’होम मिनिस्टर’ नंतर

Submitted by पूनम on 18 February, 2009 - 02:37

’उबाळे चाळी’मधल्या त्या दोन रूम पाहुण्यांनी खचाखच भरल्या होत्या.. बाहेरच्या गॅलरीतही लोक चहा पीत उभे होते. आतबाहेर करून, सगळ्यांचं चहा-पाणी नीट होतंय ना हे बघता बघता सीमाची कोण धावपळ चालू होती.. रात्र व्हायला लागली, तसे हळूहळू एकएक जण गेले, तरी घरात चिकार नातेवाईक होते..

बाहेरच्या रूममध्ये सगळे जागा मिळेल तिथं कोंडाळं करून बसले.
सीमाच्या नणंदेनी तिला हाक मारली, "वैनी, अगं ये की, टेक तरी दोन मिनिट.."
"आले, आले" म्हणत सीमाही टेकली.
"बघू तरी वैनीबाईंची पैठणी..."
सीमा मनातून हरखली. तिनेही तिच्या नव्या कोर्‍या जांभळ्या पैठणीवरून हळूच हात फिरवला.. नेसल्यापासून मनभरून बघताही आली नव्हती.. ती मिळाल्यचाच आनंद इतका मोठा होता, की ती अपूर्वाईनी निरखणं, आपण त्यात कश्या दिसतो हे न्याहाळणं हे राहूनच गेलं होतं..

ps7.gif

ते क्षण तिच्या डोळ्यापुढे झरझर सरकायला लागले...
आज संध्याकाळीच तिने ’होम मिनिस्टर’मधे पैठणी जिंकली होती.. तिने नवर्‍याच्या मोबाईलवरून सहज म्हणून होम मिनिस्टरला फोन केला काय, आणि आठच दिवसात होम मिनिस्टर घरी येणार म्हणून उलट फोन आला काय! आधी तर विश्वासच बसला नाही, पण नंतर जाम तारांबळ उडाली.. नवरा जरासा रागावलाही होता, दोघांनाही नोकरीचा एक दिवस बुडवावा लागणार होता.. आणि आज तर- सकाळपासून नातेवाईक, चाळवाले, कल्ला करून होते. पलिकडच्या चाळीमधल्या शेवाळे वहिनींबरोबर तिची स्पर्धा होती. प्रत्यक्ष आदेशभाऊजी दिसल्यानंतर सगळेच खुश झाले, अगदी नवराही. तिला तर काय बोलू, कसं बोलू असं होत होतं.. घरात काही खेळ झाले, त्यात तिला फक्त दोनशे रुपये बक्षिस मिळालं, घरच्यांची कसलीच मदत तिला नाही झाली, नवर्‍याचीही, याचा तिला मनातून खरंतर रागच आला होता.. पण पैठणीच्या खेळात मात्र तिने बाजी मारली. खेळ सोप्पाच होता.. मोगर्‍याची फुलं होती, ती ओवून गजरा करायचा होता. हा तर तिच्या डाव्या हातचा मळ. एका मिनिटातच तिने पैठणी पटकावली.

ती जिंकली आणि एकच जल्लोष झाला सगळीकडे. नवर्‍यानी चक्क उचलून घेतलं, सासूबाई आणि नणंदेनी ओवाळलं, चाळीमधल्या, कारखान्यातल्या मैत्रिणींनी कौतुक केलं.. त्या सगळ्यांचं चहापाणीच बघत होती आतापर्यंत. चहा आणि एक एक वडा दिला सगळ्यांना.. आदेशभाऊजींनाही तेच दिलं. चांगले होते बिचारे. खेळात मिळालेले दोनशे रुपये नक्कीच या खर्चापायी गेले असं वाटून मनात हिरमुसली जराशी ती..

