भारत खरोखरच प्रजासत्ताक आहे का?

Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 02:55

मंगळवार, २५ जानेवारी २०११, २०:५० (+०५:३०) — dr.sunil_ahirrao

आपण दरवर्षीप्रमाणे १५ ऑगष्ट व २६ जानेवारीला भल्या पहाटे उठून आपापल्या कार्यालयांकडे राष्ट्रध्वजास वंदन करायला जातो.राष्ट्रभक्तीपर गीतांच्या सीडीज लावतो.आणि वातावरण अगदी देशभक्तीने भारून टाकतो.तास दोन तास टीव्हीवरील देशभक्तीपर कार्यक्रमांनी आपलं रक्त थोडा वेळ उसळतंही...नंतर हळूहळू सारं शांत होत जातं.का घडतं असं? काही सरकारी
महाभाग तर केवळ नाईलाजास्तव आणि सक्तीचे म्हणून ध्वजवंदनासाठी येतात; पूर्ण सुटी मिळत नाही म्हणून ते बिचारे
नाराज असतात.काही लोक थोडा टाईमपास करण्यासाठी येतात.काही विद्यार्थी हजेरी लावण्यासाठी येतात.काही थोडा
नाश्तापाणी होईल म्हणून येतात.हे 'काही' जे कोणी असतात,त्यांची संख्या तशी अल्प असते;पण आहेतच ना या प्रवृत्तीचे
लोक? त्यामुळेच प्रश्न पडतो की आपणाला स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणवून घेण्याचा काय अधिकार आहे,जर आपण आपल्या
क्षुद्र स्वार्थांचे गुलाम आहोत तर? किती भारतीयांना आपल्या नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणिव आहे?आणि जाणिव
असूनही किती लोक त्याचे पालन करतात?
कुठे रस्त्यात अपघात झालेला असला तर फक्त बघ्यांची गर्दी होते.मदतीला कुणी पुढे येत नाही.बरेच जण उगाच लचांड
नको म्हणून पटकन तेथून पळ काढतात.आपण दिवसेंदिवस स्वतःपुरते मर्यादित होत चाललो आहोत.आज आपण केवळ
माणुसकी म्हणून करता येण्यासारखे सुद्धा करत नाही,तर देशावर उद्या एखादे संकट कोसळले तर काय करणार? कुठे आहे लोकांचं लोकांसाठी चालवलेलं सरकार? आपण चोर,भामटे आणि दरोडेखोरांना निवडून देतो,स्वतःच्या क्षुद्र स्वार्थ पोसण्यासाठी! मग हे पुढारी
सरकारी तिजोरीवर डल्ला मारून चांगलेच सोकावतात आणि जनतेवर गुलामी लादतात.पैश्यांच्या जोरावर वारंवार निवडून येतात.
आपल्यासमोर 'प्याकेज ' चा एक तुकडा फेकतात आणि मग आपण 'खुष' होऊन जातो.त्यांचेच गुणगान गातो.आपण आपल्या किरकोळ स्वार्थासाठी आपलाच आत्मा विकून टाकतो आहोत.संविधानात सांगितलेल्या भारतीय नागरिकाच्या व्याख्येत आपण खरोखर बसतो आहोत का?आपल्याला फक्त हक्क हवे आहेत,कर्तव्ये नकोत.आपण अत्यंत संकुचित आहोत,अल्पसंतुष्ट आहोत.
आपणाला आपल्यापुरती सुरक्षितता हवी असते,मग इतरांचे काहीही होवो.(सारे भारतीय माझे बांधव आहेत,हे आपण सोयीस्करपणे
विसरतो आहोत)आपण स्वतःचे आणि मुठभर पुढाऱ्यांचे गुलाम झालो आहोत.जो पर्यंत आपणाला आपल्या कर्तव्यांची खऱ्या अर्थाने जाणिव होत नाही,तोपर्यंत आपण स्वतंत्र भारताचे नागरिक गुलामीतच राहू!

