भर दुपारचे साडेबारा झालेले. विद्या खरेदी करून दमलेली. उन्हाळ्याचे दिवस. खरंतर कधी एकदा घरी जाते असं तिला झालं होतं, पण आज बायजाक्काकडे जायचं ठरलं होतं. त्यामुळे घरी जायला संध्याकाळ होणार हे नक्की होतं. मंडई-लक्ष्मी रोड-तुळशीबाग करून हातातल्या खरेदीच्या पिशव्या गाडीवर टाकत तिने नारायणपेठेच्या गल्लीकडे गाडी वळवली.
बायजाक्काच्या इमारतीपाशी अजूनही जिन्याखालची जागा मिळाली तर पार्किंगची सोय होईल ३-४ तासांची, नाहीतर पार कुठेतरी गाडी लावून परत पायपीट करावी लागेल असा विचार करत विद्या इमारतीपाशी पोचली. जिन्याखालची जागा ही तिची हक्काची सायकल लावायची जागा होती ८ वर्षांपूर्वी. "ही पोर माझ्याकडे ४ घास खायला येते, तिची सायकल तेवढा वेळ जिन्याखालीच राहील. तिचं गिळून होईपरेंत कोणीही पार्किंगसाठी बोंब मारायची नाही" असं बायजाक्काने स्वतः सोसायटीच्या मीटिंगमधे त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं म्हणे!
आणि नवल म्हणजे आत्ताही कशी कोण जाणे, ती जागा मोकळी होती. पण यावेळी बाजूच्या सोसायटीच्या ऑफिसमधे जाऊन रीतसर परवानगी घेऊन विद्याने गाडी लावली नि वर आली. बेल वाजवल्यावर बायजाक्कानेच दार उघडलं नि विद्याला पाहून ती आनंदाने हसली.
"आलीस का! ये गो पोरी!"
"अगं आलीस का काय! येणारच तर होते की! फोन नव्हता का केला २ दिवसांपूर्वी तुला!"
"ते झालंच गं, पण हल्ली लोक येतो-येतो म्हणतात, येत मात्र नाहीत... खात्री वाटेना म्हणून म्हटलं हो! रागवू नकोस हां"
ही नक्की बायजाक्काच बोलतेय की दुसरं कोणी... नाही म्हटलं तरी विद्या क्षणभर गोंधळलीच. एरवी फटकळ म्हणण्याइतपत स्पष्टवक्ती होती आक्का, दुसर्याला राग आलाच तरी पर्वा नसे तिला...
"ये. हात-पाय धू. गुळाचा खडा घे डब्यातून. आणि वाळ्याचं सरबत केलंय माठातल्या पाण्याचं... पिऊया दोघी मिळून!"
अजून एक धक्का! इतक्या प्रसन्नपणे बोलतेय ही! आणि माठातलं पाणी..अजून लक्षात आहे हिच्या!
झर्र्कन विद्याला ८-९ वर्षांपूर्वीचं सगळं आठवलं. कोकणातून आलेली १५-१६ वर्षांची मुलगी होती ती तेव्हा. पुण्यात आली तेव्हा घरगुती मेस शोधताना बायजाक्काची मेस समजली होती. "बाई जरा फटकळ आहेत, पण आहो जेवण अगदी छान असतं. थोडं कान बंद करायला सांगा मुलीला, म्हणजे जेवण सुखात जाईल" असा सल्ला खोलीच्या मालकीणबाईंनीच दिला होता. तो प्रमाण मानून, आपण बरं की अभ्यास बरा अशी वृत्ती ठेवून विद्या बायजाक्काकडे जायला लागली होती जेवायला.
