रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.
संपूर्ण वर्तक नगरमधे पुनर्विकासाचं पेवच फुटलंय असं म्हणायला हरकत नाही. जागोजागी इमारतींच्या सभोवताली लावलेले उंचच उंच पत्र्याचे आडोसे, दर शनिवारी, रविवारी किमान दोन ते तीन सोसायट्यांच्या मिटींगा, तक्रारी, भांडणं, मग पुढचा आठवडाभर त्याचीच चर्चा, बिल्डींग मिळवण्यासाठी बिल्डर्सची चढाओढ हे सगळं इतकं कॉमन झालंय तिकडे की, "हेच का ते ठिकाण जिथे आपण आपलं अर्धं आयुष्य काढलं", असं स्वत:लाच विचारावंसं वाटावं. दोन निरनिराळ्या इमारतींमधील लोक जर एकमेकांना भेटले, तर हल्ली "काय? कसं काय चाललंय?" असं विचरण्याऐवजी पहिला प्रश्न विचारतात - "काय मग? कुठला बिल्डर?"
प्रत्येकाच्याच मनात धाकधुक आहे, असणारच! बदल प्रत्येकालाच हवा असतो पण स्वत: कुठलेही कष्ट न घेता आणि आपलं नुकसान न होता! "आपल्या बिल्डींगचं काम होईल ना व्यवस्थित? बिल्डर फसवणार तर नाही ना! नक्की जास्त एरिया मिळेल ना! नवीन घराचा मेंटेनन्स परवडेल ना आपल्याला? कॉर्पस फंड किती मिळणार? किती दिवस भाड्याच्या घरात रहावं लागेल?" एक ना दोन, हजार प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनात. पण हे प्रश्न तोंड उघडून विचारावेत ही इच्छा मात्र फार कमी जणांकडे दिसली. बर्याच जणांचा सूर हा असतो की "सगळ्यांचं जे होईल तेच आपलं होईल". काही सोसायट्यांमधे तर सदस्य सर्वसाधारण सभांना नुसतं हजर रहाण्याचेही कष्ट घेत नाहीत. कारण काय? शेजारचे जातायंत ना! ते ज्याला "हो" म्हणतील त्याला आपणही "हो" म्हणायचं.
सर्वात वाईट या गोष्टीचं वाटलं की जो पुनर्विकासाशी संबंधित प्रश्न आणि शंका कमीटीला विचारतो त्याला "मोडता घालणारे, शाप देणारे" असं शेजारीच हिणवत असतात. पण आपल्याच घराचा पुनर्विकास एक त्रयस्थ व्यक्ती येऊन करणार आहे म्हटल्यावर थोडी जागरूकता नको का दाखवायला? पुनर्विकासाच्या काही बाबींमधे डोकावून पाहिलं आणि लक्षात आलं की वाटतं तितकं हे प्रकरण साधं सोपं नाही. "बिल्डर आपली बिल्डींग तोडून नवीन बांधणार आहे. तोपर्यंत आपण भाड्याच्या घरात रहायचं. भाडं बिल्डरच देणार. मग आपल्याला जुन्या घराच्या जागेवरच नवीन, मोठी जागा मिळणार आहे." या तीन-चार वाक्यांमधे घराचा संपूर्ण पुनर्विकास सामावलेला नाही आणि असलाच तर दोन वाक्यांमधील मोकळ्या जागेत बरंच काही घडतं जे आपल्याला माहित असणं हे शरिराला प्राणवायू आवश्यक असण्याइतकं आवश्यक आहे. "आंधळं दळतं नि कुत्रं पीठ खातं" या म्हणीनुसार सदस्यांनी या पुनर्विकासाच्या कामाकडे डोळेझाक केली तर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याचंही प्रत्यंतर लवकरच आलं.
मी माझ्या नजरेतून पाहिलेलं हे पुनर्विकासाचं काम क्रमाक्रमाने, जसं जमेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट इथे नमूद केल्याशिवाय मला आजचा लेख संपवता येणार नाही. पुनर्विकासासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी "लॅन्डगुरूज" या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची मदत घेतली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे.
पुनर्विकास प्रक्रियेसंबंधी अधिक जाणून घेण्याकरिता 9920028859 या क्रमांकावर संपर्क साधावा.
पुनर्विकास खरच किचकट असते,
पुनर्विकास खरच किचकट असते, आपलं राहं घर पाडून तिथे नवीन घर होऊन त्याचा ताबा मिळेपर्यंत धाकधूक असतेच, त्यात नवीन घराचे काम वेळेतच होईल याची खात्री नसते. त्यामुळे अशा गोष्टींचा निर्णय विचार करुन घ्यायला हवे हे अगदी बरोबर. चांगली माहिती दिलीत, धन्यवाद.
पुण्यातही आपण मदत करू शकता का
पुण्यातही आपण मदत करू शकता का ? धन्स माहिती दिल्याबद्दल
अगदी याच विषयावर मलाही बरेच
अगदी याच विषयावर मलाही बरेच प्रश्न आहेत. वर दिलेला नंबर तुमचाच आहे का कांचन? तो बरोबर आहे का कारण ११ नंबर्स दिसताहेत ...
कांचन तुझ्या ब्लॉगवरची सगळीच
कांचन तुझ्या ब्लॉगवरची सगळीच लेखमाला इथे लिहिणारेस का? फार बरं होईल.
हे तुझे लेख आमच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं जे सोसायटीतले लोक बघतायत त्यांना वाचायला दिले प्रिंट आउट काढून तर चालतील का?
या लिंकवर 'वारेन बफे सारख्या
या लिंकवर 'वारेन बफे सारख्या गर्भश्रीमंताच्या घराची माहिती वाचा ...
http://globalmarathi.com/20110717/4896452681162222606.htm