(लहानपणी मावसभावाकडे सोवियत रशियाचा कुठलातरी अंक यायचा त्यावरुन आम्ही अमेरिका कशी आहे ते ठरवायचो :-). त्या अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा असलेल्या आमच्या अज्ञानाचा हा मजेशीर आलेख. आताच्या सारखं अद्यायावत माहितीच्या आधारे 'आलो की झालो इथलेच' पेक्षा फार वेगळा काळ होता तो हे लक्षात घेऊन वाचावे.)
"प्लीज कॉम्प्रमाईज विथ देम"
"सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अॅथॉरिटी" मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी ड्रायव्हरचा वाद चालू होता. मी, माझा नवरा आणि त्याचा मित्र ’दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ’ या उक्तीच्या प्रत्ययाची वाट बघत उभे होतो. सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. ड्रायव्हर दिडपड मागत होता तर मोटेलचा मॅनेजर मीटरप्रमाणे घ्यायला सांगत होते. दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे दिडपट... मनातल्या मनात हिशोब चालू झाला. भांडण ऐकायचं की हिशोब करायचा या कात्रीत सापडायला झालेलं. पण मला त्या दोघांच्या उच्चाराची प्रचंड गंमंत वाटत होती. भारतात आम्ही बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने ऐकायला बसायचो (ऐकायचो म्हणण्यापेक्षा पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ अशा नजरेने मी नवर्याकडे पाहात होते. तो आपला परत परत पाकिटात दिडशे डॉलर्स आहेत का ते तपासत होता. नाहीतर येणारा पोलिस अनायसे गिर्हाईक मिळालं म्हणून आम्हालाच घेऊन जायचा बरोबर. पण रात्री अडिचच्या सुमाराला हा प्रसंग आपल्या भारतीय मनाला न मानवेल इतक्या शांततेत पार पडला. पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्याच्या त्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी निस्तब्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं. पण मी कुरकुर न करता उभी आहे हे पाहून नवर्याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली. मी नक्की कशावर भाळले आहे या कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि काहीही करायला लागलेलं नसतानाही वेगवेगळ्या अर्थांने आम्ही तिघांनी निश्वास सोडले.
अमेरिकन भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ मऊ गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी जाग आल्या आल्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक कार्ट पडलेली होती. (तेव्हा तर कार्ट म्हणजे काय हे ही माहित नव्हतं.) अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्याला गदगदा हलवलं.
"अरे काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?"
"अं...काऽऽऽय?" असं काहीसं पुटपुटत त्याने कुस वळवली.
" अरे इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी ती गाडी असावी असं वाटतय. जरा वेगळीच आहे पण आणते मी. फुकट मिळेल." त्याच्या घोरण्याचा आवाज म्हणजे मुक संमती समजून मी बाहेर डोकावले. घाईघाईत मधलं अंगण ओलांडलं, थोड्याशा उंच भागावर झाडालगत ती कार्ट होती. कुणी बघत नाही हे पाहून आले घेऊन. अमेरिकेतली माझी पहिली चकटफू गाडी दाखविण्यासाठी विलक्षण आतूर झाले होते मी.
"अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता." माझ्या उपदव्यापाने तो चांगलाच चिडलेला.
"बरं मग सामान आणू यातून." आलेला राग गिळत मी तहाच्या गोष्टी कराव्यात तसं माझं म्हणणं शांततेत मांडलं. तो काही बोलला नाही. त्याला स्वत:ला नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मुक धोरण स्विकारतो (असं माझं मत) कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात चालत जायला निघाली.
रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली एकजात सगळी लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहात होती.
"भारतीय फार नसावेत इथे. सगळे पाहातायत आपल्याकडे." मला एकदम माधुरी दिक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
"आहेत थोडेफार असं ऐकलय. आणि तू काय भुरळल्यासारखी करते आहेस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरु नकोस."
"म्हणजे मी नक्की काय करायचं, तू पुरेसा आहेस भारताचं प्रतिनिधित्व करायला आणि चालते आहे की नीट."
"हवेत गेल्यासारखी चालते आहेस."
"मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला."
"इथे नका मारु तशा उड्या."