"छानच आहे ना पैठणी.." नणंदही त्यावरून हात फिरवत, काहीश्या हेव्यानेच म्हणाली. "बदलायची नाही का? झाली मिरवून बरीच.."
हे नणंदेचं लागट बोलणं नेहेमीचच होतं. आज मात्र सीमानेही उत्तर द्यायचं ठरवलं, "असं काय बोलताय आक्का? अहो, बघताय ना.. अजूनपर्यंत चहा-पाणी करतेय, आता जेवणाची तयारी, घरात-बाहेर माणसं- साडी बदलू तरी कुठे? मघाशीही शेजारी मोरे वहिनींकडे जाऊनच पैठणी नेसून आले.. आता रोजची साडी नेसायलाही त्यांच्याकडेच जाऊ म्हणताय?"
नणंद जरा वरमली, "तसं नाही, नवी कोरी पैठणी खराब होईल ना, म्हणून म्हटले.. माझं काय, रात्रभर का नेसेनास?"
"बदलते बदलते.. तेवढ्यात कूकरच्या शिट्ट्या झाल्या तर गॅस तेवढा बंद करा.." सीमा बाथरूममध्ये शिरली..

थोड्या वेळाने जेवायला पुरुष मंडळी बसली आधी. अर्थात, विषय तोच होता.. नवर्‍याचे दोन मित्रही होते..
"काही म्हण सुर्‍या.. पण वहिनींना उखाणा घ्यायची तरी प्रॅक्टीस द्यायची राव, तसे आठ दिवस होते मधे..."
सीमाला उखाणा घेता आला नव्हता.. त्याला उद्देशून होतं हे..
सासूनेही री ओढली, "तर काय गं सीमे.. एरवी इतकी चुरुचुरु बोलत असतीस, तुला साधं नाव घेता येईना, होय गं?"
सीमा गोरीमोरी झाली, "अहो, काय करू? ते मला असे कायकाय प्रश्न विचारत होते, की गांगरायलाच होत होतं.. उखाणा सुचेनाच बघा.. त्यात शब्द काय तर ’खडीसाखर’!! मला तर जुळवायलापण सुचलं नाही काही.. म्हणून राहिलंच ते.."
"त्यात काय वहिनी.. घ्यायचं नाव- ’आवडतो मला खडीसाखर आणि पेढा आणि सुर्‍या झाला माझ्यासाठी वेडा’.." एक मित्र बोलला... हास्याचा एकच फवारा उडला.. सीमा झक्क लाजली.. पण सुरेशचा चेहरा जरासा आखडलेलाच..
"तू काय आणि सगळ्यांसमोर मला सुमोचा ड्रायव्हर बोलली.. ’आपली सुमो आहे’ इतकंच बोलायचं असतं, कळत नाही काही तुला.."
"त्यात चूक बोलली का काही पण? ड्रायव्हर तर ड्रायव्हर.. लपवायचं काय? सगळ्यांना माहीते तुम्ही सुमो चालवता ते.." सीमाने झटकून टाकले.."काही सांगू नका आणि.. तुम्हाला पापडाचा डबा तरी कुठे मिळाला? सारखे पापड मागत असता खायला.. पण डबा नाही आणलात.. माझे शंभर रुपये बुडाले, त्याचं काय?" सीमाच्या तोफगोळ्यापुढे सुरेशही गप्प बसला..

कारण त्या धावपळीमध्ये त्यालाही गडबडल्यासारखेच झाले होते.. त्यातून तो बांदेकर तिकडून सारखे उलट आकडे मोजत होता.. सीमापण काहीबाही बडबडली होती- तो ड्रायव्हर होता, तापट होता, फिरायला नेत नाही कुठे- अरे जमत नसेल, म्हणून कॅमेर्‍यासमोर बोलायचं का? तो बांदेकर लागला लगेच पिळायला.. ’लवकर घरी येईन, फिरायला नेईन’ असं कबूल करून घेतलंन! आयला, असं फिरायला म्हणून लवकर आलं तर ड्यूटी कोण करणार? पैसा कोण देणार? लांबलांबच्या ट्रिपा मारल्या, सलग ड्रायव्हिंग केलं तर पैसे भेटतात जराजरा.. आये आजारी असतेय, पोरांचे खर्च, एक आहे का? याचं काय जातंय बोलायला? म्हणे लवकर येईन! सीमीला काय माहीत नाही का हे सगळं? उगाच कायच्याकाय बडबडायचं आपलं!