Group content visibility: 
Private - accessible only to group members

Happy

कदाचीत स्वतन्त्र ही असेच फुकट मिळाल आहे तुमच्या आणि आमच्या पिढीला.
किंवा ज्यांनी किंमत मोजली त्यांचा जनतेला विसर पडला. त्या लोकांच्या देशाबद्दलच्या, कर्तव्याबद्दलच्या, स्वार्थत्याग, महत्वाचे काय, काय नाही याबाबतीतल्या कल्पना आजकाल जुन्या, कदाचित् हास्यास्पदहि, वाटत असतील.

@झक्कीजी,शक्य आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांचे बलिदान,स्वार्थत्याग नव्या पिढीला हास्यास्पद वाटतही असेल.पण मग याचा अर्थ हाच की आजचा समाज हा अत्यंत कृतघ्न आहे.हा समाज कृतघ्न का झाला असेल? तर यापूर्वीच्या पिढीला आपल्या मुलांना देशप्रेमाची शिकवण देण्याची गरज वाटली नाही.कारण ही पिढी अत्यंत संकुचित आणि अप्पलपोटी होती.त्यांना सहजपणे किरकोळ शिक्षण असूनही नोकऱ्या मिळत गेल्या आणि हा मध्यमवर्गीय समाज फक्त पुढच्या पिढीला कसे नोकरी धंद्याला लावता येईल,याच विवंचनेत जगला,मेला.उच्चवर्गीयांनी आपल्या पिढीला फक्त अधिक श्रीमंत होण्याचे शिक्षण दिले.कनिष्ठ वर्ग अजूनही अज्ञानात खितपत पडला आहे.आणि राजकारणी तर मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी जमात आहे. आता हीच परंपरा आपल्या पुढच्या पिढीने चालवली तर भारतीय म्हणजे गद्दार,कृतघ्न,संकुचित असे शब्द जगातील इतर भाषांत रूढ झाल्यास नवल वाटू नये.

पण मग याचा अर्थ हाच की आजचा समाज हा अत्यंत कृतघ्न आहे

फक्त भारतातला? अहो सगळीकडे हे असेच असते. जेंव्हा आधीची पिढी मारपीट करून आपली मते मुलांवर लादत, तेंव्हा कदाचित् दोन्ही पिढ्या सारख्याच विचाराच्या असतील.

पण हे असे योग्य नाही. तेच तेच विचार पिढ्या न् पिढ्या चालत राहीले तर नवीन कालमानानुसार बदलणार्‍या परिस्थितीतले प्रश्न सुटणार कसे? स्वतंत्र विचार आवश्यक आहेत!

पन्नास वर्षांपूर्वी भारतात राहिलेल्या लोकांना विचारा, त्यांच्यावर किती सामाजिक, आर्थिक बंधने होती. त्यांच्या मनाची कशी घुसमट होत होती. आता जरा सुबत्ता आली, समाजाची दडपणे हलकी झाली, आर्थिक परिस्थिती सुधारली, तेंव्हा सगळे काही आलबेल आहे, घ्या मजा करून अशी वृत्ति होणे साहाजिक आहे.

अमेरिकेने गेली चाळीस वर्षे हेच केले. अमर्याद उपभोगी, स्वार्थपरायण वागणूक. त्याचे दुष्परिणाम आता भोगताहेत, पण भारतावर तशी वेळ येणार नाही अशी आशा आहे कारण..
माझ्या मते तुम्ही हिंदू धर्म माना अथवा न माना, देव माना अथवा न माना, चालीरिती प्रमाणे वडाच्या झाडाला फेर्‍या मारा किंवा न मारा, पण भारत देशातील सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांति, अस्तेय, देशप्रेम, सामाजिक कर्तव्ये यांच्या कल्पना, हे तत्वज्ञान भारतीय भूखंडात जन्मलेल्या लोकांच्या मनात जो पर्यंत रुजले आहे, तोपर्यंत भारत देश टिकेल, सुखात राहील. ती खरी संस्कृति. मग प्रजासत्ताक असो वा राजसत्ताक असो.