"आधी माहित होतं ना कशी चालते ते मग कशाला केलंस......" विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत लोकांच्या नजरांना झेलत दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्याचवेळेला त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यात भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली. कुणीतरी माझ्यासारखंच.....?
मी महतप्रयासाने मिळवलेली गाडी तिथेच सोडून देताना फार जड झालं मन. हातात सामान घेऊन आम्ही परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात अधूनमधून दिसणारी माणसं तोंडभरुन हसतात आणि हाय हॅलो करतात. इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची कला इथे उपयोगी पडणार नाही हे पटकन समजलं. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्यावर भलं थोरलं स्मितहास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करुन गप्प राहावसं वाटायला लागलं. नवरा तर इतका खुष झाला या लोकांवर की सारखं आपलं रस्त्यावर, रस्त्यावर चल सुरु झालं त्याचं.
दुसर्यादिवशी नवर्याचा एक मित्र आला तोही नवीनच होता अमेरिकेत पण जुना झाल्यासारखा वागत होता. एक दिवसाचा जास्त अनुभव होता ना त्याच्या गाठीशी. त्याने मग आम्हाला रस्ता कसा ओलांडायचा असे मुलभूत धडे दिले. आम्ही निघालो त्याच्या मागून. त्याने असे आणखी दोन तीन नवखे पकडून आणले होते तेही निघाले बरोबर. आता प्रात्यक्षिक. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्या मित्राने पुढार्यासारखा हात वर केला 'थांबा' या अर्थी. सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे सिग्नल ’रस्ता फक्त वाहनांसाठीच’ चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलिकडे जायचं कसं. पण तिथे एक बटण होतं ते दाबलं की चालायची खूण येते. मित्राने बटण दाबलं. तो आता टेचात निघाची खूण करणार तितक्यात
"अरे वा"
असं म्हणत मी लांब उडीच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखं साईडवॉकवरुन रस्त्यावर उडी टाकली. माझं अनुकरण बाकिच्यानी केलं. चार पावलं टाकली आणि भयाने अक्षरश: थरकाप उडाला. आमच्यासमोर त्या सिग्नलचा रंग बदलला आणि आता तो लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करत होता. नजर टाकू तिथे चारी बाजूने खदाखदा हसत कारची चालू इंजिन्स आमच्याकडे पाहात उभी. आतले डोळेही आमच्यावर रोखलेले. या लोकांना इतकी कमी लोकं रस्त्यावर पाहायला मिळतात ना, की बघत राहातात सर्कशीतला प्राणी रस्त्यावर आल्यासारखं. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि नवर्याच्या मागून पुढे धावले. पलिकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहात उभे राहिलो, तितक्यात पाहिलं की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली काही अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती. त्यांना आमची त्रेधातिरपीट म्हणजे गंमंतच असावी. पण मग हे का नाही धावले हे रहस्यच होतं. आता ते उलगडल्याशिवाय चैन पडणार नव्हतं.
त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत ’वॉकिग सिग्नल’ दिसला की ’अरे, चलो, चलो’ म्हणत आमची सगळी गॅग धावण्याच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखी पळत सुटायची. आता मागे पुढे न करता पुढेच पळायचं असं त्या मित्राने बजावलं होतं. कधीतरी वाहन चालनाचा परवाना वाचताना कळलं की तो लाल हात डोळे मिचकावयला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यासाठी. एकदा तुम्ही रस्त्यावर आलात की जा अगदी आरामात. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात......चालायला लागलो.
मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. आल्या आल्या आवारात कचर्याच्या पेटीत मायक्रोव्हेव टाकलेला पाहिला. कार्टसारखं करावं का असं वाटून गेलं पण.... खूप गोष्टीचं अप्रूप होतं, पण आवारातला पेपर रॅक मला अतिशय आवडला. एकदा पैसे टाकले की कितीही प्रती घ्या. माझ्या दृष्टीने हा रॅक मल्टीपर्पज होता.
"भारतात असतो तर शेजार्यापाजार्यांसाठी पण घेता आली असती नाही वर्तमानपत्र?" नवर्याने थंड नजरेने पाहिलं. (नशीब मायक्रोव्हेव बद्दल काय वाटतं ते बोलले नव्हते.) त्या थंड नजरेचा अर्थ मुर्ख, बावळट, जास्त शहाणी असा असतो. बोलण्याचं धाऽऽऽडस नाही ते असं नजरेतून डोकावतं. (ह्या माझ्या वक्तव्याचा त्याच्याकडून निषेध) तरीही मी खुंटा बळकट केल्यासारखं म्हटलं.
