व्हॅलेंटाइन डे

Submitted by सुपरमॉम on 18 February, 2009 - 13:33

शर्टाच्या इस्त्रीवर शेवटचा हात फिरवत जानकीनं त्याची घडी घालायला घेतली. अगदी सुबक घडी घालून झाल्यावर बाकीच्या कपड्यांबरोबर तो शर्टही तिनं रवीच्या बॅगेत नीट ठेवला. सगळ्यात शेवटी वर धुतलेला टॉवेल पसरून ठेवला नि सूटकेस हलकेच बंद केली. तेवढ्यात रवी आत आलाच.

'झाली हं तयारी... आता फक्त लाडू चिवड्याचा डबा देते की संपलंच...'

'अग...लाडू चिवडा काय देतेस...तिकडे बाहेरच खाणं होईल.. हॉटेलवर फारच कमी राहणार आहे मी....अन तुला नि छोट्यालाच राहू दे ते फराळाचं.'

'हो..ते ही खरंच...एक माणूस काय बाबा, थ्री स्टार हॉटेलात राहणार, मस्त मस्त पदार्थ खाणार..घरच्या लाडू चिवड्याला कोण विचारतंय?'
ओठांना मुरड घालत जानकीनं कृतककोपानं रवीकडे बघितलं, तसं तो हलकेच हसला.

'तसं नाही ग जानू.. अन सारा दोन दिवसांचा तर प्रवास..सामान तरी किती नेऊ सांग?'

'असू द्या हो. आई नेहमी सांगतात ना.. भूक नसो पण शिदोरी असो..'

'हं... आईनं सूनबाईला अगदी तालमीत तयार केलीय बाकी.. लग्न झाल्यावर वाटत होतं.. की चला, आईच्या नियमांमधून सुटका झाली एकदाची. पण छे, कसंच काय.. बायकोही तिच्याच सारखी..'

जानकीकडे बघून रवीनं डोळे मिचकावले तशी ती पण खुदकन हसली. रवीच्या जवळ येऊन, त्याच्या हातात हात गुंफत रुसक्या आवाजात म्हणाली..

'अन लवकर या हं...मला नि छोटूला अगदी करमणार नाही इथे... चौदा तारखेला सकाळी नक्की..'

'अगदी नक्की.. त्यादिवशी व्हॅलेंटाइन डे आहे ना..मग कसा नाही येणार? तूच सांग बरं...'

रवीच्या चेहर्‍यावरच्या मिश्किल भावांनी जानकीच्या गालांवर चांगलाच गुलाबी रंग चढला..
'लग्नाला तीन वर्षं झाली तरी काय झकास लाजतेस तू जानू...'

रवी पुढे काही बोलायच्या आतच धाडकन दार ढकलून छोटूची स्वारी प्रवेश करती झाली. एकीकडे डोळे चोळत नि ...'आई.. दुधु..' पुटपुटत..

'हे आले हवालदार साहेब..'

रवीच्या वैतागण्यावर हसतच जानकीनं छोट्याला उचलून घेतलं नि स्वैपाकघरात जाऊन त्याच्यासाठी ती दूध गरम करू लागली. एकीकडे तिच्या सूचना चालूच होत्या...'फार तेलकट खाऊ नका बाहेर..थंडी वाटली तर स्वेटर दिलाच आहे... नि आईंसाठी महालक्ष्मीचा प्रसाद आणायला विसरू नका...'

'बाई ग, मी लढाईवर नाही चाललो.. दोन दिवसांचं तर काम... अन मुंबईला थंडी नसते या दिवसात..'

'आपल्या दौर्‍याच्या कल्पनेनं किती उत्साही झालीय जानकी....'

रवीच्या मनात आलं...

'परवापासून शेजारी पाजारी सगळ्यांशी बोलून झालंय..अन दौरा तरी कसला? शेटजींबरोबर त्यांच्या मुंबईच्या दुकानाचे हिशोब बघायचेत नि त्यांच्या मावसभावाकडे त्यांना भेटायला जायचंय. याला काय दौरा म्हणायचं? इथल्या दुकानाचे हिशोब बघतो...त्यात थोडा बदल, इतकंच. नि हॉटेलही शेटजींच्या व्याह्याचंच...म्हणून फुकट.तेवढेच पैसे वाचणार शेटजींचे...नाहीतर कारकुनाला कोण देतंय थ्री स्टार हॉटेल?....'

