हानाको आणि अकिको या दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी. रांगत्या असल्यापासून एकत्र खेळायच्या. एकमेकींच्या अंगणात मस्ती करायच्या. एकत्र खाऊ खायच्या, नाचायच्या. आणि पुढे एकत्र शाळेत जाऊन अभ्यासही एकत्र करायच्या. शाळेत तर त्यांना बहिणी बहिणीच समजत इतक्या त्या बरोबर असायच्या.
एकदा काय झालं. हानाकोच्या आईबाबांना कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार होतं. पुन्हा याच गावी परतून कधी येणार, किंवा येणार कि नाही हे ही माहीत नव्हतं. हे ऐकल्यावर हानाकोला आणि अकीकोला खूपच वाईट वाटलं. आता आपण पुन्हा कधी भेटू अशा विचारांनी दोघींना रडू यायला लागलं. तेव्हा काही फोन, इमेल अशा गोष्टी नव्हत्या त्यामुळे दूर गेल्यावर मैत्रिणीशी बोलता येणे शक्यच नव्हते. फार फार तर पत्र पाठवता आले असते. ते या दोघी करणारच होत्या. तरीही जायचा विचार करून दोघी अगदी दुःखी होत्या. त्यातल्या त्यात आईबाबांजवळ हट्ट करून हानाकोने अकीकोचा वाढदिवस साजरा करून मग जायचं असे ठरवून घेतले.
आता अकीकोच्या वाढदिवसाला काय बरं भेट द्यावी असा हानाको विचार करत होती. अशी भेट हवी होती कि जी अकिको कधीच विसरणार नाही आणि जी अकीकोला त्यांच्या मैत्रीची सतत आठवण करत राहील.
पुस्तक दिलं तरी ते फाटून जाईल. जुनं झाल्यावर किंवा अकिको मोठी झाल्यावर काही ते वाचणार नाही.
मग एखादं खेळण? नाहीच. तेही मोठं झाल्यावर थोडच खेळता येईल?
एखादं माऊच पिल्लू देऊयात का? हम्म पण पिल्लू पळून गेलं तर? शिवाय ते घरातलं दुध पिईल तेव्हा अकिको त्याला रागावेल सुद्धा.
एखादी वस्तू जी अकीकोला घरात ठेवता येईल. पण ती वस्तू नुसतीच घरात राहील त्यावर धूळ बसेल आणि अकिको विसरूनही जाईल त्याला.
हानाकोची स्वतःशीच चाललेली ही बडबड हानाकोची आई ऐकत होती.
शेवटी आई म्हणाली मी तुला एक सुंदरशी भेट सुचवते. वाढदिवसाच्या दिवशी पहाटेच माझ्याबरोबर बाहेर ये. आपण जाऊन एक गंमत आणुयात.
आईच्या बोलण्याने हानाकोला खूप आनंद झाला. हानाकोची आणि घरातल्यांची निघण्याची तयारी सुरु होती. होता होता जायचा दिवस आणि अकीकोचा वाढदिवस उद्यावर आला.
रात्री झोपताना आईने हानाकोला सकाळी पहाटे उठायची आठवण करून दिली. अर्थात हानाको विसरली नव्हतीच.
दुसऱ्या दिवशी पहाटेच हानाको उठली. आई आणि ती दूर चालत चालत जंगलात गेल्या. आईने बरोबरच्या पिशवीत एक मोठी कात्री घेतली होती. मजल दरमजल करीत त्या दोघी जंगलात खूप आता पर्यंत पोचल्या. तिथे एका डोंगराच्या उतारावर सुंदर गुलाबी चेरीची फुले , साकुरा फुलला होता. सगळा डोंगर नुसता गुलाबी फुलांनी फुलून गेला होता. हानाको तर हरखूनच गेली. पण अजूनही तीला अजूनही काय भेट द्यायची ते कळलेच नव्हते. मग आईने कात्रीने साकुराच्या मोठ्या दोन फांद्या कापून घेतल्या आणि त्या परतीच्या वाटेला लागल्या. वाटेत येताना आईने हानाकोला अजून काही पांढरी आणि जांभळी फुले गोळा करायला सांगतली. ही सगळी फुले परडीत ठेवून आणि त्या दोन मोठ्या फांद्या हातात घेऊन दोघी परत घरी आल्या. आतापर्यंत अकीकोला फुलं भेट द्यायची हे हानाकोला लक्षात आलं होतं. पण फुलं कायमची आठवण कशी ठेवणार हे काही लक्षात येत नव्हते. आईला विचारल्यावर आईने हानाकोच्या कानात ती गंमत सांगितली. तशी हानाको आनंदाने नाचायलाच लागली.घरी आल्यावर सगळी फुलं आणि त्या दोन फांद्याचा दोघींनी मिळून एक सुंदरसा बुके तयार केला. त्याला गुलाबी आणि पांढरा कागद लावून छान सजवले. मग आई म्हणाली या छोट्याशा कार्डवर एक मजकूर लिही.
"प्रिय अकिको,
असेल गुलाबी सडा,
वर पक्षांचा थवा.
मी नसले तरी आठवणी माझ्या.