"आणि केवढी रद्दी जमवता आली असती. ती विकून...." त्या रॅकचं दार आत्ताच ही सगळी वर्तमानपत्र काढून घेते की काय या भितीने त्याने धाडकन लाऊन टाकलं.
हे घराच्या बाहेरचं. आत गेल्यावर ते भलं मोठं घर आधी फिरुन पाहिलं. ठिक होतं सगळं पण मोठा प्रश्न पडला, कपडे वाळत कुठे घालायचे? ही माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पूलमध्ये धपाधप उड्या मारत असतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पूलजवळ्च्या अर्धवस्त्र नार्यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’आलेच
"स्विमिंग पूल बघायचाय?" माझा खोचक प्रश्न. पण तो माझ्या बाजूला उभा राहून निसर्ग सौदर्य पाहाण्यात इतका मग्न झाला की माझा प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
"कपडे धुवायचे आहेत."
"अरे देना मग, मी धुऊन आणतो"
"तू?" मी नुसतीच त्याच्याकडे अवाक होऊन पाहात राहिले. स्विमिंग पूल याला दारुसारखा चढला की काय?
"अगं पूलच्या बाजूलाच असतं मशीन, तिथे येतात धुता"
"तरीच" मी माझ्या नजरेत ’तरीच’ मधला भाव आणला.
"अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?"
"पंच्याहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात."
"बाप रे, मग रांगच असेल मोठी"
"मशिन नाही गं बाई मशिन्स असतात"
"बरं बरं कळलं." असं म्हणत मी भारतातून आणलेल्या सगळया बॅग्ज रिकाम्या केल्या.
"एवढे कपडे?" तो दचकलाच ढिग पाहून.
"७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?" तो कपडे घेऊन घाटावर आय मीन मशिनवर गेला.
मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले. पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगिंतलं होतं. आम्हीही बिनदिक्कत एक मोठं पोतंच आणलं त्याचं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात. त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई न्यारं या कौतुकात मी पिठाकडे पाहात राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पीठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपलं, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता म्हणून दोन महिने ते पीठ संपेपर्यंत समाधान करुन घेतलं.
ऑलपरपजसारख्या (मैदा) कितीतरी शब्दांनी आम्हाला फसवलं पण आम्हीही पुरुन उरलो, आमच्या अज्ञानात कुणी ना कुणी भर घालत राहिलं. त्यानंतर ही साखळी गेली पंधरा वर्ष चालूच आहे. एका अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेत प्रवेश केला की नवीन काहीतरी येतंच......
मजेशीर किस्से आहेत एकेक
मजेशीर किस्से आहेत एकेक
माझ्या अर्धवट माहितीवरून
माझ्या अर्धवट माहितीवरून लिहीतोय. जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा.
मेक्सिकन (किंवा सर्वच) स्पॅनिश मधे शब्दात मधे येणार्या J चा उच्चार अ किंवा ह सारखा होतो. त्यामुळे ते माहीत होईपर्यंत मोजितो (मोहितो), बाजा (बाहा) फ्रेश, मोजावे (मोहावी) डेझर्ट, सॅन जोस (होजे) अशा चुका होतात. तसेच se, pe स्पेलिंग चे उच्चार आपल्याकडील नावांसारखे पूर्ण होतात - से/जे, पे, बे/बी असे. म्हणजे Guadalupe या बे एरियातील मुठेचा उच्चार ग्वाडालूपे असा होतो. (तसेच कॅलिफोर्निया च्या कृष्णा किंवा गोदा असलेल्या san joaquin नदीचा उच्चार सॅन वाकिन असा) Adobe - अडोबी, Doce - डोसे (बारा), Once - ओन्से (अकरा)
तसेच स्पेलिंग मधे दोन एल (ड्बल एल) आला तर त्याचा उच्चार य सारखा होतो. टॉर्टिया, केसाडिया, एल पोयो (चिकन) लोको ई.
