कार्यतत्पतर म.न.पा.स एक पत्र !

Submitted by कवठीचाफा on 23 June, 2011 - 11:05

प्रती म.न.पा.,

सादर प्रणाम,

सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्यवर होणारे कामचुकारपणाचे आरोप रोज ऐकतो. ते मला फ़ारसे रुचत नसल्याने आपणास आपल्या दिव्य कार्याची जाणिव करुन देण्यासाठी मुद्दाम हा पत्रपपंच करत आहे.

सर्वप्रथम मी वैयक्तीकरीत्या आपले आभार मानु इच्छीतो कारण केवळ आपल्या कर्तव्यनीष्ठेमुळे माझे दंतवैद्याकडे खर्ची पडू शकत असलेले रु. २०० मात्र बचत झाले. त्याचे असे झाले की दुखरी दाढ काढण्यास मी दंतवैद्याकडे जात असता आपल्या कृपेमुळे रस्त्यात असलेल्या खड्ड्यात पडल्याने माझी दुखरी दाढ आगदी बिनखर्चात निघाली, अर्थात मुदलेच्या दाढेबरोबर चांगले असलेले दोन दातही व्याज म्हणुन पडले, परंतु ते ही फ़ुकटात असल्याने मी तिकडे दुर्लक्ष करत आहे.

माझा वैयक्तीक असा हा एक फ़ायदा जसा मी आपणास प्रांजळपणे सांगीतला तसेच इतरांचेही अनेक फ़ायदे मी आपणास सादर करु इच्छीतो, त्यामुळे कदचीत सर्वसामान्य जनतेला त्रास वाटणार्‍या खड्ड्यांच्या, रस्त्यात असण्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी दुर होऊ शकतील.

आजकाल ‘ट्युबलेस टायर’आणि ‘मेंटेनन्स फ़्री’ वहानांमुळे तमाम गॅरेजधारकांच्या रोजगारावर गदा येउ पहात होती परंतु केवळ आपल्या उदात्त हेतुमुळे खड्ड्यात आपटून बंद पडलेल्या वहानांमुळे त्यांच्यावरील उपासमारीचे संकट टळले आहे. घरात हक्काचे आणि सुखाचे चार घास खाताना त्यांनी आपले आभारच मानायला हवे.

रस्त्यावरुन मोटारीतुन जाताना बसणारे हादरे हे उत्कृष्ठ व्हायब्रेटर कम मसाजरचे काम करत असल्याने, आम्हा पामरांना सर्वांग सुंदर व्यायाम घडून आपला बांधा फ़ुकटात सुडौल राखता येतो तो केवळ आपण याच कारणास्तव रस्त्यांमधे ठेवलेल्या खड्ड्यांमुळेच.

" आता सिझेरीन शिवाय पर्याय नाही !" असे डॉक्टरांनी निक्षुन सांगीतल्यार प्रसुतीवेदनांनी व्याकुळ झालेल्या पत्नीची हॉस्पिटलमधे नेतानाच नॉर्मल डिलीव्हरी करुन तीची व खर्चाच्या कल्पनेने कासाविस झालेल्या पतीची अशी एकावेळेस दोघांची सुटका करण्याची किमया आपण रस्त्यात तितक्याच कौशल्यपुर्ण रितीने ठेवलेल्या खड्ड्यांमुळेच पर्यायाने आपल्यामुळेच घडत आहे.

घरापासुन ऑफ़ीसपर्यंतचा रीक्षाचा खर्च न परवडणार्‍या क्षुद्र कारकुंड्याला बसच्या प्रवासात नौकानयनाचा आनंद देण्याची आपली दुरदृष्टी काही नतद्रष्टांना कळत नाही. असा फ़ुकटातला आनंद लाटता लाटता आजवर अनेक प्रेमविवाह झाले आहेत, आणि त्याचे श्रेय त्या जोडप्यांनी निव्वळ आपल्यालाच द्यावे लागेल.

सर्वात महत्वाचं म्हणजे महाप्रलयाची साधारण कल्पना आम्हा सर्वसामान्य जनांस यावी म्हणुन आपण नालेसफ़ाई अर्धवट ठेवता, त्यामुळे साठलेल्या गुढघाभर पाण्यातुन मार्गक्रमण करताना आम्हास येउ घातलेल्या महाप्रलयाचा सामना करण्याची सवय तर होतेच, पण रस्त्यवरुन चालताना ‘आपल्या पुढल्या पावलाखाली काय येईल ?’ अशी रहस्यकथाही आम्हाला अनुभवता येते. आम्हा सामान्यजनांना त्या कथेच्या नायकाची भुमीका आपण आगदी निर्व्याजपणे देउन टाकता, अशातच रस्त्यवरचे एखादे मॅनहोल उघडे टाकुन आपण थोडाफ़ार साहसकथेलाही वाव करुन देता. अश्या या आपल्या कथा नायकांनी आपले आभार मानायलाच हवेत.

