेल्या चिनी बनावटीच्या टेबललँपच्या प्लगला अ‍ॅटॅचमेंट, बॅटरीवर चालणार्‍या मेणबत्त्यांकरता छोट्या बॅटर्‍या असे इलेक्ट्रीकच्या दुकानाशी संबधित कामं होती. बँकेशेजारीच एक इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरचे दुकान दिसले. हे कॉम्बिनेशनमध्ये दुकान का बरं चालवत असतील? हा मला नेहमीच पडणारा सनातन प्रश्न आहे. तो पुन्हा डोक्यात पिंगा घालायला लागला. इलेक्ट्रीक आणि हार्डवेअर, सोप अँड ऑईल डेपो, त्या वरताण असं सोप, ऑईल अ‍ॅंड टी डेपो .... हे असंच विकायचं हे कोण आणि कोणत्या बेसिसवर ठरवतं देव जाणे.

रस्त्यावर एका ओळीत ढीगाने असणारी ज्वेलर्सची दुकानंही माझ्या अचंब्याचे शिकारी ठरतात. कधीही कोणीही गिर्‍हाईकं न दिसणारी, तुरळक चांदीचे दागिने ठेवलेली ही दुकानं केवळ गरीब लोकांना छोट्या रकमांची कर्ज देऊन चालतात? असा कितीसा धंदा होणार? आणि त्यांच्या चेहर्‍यावर जग विकत घेतल्याचा माज दिसण्यामागचं कारण काय असू शकतं?

मान्य आहे, प्रत्येकाची गरज वेगळी असते आणि कोणीतरी त्या गोष्टी विकल्याच पाहिजेत. पण तरीही केवळ नाड्या विकणारे, केवळ लिंबं विकणारे, खुर्च्यांच्या पायांचे आवाज होऊ नयेत म्हणून त्यांना लागणारे रबरी बफर विकणारे अशा अतिफोकस्ड वस्तु विकणार्‍या लोकांबद्दल मला नेहमीच महदाश्चर्य वाटत आलंय.

शिवाय जनरल स्टोरवाले किंवा वाणी त्यांच्या नावाच्या पाटीखाली पेंट करून काही ठळक वस्तु लिहितात. उदा. महावीर जनरल स्टोर आणि खाली आमच्याकडे वह्या, रंगित कागद, फेविकॉल मिळतील. तर या नेमक्या तीनच गोष्टी ते काय लॉजिक लावून निवडत असतील ही भाबडी शंका मला नेहमीच सतावते. वाणीही इथे तेल, शेंगदाणे, चहा, गूळ मिळेल असं लिहितात ते का? का? हे सगळं त्या दुकानात मिळतं / मिळणारच हे गिर्‍हाईकाला माहित असतं की. मग? बरं दुकानातल्या असंख्य वस्तुंतून याच ठळकपणे लिहिण्याचं कारणं. बरं या खडूने वेगळ्या पाटीवर लिहिलेल्या नसतात. ते जिन्नस आणखीन वेगळे. या गोष्टी पेंटने कायमच्या अमर केलेल्या असतात.

..... वर उल्लेख केलेल्या इ आणि हा स्टोर्समध्ये माझं अर्धंच काम झालं. दिव्यांकरता छोट्या बॅटर्‍या त्यांच्याकडे नव्हत्या. बरोबर, दोन वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रॉडक्टस विकताना कुठेतरी मर्यादा येणारच की. तर, मी त्यांनाच विचारलं की इथे आसपास या बॅटर्‍या कुठे मिळतील? तर त्यांनी सांगितलं की असंच पुढे गेल्यावर तीन दुकानांनंतर हरीष कटलरी नावाचं दुकान लागेल. तिथे मिळतील. माझा कानावर विश्वासच बसेना. कटलरीच्या दुकानात बॅटर्‍या? तरीही उत्सुकतेने गेले. तर तिथे गेल्यावर मला जो आश्चर्याचा भलामोठ्ठा धक्का बसलाय म्हणता! त्या अजब दुकानात काय नव्हतं ते विचारा.