मनातले विचार मनातच ठेवत त्यानं जायची तयारी केली. छोटूशी थोडावेळ खेळला. दोन दिवस त्याच्या दूर कधी राहिलाच नव्हता तो..

बाहेर शेटजींच्या गाडीचा हॉर्न वाजला तसा बॅग घेऊन रवी निघाला. छोट्याचा गालगुच्चा घेऊन, जानकीला हात हलवीत तो गाडीत बसला. गाडी वळणावरून अदृश्य होईपर्यंत दोघे 'टाटा' करताना त्याला दिसत होते.

सहा सात तासानं गाडी मुंबईला पोचली तसं आंबलेलं अंग सरळ करत रवी खाली उतरला. शेटजींच्या व्याह्याच्या प्रशस्त बंगल्यासमोर गाडी थांबली. शेटजींची बॅग नि त्यांचं सामान त्यानं नि ड्रायव्हरनं उतरून घरात नेऊन ठेवलं. दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता यायचा वायदा करून दोघं निघाले नि रवीला ड्रायव्हरनं हॉटेलवर नेऊन सोडलं. हॉटेलच्या दर्शनी झगमगाटानं किंचितकाळ सुखावलेल्या रवीला ड्रायव्हरनं भानावर आणलं..

'साब, खानेका पैसा..'

'हो.. हो..' म्हणत रवीनं खिशात हात घालून दोनशे रुपये त्याला दिले. कालच शेटजींच्या खात्यावरून घेतले होते त्यानं. दोन दिवसांचे दोनशे रुपये.

काऊंटरवर रवीनं नाव सांगितलं तसं अदबीनं रवीला एका खोलीकडे नेऊन सोडण्यात आलं. खोली उघडून देणारा नोकर जरासा घुटमळला. आधी रवीच्या काहीच लक्षात आलं नाही...पण साहेब..टिप...' म्हणत त्यानं निर्लज्जपणे हातच पुढे केला तसे रवीनं खिशातून पाच रुपयांची नोट काढून त्याच्या हातावर टिकवली. सलाम करताना त्यानं नाराजीनं किंचित तोंड वाकडं केलेलं रवीच्या नजरेतून सुटलं नाहीच.

'काय कटकट आहे...काम शेटजींचं नि टिप मात्र आमची..'
वैतागानं पुटपुटत रवी आत आला खरा..पण खोलीचं दार मागे ओढून घेतल्याबरोबर तो तिथेच थांबला..विस्मयानं त्या सुसज्ज खोलीकडे बघू लागला..

मंद निळसर रंगानं रंगवलेल्या भिंती.. त्या रंगांला मॅच होणारे झुळझुळीत पडदे, सुरेखसे पेंटींग्ज, मध्यभागी मोठा पलंग, एका छोट्याशा टेबलावर बास्केटमधे चिप्सची पाकिटं नि पाण्याची बाटली...

दार ढकलून तो बाथरूममधे डोकावला. आत मोठ्या थोरल्या आरशासमोर आंघोळीचा टब... नि आरशाच्या बाजूच्या कपाटात चिमुकल्या शांपूच्या बाटल्या, साबणाच्या वड्या, शेजारीच ठेवलेले चार पाच परीटघडीचे टॉवेल्स...फ्लॉवरपॉटमधे ताजी फुलं..

'वा, मजाच आहे म्हणायची...एका माणसाला कशाला लागतात इतके टॉवेल्स? मोठ्यांचं सारं अजबच..'

मनातल्या मनात म्हणत तो बूट काढून पलंगावर आडवा झाला. त्या मऊमुलायम स्पर्शानं त्याचं थकलंभागलेलं अंग सुखावलं तशी त्याला पोटातल्या भुकेची जाणीव झाली.

बाहेर जाऊन, त्यानं काऊंटरवरच्या माणसाला विचारलं,
'इथे कुठे खायची सोय आहे का?'

'साहेब, काय हवं ते सांगा. पैसे द्यायची गरज नाहीय.खाली आपलं रेस्टॉरंट आहे. फक्त बुधवारी बंद असतंय ते... म्हणजे परवा..'

'हं... पण मी परवा सकाळीच निघणार..त्यामुळे प्रॉब्लेम नाही..'
'खोलीत पाठवू का साहेब?'
'नको नको म्हणत रवी लिफ्टकडे निघाला. पुन्हा पाचाची नोट द्यायचं जिवावर आलं होतं त्याच्या.