फ़क्त आणि फ़क्त आपल्याच कृपेमुळे आजकाल आम्ही आमच्या अर्धांगिनीचा हात हातात घेउन खुशाल भररस्त्यातुन मिरवु शकतो.आमच्या या रुक्ष आयुष्यातल्या या रोमँटीक क्षणालाही आपणच ( जरी मोठ्या मनाने मान्य करत नसलात तरी ) कारणीभुत ठरता. रोमान्सचा विषय छेडल्या गेलाच आहे तर मी आपणास असे सुचवेन, की शहराच्या गर्दीत सर्व बागा भरल्यावर एखादे प्रेमी युगुल जर एकांत शोधत आपल्या दयेमुळे शाबुत असलेल्या एखाद्या खड्ड्याच्या आश्रयास आले, तर त्यांना अभय मिळावे.

आपल्या दुरगामी विचारांची आम्ही पाहीलेली एक प्रचीती,
दोनच दिवसांपुर्वी आमचे शेजारी मुलाला पोहोण्याच्या वर्गाला घेउन जात असता त्यांचा सुपुत्र एका खड्ड्यात पडला केवळ आपल्या महान वरदहस्तामुळे अफ़ाट आवाक्याच्या त्या खड्ड्यातुन बाहेर येण्यासाठी त्याला जे प्रयत्न करवे लागले त्याचा परीणाम म्हणुन तो चक्क पोहोणे शिकला. आता आपला मुलगा दमडीही न खर्च करता पोहायला शिकला याचा त्या पित्यास आनंद व्हायला हवा, परंतु तो आपल्या नावाने बोटे मोडताना दिसला. असे प्रकार वारंवार घडू लागले तर लवकरच आपल्या शहरातली अनेक चिमुरडी इंग्लीश खाडी पोहून जाण्याचा विक्रम करताना दिसतील. याचे सारे मोठेपण आपल्याला द्यायलाच हवे.

आपल्यामुळे आजकाल आम्हाला अण्वस्त्रधारी अतिरेक्यांची भितीही वाटेनाशी झालेय. अतातायीपणे केलाच जर त्यांनी एखादे दिवशी अणुहल्ला, तर आम्ही आपल्या कुटूंबकबिल्यासहीत एखाद्या खड्ड्यात लपुन अनेक महीने किरणोत्सारापासुन सुरक्षीत राहु शकतो. अर्थात आपल्या या उच्च दर्जाच्या तयारीची त्या अतिरेक्यांना कल्पना असावी, म्हणुनच केवळ ते नुसत्याच वल्गना करत आहेत.

आपल्यामुळेच रस्त्याकडेच्या फ़डतुस चहाच्या टपरीला लोक बेधडक ‘लेक व्ह्यु’ असे हाय फ़ाय नाव देऊ शकत आहेत परंतु तरीही आपल्याबद्दल आदर दाखवण्याचे साधे उपचार ते दाखवत नाहीत.

काही विघ्नसंतोषी माणसांना आपली ही सेवाभावी वृत्ती पसंत नसावी, म्हणुन ते आंदोलनं करतात, रस्त्यात आपण काळजीपुर्वक जोपासलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करतात. अर्थात त्यांना तुमचे वृक्षप्रेम माहीत नसते, तुम्ही रस्त्यात आडव्या पडलेल्या वृक्षाला इजा होऊ नये म्हणुन कित्येक दिवस तिकडे फ़िरकतच नाही, तर नविन लावलेल्या झाडाला मुळासकट उपटून टाकण्याची राक्षसी वृत्ती आपल्याकडे कुठून असणार ? ते आपले काम करुन बाजुला होतात, आणि तुम्ही त्यांच्या अरेरावी कारवाईकडे दुर्लक्ष करता, मग खड्डा हळूहळू मोठा होतो आणि त्यात लावलेले झाड त्याच्या पोटात गडप होते.
इथे एक प्रश्न पडतो, असे म्हणतात की दगडी कोळसा हा कधीतरी हजारो वर्षांपुर्वी गाडल्या गेलेल्या झाडांपासुन बनतो, याचा अर्थ हजारोवर्षांपुर्वीही अशी आंदोलनं होत असावीत काय ? आणि तेंव्हाही आपण इतकेच कार्यक्षम होतात का ?

असो, इतके दिवस आपल्या छत्राखाली राहील्याने मलाही काही कल्पना सुचत आहेत. आपली परवानगी आहे असं गृहीत धरुन मी त्या मांडत आहे.
आपण जर या खड्ड्यांची रुंदी व खोली अशीच वाढवत नेली तर आपल्या शहरात भुयारीमार्गांचे जाळे सहज पसरवता येईल जेणे करुन आमच्यासारखे पामर ट्रॅफ़ीक जॅम, सिग्नल, मेगाब्लॉक असले अडथळे न येता सहजासहजी वेळेवर ऑफ़ीसात पोहोचु शकु. पुढे कधी शक्य झाल्यास याच भुयारीमार्गाचे विस्तारीकरण करुन त्यात एखादे भुमीगत शहरही वसवता येईल. आणि वर साठलेल्या नाल्यांचे पाणि मातीतुन फ़िल्टर होऊन खालच्या शहराला चोविस तास पाणिपुरवठाही करता येईल.