कोकणातली म्हणून की काय कोण जाणे, आक्का तिच्यावर भारी माया करी. आक्काही मूळची को़कणातलीच होती. तिच्या सवयी आक्काने बरोबर टिपल्या होत्या आणि ती जपत होती. माठातलं पाणी, उन्हातून आली तर गुळाचा चिंचोक्याएवढा खडा हवासा वाटणं, गोड शिर्याबरोबर लोणचं खायची सवय.. बरंच कौतुक करे बायजाक्का. विद्याला वाटे, इतक्या सगळ्या मेंबर्समधे मीच लहान, मग घरची आठवण येऊ नये म्हणून बायजाक्का करत असेल एवढं सगळं. पण तिच्या अफाट तोंडापुढे विद्याने तिला कधी विचारलं नाही. न जाणो, "करतेय ना मी! मग करून घे मुकाट्याने!"असं म्हणाली असती तर काय घ्या, म्हणून विद्या काही बोलत नव्हती. सुरुवातीला विद्याने तिला "अहो बायजाक्का" अशी हाक मारली. त्यावर "अहो म्हणायला मी तुझी सासु आहे की मास्तरीण?" असा प्रश्न आल्यावर नुसतंच "बायजाक्का" अशी हाक मारायला विद्याने सुरुवात केली. शक्यतो अहो किंवा अगं संबोधायची वेळ येणार नाही असं बोलायला शिकली ती...
......"येत्येस ना गं? सरबत आणलंय मी बाहेरच्या टेबलावर"
विद्या भानावर आली. खरं म्हणजे लग्नाचं आमंत्रण द्यायचं म्हणून ती आली होती, आणि "यायचं तर जेवायला ये. न पेक्षा पोष्टाने पाठव पत्रिका, मी उलटटपाली अक्षता धाडून देईन" असा आहेर आधीच मिळाल्यावर "जाउदेत! ३-४ तास कान बंद करून बसू" असं ठरवून ती आली होती आज. लोक का येत नसतील हिच्याकडे याचा अंदाज आला होताच नाहीतरी.
सरबत घेत असताना गप्पा सुरु झाल्या. नाही म्हटलं तरी ८ वर्षं झाली होती याआधीचं भेटून. मधल्या काळात बरंच काही घडलं होतं. आता समीरदादा-स्मितावहिनी पण इथेच वरच्या मजल्यावर रहातात हे नव्याने समजलं. पूर्वी समीरदादा गुजरातेत कुठेशी होता नोकरीला. आता इथे बदलून आलाय, आणि स्मितावहिनी मूक-बधीर शाळेत शिकवते, हेही नवीनच होतं.
"तुझ्याशी जरा बोलायचं होतं.." थोड्या वेळाने जेवणं झाल्यावर जरा अडखळतच आक्का म्हणाली.
"बोल की! त्यात काय!" वरकरणी सहज, पण मनातून जरा धसकूनच विद्या म्हणाली.
"तुला सतत वाटे ना, की मी फक्त तुलाच एकेरी नावाने हाक का मारायला लावली.... तुझ्या सगळ्या सवयी का लक्षात ठेवल्या... आणि फटकळपणा न सोडताही, तुझ्याशीच जास्त मायेने का वागले?"
" हो..."
" अगं घाबरू नको...आता मी काही उलटसुलट बोलायची नाही..मगाशी तुझ्याशी बोलायचंय म्हटलं तेव्हा मनातून जरा धसकली आहेस ते मी ताडलंय."
विद्या गप्प.
"आज तुला सगळं सांगेन म्हणते. मी मूळची चिपळूणातली. तुझ्या आजोळगावची. तुझ्याकडूनच एक-दोनदा चिपळूणचा उल्लेख ऐकला होता.