बॅटर्‍या असणार असं गृहित धरूयात. तर त्या जोडीला विविध प्रकारचे बॉल्स (पिवळ्या स्मायलीवाल्या स्ट्रेसबॉल्ससकट), फेविकॉल, वह्यांना कव्हरं घालण्याचे ब्राऊन पेपर्स, इअरबड्स, वरती मोठमोठ्या रीळांना गुंडाळलेले प्लॅस्टीकच्या जाड दोर्‍या, स्टीकर्स, गोट्या, बबलगम, डेकोरेशनची रंगिबेरंगी फुलं, झुरळाच्या गोळ्या, शाळा नुकत्याच सुरू झाल्यात म्हणून वह्या (या सिझनल होत्या कारण जमिनीवरच ठेवल्या होत्या). अक्षरश: काहीही होतं. कटलरी सोडून सर्व काही. कोणी मागत आलाच तर गरमागरम बटाटेवडेही मिळतील अस मला वाटायला लागलं. त्यातून एकच एक म्हातारा सगळ्यांना टॅकल करत होता. माझे दिवे बघून 'कोणत्या प्रकारच्या बॅटर्‍या लागतील ते उघडून बघावं लागेल. थोडं थांबा." म्हणाला. पण मला वेळ नव्हता म्हणून निघून आले.

घरी आले तर थोड्यावेळात बेल वाजवून कोणी एक स्त्रीयांकरता काही प्रॉडक्ट्स विकायला आलेली बाई. आमच्या बिल्डींगमध्ये सेल्समन किंवा बाया अजिबात बंद आहेत. त्यामुळे तिला पाहून आश्चर्यचकीत होऊन मी तिलाच यामागचं रहस्य विचारलं. तर तिने सांगितलं की ती पोलिओचे डोसही घरोघर जाऊन देते. मग त्यासरशी या गोष्टीही विकते. शिवाय हेडमसाज, फूटमसाज ही करून देते. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यामुळे प्रत्येक घरात एकतरी गोष्ट अपील होते. शिवाय पोलिओमुळे आमच्या बंदिस्त सोसायटीचे दारही तिच्याकरता उघडे होते. एकीकडे तिचे कौतुकच वाटले.

म्हणजे एकाचवेळी अतिमर्यादित वस्तु विकणारी दुकानं आहेत तशीच अति डायव्हर्सीफाईड दुकानंही गुण्यागोविंदानं नांदतायत की! सगळे आलबेल आहेत. आपापल्या कामावर निष्ठा ठेऊन आहेत. हेही नसे थोडके.

मात्र या सगळ्या सगळ्या दुकानांवर कडी असं 'परकर आणि ओले काजू' विकणारं दुकान मला पुण्यात दिसलं होतं ते मी जन्मात विसरणार नाही. Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान लेख Happy पुण्यातील 'परकर व ओले काजू' भारीच! हेच प्रश्न खरे तर बहुतेकांना पडत असतील 'अशा अशा' दोन वस्तू'च' एकत्र का विकल्या जातात असे!

मामी Lol

एवढं डायव्हर्सिफाइड गोष्टी विकणार्‍याकडून खरंतर दिक्षा घेतली पाहिजे. ते सोडून पब्लिक हसतंय. म्हणून मराठी माणूस उद्योगात मागे असतो.. Wink

मामी मस्तच... Lol

आणि हो, कॅश हवी असेल तर एटीएम पण!!>> झक्कीजी आजकाल पुण्यात सुद्धा mall / mart मधे या सगळ्या गोष्टी मिळतात... आणि Pune Central मधे तर मी ATM सुद्धा बघितलय... मला तर पहिल्यांदा खुप आश्चर्य वाटलेल याचं.. (ATM च)

मामी आज वाचला तुझा लेख... सॉलिड निरिक्षण.. Happy
तुझ्यासारखा प्रश्न मला सुद्धा रोज पडतो, माझ्या ऑफिसच्या वाटेवर अग्रीपाडा जनरल स्टोअर नावाचं दुकान आहे, त्यात काय मिळत नाही हेच मी रोज खिडकित बसून शोधून काढायचा प्रयत्न करते, त्याचं काही होत नाहीच, उलट मला रोज त्या दुकानात काही ना काही नविन वस्तू दिसते.. Happy

परवा गिरगावात, नोटांची नवीन बंडले मिळतील. जून्या नोटा बदलून देऊ अशी पाटी वाचली. हे दोन्ही कमिशन घेऊनच करत असतील की.

बाकि रामाच्या दु --------कानात उ-------त्तम चि----------- वडा मिळतो. हा माझ्या लहानपणीचा जोक आहे. (चारा कडु....... पण !!)

मामी,
अगदी रोखठोक, आवडलं !
Happy

गावाकडे एकाने आपल्या पानपट्टीमध्ये एकदा चक्क केळी विकणं चालु केलं, गावातले कारण बरेच लोक त्याला आणुन द्यायचे,दर सांगुन घरी जायचे.
म्हणायचा व्यसन करा पण सोबत २-४ केळी देखील खायला घ्याच.