सर्वच स्पॅनिश भाषेत असं असतं
सर्वच स्पॅनिश भाषेत असं असतं असं एकदा एका स्पॅनिशमधे मास्टर्स करणारीने मला सांगितलं होतं. आणि जनरली हेच नियम न्यू मेक्सिको (हे ही खरंतर मेहिको) मधल्या माझ्या हिस्पॅनिक मैत्रिणी पाळताना दिसायच्या.
तसंच burrito चं बरिटो नाही तर बुर्रितो इत्यादी.
तज्ञ सांगतीलच.
पुण्यात वाडेश्वरच्या इथे पेपिनोज का असं काहीतरी आहे तिथे खायला गेले होते एकदा. ते नवीन होतं हाटेल आणि मी नुकतीच सान्टाफे, न्यू मेक्सिको मधे राहून परत आले होते. तिथे गेल्यावर कायतरी मागवलं त्यात कॅसेडिया होतं. वेटरने मी महा अडाणी असल्याचा तु क माझ्यावर टाकत ते कॅसेडिल्ला आहे असं सांगितलं.
स्पॅनिश मधे शब्दात मधे
स्पॅनिश मधे शब्दात मधे येणार्या J चा उच्चार अ किंवा ह >> आम्हाला मार्केटींग कॉल आले की पहिल्यांदा 'मिस. होशी' हेच ऐकायला लागते.
मग सावनी तुम्ही जोश मधे आहात
<<<'मी शनिवारी उघडीच
<<<'मी शनिवारी उघडीच असते'>>>
बाप्रे... कसलं डेंजर मराठी!!!
सावनी, फारेंडा
सावनी, फारेंडा
(No subject)
फारेंडा जोश मधे आहात की होश
फारेंडा

जोश मधे आहात की होश मधे प्रश्न पडत असेल>>> हो न जोशात येऊन 'होश में नही हो क्या' असं समोरच्यालाच विचारावसं वाटतं
फारेंडा, या स्पॅनिश
फारेंडा,
या स्पॅनिश उच्चाराच्या लोच्यामूळे खेरीज गोर्यांना आपली नावे उच्चारायला असेही झेपत नाही त्यामूळे माझ्या जोशी या आडणावाची योशी, होशी, जाशी, योशीश अशी वाट लावली जायची. (ब्रीटस त्या मानाने बरे ऊच्चार करतात म्हणायचे) मी शक्यतो फक्त पहिलेच नाव ओळख देताना सांगायचो तेही "योगी". युनिव्ह. च्या पहिल्याच सत्रात माझ्या ग्रॅड अॅड्व्हायजर ने योगेश चे योगी केले तेच पुढे/अजूनही सर्वत्र चिकटलय. तो स्वतः मदन चा मॅट झाला होता.
याही बाबतीत भयंकर मजेदार किस्से आमच्या रूमी चे. अस्सल कट्टर तंबी (तामिळ) गडी होता त्यात त्याचे नाव होते "जयकुमार क्षिवगन्यानमे". गोरेच काय देशी पब्लिक ची देखिल त्याचे पूर्ण नाव घेताना बोबडी वळायची. त्याच्या डिपार्टमेंट मध्ये त्याच्या नावाचे "जेके" असे कायमचे बारसे करण्यात आले.. कुणी जेके म्हटले की तो एकदम चवताळून अंगावर यायचा. क्षिव चे शिव म्हटलेलेही त्याला चालत नसे. काय तर म्हणे त्याचे नाव तमीळ भाषेत होते आणि त्याच्या नुसार तमिळ भाषा हीच देवांची भाषा होती.
आयला, ऊसगावच्या ११ वर्ष रहिवासातील तेही नविन नविन दिवसातील डायरीतील काही पाने लिहावी म्हणतो.. लय म्हणजे लय भिषण भालो प्रसंग आहेत
एका देशीचे आडनाव रतिनासभापती
एका देशीचे आडनाव रतिनासभापती आहे. मग हे मी एका गोरीला असे सांगीतले.
रतिना = रेटिना
सभा = असेंब्ली
पति = हजबंड
मग तिला रेटिना असेंब्ली हजबंड असे त्याला हाक मारायला सांगीतले. तिने हाक मारताना हजबंड असेंब्ली असा घोळ घातला.