माझं लग्न झालं तेव्हा मी होते वीस वर्षांची नि समीरची वडील तीस वर्षांचे. देखणे, रसिक, आणि नोकरीबिकरीत स्थिरावलेले होते. बाकी नाही म्हणावंसं नव्हतं काही. झालं लग्न आमचं. त्यांना एकच आवड होती, गाणी ऐकायची. सिनेमातली नव्हे, आ-आ-ऊ-ऊ असतं ना...शास्त्रीय का काय ते..त्याची! सतत कुठे ना कुठे गाणी ऐकायला जात. बाकी तसा काही त्रास नव्हता, पण आपण लग्न करून एक जिवंत बाई घरात बायको म्हणून आणली आहे हे कधीच समजलं नाही त्यांना. पगार सगळा माझ्या हातात देत. कधी सामानाची यादी दिली तर सामान आणत. सणावाराच्या दिवशी नवे कपडे घेत, नातेवाईकांना भेटायला नेत. माझ्या माहेरचेही असत त्यात. पण बाकी संवाद शून्य! एवढे रसिक होते, की वाड्यातल्या खिडक्यांना पडदे लावले तर शेजारी कुजबुजत त्या काळी ह्यांनी मलमलच्या कापडाचे पडदे शिवून घेतले होते नाटक कंपनीच्या शिंप्याकडून! पण...आता काय सांगू तुला! लग्नाची मुलगी तू..लहान नाहीस म्हणून सांगते... कधी चुकूनसुद्धा पडदा जरा ओढून मला जवळ घेतलनी नाही हो! ते जाऊदेतच, पण कधी केल्या पदार्थाचं कौतुकही नाही केलनी! आल्यागेल्याशी हसून बोलत, माझ्याकडे बघायचं मात्र टाळत.
एकदा मात्र मी सोक्षमोक्ष लावायचा म्हणून विचारलं, की काय पाप केलं म्हणून मला असं दूर ठेवता! बोलतही नाही माझ्याशी! अहो पसंत नव्हते तर केलंत कशाला लग्न! तुम्ही काय, नाही म्हटलं असतंत तर दुसर्या एखाद्या स्थळाला होकार दिला असता मी! आहे तरी काय तुमच्या मनात! की दुसरीकडे कुठे गुंतला आहात अगोदरच!
हे ऐकल्यावरही हे बोलले नाहीत. शेवटी सासुची शपथ घातली तेव्हा तोंड उघडलनी! म्हणतात कसे, की तुझ्याशी काही उभा दावा नाही माझा. ती एक अमकीतमकी बाई आहे, गळ्यात सूर आहे तिच्या, तिच्याशी घरोबा करायचा होता. पण अगोदर तात्यांनी, म्हणजे सासरे हो माझे- विरोध केला, मग म्हणे त्या बाईला हे सांगायचं धाडस नाही झालं माझं. प्रेम बिम काय ते तिच्यावर केलं, तुझ्यावर करायला काही उरलं नाही म्हणाले!
उभी कोसळले मी! काय करावं सुचेना! हा कसला संसार! दोन माणसं एका छताखाली रहात होतो झालं! अशीच २ वर्षं झाली. तात्या नि माई आडून आडून विचारत, आता नातवंड बघायचंय म्हणून! भली माणसं होती दोघं. माईला कुणकुण होतीच, मला एक दिवस जवळ घेऊन म्ह्णाली, मी आई आहे तुझी असं समजून बोल. अगदी मोकळी हो! आणि मग मी सांगून टाकलं तिला सगळं.
सगळा प्रकार ऐकून तिचा तिळपापड झाला. मनाशी काहीतरी ठरवून ती तिरीमिरीत ह्यांच्या खोलीत गेली नि बराच वेळ कायतरी बोलली ह्यांना. पुढे काय झालं माहिती नाही, पण मला म्हणाली, तुझी कूस उजवेल हो पोरी!
आणि अशातच एक दिवस मला नवं कोरं पातळ देऊन माई म्हणाली, आज तुझ्यासाठी सण आहे... मी काय ते समजले. दिवसभर नुसती फुलपाखरासारखी भिरभिरत होते. हे पण जरा बरे दिसत होते. रात्री जेवणं झाल्यावर थोडी घाबरतच मी वरच्या खोलीत गेले. काळोखात ह्यांची चाहूल लागली मला आणि जाणवलं की हे खूप जवळ उभे आहेत...
पोरी, नवरा कसा असतो हे २ वर्षांनी समजलं मला! पुढचे काही दिवस मी या जगात नसल्यासारखी झाले होते! माझ्यातच मश्गूल होते! थोड्या दिवसांनी समीर झाला. कौतुकच कौतुक!