बाकी करवा चौथ, छटपूजा, वटपौर्णिमा, नमाज, रवीवारी चर्चमधे जाणे वगैरे सगळे करा किंवा नका करू, त्याचा खर्‍या संस्कृतीशी काहीहि संबंध नाही. पोलीस, राजकारण, लाचलुचपत हे उगीच आपले मायबोलीवर येऊन वादविवाद करण्याचे विषय. पूर्वी लोक शक्तीचे प्रदर्शन करायला मारामार्‍या करत, कुस्त्या खेळत, आजकाल अकलेचे (?) प्रदर्शन करायला वादविवाद करतात. दोन्ही सारखेच निरर्थक, निरुपयोगी. केवळ कालापव्यय.

@झक्की,म्हणूनच निदान पुढच्या पिढ्यांना आताच्यासारखे बनू द्यायचे नसल्यास आताच प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी. एकाच वेळी एक विचार जेव्हा सर्वत्र मूळ धरू लागतो,तेव्हा बदल घडतोच घडतो.स्वातंत्र्यकाळापूर्वी आपण गुलामीत आहोत,हेच कळायला लोकांना कैक वर्षे लागली.आणि ते इंग्रजांनाच आपले राजे मानू लागले.गुलामीची,लाचारीची सवय पडत गेली.पण जेव्हा एकदा सुरुवात झाली,स्वातंत्र्यविचार संपूर्ण देशात रुजला तेव्हा इंग्रजांसमोर हा देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. फक्त एक विचार -उदा.'मी कोणत्याही परिस्थितीत लाच देणार नाही;लाच मागणाराला पकडून देण्याचा प्रयत्न करीन. " -सर्वांनी अमलात आणल्यास महिनाभरात सर्व सरकारी कर्मचारी आणि पुढारी यांचे धाबे दणाणून जाईल,हे निश्चित.मात्र त्यासाठी आपल्या क्षुद्र स्वार्थांवर पाणी सोडण्याची प्रत्येकाची तयारी हवी.

"...मात्र त्यासाठी आपल्या क्षुद्र स्वार्थांवर पाणी सोडण्याची प्रत्येकाची तयारी हवी...."

~ डॉक्टर, तुमच्या प्रामाणिक हेतूविषयी आदर ठेवून हेच म्हणावे लागेल की, Ideal State संदर्भातील तुमचा आशावाद (वा स्वप्न) अस्तित्वात येण्याची सांप्रत देशी सुतराम शक्यता नाही. प्लेटोच्या रीपब्लिकमध्ये अशा चर्चा करणे ठीक आहे, पण ज्यावेळी नाकासमोर सरळ चालणारी व्यक्ती सरकारी आणि खाजगी पातळीवर चालणार्‍या 'कामकाज' नावाच्या चक्रात अडकते त्यावेळी तिला दिवसा चांदणे दिसू लागते, हे अनुभवांती सांगतो.

व्हॉट इज द मीनिंग ऑफ 'क्षुद्र स्वार्थ" आफ्टर ऑल? कोर्टाचे कामकाज सुरू होता होता खिशात असलेल्या मोबाईलची रिंग वाजली म्हणून तिथल्या तिथे पोलिसाने माझ्या मित्राचा हॅन्ड्सेट 'जप्त' केला. वाजले होते ११.१०. दंड होता १०० रुपये, जो मित्र तात्काळ भरण्यास तयार झाला. त्याची वरात मग कार्यालयातील बाबुकडे. तो अजून यायचा होता....आल्यावर मग आरामशीरपणे त्याची तिथे प्रथम लिखापढी...वाजला १...मग सांगण्यात आले अमुक खिडकीत जाऊन दंड भरा व पावती इकडे आणा....खिडकीतील बाई अदृश्य...कुठे गेली? माहीत नाही, इती अटेंडंट....'रोखीचा भरणा दु.२.०० पर्यंत.." असा तिथे बोर्ड. सेट हातात नसल्याने मित्र अस्वस्थ. १.४५ ला बाई आल्या, उपकार केल्यागत पावती झाली. तो धावत परत पहिल्या टेबलकडे...पण तोपर्यंत तिथली चहापानाची वेळ. ३ पर्यंत थांबला...पण रावसाहेब परतले नव्हते. चौकशी केली तर साहेबांच्यासमवेत व्हिजिटला गेलेत. हा हतबल झालेला पाहून तेथील एक 'सामाजिक कार्यकर्ता' पुढे. "द्या एक पन्नासची नोट इकडे...येतोय बघा तो बाबू कसा चटदिशी..." दिली...रावसाहेब पुढच्याच मिनिटाला टेबलवर....हॅ हॅ करत...मग आणखीन एकदोन ठिकाणी सह्या घेऊन, मेहरबानी केल्याच्या थाटात मोबाईल परत....वाजले होते....४.१०...मग परत त्या थोर कार्यकर्त्याला बाहेर येऊन कोल्ड्रिन्क्स वगैरे....दिवस बुडाला.