त्याचा उतरलेला चेहरा पाहून सीमाला कसंतरीच झालं.. उगाच जगासमोर रडगाणी गायली की काय असं वाटायला लागलं.. पण आदेशभाऊजींनी "हे वेळ देतात का घरात?" असं विचारल्याबरोब्बर मनातलं बाहेर पडलंच सगळं.. दिवसरात्र घरी नाहीत हे.. नाईटला जातात, तर घरी येईपर्यंत लक्ष लागत नाही कुठे.. परत मित्र हे असे टवाळखोर.. तरी बरं, दारूबिरूच्या नादी अजून तरी लागले नाहीयेत.. पोरं लहान, म्हातारी बघते, म्हणून नोकरी तरी करता येते.. नायतर ह्यांच्या एकट्याच्या कमाईत काय भागतंय? पण यासगळ्यात मन मारावंच लागतंय, फिरणं, सिनेमा, हॉटेल.. काहीच नाही करता येत.. सगळा वेळ धबडग्यातच जातो.. मग कोणीतरी विचारलं की पटकन बोलून जायल होतंय..

इतक्यात नणंदेच्या मुलीने विषय काढला, "मामी ते तू काय करत होतीस गं? हात लांब करून?"
सगळेच हसायला लागले.. सिनेमाच्या नावांचा अभिनय करायचा होता.. आधी सिनेमा, त्यातून अभिनय! सगळाच खडखडाट!! काय तरी सिनेमे आणि- गाढवाचं लग्न, लेक चालली सासरला, मुंगी उडाली आकाशी, इश्श्य आणि काय बरं, हां- एक डाव धोबीपछाड! यात कशाचा अभिनय करायचा डोंबल? आणि ओळखणारेही सगळे एकसे एक! सीमाला नीट काही करता येत नव्हतं, त्यात ती जे करत होती, ते त्यांना समजत नव्हतं.. हां, ’इश्श्य’चा मुरका मात्र झ्याक मारला तिने.. पण तोही सासूने ओळखला! सुरेश नुसताच बघत बसला होता! आठवूनही हसू आलं तिला..

"अगं ते नव्हतं का.. मुंगी ऊडाली आकाशी- मी आकाशात उडताना दाखवत होते.." ती हसतच म्हणाली..
"असंय होय.. मी म्हटलं ही अचानक हातवारे काय करायला लागलीये आणि.." सुरेशही तिची मस्करी करायला लागला..
"वैनी, मग गाढवाचं लग्न दाखवताना सुर्‍याकडे का नाही बोट केलंस? आम्ही लग्गेच ओळखलं असतं.."
"ए, माज्या लेकाला बोलायचं नाही हा काही.." सीमाच्या सासूने लेकाची बाजू घेतली..
एकूण वातावरण मोकळं झालं थोडं..

बाहेरची पंगत आटोपल्यावर आत सीमा, तिची सासू, नणंद आणि तिची मुलगी असे जेवायला बसले. नणंद कधीपासून याच संधीची वाट पहात होती.. हळूच ती म्हणाली,
"वैनी, आता पुढे काय करणार पैठणीचं?"
पुढे काय म्हणजे? सीमाला नणंदेचा रोखच समजला नाही.. "म्हणजे?"
"अगं म्हणजे, पैठणीची काय्काय निगा राखावी लागती, ठाऊके ना? बयो, मोलामहागाची साडी ही.. जपून ठेवावी लागती.. ब्लाऊजला अस्तर लागतंय, शिवाय घरी धुता येत नाही.. डरायक्लीन करावी लागती- पन्नास रुपये घील बघ तो.. शिवाय इस्तरी पाहिजे नेहेमी.."
सीमा विचारात पडली, " अगंबाई! हो की.. मी एवढा विचारच नव्हता केला.."
"तेच म्हणतेय मी.. पैठणी मिळवलीस खरी- नाही, त्याबद्दल कौतुकच आहे, पण टिकवाणं येरागबाळ्याचं काम नोहे!" नणंदेचा ठसका जोरातच होता..