माझ्या गरोदरपणातही हे अलिप्तच होते. पण समीरला बघून मात्र जरा खुष दिसत होते. वेळ मिळाला की समीरला खेळवत. बाहेर घेऊन जात. तोही गाण्याच्या मागे लागू नये याची मात्र मी सुरुवातीपासून काळजी घेत होते. पण हा आनंद अगदी थोडे दिवसच टिकला. कसे कोण जाणे, हे समीरपासूनही लांब राहू लागले. अगदीच घुम्यासारखे वावरायला लागले. मला काळजी वाटायला लागली. गावाहून माई आली तेव्हा मी तिला हे सांगितलं. माई विचारांत हरवली. तिच्या चेहृयावर काळजी दाटून आली. म्हणाली, पोरी, मी तुला दु:खात ढकलेली गो! मला आधी क्षमा कर...
माईला असं बोलताना बघून मला काही कळेना. माई म्हणाली, "काय सांगू तुला! तुझ्या नवर्याला मी चांगलं सुनावलं होतं, तू मला खरा प्रकार सांगितल्यावर. बरंच काय काय ऐकवलं होतं त्याला. तोही कधी नव्हे ते मला बरंच उलटसुलट बोलला होता त्यावेळी, पण मी म्हटलं होतं, की सुनबाईची कूस उजवलीच पाहिजे! एकतरी नातवंड हवंय मला. नात असो की नातू...नि त्यावेळी याने मला काहीतरी अभद्र ऐकवलन होतं...मूल व्हायला काय नवराच हवा असं नाही.... दीरपण चालेल म्हणून... तिला मूल झाल्याशी कारण!"
विद्या, अगो पुढचं काही मला ऐकू येईना. फक्त मला खोलीतल्या काळोखाचा उलगडा झाला! रोज मी यायच्या आत हे काळोख का करून ठेवत ते समजलं मला! अगो समीर त्याच्या काकापासून झाला मला!"
बायजाक्काचं बोलणं ऐकून विद्याला घाम फुटला. एक तर हे सगळं आक्का आपल्यालाच का सांगतेय...तेही आपण लग्नाचंच आमंत्रण द्यायला आलो तेव्हाच का सांगतेय...काही म्हणता काही कळेना! बरं ऐकतोय ते खरं, की सिनेमा किंवा कादंबरीची नायिका आपलं दु:ख सांगतेय.. असंही तिला वाटून गेलं. असं काहीतरी घडत असेल जगात हे तिला माहिती होतं, पण त्याचा बळी गेलेलं कोणीतरी ती आज पहिल्यांदा बघत होती. तेही इतकं जवळचं माणूस... जिच्या हातचं जेवण विद्या ३ वर्षं जेवली ती आक्का..... छे!!
विद्याच्या मनातली घालमेल आक्काने ओळखली. पण तिला आता सगळं बोलून टाकायचं होतं. विद्याने एकदा आक्काकडे बघितलं, आणि एकदम मऊपणा आला तिच्या बोलण्यात. आक्काचा हात हलकेच धरून म्हणाली, "आक्का, बोल गं... ऐकतेय ना मी!"
आक्काला जरा हायसं वाटलं. तिने पुढचं सांगायला सुरुवात केली.
"झाल्या प्रकाराने मला जीव नकोसा झाला होता. स्वतःचीच शरम वाटत होती. तात्यांना हा प्रकार समजला तेव्हा त्यांना धक्का बसला नि अर्धांगवायू होऊन ते अंथरुणाला खिळले. माईनेही हाय खाल्ली. हे सगळं बघत होते. एक दिवस मी न रहावून ह्यांना बोल बोल बोलले. कोण कुठली ती गाणारी, तिच्या प्रमात पडले, बरं हे तिला सांगायचंही धाडस केलनी नाही, नि वर त्यापायी माझा बळी दिला! एवढं होऊन भागलं नाही तो आता जन्मदात्यांचाही बळी जातोय...
कसं कोण जाणे, ह्यांनी तात्या आणि माईजवळ जाऊन त्यांची माफी मागितली. माझ्याजवळ येऊन माझी माफी मागितली. डोळ्यांत अपराधीपणा दिसत होता. तात्या म्हणाले, आमचं काय उरलंय आता...त्या पोरीच्या मनाशी खेळ केलायस तो निस्तर आता!