खाली जाऊन त्यानं भरपूर खाऊन घेतलं. पनीर, छोले नि पराठे.. व्हेज बिर्याणी नि बरंच काय काय. शेवटी मँगो लस्सीपण..

आज जानू नि छोट्या हवे होते इथे...जानकीला पनीर किती आवडतं.. पण एकतर फारसं हॉटेलमधे जातच नाही आपण... महिन्याच्या खर्चाशी झगडता झगडताच थकून जातो दोघं..त्यात आईची, छोट्याची औषधं, दूध, घरभाडं नि इतरही अनेक खर्च... कधीमधी जमवून गेलोच, तर त्यातल्यात्यात महाग असतात म्हणून पनीरच्या डिशेस मागवायला नाहीच म्हणते बिचारी..

खरंच, किती समजूतदार आहे जानकी..

जेवण उरकून, बडीशेप चघळत तो खोलीत आला. कपडे बदलून पलंगावर पडला तरी त्याचं विचारचक्र सुरूच होतं..

'पहिल्यांदा मुंबईला येतोय आपण... जानकीसाठी निदान एक साडी तरी.. म्हणजे व्हॅलेंटाइन डे म्हणून नाही.....पण या अशा गोष्टी कधी जमल्याच नाहीत आपल्या तुटपुंज्या पगारात. अगदी तिच्या वाढदिवसालाही गजरा नाहीतर भेळेवर निभावत आलो आपण. पण ती बिचारी कधी तक्रार म्हणून करत नाही. यावेळी मात्र फार वाटतंय काहीतरी न्यावसं. किती खूष होईल ती..'

खिशातल्या शंभराच्या चार नोटांची आठवण झाली तसं त्याच्या उत्साहावर विरजण पडलं..

अजून पुरता एक आठवडा जायचाय महिन्याचा...पगाराला वेळ आहे अजून. पैसे पुरले नाहीत तर फार पंचाईत होते मग. गेल्या महिन्यात छोट्याची पिगीबँक फोडावी लागली तेव्हा कित्ती रडला होता तो..

विचार करता करताच तो गाढ झोपून गेला. सकाळी शेटजींच्या फोननंच जाग आली त्याला..

झटपट तयार होऊन तो निघाला. शेटजींना घेऊन दुकानावर गेला.

तो सगळा दिवस रवीचा खूप घाईगडबडीचा नि दगदगीचा गेला. बरंच काम होतं दुकानात. दुपारी तर त्याला जेवायलाही खूप उशीर झाला. सगळी कामं उरकून तो शेटजींना सोडायला त्यांच्या व्याह्यांच्या बंगल्यावर गेला तेव्हा बरीच संध्याकाळ झाली होती.
शेटजींची बॅग ठेवून तो वळणार तोच शेटजींच्या विहिणबाईंनी त्याला हाक मारली.

'उद्या तुम्ही महालक्ष्मीच्या देवळात जाणार ना?मग एक काम कराल का? हे न्या देवीसाठी...'

त्यांनी पुढे केलेलं पुडकं रवीनं मान डोलावत बॅगेत टाकलं.

गाडीत त्याचं थकलं भागलेलं मन पुन्हा विचार करत होतं..

छोट्यासाठी तर काय..एखाद्या बॉलनंही खूष होईल तो, पण जानकीला काय न्यावं बरं?

शेवटी साडी नेणं शक्य नाही हे नक्की करून रवी हॉटेलवर आला. बॅग हॉटेलवर ठेवून तो बाहेर निघाला नि जवळच्याच एका खेळण्याच्या दुकानातून त्यानं छोट्यासाठी बॉल घेतला. बाजूच्या सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानातून जानकीसाठी एक पर्स विकत घेतली.

परत येऊन त्यानं सारं सामान नीट बॅगेत लावून ठेवलं. सहज म्हणून कुतुहलानं शेटाणीनं दिलेलं पुडकं उघडून पाहिलं...

आत धानी रंगाची, बुट्ट्याबुट्ट्यांची सुरेख चंदेरी साडी होती.

देवाला द्यायला इतकी भारी साडी घेता येते लोकांना... नि घरच्या गृहलक्ष्मीसाठी एक साडी घेताना विचार करावा लागतो आपल्याला...'
त्याच्या मनात आलं.

