अवधी पध्दतीने मूग डाळ

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 19 June, 2011 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप (लहान) मूग डाळ
१ कांदा बारीक चिरून
१ कांदा पातळ उभा चिरून
दीड चमचा आले व हिरव्या मिरचीचे वाटण
१ टोमॅटोची प्यूरी
चिमूटभर हळद
पाव चमचा जिरेपूड
अर्धा चमचा लाल तिखट
चिमूटभर गरम मसाला पूड
चवीप्रमाणे मीठ
दीड ते दोन चमचे साय/ मलई
पुदिन्याची ताजी पाने
फोडणीसाठी तूप

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम मूगडाळ तीन-चार मिनिटे कोरडी भाजून घ्या. नंतर ती धुवून प्रेशरकुकरमध्ये २ कप पाणी, आले-हिरवी मिरची पेस्ट व बारीक चिरलेल्या कांद्यासह मऊ शिजवून घ्या.

डाळ शिजल्यावर जरा घोटून त्यात टोमॅटो प्यूरी घालून ती पाच ते सात मिनिटे गॅसवर शिजवत ठेवा. त्यात जिरेपूड, गरम मसाला पूड, तिखट, मीठ घाला. मलई/ साय घालून दोन-तीन मिनिटे शिजू द्या.

फोडणी करायच्या भांड्यात थोडे तूप गरम करून त्यात पुदिन्याची पाने परतून घ्या. ती खुटखुटीत झाली की बाजूला काढा व त्याच भांड्यात पातळ उभा चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा पारदर्शक झाला पाहिजे.
परतलेला कांदा व पुदिना पाने डाळीत घाला. गरमागरम डाळ तय्यार! पोळी / ब्रेड/ भाताबरोबर ही डाळ खाता येते.
सजवायचे झाल्यास वरून एखादे पुदिना पान, परतलेला कांदा, मलईचा ठिपका घालून सजवा. (मी नाही सजवली :फिदी:)

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

ही डाळ चवीने तशी सौम्य आहे आणि त्याचवेळी जरा तिखटही लागते. पुदिन्याचा स्वाद मस्त लागतो. मी सवयीने डाळीत चिमूटभर साखर घातली, गूळही घालू शकता, पण खरे तर आवश्यकता नाही. तूप + भात / तूप + पोळीबरोबर अतिशय मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त पाककृती आहे ही. मी काल जीराराईसबरोबर केली होती. एकदम चविष्ट. डाळ आधी भाजून घेतल्याचा मस्त खमंगपणा आणि कांदा नंतर परतून घातलेल्याचा स्वाद एकदम भारी लागत होता. फक्त डाळीचा रंग पिवळा आला होता, तुमच्या सगळ्यांसारखा लाल नाही आला. Sad
पण असो, चव एकदम लई भारी!

तो लाल रंग बहुतेक टोमॅटो प्यूरीमुळे येतो मंजूडी.

एका खेपेस ह्या डाळीत वापरलेला कांदा का टोमॅटो किंचित उतरला होता, करताना लक्षात नाही आलं, तेव्हा त्याची चव नाही लागली बरोबर. Sad पण बाकी वेळांना हिट्ट झाला आहे हा पदार्थ आमच्याकडे!! Happy

Pages