झक्कीजी आजकाल पुण्यात सुद्धा mall / mart मधे या सगळ्या गोष्टी मिळतात... आणि Pune Central मधे तर मी ATM सुद्धा बघितलय... मला तर पहिल्यांदा खुप आश्चर्य वाटलेल याचं..

अहो ते काय विचारता? आजकाल भारत म्हणजे एकदम अमेरिकाच! शेम टु शेम, डिट्टो टु डिट्टो!!

मला एव्हढच म्हणायचे होते की तिथे जसे दुकानातल्या काही जिनसांबद्दलच पाट्या असतात, तश्याच इथेहि अनेक गोष्टींपैकी काहीच गोष्टींच्या पाट्या असतात!! आता तिथे जाऊन संपदित करून हे शेवटचे वाक्य टाकतो.

नाहीतर उगाचच भारत अमेरिका वाद तुम्ही उकरून काढलात नि दोष मात्र मला मिळेल!! मिळू द्या!

हायला ह्यांचं एक काय करावं कळत नाही. ह्यांच्या घरासमोर 'लाटणी मिळतील, खड्डे खणायला टिकमफावडे मिळेल, बॉलिवुडच्या पायरेटेड सीड्या मिळतील, क्रिकेटावरच्या अडुसष्ठ वर्षांपासूनच्या रनिंग कॉमेंट्र्या फुकट मिळतील, मौज्जाहीमौज्जाकरीना स्टाईल कॉश्चूम आणि करोनाचे क्रेट मिळतील, मोहर्रमच्या ताबुतांचे सजावट सामान मिळेल आणि लाच मिळेल.' अशी पाटी लावली असावी असा दाट संशय आहे.

मामी.. Lol

मामी,

मस्त निरिक्षण. मधे घरात उंदिर झाले म्हणुन मी उंदिर पकडायचा पिंजरा शोधत होतो. मला प्रश्न पडला होता की कोणत्या कॅटेगरीच्या दुकानात शोधायचा ? शेवटी पिंपरीला फिरताना वजन मापे विकणार्‍यांच्या दुकानात मिळाला.

सायकल पंक्चरच्या दुकानात स्टोव्ह रिपेअरिंग...

( मराठी माणसाचा हक्काचा व्यवसाय Proud आता यात पण राजस्थानी घुसलेत )

बाटल्यांना हजर स्टॉकमधे बुचं लावून मिळतील

असा धंदा ऐकला होता कधी ? स्वारगेटला टिळक रस्त्याला पहायला मिळेल ही पाटी Proud

आणखी एक पाटी वाचली होती.

फुगे फुगवून मिळतील Biggrin

या दुकानांवरून, ’आगे दुकान, पीछे मकान’ ही संकल्पना आठवली.
सद्ध्या अशी दुकाने विरळा दिसतात. पण पूर्वी मुंबईत अशी काही दुकाने पाहिल्याचं आठवतं.
बर्‍यापैकी मोठा असा दुकान गाळा ... त्याच्या रस्त्याकडील भागात दुकान थाटलेले
आणि मागील अर्ध्या भागात दुकानदारचा संसार. म्हणजेच आगे दुकान-पीछे मकान.
विशेषतः किराणा मालाची दुकाने या पद्धतीने चालविल्याचं मी पाहिलं आहे.
याचे अनेकविध फायदे, पटेल नांवाच्या माझ्या मित्राने सांगीतलेले -----

१) दुकानाची जागा आणि घर यासाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट नको.
२) घरातल्या सर्वांची धंद्यात मदत मिळते, ते धंद्यात वाकबगार होतात.
३) दुकान घरापासून लांब असल्यास दुकानात जाण्या-येण्यासाठी प्रवासखर्च होतो.
पण ‘आगे दुकान-पीछे मकान’ सिस्टीममध्ये हा प्रवासखर्च शून्य.
४) चहा, नाश्ता इ. साठी हॉटेलचा खर्च नाही.
५) जेवणाचा डबा/टिफिन नेण्याचं झंझट नाही.
६) दुकानात, घरातलेच पण जरा बरे असे कपडे घालून बसलं तरी चालतं.
म्हणजे वेगळ्या कपड्यांचा खर्चही वाचला. तसंच ते धुणे, इस्त्री करणे इ.मेंटेनन्स खर्च वाचला
७) जेवणासाठी दुकान बंद ठेवण्याची गरज नसते. मुख्य दुकानदार मागच्या घरात जेवत असताना
त्याची बायको/मुलगा यापैकी कोणीही दुकानात बसू शकतं.
८) दुकानाची आणि धंद्याची माहिती घरातल्या सर्वांना असल्याने दुकानात पगारी नोकराची गरज भासत नाही. म्हणजे तिथेही पैशाची बचत होते.
९) घरातल्या कोणालातरी दुकानात बसवून, मुख्य दुकानदार, दुकानाच्या वेळेतच बँकेचे व्यवहार किंवा तत्सम कामे बिनदिक्कत करू शकतो.
१०) दुकान बराच वेळ सुरू ठेवता येते. बिझिनेस अवर्स वाढल्याने धंदाही वाढतो.
११) रात्री दुकानातली काही जागा झोपण्यासाठी वापरली जाते. दुकानात माणसे असल्याने रात्रीच्या वेळी चोरांकडून दुकान फोडले जाण्याची भीती/शक्यता जवळपास नाही.