त्या रात्री रवीला झोपही नीट लागली नाही. का कोण जाणे, पण घरची उगाचच आठवण येत होती त्याला. केव्हा एकदा घरी जातो असं होऊन गेलं होतं. थोडी झोप लागलीही, तरी रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजानं मधेच जाग येत होती. जानकीची नि छोट्याची सारखी काळजी वाटत होती.

'नीट राहतील ना दोघे एकटे... नेमकी आईही याच वेळी मामाकडे गेलीय.. '
अशा अनेक विचारांनी तो अस्वस्थ होता.

सकाळी शेटजी आधी त्यांच्या मावसभावाकडे जाऊन, थोड्या वेळातच भेटून येणार होते नि मग हॉटेलवर येऊन, रवीला घेऊन, दोघं गावाकडे निघणार होते. जाता जाता देवळात दर्शन घेऊन पुढे निघायचा बेत होता.

अंघोळ वगैरे उरकून रवी अगदी तयार होऊन बसला होता. सामान भरताना बॅगेत शांपूच्या बाटल्या नि साबणाच्या वड्याही भरायला विसरला नव्हता तो.. चिप्सची पाकिटंही छोट्यासाठी म्हणून काढून घेतली होती त्यानं..

पण दोन तीन तास होऊन गेले तरी शेटजींचा पत्ता नव्हता. त्यांच्या व्याह्यांकडे फोन केला तर ते सकाळीच निघून गेल्याचं कळलं. बराच वेळ वाट बघून रवी अगदी कंटाळून गेला. शेटजींच्या मावसभावाचा नंबर काही त्याच्याकडे नव्हता. खालचं रेस्टॉरंटही बंद... फारच डोकं दुखायला लागलं तसा तो कोपर्‍यावरच्या टपरीवर जाऊन चहा पिऊन आला.

दीड वाजून गेले तरी शेटजी आले नव्हते. खूपच भूक लागली तशी त्याला जानकीनं दिलेल्या लाडू चिवड्याची आठवण झाली. भरपूर चिवडा नि दोन लाडू खाऊन त्यानं तृप्तीचा ढेकर दिला तोच फोन खणाणला.

शेटजींचाच फोन होता. भावानं आग्रहानं जेवायलाच ठेवून घेतलं होतं त्यांना. अर्ध्या तासात ते निघणार होते म्हणून रवीला तयार व्हायला सांगितलं होतं. आता लगेच निघायला हवं होतं म्हणजे रात्रीपर्यंत गावी पोचता आलं असतं..

रवीला चांगलाच संताप आला. इतका वेळ आपल्या जेवणाखाण्याचाही विचार नाहीय या माणसाला... बरोबर..नोकराला आपले बेत कशाला सांगतील ते?

'पण शेटजी, ती साडी... देवळात जायचंय ना?'

'देऊन टाक हॉटेलातल्या नोकराला एखाद्या. देवीला दिली म्हणून सांगून टाकू...'
बिनदिक्कतपणे शेटजी उत्तरले.

फोन ठेवून रवी उठला. पुडक्यातून साडी काढून त्यानं एक क्षणभर विचार केला. साडीच्या मखमली पोतावर, नाजूक नक्षीवर हात फिरवला नि हलकेच ती साडी बॅगेत सारली.

व्हॅलेंटाईन डे संपायला अजून वेळ होता..

-समाप्त.

गुलमोहर: 

याला काय म्हणायचं? चोरी म्हणता येईल का? खचितच नाही. शेटजींनी हॉटेलातल्या नोकराला दे म्हणून सांगितलेच होते. मी असतो तर त्या परिस्थितीत रवीने केले तेच केले असते.

छान लिहिलीय कथा.

शरद

छान च आहे, नेहमीसारखी..पण तुमच्या कथेतील माणूस अगदी इनामदारीने ती साडी अजून एखाद्या देवळामधे देईल , अथवा त्याला शेटजी इनाम म्हणून जास्ती पैसे देईल आणी त्याच्यातून तो साडी घेईल असे वाटले होते..

नाही स्नेहा, असं नाही दाखवलं तेच बरं झालं. कारण आदर्शवादावर जग चालत नाही. शेटजींना ती साडी नाहीतरी कुणालाही दिलेली चालली असती.

मस्त, भावली आणि पटली देखील !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

एकदम वेगळी आणि अनपेक्षीत..हळुवार आणि तितकीच खरी...