आणि मग हे सुधारले हळूहळू... जरा माणसांत आल्यासारखे वागायला लागले. ३-४ वर्षं गेली मधे. मीही हळूहळू सावरत होते. माझा तो दीर... तो कुठेतरी लांबच्या गावी नोकरीला असे, तिथून थेट परदेशीच गेला म्हणे! मधल्या काळात ह्यांनाही संसाराचा अर्थ समजला होता. समीरला आता त्यांनी स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारलं होतं. मला पुन्हा एकदा दिवस गेले नि या वेळी मुलगी झाली मला. तीच प्रभा. अगदी ह्यांच्यावर गेली दिसायला.
विद्या, आम्ही हे सगळं बरीच वर्षं समीर-प्रभीपासून लपवून ठेवलं होतं. निष्पाप पोरं ती, त्यांना कशाला नसते भोग! बरं जे घडलं ते आम्हा चौघांशिवाय कोणाला माहितीही नव्हतं! जो पाचवा होता तो दीर, तो गेला परदेशी निघून, नि अंबाबाईची कृपा म्हण... नंतर त्याने कधी त्रास नाही दिलान आम्हाला यावरून. तात्या-माई थकले होते, तेही वर्षभराच्या अंतराने गेले! आमचा संसार नीट चाललाय हे त्यांना मरताना तरी का होईना, बघायला मिळालं हे त्यातल्यात्यात समाधान!
जरा स्थिरावत होते मी...आणि एक दिवस हे बाहेरून येत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला नि ते मला एकटीला सोडून गेले. समीर १५ वर्षांचा नि प्रभी १०ची.
समोर आयुष्यात नुसता अंधार दिसत होता. पण माहेरच्यांनी सावरलं. मी मेस सुरू केली. समीरच्या जन्माचं रहस्य माहेरी कोणाला माहिती नव्हतं, पण एक दिवस भावासाठी खोली रिकामी करताना तात्यांनी ह्यांना लिहिलेलं कुठलंसं पत्र, ज्यात तो उल्लेख होता, ते माझ्या भावाने बघितलं. सगळंच संपलं त्या दिवशी.
अगदी सिनेमा-नाटकात होतं ना, तसंच झालं बघ माझ्याही बाबतीत. माझ्या भावाकडून ते समीर आणि प्रभीला समजलं. दोन्ही पोरं- त्यात समीर जास्त- दुरावली मला. प्रभी तरी लहान होती, पण समीर तर अगदी अडनिड्या वयात! तो तर जास्तच घुसमटला! पुढे वर्षभराने एसएससी झाल्यावर हॉस्टेलवरच गेला रहायला!
प्रभी मात्र कितीही रागावली तरी फारसं काही कळायचं तिचं वय नव्हतं. ती माझ्याजवळ राहिली. पुढे मग जरा मोठी झाली तेव्हा मीच तिला सगळं सांगून टाकलं. मला आता कोणाचंच काही बाकी ठेवायचं नव्हतं. कुठलाही भार सहन करायची शक्तीच उरली नव्हती माझ्यात.
समीर चांगला शिकला नि गुजरातेतल्या कुठल्याश्या कंपनीत नोकरी मिळाली त्याला. काळ हे सगळ्यावरचं औषध असतं ना! हळूहळू त्यालाही माझी त्या वेळची अवस्था काय झाली असेल ते समजलं नि तोही नीट बोलायला लागला. प्रभी मोठी होत होती. तिलाही हळूहळू समज येत होती. पुन्हा एकदा सगळं निवायला लागलं.
समीरने गुजराती मुलीशी लग्न केलं. सून खूप गुणी आहे माझी. तिला सगळं सांगितलंय समीरने. पण हाडाची सालस आहे ती! चांगलं आहे सगळं. आणि प्रभीपण मजेत आहे संसारात तिच्या. माझी नातवंड येऊन जाऊन असतात माझ्याकडे. मोठी झाली आहेत नि शाळेत जातात आता ती.
विद्या, तुला वाटेल एवढं सगळं मी तुला का सांगत बसले! तेही तुझं लग्न जवळ आलेलं असताना...