सीमाच्या मात्र डोळ्यासमोर पैठणीचे खर्च उभे राहिले.. अस्तर, नेट, इस्त्री, ड्रायक्लीन.. एका साडीमागे एवढा खर्च! आणि एवढं करून कपाटाचीच धन! पण काही म्हणा, तिने ती पटकावलेली होती, तिचं बक्षिस होतं ते.. ती नाहीतर बाजारात जाऊन कधी पैठणी घेणार होती? पण हा पांढरा हत्ती सांभाळावा तरी कसा? कसेबसे पैसे पुरत होते.. त्यात आजच्यासारखं जेवण-बिवण घालायचं, सणवार, मुलांचे खर्च- सीमाच्या डोळ्यापुढे खर्चाचे आकडे फेर धरून नाचायला लागले..
नणंद हे सगळं हेरत होतीच.. तिने आपलं घोडं दामटवलं पुढे..
"मी काय म्हणते वैनी, माझ्या घरी आता बरेच कार्यक्रम आहेत.. मोठ्या भाऊजींकडे लग्न आहे, झालंच तर अजून एका पुतण्याच्या बायकोला सातवा चालू आहे.. ते डोहाळजेवण, बारसं असेलच.. तर मला दे की ही पैठणी.."
सीमा डोळे मोठे करून तिच्याकडे पहायला लागली, "अहो.. पण.."
"सीमे, दे की आक्कीला.. तू तरी कुठे मिरवणार हाईस? कार्यात कोरी साडी उठून दिसती.." सासूला लेकीची मागणी चूकीची वाटली नाही.
"आणि मी तरी नेहेमीसाठी कुठे मागत्ये? दोनचार वेळा नेसायला दे म्हटलं.. कार्यात नेसीन, आणि डरायक्लीन करून पुन्ना नव्यासारखी करून आणून देईन बघ.."

सीमा यावर काही विचार करणार, बोलणार इतक्यात सुरेश आत आला.."तुम्ही आजून पैठणीतच का? बास करा की आता ते खटलं.. आक्के, छोटी का रडतीये बघ जरा बाहेर अन सीमे, डबा करून दे उद्यासाठी पटकन. आत्ताच फोन आला होता.. शिर्डीला निघायचंय अर्जन्ट.. अर्ध्या तासात पोचायचंय पार्टीकडे.. उद्या परत यीन.."
"अहो पण, तुम्ही इतके दमलेले.. आज या गडबडीत झोप नाही झाली, की विश्रांती.."
"च्च! झोप काय, काढीन उद्या गाडीत. तसेही आजचे पैसे बुडले, आत्ता ड्यूटी मिळतेय तर खोटी करू नकोस. डबा दे चटकन.." असं म्हणत तो आंघोळीला गेलाही..

सीमाचं तोंड उतरलं.. सकाळपासून वाटणारा आनंद, उत्साह, पैठणी जिंकल्याचे क्षण या स्वप्नातल्या दुनियेतून खाडकन प्रखर वास्तवात आली ती. ’होम मिनिस्टर’ बनून काय तीर मारले? काय वाटलं, टीव्हीवर आलं की सगळ्यांची तोंडं बंद होतील? उलट घरातले जास्तच बोलतायेत- कोणी चिडवतायेत, कोणी हेवा करतायेत.. कोणी आडून, कोणी समोर.. कसली पैठणी अन काय! ती गंमत, तो आनंद तेवढ्यापुरताच.. आपल्यासारखी हातातोंडाची गाठ असलेल्यांसाठी नव्हे हे लाड. जी पैठणी मिळाली, त्यावर नणंदेचा डोळा, ते पैसे मिळाले, ते खातीरदारीत गेले.. नवरा करवादलाय, पोरं रडवेली होऊन झोपेला आलीत, कामाचा हा ढीग पडलाय.. दोन घटकेची विश्रांती आणि चार घटकेची विकतची उस्तवार!

जाऊदे, पैठणी असो कोणाला लखलाभ, पण आपल्याला ही साधी साडीच बरी असं म्हणत, घरातल्या आपल्या साध्या साडीवरून हात फिरवत एक सुस्कारा टाकत सीमाने देवाला नमस्कार केला. नेहेमीप्रमाणेच नवर्‍याला, पोरांना उदंड आयुष्याचं दान मागितलं आणि आजचं सगळं विसरून मनाला आवर घातला. मग तिने नुकत्याच घडी केलेल्या पैठणीवरून हात फिरवला, तिला एकदा डोळेभरून मनात साठवली आणि पिशवीत भरली. ती पिशवी तिने बाहेर नणंदेच्या सामानाशेजारी ठेवली आणि आत येऊन डबे धुंडाळू लागली. पीठ संपत आलं होतं आणि उद्या कारखान्यातून येताना भाजी आणायलाच हवी होती...