ही माहिती पटेल कडून ऐकली त्या गोष्टीला अनेक वर्षं झाली. त्यामुळे काही मुद्दे मी विसरलोही असेन. पण एकूणच कल्पनाशक्तीची कमाल आहे असंच म्हणावसं वाटतं.
आमच्या घरापासून थोड्या अंतरावरच (बोरिवली-पूर्व) एक हार्डवेअर मटेरिअलचं दुकान, अनेक वर्षं ’आगे दुकान पीछे मकान’ सिस्टीमने चालवलं गेल्याचं मी पाहिलं आहे.

नाहीतर उगाचच भारत अमेरिका वाद तुम्ही उकरून काढलात नि दोष मात्र मला मिळेल!! मिळू द्या!>>
नाहि हो .. मला असा काहि वाद वगैरे नहि उकरुन काढायचा.. असो तस वाटलं असेल तर माफ करा..

लेख आवडला...

पुण्यातलीच आमच्या घाराजवळची २ दुकानं आठवली. ही दोन्ही दुकानं अगदी नवीन-नवीन चालू झाली तेव्हापासून पाहतोय.

दुकान १: दुकानावर पाटी 'सौभाग्य अलंकार'. सुरुवातीला टिकल्या, गंध, बांगड्या आणि तत्सम सौभाग्य अलंकारच मिळायचे. नंतर-नंतर वह्या-पुस्तकं-पेनं वगैरे मिळायला लागलं. अजून काही दिवसांनी तर पतंग, मांजा, गोट्या पण ठेवायला लागले. नंतर फोटोकॉपी मशिन पण आलं. पण दुकानाचं नाव अजूनही तेच.....'सौभाग्य अलंकार' ....हल्लीच केव्हातरी पाटीच काढून टाकली Happy

दुकान २: दुकानावर पाटी 'सिझनल स्टोअर्स'. ह्याच्याकडे गोळ्या-बिस्किटांपासून, स्टेशनरी, बेकरी प्रॉडक्टस् सगळं मिळायचं. थोड्या दिवसात त्याने सायकलच्या टायरमध्ये हवा भरायचा पंपपण बसवून घेतला (काही दिवस हातपंप होता, नंतर मोटरवर चालणारा आला) Happy

आज हा लेख आठवण्याचं कारण म्हणजे ही खालील पाटी. परवाच कुठूनतरी येत असताना परळच्या एका दुकानावर पाहिली. Proud

एकमेकांशी संबंध नसलेल्या किती वस्तू एकत्र नांदताहेत!

भारी लिहीलयं...
गावाकडे 'येथे अंडी, फरशी आणि सायकल मिळेल' असा बोर्ड असलेले दुकान होते ते आठवलं!>> Rofl
पूर्वी सांगलीत पोस्टाजवळ चपला, बूटांची छोटी छोटी दुकानं (टपर्‍या) होत्या, तिथे एका दुकाना बाहेर पाटी लावलेली असायची " फाटक्या नोटा बदलून मिळतील"... Uhoh ...ते आठवलं!!

खूप छोट्या छोट्या वस्तू विकणार्‍या लोकांचा चरितार्थ कसा चालतो कोण जाणे? कोण घेतं असल्या वस्तू प्रश्नच पडतो मला. >>>
बोरिवलीत ठाकरे नाट्यग्रुहाजवळ एक महापालिकेची शाळा आहे. तिथे एक ५०-६० किन्वा अधिक वयाचे जोडपे चिन्चा, बोरे, ओली बडिशेप वगैरे काहिबाही विकत असतात. लहान मुलान्ना काय किमतीत देतात ठाउक नाही पण मला पाच रुपयाला २५-३० बोरे किन्वा बडिशेपच्या ५-६ काड्या देतात.
मुलान्च्या कुठ्ल्याशा कामाला जोडधन्दा म्हणुन हे म्हातारे जोडपे हे करत असले तरि खरेच शाळेच्या १२-१३ तासात त्यान्ना काय मिळत असेल?? का हा आटापिटा? :-o

Pages