"जयकुमार क्षिवगन्यानमे'<<<<
"जयकुमार क्षिवगन्यानमे'<<<< मला मनातल्या मनात उच्चार करायला कठिन गेले
मोहना, लेख एकदम मस्त आणि
मोहना, लेख एकदम मस्त आणि प्रतिक्रियाही धमाल.
(No subject)
ब्रीटस त्या मानाने बरे ऊच्चार
ब्रीटस त्या मानाने बरे ऊच्चार करतात म्हणायचे<<<
एक ब्रिटने माझ्या नावाचा केलेला 'निराशा' हा उच्चार मला अजून चिकटलाय हो. त्यामानाने साउथवाले पब्लिक (सौदिंडियन नव्हे.. अॅयथेन्स, जॉऑर्ज्या म्हणणारे साउथवाले) बरा उच्चार करायचे.
खो खो आणि अत्यंत खो...
खो खो आणि अत्यंत खो... हो...मलाही तुझं हे नाव माहीतेय.................
@योग >>>आयला, ऊसगावच्या ११
@योग
>>>आयला, ऊसगावच्या ११ वर्ष रहिवासातील तेही नविन नविन दिवसातील डायरीतील काही पाने लिहावी म्हणतो.. लय म्हणजे लय भिषण भालो प्रसंग आहेत
अरे आपण बहुतेक साधारण एकाच वेळी उसगावात आलोय बहुतेक. माझ्याही गेल्या ११ वर्षांतील किश्श्यांनी पाने भरतील. student life च एक स्वतंत्र पुस्तक नव्हे ग्रंथ होइल. आणि तो एफोबींना उपयोगी पडेल.
सर्वानी उल्लेखलेल्या गोष्टी तर आहेतच पण अजुन एक कॉमन ग्रोसरी स्टोअर मधे विचारली जाणारी म्हणजे paper or plastic. माझ्या अगदी पहिल्या किराणा खरेदीत मी मख्ख्पणे उभी होते. काही कळतच नव्हत वाटल दुसर्याच कोणाशी बोलतेय ही बया. मग तिनेच समजून पेपर मधे सामान ठेवायला सुरुवात केली.
बुफे (इथे बफे म्हणतात) चे पण काही नियम असतात. प्रत्येक राउण्ड्ला नवी ताटली घ्यायची असते. हात नीट पुसुन स्वच्छ हातांनी पुन्हा वाढुन घ्यावे. स्टु. ला. मधे देशी जनता बफे म्हणजे मनसोक्त आडवा हात मारुन खायला आलेले असायचे. एरवी कसेबसे ब्रेड-भाजी, भात्-आमटी खायला मिळत असेल तर चारीठाव अन्न दिसले की उष्टी ताटली घेउन अजुन अजुन अन्न घ्यायला जात असत. कदाचित भारतात बुफेचे नियम वेगळे असतील पण इथे वेगळ. मग हॉटेल मालकाकडून तु. क. + लेक्चर इ. मार मिळतो.
अजून टोमॅटो समजून पेपरोनी
अजून टोमॅटो समजून पेपरोनी पिझा खाल्लेले आले नाहीत का इथे ? चीज बर्गरवाले पण असतीलच
मी पहिल्यांदा 'फॉर हिअर..' वाला प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखा केला होता आणि मग बर्गर/फ्राइज आल्यावर कॅरी बॅग आहे का विचारलेलं. काउंटरवरची बाई अजून महान. आम्ही हे विकत नाही म्हणे. माझ्या आधी आलेल्या कलिगने हिला टु गो हवय असं म्हणून सांभाळून घेतालं.
माझ्या नावाचा तर इतका चकणाचूर
माझ्या नावाचा तर इतका चकणाचूर करतात की विचारु नका. धनश्री हे बहुतेकदा डनश्रि, डानाश्रि असच होत. मला आता त्याची सवय झालीये. पण सुरुवातीला समजायचच नाही हे आपल्याशी बोलताहेत ते. आणि मग त्यातून अनेक किस्से.

आता डानश्रि ची सवय झाल्यामुळे फोनवर जेव्हा कोणी अमरु accent मारत "hello may I talk to धनश्री please?" अस म्हणत तेव्हा लगेच हा कोणत्यातरी company चा telemarketing call आहे हे लगेच समजत.