समाप्त.
(संपूर्णपणे काल्पनिक)

गुलमोहर: 

स्वप्नातल्या दुनियेतून खाडकन प्रखर वास्तवात आली ती.>>> ह्म्म्म ह्यातच खरा लोचा आहे गं! स्वप्नातल्या दुनियेत कसं स्वर्गात गेल्यासारख वाटतं Happy मला काय फार नाही आवडली ही कथा Sad कदाचित रिलेट नाही होऊ शकलो म्हणून असेल! असो आता बघतो ते हो. मि. बादवे कुठे लागतं? कधी?
बाकी रा. लो. नसावा!

एकदम मस्त!!
वेगळा विषय, सुबक बांधणी.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
-अनिता

सहीच कथा!!! एकदम वेगळी.
-----------------------
2b || !(2b)

मस्त जमली आहे कथा. आवडली एकदम. आतापर्यंत लिहिलेल्या सगळ्या कथामध्ये ही The best वाटली.
वरती कुणीतरी म्हटल आहे कि "मी मुळीच दिली नसती पैठणी". पण या म्हणायच्या गोष्टी झाल्या. मला खात्री आहे सीमाच्या जागी तुम्ही असता तर दिलीच असती पैठणी. Happy

कथा आवडली .. Happy मस्त उतरलं आहे सीमा चं कॅरॅक्टर .. पण भाषा एक दोन ठिकाणी जुळली नाही असं वाटलं .. म्हणजे एकसंध ग्रामीण बाज झाला नाहीये सगळ्यांच्या तोंडी असं वाटलं .. चू. भू. दे. घे .

पूनम छानच. काहीका असेना. काही क्षणापुरता तरी आदेश बांदेकरांनी सिमाच्या जीवनात आनंद निर्माण केला होममिनिस्टरच्या निमित्ताने.

पूनम,

कथा मस्तचं आहे. पण मला वाटते की तिने (म्हणजे कुठल्याही सामान्य स्त्री ने) ननंदेला नसती दिली पैठणी.

शरद

खुप खुप झक्कास जमलिय कथा..

वेगळा विषय. मस्त लिहिले आहेस.

वा वा आवडली. छान लिहीलस.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

पूनम, खूपच आवडली . छान, आणि अगदी सहज. डोळ्यांसमोर सगळं उभं केलंस.

सुंदर जमलीय ही पूनम!

मस्त गं वहीनी.. हटके विषय घेतलास की..
खरोखर पैठणी जिंकलेल्या बायकांना त्यांचे नंतरचे अनुभव विचारायला पाहिजेत.. बरेच बरेवाईट किस्से मिळतील ऐकायला..

पूनम, सुरेख कथा. किती बारकावे... उबाळे चाळ ह्या नावापासून, दोन कूकरच्या शिट्ट्या वगैरे सगळं. मस्तच. सीमाची व्यक्तीरेखा खरच इतकी स्पष्टं झालीये वाक्या वाक्यातून , स्वगतातून, इतरांच्या बोलण्यातून... की बस्स!
तो एक परिच्छेद - <<त्याचा उतरलेला चेहरा पाहून सीमाला कसंतरीच झालं.. ............. सगळा वेळ धबडग्यातच जातो.. मग कोणीतरी विचारलं की पटकन बोलून जायल होतंय..>>
ह्यातलं शेवटचं ते "मग कोणीतरी विचारलं की पटकन बोलून जायला होतय" वाक्यं.. इतकं म्हणजे इतकं सहज आणि "सीमाचं" आहे.. की.. आता काय सांगू?
पूनम, आपण फिदा!