सुन्दर. भयकथा, रहस्यमय कथा ह्या सर्वामधून बाहेर काढणारी अतिशय भावस्पर्शी कथा.

हा रखरखत्या वास्तवातला व्हॅलेंटाईन डे आवडला आपल्याला...

कथाबीज छान आहे, आम्ही लहान होतो तेंव्हा एक दूरचे नातेवाईक "गरीब मुलांना द्या" असे सांगून त्यांच्या मुलींचे छान, नवे कपडे आईकडे पाठवायचे. ते टाकून द्यायला अगदी जीवावर ययचं तिच्या, मग आम्हाला होतील असे आम्हाला ठेवून घ्यायची ती. त्यामुळे मी समजू शकते रवीची मानसिक अवस्था!

पण रवीच बॅकग्राऊंड आणि शब्दरचना किन्वा वातावरणनिर्मिती मॅच नाही झाली. बायकोचा वाढदिवस भेळेवर साजरा करणारा माणुस व्हॅलेंटाईन डे लक्षात ठेवून घरी बोलतो आणि हे मुंबईपासून दूरच्या ठिकाणी होतय हे खटकतय बहुदा!

आदर्शवादावर जग चालत नाही.>> अगदी खरंय! शेवट एकदम पटला.

आणि कथानायक तर कसला गोड आहे... सारखा बायकोचा आणि छोट्याचा विचार, बायकोच्या त्यागाचं, तिच्या समजुतदार्पणाचं कौतुक... कित्ती कुटुंबवत्सल!

'लग्नाला तीन वर्षं झाली तरी काय झकास लाजतेस तू जानू...' आईगं कित्ती गोड... Blush

कोण म्हणतं बरं लग्नानंतर प्रेम संपतं म्हणून? आस्था आणि हळवेपणा जपला म्हणजे झालं
Happy
पुन्हा हळव्या रेशीम नात्यांच्या भावबंधाची चांदणशिंपण!! लिहीत राहा सुमॉ खुप हळवं आणि गोद लिहीता बाई...

dreamz_unlimited.jpg

साडी महालक्ष्मीला न देता गृहलक्ष्मीला दिली. Happy

सुंदर कथा!!

--------------
नंदिनी
--------------

कथा उत्तम आहे.पण खूप लहान वाट्ली.कल्पना उत्तम होती ,शेवट हलवून गेला.ऑल द बेस्ट.

मला मनातून उगाच अस्वस्थ होत होतं की आता हा परस्पर साडी बायकोला नेतोय की काय.. पण शेटजींनीच सांगितल्यामुळे एकदम हलकं वाटलं..
चांगली कथा.
----------------------
एवढंच ना!

सुमॉ, छानय कथा. तुझ्या कथेतली "चांगली" माणसं "योग्य"च वागतात.... आणि ती कुठल्यातरी जुन्या पुस्तकातली न वाटता, आजूबाजूची वाटतात... गंमत आहे नाही? Happy

कथा आवडलीच.

सुमॉ छानच जमली आहे कथा. आणि शेवटही गोड.

सुमॉ
मला काही पटली नाही गं कथा. म्हणजे असे लोक असू शकतात हे खरंय. पण अशा मोहाच्या प्रसंगातूनच माणसाची परिक्षा होत असते. त्या रवीच्या बाकीच्या विचारांवरुन, वागणूकीवरून तो असा वागेल हे पटत नाही. शिवाय त्याच्या बायलोला सुद्धा अशी व्हॅलेंटाईन गिफ्ट चालेल का असाही विचार आला मनात.
अगदी नोकराला देण्यापेक्षा परत कधी तरी कुठल्याही देवळात देता आलीच असतीच साडी.

सुमॉ मलापण शोनूसारखच वाटलं गं. शेवटी सद्सद विवेकबुद्धीला स्मरून घेतलेल्या निर्णयाचं समाधान काही वेगळच असतं.

तुझी लेखनशैली मस्तच आहे पण. तेव्हा तुझ्या पुढच्या कथेच्या प्रतिक्षेत.

सुमॉ,
ह्म्म्म! फारशी नाही आवडली कथा! (मे बी व्हॅलेंटाइन डे च हे जे बाजारिकरण होतय नं त्यामुळही असेल कदाचित...) किंवा ह्या रेट्यात माझाही अगदी काल परवा पर्यंत बळी जात होता म्हणून असेल कदाचित!
Sad

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

Back to top