माझ्यापण नावाची वाट लावतात.
माझ्यापण नावाची वाट लावतात. त्यात मराठी ज्ञ आणि हिंदी ग्य चा गोंधळ घालतात भारतीय लोकही. एका प्रवासात आम्हाला एक बंगाली कुटुंब भेटलं, ओळख करून घेताना नावं सांगून झाली. ती मुलगी मला प्रयत्नपूर्वक प्रज्ञा म्हणून हाक मारत होती, मग तिने सहज अर्थ विचारला. अर्थ ऐकल्यावर "ओ! मतलब प्रग्या है तुम्हारा नाम!" म्हणाली!
आणि अमेरिकन मंडळी तर "Sorry I cannot pronounce the name...is it P R A D N Y A?" असं विचारतात किंवा सरळ नावाच्या जमतील तशा चिंध्या!
मस्तं लिहिलंय . प्रतिक्रिया
मस्तं लिहिलंय . प्रतिक्रिया पण मस्तच.
. फॉर हियर ऑर टू गो साठी सेम सेम. दुसरी एक मजा म्हणजे आमच्या घराजवळ एक ग्रोसरी मार्केट होतं जिथे आपल्या भारतीय मिरच्यांसारख्या मिरच्या (थोड्या लांब न कमी तिखट अश्या). एकदा त्या सापडत नाहीत म्हणून मी तिथल्या एका हेल्पर ला विचारलं, ग्रीन चीलिज कुठे ठेवल्यात म्हणून, तो बिचारा वेडा झालेला, आधी काहीच कळेना त्याला मग, मला जवळच्या चिलीज रेस्टॉरेंट्चा पत्ता दिला, मग शेवटि म्हणाला थांब मी मॅनेजर ला विचारून येतो. नशिबानी मॅनजर भारतीय होता, त्यानी बाहेर माझ्याकडे पाहिलं न म्हणाला, तिला ग्रीन लॉन्ग सेमी हॉट पेपर हव्यात. त्या कुठे ते सांग फक्त. त्याचा जीव भांड्यात पडला. मलाच नाही तर माझ्या नवर्याला पण आठवलं नाही चिलीज नाही पेपर विचारवं ते. नंतर तो मॅनेजर दिसला की छान बोलायचा. अश्या बर्याच लोकांच्या मजा होतात असंही म्हणायचा.
ते डिशवॉशर प्रकरण आमच्याकडे पण झालेलं, पण मी नाही नवर्यानी प्रयोग केलेला तो. माझी पहिली मजा तर ते एयर्पोर्टला लगेज कार्ट घेताना झालेली. काही केल्या कळेना, लिंकन उलटा की सुलटा. आणि मागे ४ भारतीय आजी आजोबा लोक उभे होते. ते बिचारे माझ्याकडे फार आशेनी बघत होते. की मला कळलं की ते पण मला विचारू शकतील, त्यामुळे जेव्हा ३ मिनिटांनी ते जमलं तेव्हा एका आजींनी शाबासकी पण दिली मला.
अजून टोमॅटो समजून पेपरोनी
अजून टोमॅटो समजून पेपरोनी पिझा खाल्लेले आले नाहीत का इथे >>
आहेत ना, माझा मित्र (याला तिखट खुप आवडते.) असाच एकदा डोमिनोज मधे गेला. तिथे गेल्यावर याने टॉपिंग्स कोणकोणते आहेत ते विचारले. तिथल्या बयेने सांगितले टोमॅटो, आनियन, हालपिनो, पेपरोनी.
या पठ्याने पेपरोनी ऑर्डर केले. नंतर खर काय ते कळल्यावर फेकुन दिले. त्याला वाटले की ते "पेपर-आनियन" आहे.