कदाचीत या कल्पना आपल्याला आधीच सुचलेल्या असु शकतील व त्यावर आपली कार्यवाही चालुही असु शकेल, परंतु सामान्य नागरीकांना आपले उदात्त हेतु कळत नसल्याने ते उद्दामपणा करत असतात. जमल्यास या पत्राची प्रत काढून परीपत्रकाप्रमाणे नागरीकांमधे वाटल्यास गैरसमज कमी होण्यास हातभारही लागण्याची शक्यता आहे.

पत्राच्या शेवटी आपले पुनश्च आभार मानुन मी देवाजवळ विनंती करतो की पुढच्या जन्मीही आपल्याच कृपाछत्राखाली वावरण्याची संधी मिळावी ( आणि तो जन्म माणसाचा असु नये )
माझ्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत, धन्यवाद.

आपलाच एक

सुजाण नागरीक.

गुलमोहर: 

रस्त्याकडेच्या फ़डतुस चहाच्या टपरीला लोक बेधडक ‘लेक व्ह्यु’ असे हाय फ़ाय नाव देऊ शकत आहेत Happy
पण 'लेक व्ह्यु’ असे देवनागरीतच लिहीतात ना? नाहीतर राज ठाकरे येईल गुंडांना घेऊन.
मी २००५ मधे पुण्यात असताना महापालिकेच्या अहवालात म्हंटले होते की खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो व अपघातात गाडी व मनुष्य यांना मर्यादित इजा होते. जास्त वेगाने जाताना अपघात झाले तर इजाहि जास्त गंभीर होऊ शकते. हे सगळे आकडीवारीने सिद्ध करण्यात आलेले आहे.

हे खासच आहे रे....
पण चाफ़्याकडुन भयकथेची अपेक्षा असते, विनोदी लेखनाची नाही Happy

हे हे हे Lol

हसून हसून डोळ्यात पाणी आलं Happy

वर साठलेल्या नाल्यांचे पाणि मातीतुन फ़िल्टर होऊन खालच्या शहराला चोविस तास पाणिपुरवठाही करता येईल. >>> जबरी आयडीया !

म न पा चा इतका उपहास कुणी केला नसेल, पण गेंड्याच्या कातडी वाल्याना त्याचे काय?( अखिल भारतीय गेंडा महापरिषद काझीरंगा बुद्रुक यांची क्षमा मागून )

सर्वप्रथम प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद दोस्तलोक्स ! झक्की आपण स्वतः ? वाचुन बरं वाटलं
बरेच दिवसांनी ( महीन्यांनी असावे का ? ) मा.बो. वर लिहीले (आणि म्हणुनच सुरुवात भयकथेने करत नाहीये, कळले का विशल्या ? Happy )
असो, हे पत्र राज ठाकरेंच्या हवाली करावे का ? ( विचार करणारी बाहुली कशी काढतात ? )

मस्त करमणुक झाली. खड्डे म्हणजे भारताची खासियत नाही रे. इथेही भरपूर आहेत. आणि अशाच धर्तीची पत्रे पण इथल्या सिटी कौन्सिल ला लिहिली जातात.

पुणे मनपाचा अनुभवः
एकदा चुकून प्रॉपर्टी टॅक्स डबल भरला गेला.. नवर्‍यानं सहज म्हणून मनपाची साईट पाहिली.. त्यावरच्या ईमेल अ‍ॅड्रेस वर मेल केली(बघु तरी)
तासाभरात ज्याला मेल गेली त्यानं ती आपल्या टीमला फॉरवर्ड केलेली - त्यांचा एक दिवसाच्या आत रिस्पॉन्स आला की ते पुढच्या वर्षीच्या टॅक्स मधे धरतील आणि नंतर कन्फर्मेशन ईमेलही.

मग नवर्‍याला चेव चढला.. त्यानं सोसायटी समोरच्या खड्यांची ऑनलाईन तक्रार केली.
आठवड्याच्या आत आमच्या सोसायटी समोरच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवले गेले. (योगायोग का ते माहित नाही)

वाSSS म्हणजे म . न. पा. चे चांगले अनुभवही आहेत तर Happy
कुणितरी झक्की काकांना सांगा रेSSSS Wink

बरेच दिवसांनी ( महीन्यांनी असावे का ? ) मा.बो. वर लिहीले>>>

तुमच्याकडे महिना हा शब्द वर्ष या अर्थाने वापरला जातो का बे? Wink

हसुन हसुन मेले खर तर...
सॉलीडच मान्डलस.....पण खरच विचार करायला लावणारय हे सार्.....ग्रेट जॉब चाफा मित्रा......

सावरी