इथे मित्राचा मोबाईल कोर्टात वाजला (अजून कोर्टाचे कामकाज चालू झाले नव्हते....) ही बाब नियमाविरूद्ध असली तरी तो दंड भरण्यास तयार असल्याने त्याला दोष देता येणार नाही, पण हे रितसर का होऊ शकत नाही? प्रत्येक पावलावर जर पैसापेरणी करावी लागत असेल आणि ती करणे भागच असेल तर मग आपल्या हक्काच्या वस्तूसाठी करावी लागणारी यातायात 'क्षुद्र स्वार्थ' गटात कशी येते ?

गर्दीच्या रस्त्यावर समविषम तारखेला अमुक एका ठिकाणी दुचाकी लावू नयेत अन्यथा 'अतिक्रमण' गट ते वाहन उचलून नेईल... असे बोर्ड तुम्ही पाहिले असणारच? लिहू त्या संदर्भातील अनुभव ?

कदाचित् काहीहि कारणाने दुसर्‍या लोकांची अडवणूक केल्याने स्वतःचे मोठेपण सिद्ध होते असा अहंकार असणे हेहि त्यामागील एक कारण असू शकते.
कुणि काकुळतीला येऊन 'साहेब, दया करा नि माझे दंडाचे पैसे घेऊन पावती द्या' असे म्हंटले काय पण बरे वाटत असेल त्या साध्या कारकुनाला! राजाला खंडणी किंवा नजराणा देतात तसे लोक आपल्याला पैसे देतात!!
नाहीतर एरवी लोक आपले नोकरांवर, आपल्यापेक्षा 'कमी दर्जाच्या' लोकांवर नुसते खेकसत असतात. आवाजात उर्मटपणा ठासून भरलेला!! नुसते तोंडदेखले सुद्धा, नमस्कार, 'हे काम करता का?' वगैरे म्हणणार नाहीत!