तुझीच हानाको.
"
आईने सांगितला तसा मजकूर लिहून ते कार्ड त्या फुलांमध्ये ठेवलं आणि हानाको अकीकोच्या घरी आली. इथे अकिको वाटच बघत होती. हानाकोने आणलेली फुलं अकीकोला भेट दिली आणि कार्ड रात्री ती गेल्यावर वाचायला सांगितलं. तो दिवसभर त्या दोघी एकत्र खेळल्या , जेवल्या. संध्याकाळ झाली तशी हानाकोची जायची वेळ झाली. रडत रडतच दोघींनी एकमेकींना निरोप दिला. पुन्हा केव्हातरी नक्की भेटू असं आश्वासन दिलं आणि हानाकोचा प्रवास चालू झाला.
इथे रात्री अकीकोने तो मजकूर वाचला. पण तीला त्याचा अर्थ कळेना. रात्रभर अकिको विचार करत राहिली. असे दोन दिवस गेले. आता हानाकोने दिलेली ती फुलं सुकणार अशा विचाराने अकीकोला खुपच वाईट वाटत होतं. अकीकोच्या आईचं मात्र अकोकोकडे लक्ष होतं. शेवटी नं रहावून आई म्हणाली तुला हानाकोने दिलेली भेट जपून ठेवायची आहे ना? मग ती फुलं घेऊन इथे ये माझ्याबरोबर.
अंगणात गेल्यावर आईने तो बुके सोडवला त्यातल्या त्या दोन साकुराच्या फांद्या घेऊन जमिनीत व्यवस्थित खड्डा करून लावल्या. आता कुठे अकीकोला हानाकोच्या मजकुरातली गंमत कळली. अकिको रोज त्या फांद्याना पाणी घालायला लागली आणि त्यांची काळजी घ्यायला लागली. काही दिवसांनी त्या फांद्या रुजल्या आणि त्याला पोपटी रंगाचे नाजून कोंब फुटले. ही साकुराची रोपं मोठी व्हायला लागली. त्यांच्याशी गप्पा मारताना अकीकोचा एकटेपणा केव्हाच पळून गेला. दरवर्षी वसंत ऋतू आल्यावर या रोपांना फुलं यायची. सुरुवातीला अगदी थोडीच असायची पण अशी दोनचार वर्ष उलटली आणि झाडं चांगली मोठ्ठी झाली. या साकुराचा बहार अगदी भरभरून यायला लागला. या दिवसात सगळं अंगण आणि अकीकोच्या घराची कौलं अगदी गुलाबी दिसायची. आणि एका वर्षी चक्क साकुराला छोट्या छोट्या लाल चुट्टुक चेरी आल्या. या चेरी खायला खूप खूप पक्षीही आले. अकीकोला हे नवेच मित्र मिळाले. हानाकोच्या मजकुराचे कार्ड अकीकोने अगदी जपून ठेवले होते. त्यातला साकुराचा गुलाबी सडा , आलेल्या चेरी आणि त्यावरचा पक्षांचा थवा सगळ्या गोष्टी घडून आल्या होत्या.
आता अकीकोच्या या नवीन मित्रांनी चेरी खाऊन त्यांच्या बिया गावात सगळी कडे टाकल्या. त्यांची रोपं उगवली आणि पुढच्या काही वर्षात गावात सगळ्यांच्या अंगणात साकुराची फुललेली, फळलेली झाडं दिसायला लागली.
अनेक वर्षांनी जेव्हा हानाको आपल्या मैत्रिणीला भेटायला गावात परत आली तेव्हा यायच्या रस्त्यातच फुललेला साकुरा बघून आपल्या मैत्रीचे झाडं अकीकोने योग्य प्रकारे फुलवल्याचे समाधान हानाकोला मिळाले.
------------------
गोष्टी मधली जपानी नावे, साकुराचा संदर्भ लागावा म्हणुन घेतली आहेत. भारतीय नावाने चेरी च्या फुलांचा संदर्भ लागणार नाही.
हि गोष्ट इथेही वाचता येईल.
http://gammatgoshti.blogspot.com/
एखादा साकुराचा फोटो टाकायचा आहे. तो वेळ मिळाला कि टाकेन.
सुंदर गोष्ट ग. ह्यातली हानाको
सुंदर गोष्ट ग. ह्यातली हानाको म्हणजे तू कां?
खरंच गोड गोड गोष्ट.
खरंच गोड गोड गोष्ट.
हानाको सान, मस्त
हानाको सान, मस्त
मस्त गोष्ट ,खूप आवडली.
मस्त गोष्ट ,खूप आवडली.
गोड आहे गोष्ट अगदी! मस्त मस्त
गोड आहे गोष्ट अगदी! मस्त मस्त अगदी.
छान आहे गोष्ट ,लेकीला सागायला
छान आहे गोष्ट ,लेकीला सागायला हवी.
मस्त गोष्टं
मस्त गोष्टं
व्वा मस्त गोष्ट . आज
व्वा मस्त गोष्ट . आज रात्रीच्या गोष्टीची सोय झाली.
गोड गोष्ट! आवडली
गोड गोष्ट! आवडली