पण तुझ्याबद्दल माया वाटली. तू विसरली असशील पण माझ्या लक्षात आहे.
तू जेव्हा इथे आलीस तेव्हा समीर-स्मिता गुजरातला होते. मेसमधे येणार्या मेंबर्सना इतिहास माहिती असायचं काही कारण नव्हतं, पण कोणालातरी काहीतरी कमी-जास्त समजलं होतं. तुला त्यावेळी एकाने सांगितलं होतं, बायजाक्का म्हणजे चारित्र्याची चांगली बाई नाही... खालच्या पोतदारांनी हे ऐकलं होतं नि त्यावरचं तुझं बोलणंही ऐकलं होतं. लहान असूनही तू त्या माणसाला चार खडे बोल सुनावलेस हे पोतदार वहिनी बोलल्या होत्या मला. तुझ्याबद्द्ल मत चांगलं होत गेलं माझं. बाकीचे लोक माझ्या फटकळ बोलण्याला कंटाळून वर्षभरात दुसरी मेस बघत, पण तू ३ वर्षं न कुरकुरता राहिलीस माझ्या हातचं खायला...
तुझ्यात मला कधीतरी माईचा भास होई. तू आलीस तेव्हा तूही अडनिड्या वयातली कोवळी लहान पोर होतीस...घर सोडून गेलेल्या माझ्या समीरएवढी असशील... आठ्वण येई मला त्याची! पण म्हणून तुला फक्त जपलं मी. फटकळपणा तर काय! तो सुटायची शक्यता नव्हती. अगो एवढं भोगल्यावर नि फसवणूक झाल्यावर मी कधीच कोणाशी सरळ बोलले नाही. ह्यांच्या मनात जरी नंतर माझ्याबद्द्ल माया आली असेल तरी जे घडलं होतं ते पुसता येत नव्हतं ना!
फसवणुकीनंतर कसाबसा फुललेला संसार, ह्यांच्या मनातली अपराधीपणाची जाणीव, तात्या-माईचं शेवटचं आजारपण, आणि जरा कुठे स्थिरावतोय तर ह्यांचं जाणं नि माझा समीर माझ्यापासून लांब जाणं... किती सोसावं गं!
आता आयुष्य सरत आलं बघ! काही इच्छा नाही उरली आता. एकदा फक्त वाटलं होतं, की तुला पुरण-वरणाचं जेवण करून तुझं केळवण करावं... गुळाचा खडा, माठातलं पाणी, वाळ्याचं सरबत...तुला माहितेय? सगळ्या सवयी होत्या माईला! तुला हे करताना बघितलं की माईच यायची डोळ्यासमोर! त्यात बाकी कुणापेक्षा तूच जास्त होतीस ना जेवयाला इथे! म्हणून जास्त आपली वाटायचीस मला. माई सासू होती माझी, पण मला म्हणायची, अहो माई नको, अगं माई म्हण.. तू अहो म्हटलेलं मला नको होतं ते यासाठीच!
एकदा तू जांभळ्या रंगाचा ड्रेस घालून आली होतीस वाढदिवसाला. मेसमधे येणारं कोणी कधी माझ्या पाया पडलं नाही. तशी अपेक्षाही नव्हती म्हणा! पण तू मात्र त्यादिवशी येऊन देवघरातल्या देवाला नि मग मला नमस्कार केलास....मला वाटलं माझी माईच आली आहे जांभळं लुगडं नेसून...
विद्या, पोरी, काही कमी-अधिक बोलले असेन तर रागवू नकोस हो माझ्यावर!"
बायजाक्का बोलायची थांबली. विद्याला हे सगळं ऐकतानाच प्रचंड मानसिक थकवा आला होता. ग्लासातलं पाणी पिऊन तिने डोळे मिटले. आक्काही उठून डोळे पुसून आली. येताना परत एकदा सरबताचे ग्लास घेऊन आली.
इतके दिवस फटकळ, काहीशी विक्षिप्त वाटणारी बायजाक्का इतकी मायाळू असेल याचा विचारही आपल्या मनात कसा नाही आला असं विद्याला सारखं वाटत होतं!