@प्रतीकजी,आपल्या मित्राचा अनुभव वैतागवाणा आहे,या बद्दल शंका नाही.असे अनुभव प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी येतातच.आपण आपलाही अनुभव जरूर लिहा.आता मी माझा अनुभव सांगतो-
मी ट्रेनने मेडीकल ऑफिसरच्या पोस्टसाठी एका इंटरव्यूला गेलो.स्टेशनवर उतरलो तेव्हा सकाळचे १० वाजलेले होते.इंटरव्यू ११ वाजेला होता.आणि मला त्याठिकाणी पोचायला आणखी एक तास तरी लागणार होता. बरेच लोक रूळ ओलांडून जात होते.मीही गेलो.आणि पुढे रेल्वे पोलिसांनी अडवलं.इतर लोकांनाही अडवलं.त्यांच्यात जास्त करून सुशिक्षित लोकच होते.
'क्या प्रोब्लम है?'मी विचारले
'आप अंदर ओफिसमें जाईये'
चांगले पन्नासेक लोक आत बसलेले.या सर्वांनी रूळ ओलांडला होता.
'आप सबको पता है,आपने कितना बडा गुनाह किया है? जिस पटरीसे आप लोग आए उसपर अगर कोयी ट्रेन आ जाती,तो आपकी जान भी जा सकती थी;और फांसी हमारे गलेको लगती.' मग त्या जाडगेल्या पोलिसाने आम्ही रूळ ओलांडत असल्याचं व्हिडीओ चित्रण आम्हाला दाखवलं.
मग आणखी एक जण आला. तो म्हणाला मी अमुक अमुक अधिकारी आहे. 'आप लोगोंको हम कोर्ट ले जाएंगे.वहां सुनवाई होगी.और जो फाईन होगा वह देकर आप लोग जा सकते है.'
'कोर्ट कहा है? ' मी विचारले
' यह कोर्ट मोबाईल कोर्ट है.अब साहब एक्सवायझेड स्टेशनपर गये हुए है.दोपहर ३ बजेके बाद आनेकी संभावना है.'
'सरजी,मै यहां इंटरव्ह्यू के लिए आया हुआ हुं. कृपया आप मुझे जाने दिजीये;मै अपना नाम पता आपको देता हुं,और दोपहरमें ३ बजे वापिस आऊंगा'
'आप क्या करते है?'
'डॉक्टर हुं साहब.'
'वाह डॉक्टरसाहब,आप जैसे लोग इस तरह गैरजिम्मेदारी की बाते करने लगे,तो फिर औरोंकी तो बातही क्या?' वगैरे वगैरे.
'मै अपनी गलती मानता हुं;और मै फाईन देनेके लिये भी तैयार हुं.आप प्लीज मुझे जाने दिजीये'
मग असेच काही लोक ज्यांना घाई होती,त्यांनीही त्या अधिकाऱ्याला विनंती केली.
'ठीक है,आप लोग,जो जल्दीमें है, १००० रु. पर हेड जमा करा दिजीये,और फिर बादमें कोर्टमें हाजीर हो सकते है'
'उसकी रसीद आप देंगे ना?'
'हा हा हा, भाईसाहब,यह तो हम आपके लिये कर रहे है.बाकी आपकी मर्जी.आप चाहो तो रुक सकते है,जब साहब आयेंगे तब जो फाईन होगा सो होगा'
'साहब कब आयेंगे ?'
'वैसे तो ३-४ बजेतक आ जाना चाहिये;लेकिन हो भी सकता है की कल सुबह आये-आप लोग सोचो.'असे म्हणून तो मनुष्य बाहेर निघून गेला.
यानंतर त्या जाड्या पोलिसाने आम्हाला सांगितले 'साहब,एक बात बताता हुं,आप १०००/- रु.देके यहासे निकले तो आपका वक्त और पैसा भी बचेगा!'
'फाईन कितना हो सकता है?'
'वह तो कोर्टमें पता चलेगा.साहब की मूड पर डिपेंड होता है.'
'लेकिन १००० रु.तो नही होगा ना,यह तो बहुत जादा अमाउंट है'
'आप एक काम किजीये,५००/-जमा करा दिजीये.बाकी मै देख लुंगा!'
'मतलब?'
'आप लोग यह फॉर्म भर दिजीये.और आनेकी जरुरत नही.'
'लेकिन हमारे नाम कोयी नोटीस वगैरा आया तो?'
'आपको किसने कहा की सही नाम और पता लिखो?'
अनेकांनी ५००-५०० देऊन तो झेरॉक्स केलेला फोर्म भरला आणि निघून गेले.आता ११ वाजत आले होते एव्हाना इंटरव्यू सुरु पण झाले असतील .पण एवढ्या दूर आलोच आहोत,तर जाऊन तर येऊ,असा विचार करून मीही ५००/-रु त्या पोलीसाजवळ दिले.आणि फोर्म मध्ये खरे नाव आणि पत्ता लिहिला.आणि त्याला म्हणालो' मुझे पता है,फाईन १००/-रु.होता है.मै दोपहरमें आऊंगा,तब ५००/-रु आपसे वापिस लुंगा'
'कोयी बात नही,आप दोपहरमें जरूर आईये.'
'लेकिन आप कमसे कम इस कागज पर लिख तो दिजीये,रसीद ना ही सही' मी खिश्यातल्या छोट्या डायरीचं पान त्याच्यासमोर ठेवलं.
'ठीक है.'असे म्हणत त्याने ५००/-जमा असे लिहून दिले.सही मात्र केली नाही. मी इंटरव्यूला टेक्सीने पोचलो.तिथे एवढी प्रचंड गर्दी होती,की फक्त फॉर्म आणि सर्टीफिकेटस् च्या झेरॉक्स कॉपीज फक्त घेण्यात आल्या.मी वैतागलो आणि पुन्हा स्टेशनवर आलो. आता बरोबर दुपारचे ३ वाजले होते. मी त्या पोलिसाकडे गेलो.
'आज साहब नही आयेंगे' मला पाहताच तो म्हणाला.
'तो कब आयेंगे?'
'कल सुबह ११ बजे
'ठीक है मै कल ११ बजे जरूर आऊंगा' असे म्हणून मी तेथून निघालो. सिटीत मित्राकडे गेलो.त्याच्याचकडे थांबलो.
मित्र म्हणाला 'एक दिवस वाया घालवण्यापेक्षा ५००/-रु.वर पाणी सोडणं परवडलं असतं.पण असो,या निमित्ताने तू माझ्याकडे आलास तरी'

