क्षणभराची सौभाग्यकांक्षिणी ---- कथा--- जयनीत दीक्षित

Submitted by जयनीत on 4 July, 2011 - 08:18

बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता.
तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या.
तिच्या स्वता: बद्दलच्या संवेदना आता संपल्यातच जमा होत्या. ज्या ही घात, अपघाता मुळे ती इथे पोहोचली होती त्याच्या बद्दलच दुखः ही उगाळून उगाळून संपून गेलं होते.
आता ती इथलीच एक होऊन गेली होती. मागचं आयुष्य विसरुन ती हळूहळू इथल्या जीवनात रमु लागली होती. इथली मैत्री, स्पर्धा, भांडणं, मारामा-या, ह्या सगळ्या सवयीच्या झाल्या होत्या.
तरीही ती वेगळीच होती, ग्राहकांना पटवण्या, गटवण्याच्या स्पर्धेत ती फार मागे राहायची. ते रंग ढंग अजून तिच्यात पूर्णपणे उतरायचे होते, ती इथे चुकून तर आली नाही ना? असे ही अनेकांना पहील्यांदा वाटायचे. बाकीच्या तिला गमतीने ताई आणि आपा म्हणायच्या. दलालांची ही तिच्याशी वर्तणूक आदर पूर्वकच असायची.
जरी ही तिने ग्राहक गटवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कधी भाग घेतला नसला तरी ही काही लोकांना मात्र तीच हवी असायची. एकूण तिचे बरे चालले होते.
तसल्याही परीस्थित ती आनंदाने जगण्याचा प्रयत्न करीत होती.
लग्न करून संसार करण्याची तिची इच्छा अपूर्णच राहिली होती. आता ती कधी ही पूर्ण होऊ शकणार नाही हे तिला माहित होते. तरी ही तरी ही एक दिवस, फक्त एक तरी दिवस तिला लग्न झालेया सर्वसामान्य बाई सारखे जगायचे होते.
लग्न करायला नाही म्हणत आहे मी! ती म्हणाली, फक्त एक दिवस मला लग्नाच्या बायको सारखे वागवा, मग जन्म भर कधीही या मी लग्नाच्या पत्निच्या निष्ठेनी तुमची सेवा करील. एक पैसाही कधी घेणार नाही, ती ग्राहकाला म्हणाली.
तिने त्याला सर्व काही नीट समजावून सांगितले. ग्राहक ही तयार झाला.
निघण्या पूर्वी तिने नवीन आणलेल्या साबणाने घासून पुसून स्वछ आंघोळ केली. तिने मागितलेला दिवस तिला मिळाला होता.
पैसे होते तरीही टॅक्सी करून जाण्यात तिला रस नव्हता. बस, रेल्वे, काळीपिवळी तून लग्न झालेल्या बाई सारखे तिला मिरवत मिरवत जायचे होते. शहरात दोन चार नजरा चमकल्याचा तिला भास झाला पण वेशी बाहेर मात्र तिला कुणीही ओळखले नाही.
ते दोघेही एका सुखी संसारी जोडप्या सारखे वाटत होते. सगळं काही तिच्या मना सारखंच घडत होतं ति फार फार आनंदात होती.
ग्राहकाला देवा धर्मात काही रस असावा असे तिला वाटले नाही, पण तसा तो सज्जन होता. ती जे जे म्हणेल तसा तसा तो वागत होता,
दिलेला शब्द त्याने पाळला होता.
फुलांची पुडी घेऊन ती मंदिरात गेली, फुले वाहून तिने प्रदक्षिणा घातल्या आणि देवाला हात जोडले.
नक्कीच नक्कीच, मी म्हणतो ना! ही तशीच आहे.
नाही रे वाटत नाही.
लाव बेट! वाटलं तर रेट विचार तिला.
तू कुठे बघितलं हिला?
बघायला बिघायला कशाला हवं रे. कुठे बघितलं नाही पण माझी नजर धोका खाणार नाही. इतका अनुभव आहे मला. कितीही लपवलं तरी नुसत्या चाली वरून कळतात रे ह्या बाया.
तिला मागून कुजबुज ऐकू आली.
ती सुन्न झाली. तिच्या हातापायातले त्राण निघून गेले.
तिचे डोके चक्राउ लागले. आता जणु देव अन देऊळ तिच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले.
तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळला आणि दानपेटीत जाऊन पडला.
नकळत तिचा हात गळया कडे गेला. तिने खस्स्कन मंगळसूत्र ओढुन काढ्ले.
अश्रूच्या पाठोपाठ ते ही दान पेटीत जाऊन सामावले.
ती बाहेर आली.
चला! ती ग्राहकाला म्हणाली.
कुठे? ग्राहक म्हणाला.
कुठे?वेश्या आहे ना मी? कोण घरी नेणार मला? बाहेर च्या जगात माझ्या साठी जा॑गा नाही. चकल्या वरच परत सोडुन द्या मला. ती म्हणाली.
आता तिच्या डोळ्यात एक ही अश्रू नव्हता.
(समाप्त)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कथा छान लिहिली आहे, पण.....
Sad ! मला अशा दु:खी गोष्टी सहन नाही होत. 'दोघी'मधे जसा तो कोणी मित्र तिला accept करतो, तसं या temp नवर्‍याने तिला शेवटी accept केलं, असा शेवट जास्त आवडला असता. पण जीवन तर सोडाच कथेचा शेवटही आपल्याला हवा तसा नेहमीच नसतो.

लिखाणाची शैली आवडली.

दीक्षित साहेब, कथेबद्दल काही मत देत नाही, पण एक सांगावेसे वाटत होते, पटतं का ते बघा.
कथेच्या शीर्षकात, कथा हा शब्द आणि नाव देण्याचे काही कारण नाही, ते मायबोलीच्या मुख्य पानावर दिसतेच.