"बाळा, हे सगळं तुला लग्नाच्याच वेळी सांगायचं नव्हतं मला. पण अगोदर भेटली नाहीस, आणि माझे किती दिवस उरलेत काय माहिती.... म्हणून आत्ता सांगितलं. सुखी हो गं पोरी! तुला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही! माझे आशीर्वाद आहेत तुला!"
दुपारचे ४ वाजले होते. सगळी खरेदी घेऊन, मधे सारंगला भेटून थोडी कामं करून खोलीवर परतायचं होतं तिला. लग्न झालं की सारंगला घेऊन यायला हवं परत..ती मनाशी म्हणाली..
"आणि आता जावईबापूंना घेऊन ये! पुढच्या वेळी जोडीने पाया पडायला या"
बायजाक्का स्वयंपाकघरातून कुंकवाचा करंडा घेऊन येत म्हणाली तशी विद्या केव्ढ्यांदातरी दचकली! तिच्या मनात जे होतं तेच बायजाक्का म्हणत होती!
तिने जाताना आक्काला वाकून नमस्कार केला. लग्न महिन्यावर आलं होतं, नि विद्या थोडे दिवसांनी गावी जाणार होती परत. लग्नाला नक्की ये असं तीनतीनदा सांगून, फोन नंबर देऊन ती निघून गेली.
गावी जायच्या आदल्या दिवशी तिला अनोळखी नंबरवरून फोन आला. उचलला तर पलिकडून समीरदादा बोलत होता. "आई गेली, उद्या १०वा दिवस आहे. आईची इच्छा होती की तू १०व्याला यावंस. तुझ्यासाठी काहीतरी दिलंय आईने. तुझा हा नंबर आईनेच दिला मला..."
विद्याला हे अनपेक्षित होतं. उद्या ती सकाळच्या गाडीने निघायची होती, तो बेत बदलून तिने संध्याकाळी येते असं घरी कळवलं. सकाळी ती आक्काच्या घरी गेली. फार काही धार्मिक विधी झालेले नसावेत...
स्मितावहिनीने दार उघडलं. थोडंफार औपचारिक बोलणं झालं. बायजाक्काची शुगर अचानक वाढली, आणि मग तब्येत अचानक खूपच बिघडली. हे सगळं झालं विद्या येऊन गेल्यावर १-२ दिवसांत. सारखी तिचीच आठवण काढत होती...पण आपल्याला वरचं बोलावणं आलंय हे ओळखून म्हणाली होती, विद्याला १०व्यालाच बोलवा, आधी काही सांगू नका म्हणून! शेवटची इच्छा म्हणून बायजाक्काने तिच्या कपाटातलं माईचं जांभळं लुगडं मागवलं नि ते नीट पॅक करायला लावून विद्याला आशीर्वाद म्हणून द्या असं सांगितलं.
विद्याने ते लुगडं हातात घेऊन घट्ट कवटाळलं.... एवढ्या वर्षांनी बायजाक्का भेटते काय नी पुन्हा कधी भेट होणार नाही अशी ठिकाणी जाताना मायेचा धागा जोडून जाते काय!
जड पावलांनी विद्या खाली आली. खिडकीतून बायजाक्का बघत असेल असं तिला उगीचच वाटून गेलं. तिने वर पाहिलं, पहिल्यांदाच भेटलेली स्मितावहिनी तिला, "पुन्हा ये गं..." म्हणत होती...अगदी बायजाक्काच्याच जागी बसून!
********************************************************************
कथा वगैरे कधी लिहिली नाहिये. ही पहिलीच.
छान लिहिलीयस, आवडली.
छान लिहिलीयस, आवडली.
पुलेशु
पुलेशु
मस्तच ग... आवडली....नी
मस्तच ग...
आवडली....नी भिडलीही.....
शुभेच्छा,
सावरी
मस्तच गं प्रज्ञा, आवडली. खूप
मस्तच गं प्रज्ञा, आवडली.
खूप दिवसांनी रत्नागिरीची भाषा वाचायला मजा आली.