दुसरया दिवशी सकाळी १० वाजेलाच मी स्टेशनवर पोचलो. तो पोलीस माझ्याकडे जणू खुन्नसने पहात होता.मी मनाशी ठरवून टाकलं 'काहीही झालं तरी याला आपले ५००/-रु हडप करू द्यायचे नाहीत. ११-१२-१ -२ वाजून गेले तरी साहेबांचा पत्ता नव्हता.मधल्या वेळात मी जवळच्या हॉटेलात जेवूनही आलो.साहेब एकदाचे ४ वाजेला आले.माझ्यासारखे अनेक लोक रांगेत होतेच.'त्या' पोलिसाने नावे पुकारून कोण आले,नाही वगैरे खात्री करून-जे आले नव्हते त्यांचे फॉर्म्स वेगळे ठेवले.
माझ्या नावाचा पुकारा झाला.मी आत गेलो.
'आपलं नांव?'
मी नाव सांगितलं
'गुन्हा मान्य आहे?'
'होय सर'
'१००/-फाईन भरा बाहेर'
'ओके सर,धन्यवाद'
मी १००/-भरून पावती घेतली आणि त्या पोलिसाकडे आलो.
'साहब ५००/-रु?'
त्याने खिश्यातून ३००/-काढून दिले.
'ऐसा नही,साहब पुरे ५००/-चाहिये.'
'वो क्या है ना साहब,हमें साहबको भी पैसे देने पडते है'
'कौनसे साहबको?'
'कोर्ट...'
मी म्हणालो 'आपसे मै पुरे ५००/-वापिस लुंगा,यह मैने आपसे कलभी कहा था!'
'लेकिन...'
'लेकिन वेकीन कुछ नही,पैसे दो' मी त्याला ते डायरीचं पान दाखवलं
त्याने मुकाट्याने आणखी २००/-परत दिले.आणि तिकीट खिडकीकडे निघालो. तो माझ्या मागे आला म्हणाला 'साहब,वो कागज प्लीज...'त्याच्या डोळ्यात भिती होती.
मी तो कागद त्याला दिला.
'धन्यवाद..'म्हणून तो निघून गेला.आणि मीही प्लेटफोर्मकडे धावलो आणि ट्रेन पकडली.
या दोन दिवसात मला प्रचंड त्रास झाला.त्या दोन दिवसांची माझी कमाई बुडली.माझा वेळ गेला.पण हे क्षुद्रच स्वार्थ होते,नाही का? मी ते माझ्या परिने टाळले याचे समाधान वाटते.

डॉ. आपण केलेत तसे सर्वांना पेशन्स ठेवून करणे जमते असे नाही. आणि त्यामुळेच असल्या दुष्प्रवृत्तींना खतपाणी मिळत जाते.

pratyekane arthat vel aani paisa yancha bhurdand sosanyachi tayari dakhwlyas , hya pravruttinna aala ghalta yeil.

भारतातच नाही.. जगात कुठेही बघा. स्वातंत्र्यसंग्राम, परकीयांनी केलेला जुलूम.... हे जो जगतो त्यालाच कळतं. पुढच्या पिढ्याना ह्या फक्त गोष्टी होऊन रहातात.
आता प्रत्येक पीढीला पारतंत्र्यात कसं वाढवता येईल..?

@pudhchya pidhyanna nidan swatantryapurvichya pidhyancha tyaag samjun sangeetala pahije. pustkant he asatach, pan palakanni mulanna sangayala have ki beta, aaj tuzya watyala he je sukh aale aahe, teeche shrey swantantya milavun denarya mahapurushanna aahe !

Pages