अवधी पध्दतीने मूग डाळ

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 19 June, 2011 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप (लहान) मूग डाळ
१ कांदा बारीक चिरून
१ कांदा पातळ उभा चिरून
दीड चमचा आले व हिरव्या मिरचीचे वाटण
१ टोमॅटोची प्यूरी
चिमूटभर हळद
पाव चमचा जिरेपूड
अर्धा चमचा लाल तिखट
चिमूटभर गरम मसाला पूड
चवीप्रमाणे मीठ
दीड ते दोन चमचे साय/ मलई
पुदिन्याची ताजी पाने
फोडणीसाठी तूप

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम मूगडाळ तीन-चार मिनिटे कोरडी भाजून घ्या. नंतर ती धुवून प्रेशरकुकरमध्ये २ कप पाणी, आले-हिरवी मिरची पेस्ट व बारीक चिरलेल्या कांद्यासह मऊ शिजवून घ्या.

डाळ शिजल्यावर जरा घोटून त्यात टोमॅटो प्यूरी घालून ती पाच ते सात मिनिटे गॅसवर शिजवत ठेवा. त्यात जिरेपूड, गरम मसाला पूड, तिखट, मीठ घाला. मलई/ साय घालून दोन-तीन मिनिटे शिजू द्या.

फोडणी करायच्या भांड्यात थोडे तूप गरम करून त्यात पुदिन्याची पाने परतून घ्या. ती खुटखुटीत झाली की बाजूला काढा व त्याच भांड्यात पातळ उभा चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा पारदर्शक झाला पाहिजे.
परतलेला कांदा व पुदिना पाने डाळीत घाला. गरमागरम डाळ तय्यार! पोळी / ब्रेड/ भाताबरोबर ही डाळ खाता येते.
सजवायचे झाल्यास वरून एखादे पुदिना पान, परतलेला कांदा, मलईचा ठिपका घालून सजवा. (मी नाही सजवली :फिदी:)

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

ही डाळ चवीने तशी सौम्य आहे आणि त्याचवेळी जरा तिखटही लागते. पुदिन्याचा स्वाद मस्त लागतो. मी सवयीने डाळीत चिमूटभर साखर घातली, गूळही घालू शकता, पण खरे तर आवश्यकता नाही. तूप + भात / तूप + पोळीबरोबर अतिशय मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे गं अकु रेसिपी. नक्की करुन बघेन Happy
ह्यावरुन आठवलं, माझ्या मैत्रिणीची आई अगदी साधी मूगडाळ आणि गाखर करते. काय भारी लागतात ते. त्यामध्ये मूगडाळ नुसती शिजवून घ्यायची आणि मग वरुन फक्त शहाजिरे आणि लाल तिखट घातलेली तुपाची फोडणी द्यायची. मस्त लाल तवंग येतो. एकदम साधी पण टेस्टी.

वा वा, मस्त फोटो लालू, सजावटही छान आहे! Happy

धन्यवाद लाजो, वत्सला, दिनेशदा, अगो, अन्कॅनी.

सिंडरेला, नावावरून कळलंच असेल, नवाबी प्रांतातील रेसिपी आहे.... तेव्हा थोडीफार खिटपिट असणारच! Proud चव मात्र मस्त आहे... आमच्याकडे हिट्ट झाली ही रेसिपी!

दुपारी केलेली डाळ रात्री आणखी स्वादिष्ट लागते, मसाला मुरतो मस्त त्यात!

छान लागते ही डाळ. नुसती खायला / प्यायला पण मस्त लागते, स्पेशली थंडीच्या दिवसात. मागे एका लग्नामध्ये आम्ही नुसतीच प्यायलो होतो ही डाळ. Happy

अकु, मी ही आज करून बघितली. चवीला चांगली झालीये, पण मी टोमॅटो प्युरीऐवजी टोमॅटो पेस्ट घातली, त्यामुळे तुमची जितकी पातळ झालीये तितकी माझी नाही झाली. मलई/साय दोन्ही नाही घातलं (त्याने काय फरक पडतो ते माहित नव्हतं/कळलं नव्हतं), पुदिन्याची पानं घरात नव्हती पण पावडर होती मग ती घातली.

DSC08125 cropped.jpg

अकु, मस्त रेसिपी..
आणि फोटो टाकणार्‍या बायांनो तुमची पोटं दुखली की नाही? Proud
फोटो टाकून जळवू नका, खायला बोलवा... मला एकटीला फक्त.. Lol

अरुंधती, मस्त पाकृ!! आवडली. नक्की करून बघणार.

काय सगळ्या बाया बिगी बिगी रेस्पी करून वर आणि फोटो टाकून जळवताहेत Sad

सगळ्यांचे फोटो छान हां... म्हणजे पदार्थ पण टेस्टी झाला असेल Happy

अरे काय मस्त मस्त फोटो टाकलेत सर्वांनी! सावनी, आडो... फोटो लैच भारी आहेत!! Happy

आडो, पुदिना पाने व मलई/ सायीमुळे चवीत फरक पडतो नक्कीच. पुदिन्याची पाने जेव्हा मिळतील तेव्हा ती ताजी पाने वापरून बघ. टोमॅटो प्यूरी व टोमॅटो पेस्ट ह्यांच्या चवीत जास्त फरक नसणार आहे. बाकी तुझं झटपट इम्प्रोव्हायझेशनही भारी आहे! Happy

अल्पना, थंडीच्या दिवसांत दिल्लीत ही डाळ नुसती गरमागरम सूपसारखी प्यायला मजा येत असणार निश्चितच!

मंजूडी, रैना, स्वप्ना_तुषार, दक्षिणा... करून बघा आणि सांगा कशी वाटली चव ते!

अरुंधती,मी हि डाळ आज केली ..सगळी पध्दत तुझीच ..फक्त मुगडाळ च्या जागी मसुर डाळ घेतली व पुदीना पाने वगळली.तरी डाळ अप्रतिम झाली..बरोबर पुरीच्या आकाराची छोटी छोटी रोटी केली..एका वेळी तव्यावर ३ रोटी भाजता येतात..बरोबर कांदा ,टोंमॅटो च्या फोडी..मस्त मेनु झाला..

वा! सुलेखा, मान गए... आता मी पण मसुराची अशीच डाळ करुन बघणार!
तुम्ही ज्या छोट्या छोट्या रोट्या केल्यात ना, त्यांना आमच्या शेजारची गुज्जू भाभी 'रोटली' म्हणायची. रोटली अने दाल. Happy

केली.कालच.चिवाला पण खावू घतली.मला पुदिन्याच्या पानांचा स्वाद खूप आवडला पण नवर्याला नाही Sad

अरे हे कसे सुटले माझ्या नजरेतुन? खतरनाक फोटो आलेत वरचे.. पोटभर जेवण झाले आहे आत्ताच तरी तों.पा.सु. बिल्वा तुझी पोळी काय भारी दिस्ते आहे. काय घातले आहेस त्यात?

वल्ला वल्ला.

क्ष... (मिनोती), अगं ही रेसिपी एका साइटवरच नव्हे तर अनेक साइट्सवर आहे. गूगलबाबाला सर्च करायला सांग. तुला वरच्या साइटवरचीच रेसिपी बर्‍याच साइट्सवर सापडेल! Happy त्याच सर्व रेसिप्या धुंडाळून ही वर दिली आहे रेसिपी मी!

Pages