एक अगदी जवळंचं रिअल लाईफ उदाहरण आहे माझ्या पाहाण्यात त्यामुळे ही गोष्ट अजिबातच अतर्क्य वाटत नाही.
खुप खुप आवडली, आणि मनाला
खुप खुप आवडली, आणि मनाला भिडली देखील ...
वाचताना सगळ डोळ्यासमोर घडतय असच वाटत होत.
आवडली !!!!
आवडली !!!!
जुई यांच्याशी सहमत! कथा फार
जुई यांच्याशी सहमत!
कथा फार आवडली. सुंदर कथानक आणि सुंदर लेखन!
अभिनंदन प्रज्ञा!
-'बेफिकीर'!
मस्त कथा आवडली गं
मस्त कथा आवडली गं
उत्तम कथानुभव आणि सुरेख लेखन.
उत्तम कथानुभव आणि सुरेख लेखन. खरं वाटत नाही हे पहिलं लिखाण आहे. पु.ले.शु.
आवडली.
आवडली.
छान आहे आवडली.
छान आहे आवडली.
छानच.
छानच.
छान कथा
छान कथा
प्रज्ञा, चांगली लिहिली आहेस,
प्रज्ञा, चांगली लिहिली आहेस, गं. कथाबीज छान फुलवलयस. आता पुढले लेख, कथा येऊदेत, वाट बघतो.
आवडली.
आवडली.
छान लिहिली आहेस कथा प्रज्ञा.
छान लिहिली आहेस कथा प्रज्ञा. खूप आवडली.
मस्तच!
मस्तच!
छान लिहिलंय . बायजाक्का अगदी
छान लिहिलंय . बायजाक्का अगदी डोळ्यापुढे उभी राहिली .
अगदी सहज मनाला भिडत जाणारी
अगदी सहज मनाला भिडत जाणारी आणि संपता संपता डोळ्यांच्या कडा ओलावणारी!
खूप आवडली.
चांगली जमली आहे कथा. आवडली!
चांगली जमली आहे कथा. आवडली!
सगळ्यांचे मनापासून आभार!
सगळ्यांचे मनापासून आभार!
आत्तापर्यंत ललित लिहिलं होतं, पण ते अर्थातच स्वानुभवकथन होतं. मांडणी थोडीशी जमते आता, पण काल्पनिक कथाबीज घेऊन ते फुलवायला जमेल का शंका होती. पाल्हाळ न लावता, तपशिलात न चुकता, वाचताना कंटाळवाणी होणार नाही अशी कथा लिहिण्याचा प्रयत्न करायचा होता.
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांवरून तो प्रयत्न थोडातरी जमलाय हे बघून मलाच बरं वाटतंय. प्रोत्साहनासाठी पुन्हा आभार.
आवडली
आवडली
अतिशय ओघवती आणि सुरेख
अतिशय ओघवती आणि सुरेख कथा..
आवडली.
मस्त लिहिलं आहेत. पहिल्यांदाच
मस्त लिहिलं आहेत. पहिल्यांदाच लिहिताय असं अजिबात वाटलं नाही. कथानकाची मांडणी उत्तम.
पु.ले.शु.
वरील सगळ्यांशीच सहमत !
वरील सगळ्यांशीच सहमत !
तुम्ही फार कसदार लिहू शकता. पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
मला कथेचे शीर्षक फार आवडले.
प्रज्ञा, छान लिहिलंय. असंच
प्रज्ञा, छान लिहिलंय.
असंच लिहित रहा म्हणजे मलाही उत्खनन करायला नको
प्रज्ञा, मस्त लिहिलंयस. छान
प्रज्ञा, मस्त लिहिलंयस. छान ओघ आणि कथेतले संवादही अगदी सहज-अकृत्रिम आहेत.
छान लिहिलीयेस गं. कथानक छान
छान लिहिलीयेस गं. कथानक छान खुलवता आलयं. मनावर घेऊन अजून येऊ दे. पु. ले. शु
छानच लिहिलीयस,आवडली
छानच लिहिलीयस,आवडली
आवडली.
आवडली.
Pages