माझ्या रूममेटने मागवला होता
माझ्या रूममेटने मागवला होता पेपरोनी पिझ्झा. ती तेव्हा शाकाहारी होती. समहाउ पेपरोनी म्हणजे टॉमेटो नाहीत, आपण जे खात नाही त्यातलं काहीतरी आहे हे मला पक्कं कळत होतं. मी तिला १०-१० वेळा विचारलं. बहुतेक ते शाकाहारी नाहीये असं पण सांगितलं पण ती पडली मिठीबाईची अॅटिट्यूड क्वीन. मीच्च बरोबर म्हणाली मग म्हणलं भोआकफ. इतकं ग्रेट मराठी कळत नसल्याने तिने खरंच क फ भोगली. आधी खाणे मग शंका येणे आणि खात्री झाल्यावर उलटी वगैरे.
नविना, >> लिंकन उलटा की सुलटा. << हे काय? कार्टसाठी स्लॉटमधे डॉ बिल कसं सरकवायचं ते का? मी नशिबवान होते. माझ्या पहिल्या ट्रिपेत बरोबर विमानात सांगलीचा एक मुलगा आणि कोल्हापूरची एक मुलगी होती. कसं कोण जाणे पण त्या दोघांना सगळं माहित होतं. मी टोटल अडाणी गंगू होते त्यांच्यामानाने. पहिला मुंबई ते अॅटलाणा प्रवास त्या दोघांना लटकूनच केला मी.
योग आणि धनश्री, ११ वर्ष म्हणजे मी तुमास्नी २ वर्षांनी सिनियर.
९८ च्या फॉलला गेले होते मी. मी डायरी नाही ठेवली पण एकसे एक किस्से केलेत ३ वर्षात.
खो खो आणि अत्यंत खो... हो...मलाही तुझं हे नाव माहीतेय..<<< चूपे.. माहिती होतं तू हे म्हणणार ते. पण जाउदे डेव्हिडला माफ होतं ते.
पेपरोनीज.. "पेपर-आनियन"
पेपरोनीज.. "पेपर-आनियन"

आपल्या भोपळी मिर्च्यांना पूर्वीपासून चालत आलेला 'कॅप्सीकम' हा शब्द आता त्यांना मुळीच समजत नाही.. या कॅप्सीकम चं अमेरिकनांनी इतक्या वेळा बारसं केलंय ना.. पापरिका काय,बेल पेप्पर काय.. आपण कॅप्सीकम म्हटलं तर आपल्याकडे 'हे अजाण बालका'म्हणत कीवभरल्या दृष्टीनं पाहायला कमी करत न्हाईत वरून .
व्हय व्हय.. तेच लेडिज फिंगर
व्हय व्हय.. तेच लेडिज फिंगर आणि कोरियान्डरचं पण. आपण आपले भाज्यांची विंग्रजी नावं घोकून जातो. पण ओक्रा आणि सिलॅन्ट्रो कुठे माहित असते आपल्याला.
(No subject)
इथल्या चीजबर्गर मध्ये बीफ
इथल्या चीजबर्गर मध्ये बीफ असते ना? मॅक्डि मध्ये डबल चीजबर्गर नावाचा प्रकार असतो त्यात नुसते चीज असेल असं समजून धर्म भ्रष्ट करून घेतला होता
नीरजा, ११ वर्षे वास्तव्य
नीरजा,
११ वर्षे वास्तव्य म्हटलं... मी गेलेलो ९८ जानेवारी
९७ फॉल लाच जायचो पण फेमस मुंबई अमेरीकन काँ. ने व्हिसा नाकारला होता-- तो काळच असा होता म्हणा सर्व F1 वाले "माई भिक्षा वाढ" च्या थाटात निमूट काँ बाहेर तासन्तास रांग लावत.. आणि एव्हडे करून माई चा मूड चांगला असेल तरच भिक्षा मिळत असे अन्यथा, चला फूटा म्हणायचे बाकी ठेवायचे. त्याचाही एक ग्रंथ होईल! लिहावाच म्हणतो. एकंदरीत F1-H1-GC\Citizen या साखळीतून गेलेल्यांचे अनुभव इतर थेट L1-H1 कंपूपेक्षा खूप वेगळे आहेत हे निश्चीत सांगू शकतो.
ह्म्म्म मी आपली F1-EAD आणि
ह्म्म्म
मी आपली F1-EAD आणि धन्यवाद
सही आणि इंटरेस्टिंग
सही आणि इंटरेस्टिंग किस्से..!
अनेक ठिकाणी भस्सकन हसू आले. धन्यवाद. लिहिते रहो सब लोगां.
Pages