अरे वा! एकदमच वेगळा विषय ... कथा आवडली Happy
पैठणीची दुसरी बाजू - म्हणजे अस्तराचं ब्लाऊज, घरी धुता येत नाही, ड्रायक्लिनींगचा खर्च ... सीमासारख्या गृहिणीच्या दृष्टिकोनातून एकदम बरोब्बर मुद्दा !!!
छानच!

~~~
पकाक पॅक पॅक पॅक पॅक

फार छान उतरलीय गोष्ट पूनम. कल्पनाच मस्त आहे एकदम.
मला "मीच"तुमची वहिदा" नावाची वपुंची गोष्ट आठवली.
>> नुसतं आपली सुमो आहे असं सांगायचं.
अगदी अगदी.

कथाबीज छानच आणि ते सुरेख फुलवलंय Happy

    ***
    "If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away." - हेन्री डेव्हिड थोरो

    मनापासून खूप खूप आभार सगळ्यांचेच.
    निम किंवा कमी उत्पन्न गटात येणार्‍या कुटुंबांचे आनंदाचे क्षण फार कमी असतात, कारण रोजची जगण्याची लढाई त्यांना विश्रांती घेऊच देत नाही Sad यातली अपरिहार्यता, असहायता व्यक्त करावी अशी इच्छा होती.
    कथा तुम्हाला आवडली, तुमच्यापर्यंत 'पोचली', खूप आनंद झाला. धन्यवाद. क लो अ Happy
    -----------------------------------
    शेवटी साथ नशीबाचीच!

    हलकंफूलकं अन तरीही दमदार कंटेंट! डिटेलिंग येऊनही ही 'दीर्घकथा' झाली नाही (किंवा त्याचा हव्यास टाळला) हे आवडलं, कारण असं सर्वांनाच जमत नाही.

    कथेतली पात्रं आजूबाजूलाच बघितलेली आहेतसं वाटणं, कथेतली स्थळे, भाषा, संवाद- हे आपले अन वास्तव वाटणं, त्या सर्वांशी स्वतःला कुठेतरी रिलेट करणं; हे कुठल्याही कथेचे यश, तसंच तुझ्याही.. Happy

    तुला अन सीमाला शुभेच्छा.. Happy

    --
    संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
    ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

    १००%

    खुप खुप खरी आणि खुपच सुंदर कथा झालीय पुनम.

    पूनम, खुप छान गं... हेच खरं रूप 'होम मिनिस्टर'चं.. एपिसोड म्हणजे नुसताच झगझगाट अन् दिखावा..

    खरच अगदी खरा खुरा प्रसंग. मस्त लिहीलयस, एकदम वेगळ.

    पूनम, परत एकदा सुंदर कथा. Happy

    हल्ली गुलमोहरावर परत यावस वाटतय. Happy
    --------------
    नंदिनी
    --------------

    अग्गोबाई हा विचारच नव्हता केला... पैठणी मिळालेल्या बाईबद्दल फक्त कौतुक किंवा हेवा वाटायचा पण किती घरांतून त्यांच्यासाठी कौतुक किंवा सहकार्य असेल? अगदी वेगळी कल्पना... (कदाचित काही घरांतील सत्यघटना...)

    नणंदेच्या बाबतीत तर मी पण भाग्यवान. नणंदच नाही. Happy >> आम्ही पण भाग्यवानांच्या लायनीत!!

    वरती कुणीतरी म्हटल आहे कि "मी मुळीच दिली नसती पैठणी". पण या म्हणायच्या गोष्टी झाल्या. मला खात्री आहे सीमाच्या जागी तुम्ही असता तर दिलीच असती पैठणी. Happy >> खरंय मला पण तसंच वाटतेय... या "समजुतदार"पणावर तर संसार टिकून असतो... सीमा खरंच खुप समजुतदार आहे... टिपीकल भारतीय नारीच्या स्वभावातिल बारकावे तिची स्वप्ने तिच्या आकांक्षा तिचं छोट्या छोट्या गोष्टींमधे समाधान मानणं...अगदी बारकव्यांसकट टिपलेय...

    म्हणजे पैठणीची निगा राखण्यासाठी लागणारे पैसे पण तेच देतील..>> Lol

    कित्तीही झालं तरी उद्याच्या भाजीची आणि आजच्या डब्याची चिंता कै सुटत नै.>> अगदी अगदी Happy

    थोड्क्यात काय... आनंदाचे क्षण धुंदपणे जगा...जसे मिळतील जेव्हा मिळतील जेवढे मिळतील... रहाटगाडगं तर चालु राहातच...

    dreamz_unlimited.jpg

    Pages